भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४
पॅट्रोक्लसचा अंत्यविधी
मागील भागात सांगितल्याप्रमाणे अकिलीसने हेक्टरची डेडबॉडी रथामागे फरपटत आणली आणि पॅट्रोक्लसच्या चितेजवळ तशीच ठेवून दिली आणि आगामेम्नॉनला सांगितले की उद्या सकाळी लाकडे इ. आणा. सर्व ग्रीकांना अकिलीसने जणू बाराव्याचे जेवण असाव तसे बरेच बैल, बोकड अन रानडुकरे कापून खाऊ घातले. ते हादडून सर्व ग्रीक तृप्त झाले. मग इतर मॉर्मिडन सैनिकांसोबत जेवण करून अकिलीस शांत झोपला. त्याला स्वप्नात पॅट्रोक्लस दिसला आणि त्याला अखेरचे आलिंगन द्यायला म्हणून अकिलीस उठला पण कुठले काय! मग तो तसाच रडू लागला. बाकीचे सैनिकही त्यात जॉइन झाले.
तोवर जवळ असलेल्या इडा पर्वतावरील लाकूडफाटा गोळा करून बाकी लोक आले. सर्व मॉर्मिडन सैनिक युद्धाच्या पोषाखात सज्ज झाले आणि आपापल्या रथांमागोमाग पॅट्रोक्लसकडे निघाले. प्रत्येक मॉर्मिडनने आपल्या केसांची एक बट कापून पॅट्रोक्लसवर टाकली .अकिलीसनेही आपल्या सोनेरी केसांची एक बट कापली आणि मृत पॅट्रोक्लसच्या हातात ठेवली. बर्याच मेंढ्या अन बैलांचा बळी दिला. पॅट्रोक्लसची काही पाळीव कुत्री होती, त्यांपैकी दोन कुत्री मारली. चार घोडे मारले. मागील बुकात सांगितल्याप्रमाणे बारा ट्रोजन योद्धे पकडून आणले होते त्यांचाही बळी दिला. मध आणि इतर उटण्यांनी भरलेले दोन जार्सही ठेवले. मध्यभागी पॅट्रोक्लसचा मृतदेह आणि त्याच्या सभोवती बाकी सर्वांचे मृतदेह अशी चिता सजवली आणि पॅट्रोक्लसला मरणोत्तर सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना केली. शिवाय हेक्टरचा मृतदेह कुत्र्यांनी खावा म्हणून लालूच दाखवली, पण आश्चर्य म्हणजे कुत्री हेक्टरला शिवेनात.
पण का कोण जाणे, चिता पेट घेईना कारण वारे थंड होते. अकिलीसने हात उभावून त्यांची प्रार्थना केली त्यानंतर वारे वाहू लागले आणि चिता धडधडू लागली ती पूर्ण रात्रभर पेटतच होती. चितेभोवती अकिलीस येरझारा घालत होता. अखेरीस त्यालाही झोप लागली. दुसर्या दिवशी सकाळी लोकांनी त्याला उठवले तेव्हा त्याने उरलीसुरली आग वाईन टाकून विझवायची आज्ञा केली आणि एका सोन्याच्या बरणीत, बैलाच्या चरबीच्या दोन थरांखाली पॅट्रोक्लसची पांढरीफटक, काहीशी गरम हाडे ठेवून ती बरणी शामियान्यात नेली आणि जिथे दहन झाले तिथे एक चबुतरा उभारला.
फ्यूनरल गेम्स
आता रिवाजाप्रमाणे वेळ होती गेम्स खेळावयाची!! विविध शारीरिक क्षमतेच्या स्पर्धा ठेवून त्यांसाठी विविध तलवार, खजिना, स्त्रिया, घोडे, कढया, इ. बक्षिसे ठेवलेली होती. या सर्व वस्तू अकिलीस जहाजातून घेऊन आला आणि त्याने विविध स्पर्धांची अनाउन्समेंट केली.
"ग्रीकहो! या स्पर्धांमध्ये पहिला इव्हेंट आहे रथांच्या शर्यतीचा. तुमच्या सर्वांपेक्षा माझे घोडे किती चपळ आहेत हे जगजाहीर आहे, पण आज मी स्पर्धेत भाग घेणार नाही. बाकीच्यांनी अवश्य भाग घ्या आणि आपापले कौशल्य दाखवा."
स्पर्धेसाठीची बक्षिसे खालीलप्रमाणे होती:
पहिले बक्षीसः सर्व कलांमध्ये पारंगत अशी एक स्त्री, शिवाय एक तीन पायांची कढई. त्यात २२ अँफोरे तरी पाणी मावेल.
दुसरे बक्षीसः सहा वर्षे वयाची एक अनटेम्ड घोडी.
तिसरे बक्षीसः ४ अँफोरे भरून पाणी मावेल इतकी मोठी तिपायी कढई.
चौथे बक्षीसः २ टॅलेंट भरून सोने.
पाचवे बक्षीसः एक जार.
(सोन्याला महत्त्व कमी असल्याचे लक्षात आले असेलच.)
युमेलस, डायोमीड, मेनेलॉस, नेस्टॉरपुत्र अँटिलोखस (याला नेस्टॉरने जाताजाता रथांची रेस कशी जिंकावी? यावर नेहमीप्रमाणे एक प्रवचन देऊन पाठवले.) आणि मेरिओनेस हे पाचजण शर्यतीत भाग घेतो म्हणून आले. टॉस केल्यावर कोण पुढे, कोण मागे राहणार, इ. निर्णय घेतल्या गेले. अकिलीसने "रेडी-स्टेडी-गो!!!!" चा संदेश दिल्यावर शर्यत सुरू झाली.
मध्ये एके ठिकाणी रस्ता अरुंद होता. मेनेलॉस आणि अँटिलोखस यांमध्ये बेनहर पिच्चरमध्ये दाखवल्यासारखी सिच्युएशन होतेय की काय असे चित्र तयार झाले. अँटिलोखसला मेनेलॉस म्हणाला, की बाबारे रोड लै अरुंद आहे, जरा पुढे जाऊदे अन मग खुशाल मागे टाक. पण डायोमीड पुढे गेल्यामुळे अँटिलोखस चिडला होता. त्याने मेनेलॉसचे ऐकले नाही. त्याला शिव्या घालतच मेनेलॉस पुढे गेला. क्रीटाधिपती इडोमेनिअस आणि धाकटा अजॅक्स यांच्यात तोपर्यंत रेसमध्ये कोण पुढे अन कोण मागे यावरून अल्पगालिप्रदान झाले अन मग अकिलीसने "राजेपणाची जरा लाज बाळगा लोकहो!" करून त्यांना गप्प केले. तोपर्यंत रेस संपली. पहिल्यांदा डायोमीड, त्याच्या मागे अँटिलोखस, त्याच्या मागे मेनेलॉस, अन अनुक्रमे मेरिओनेस आणि शेवटी युमेलस असे रेसर्स फिनिश झाले.
युमेलस हा रथविद्येत एकदम प्रवीण होता. त्यामुळे अकिलीस म्हणाला की तो जरी ढोग नंबर आला तरी त्याला सेकंड प्राईझ दिले पाहिजे. यावर अँटिलोखस म्हणाला खड्ड्यात जा. मी दुसरा आलोय, दोन नंबरवाली घोडी मलाच पाहिजे. अकिलीस म्हणाला ओके आणि मग मांडवली म्हणून युमेलसला एक चिलखत दिले गेले. एवढ्यात मेनेलॉस तणतणू लागला, "हा अँटिलोखस हरामखोर आहे. याचे घोडे माझ्या घोड्यांच्या तुलनेत काहीच नाहीत. याचा निर्णय ग्रीकांनी स्वतःच करावा. याने सगळ्यांसमोर येऊन अपोलोची शपथ घ्यावी की माझ्या घोड्यांचा मार्ग याने मुद्दाम अडवला नाही म्हणून."
अँटिलोखसची अंमळ तंतरली. "सॉरी शक्तिमान!" म्हणून त्याने घोडी मेनेलॉसला दिली. मग मेनेलॉस सुखावला आणि "आयिंदा खयाल रहे" म्हणत त्याने घोडी परत त्याला दिली. अन्य बक्षिसेही त्या त्या क्रमांकाच्या स्पर्धकाला दिली गेली. पाचव्या क्रमांकाची बरणी शिल्लक राहिली होती, ती अकिलीसने नेस्टॉरला भेट देऊन टाकली. बुढ्ढा नेस्टॉर सुखावला आणि नेहमीप्रमाणे त्याने एक प्रवचन दिले. या नेस्टॉरची लेक्चर द्यायची सवय पाहता तो ग्रीकांचा 'आचार्य बाबा बर्वे' होता असे म्हणावयास हरकत नाही. तेही साहजिकच आहे म्हणा. ट्रोजन युद्धाच्या वेळी नव्वदीकडे झुकलेला होता, आणि बाकी वीरांचे बाप पाळण्यात होते तेव्हा त्याने काही फेमस लढायांत भाग घेऊन मोठे शौर्य गाजवले होते.
ते ऐकून घेऊन मग अकिलीसने पुढील इव्हेंट बॉक्सिंग स्पर्धेची अन बक्षिसांची घोषणा केली.
"जो जिंकंल त्याला हे सहा वर्षे वयाचं खेचर मिळंल अन हरलेल्याला ह्यो वाईनचा कप. हाय का कोण बॉक्सिंग करणार?" एपिअस आणि युरिआलस नामक दोघे बॉक्सर उभे राहिले. डायोमीडने युरिआलसच्या हातात बैलाच्या कातड्याचे हँडग्लोव्ह्ज घातले आणि म्याच सुरू झाली. दोघेही घामाने न्हाऊन निघाले होते. अखेरीस बॉक्सिंगमध्ये पटाईत असलेल्या एपिअसने युरिआलसच्या बरोब्बर तोंडावर एक ठोसा असा मारला, की युरिआलस खाली कोसळला, एका बुक्कीत गार झाला. कसाबसा उठला तेही रक्त ओकत ओकत. ती दशा पाहून एपिअसनेही त्याला आधार दिला आणि बसते गेले. बक्षिसे वाटली गेली.
मग सुरू झाला तिसरा इव्हेंट-कुस्तीचा!! यात जिंकणार्याला एक भलीथोरली कढई अन हरणार्याला सर्व कलानिपुण एक स्त्री अशी बक्षिसे जाहीर केली गेली. या बक्षिसांची किंमत प्रेक्षकांच्या मते अनुक्रमे १२ आणि ४ बैलांच्या इतकी होती. थोरला सांड अजॅक्स आणि इथाकानरेश बेरकीसम्राट ओडीसिअस हे दोघे तयार झाले. दोघे एकमेकांना भिडले.कोणीच कुणाला आटपेना. मग बघणारेही कंटाळले तसा अजॅक्स ओडीसिअसला म्हणाला, लै झालं आता. एक तर तू मला उचल नैतर मी तुला उचलतो. मग अजॅक्स ओडीसिअसला उचलताना ओडीसिअसने बेरकीपणे गुडघ्याच्या मागच्या बाजूला लाथ घातली. त्यामुळे अजॅक्सचा ब्यालन्स गेला आणि दोघेही खाली कोसळले. ग्रीकांना जरा आश्चर्य वाटले. मग ओडीसिअसने अजॅक्सला उचलले, पण अजॅक्स म्हणजे ग्रीकांचा भीम होता. तो काय असा सहजासहजी उचलला जातोय थोडीच? कैलास पर्वत उचलताना रावणाची झाली तशी ओडीसिअसची गत होऊ लागली. जमिनीपासून जरा उगीच वर उचलले खरे पण नंतर काय झेपेना. शेवटी दोघेही पुन्हा कोसळले. तिसर्यांदा ते दोघे भिडणार एवढ्यात अकिलीस म्हणाला, "भावांनो बास. लै दमलात, आता अजून दमू नका. प्रत्येकाला सारखं बक्षीस देतो." मग ते दोघे आपल्या कपड्यांवरची धूळ झटकत तिथून निघून गेले.
यापुढचा इव्हेंट होता रनिंग रेस!! पहिले बक्षीस म्हणून चांदीचे एक अप्रतिम भांडे तर दुसरे बक्षीस म्हणून एक गच्च भरलेला बैल आणि तिसरे बक्षीस म्हणून अर्धा टॅलेंट सोने जाहीर केले गेले.
मग धाकटा अजॅक्स, ओडीसिअस आणि नेस्टॉरपुत्र अँटिलोखस हे तिघे उभे राहिले. अँटिलोखस या दोघांपेक्षा बराच तरुण होता. रेस सुरू झाली. धाकटा अजॅक्स सर्वांत पुढे होता. पण ओडीसिअस जीव खाऊन पळू लागला. दोघांमधील अंतर कमी होऊ लागले आणि एवढ्यात धाकट्या अजॅक्सचा पाय कुठल्यातरी प्राण्याच्या पडलेल्या कातडीला लागून सटकला आणि तो धाडकन खाली पडला-तोंडात शेण गेले. यथावकाश रेस संपली, ओडीसिअसला चांदीचा कप मिळाला आणि तोंडातले शेण बाहेर काढत धाकटा अजॅक्सही आपापला बैल घेऊन निघून गेला. अँटिलोखसने सोने घेतले आणि काका लोकांच्या स्टॅमिनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. "अजॅक्स आणि ओडीसिअस दोघेही माझ्यापेक्षा शीनियर आहेत बरेच तरी रेसमध्ये तरुणांना हरवले. क्या बात है!!" हे ऐकून अकिलीसने आनंद व्यक्त केला आणि अँटिलोखसला अजून अर्धा टॅलेंट सोने दिले."मी तुझ्यावर प्रसन्न आहे!! हे घे सोने, तू भी क्या याद रखेगा!!"
पुढचा इव्हेंट होता चिलखत वैग्रे सर्व घालून युद्ध. जो कोणी प्रतिस्पर्ध्याला जखमी करून पहिल्यांदा रक्त काढेल तो जिंकेल अशी अट होती. जिंकणार्याला एक धारदार तलवार आणि एक चिलखत दोघांना सामाईक, शिवाय दोघांना अकिलीसकडून एक डिनर प्रत्येकी अशी बक्षिसाची ऑफर होती. मग थोरला अजॅक्स आणि तरणाबांड डायोमीड हे चिलखत घालून तयार झाले. दोघांचा आवेश आणि चापल्य पाहून बघणारे ग्रीक गुंगून गेले. अजॅक्सने डायोमीडची ढाल भेदली, पण चिलखतामुळे डायोमीड वाचला. तो अजॅक्सच्या मानेचा भाल्याने वेध घेऊ पाहत होता आणि त्यासाठी अजॅक्सवर तीनदा तरी झेपावला. ते पाहून अजॅक्स मरतो की काय असे वाटून ग्रीकांनी दोघांना आता बास करण्याबद्दल विनवले. मग खेळ संपला आणि अकिलीसने डायोमीडला धारदार थ्रेशियन तलवार भेट दिली.
नंतरचा इव्हेंट होता थाळीफेक. धातूची जड थाळी जो सर्वांत लांब फेकेल त्याला किमान पाच वर्षे पुरेल इतके लोखंड दिले जाणार होते. एपिअस (बॉक्सिंगवाला), पॉलिपोएतेस, थोरला अजॅक्स आणि लेऑन्तेउस हे चारजण पुढे आले. पॉलिपोएतेसचा थ्रो सर्वांत दूरवर गेला आणि त्याला लोखंड बक्षीस मिळाले.
मग सेकंडलास्ट इव्हेंट होता धनुर्विद्येचा. एका जहाजावर एक कबूतर पाय बांधून ठेवले आणि जो फक्त दोरी तोडेल त्याला दहा कुर्हाडी तर जो कबुतराचा वेध घेईल त्याला दहा परशू मिळतील असे जाहीर केले. मेरिओनेस आणि धनुर्धारी ट्यूसर हे दोघे पुढे आले. टॉस केला, पहिल्यांदा ट्यूसरचा चान्स आला. ट्यूसरने नेम धरला पण फक्त दोरी तुटली आणि कबुतर हवेत उडाले. मग मेरिओनेसने जराही वेळ न दवडता ट्यूसरच्या हातातून धनुष्यबाण हिसकावून घेतले आणि हवेतल्या हवेतच कबुतराला मारले. तो बाण जहाजाच्या शिडात रुतून बसला आणि हळूहळू त्यासहित मेलेले कबूतरही खाली पडले. ठरल्याप्रमाणे मेरिओनेसला दहा परशू तर ट्यूसरला दहा कुर्हाडी दिल्या गेल्या.
शेवटचा इव्हेंट भालाफेकीचा होता. जिंकणार्याला बक्षीस म्हणून एक नक्षीकाम केलेली कढई मिळणार होती. आगामेम्नॉन आणि मेरिओनेस दोघेही उभे राहिले. अकिलीस म्हणाला की भालाफेकीत आगामेम्नॉन जगात भारी आहे. त्यामुळे त्याला हवे तर कढई देतो पण मेरिओनेसला एक ब्राँझचे टोक असलेला भाला देऊदे. आगामेम्नॉनने संमती दिल्यावर टॅल्थिबियस नामक त्याचा सारथी कढई त्याच्या शामियान्यात घेऊन गेला आणि स्पोर्ट्स इव्हेंट संपले.
प्रिआमची यशस्वी गांधीगिरी.
या शेवटच्या बुकात प्रिआमच्या डेरिंगचे अन हेक्टरच्या दहनविधीचे वर्णन आलेले आहे. हेक्टरला मारले, पॅट्रोक्लसला दहन केले आणि मरणोत्तर गावभरचे गेम्स खेळून झाले तरी अकिलीसचे दु:ख काही केल्या शमत नव्हते. तशातच तो सैरभैर होत वेड्यागत इकडेतिकडे फिरू लागला आणि हेक्टरची डेड बॉडी पुनरेकवार रथाला जोडून फरपटत नेत पॅट्रोक्लसच्या शवाला प्रदक्षिणा घातल्या. गेले बारा दिवस हाच क्रम चालला होता. पॅट्रोक्लसच्या मरणाचे इतके दु:ख झाले त्याअर्थी या दोहोंमधील नाते शारीर पातळीवरही असावे असे तर्क मांडले जातात. नक्की कुणाला काहीच माहिती नाही, पण प्राचीन ग्रीसमध्ये गेगिरी कॉमन होती तुलनेने अन त्याबद्दल लोकांचा दृष्टिकोनही तुलनेने उदार होता. त्यामुळे असेलही. खुद्द आगामेम्नॉनबद्दलही अशी एक कथा प्रचलित आहे. त्याचा एक 'लव्हर' नदीत पोहत असताना मेल्यावर आगामेम्नॉनला लै दु:ख झाले अन त्याने त्याबद्दल बराच शोक व्यक्त केला अन त्याची समाधीही बांधली. असो.
इकडे हेक्टर मरून बारा दिवस झाले तरी पोराची डेड बॉडी तशीच आहे याचे दु:ख प्रिआमला सहन होईना. शेवटी तो एका निश्चयाने उठला. त्याच्या इतर सर्व पोरांना त्याने लै शिव्या घातल्या. " सगळे साले एकापेक्षा एक बिनकामाचे आहेत!! तुमच्यापेक्षा हजारपटीने सरस असलेला हेक्टर मरून पडलाय. तुमची लायकी रणांगणात सिद्ध करा, माझ्यापुढे तोंड घेऊन येऊ नका. माझा रथ तरी किमान तयार करता येतो का बघा. हला इथून!"
मग अकिलीसला खजिना द्यायला म्हणून त्याने बारा रग, बारा कोट, बारा अंगरखे, बारा मँटल(हाही कपड्याचाच एक प्रकार असावा बहुधा), दहा टॅलेंट सोने, दोन तिवया, चार कढया अन थ्रेशियन लोकांनी भेट म्हणून दिलेला एक अतिशय सुंदर नक्षीकाम असलेला कप इतके सामान घेऊन तो निघाला. काहीही करून हेक्टरचे पार्थिव परत आणायचेच, असा त्याचा निग्रह होता.
जाण्याआधी बायको हेक्युबाबरोबर झ्यूसदेवाला एक वाईनचा कप अर्पण करून प्रिआम आपल्या इदाएउस नामक सारथ्याबरोबर निघाला. ट्रॉयच्या वेशीपर्यंत त्याचे पुत्र आणि जावई त्याला घालवायला आले होते. तो पुढे गेल्यावर तेही परत निघून गेले. वेळ रात्रीची होती. प्रिआमला बाहेर गेल्याबरोबर एक मॉर्मिडन सैनिक दिसला. त्याची फुल तंतरली. आता हा मारतो की काय अशा दुग्ध्यात असतानाच तो मॉर्मिडन सैनिक त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, "अरे म्हातार्या, या मैदानभर पसरलेल्या ग्रीकांची तुला भीती वाटत नाही का? इतका खजिना घेऊन जाताना तुला अजून कुणी पाहिलं तर खातमाच करेल तुझा. पण मी तुला काही करणार नाही, कारण तुला पाहून मला माझ्या बापाची आठवण येतेय, तोही तुझ्याइतकाच म्हातारा आहे."
प्रिआम उत्तरला,"देवागत धावून आलास रे पोरा." त्याने सुटकेचा नि:श्वास टाकल्यावर तो मॉर्मिडन परत प्रश्न विचारू लागला, "पण एक सांग, अगदी खरं खरं सांग- हा इतका खजिना घेऊन तू युद्धाच्या भीतीने कुठं दूरदेशी चाललायस की तुझा शूर मुलगा मेल्यामुळे ट्रॉय सोडून चाललायस?"
प्रिआम अंमळ ब्रेकडाउन झाला आणि विचारू लागला, की हेक्टरबद्दल त्याला कसे काय सगळे माहिती ते. मग त्या मॉर्मिडनने स्वतःची कर्मकहाणी सांगितली आणि प्रिआमला हळूच कुणाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीने स्वतः अकिलीसपर्यंत घेऊन गेला. प्रिआमने त्याला एक लहानसा कप देऊ केला, पण अकिलीसला ठाऊक नसताना हे घेतले तर तो मला मारेल इ.इ. सांगून त्या बिचार्याने ती भेट नाकारली.
अकिलीसच्या शामियान्याबाहेर प्रिआमचा सारथी इदाएउस बसला आणि प्रिआम सरळ आत गेला. अकिलीस तिथे ऑटोमेडॉन आणि अल्किमस यांसोबत बसला होता. नुकतंच जेवण झालं होतं त्याचं. गेल्यागेल्या प्रिआमने सरळ गुडघे टेकले आणि अकिलीसच्या हातांचे चुंबन घेतले. अकिलीस आणि बाकीचे दोघे परम आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात तोवर प्रिआम म्हणाला, "अकिलीस,तुझ्या बापाला आठव. मीही वयाने त्याच्याइतकाच आहे. हे युद्ध सुरू झालं तेव्हा माझे पन्नासच्या पन्नास पुत्र जिवंत होते-त्यांपैकी एकोणीस एकट्या हेक्युबा राणीपासून झालेले. आज त्यांपैकी कितीतरी तुझ्या हाताने मेलेत. हेक्टरलाही तू मारलंस. त्याचं पार्थिव मी घ्यायला आलोय. माझ्यावर दया कर. आजवर असा प्रसंग कुणावरही आला नसेल. ज्याने माझ्या पोरांना क्रूरपणे ठार मारलं त्याच्याच हातांचं चुंबन मला घ्यावं लागतंय. आजवर कुणालाही इतकं मन घट्ट करावं लागलं नसेल जितकं मला करावं लागलंय."
हा ऐकून अकिलीसच्या मनावर खोलवर परिणाम झाला. प्रिआम आणि अकिलीस दोघेही आपापल्या प्रियजनांसाठी पुन्हा रडू लागले. दु:खाचा भर ओसरल्यावर अकिलीसने प्रिआमला धरून बसते केले आणि म्हणाला,"इतक्या कडक ग्रीक पहार्यातून एकट्याने इकडे येणे म्हणजे लोकोत्तर डेरिंगचे काम आहे. तुझ्या या धाडसाला मी सलाम करतो. पण असे रडून काही फायदा नाही, काही झालं तरी हेक्टर काही पुन्हा जिवंत होऊ शकत नाही."
प्रिआम म्हणाला,"बाकी सोड, हेक्टरचं शव पडलंय ते मला दे आणि त्या बदल्यात हा खजिना घे."
अकिलीस अंमळ चिडून म्हणाला,"माहितेय रे, देतो तुला परत. कुणा देवाची तुला मदत असल्याखेरीज हे शक्य होणे नाही." असे म्हणून त्याने आपल्या नोकरांना आज्ञा केल्यावर त्यांनी प्रिआमचा खजिना ताब्यात घेतला, हेक्टरची डेड बॉडी नीट धुतली, सुगंधी उटणी लावली, शवाला स्वच्छ कपडे घातले आणि अकिलीसने स्वतः रथावर तिरडी ठेवून त्यावर नीट बांधून ठेवले.
त्यानंतर अकिलीस म्हणाला,"तुझ्या इच्छेप्रमाणे हेक्टरचं शव मी परत केलं. उद्या पहाटे निघून जा इथून, तोपर्यंत रात्रीचं जेवण करून घे." असं म्हणून त्याने चांदीसारखी पांढरी शुभ्र लोकर असलेली एक मेंढी मारली, लहानलहान तुकडे करून ते नीट भाजले. अकिलीसचा सारथी ऑटोमेडॉन टोपलीतून ब्रेड घेऊन आला. सोबत वाईनचे सेवनही चालले. जेवता जेवता प्रिआमचे लक्ष अकिलीसकडे गेले. अकिलीस दिसायला देखणा होता. प्रिआम त्याच्या व्यक्तिमत्त्वाने चांगलाच प्रभावित झाला. अकिलीसही प्रिआमच्या शहाणपणाची अन समजेची आणि एकूणच 'मॅनर्सची' मनोमन तारीफ करत होता.
जेवण झाले आणि प्रिआमने अकिलीसला विनवले,"हेक्टर मरण पावला त्या दिवसापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही लागला.धड जेवणही मला जात नव्हतं. जेवल्यावर आता मला झोप येतीय, तरी प्लीज झोपूदे." अकिलीसने लगेच लोकरीचं अंथरूण-पांघरूण आणून झोपेची जय्यत तयारी केली. झोपण्याआधी अकिलीस मजेने म्हणाला, "आत्ता जर कुणी माझ्याकडे आला आणि तुला इथं झोपलेलं पाहून आगामेम्नॉनकडे चुगली केली तर??? ते एक असो. हेक्टरसाठी सुतक किती दिवस पाळणार? म्हणजे तेवढे दिवस आम्ही युद्ध करणार नाही म्हणून विचारलं आपलं."
"अकरा,", प्रिआम उत्तरला.
"ठीक," अकिलीस म्हणाला. शामियान्याच्या बाहेरच्या बाजूस प्रिआम आणि त्याचा सारथी इदाएउस हे दोघे झोपले तर आतल्या बाजूस अकिलीस ब्रिसीसबरोबर झोपला.
थोडा वेळ गेल्यावर प्रिआमच्या मनात शंका फेर धरून नाचू लागली. असे झोपलेले कुणा ग्रीकाने पाहिले तर? सरळ पकडून आगामेम्नॉनकडे देईल. मग ट्रॉयचे काय होईल? हे भय त्याला झोपू देईना. तसाच तो उठला, इदाएउसलाही उठवले अन दोघे खोपचीतून कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने ट्रॉयमध्ये निघून गेले.
ट्रॉयमध्ये प्रिआमला पाहिल्यावर गेटपाशीच आकांत उसळला. हेक्टरची बायको अँद्रोमाखी, आई हेक्युबा अन वहिनी हेलेन या तिघीही आकांत करीत होत्या. नऊ दिवस असा शोक केल्यावर दहाव्या दिवशी इडा पर्वतातून लाकूडफाटा आणून हेक्टरला अग्नी दिला, अन अकराव्या दिवशी त्याच्या अस्थी गोळा केल्या आणि एका जांभळ्या कापडात गुंडाळून सोन्याच्या बरणीत ठेवल्या. दहनस्थानी स्मृत्यर्थ एक उंचवटा उभारला आणि बाराव्याची मेजवानी जेवू लागले.
अशाप्रकारे ट्रोजनांनी घोडे माणसाळवण्यात निपुण असलेल्या हेक्टरचे अंत्यविधी पार पाडले. (And thus did they celebrate the funeral of Hector, tamer of Horses.)
हेक्टरच्या मरणानिशी इलियडही संपते. पूर्ण इलियडमध्ये जवळपास २-३ महिन्यांचाच कालावधी येतो.
प्रतिक्रिया
11 Jan 2014 - 6:38 pm | बॅटमॅन
इथे इलियडचे २४ वे बुक अन त्याबरोबर इलियड संपते.
11 Jan 2014 - 8:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे
लय भारी लेखमाला रे !! मुंबईत पाय ठेवाल तेव्हा एक ट्रीट लागू.
आजवर फार प्रतिसाद दिले नव्हते, कारण दर वेळेस तेच तेच काय लिहीणार. :-)
11 Jan 2014 - 8:03 pm | पैसा
झकास भाषांतर अन सारांश! या मालिकेमुळे ग्रीकांच्या त्या काळच्या राहणी, चालीरीती यांची मस्त माहिती मिळाली. अंत्यविधी आणि नंतरचे खेळ, त्यावरची बक्षीसे वगैरे सगळंच काही वेगळं वाटलं. पण अगदी खरं सांगायचं तर महाभारताशी याची तुलना करू नये. महाभारत ते महाभारतच!
11 Jan 2014 - 8:16 pm | बॅटमॅन
बहुत धन्यवाद!
महाभारत अन इलियड यांची तुलना होत नाही कारण इलियडमध्ये थोड्या कालावधीतील काही विशिष्ट प्रसंगांचेच वर्णन आलेले आहे. महाभारताची गोष्टच वेगळी. ती का वेगळी याला बरीच कारणे आहेत. जय पासून भारत अन तिथून महाभारत असा प्रवास इलियडचा झाला नाही याचे कारण म्हणजे मुळातच मर्यादित स्कोप आणि नंतर अथीनियन राजा पिसिस्त्रातोस याच्या काळात इलियड अन ओडिसीची लेखी व्हर्जन तयार करण्यात आली जी पुढे अलेक्झांड्रियातील विद्वानांनी क्रिटिकल एडिशनमध्ये रूपांतरित केली अन तीच पुढे स्टँडर्ड मानण्यात आली. तो सर्व इतिहास पुढे येणार आहे. आत्ता ही लेखमाला फक्त एकतृतीयांश पूर्ण झालीये असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अजून चिकार भाग येणार आहेत. :) मुळात कथाच अजून संपली नाहीये :) आता इथून पुढे अकिलीसादि योद्धे मरणार, लाकडी घोडा आणून ट्रॉयमध्ये घुसणार, मग ट्रॉयचा विनाश, मग परतीचा प्रवास - हे सर्व बाकी आहे. तेव्हाच ओडिसीवरही असे तीनेक लेख तरी येतील असा अंदाज आहे.
शक्य तितका या सर्व गोष्टींचा विस्तृत आढावा द्यायचा प्रयत्न आहे, तस्मात तुम्ही उपस्थित केलेल्यांपैकी बरेच प्रश्न म्हणा कमेंट म्हणा, त्यांचा परामर्श यथाशक्ती घेणारच आहे. :)
11 Jan 2014 - 8:25 pm | पैसा
हे सगळे लेख फटाफट येऊ देत! पण तरीही या कथेचा कालखंडसुद्धा महाभारताच्या मानाने बराच मर्यादित असावा. ट्रोजन व्हायरसमुळे ट्रोजन हॉर्स माहित आहेच. पण डिटेल वाचायची उत्सुकता आहेच. जरा लवकर लवकर लिही. नाहीतर तुला लिखाण पुरे होईपर्यंत कुठेतरी एकांतात कोंडून घालावे लागेल!!
11 Jan 2014 - 8:31 pm | बॅटमॅन
येस मॅम!!! अर्थातच लौकर लिहिणारे.
ही कथा त्या एका मोहिमेवर आधारलेली आहे आणि त्याचा कालखंड तीसेक वर्षे आहे. तसे ३-४ पिढ्या आधीचे रेफरन्सेस बरेच येतात-वीरांच्या वंशावळी लिहिताना. पण तो भाग मुख्य कथेस अनावश्यक म्हणून मी गाळला आहे. महाभारत पार शांतनू ते परीक्षित-जनमेजयापर्यंत जाते तसे इथे नाही. युद्ध हाच इथे गाभा आहे, मात्र महाभारताच्या तुलनेत हे युद्ध लै म्हणजे लैच दिवस लांबले.
11 Jan 2014 - 8:35 pm | जेपी
troy चित्रपट पाहिल्यावर हा विषय वाचायचा प्रतत्न केलता पणा किचकट असल्यामुळे मागे पडला . धन्स बॅटमॅन मराठीत आणल्यामुळे .
अंवातर -अंजावर ट्राय युद्धाची बरीच चित्रे आहेत टाकयला जमल्यास बघ .
11 Jan 2014 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
...ते हादडून सर्व ग्रीक तृप्त झाले...बाबारे रोड लै अरुंद आहे, जरा पुढे जाऊदे अन मग खुशाल मागे टाक....यावर अँटिलोखस म्हणाला खड्ड्यात जा. मी दुसरा आलोय...लोकोत्तर डेरिंगचे काम...ई ई ई
लै म्हंजे लैच भारी लेखनशैली. लेखन छापण्याजोगे आहे. ग्रीसला जाताना एक छापील प्रत किंवा गेला बाजार एखादा प्रिटऔट तरी होमरच्या समाधिवर ठेवायला घेऊन जा. होमरबाबा नक्कीच, "ये भाषा लैच भारी हय. आपूनकोबी शिकवो ना बाप." असं म्हणत मागे लागेल ;)
पुढचे भाग भराभर टाकनेका. म्हंजे कैसा की घाटमे गाडीका मोसम नै टूटनेको मंगता. क्या?
11 Jan 2014 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
शाला ते 'पॅट्रोक्लस'चा चे जागी सार्का 'पेट्रोमॅक्स' वाचत होता मी !
12 Jan 2014 - 12:44 am | प्रचेतस
मायला, जबरी आहे हा भाग.
अकिलीसने ग्रीकांना खाऊ घातलेले जेवण पाहून रंतिदेवाच्या यज्ञाची आणि त्याजबरोबर म्हशीची पण आठवण होऊन डोळे पाणावले.
बाकी ऑलिंपीक गेम्सचा उगम ह्या इलियडमध्ये होता की काय असे वाटून गेले. सगळे खेळ तसेच.
पुढचे भाग टाक बे पटापट आता.
12 Jan 2014 - 1:38 am | बर्फाळलांडगा
अजुन येउदे.
12 Jan 2014 - 3:05 am | अर्धवटराव
माणसाची रग काय पकडली आहे बॅट्याने. एकदम सही.
12 Jan 2014 - 3:12 am | बॅटमॅन
धन्यवाद अर्धवटराव. ही अर्थातच होमरची देणगी आहे हेवेसांनल :) अख्खा समाज उभा करतो डोळ्यांसमोर.
12 Jan 2014 - 3:08 am | बॅटमॅन
विश्वनाथ मेहेंदळे & तथास्तु: धन्यवाद!! बादवे पिच्चर अभी भौत बाकी है :)
इस्पीकचा एक्का: बहुत धन्यवाद सरजी!!! इन्शा-झ्यूस, जाईन तेव्हा इलियड तरी नक्की घेऊनच जाईन तिथे!!! :)
वल्ली: रंतिदेव चंबळवाले हाहाहा =)) अन ऑलिंपिक गेम्सचा उगम इसपू ७७६ असा परंपरेने सांगतात पण त्याच्या आधीपासून गेम्सची परंपरा अस्तित्वात होती हे इलियडमध्ये कळते खरेच.
बर्फाळलांडगा: बहुत धन्यवाद :)
अन लवकरच टाकेन पुढचे भाग हेवेसांनल. :)
12 Jan 2014 - 12:18 pm | अभ्या..
एक लम्बर झाली बघ लेखमाला. जब्राच्च एकदम.
पण ब्याट्या ज़रा तेंच्या इतिहासात कुठे उलट्या मुठिला थुक्का लावून ट्याम्प्लिज ची बोत होती का तेवढे हुडकुन काढ. ;-)
म्हणजे युध्द कवा अन इतर आक्टिव्हिटि कवा करायचे ते तर समजल. :-D
14 Jan 2014 - 1:39 am | बॅटमॅन
हा हा हा ;) धन्यवाद रे अभ्या. :)
12 Jan 2014 - 9:57 am | तिमा
लुप्त झाल्यामुळे परत लिहित आहे. पुढील भागांची वाट पहातो आहे.
12 Jan 2014 - 9:59 am | अजया
____________________________/\___________________________________
13 Jan 2014 - 3:04 pm | इशा१२३
आता पुढच्या कथेचे वेध लागलेत..त्यामुळे लवकर येउ द्या पुढचा भाग!
13 Jan 2014 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर !!
13 Jan 2014 - 6:28 pm | आदिजोशी
अजून अनेक भाग शिल्लक आहेत हे ऐकून अत्यंत आनंद झाला. येउ देत फटाफट पुढचे भाग :)
14 Jan 2014 - 1:38 am | बॅटमॅन
तिमा, अजया, ईशा, प्रसाद अन आदिजोशी: बहुत बहुत धन्यवाद! पुढचे भाग लौकरच येतील :)
14 Jan 2014 - 3:06 am | निशदे
एकदम झक्कास.......
पुढचे भाग येताएत हे वाचून बरे वाटले....... लवकर येऊद्यात. :)
14 Jan 2014 - 10:07 am | प्रशांत
एकदम सही
असेच पुढचे भाग लवकर येऊदेत