पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने हे विडंबन सुचले.संदर्भासाठी,खाली,भा.रा.तांबे यांची मूळ कविता देत आहे.
घन टमी,पँट बघ घट्ट करी
रे खिन्न मना,मेदवृद्धी ही खरी
ये बाहेरी व्यायाम करुनी
शुद्ध मोकळ्या हवेत
का बसशी,कोचातच रुतुनी
रे! मार बैठका जोर तरी
जड झाले, अति गोड खादले
स्नायु नुरे,बेढब तनु डुले
मेद जमे,बघ पोटही सुटले
का मरणाशी खेळ चाले
मना,वृथा का भीशी जगण्या
दार सुखाचे ते निसर्ग भ्रमणा
वसुंधरा पाहे वाट मना
पसरोनी शेला हिरवा परी
मूळ कविता:-
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना,बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भीशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी
प्रतिक्रिया
10 Jan 2014 - 8:41 pm | कवितानागेश
हीहीहीही!!!! :P
10 Jan 2014 - 8:47 pm | विकास
एकदम मस्त आहे. (सॉल्लीड म्हणजे मस्त असा अर्थ घ्यावा, "घन" असा नको!)
10 Jan 2014 - 11:14 pm | मिसळपाव
होतास की काय इतक्यात? !
10 Jan 2014 - 8:49 pm | धन्या
मस्त जमलीय !!!
10 Jan 2014 - 9:27 pm | पैसा
भयंकर वजनदार विडंबन!
11 Jan 2014 - 2:55 pm | भावना कल्लोळ
सहमत
10 Jan 2014 - 9:31 pm | सूड
ह्म्म जमलंय.
पँट चं अनेकवचन पँट्स असं होतं असं आम्हाला शाळेत शिकवलं होतं.
10 Jan 2014 - 9:33 pm | पैसा
त्यांनी घागर चं घागरी होतं तशा प्रकारे लिहिलंय रे. त्यातून अर्थाचा अनर्थ झाला तरी विडंबन असल्याने चालून जाईल!
10 Jan 2014 - 9:34 pm | पैसा
स्वाक्षरी नोटेड! =))
10 Jan 2014 - 10:22 pm | यसवायजी
सूड्राव्, अहो मराठीत अनेकवचन असंच अस्तय. उदा:- टेबल- टेबलं. प्लेट-प्लेटी. तसंच पॅन्ट - पॅन्टी.
मराटीत लिवलंय.. तं मराटीत्लाच अर्त घ्याचा. ;)
10 Jan 2014 - 11:41 pm | प्यारे१
प्यान्टा म्हणा की सरळ! उगा तरास नको!
11 Jan 2014 - 12:17 am | सूड
मराटीत ईजार लिवतंत मरे!! काय तरी दिवस आले हत, हो कानडी येव्न माका मराटी शिकवताहां. ;)
11 Jan 2014 - 1:04 am | बॅटमॅन
वरचे कोङ्कणीसदृश बघोन कानड्यांनी मराठी शिकविणे योग्यच आहे असा पैठणपीठाधिपतींचा आदेश आहे ;)
(सीमाभागाभिमानी) ब्रूसण्णा वेनाप्पा.
13 Jan 2014 - 9:24 pm | सूड
कोकणी खंयसून इली? मालवणीत लिवलाहां तां.
13 Jan 2014 - 9:34 pm | बॅटमॅन
कोंकणीसदृश म्हणालो रे मेल्या!!! आम्हा देशावरच्यांना कोंकणी काय मालवणी काय सगळं सारखंच!
10 Jan 2014 - 9:37 pm | सुहास..
:)
आठवणीमै बातां : रंगाकाकाची अशीच एक अकविता होती का ?
मैं और मेरी बेली अक्सर ये बाते ...
10 Jan 2014 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
धमाल !
11 Jan 2014 - 12:00 am | आनंदी गोपाळ
तुम्ही पँटी का घातलीत? पँटी हे एक स्त्रीजातीच्या मनुष्यांनी वापरावयाचे अंतर्वस्त्र असते ना?
;)
11 Jan 2014 - 1:20 am | अत्रुप्त आत्मा
घन टमी,पँट बघ घट्ट करी
रे खिन्न मना,मेदवृद्धी ही खरी>>> ह्या..ह्या..ह्या.. =)) मस्त विडंबन.
11 Jan 2014 - 1:24 am | बॅटमॅन
तिमांचा विडंबिक अभ्यास बाकी लैच जबराट बघा =)) अन्यत्र तिमांनीच बहुतेक स्ट्रेचलॉनला खेचलॉन हा शब्द वापरला होता.
पण इथे फिनिश अंमळ कमी पडले असे वाटले. घन टमी वर सिक्सर मारून सुरुवात केली पण तिसर्या कडव्यातली फटकेबाजी चौथ्यात अंमळ मेडन ओव्हरीगत वाटली.
हायलाईट म्हणजे घन टमी ही संज्ञा. याने अन तिसर्या कडव्यातील फटकेबाजीने मात्र आम्ही फ्ल्याट झालो ते अजून त्रिमित होतच आहोत =))
11 Jan 2014 - 1:24 am | नंदन
विडंबन आवडलं. पुरोगामी औदार्याच्या व्यथा अगदी नेमकेपणाने मांडल्या आहेत ;)
11 Jan 2014 - 1:39 am | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
नंदनशेठ ने एक ही बात क्या बोली है...बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है =))
धन्य _/\_
11 Jan 2014 - 8:42 am | तिमा
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. प्रतिसाद पण मस्तच आहेत. विशेषतः नंदन यांचा 'पुरोगामी औदार्याचा'!
पँटी लिहिल्याने अर्थाचा अनर्थ झाला हे मान्य. पण मराठी लेकरु हाय,समजून घ्यावा.
11 Jan 2014 - 2:28 pm | वेल्लाभट
काय वजन आहे राव काव्याला ! आहाहाअहाहा ! बेस्ट लईच्च्च आवडलं. पण दुसरा तिसरा अंतरा तितका जमला नाही जितकं धृवपद आणि पहिला अंतरा जमला....
एनिवेज.....
विडंबन जबरदस्त म्हणू मी
तव प्रतिभा असे ही खरी
11 Jan 2014 - 3:18 pm | सस्नेह
पयल्या ओळीलाच लोल !
12 Jan 2014 - 9:37 pm | अमेय६३७७
झकास जमले आहे.
12 Jan 2014 - 9:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
"तुमची सही" या कवितेतल्या प्रॉब्लेमवर एक सही उपाय आहे ;)
13 Jan 2014 - 9:44 pm | सूड
घन टमी, मेद बघ माज करी
रे लाव आता जिम जरा तरी
ये बाहेरी दंड ठोकूनि
फिर मोकळ्या वातावरणी
का तडमडशी खुर्चीत बसूनि
रे मार सपात्या जरा वरी
तितकंसं मनासारखं झालं नाही पण द्यायचा मोह आवरला नाही.