पॅट्रोक्लसच्या प्रेताभोवती तुंबळ कापाकापी होते.
मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले. उद्देश अर्थातच त्याचे चिलखत काढून घेणे हा होता. संपूर्ण इलियड आणि एकूणच ट्रोजन युद्धात अशा प्रकारचे प्रसंग खूपदा आलेले आहेत आणि त्यांतून कथानकाला अनपेक्षित कलाटणीही मिळालेली आहे.
तर त्याच्या प्रेताभोवती पहिल्यांदा आला मेनेलॉस-त्याची डेड बॉडी ग्रीक बाजूला परत न्यावी म्हणून. तोवर युफोर्बस नामक एक ट्रोजन योद्धा आला आणि किरातार्जुनीयातल्याप्रमाणे दोघांची बाचाबाची सुरू झाली. शेवटी मेनेलॉसने त्याच्या अंगात भाला खुपसून या वादाचा कंडका पाडला आणि त्याच्या अंगावरील चिलखत काढून घेतले. इकडे हेक्टरला मेन्तेस नामक एका सेनापतीने ओरडून पुनः युद्धासाठी प्रेरित केल्यावर हेक्टर सेना घेऊन तिथे आला. मेनेलॉस एकटाच पडल्याने मागे हटला, इतके लोक काही त्याच्याने आवरेनात. तोपर्यंत हेक्टरने पॅट्रोक्लसच्या शरीरावरील चिलखत काढून स्वतः घातले होते, कारण ते अकिलीसचे चिलखत होते शेवटी! आपल्याला तोच साईझ येतो की कसे याचा बहुतेक अंदाज घ्यायचा असावा हेक्टरला.
ते पाहताच मेनेलोसने अजॅक्सला हाक मारली, अजॅक्स येताक्षणी हेक्तर मागे हटला. तसे केल्याबद्दल ग्लॉकस नामक सेनापतीने त्याला दूषणे दिली.
ते ऐकून हेक्टरची सटकली."तू पहाशीलच आता मी काय करतो अन कसा लढतो ते!! नाही आणली डेड बॉडी ट्रॉयमध्ये तर नावाचा हेक्टर नाही." असे म्हणून सर्वांना ओरडून म्हणाला, "ट्रोजन्स, लिशियन्स आणि दार्दानियन्स, सर्वजण ग्रीकांशी लढा. मी आता या पॅट्रोक्लसला मारताना काढलेले अकिलीसचे चिलखत घातलेय. जो कोणी मला त्याची डेड बॉडी आणून देईल त्याला मी लुटीचा अर्धा हिस्सा देईन."
हेक्टरबरोबर मोठी सेना डेड बॉडीपाशी आली. ट्रोजन्स लुटीला चटावलेले होते. अजॅक्स आणि मेनेलॉसला कळायचं बंद झालं."च्यायला मेनेलॉस, हे जरा जास्तच आहे. पॅट्रोक्लसच्या डेड बॉडीचं काही का होईना, आपला जीव तरी आता वाचतो की नाही कुणास ठाऊक. हेक्टरनं चहूबाजूंनी नुस्ती गोची करून ठेवलीय. बाकीच्यांना बोलाव जा लौकर." मग मेनेलॉसने हाका मारमारून मेरिओनेस, क्रीटाधिपती इडोमेनिअस, धाकटा अजॅक्स आणि बाकीचेही बरेच ग्रीक बोलावले अन लढाईला तोंड लागले.
ट्रोजन्स तेव्हा हटलेच असते मागे पण एनिअस नामक दबंग तरुण ट्रोजन योद्धा पुन्हा पुढे सरसावला. त्यासोबत बाकीचे ट्रोजनही पुढे सरसावले पण थोरल्या अजॅक्सने ग्रीकांना स्पष्ट बजावून ठेवले होते की कुणीही आपापली जागा सोडून जायचे नाही. त्याप्रमाणे सर्वजण एकमेकांच्या जवळ उभे राहिले. पॅट्रोक्लसच्या प्रेतावर आणि स्वतःवर ढालींचे आवरण घालून भाले पुढे सरसावून अगदी टाईट्ट फॉर्मेशनमध्ये उभे असल्याने ट्रोजनांचा मनसुबा सिद्धीस जाईना. तरी लै मुडदे पडले. कधी ट्रोजन डेड बॉडी आपल्या बाजूला ओढू पाहताहेत तर कधी ग्रीक आपल्या बाजूला. पण तेही तेवढ्यातल्या तेवढ्यात, त्या टीचभर जागेतच. कुणालाच धड मागे हलता येईना की पुढे जाता येईना. दोन्ही बाजू आपापल्या साईडच्या लोकांना आरडून ओरडून चेतवत होत्या.
आता नेक्स्ट प्लॅन काय, अशी विचारणा केल्यावर थोरल्या अजॅक्सने सांगितले, की थोरला व धाकटा असे दोन्ही अजॅक्स पुढे राहून ट्रोजनांपासून डेड बॉडीचे रक्षण करतील आणि कव्हर देतील. तेवढ्यात मेनेलॉस आणि मेरिओनेस या दोघांनी डेड बॉडी उचलून मागे घेऊन परत जावे. डेड बॉडी उचलताना दोघांना लै श्रम पडलले, कारण पॅट्रोक्लस म्हणजे काडीपैलवान नव्हता. त्याला उचलून घेऊन जाताना दोघांच्याही शरीरांतून घामाचे पाट वाहू लागले. इकडे दोन्ही अजॅक्स लोकांनी आघाडी राखून ठेवलेलीच होती. कसेबसे डेड बॉडी नेण्यात ग्रीकांना यश आले खरे पण ट्रोजनांनी लै ग्रीक मारले. दोन्ही अजॅक्स विरुद्ध एनिअस आणि हेक्टर असे लै तुंबळ युद्ध झाले.
अकिलीस आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.
इकडे नेस्टॉरचा मुलगा अँटिलोखस अकिलीसकडे गेला आणि पॅट्रोक्लस मरण पावल्याची बातमी दिली. ते ऐकून अकिलीस एकदम दु:खाच्या गर्तेत कोसळला. दोन्ही हातांत माती खुपसून स्वतःच्या डोक्यावर, चेहर्यावर टाकली आणि हातांनी केस ओढू लागला. ते ऐकून अकिलीसची आई थेटिस (इम्मॉर्टल अप्सरा) समुद्रातून तडक तिकडे आली. "का रडतोएस रे बाळा?"
अकिलीस उत्तरला, "रडू नाहीतर काय करू आई? प्राणापेक्षा प्रिय असा पॅट्रोक्लस मेला, आता जगून तरी मी काय करू. तो मेला तो मेलाच, शिवाय हेक्टर त्याला मारून वर माझे त्याला दिलेले कवच घालून दिमाखात फिरतो आहे. हेक्टरला ठार मारल्याशिवाय मी उजळमाथ्याने जगू शकणार नाही."
यावर मायलेकांमध्ये एक हृद्य संवाद घडला. थेटिसनेही आपल्या दु:खाला वाट करून दिली आणि अकिलीसला सांगितले,"मी उद्या सकाळी ग्रीक विश्वकर्मा ऊर्फ व्हल्कन देवाकडून दुसरे चिलखत, ढाल अन हेल्मेट, तलवार वगैरे बनवून आणते. तोपर्यंत जरा आवर स्वतःला आणि बिगर चिलखताचा लढाईत जाऊ नकोस."
असे म्हणून ती ऑलिंपस पर्वतावरील व्हल्कन देवाच्या घरी निघून गेली.
तोवर इकडे युद्धाचे काय झाले ते पाहू. मागील बुकात सांगितल्याप्रमाणे मेनेलॉस आणि मेरिओनेस या द्वयीने पॅट्रोक्लसची डेड बॉडी उचलून आणली खरी, पण बिचार्याच्या मृतदेहाभोवतीची मारामारी अजून थांबलीच नव्हती. हेक्टरने कमीतकमी तीनदा तरी त्याचे पाय ओढत ओढत त्याला ट्रॉयमध्ये नेण्याचा प्रयत्न केला आणि तितक्याच वेळा थोरल्या व धाकट्या अजॅक्सने तो बेत हाणून पाडला. पण इतके असूनही ते दोघेही हेक्टरला मागे काय हाकलू शकले नाहीत. हेक्टर एकदम हट्टालाच पेटला होता. त्याने पॅट्रोक्लसला ओढत ओढत ट्रॉयमध्ये नेलेही असते, इतक्यात-
इतक्यात अकिलीसची सटकली. तो आपल्या शामियान्यातून बाहेर युद्धभूमीजवळ आला आणि जी रणगर्जना केली त्याने ट्रोजनांचे धाबे दणाणले. मागे उभारून अकिलीस फक्त तीनवेळेस जोऽरात ओरडला. त्याच्या नुसत्या दर्शनाने ट्रोजनांची पाचावर धारण बसली. त्या गर्जनेने ट्रोजन घोडी बावचळली आणि त्या भानगडीत बारा ट्रोजन योद्धे आपल्याच रथांखाली पडले, त्यांच्या चाकांखाली येऊन आणि आपल्याच भाल्यांचे घाव लागून मरण पावले. अकिलीसला पाहून ग्रीकांना स्फुरण चढले. ट्रोजन लोक मागे हटलेले पाहून त्यांनी पॅट्रोक्लसची डेड बॉडी अखेरीस आपल्या छावणीत आणली आणि त्याच्या मृतदेहाची विटंबना अखेरीस थांबली. तेवढ्यापुरते युद्ध देखील थांबले.
ट्रोजन छावणीत आता सगळ्यांवर एक भीतीचे सावट पसरले होते. पॉलिडॅमस नामक ट्रोजनाने प्रस्ताव मांडलादेखील,"आजवर हा अकिलीस रुसून बसल्यामुळे आपल्या गमजा चालल्या होत्या, पण आज तो अखेरीस बाहेर आलाय. आता आपला सर्वनाश व्हायला वेळ नाही लागायचा. हे टाळायचे असेल तर ट्रॉयचे दरवाजे बंद करून बसून राहू. बाहेर त्याच्या घोड्यांना खायला घालायलासुद्धा त्याच्याकडे काही उरले नाही की तो झक मारत परत जाईल. आपल्या भिंती तर काही तो तोडू शकत नाही त्यामुळे असे केले तर आपण नक्कीच सुरक्षित राहू."
यावरी हेक्टरें भणितलें," येडा जाहलासी काये? अगोदरच ट्रॉयचा खजिना आता रिता होत चाललाय त्यात असे घाबरून आत बसलो तर सगळा बट्ट्याबोळच होणार. कुणाला आपल्याजवळच्या खजिन्याची भीती वाटत असेल तर त्यांनी गप तो लोकांत वाटून टाकावा. लोकांमध्ये उगीच भीती पसरवायचं काम नाही सांगून ठेवतो आधीच. उद्याही आपण जहाजांजवळच लढाई करूया, अकिलीस लढायला आला तर येऊदे. देवाच्या कृपेने तो मरेलसुद्धा." याला सर्व ट्रोजनांनी अनुमोदन दिले.
इकडे ग्रीक छावणीत पॅट्रोक्लसच्या प्रेताला नीट आंघोंळबिंघोळ घालून सजवण्यात आले होते. अकिलीस विलाप करत म्हणाला, "माझीही माती आता इथेच पडायची, म्हाताराम्हातारींना मी पुन्हा भेटू शकेन असं मलाही वाटत नाही. पण भावा तुला मी काही आत्ता पुरणार नाही. हेक्टरला मारेस्तवर तर नाहीच नाही. आणि ट्रोजनांच्या कमीतकमी बारा तरी महत्त्वाच्या सेनापतींना मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही."
आता व्हल्कनने अकिलीससाठी बनवलेल्या ढालीच्या वर्णनासाठी होमरने किमान तीनचार प्यारेग्राफ खर्ची घातलेत. मथितार्थ इतकाच की लै काय काय गावभरची नक्षी त्या ढालीवर होती, ढाल मोठी अन गोलाकार होती- अन्य बर्याच लोकांची मात्र आयताकृती होती. नंतर चिलखत आणि हेल्मेटदेखील बनवले आणि थेटिसला दिले. ते घेऊन थेटिस तिथून निघाली.
अकिलीस आगामेम्नॉनबरोबर समेट करतो आणि युद्धाला तयार होतो.
आता अकिलीसची आई थेटिस त्याच्यासाठी व्हल्कन देवाने बनवलेले चिलखत घेऊन आली. अकिलीसने ओडीसिअस, डायोमीड, आगामेम्नॉन, इ.इ. ग्रीकांच्या सर्व अतिरथी-महारथींना बोलावले. जखमी झालेले ते सर्व लंगडत, कण्हत तसेच आले. सभा भरताच त्याने सरळ मुद्यालाच हात घातला. "हे अत्रेउसपुत्र आगामेम्नॉन, माझा तुझ्यावरचा राग आता निवळला आहे. बाकी ग्रीक योद्ध्यांना शस्त्रे घेऊन माझ्याबरोबर चलायला सांग. ट्रोजनांचा कंडका पाडू एकदाचा, हाय काय नाय काय."
हे ऐकून ग्रीकांनी "जितं मया" च्या आरोळ्या ठोकल्या. अकिलीस लढायला लैच आतुर झाला होता पण कायम विवेक जागृत असलेल्या ओडीसिअसने त्याला सांगितले की बाबारे, बाकीच्यांना किमान खाऊ तरी दे!! मग त्यासोबतच त्याने आगामेम्नॉनलाही शपथ घ्यावयास लावली की अकिलीसच्या ब्रिसीसला त्याने हातही लावला नाही. तशी शपथ घेतल्यावर आणि तेव्हा प्रॉमिस केलेला खजिना लगेच अकिलीसच्या स्वाधीन केल्यावर अखेर समेट झाला.
नंतर अकिलिसने चिलखत अंगावर चढवले आणि जरा ट्रायल घेतली की ठीक बसतंय की नाही ते बघायला. समाधानकारकरीत्या सगळं जमल्यावर त्याने त्याचा पेलिऑन पर्वतावर खास बनवलेला भाला हातात घेतला. अकिलीस सोडून हा भाला वापरणे कुणाच्याही आवाक्याबाहेरचे होते. चांदीच्या मुठीची तलवारही घेतली आणि तो निघाला. ऑटोमेडॉन आणि आल्किमेदॉन या दोघा मॉर्मिडन लोकांनी त्याचा रथ सज्ज केला, घोडे नीट बांधले.
अकिलीसची फाईट-वातावरण पूर्णच टाईट.
अकिलीस रणभूमीवर आल्या आल्या सर्वांत आधी एनिअस आणि अकिलीस यांची अंमळ बाचाबाची झाली. अकिलीस म्हणाला, "माझ्यासमोर यायची तुझी डेरिंग झालीच कशी? मागे इडा पर्वतावर तुमच्या गायी पळवताना तू माझ्यापासून जीव वाचवत एर्नेसस शहरात पळालास. त्या शहरावरही मी हल्ला करून कब्जा केला, तिथल्या बायका ताब्यात घेतल्या. तुलाही तेव्हाच मारला असता पण देवांच्या कृपेमुळेच तू जित्ता जाऊ शकलास, नाहीतर तेव्हाच तुला कापला असता. गप मागे फीर नैतर फुकट मरशील."
यावर एनिअस उत्तरला, "तुझ्या शब्दांनी घाबरून जायला मी काही कुक्कुलं बाळ नाहीये, काय समजलास? मीही तुझ्यासारखाच उच्चकुळातला आहे. रस्त्यात भांडणार्या बायकांसारखं शब्दांनी भांडत बसण्यात काही अर्थ नाही. भाल्यांनीच एकमेकांचे पाणी जोखू."
असे म्हणून त्याने एक भाला बरोबर नेम धरून अकिलीसवर फेकला. अकिलीस क्षणभर घाबरला, त्याला वाटले भाला ढालीतून आरपार जातो की काय!! पण तो त्याच्या ढालीच्या बरोब्बर मध्यभागी लागून बाजूला पडला. मग अकिलीसनेही त्याच्यावर आपला पेलिअन पर्वतावर बनवलेला खास भाला फेकला. तो ढालीच्या एकदम कडेवर आदळून जवळून सूं सूं करत मागे पडला. एनिअसला झाले काहीच नाही, पण इतक्या जवळून भाला गेल्यामुळे तो एकदम बावचळला, गडबडला. मग अकिलीसने आपली धारदार तलवार उपसली आणि एनिअसनेही एक भलाथोरला धोंडा हातात घेतला आणि ते एकमेकांवर तुटून पडणार इतक्यात एनिअसला जणू देवानेच वाचवले आणि अकिलीसला तो दिसेनासा झाला. (बहुतेक धुळीचे वादळ आले असावे आणि त्या भानगडीत एनिअस पळाल्याने दिसेनासा झाला असावा. ट्रॉयचा उल्लेख 'वादळी, लै वारे असलेली जागा' म्हणून कायम येतो इलियडात.) त्यात परत हेक्टरने ट्रोजनांना ओरडून चेतवले खरे पण स्वतः अग्रभागी गेला नाही कारण अकिलीस चेकाळलाय हे दिसतच होते.
एनिअस गुल झालेला पाहून अकिलीस इतर ट्रोजनांच्या मागे लागला आणि त्याने ट्रोजनांच्या कत्तलीचा सपाटाच लावला.
इफितिऑन: याच्या डोक्यात भाला घालून कवटीचे सरळ दोन तुकडेच केले.
डेमोलिऑन: याचे हेल्मेट फोडून भाला आरपार गेला आनि "टेंपल" वर म्हणजेच डोळे आणि कपाळ यांच्या मध्ये घुसला तो कवटी भेदून गेला. मेंदूचे तुकडे बाहेर सांडले आणि जागीच ठार झाला.
हिप्पोडॅमसः हा रथातून उतरून चढाई करीत असताना याला पोटात भाला खुपसून ठार मारले.
पॉलीडोरसः हा प्रिआमचा सर्वांत लहान मुलगा होता. याला पाठीत भाला भोसकून ठार मारले.
आपला भाऊ पडलेला पाहून हेक्टर धावत आला. हेक्टर आणि अकिलीस दोघांची बाचाबाची झाली आणि हेक्टरने अकिलीसवर भाला फेकला, पण तो चुकवून अकिलीस त्याच्यावर झेपावला. तीनवेळा झेपावूनही हेक्टरने त्याचा वार चुकवला. चौथ्यांदाही असेच झाले तेव्हा हेक्टरला शिव्या घालून अकिलीस अन्य ट्रोजनांमागे गेला आणि अजूनही बरेच लोक मारले.
ड्रायॉप्सः याच्या मानेच्या मध्यभागी भाला खुपसून ठार मारले.
देमुखसः याच्या गुडघ्यात भाला खुपसून जायबंदी केले आणि तलवारीने प्राण घेतला.
लाओगोनस आणि दार्दॅनसः या दोहोंना रथातून खाली फेकले आणि लाओगोनसला भाला फेकून ठार केले तर दार्दॅनसचा हातघाईच्या लढाईत मुडदा पाडला.
ट्रॉस: हा बिचारा अकिलीसचा गुडघा पकडून प्राणांची भीक मागत होता त्याला पाहताक्षणी, परंतु पाषाणहृदयी अकिलीसने सरळ त्याच्या यकृतात तलवार खुपसली. यकृत बाहेर आले आणि काळसर रक्तही जमिनीवर इतस्ततः पसरले आणि तो तसाच निश्चेष्ट पडून साहिला.
मुलियसः याच्या एका कानातून भाला खुपसला तो आरपार दुसर्या कानातून बाहेर आला. जागीच खलास झाला.
एखेलसः याच्या डोक्यावर तलवारीने इतका जोराचा वार केला की कवटी फुटून तलवार रक्ताने लाल झाली. तसाच कोसळला.
ड्यूकॅलियनः याला कोपरावर भाला मारून जखमी केल्यावर बिचारा दोन्ही हात उभावून होष्यमाणाची वाट पाहत होता. त्याचे तलवारीने डोके उडवून फेकून दिले. पाठीचा कणा अंमळ मांसातून डोकावू लागला आणि बरेच रक्त वाहू लागले.
र्हिगमसः याच्या पोटात भाला खुपसून रुतवल्याने तो रथातून खाली कोसळला आणि मेला.
आरेइथूसः हा र्हिगमसचा सारथी होता. त्यालाही पाठीत भाला खुपसून रथातून ओढून काढले. त्याचे घोडे भीतीने खिंकाळू लागले.
शेतात पिकलेल्या धान्यावर बैल चालून त्यातला कोंडा इ. घटक वेगळे करतात त्याप्रमाणे अकिलीसच्या रथाचे घोडे कायम मृतदेह तुडवत होते. त्याच्या रथाची चाकं रक्ताने माखली होती. चहूबाजूने कत्तल करून करून अकिलीस त्याच्या शस्त्रांसमवेत रक्ताने न्हाऊन निघाला होता.
अकिलीस ट्रोजनांनी पूर्ण चटणी उडवतो.
आता अकिलीसच्या फाईटने वातावरण पूर्णच टाईट झालेले होते. त्यात अकिलीसपुढे घाबरून पळणार्या ट्रोजनांचे दोन भाग पडले: एक भाग ट्रॉय शहरात जाऊ पाहत होता तर दुसरा खँथस नामक ट्रॉयच्या जवळच असलेल्या नदीपाशी अडकला होता. नदीतील भोवर्यांचा सामना करत अकिलीसपासून वाचण्याची पराकाष्ठा करणार्या ट्रोजनांची पार तारांबळ उडाली होती. नदीकाठी आपला रथ आणि भाला ठेवून अकिलीस ढालतलवारीनिशी नदीत उतरला. एखाद्या डॉल्फिन माशापुढे लहान मासे पळावेत तसे ट्रोजन्स अकिलीसपुढे पळत होते. लोकांना मारता मारता अकिलीसचे हात भरून आले. त्यानंतर त्याने १२ ट्रोजन तरुणांना नदीतून बाहेर जिवंतच ओढून काढले-एखादी कोंबडी हातात पकडावी तसा तो त्यांना ओढून काढत होता. त्याने त्यांचे हात मागच्या बाजूस बांधले, आणि आपल्या सैनिकांच्या स्वाधीन केले. हे बाराजण पॅट्रोक्लससाठी "सॅक्रिफाईस" म्हणून अकिलीसच्या शामियान्यात नेले गेले. तिथे त्यांना नंतर मारले जाणार होते. तिथेच त्याला लियाकॉन नामक प्रिआमचा अजून एक पुत्र दिसला. लै वर्षांमागे त्याने त्याला पकडले होते-अकिलीसच्या द्राक्षबागेत चोरी करताना-आणि गुलाम म्हणून विकले होते लेम्नॉस बेटात. इतक्या वर्षांनी तो परत दिसला तेव्हा अकिलीसला महदाश्चर्य वाटले. पण त्याने शेवटी मानेत तलवार खुपसून लियाकॉनचा जीव घेतला. त्याच्या विनवणीकडे जरासुद्धा लक्ष दिले नाही.
त्यानंतर अकिलीसचे लक्ष अॅस्टेरोपाइउस नामक ट्रोजन योद्ध्याकडे गेले. अंमळ बाचाबाची होऊन युद्धाला तोंड लागले. अॅस्टेरोपाइउस हा दोन्ही हातांनी भालाफेक करू शकायचा. पहिल्यांदा त्याने फेकलेला भाला अकिलीसच्या ढालीवर आदळून खाली पडला. मग दुसरा भाला फेकला, तो अकिलीसच्या कोपराला लागून रक्त आले!! अकिलिसचा जमिनीत खोवलेला भाला उपसण्याचा तीनवेळा निष्फळ प्रयत्न त्याने केला पण अकिलीस तेवढ्यात त्याच्यावर झेपावला आणि पोटात बेंबीजवळ तलवार खुपसून त्याने त्याचा जीव घेतला. अॅस्टेरोपाइउसची आतडी बाहेर आली आणि रक्त जमिनीवर पसरले.
त्यानंतर अकिलीसने थर्सिलोखस, मिडॉन, आस्टिपिलस, म्नेसस, थ्रॅसियस, ओनेउस आणि ओफेलेस्टेस या ट्रोजनांना मारले. अजूनही कैक ट्रोजनांना मारले असते, पण तेवढ्यात खँथस नदीने मानवरूपात येऊन त्याला विनंती केली, "बाबारे आता तरी कत्तल थांबव. लै प्रेतं पडलीत माझ्या पाण्यात अन सगळं नुसतं तुंबून गेलंय."
त्यावर अकिलीस इतकेच म्हणाला की हेक्टरला मारल्याशिवाय ही कत्तल थांबणे अशक्य. मग नदी चिडली आणि अकिलीसच्या मागे लागली. नदीतून बाहेर निघताना अकिलीसची पुरेवाट झाली, बुडतो का काय असे वाटेपर्यंत एकदाचा तो तिथून बाहेर निघाला.
ट्रॉयचा राजा प्रिआम हा अकिलीसने चालवलेले हे ट्रोजनसत्र एका उंच बुरुजावर उभा राहून पाहत होता. अकिलीसच्या भयाने शहरात धावत येणार्यांसाठी सगळी दारे खुली ठेवा अशी त्याने आज्ञा केली.
तेवढ्यात आगेनॉर नामक ट्रोजन सेनापतीने अकिलीसला आव्हान दिले आणि त्याच्या पायावर भाला फेकला. पण चिलखत असल्याने भाला नुस्ताच पायाला लागून खाली पडला. प्रत्युत्तरादाखल अकिलीस त्यावर झेपावला पण आगेनॉर गोंधळाचा फायदा घेऊन तोपर्यंत निसटला होता. बाकीचे लोक कुणाचं काय झालं याची कणमात्रही फिकिर न करता जीव वाचवण्यासाठी शहरात धावत होते.
हेक्टर-अकिलीस सामना आणि हेक्टरचा मृत्यू.
अकिलीस ट्रोजनांची चटणी उडवत असलेला पाहून प्रिआमने ट्रॉयचे दरवाजे उघडे ठेवण्याची आज्ञा केली होतीच. अकिलीसशी लढायला हेक्टरने जाऊ नये म्हणून त्याने परोपरीची विनवणी केली. लै हृदयद्रावकपणे त्याने हेक्टरला विनवले. ( होमरने करुणरस ओतलाय तिथे फुल.) पण त्याचा हेक्टरवर काही परिणाम झाला नाही. हेक्टरची आई हेक्युबा हीदेखील अन्य स्त्रियांसमवेत विलाप करू लागली, पण हेक्टरचे मन वळवण्यात कुणालाही यश आले नाही.
आणि ते साहजिकच होते म्हणा. हेक्टरच्या मनात चुल चलबिचल चालली होती. "आत जाऊ की नको? आत गेलो तर पॉलिडॅमस मला सगळ्यांसमोर शिव्या घालेल-कालपरवा फुरफुरत होतास आणि आज नांगी टाकलीस म्हणून. मग माझी सर्वांसमोर छी:थू होईल! नकोच ते. समजा मी सर्व शस्त्रे त्यागून अकिलीससमोर गेलो तर काय होईल? तो माझे ऐकेल ही शक्यतादेखील कमीच वाटते. समजा या सर्व युद्धाचे मूळ असलेल्या हेलेनला परत देऊन वर ट्रॉयचा निम्मा खजिना ग्रीकांना ऑफर केला तर? मी ट्रोजनांना गप करू शकतो म्हणा तसं, पण बिनहत्यार असताना अकिलीसकडे गेलो तर मला तो एखाद्या स्त्रीला मारावे तितक्या आरामात ठार मारेल. त्यापेक्षा राहूदे, गप त्याच्याशी लढतो. काय निकाल लागतो तो लागूदे एकदाचा."
असा विचार करत असतानाच अकिलीस त्याच्यावर झेपावला. त्याच्या उजव्या हातात भाला होता. त्याचा आवेश बघून हेक्टर घाबरला आणि पळू लागला. त्याच्या मागे चपळ अकिलीस वेगाने पाठलाग करू लागला-एखादा ससाणा भक्ष्यावर झेपावावा तसा. ट्रॉयच्या भिंतीजवळून या कडेपासून त्या कडेपर्यंतच्या नदीजवळून तीन वेळा तरी हा पाठलाग चालला. हेक्टर ट्रॉयच्या गेटजवळ जायचा कारण आपले लोक वरून अकिलीसवर शस्त्रे फेकतील असे त्याला वाटायचे. गेटच्या जास्तच जवळ जातोय असे वाटले की अकिलीस त्याला बाहेरच्या मैदानाच्या बाजूस हाकलायचा. हेक्टर अकिलीसपासून दूर जाऊ शकला नाही आणि अकिलीसही त्याला पकडण्याइतपत जवळ गेला नाही. शिवाय अकिलीसने ग्रीक सैन्याला खूण करून अगोदरच बजावून ठेवले होते, की कोणीही हेक्टरवर भाला, तलवार, बाण, धोंडा,इ. पैकी कशानेही हल्ला करावयाचा नाही म्हणून. हेक्टरला मारण्यापासूनची दिगंत कीर्ती अकिलीसला फक्त आणि फक्त स्वतःसाठी पाहिजे होती.
अखेरीस पळापळ थांबली. डेइफोबस नामक हेक्टरचा भाऊ त्याच्या मदतीला आला आणि दोघांनी मिळून अकिलीसचा सामना करावा असे ठरले. मग हेक्टरचे डेरिंगही वाढले, कारण बाकीचे लोक शहराच्या आत पळत असताना बाहेर राहणे सोपे काम नव्हे. पण अकिलीस चालून येतेवेळी मात्र तो कुठे दिसेनासा झाला.
(मिनर्व्हा देवी डेइफोबसच्या वेषात येते इ. वर्णन आहे त्याजागी प्रत्यक्षात काय घडले असावे हा माझा तर्क मांडतो आहे. बाकी आहे तसेच लिहिले आहे.)
शेवटी अकिलीस आणि हेक्टर समोरासमोर आले. हेक्टर अकिलीसला म्हणाला,"हे अकिलीस, तुझ्यापासून मी तीनवेळेस पळालो, पण आता नाही. आता एक तर मी मरेन नाहीतर तुला तरी मारीन. चल दोघांनी प्रतिज्ञा करू, की आपल्या युद्धात जो जिंकेल त्याने पराभूताच्या प्रेताची कुठल्याही प्रकारे विटंबना करू नये."
आधीच पॅट्रोक्लसला मारल्यामुळे अकिलीसचा हेक्टरवर राग होता, त्यात त्याच्या प्रेताची इतकी विटंबना केल्यावर हेक्टरकडून असा प्रस्ताव ऐकल्यावर अकिलीसची सटकेल नाहीतर काय!!! तो सरळ गुरकावला, "मूर्खा!!!! (खरे तर ग्रीक भाषेतल्या शिव्या असाव्यात, पण इलियडमध्ये शिव्या कधी दिसत नाहीत. नुस्ती कापाकापी चालू असताना शिव्यांची गरज ती काय म्हणा. व्हाय कर्स व्हेन यू कॅन किल?) प्रतिज्ञा वगैरे भाकडकथा माझ्यापुढे बोलू नकोस. सिंह आणि माणूस एकमेकांशी कधी करार करतात का? लांडगे आणी मेंढ्यादेखील एकमेकांशी करारमदार करीत नाहीत, उलट एकमेकांचा कायम कट्टरपणे द्वेषच करतात. त्यामुळे आपल्या दोघांत असला करारबिरार विसरून जा. तुझ्यात असेल नसेल तितकी पूर्ण ताकद पणाला लाव, बघू काय दम तुझ्यात ते. पॅट्रोक्लस आणि इतर माझ्या मित्रांना मारून तू जे दु:ख मला दिलंयस त्याची पूर्ण भरपाई मी आज करणार आहे, याद राख."
असे म्हणून अकिलीसने हेक्टरवर भाला फेकला आणि युद्धाला तोंड लागले. हेक्टरने वाकून तो भाला चुकवला आणि म्हणाला, "नेम चुकला रे तुझा अकिलीसा!!! मोठा टिवटिव करत होतास ना की मी तुझ्यापुढे गर्भगळित होईन आणि पळून जाईन म्हणून?? आता घे माझा भाला, बघू चुकवतोस की कसा ते. तू मेलास तर ट्रोजन लोक सुटकेचा नि:श्वास सोडतील, कारण तुझ्याइतकी हानी आम्हांला कोणीच पोचवलेली नाही."
असे म्हणून हेक्टरने अकिलीसवर भाला फेकला. तो त्याच्या ढालीच्या बरोब्बर मध्यभागी लागून रिबाउंड झाला. भाला व्यर्थ गेल्यावर हेक्टर चिडला, कारण दुसरा भाला त्याच्याकडे नव्हता. "डेइफोबस! डेइफोबस!!" हाका मारल्या पण डेइफोबस होता कुठे? "च्यायला, डेइफोबस तर आत तटाआड आहे. मी काय करू आता? मरण तर अटळ दिसते आहे, पण मरण्याआधी काहीतरी मोठे काम करून मगच मरतो."
असा विचार करून हेक्टरने आपली मोठी धार्दार तलवार उपसली आणि अकिलीसच्या दिशेने झेपावला. अकिलीसही त्याच्यावर झेपावला. त्याच्या उजव्या हातात स्पेअरवाला दुसरा भाला होता. हेक्टरच्या कवचावरून अकिलीसने एक नजर फिरवली. पॅट्रोक्लसला दिलेले अकिलीसचेच कवच होते, ते हेक्टरने घातले होते. एक गळा सोडला तर बाकी सर्व काही प्रोटेक्टेड होते. ती जागा बरोब्बर हेरून अकिलीसने हेक्टरच्या गळ्यात भाला खुपसून त्याला खाली पाडले. हेक्टर मरणार हे फिक्स होतेच, पण तो अजून बोलू शकत होता कारण गळ्यातून भाला खोल गेला तरी स्वरयंत्र इ. शाबूत होते.
अकिलीस मरणाच्या दारातल्या हेक्टरला म्हणाला, "मर मूर्खा. मी जित्ता असताना पॅट्रोक्लसचा जीव घेताना आपण सहीसलामत वाचू असं वाटलं काय तुला? आता तू मेल्यावर ग्रीक लोक पॅट्रोक्लसचे अंत्यसंस्कार विधिवत करतील, पण तुझं प्रेत मात्र कुत्र्यागिधाडांना खाऊ घालेन मी."
हेक्टरने अकिलीसला विनवले, "प्लीज असं काही करू नकोस, माझे आईबाबा तुला माझ्या बदल्यात मोठा खजिना देतील तो घे, पण मला ग्रीकांच्या कुत्र्यांना खायला घालू नको. माझे अंत्यसंस्कार नीट करू देत त्यांना प्लीज."
अकिलीस अजूनच चिडून उत्तरला, "गप ए कुत्र्या. बुढ्ढ्या प्रिआमने तुझ्या वजनाइतकं सोनं दिलं किंवा त्याच्या वीसपट खजिना दिला तरी मी तुला सोडणार नाही. आत्ताच तुझे तुकडेतुकडे करीन मला वाटलं तर."
हेक्टर म्हणाला,"मला माहितीच होतं, तुझ्यासारख्या पाषाणहृदयी माणसापुढे माझा इलाज चालणारच नाही. पण ट्रॉयच्या स्कीअन दरवाज्याजवळ अपोलो देव तुला मारेल हे नक्की. ती अवकृपा ओढवून घ्यायची असेल तर बघ."
हे बोलून तो मरण पावला. त्यानंतर अकिलीसने त्याच्या गळ्यातून भाला उपसून काढला आणि त्याचे हेल्मेट व चिलखत काढून घेतले. त्याचे मॉर्मिडन सैनिक हेक्टरच्या शवाजवळ हळूहळू एकेक जमू लागले आणि त्याच्या शवाला भाल्याने जखमा करू लागले. "हेक्टरचा सामना करणं आता सोप्पंय!!!" करत चीत्कारू लागले.
त्यानंतर अकिलीस सर्वांना उद्देशून म्हणाला, "ट्रोजन लोक हेक्टरला देवासारखा मानत होते, त्याला मारून आपण मोठा विजय मिळवला आहे. यानंतर ते लढतील की शरण येतील हे पहा. पण त्याआधी पॅट्रोक्लसचे अंत्यसंस्कार करू चला." असे म्हणून त्याने हेक्टरच्या दोन्ही पायंच्या घोट्याजवळच्या मांसल भागाला भोके पाडली आणि त्यांतून बैलाच्या कातड्यापासून बनवलेला दोर आरपार घालून रथाला बांधून हेक्टरला रथामागे फरपटत नेले. रथाचे घोडे दौडत होते, आणि हेक्टरचे काळे केस इतस्ततः अस्ताव्यस्त पसरून भेसूर दिसत होते. ही अप्रतिष्ठा थांबवायचे धाडस कुणातही नव्हते.
इकडे हेक्टर पडल्याचे कळताक्षणी त्याची आई हेक्युबाचा आकांत कळसाला पोहोचला. बाप प्रिआम तर पागल झाला होता, कुणालाही आवरेना. "मी एकटाच जातो त्या निष्ठुर अकिलीसकडे आणि हेक्टरचे शव परत मागतो. त्याने माझी कितीतरी पोरं मारलीत आजवर, पण हेक्टर माझा सगळ्यांत प्रिय होता. मरेस्तोवर ही बोच माझ्या हृदयात कायम राहणार."
पण हेक्टरपत्नी अँन्द्रोमाखी हिला अजूनपर्यंत पत्ताच नव्हता आपला नवरा मेलाय त्याचा. बिचारीने युद्धाहून परत आल्यावर हेक्टरला आंघोळीसाठी गरम पाणी तापवावे म्हणून एका मोठ्या कढईची तजवीज केली होती. ती त्याची आतुरतेने वाट पाहत होती. एवढ्यात आपल्या सासूचा विलाप ऐकून तिला अभद्र शंका आली आणि ती पळत पळत तिकडे गेली. बातमी कळाल्यावर तिच्या दु:खाला पारावार राहिला नाही. नाना परीच्या आठवणी काढत ती शोक व्यक्त करू लागली. अख्ख्या ट्रॉयभर सुतकी शोकमय वातावरण होते. हेक्टर सर्व ट्रोजनांचा लाडका होता, त्यामुळे तो मेल्यावर सर्व ट्रोजनांना अपरंपार दु:ख झाले होते.
इथे इलियडचे २२ वे बुक संपते.
(अकिलीसचे म्हणून ब्रॅड पिटचे फोटो दिलेत खरे पण माझ्यासाठी पिटने साकारलेला अकिलीस हा बर्यापैकी होमरच्या अकिलीसजवळ जातो. :) असो. )
प्रतिक्रिया
7 Jan 2014 - 9:29 pm | पैसा
कापाकापीची वर्णने वाचून शहारा आला अगदी! या लोकांची भांडणे, लढाया, गायी पळवणे, धुळीमुळे अचानक दिसेनासे होणे वगैरे प्रसंग वाचताना महाभारतातल्या समांतर प्रसंगांची आठवण येत होती. मात्र हे ग्रीक्/ट्रोजन्स जरी देव म्हटले तरी जास्त मानवी वाटतात.
7 Jan 2014 - 9:39 pm | बर्फाळलांडगा
रोचक तरीही रंजक माँडनी. स्वत:चे तर्क फार न घुसड़ता लिहल्याने मनाचा ठाव घेतय.
7 Jan 2014 - 10:13 pm | अजया
आता अकीलिसचे ह्रदयपरिवर्तन पुढे? क्रमशः आहे ना?
7 Jan 2014 - 10:49 pm | आतिवास
खूप दिवसांनी लिहिलंत त्यामुळे आता आधीचे भाग पुन्हा एकदा वाचून इथं यावं लागेल!
7 Jan 2014 - 11:06 pm | प्रचेतस
जबरदस्त.
ठायी ठायी महाभारताची आठवण होतेय.
7 Jan 2014 - 11:28 pm | सस्नेह
कुरकुरीत लेखन ! नावे लक्षात ठेवायला जरा अवघड वाटली. देवदेवता अन माणसे मिक्स-अप होत असलेली पाहून पुराणासारखे वाटले.
8 Jan 2014 - 1:06 am | अर्धवटराव
एखाद्या जातीवंत बखरकाराने पानिपत युद्धाचे वर्णन करावे तस्सं झालय... शिवाय खास बॅटमॅनी मिपा तडका.
लाजवाब.
8 Jan 2014 - 1:42 am | प्यारे१
भन्नाटच.
असं काही भारी भारी लिहा मालक.
(बाकी काही करण्यापेक्षा असं म्हणत नाही. वाढदिवस किती करु एका वर्षात?)
इलियड इन 'रापचन्डुस ढासु मराठी' असं काही नाव देऊन छापता येईल.
8 Jan 2014 - 2:00 am | बॅटमॅन
पैसा, बर्फाळलांडगा, अजया, आतिवास, वल्ली, स्नेहांकिता, अर्धवटराव आणि प्यारे१: बहुत बहुत धन्यवाद :)
अजया: अर्थातच, क्रमशः आहेच. कथा पूर्ण संपायची तर अजून किमान ५ भाग लागतील असा अंदाज आहे. हे सर्व घडून गेल्यावर त्याच्या इतिहाससंशोधनाला अजून ३-४ भाग तर लिहावेच लागतील.
वल्ली, स्नेहांकिता: नक्कीच, ते महाभारतासारखं आहेच, नो डौट. बाकी नावांपुढे इलाज नै, वेगळ्या संस्कृतीतली नावेही वेगळीच असणार, नै का?
अर्धवटराव, प्यारे१: धन्यवाद!! इलियडचे मराठीत काव्यमय भाषांतर कुणीतरी केलेय असे मध्ये ऐकले होते. पण कोण, कधी केले काहीच माहिती नाही. किमान तीसेक वर्षांपूर्वी, त्याच्याही आधीचा प्रकार असावा हा.
पैसा, बर्फाळलांडगा: ते आहे खरं तसं, पण मूळ होमरमधील दैवी पार्ट मी शक्य तितका कमी केलेला आहे. तुम्ही जर मूळ इलियड वाचायला घेतले तर "झ्यूसदेवाने अकिलीसच्या पायांत शक्ती ओतली, अपोलोने पॅरिसचा बाण वरती नेला" , इ. वर्णने लै बघायला मिळतात. ते असूनही होमरमध्ये अनावश्यक अलंकार फारसे नाहीत. पण उपमा अतिशय चपखल देतो खरा. ते डॉल्फिनपुढे पळणारे मासे नैतर कापणीनंतर धान्य तुडवून वेगळे करणारे बैल आणि मृतदेह तुडवणारे अकिलीसच्या रथाचे घोडे यांची तुलना वैग्रे वैग्रे सगळे होमरबाबांकडून आहे तस्से घेतले आहे.
8 Jan 2014 - 2:04 am | बॅटमॅन
आतिवासः होय, पण इथून पुढचे लेख लौकर टाकेन ही खात्री बाळगा. :)
8 Jan 2014 - 2:40 am | अस्वस्थामा
मस्त चालु आहे वाल्गुदेया.. बहुतेक 'चांदोबा' मध्ये 'भुवनसुंदरी' म्हणून ही गोष्ट येत होती असं आठवतंय. त्यात क्रूर हिंसक वर्णने टाळून आणि भरपूर नाट्यमय संवाद घालून खूप दिवस चालू होती ती मालिका.
त्यात बरीच नावे भारतियीकरण करून वापरली होती. जसे की हेलेनसाठी 'भुवनसुंदरी', इडिपससाठी 'रूपधर' अशी नावे होती. (त्यावरून परत 'ओडिसी' ची मालिका 'रूपधरच्या यात्रा' पण सुरु होती)
8 Jan 2014 - 7:12 am | लॉरी टांगटूंगकर
सही चाललंय रे, (हा) भाग वेळेत टाकल्याबद्दल धन्यवाद. :) :ड
8 Jan 2014 - 7:34 am | चित्रगुप्त
'अखिल-ईश' याची पराक्रमगाथा, 'भद्र-पित्त' या अभिनेत्याची चित्रे, वाहवा.
8 Jan 2014 - 8:44 am | श्रीरंग_जोशी
या लेखमालिकेतील हा भाग वाचून असं वाटतंय म्हणजे पंचपक्वान्नांचं जेवण झाल्यावर एक रापचिक मसाला पान पुढ्यात आलंय.
बाकी मागच्या भागांत पॅरिसला बुळगटशिरोमणी म्हंटल्याबद्दल उशिराने निषेध. दुष्मन राज्याच्या राज्यात जाऊन तहाची बोलणी चालली असताना त्याच्या सौंदर्यवती राणीला पटवणे अन नंतर पळवून आणणे हे लै डेरिंगबाज काम हाय.
8 Jan 2014 - 10:06 am | इरसाल
कं लिवलय कं लिवलय !
परत एकदा मजा.
हेक्टरबरोबर मोठी सेना डेड बॉडीपाशी आली. ट्रोजन्स लुटीला चटावलेले होते. अजॅक्स आणि मेनेलॉसला कळायचं बंद झालं."च्यायला मेनेलॉस, हे जरा जास्तच आहे. पॅट्रोक्लसच्या डेड बॉडीचं काही का होईना, आपला जीव तरी आता वाचतो की नाही कुणास ठाऊक. हेक्टरनं चहूबाजूंनी नुस्ती गोची करून ठेवलीय. बाकीच्यांना बोलाव जा लौकर."
हे वाचताना वाटले की पुढे " ये पक्या जा धरुन आन. मंग तो जाम चितालतो, तरवार, बांबु नं मंग गुप्त्या अशी सगली हत्यार कारतो" अस वाचायला मिळतं की काय.
पण जे काही लिहीलय त्याला तोड नाही.
8 Jan 2014 - 11:00 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
8 Jan 2014 - 2:51 pm | तिमा
इतके दिवस पुराणकथा आणि इतिहासाची आवड असून मी या लिखाणापासून दूर का राहिलो तेच कळत नाही. पण झाले ते बरेच झाले. आज निवांत वेळ मिळाल्यावर आगदी भाग-१ पासून सारे एका दमात वाचून काढले. फारा दिवसांनी एवढी मजा आली. त्यांत ती खुसखुशीत भाषा! लढाईचे वर्णन वाचून तर एवढे स्फुरण चढले की एक भाला घेऊन घराबाहेर पडावे असे वाटले.
आम्ही जुनी माणसं. जुना 'हेलन ऑफ ट्रॉय' तरुणपणी बघितला होता. पण हे संपूर्ण महाकाव्य वाचायचे डेअरिंग कधी झाले नव्हते, आणि इतकी अवघड नांवे इंग्लिशमधे वाचल्यावर तो उत्साह टिकलाही नसता.
शतशः धन्यवाद,आता मात्र पुढच्या भागांची उत्कटतेने वाट बघतोय.
8 Jan 2014 - 3:09 pm | मदनबाण
वटवाघुळ मानवा लयं भारी लिहतोस ! :)
8 Jan 2014 - 4:50 pm | बॅटमॅन
अस्वस्थात्मा, मंद्या: धन्यवाद!!! भुवनसुंदरी नामक प्रकार चांदोबात वाचल्याचे मलाही आठवतेय, पण तेव्हा हे काही ठाऊक नव्हते. इंजिनिअरिंग सेकंड ईयरच्या सुरुवातीला ट्रॉय पिच्चर पाहिल्यावर मगच हे लक्षात आलं बाकीचं. :)
चित्रगुप्तजी: भद्र पितृ वरून भद्द पित्त वरून बड्ड पिट्ट आणि तिथून ब्रॅड पिट असा प्रवास आपण यथार्थपणे सांगितला आहे. अखिल-ईशही तसेच. बहुत धन्यवाद सरजी!
श्रीरंग जोशी: पॅरिस तसा डेरिंगबाज पण मोर ऑफन दॅन नॉट, बुळगाच. पण साल्याने लै मजा केली बाकी ;)
इरसालः धन्यवाद :) बोलीभाषांचा आमचा अभ्यास अंमळ कमी, नैतर अगदी यदाकदाचित सारख्या साच्यात बसवणे हे सहज शक्य होते ;)
तथास्तु अन मदनबाण: थ्यांक्यु डूड लोक्स :)
तिमा: आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेसाठी टनभर धन्यवाद!!!!!!!! होमरची शैली इतकी जबरी आहे की स्फुरण चढतेच, सवालच नाही :) पुढचा भाग लौकरच येणार, खात्री बाळगा. :)
8 Jan 2014 - 5:28 pm | कपिलमुनी
तुमची लेखन शैली आवडली ..
8 Jan 2014 - 5:43 pm | मंदार दिलीप जोशी
ऐतिहासिक लिखाण इतक्या खुशशुशित शैलीत केल्यामुळे प्रचंड, भयानक, खूपच मज्जा आली. नाहीतर इतका मोथा लेख आंतरजालावर वाचायचा संयम आपल्यात तरी नाही ब्वॉ.
या लेखमालिकेतले हेच पहिल्यांदा वाचले तरी जराही विचित्र वाटले नाही. लिहीत रहा शेट.
8 Jan 2014 - 6:26 pm | इशा१२३
आधिचे सगळे भाग वाचले आहेतच.एवढे गुंतागुंतीचे कथानक आता उलगडायला लागलय.हा भागही छानच!
8 Jan 2014 - 11:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेखागणिक बट्टमणी भाषा बहरू लागलेली आहे. येवढ्या तुंबळ युद्धात होमरबाबाला अगदी प्रत्येकाचा भाला कोणाला कुठे लागला आणि कोणी कुठे तलवार खुपसली याचे सुक्ष्म निरिक्षण बरे जमले ;) नावे क्लिष्ट असली तरी भारी लेखनशैलीने वाचायला 'अब किसका नंबर आयेगा?" असंच वाटत राहतंय.
बाकी ही लढाई हळदीघाटीच्या लढाईसारखीच झाली असे दिसते. तिथेही असेच झाले होते...
याचा भाला त्याच्या पोटात. त्याची तलवार याच्या मानेत. नुसती मारधोड, कापाकाप चालली होती. मुडद्यांचा नुसता खच... एकावर दुसरा, दुसर्यावर तिसरा, असं करत पाचव्यावर सहावा मुडदा पडला तरी पहिल्यानं हू का चू नाय केलं. कुठं हाया म्हाराजा?
9 Jan 2014 - 3:10 am | बर्फाळलांडगा
या टायटल चे प्रयोजन काय ? हे वाचताना उलट ट्रॉय मधील ब्रेड पिट अकिलीस हेssक्टर! हेssक्टर!! हेssक्टर!!! अशी आरोळी देतानाच समोर येतोय.
9 Jan 2014 - 5:01 pm | बॅटमॅन
कपिलमुनी, मंदार, ईशा: बहुत धन्यवाद :)
इस्पीकचा एक्का: धन्यवाद! बाकी होमरला देवी प्रसन्न असावी, काय म्हणता ;) बाकी सहमत आहेच!!
बर्फाळलांडगा: अकिलीसने पराक्रम गाजवल्यावर ग्रीक सैनिक चीत्कार करतात त्यासारखे शीर्षक दिले आहे इतकेच.