ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जनातलं, मनातलं
5 Jan 2014 - 5:02 am

भाग १ भाग २.१ भाग २.२

सर्वप्रथम या लेखमालेतला हा चौथा भाग येण्यास कल्पनातीत उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतो. कधी हे नैतर ते अशी नाना खेकटी मध्ये आल्यामुळे फार वेळ गेला. पण गेले काही दिवस काम सुरू असून आता ही लेखमाला लौकरच वेग घेऊन संपेल याची ग्वाही देतो. पुढचा लेख तयार आहे, लगेच टाकणारही आहे. यापुढे असे होणार नाही. प्रॉमिस!

इतक्या मोठ्या लॅगनंतर वाचायचे म्हटल्यावर त्रास होणारच, सबब वाचकांना विनंती आहे की जमल्यास आधीचे तीन भाग कृपया वाचले तर उत्तम. न जमले तर भाग १ वाचला तरी ठीक.

तर या भागात इलियडच्या बुक क्र. ११ ते १६ पर्यंत वर्णन आहे. आत्तापर्यंत पाहिल्याप्रमाणे विविध ग्रीक आणि ट्रोजन वीरांनी मोठा पराक्रम गाजवला. मागील भागाच्या शेवटी शेवटी डायोमीड अन ओडीसिअसने रात्रीच्या अंधारात जाऊन ट्रोजनांच्या साथीदारांची चांगलीच कत्तल उडवली होती.

आगामेम्नॉन, डायोमीड, ओडीसिअस, हेक्टर, इ. वीरांचा पराक्रम.

दुसर्‍या दिवशी सकाळी लढाई सुरू झाली. आगामेम्नॉनचे चिलखत किती भारी अन बूट किती भारी, कुठल्या दैवी ब्रँडचे होते, इ. चर्चा करून होमरबाबा आपणही अखिल-ब्राँझयुगीन-यवन-ब्रँड-कॉन्शस असल्याचे दाखवून देतात.

तर आता अ‍ॅगॅमेम्नॉन तयार होऊन युद्धाला निघाला, त्याच्या पाठोपाठ अख्खी सेना निघाली. समोर ट्रोजन सेनाही सज्ज होतीच. हेक्टर, एनिअस, पॉलिडॅमस, आणि अँटेनॉरचे तीन मुलगे पॉलिबस, आगेनॉर आणि अकॅमस हे त्यांचे मुख्य सर्दार होते. यथावकाश लढाईला तोंड लागले.

आज पहिल्यांदा अ‍ॅगॅमेम्नॉन फॉर्मात होता. त्याने बिएनॉर या ट्रोजन योद्ध्याला आणि त्याचा सारथी ऑइलिअस या दोघांना भाला फेकून ठार मारले. ऑइलिअसच्या कपाळातून भाला आरपार गेला. नंतर तो इसस आणि अँटिफस या दोघा प्रिआमच्या पुत्रांमागे लागला. इससच्या छातीत तर अँटिफसच्या कानाजवळ डोक्यात भाला खुपसून त्याने दोघांना ठार मारले. आणि रथातून बाहेर फेकून चिलखते काढून घेतली. नंतर पिसांडर आणि हिप्पोलोकस या दोघा सख्ख्या भावांनाही ठार मारले. पिसांडरला रथातून खाली पाडून त्याच्या छातीत भाला खुपसला. ते पाहून हिप्पोलोकस पळू लागला, तर अ‍ॅगॅमेम्नॉनने त्याचे दोन्ही हात कापले आणि डोके उडवले. ते डोके घरंगळत ट्रोजन फौजेजवळ गेले, ते पाहून ट्रोजनांची भीतीने गाळण उडाली. अ‍ॅगॅमेम्नॉनसोबत ग्रीक फौज पुढेपुढेच निघाली. ट्रोजन घाबरून पळत होते त्यांची यथास्थित मुंडकी उडवण्यात येत होती. ट्रॉयच्या स्कीअन गेट नामक दरवाजाजवळ आल्यावर ग्रीक फौज बाकीच्यांची वाट बघत अंमळ थांबली.

थोड्या वेळात बाजूने रथात बसलेल्या हेक्टरच्या नेतृत्वाखाली ट्रोजन फौजही मोठी गर्जना करत आली. ग्रीक आता सरसावले आणि ट्रोजनांनी आक्रमक पवित्रा घेतला. लढाईला पुनश्च एकवार तोंड लागले. अँटेनॉर या प्रसिद्ध ट्रोजन योद्ध्याचा मुलगा इफिडॅमस आणि अ‍ॅगॅमेम्नॉन यांची लढाई सुरू झाली. इफिडॅमसने अ‍ॅगॅमेम्नॉनच्या छाती-पोटावरच्या गर्डलवर भाला फेकला पण गर्डल भेदले गेले नाही. उलट अ‍ॅगॅमेम्नॉनने त्यावर पुन्हा चढाई केली आणि मानेवर तलवारीने घाव घालून त्याचा खातमा केला, त्याचे चिलखत काढून घेतले. हे पाहून इफिडॅमसचा भाऊ कून तिथे आला आणि त्याने सरळ अ‍ॅगॅमेम्नॉनच्या उजव्या कोपराजवळ भाला खुपसून त्याला जखमी केले आणि इफिडॅमसचे शव ट्रोजन साईडला ओढत नेऊ लागला. अ‍ॅगॅमेम्नॉन लै कळवळला, पण तेवढ्यात त्याने कूनला भाला खुपसून ठार मारले आणि त्याचे मुंडके उडवले. भाल्याची जखम ओली असेपर्यंत अ‍ॅगॅमेम्नॉन भाले, भलेथोरले धोंडे , इ. नी लढतच होता, पण नंतर जखम सुकल्यावर मात्र त्याला त्या कळांनी कळायचं बंद झालं. होमरची उपमा इथेही मार्मिक आहे- तो म्हणतो की प्रसूतिवेदनांसारख्या वेदना त्याला झाल्या. (प्रसूतीसाठी एक शेप्रेट प्रकारच्या देवीही ग्रीक पुराणांत आहेत हे पहिल्यांदा होमरमध्येच कळतं- नाव आहे Eilithuiae- इलिथिआए). शेवटी तो रथात बसून आपल्या जहाजात परत गेला आणि इतरांना लढण्याविषयी बजावले.

इकडे अ‍ॅगॅमेम्नॉन परत गेल्याचे पाहून हेक्टरला अजूनच स्फुरण चढले. त्याने ट्रोजन सैन्याला धीर दिला आणि अनेक ग्रीक योद्ध्यांना हेडिससदनी पाठवले. रानडुकराच्या शिकारीत कुत्री जशी डुकराचा पाठलाग करतात तसे ट्रोजन ग्रीकांमागे लागले होते. हेक्टरने असाइउस, ऑटोनुस, ओपितेस, डोलॉप्स, ऑफेल्टियस, आगेलाउस, एसिम्नस, ओरस, हिप्पोनूस या नऊ ग्रीक सेनानींना एका झटक्यात ठार मारले. अजूनही बर्‍याच ग्रीकांच्या रक्ताने त्याचे हात लाल झाले आणि ग्रीक सेनेत हाहा:कार पसरला.
तो पाहून ओडिसिअस आणि डायोमीड उभे राहिले. त्यांनी काही ट्रोजनांना ठार मारले, त्यामुळे ग्रीकांना थोडा "ब्रीदिंग टाईम" मिळाला हेक्टरपासून. त्या दोघांमुळे ट्रोजन सैन्यात उडालेला गदारोळ पाहून हेक्टरने आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला. हेक्टरवर नीट नेम धरून डायोमीडने भाला फेकला, पण त्याचे ब्राँझचे हेल्मेट न भेदता भाला तसाच खाली पडला. हेक्टरला इजा झाली नाही, पण भाल्याच्या आघाताने त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि तो दुसर्‍या बाजूला गेला. आपला भाल्याचा प्रहार वाया गेला हे पाहून डायोमीड पुन्हा एक भाला घेऊन ट्रोजन सैन्यात समोरच्या ट्रोजनांचे शिरकाण करत घुसला. एकाचे चिलखत काढून घेत असतानाच डायोमीडच्या उजव्या पायात एकाने अचानक बाण मारला. बाण कुठून आला हे पाहिले तर बुळगटशिरोमणी पॅरिसने मारला होता!!! युद्धभूमीवर एक स्मारक होते त्याच्या आड लपून त्याने हा बाण मारला होता.

"तुझे नशीब बरे म्हणून तुला पायात लागला, नैतर पोटात लागून तू मेला असतास", असे म्हणून पॅरिस कुत्सित हसू लागला. डायोमीड उलट फणकारला, "तुझ्यासारखा पेद्रट भित्रा मला काय शष्प इजा करू शकणारे? असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही." हे जाबसाल होताच डायोमीडच्या मदतीला ओडीसिअस आला. तो ट्रोजनांशी लढत असताना डायोमीड हळूहळू आपल्या रथाकडे गेला आणि जखमेवर उपचार करण्यासाठी परत जहाजाकडे गेला. आता ओडीसिअस जवळपास एकटा पडला होता, ट्रोजनांपासून त्याला वाचवायला कोणी नव्हते. पण ओडीसिअस काही कमी नव्हता, शर्थीने आपली पोझिशन कायम राखून त्याने बर्‍याच ट्रोजनांना मारले. सोकस नामक ट्रोजनाने ओडीसिअसवर नेम धरून भाला फेकला. तो ढाल आणि चिलखत भेदून छातीला लागला. थोडे मांस भेदले गेले आणि रक्त येऊ लागले, पण तो प्राणघातक वार नव्हता. मग ओडीसिअस सोकसच्या मागे लागला. सोकस पळू लागला, पण त्याच्या पाठीवर अचूक नेम धरून ओडीसिअसने भाला रेमटवला. तो छातीच्या आरपार जाऊन सोकस कोसळला.

आता ओडीसिअसच्या जखमेतून रक्त आलेले ट्रोजनांना दिसल्यावर त्यांनी ओडीसिअसवर हल्ला केला. ओडीसिअसने मदतीची आरोळी ठोकली, ती ऐकून थोरला सांड अजॅक्स त्याच्या मदतीला आला. अजॅक्सने कव्हर दिल्यावर मग जखमी ओडीसिअसला मेनेलॉसने परत नेले. अजॅक्सने डोरिक्लस, पँडोकस, लायसान्द्रस, पिरॅसस आणि पिलार्तेस या मुख्य ट्रोजन योद्ध्यांना आणि बर्‍याच इतर सैनिकांना ठार मारले.

हे सगळे चालू असताना हेक्टर हा लढाईच्या दुसर्‍या टोकाला होता. नेस्टॉर, क्रीटाधिपती इडोमेनिअस यांच्याबरोबर लढाई ऐन रंगात आली होती. पॅरिसने मॅखॉन या ग्रीक योद्ध्याला उजव्या खांद्यात तीन टोकांचा बाण मारून जखमी केले होते. मॅखॉन हा योद्ध्याबरोबरच वैद्यराज असल्याने इडोमेनिअस म्हणाला की आधी याला मागे न्या. बाकीचे मेले तरी चालेल पण वैद्य जगला पाहिजे. मग नेस्टॉर त्याला घेऊन मागे फिरला.

खंदक ओलांडून ट्रोजन आत घुसतात आणि घमासान लढाई होते.

पॅट्रोक्लस हा जखमी युरिप्लस नामक ग्रीक योद्ध्यावर जरा उपचार करीत होता. त्याच वेळी ग्रीकांच्या जहाजांभोवती खणलेला खंदक पार करून जहाजांपर्यंत घुसण्यासाठी ट्रोजन सेना जिवाचे रान करीत होती. खंदकापलीकडचा तट भेदून आत जाण्यासाठी ट्रोजनांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या अग्रभागी अर्थातच हेक्टर होता. ट्रोजन सैन्यात बरेच रथदळ होते. खंदकावरून उडी मारून लगेच पलीकडे जावे म्हटले तर ते इतके सोपे काम नव्हते. पलीकडल्या बाजूला लाकडाचे टोकदार वासे बरोब्बर अँगलमध्ये उभे करून ठेवले होते. कोणी उडी मारायचा अवकाश, ते वासे एकतर आरपार तरी गेले असते किंवा पूर्ण आत घुसून त्या बिचार्‍याचा "सीख कबाब" तरी झाला असता. शिवाय तटाच्या बुरुजाबुरुजांवर ग्रीक सैनिक भाले-दगड इ. घेऊन मारामारीला सज्जच होते. ते सर्व पाहून ट्रोजनांचे घोडे भीतीने खिंकाळू लागले. शेवटी घोड्यांना सारथ्यांकडे सोपवून आपण पायउतार होऊन पुढे जावे असा सल्ला पॉलिडॅमस नामक ट्रोजन वीराने हेक्टरला दिला. त्याबरहुकूम मग ट्रोजन सेना निघाली- ५ तुकड्यांत विभागून ती खालीलप्रमाणे.

तुकडी क्र. प्रमुखांची नावे

१ हेक्टर, पॉलिडॅमस आणि सेब्रिऑनेस.
२ पॅरिस, अल्काथूस आणि अ‍ॅगेनॉर.
३ हेलेनस, डेइफोबस आणि एसियस.
४ एनिअस आणि अँटेनॉरचे दोन मुलगे- आर्किलोकस आणि अकॅमस.
५ सार्पेडॉन आणि ग्लॉकस व अ‍ॅस्टेरोपाइउस.

अशी ही सेना घेऊन सगळेजण हल्ला करायला निघाले. आता हळू हळू ट्रोजन्स आत घुसत होते आणि ग्रीकांना जहाजांभोवती कोंडाळे करून स्वतःचे संरक्षण करणे भाग पडत होते. इकडे हेक्टर आणि पॉलिडॅमसच्या हाताखालची तुकडी अजून खंदकाजवळच कन्फ्यूज्ड होऊन उभी होती. इतक्यात त्यांना आकाशात एक गरुड दिसला. त्याच्या पंजात एक लालसर रंगाचा साप होता आणि तो अजूनही जिवंत होता-वळवळत होता. अचानक सापाने गरुडाला डंख मारला. त्या आकस्मिक हल्ल्याच्या वेदनेने त्रस्त होऊन गरुडाने सापाला तसेच सोडून दिले आणि उडून गेला. तो साप त्या तुकडीच्या अगदी जवळच जमिनीवर पडला.

हा तर नक्कीच अपशकुन होता. आता काही अर्थ नाही, गप परत फिरू. समजा लढायला गेलो तरी लै लोक मरतील असे पॉलिडॅमसने हेक्टरला सांगितल्यावर हेक्टर लै खवळला. "शकुन-बिकुन गेला गा-च्या गा-त!!!काय डोक्यावर पडलायस की काय? स्वतःच्या देशासाठी प्राणपणाने लढणे हाच काय तो एकमेव शकुन आहे. तू घाबरला तर नाहीयेस ना? आम्ही सगळे मेलो तरी तू मरायचा नाहीस, कारण तू न लढता पळूनच जाशील. इतःपर तू पळून गेलास किंवा अजून कुणाला पळून जाण्यास भाग पाडलेस तर माझ्याशी गाठ आहे. एका भाल्यात गार करीन." अशी सज्जड धमकी त्याने पॉलिडॅमसला दिली.

हेक्टरचे नवसंजीवनी देणारे शब्द ऐकून ट्रोजन तुकडीही खवळली होती. त्याच आवेशात ते सर्वजण ग्रीकांच्या तटाजवळ आले. भिंतीचा काही भाग अन काही बुरुज सरळ पाडून टाकले (माती+लाकूड असल्याने ते जमले नपेक्षा जमणे पॉसिबल इल्ले.) आणि भिंत पाडण्यासाठी रेटा लावू लागले तरी उरलेल्या बुरुजांवर व जवळपास ग्रीक सैनिक होते तस्से अडिग राहिले, ट्रोजनांवर भाले-बरची-दगडे फेकतच राहिले. ग्रीकांना प्रेरणा देण्यासाठी थोरला आणि धाकटा अजॅक्स हे दोघेही इकडेतिकडे पळापळ करीत होते. रणगर्जना, तलवारींची खणाखणी, भाले खुपसल्यावर वेदनांचे आवाज, दगड आणि ढालींचा एकमेकांवर आघात झाल्यावरचा आवाज, यांनी पूर्ण वातावरण भरून गेले होते.
तरीही आत घुसण्यात अजूनही यश आलेले नव्हते. सर्व गेट्स बंद होती आणि ट्रोजन्स आत घुसण्याचा जिवापाड प्रयत्न करीत होते. आता सार्पेडॉन एकदम फॉर्मात आला. ग्लॉकस व लिशियन योद्ध्यांना बरोबर घेऊन एकदम निकराचा हल्ला त्याने चालविला.

ते पाहून मेनेस्थेउस नामक ग्रीकाची फाटली आणि त्याने दोन्ही अजॅक्स लोकांची मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे एक मेसेंजर पाठविला. धाकट्या अजॅक्सला आहे तिथेच थांबून खिंड लढवायला सांगून थोरला अजॅक्स त्याचा सावत्र भौ ट्यूसरसकट मेनेस्थेउस असलेल्या टॉवरकडे गेला. टॉवरवरून एक भलाथोरला धोंडा एपिक्लेस नामक ट्रोजन योद्ध्याच्या डोक्यात आदळून त्याने त्याचा खातमा केला. त्या धोंड्यामुळे एपिक्लेसच्या हेल्मेटचे तुकडेतुकडे झाले आणि कवटीच्या हाडांचा चुरा झाला. तो जागीच ठार झाला. नंतर ट्यूसरने ग्लॉकसच्या खांद्यात बाण मारून त्याला रिटायर्ड हर्ट केले. ते पाहून सार्पेडॉनला दु:ख झाले, तरी त्याने अल्कॅमॉन नामक ग्रीक योद्ध्याला भाल्याने ठार केले आणि जवळचा बुरुज पाडून-मोडून टाकला. त्यामुळे बर्‍याच लोकांना जाता येईल अशी मोकळी जागा तयार झाली आणि तोही घुसला.

युद्धाचे पारडे बराचवेळ समतल राहिले. अखेरीस हेक्टरच्या "हरहर महादेव" ने त्याची तुकडी बुरुज चढून पुढे आली. दरवाजा तर काही केल्या फोडणे अवश्यमेव होते. शेवटी हेक्टरने एक भलाथोरला धोंडा घेतला आणि नीट नेम धरून, पूर्ण वजन टाकून दारावर नेमका मध्यभागी आदळला. त्या डबल डोअरला मागे दोन आडणे तिरपे बसवले होते. हेक्टरच्या आघाताने ते दोन्ही आडणे मोडले, दाराच्या दोन्ही बिजागर्‍याही मोडल्या आणि दारही तुटले. दगड त्याच्या वजनामुळे पुढे आत जाऊन पडला.

दार तुटले म्हटल्यावर ट्रोजनांना चेव आला. काहीजण भिंत चढून तर बरेचजण दरवाजातून आत घुसले. ग्रीकांचा पाठलाग करत त्यांना पार जहाजांपर्यंत रेमटवत नेले. ग्रीक आता घाबरले होते, सगळीकडे आरडाओरडा आणि नुसता गोंधळ चालला होता.

खंदकातील लढाई पार्ट २

ट्रोजन्स तट भेदून आत घुसले. बरेच ग्रीक मागे हटले तरी त्यांची फळी पूर्णतः काही मोडलेली नव्हती. त्यांनी नंतर नेटाने प्रतिकार चालविला. राजपुरोहित काल्खसने ग्रीकांना धीर देणे सुरू केले.हे ऐकून ग्रीक पेटले. थोरल्या आणि धाकट्या अजॅक्ससमवेत ते लढायला उभे राहिले. त्यांनी एक मानवी भिंतच उभी केली. त्यांच्या हेल्मेट्सचा एकमेकांना स्पर्श होऊ लागला, ढालीला ढाल स्पर्शू लागली आणि शेकडो भाले ट्रोजनांच्या दिशेने रोखलेले पुढे जाऊ लागले. अभेद्य हाडामांसाची भिंतच जणू. ते पाहून हेक्टरनेही आपल्या ट्रोजन, लिशियन आणि दार्दानियन योद्ध्यांना तस्सेच अगदी खेटून राहण्यास सांगितले आणि लढाईला पुन्हा एकदा तोंड फुटले.

प्रथम एक ग्रीक योद्धा मेरिऑनेस याने प्रिआमचा मुलगा डेइफोबस याजवर भाला उगारला. डेइफोबसच्या ढालीवर तो बरोब्बर लागला खरा, पण ढालीला काही न होता उलट भालाच तुटला. डेइफोबस आणि आपले गांडू नशीब यांना चार शिव्या घालत, नवीन भाला आणण्यासाठी मेरिऑनेस युद्धभूमीतून आपल्या तंबूकडे तात्पुरता रिटायर झाला. नंतर मग थोरल्या अजॅक्सचा सावत्र भौ, ग्रीकांकडचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर ट्यूसर याने इंब्रियस नामक ट्रोजन योद्ध्याला ठार मारले. भाला फेकला तो सरळ कानाखाली घुसला. इंब्रियस जागीच कोसळला. ट्यूसर त्याचे चिलखत काढण्याच्या बेतात असतानाच हेक्टरने त्यावर एक भाला फेकला. सुदैवाने ट्यूसरचे लक्ष असल्याने त्याने तो चुकवला. तो पुढे अँफिमॅखस नामक ग्रीक योद्ध्याला लागून तो जागीच गतप्राण झाला. त्याचे हेल्मेट काढून घेण्यासाठी हेक्टर पुढे सरसावला, इतक्यात धाकट्या अजॅक्सने हेक्टरवर जोर्रात भाला फेकला. तो हेक्टरने ढालीवर झेलला तरी त्याचा जोरच इतका होता, की त्यामुळे हेक्टर डेड बॉडीपासून चार पावले मागे झाला. ते पाहताच अँफिमॅखसची डेड बॉडी स्टिचियस आणि मेनेस्थेउस या अथीनिअन ग्रीकांच्या कॅप्टन्सनी तर इंब्रियसची डेड बॉडी थोरल्या व धाकट्या अजॅक्सांनी आपल्या बाजूस नेली. एक काडी करायची म्हणून धाकट्या अजॅक्सने अँफिमॅखसचे शीर कापून हेक्टरच्या पायांजवळ फेकले.

एकदा युद्धात उतरल्यावर इडोमेनिअसने आपले शौर्य दाखवायला सुरुवात केली. केस पांढरे झाले असले तरी अंगातले बळ काही उणावले नव्हते. ओथ्रिओनेउस नामक ट्रोजनावर त्याने भाला फेकला, तो ब्राँझचे चिलखत भेदून पोटात घुसला. एसियस नामक ट्रोजनालाही यमसदनी धाडले.

ऑथ्रिओनेउस आणि एसियसचा बदला घेण्यासाठी डेइफोबस आता इडोमेनिअसवर परत चालून आला. त्याने एक भाला फेकला, तो इडोमेनिअसने वाकून चुकवला. डेइफोबसच्या वल्गना ऐकून ग्रीक चिडले, अँटिलोखस तर लैच चिडला. इकडे इडोमेनिअसचा कत्तलखाना सुरूच होता. अल्काथॉउस नामक ट्रोजन योद्ध्याच्या छातीत भाला खुपसून त्याने त्याला ठार मारले, आणि डेइफोबस कडे पाहून चढ्या आवाजात म्हणाला: " लै टिवटिव करायलास. आमचा एकच जण मेला तर तुझे तीन लोक आम्ही मारले. आता तुला असातसा सोडतो की काय? उभा रहा युद्धाला."

हे च्यालेंज ऐकून डेइफोबसची जरा तंतरलीच. एकट्याने हाणामारी करावी तर इडोमेनिअस पेटलाय एकदम. मग त्याने एनिअस नामक ट्रोजन वीराला बोलावणे पाठवले. ते दोघे आपल्यावर चाल करून येत असलेले पाहताच एखाद्या रानडुकरासारखा उभा असलेल्या इडोमेनिअसनेही आपल्या साथीदारांना हाक मारली.ते ऐकून सगळेजण इडोमेनिअसकडे धावले. खांद्यावर ढाला बांधून सज्ज राहिले. (ढाली बर्‍याच लोकांच्या जरा लैच मोठ्या होत्या) ते पाहून एनिअसनेही आपल्या साथीदारांना हाक मारली. ती ऐकून डेइफोबस, पॅरिस आणि आगेनॉर हे ट्रोजन तुकडीप्रमुख आणि त्यांच्यामागोमाग अजून बरेच ट्रोजन सैनिक आले. अल्काथॉउस नामक ट्रोजनाच्या शवाभोवती अगदी हातघाईची लढाई सुरू झाली.

त्यात ट्रोजनांची सरशी पाहून हेलेनचा पती, अ‍ॅगॅमेम्नॉनचा धाकटा भौ मेनेलॉस चिडला आणि हेलेनस नामक ट्रोजनावर झेपावला. हेलेनसकडे धनुष्यबाण होते तर मेनेलॉसकडे भाला. हेलेनसने बाण मारला खरा परंतु मेनेलॉसचे चिलखत भेदण्यास तो असमर्थ ठरला. मेनेलॉसने हेलेनसला जो भाला फेकून मारला तो त्याच्या हातातून आरपार गेला आणि तसाच रुतून बसला. जिवाच्या आकांताने कसाबसा हेलेनस मागे हटला. भाला रुतलेला हात भाल्याच्या वजनाने खाली लोंबतच होता. शेवटी आगेनॉर या ट्रोजन योद्ध्याने भाला तिथून उपटून काढला, आणि हात एका लाकडी गोफणीत बांधला.

ते पाहून पिसांडर नामक ट्रोजन योद्धा मेनेलॉसवर धावून आला. त्याने मेनेलॉसवर भाला फेकला पण मेनेलॉसने तो ढालीने अडवला. त्या भानगडीत भाल्याचे टोक मोडल्यावर मेनेलॉसने आपली तलवार उपसली. ते पाहून पिसांडरने जवळच पडलेला एक परशू उचलला आणि मेनेलॉसच्या डोक्यावर घाव घातला. पण मेनेलॉसने तो शिताफीने चुकवला, हेल्मेटच्या वरचा भाग जरा टच झाला इतकेच. मग मेनेलॉसने त्याच्या कपाळावर तलवारीचा जीव खाऊन वार केला. कवटीची हाडे मोडून पडली आणि पिसांडर ठार झाला.

आता इकडे चाललेल्या या गोंधळाचा हेक्टरला पत्त्याच नव्हता. थोरल्या आणि धाकट्या अजॅक्सने हेक्टरविरुद्ध चांगली खिंड लढवत ठेवली होती. सोबतच्या लोक्रियन धनुर्धार्‍यांनीही आता कमाल चालवली होती. त्यांच्याकडे अवजड चिलखते नसल्याने ते हातघाईच्या लढाईत नव्हते-तिथे चिलखतवाले बाकीचे वीर होते. त्यांच्या आडून ते ट्रोजनांवर वार करत होते. अचानक बाण कुठून येताहेत म्हणून ट्रोजन कन्फ्यूज झाले. आणि त्यांचे मनोधैर्य खचले. ग्रीकांनी त्यांची चटणीच उडवली असती, इतक्यात पॉलिडॅमसने हेक्टरला सांगितले "भौ, दमानं घे नं जरा. सगळ्यातलं सगळं तुलाच कळतं असं काही नाही. आत्तापर्यंत आपण आलो ते ठीक, पण तो अकिलीस स्वस्थ बसलाय म्हणून चाललंय हे सगळं. तो एकदा का पेटला की संपलंच! तो तरी किती स्वस्थ बसेल म्हणा. त्यामुळं चल आता, परत जाऊ गप." हेक्टर ओके म्हटल्यावर पॉलिडॅमसला त्याने सर्व तुकडीप्रमुखांना बोलवायची आज्ञा केली आणि स्वत: तोपर्यंत लढाईत घुसला.

पण त्याची नजर जिथेतिथे पॅरिस, हेलेनस, एसियस आणि अ‍ॅडमस यांना शोधत होती. तो फुल्टू टेन्शन मध्ये होता. पॅरिसला पाहताच हेक्टरला बरे वाटले आणि तो पुन्हा युद्ध करू लागला. लै योद्धे दिमतीला घेतले होते.

तो मोठा जथा ग्रीकांपाशी आल्यावर थोरल्या अजॅक्सने हेक्टरला च्यालेंज केले. "इकडे या साहेब, असे लांब जाऊ नका! आम्ही ग्रीक नंबर एकचे शिपाई आहोत, झ्यूसदेवाची अवकृपा झाली तरीही आमचे शौर्य काही कमी झालेले नाही. आज आमची जहाजे उद्ध्वस्त केलीत, उद्या तुमचे ट्रॉय आम्ही नक्कीच उद्ध्वस्त करू. तेव्हा झ्यूसदेवाची प्रार्थना नीटच करून या इकडे यायचे तर."

अजॅक्सचे आव्हान ऐकून हेक्टर लै चिडला. "खोटारड्या, झ्यूशशपथ सांगतो या भाल्याने तुमचे सर्वांचे या जहाजांपाशीच मुडदे पाडीन आणि कुत्र्या-गिधाडांना खाऊ घालीन." ते जाबसाल झाल्यावर ट्रोजन सैन्य ग्रीक सैन्याला पुन्हा एकदा भिडले.

ट्रोजन ग्रीकांवर खूप बळजोर होतात, पण ग्रीक पुन्हा सावरतात.

मागच्या बुकात सांगितल्याप्रमाणे फुल बोंबाबोंब चालली होती. हेक्टर आणि अन्य ट्रोजनांनी मिळून ग्रीकांची दाणादाण उडवलेली होती. यवनभीष्म नेस्टॉर आपल्या शामियान्यात बसला होता तिकडेही लढाईचा आवाज ऐकू येत होता. धन्वंतरी एस्कुलापियसचा मुलगा मॅखॉन जखमी झाला होता त्याला अंमळ विश्रांती घ्यायला सांगून नेस्टॉर ढाल-भाला-तलवार घेऊन बाहेर पडला. ट्रॉयसमोरचा समुद्रकिनारा मोठा असला तरी सर्व जहाजांना जागा पुरेल इतका रुंद नव्हता, सबब भौतेकांनी जहाजे एकापुढे एक अशी लावलेली होती. त्यांतून वाट काढत बाहेर पडल्यावर काही काळाने त्याला आगामेम्नॉन, डायोमीड आणि ओडीसिअस हे तिघे भेटले.

आगामेम्नॉनला कळायचं बंद झालं होतं. नेस्टॉरला पाहताक्षणीच त्याचा बांध फुटला, "बा नेस्टॉरा, तूही लढाई सोडून आलास तर!! च्यायला या ट्रोजनांनी अन त्यात पण हेक्टरने लैच वाट लावलीय राव आपली. तो जहाजांपर्यंत येईल अन आपल्याला हाकलून लावेल. अकिलीससारखे लोक रुसून बसल्यावर काय घंटा पाड लागणारे आपला?"
नेस्टॉर म्हणाला की एका चांगल्या सल्ल्याची आत्ता कधी नव्हे इतकी गरज आहे. लगेच आगामेम्नॉनचा प्लॅन रेडी होताच-"गप इथून निघून जाऊ. रात्रीच्या वेळेस लढाई थांबवली तर बरेच लोक सुरक्षितपणे निसटू शकू. शेवटी शिर सलामत तो हेल्मेट पचास."

हे ऐकल्यावर इथाकानरेश ओडीसिअस मात्र लैच खवळला. "मूर्खा, तुला अक्कल आहे का तू काय बरळतोयस त्याची? ग्रीक सैन्यासारख्या श्रेष्ठ सेनेला तुझ्यासारखा नेता आजिबात शोभत नाही. आता जरा तुझं तोंड बंद ठेव नैतर कोणी ऐकलं तर काय बिनडोक सल्ला देतोय राजा म्हणून लायकी काढतील तुझी. इतकी वर्षे ट्रॉयवर कब्जा करण्यासाठी लढलो ते काय उगीच? आणि तुला किंवा अजून कुणाला जहाजातून पळताना पाहून बाकीचे ग्रीक काय लढतील की पळतील? त्यांच्या मनाचा कै विचार आँ????"
आगामेम्नॉनला हा वार एकदम दिल पे लागला. "सगळ्यांनी एकगठ्ठा पळून जावं असं मी म्हणतच नाहीये. कुणाकडे अजून चांगला सल्ला असेल तर ऐकूच." तो असे म्हणताक्षणी डायोमीड उत्तरला, "तर मग ऐका मी काय सांगतो ते. माझं वय कमी असलं तरी निव्वळ तेवढ्या कारणासाठी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. माझं म्हणणं असं आहे की आत्ता आपण सर्व जखमी झालो असलो तरी आपल्याला परत युद्धभूमीकडे परत गेलेच पाहिजे. ज्यांनी आत्तापर्यंत कातडी बचावून आराम केलाय त्यांना आपण पुढे ढकलू अन काही काळ तरी प्रत्यक्ष खणाखणीपासून दूर राहून ताजेतवाने होऊ."

हा सल्ला सर्वांना पसंत पडला आणि आगामेम्नॉनच्या नेतृत्वाखाली ग्रीक सैन्याने पुनरेकवार कूच केले. त्यांना पाहताच हेक्टरनेही आपल्या आर्मीला पुनरेकवार नीट अ‍ॅरेंज केले आणि लढाईला तोंड लागले. थोरला सांड अजॅक्स (टेलामॉनचा मुलगा, अकीलिसचा चुलतभौ) आणि हेक्टर हे पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. हेक्टरने नीट नेम धरून अजॅक्सच्या छातीवर एक भाला फेकला. पण अजॅक्सने ढालतलवारीच्या सहाय्याने तो थोपवला. भाला व्यर्थ गेल्याने हेक्टर चिडला आणि परत मागे हटला. पण तो मागे हटत असतानाच अजॅक्सने जवळ पडलेला एक धोंडा उचलला. तो धोंडा उचलून त्याने हेक्टरच्या मानेजवळ फेकून मारला. हेक्टरची ढाल मोठी होती, पार मानेपासून ते पायांपर्यंत येण्याइतकी. त्या ढालीच्या वरच्या टोकाच्या जरा वर अन मानेवर तो धोंडा जोरात लागल्यामुळे हेक्टर एकदम सटपटला आणि जमिनीवर कोसळला. त्याला पडलेला पाहून अनेक ग्रीकांनी त्यावर बाण मारले आणि त्याला ग्रीक बाजूस ओढत नेणे चालले होते. पण तेवढ्यात ट्रोजन बाजूच्या अनेक दक्ष लोकांनी मध्ये पडून हेक्टरला वाचविले. त्याला मागच्यामागे त्याच्या रथाजवळ नेले. तोंडावर पाणी मारले तेव्हा तो मूर्छेतून जागा झाला अन गुडघ्यांवर मटकन खाली बसत त्याने रक्ताची एक उलटी केली अन पुन्हा बेशुद्ध पडला.

हेक्टर रणभूमीपासून बाजूला गेल्याचे पाहताच ग्रीकांना धीर आला आणि नव्या जोमाने त्यांनी ट्रोजनांबरोबर लढणे सुरू केले. धाकटा चपळ अजॅक्स या वेळेस एकदम जोरात होता. लै लोक मारलेन्. अजूनही बर्‍याच ग्रीकांनी ट्रोजनांना व ट्रोजनांनी ग्रीकांना मारले. तलवारीने हाडे मोडणे, डोळ्यात भाला खुपसून बुबुळ खोबणीतून उचकून पार आरपार जाणे, इ. अनेक प्रकार यथासांग झाले. आगामेम्नॉन वगैरे लोकांनीही अनेक लोक मारले. धाकट्या अजॅक्सने पाठलाग करता करता चपळाईने अनेक लोक मारले.

हेक्टर सर्व ग्रीकांना भारी पडतो अन ग्रीकांसाठी जिंकू किंवा मरू अशी स्थिती येते.

मागील बुकात पाहिल्याप्रमाणे हेक्टरला घेऊन बरेच ट्रोजन मागे हटले. अजॅक्सने मारलेल्या धोंड्याच्या आघातामुळे हेक्टर अजूनही सुन्नच होता. पण तरीही आपल्या दुखण्यावर काबू ठेवत तो लढायला उभा राहिला. त्याची ही डेरिंग बघून ट्रोजन सैन्यात जी वीरश्री संचारली तिचे वर्णन करणेच अशक्य. भारल्यागत त्याच्या मागोमाग सर्व ट्रोजन निघाले. ते पाहून एका ग्रीक सैनिकाने थोरला अजॅक्स, क्रीटाधिपती इडोमेनिअस, अजॅक्सचा सावत्र भौ धनुर्धारी ट्यूसर, मेरिओनेस आणि अजून उत्तमोत्तम योद्ध्यांना हाक मारली. ते सर्वही सैन्य घेऊन हेक्टरचा सामना करण्यासाठी पुढे निघाले.

आज हेक्टर कुणालाही आटपत नव्हता. त्याने लै लोक मारले. पॅरिस आणि अन्य ट्रोजनांनीही ग्रीकांना मारून त्यांची चिलखते ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. नंतर सैन्याला हेक्टरने पुन्हा आवाहन केले, "आक्रमण!!! जहाजांकडे पुढे जावा आणि मिळेल ती लूट पदरात घ्या. सर्व आहे आपलंच, होऊ दे ग्रीकांचा खर्च!!" ट्रोजनांपासून बचाव म्हणून ग्रीकांनी जहाजांभोवतीच्या खंदकाचा, त्याआधीच्या टोकदार लाकडी वाशांचा आसरा घेतला आणि भिंतीआड लपले.

आता लढाई हातघाईवर आली होती. ट्रोजन खंदक भेदून कधीही घुसू शकतील असं चित्र होतं. ते पाहून अकीलिसचा मित्र पॅट्रोक्लस उठला आणि अकीलिसची मनधरणी करण्याला निघून गेला. कारण आता अब नही तो कभी नही अशी स्थिती होती. नेस्टॉरसाहेब आकाशाकडे पाहून आर्त प्रार्थना करीत होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तटाच्या भिंतीपाशी खतरनाक मारामारी सुरू होती. ट्रोजन आत घुसू पाहत होते पण थोरला अजॅक्स बिनीला असल्याने ग्रीकही तुलनेने कमी असले तरी फुल चेकाळून लढत होते. कुठलीच एक बाजू बळजोर होत नव्हती. अजॅक्सला पाहून हेक्टर पुन्हा त्याच्यावर झेपावला. काय आकर्षण होते काय माहीत दोघांना एकमेकांचे. हेक्टरपण जरा आवरेल की नै? आत्ताच तर मार खाल्लाय, रक्त ओकलाय तरी त्याच माणसाबरोबर युद्ध करू पाहतोय. पण खणाखणीला तोंड लागले, दोघेही सारखेच तुल्यबळ. कोणी कुणाला आवरेना. अजॅक्सने एक भाला फेकून मारला तो हेक्टरच्या एका चुलतभावाला लागला. तो मरताच त्याचे चिलखत काढून घेण्यासाठी माशा घोंगावतात तसे ग्रीक योद्धे त्याच्या प्रेताभोवती गर्दी करू लागले. मृतदेहाची विटंबना थांबवण्यासाठी हेक्टरने योद्ध्यांना पाचारण केले आणि ते सर्व डेड बॉडी ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले.

ते पाहताच अजॅक्सने त्याचा सावत्र भाऊ ट्यूसरला सांगितले की धनुष्य बाण घेऊन ये, हेक्टरला टिपून काढ बाणाने. ट्यूसर गेला, अन प्रत्यंचेवर बाण ठेवणार इतक्यात हाय रे दैवा!! प्रत्यंचाच तुटली. पुन्हा सांधायला वेळ नव्हता, मग ट्यूसर ढाल अन भाला घेऊन राउंडात उतरला. प्रत्यंचा तुटल्याचे पाहताच हेक्टर मोठ्याने हसून म्हणाला, "झ्यूसदेवाची आपल्यावर कृपा आहे पाहिलंत का ट्रोजनांनो!! ते बघा एका ग्रीक राजाच्या धनुष्याची प्रत्यंचाच तोडली झ्यूसने. आता आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. खुश्शाल पुढे जावा अन युद्ध करा. कुणी मेला तरी हर्कत नाही, आपल्या देशासाठी मरणे हे पुण्यकर्मच आहे." हे ऐकून ट्रोजन अजून चेकाळून लढू लागले.

ते पाहून अजॅक्स चिडूनच ग्रीकांना म्हणाला, "लानत है साल्यांनो. इतकी वाईट अवस्था आली काय आपल्यावर? आणि ट्रोजनांच्या ताब्यात सगळे दिले तरी आपण जगूवाचू याची ग्यारंटी ती काय? हेक्टर पाहिलात का कसा चेकाळून लढतोय ते? एक तर लढून त्यांना हाकला तरी नैतर लढून मरा तरी. तिसरा मार्ग आता आपल्यापुढे नाही." ते ऐकून ग्रीकांनाही स्फुरण चढले. नव्या जोमाने लढाई सुरू झाली. हेक्टरने पुन्हा खवळून चढाई केली तरी तो कमी लोकच मारू शकला. पण तोपर्यंत ट्रोजनांनी ग्रीकांना जहाजांच्या पहिल्या रांगेमागे हाकलले होते. आता पार मागच्या बाजूच्या शामियान्यांपर्यंत लढाई गेली होती. नेस्टॉरनेही ओरडून सर्व ग्रीकांना धीर दिला. बरेच ग्रीक जागेवरून हटले तरी थोरल्या अजॅक्सला हटणे नामंजूर होते. या ना त्या जहाजाच्या डेकजवळ उभे राहून तो लढाई करीत होता. त्याच्या हातात एक लै लांब असा 'पाईक' ऊर्फ मोठा दांडा होता.

http://en.wikipedia.org/wiki/Pike_%28weapon%29

हेक्टर एका जहाजाजवळ आला आणि तिथे हातघाईची लढाई सुरू झाली एकदम जवळून. बाणांचे इथे काम नव्हते. हातभराच्या अंतरावरून भाले, तलवारी अन कुर्‍हाडी समोरच्याच्या शरीरात खुपसल्या जात होत्या, कवट्या फोडल्या जात होत्या अन हातपायांची हाडे मोडून निकामी केली जात होती. हेक्टर आणि अजॅक्स यांनी पुन्हा एकदा आपापल्या सेनेस ओरडून चेतवले. त्या लढाईत अजॅक्सने भाल्याने बारा लोकांचे प्राण घेतले.

अफाट पराक्रम गाजवून पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरतो.

(पॅट्रोक्लसवर उपचार करताना अकिलीस)

हेक्टरच्या नेतृत्वाखाली ट्रोजन सैन्याने ग्रीकांना पार जहाजांपर्यंत मागे रेटले होते. ते पाहून पॅट्रोक्लस अकीलिसची मनधरणी करायला निघाला. डोळ्यांत अश्रू आणून त्याने अकीलिसला बहुता परीने विनविले, की "बाबारे, तू नाहीस तर कमीतकमी मी तरी तुझे चिलखत वगैरे घालून लढाईला जातो. ग्रीकांचे पार कंबरडे मोडले आहे हेक्टरने. डायोमीड भाल्याची जखम वागवत आहे.ओडीसिअस आणि आगामेम्नॉनला तलवारीचे घाव लागलेत तर युरिपिलसच्या मांडीत बाण घुसलाय. काळ मोठा कठीण आलाय. सोबत तुझे मॉर्मिडन सैनिकदेखील माझ्या बरोबर दे."

त्याच्या विनंतीचा अकीलिसवर परिणाम झाला आणि त्याने त्याला परवानगी दिली. पण परवानगी देतानासुद्धा कशा शब्दांत दिली हे फार रोचक आहे. तो म्हणाला, "मला जितका अपमान सहन करावा लागला तो सहन करणे माझ्या कुवतीबाहेरचे होते. आगामेम्नॉन आणि मी दोघेही एकाच दर्जाचे असूनही निव्वळ त्याची पॉवर माझ्यापेक्षा जास्त असल्याने माझ्या शौर्याचे बक्षीस म्हणून मिळालेली ब्रिसीस त्याने हिरावून घेतली. तरी ठीक आहे, झालं गेलं स्टिक्सला मिळालं. ग्रीकांपैकी कुणाची रणगर्जना कानावर पडेना, फक्त हेक्टरचा आरडाओरडा कानावर येतोय म्हणजे प्रसंग मोठाच बाका आलाय खरा. तू माझं चिलखत वगैरे घालून जा लढायला आणि मोठा विजय मिळव ट्रोजनांवर. म्हणजे आगामेम्नॉन खूष होऊन मला माझी ब्रिसीस परत मिळेल. पण मी नसताना अजून हल्ला करू नकोस, कारण ती माझी हक्काची लढाई आहे आणि त्यापासून मिळणारी कीर्ती माझ्यापासून आजिबात हिरावून घ्यायची नाही. आणि अजून एक म्हणजे ट्रॉय शहराजवळ फार जाऊ नकोस, तिथे लै योद्धे आहेत. उगा मेलासबिलास तर कशाला बिलामत नसती? जहाजांपासून ट्रोजनांना दूर हाकललेस की परत ये गप आणि इतरांना लढू दे."
यावरून लक्षात येते की स्वतः पॅट्रोक्लसचीच ऑफर होती अकीलिसच्या वेषात युद्ध करायची.

आता पॅट्रोक्लस लढाईसाठी तयार होत होता. अकीलिसचे हेल्मेट, चिलखत अन तलवार घेऊन निघाला, पण भाला काही त्याला झेपला नाही. पेलिऑन पर्वतावर तयार केलेला तो भाला अकीलिस सोडून कुणालाही फेकता येत नसे. ऑटोमेडॉन नामक मॉर्मिडनने रथ सज्ज केला, खँथस आणि बॅलियस व पेडॅसस नामक तीन घोडे त्याला जुंपले. पाठोपाठ अकीलिस आपल्या मॉर्मिडन सेनेला आवाहन करू लागला. "भावांनो, ऐका. पराक्रम गाजवण्याचा मोठा चान्स आहे तुम्हाला आज. आगामेम्नॉनवर चिडून मी बसल्यामुळे तुम्हाला इतके दिवस स्वस्थ बसावे लागले म्हणून तुम्ही मला कायम शिव्या घालायचा, पण आता मात्र नुस्ता दंगा घालायचा! होऊ दे मारामारीचा खर्च, ट्रॉय आहे घरचं!"

आवाहन करून त्याने मॉर्मिडन लोकांना चेतवले. ही सेना अख्ख्या ग्रीसमध्ये सर्वांत खूंखार म्हणून गाजलेली होती. स्वतः होमर त्यांचे वर्णन "एखाद्या चवताळलेल्या लांडग्याप्रमाणे लढणारे अन भीती म्हणजे काय ते ठाऊक नसणारे" असे करतो. ट्रॉयला येताना अकीलिसने ५० जहाजे आणलेली होती. प्रत्येक जहाजात ५० लोक होते. म्हणजे एकूण झाले अडीच हजार. यांवर त्याने पाच सरदार नेमले होते- अनुक्रमे मेनेस्थियस, युडोरस, पिसांडर, फीनिक्स आणि अल्किमेदॉन. या पाचांवरचा बॉस अर्थातच अकीलिस स्वतः होता. यांच्या अग्रभागी आता अकीलिसच्या वेषातील पॅट्रोक्लस आणि ऑटोमेडॉन हे दोघे होते. ती सेना युद्धासाठी निघून गेल्यावर अकीलिसने झ्यूसदेवाला वाईन अर्पण करून यशासाठी प्रार्थना केली.

लढाईला तोंड लागले. मॉर्मिडन सेनेला पाहून ग्रीकांनी मोठ्या जोषाने जयघोष करावयास सुरुवात केली, तर त्यांचा अन त्यांच्या अग्रभागी असलेल्या पॅट्रोक्लसचा आवेश पाहून ट्रोजनांची चांगली हातभर फाटली. इतका वेळ ग्रीकांना रेमटवून मारणारे अन त्यांची चटणी उडवणारे ट्रोजन आता मागे हटू लागले. पॅट्रोक्लस, मेनेलॉस आणि धाकट्या अजॅक्सने तुंबळ मारामारी केली. अन्य ग्रीक योद्ध्यांनीही जबरा हाणाहाणी केली. पेनेलेऑस नामक ग्रीक योद्ध्याने लीकॉन नामक ट्रोजन योद्ध्याला कानाखाली मानेवर जोराचा घाव घातला. तलवार इतकी खोलवर गेली की कातडी वगळता डोक्याला धडाशी जोडणारा कसलाच दुवा शिल्लक राहिला नाही. मेरिओनेस आणि क्रीटाधिपती इडोमेनिअस यांनीही शर्थीची लढाई केली. इडोमेनिअसने एरिमास नामक ट्रोजन योद्ध्याच्या तोंडातच सरळ भाला खुपसला. तो कवटीच्या आरपार गेला. आतल्या हाडांचा चकणाचूर झाला, डोळ्यांतून रक्त वाहू लागले. रुतलेला भाला काढताना सगळी दंतपंगती बाहेर आली आणि नजारा अतिशयच भेसूर दिसू लागला.

इकडे थोरला अजॅक्सही हेक्टरवर पुन:पुन्हा भाले फेकतच होता, पण हेक्टर आपल्या ढालीचा कौशल्याने वापर करून ते चुकवीत होता. पण त्यालाही कळून चुकले, की आता माघार घेणेच इष्ट. तो निघाला तराट, पण बाकीची सेना तशीच मागे राहिली. जो तो ज्याला जसे सुचेल तसा पळत होता. त्या भानगडीत अनेक ट्रोजन रथांपासून घोडे घाबरून पळताना विलग झाले आणि कितीकजण तसेच मागे राहिले. पाठलागात पॅट्रोक्लसने दहाबारा ट्रोजन तरी लोळवलेच.

ते पाहून सार्पेडन नामक एक नामांकित ट्रोजन योद्धा खवळला. लिशियन लोकांना पाचारण करून तो पॅट्रोक्लसवर झेपावला. दोघांनी एकमेकांवर भालाफेक केली. सार्पेडनचा वार फुका गेला (पॅट्रोक्लसच्या रथाचा पेडॅसस नामक घोडा जायबंदी झाला) पण पॅट्रोक्लसचा वार कामी आला. सार्पेडनच्या जस्ट हृदयाखाली भाला बरोब्बर लागला. सार्पेडन कोसळला आणि मरण पावला.

ते पाहून ग्लॉकस नामक ट्रोजन सेनापतीने ओरडून ट्रोजन सेनेला हाकारून चेतवले. ते ऐकून ट्रोजन परत आले अन लढाईला पुन्हा तोंड लागले. मॉर्मिडन सेनेतील एक महत्वाचा कमांडर ट्रोजनांनी मारलासुद्धा. पण ग्रीक आज अनझेपेबल झाले होते. हेक्टर पुन्हा एकदा त्या रेट्यापुढे पळून गेला. ते पाहून अन्य ट्रोजनसुद्धा पळू लागले. मग ग्रीकांनी विधिवत सार्पेडनच्या डेड बॉडीपासून त्याचे चिलखत लांबवले. पाठलाग करत काही अंतर गेल्यावर पॅट्रोक्लस परत फिरला.

इकडे हेक्टर ट्रॉयपर्यंत गेला खरा पण तिथल्या "स्कीअन गेट" नामक दरवाजाच्या जवळ थांबून आत जावे की पुन्हा लढावे या द्विधा मनःस्थितीत तसाच उभा राहिला. ते पाहून त्याचा एक काका एसियस याने त्याला जरा शिव्या घालून पुन्हा लढावयास उद्युक्त केले. परत गेला पण अजून कुणा ग्रीकाला न मारता सरळ पॅट्रोक्लसवरच त्याने लक्ष केंद्रित केले. हेक्टर आपल्यावर चालून येत असलेला पाहताच पॅट्रोक्लसने त्याच्यावर एक धोंडा उचलून फेकला, तो हेक्टरच्या सारथ्याला लागून तो ठार झाला. हेक्टर पॅट्रोक्लसला पुढे जाऊ देईना तर पॅट्रोक्लसही हेक्टरला इकडेतिकडे हलू देईना. कुणीच कुणाला आटपेना. हेक्टरचा गतप्राण सारथी केब्रिओनेस याच्या डेड बॉडीभोवती लैच धुमाकूळ सुरू होता. पॅट्रोक्लसने तुफान पराक्रम टोटल सत्तावीस लोक मारले आणि तीनवेळेस ट्रॉयची भिंत चढण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला.

पण नंतर पॅट्रोक्लसची नजर धूसर झाली, भौतेक डोळ्यांत धूळ गेली असावी. कुणीतरी मागून केलेल्या आघातामुळे त्याचे हेल्मेटही खाली पडले. त्यातच एका ट्रोजनाने मागून येऊन पॅट्रोक्लसच्या दोन्ही खांद्यांमध्ये भाला खुपसला आणि वार करून पळून गेला. त्याला घाव लागला खरा पण तो प्राणघातक नव्हता. घाव लागल्यावर पॅट्रोक्लस मागे हटू लागला. ते पाहून हेक्टर पुढे सरसावला आणि त्याने त्याच्या ओटीपोटात भाला खुपसला. पॅट्रोक्लस त्या प्राणांतिक घावामुळे खाली कोसळला तेव्हा हेक्टरने वल्गना केली, "तुला काय वाटलं ट्रॉयवर कब्जा करणं म्हणजे खाऊ आहे होय? इतका शूर अकिलीस पण तोही तुझ्यासाठी घंटा काही करू शकला नाही. त्याने सोपवलेल्या कामगिरीत तर तू फेल झालासच, तुला मूर्खाला इतकीसुद्धा अक्कल नव्हती का आँ?"

मरता मरता पॅट्रोक्लसने जवाब दिला, "देवांच्या अवकृपेमुळे मी मरतोय. त्यांची कृपा असती तर तुझ्यागत शंभर (मूळ आकडा २० आहे) लोक आले असते तरी मी सगळ्यांचा मुडदा पाडलो असतो. उगा जास्ती टिवटिव करू नकोस. तूसुद्धा आता तसा जास्त दिवस जगणार नाहीयेस. अकिलीस लौकरच तुझा मुडदा पाडेल." इतके बोलून त्याने प्राण सोडला तरी हेक्टर त्याच्या डेड बॉडीबरोबर बोलतच होता-"कशाला मातबरी सांगायलास त्या अकिलीसची? कुणास ठाऊक तो माझ्या भाल्याने मरेलही."

हेक्टर आधी असे कधी करत नसे. अकिलीसचा विषय असल्याने त्याला स्वतःला दिलासा देणे गरजेचे वाटले असावे.पॅट्रोक्लसला मारल्यावर त्याचा सारथी ऑटोमेडॉन याला मारण्यासाठी हेक्टर निघाला पण ऑटोमेडॉन रथातून लगेच वेगाने परत फिरला.

सारांशः

ग्रीकांच्या जहाजांभोवती खूप हातघाईची लढाई होते, त्यात ग्रीकांचे सर्व सेनापती जखमी होतात. पॅट्रोक्लस अफाट पराक्रम गाजवून मरतो.

हा १६ व्या बुकापर्यंतचा कथाभाग झाला. इथून पुढे अकिलीसच्या पराक्रमाचे अतिशय डीटेल वर्णन आहे. स्टे ट्यून्ड!!

मांडणीविचार

प्रतिक्रिया

सर्व भाग साठवले आहेत आणि एकादमात वाचून काढणार .एक इँग्रजी पुस्तक इलिअड पण रद्दीत मिळवले आहे .मराठीत आणल्याबद्दल आभार .
सध्या जयपुर लिट्ररी फेस्टि वाल्या विल्यम डर्लिंपल ( व्हाईट मुघल )वाचत आहे .

धन्यवाद. :) कुणाचं इलियड आहे? आञ मीन भाषांतर कुणी केलेलं आहे?

बाकी सर्व प्रतिसादकांनाही धन्यवाद!!

श्रीरंग_जोशी's picture

5 Jan 2014 - 5:59 am | श्रीरंग_जोशी

जबरदस्त जमलाय रणसंग्राम.

ट्रॉय चित्रपटात लै म्हंजे लैच सुटसुटीत केलय सर्व. हा भाग वाचताना चित्रपटात दाखवलेल्या लढाईतील अनेक दृश्ये डोळ्यासमोर आली. थोडी अधिक चित्रे बरोबरीला असती तर अधिक परिणामकारक वाटले असते. पण शब्दातले वर्णन पार काळजाला जाऊन भिडले आहेच.

बॅट्या, होऊ दे टंकनखर्च, मिपा आहे घरचं!!

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 2:13 am | बॅटमॅन

आता पुढच्या भागात चित्रे टाकलीत बघा :)

अजया's picture

5 Jan 2014 - 10:13 am | अजया

बर्याच दिवसापूर्वी हे ट्रोजन युद्ध वाचायचा निष्फळ प्रयत्न केला होता. पुढे पुढे वाचताना परत मागे जाऊन संदर्भ तपासावा लागायचा. हे सर्व वाचुन त्यावर अतिशय सुसंगत आणि वाचनिय लिहिणे खरच कठिण काम आहे.
_/\_ स्विकारा.

प्यारे१'s picture

5 Jan 2014 - 1:19 pm | प्यारे१

+१

असेच म्हणतो!

बुळगटशिरोमणी पॅरिसने मारला होता!! =))
होऊ दे मारामारीचा खर्च, ट्रॉय आहे घरचं!" =))

जबरी लिहिलय.

अनुप ढेरे's picture

5 Jan 2014 - 1:23 pm | अनुप ढेरे

आवडलं !

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2014 - 1:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिले भाग आवडले होते. हाही तसाचा अभ्यासपूर्ण असणार यात शंका नाहीच. पण बराच खंड पडल्याने प्रथम पहिले वाचून मग हा वाचतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2014 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भाग ही भन्नाट जमलाय !

"शकुन-बिकुन गेला गा-च्या गा-त!!!काय डोक्यावर पडलायस की काय? होमरबाबाचे काही जीवाश्म उरले असलेच तर ते हे वाचून थडग्यात खो खो हसत गडबडा लोळायला लागतील +D

कवितानागेश's picture

5 Jan 2014 - 1:37 pm | कवितानागेश

फीस्ट!!
चवीचवीनी वाचेन आता... :)

चित्रगुप्त's picture

6 Jan 2014 - 7:25 am | चित्रगुप्त

वाहवा. हे सर्व डीटेलवार मराठीत, तेही खास शैलीत ब्याम्या वाचायला मिळते आहे, हे अहोभाग्य. मात्र या सर्व प्रसंगांवर भरपूर चित्रे उपलब्ध आहेत, तीही अवश्य टाकावीत, म्हणजे लेखमामेला च्यार चांद लागतील. पुभाप्र.

पैसा's picture

6 Jan 2014 - 9:58 am | पैसा

महाभारतासारखंच यातही कशाच्या तरी आडून बाण्/भाले मारणे, शिव्याशाप देणे, वल्गना सगळंच ठासून भरलंय. मात्र ऐन लढाई सुरू असताना ही मंडळी मेलेल्याचे चिलखत काढायचा उपद्व्याप का करत हे कळले नाही! ते चिलखत काढून घेण्याच्या प्रयत्नात अनेकजणांनी मार खाल्लेला दिसतोय!

राही's picture

6 Jan 2014 - 12:59 pm | राही

१)कदाचित त्या काळी मेटॅलर्जी तेव्हढीशी सोपी नसेल आणि आयर्न ओअर देखील सरसकट उपलब्ध नसेल. स्थानिकरीत्या तर नसेलच नसेल. युद्धभूमीवर चिलखते भरपूर प्रमाणात तातडीने उपलब्ध होण्याजोगी नसतील. २) आजही अपघातात मेलेल्या किंवा मरणासन्न असलेल्यांच्या मौल्यवान वस्तू लुटण्याची 'पद्धत' आहेच.

बॅटमॅन's picture

6 Jan 2014 - 1:09 pm | बॅटमॅन

अगदी असेच वाटते मलाही. ग्रीस देश आत्ता दिसतो तेवढा पाहिला तरी पश्चिम महाराष्ट्राएवढा आहे. तेव्हा तर ग्रीक वस्त्या अजूनच कमी प्रदेशात होत्या. सबब खनिजसाठे कमीच माहिती असणार, त्यात परत हे सततचे युध्यमान समाज पाहता त्यांना लोखंडादि धातूंची गरज कायम लागत असे.

याला पुष्टिकारक पुरावा इलियडच्या पुढच्या बुकांत मिळतो. पॅट्रोक्लस मेल्यावर अन हेक्टरला मारल्यावर पॅट्रोक्लसच्या स्मरणार्थ अकिलीस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो त्यात एके ठिकाणी बक्षीस म्हणून पाच वर्षे पुरेल इतका लोखंडाचा साठा ऑफर केला गेलेला आहे. इन फॅक्ट, लढाईशी संबंधित गोष्टींना इतके जास्त महत्त्व आहे की पहिला क्रमांक आल्यास शस्त्रे अन ढोग नंबरवाल्याला सोने असेही पहावयास मिळते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2014 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

+२

वरच्या सर्व तर्कांशी सहमत.

शिवाय लढाईतून परतताना शत्रूच्या मालकिची वस्तू, आणि त्यातही योद्ध्याच्या चिलखत अथवा शिरस्त्राणाइतकी विशेष वस्तू, हे जिवंत असेतो प्रौढी मिरवण्यासाठी आणि मेल्यावर दंतकथात जिवंत राहण्यासाठी उत्तम साधन असते ! त्यातही वस्तूचा मालक योद्धा जर नामांकित असला तर ती गोष्ट एक म्हणजे वर्ल्डकपची ट्रॉफीच झाली !

या कथानकाचा काळ इ.स. पूर्व १३०० च्या आसपास समजला तर तेव्हा शुद्ध लोखंड मिळवता येत असेल का ब्राँझ/तांबे वापरात असेल?

राही's picture

6 Jan 2014 - 1:52 pm | राही

समजा ब्रॉन्झयुग होते म्हटले तरी चिलखत हिसकावण्यामागचे लॉजिक तेच. धातूंची दुर्मीळता. बाकी ब्रॉन्झ्युगाचा अस्त आणि लोहयुगाचा उदय हे साधारणतः इलिअड्च्या घटनाकाळाला समांतरच असावेत. इलिअडचा लेखनकाल नंतरचा (म्हणजे लोहयुगातला) असावा. तपशिलाची चूक मान्य.

चूक दाखवण्यासाठी नाही. पण चर्चेच्या ओघात मी आपली एक शंका विचारली. बाकी तेव्हा चिलखते ही चांगलीच किंमती गोष्ट असणार त्यामुळे ती काढून घेत असतील आणि मोठ्या योद्ध्यांची चिलखते ट्रॉफीसारखी ठेवून घेत असतील हे मान्यच आहे.

चिलखताची "ट्रॉफी व्हॅल्यू" हे एक महत्त्वाचे कारण होते ते इस्पीकचा एक्का यांनी सांगितले आहेच.

बाकी प्रत्यक्ष ट्रोजन युद्धाचा घटनाकाळ हा इ.स.पू. १३०० ते इ.स.पू.१२०० पर्यंत समजला जातो. इ.स.१८६९ पासून आजतागायत इतकी उत्खनने झालेली आहेत तिथे आणि अन्यत्र की याबद्दल बर्‍याच मतमतांतरांनंतरही एक जनरल अग्रीमेंट आहेच.

त्या काळात ग्रीस आणि आसपासच्या भागात ब्राँझयुग होते. लोखंडही असणार कारण होमर लोखंडाचा उल्लेख करतो एकदोनदा, पण मुख्य धातू हा ब्राँझच.

शिवाय या ब्राँझयुग अन लोहयुगाची एक मजा अशी आहे की सुरुवातीला आपल्याला वाटते तसे सर्व जगभर विशिष्ट कालखंडासाठी ताम्रयुग, नंतर ब्राँझयुग अन नंतर लोहयुग अशी विभागणी कधीच नव्हती. काही ठिकाणी हे तीन टप्पे आले, तर भारतासारख्या ठिकाणी ताम्रयुगानंतर डैरेक्ट लोहयुगच आहे. याचा अर्थ ब्राँझयुगीन पुरावे सापडत नाहीत असा नव्हे, तर ती मधली स्टेजच आली नाही त्या ठिकाणी असा आहे. असे होण्यास बरीच लोकल कारणे असतात.

प्रचेतस's picture

6 Jan 2014 - 10:01 am | प्रचेतस

जबरी लेखनशैली रे.
पण बरेच दिवसांनी टाकल्यामुळे परत आधीचे भाग वाचावे लागले.

बॅटमॅन's picture

6 Jan 2014 - 11:44 am | बॅटमॅन

धन्यवाद चित्रगुप्त सर!! चित्रे इथून पुढे अवश्य टाकेन.

पैसा तै: धन्यवाद! चिलखत काढणे हा त्यांचा रिवाज होता. या चिलखत काढण्यातून आधीही आणि नंतरही लै लफडे झालेले आहेत. :)

वल्ली: आता अकिलीसची एंट्री होणार पुढच्या भागात. :)

मस्त!! एकदम रोचक वर्णन केलेय लढाईचे!

तसे पाहता आपले महाभारत आणि त्यांचे इलियड थोडे सारखे वाटतात.

महाभारतात मुळ कथेत अनेक प्रक्षिप्त कथा आहेत, तश्या कथा या ग्रीक महाकाव्यात देखील आहेत का?

आदूबाळ's picture

6 Jan 2014 - 12:15 pm | आदूबाळ

भारीच! वाचतो आहे!

पुढचा भाग लवकर टाकणे

@इस्पीकचा एक्का: धन्यवाद सरजी :)

@परिंदा: धन्यवाद. प्रक्षिप्त भाग काही आहेत असे म्हणतात. पण मुळात इलियड इतके छोटे आहे, की प्रक्षिप्त त्यात असून असून असणार तरी किती? १६ हजार ओळी फक्त. फार तर फार पाचेक हजार श्लोकांत आरामात मावेल सगळे. ओडिसी तर त्याहीपेक्षा लहान आहे, १२ हजार ओळी फक्त. तुलनेने रामायण-महाभारत फार मोठे हो. मुळामुठा अन गंगेची तुलना केल्यागत होईल ते :) त्यांच्या विस्तारामुळे अन कंटिन्युअस ट्रान्समिशनमुळे तिथे प्रक्षिप्त भाग जास्त घुसले. इलियडच्या ग्रीक भागाचे लॅटिनमध्ये जे भाषांतर झाले तेच युरोपभर अभ्यासले जात होते. वरिजिनल ग्रीक औट ऑफ फ्याशन गेले ते इ.स. १४८८ साली उजेडात आले. त्यामुळेही त्यात फेरफार असे झालेच नाहीत.

@आदूबाळः येस्सार, लौकरच टाकणारे. :)

मुळात इतिहासात फारसा रस नाही ( यु नो, हि नो, दे नो, ईट नो, ) ...पण हे बर आहे ..कोणीतरी साठवतय ते :)

इरसाल's picture

6 Jan 2014 - 2:23 pm | इरसाल

हा भाग पण लै भारी. मित्रांचे टोळके जमवुन कॉलेज कँटीन ला गप्पा मारतोय असा फील येतो, जाम मजा येतेय हे वाचताना.
बाकी हा त्याच्याशी तो ह्याच्याशी कोण कुठे कसा कधी लढला ह्यात माझा लै घोळ होतोय इतकी नावे अ‍ॅड होतायेत.
सगळं पुन्यांदा वाचाव लागनार.

धन्यवाद इरसाल साहेब. नावे जरा जास्तच आहेत, पण मुख्य कॅरॅक्टर्सची यादी दिलेली आहे भाग १ मध्ये तेवढीच वीसपंचवीस फारतर. तरी जरा नंतर ट्रिम करण्याचा प्रयत्न करेन.

इरसाल's picture

6 Jan 2014 - 2:46 pm | इरसाल

साहेब कोण आहेत?

मस्तच ! क्षणभर उगाच डोळ्या समोर ३०० चालु आहे आणि त्याचेच वर्णन वाचतोय असं वाटलं.

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Jan 2014 - 7:54 am | लॉरी टांगटूंगकर

खास लिखाण!!

"असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही." हे चुकून असल्या खरडींना आम्ही दाद देत नाही असं वाचलं. आणि मिपाच्या आयडींचं ट्रॉय झालं तर कसं होइल, विचार करून अजून जास्त हसायला आलं.