आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की,
राज्यातील बरीच मुले अन स्त्रिया कुपोषणाच्या जंजाळात अडकल्या असताना स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेण्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांचे कृत्य लज्जास्पद अन घृणास्पद असुन यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला एक प्रकारे ठेच पोहोचली आहे. अभिषेकासाठी वापरण्यात आलेल्या दुधाची रक्कम कुपोषण असलेल्या भागातील मुलांच्या शाळा अथवा एखाद्या बालसंगोपनगृहाला देउन मुश्रीफ़ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या दुध हे पुर्णान्न आहे. राज्याने अजुनही दुग्धोत्पादनात स्वयंपुर्णता मिळवली नाही. बरयाच स्त्रीयांना अन बालकांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी दुधाची गरज आहे परंतु गरीबीमुळे ते त्यांना मिळत नाही. असे असतांना दुधाची अशी नासाडी व्हावी ही वेदनादायक बाब आहे. त्या पुढे म्हणतात की मुश्रीफ़ पालकमंत्री असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, संग्रामपुर, जळगाव जामोद हे तालुके कुपोषणग्रस्त आहेत. मेहकर तालुकाही काही प्रमाणात या समस्येने ग्रासला आहे याचेही भान त्यांना (मुश्रीफ़ांना) कसे राहीले नाही ?. देवांच्या मुर्तीवर केले जाणारे असे अभिषेकही आपणास मान्य नसुन त्याकरीता वापरण्यात येणारे दुध एखाद्या बालकाश्रमाला दिल्यास ती भक्ती परमेश्वराला अधिक प्रिय होईल. इत्यादी. असे त्या म्हणाल्या.
वरील मागणी अत्यंत योग्य आहे. डॉ. राणी बंग जे काही बोलल्या त्यातला शब्द न शब्द अक्षरश: खराच आहे. याचे कारण त्यांची संस्था कुपोषणा वर अनेक वर्षे अत्यंत महत्वाचे असे काम गेली कित्येक वर्षे अत्यंत निष्ठेने करीत आहेत. हे सर्व तर आपल्याला माहीत आहेच. पण त्यांचा वरील शब्द कीती कळकळीतुन आलेला आहे कीती सच्चा आहे हे मला अतिशय तीव्रतेने जाणवले याचे कारण वरील बातमी वाचल्या बरोबर अतिशय तीव्रतेने आठवला तो राणी बंग यांच्या संस्थेसंदर्भात वाचनात आलेला एक सुंदर लेख जो मला खात्रीने आठवतो साप्ताहीक सकाळ च्या काही वर्षांपुर्वीच्या दिवाळी अंकात आलेला होता.( फ़क्त वर्ष नेमके आठवत नाही पण अगदीच जुना ही नाही प्लिज कुणाकडे असल्यास नेमका संदर्भ द्यावा ) तर त्या लेखात एक याच राणी बंगांविषयी एका घटनेचे वर्णन आलेले होते ती अशी की,
डॉ.राणी बंग या ज्या आदिवासी भागात काम करतात तेथे च एक गरीब आदिवासी स्त्री होती जीने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता आणि झाल अस होत की काही वैद्यकीय कारणास्तव या आदिवासी बाईला पान्हा फ़ुटला नव्हता त्यामुळे ती स्वत:च्या बाळाला स्वत:चे दुध पाजण्यास असमर्थ होती. बाळ अतिशय कुपोषीत व जगेल की वाचेल अशा अवस्थेतच होते. आईचे दुध बाळा साठी सुरुवातीच्या काही महीन्यात तरी कीती महत्वाचे असते ते आपल्याला माहीतच आहे. हे न होण्यामागे ही त्या आदिवासी दुर्देवी बाईची गरीबी/ कुपोषण हीच कारणे अर्थातच होतीच. आणि त्याच वेळेस डॉ. राणी बंग यांनी ही एका बाळाला जन्म दिला होता. तेव्हा ही आदिवासी बाई त्यांच्या कडे पेशंट म्हणुन आलेली होती व तिची ही अडचण डॉ.राणींना समजली. तेव्हा डॉ. राणी बंग यांनी स्वत: त्या आदिवासी बाईच्या बाळाला आपलं (आपल्या पोटच्या बाळांसाठीचं दुध ) शेअर करुन त्या आदिवासी बाईच्या बाळाला त्यांनी वाचवल होत. त्या स्वत:च्या बाळाबरोबरच अर्ध अर्ध शेअर करुन दोन्ही बाळांना स्वत:च दुध पाजतं असत. व असं करुन त्यांनी त्या गरीब आदिवासी बाईच्या बाळा ला कुपोषणापासुन वाचवुन एक प्रकारे संजीवनी च दिली. असा अनुभव त्या लेखात दिलेला होता.
यामुळे ही वरील मुश्रीफ़ यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली दुधाची नासाडी खरोखरच डॉ.राणी यांच्या संवेदनशील मनाला कीती वेदना पोहोचवत असेल याची जाणीव एका क्षणात कुठलेही स्पष्टीकरण न देताही होते. आणि त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यावरुन व या घटनेवरुन मनात त्यांच्या विषयीचा असलेला आदर अनेक पटींनी वाढतो.
बर यातही विशेष म्हणजे या घटनेचा उल्लेखही त्यांनी स्वतहुन कधी केलेला नाहीये त्यांच्याबद्दल कोणी तरी दुसरयाने च सांगितलेल आहे.आजच्या “करुन दाखविले” चे होर्डींग बनवुन रस्त्यावर लावण्याच्या जमान्यात इतकी संवेदनशीलता इतकी माणुसकी इतक प्रेम कोणा मध्ये इतरांविषयी असु शकत हेच फ़ार दुर्मिळ वाटत. ते दोन्ही ही ( डॉ.राणी व डॉ. अभय बंग ) स्वत:विषयी कीती कमी बोलतात या संदर्भातील अनिल अवचट यांच्या “कार्यरत” या पुस्तकातील हा खालील उतारा ही पुरेसा बोलका आहे.
अभय, राणीला स्वतःविषयी बोलायला नको असायचं. विशेषतः राणीला काही विचारलं तर ती म्हणायची, "ते तू अभयला विचार." हळूहळू त्यांचं मागचं समजायला लागलं तेंव्हा लक्षात आलं, की ही दोघं म्हणजे भलतेच स्कॉलर लोक आहेत. आपल्याकडे मेडीकलला अॅडमिशन मिळणं हेच मुळात केवढं अवघड असतं. अॅडमिशन मिळाल्यावर मुलं तर चार बोटं वर चालायला लागतातच; पण त्यांचे पालकही तरंगू लागतात. इथं अभय आणि राणी MBBS काय MD काय सगळ्या विद्यापीठात पहिले तर आलेच, पण ते ही सुवर्णपदक मिळवून. अभयला MBBS ला तीन विषयांत सुवर्णपदकं होती. राणीला MD ला मिळालेलं सुवर्णपदक विद्यापीठात त्या आधी कितीतरी वर्षं कुणालाच मिळालेलं नव्हतं. MBBS नंतर अभय चंदीगडच्या, संपूर्ण भारतात अग्रगण्य असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल रिसर्च (PGI) मध्ये गेला. तिथे काही काळ काम करून नंतर प्रवेशपरीक्षा असते. तिथं तो रेकॉर्ड मार्क मिळवून पहिला आला, नंतर दोघंही अमेरिकेतल्या बाल्टिमोर येथील जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात शिकायला गेले. 'पब्लीक हेल्थ' या क्षेत्रातला जगातला 'लास्ट वर्ड' समजली जाणारी ही संस्था. सर्व जगातून तिथं विद्यार्थी येतात. तिथल्या सगळ्या विद्यार्थांत तर अभय पहिला आलाच; पण त्याला ९९% मार्क पडले. त्या विद्यापीठाच्या इतिहासात कुणाला इतके मार्क पडले नव्हते आणि अजूनपर्यंत कुणाला पडले नाहीत. राणीची आई त्या काळात वारली. तिला थोडे दिवस इकडे यावं लागलं तरीही तिला ८०% मार्क पडले. हे सर्व मला तुकड्या तुकड्यानं दीड वर्षांच्या काळामध्ये समजलेले तपशील. याहून किती आहे, ते माहिती नाही.
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 4:45 pm | आतिवास
लेखाच्या 'अफलातून' शीर्षकातून तुम्ही डॉ राणी बंग यांच्या कार्यापेक्षा आणि त्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांच्या "आई" पणाला जास्त मोलाचं लेखलं आहे - हे तुमच्या लक्षात येतंय का?
जणू काही त्या "आई" नसत्या तर त्यांच्या या टीकेला काही फार अर्थ नसता!!
असो. :-(
30 Dec 2013 - 7:03 pm | कुमारकौस्तुभ
लेखाच्या 'अफलातून' शीर्षकातून तुम्ही डॉ राणी बंग यांच्या कार्यापेक्षा आणि त्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांच्या "आई" पणाला जास्त मोलाचं लेखलं आहे
30 Dec 2013 - 7:16 pm | बॅटमॅन
पूर्ण सहमत.
भारतीय समाजात जेरोंटोक्रसी आणि म्यारिडोक्रसी फार आहे. मुद्दा काय आहे हे न पाहता कोण मुद्दा मांडलाय हेच पाहणार्यांची कीव येते.
पण तेही बरोबरच म्हणा. आडात काही नसलं तरी या विशिष्ट टप्प्यांमुळे पोहर्यात काहीतरी येईल असे वाटणार्या गाढवांची संख्या कमी नाही. (गाढवांनो** माफ करा).
**(म्हणजे, चारपायवाली. दोनपायवाली नव्हे.)
31 Dec 2013 - 9:36 pm | प्यारे१
>>>> मुद्दा काय आहे हे न पाहता कोण मुद्दा मांडलाय हेच पाहणार्यांची कीव येते.
सरसकटीकरण करुन चालणार नाही.
काही कारणं असतात त्याला.
कुपोषणग्रस्त भागात, आदिवासी भागात सगळं सोडून काम करणार्या बंग दांपत्याच्या, आमटे कुटुंबियांच्या,
नानाजी देशमुखांच्या, समाज /ग्रामसभा/ सुधारणा ह्या विषयात आण्णा हजारेंच्या वर्षानुवर्षं कष्ट करण्याला, घेतलेल्या अनुभवाला, उपसलेल्या कष्टाला, चार ते चार हजार कुटुंबांच्या चांगल्या अर्थाने बदललेल्या जीवनाला तो सलाम असतो.
प्यारे काही म्हणतो किंवा बॅटमॅन काही म्हणतो म्हणून कुणी उभा नाही राहणार. किमान दोन चार पावलं तरी चाललेली असतील, काही काम केलेलं असेल तर त्यामागच्या शब्दांना वजन असतं.
अशामुळंच काय मुद्दा पेक्षा कोण मांडतंय ह्याला'देखील' महत्त्व येतं. २०किलो वजन कमी केलेल्या व्यक्तीला लोक विचारणार हो वजन कमी कसं करु म्हणून. आधीच्च काही नाही. उगा बोलबच्चन, १०० वेळा पुस्तक वाचलंय 'वजन कमी कसे करावे' नावाचं. उपयोग काय????
(सचिन मुंबई 'भारता'ची म्हटल्यावर वाईट वाटतं ना तेच्च खरं असलं तरी? जनरली विचारतोय)
आतिवास तैंनी मांडलेला मुद्दा काहीसा बरोबर आहे. खेचक शीर्षक आहे. मात्र लेखातला भाग तितकासा एकांगी विचार करणारा नाही वाटत. इथं मुद्दा काय आहे त्याकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मत आहे.
1 Jan 2014 - 1:09 pm | बॅटमॅन
होय की, सरसकट म्हणता येणार नाही तसं. पण असं नेहमीच होताना दिसतं तेव्हा बोलावं वाटतंच! मुद्दा काय आहे हे लक्षात न घेता बोलणार्याची अमुक एक प्रीरेक्विसिट्स असतील तरच आम्ही सीरिअसलि घेऊ हा अहंकार दरवेळेस जस्टिफायेबल नसतो. लिहिणारे काय अन वाचणारे काय, प्रत्यक्ष अनुभवी कमीच असतात. मुद्दा मांडणार्याची हेटाळणी करणं सोपं असतं पण हेटाळणी करणारे तरी कोण मोठे लागून गेले?
ओके, हो अंमळ वाईट वाटतं. पण या मुद्याचा इथे संदर्भ लक्षात आला नाही.
बाकी सहमत आहेच. मी टीका केली ती या प्रतिसादाच्या निमित्ताने जण्रल प्रवृत्तीवर. तो अहंकार बिनबुडाचा असतो बर्याचदा. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" हे लोक स्वीकारू शकायला अडचण नसावी. असो. अर्थात दॅट डजंट गिव्ह द लायसन्स टु स्पीक नॉन्सेन्स हे ओघाने आलेच.
2 Jan 2014 - 12:50 pm | प्यारे१
बरोबर.
मात्र कधीकधी एका क्षेत्रात तज्ज्ञ आहे, मान्यता आहे म्हणून सगळीकडे सरसकट बोलायचा अधिकार मिळाला आहे असं वाटायला लागणारांची त्याहून वाईट कीव वाटते. उदा. जावेद अख्तर. त्यांना मत विचारणारांना तर फोडून काढावंसं वाटतं.
(राहुल गांधी ह्या पार्सल बद्दल काय म्हणावं खरं? ना अभ्यास ना तज्ज्ञ तरी मतं मांडतो)
सचिन बद्दल माझ्याकडून थोडी सरमिसळ झालीये. एका खेळातली एक उत्तुंग कामगिरी असणारी व्यक्ती. त्याच्यावर प्रेम करणारांची संख्या अफाट. त्याचं मत खेळात भारी मानायला हरकत नाही. किंबहुना अधिकारच आहे. त्यामुळंच त्याचं इतर क्षेत्रातलं मत वाचताना वाईट वाटतं असं म्हणायचं होतं.
2 Jan 2014 - 1:06 pm | बॅटमॅन
जावेद अख्तर अन राहुल गांधीबद्दल सहमत आहे.
पण प्रो-सचिन बायस म्हणून नाही, त्याने त्याचं एक वैयक्तिक मत मांडलं इतकंच. त्याबद्दल मला त्याला तादृश धारेवर धरावंसं वाटत नाही. आता भारताने काश्मीरमधून इंचाइंचाने माधार घ्यावी की फुटाफुटाने चढाई करावी याबद्दल तो काही बोलला असता तर मग त्याची तासलीच असती.
2 Jan 2014 - 2:30 pm | मारकुटे
मात्र दत्तोबांचं म्हणणं सगळ्यांनाच मानावं लागतं बरं का !
30 Dec 2013 - 7:38 pm | कुमारकौस्तुभ
अतिवास जी
माझ्या लेखावरुन असा अर्थ तुम्हाला जाणवला याचे अतिशय खेदजनक आश्चर्य वाटले. मी कुठेही राणी यांच्या कर्तुत्वाला कमी लेखले नाही. उलट ज्या दोन अत्यंत महत्वाच्या व्हॅल्युज इंटेग्रीटी ( मला योग्य मराठी प्रतिशब्द आठवत नाही ) आणि संवेदनशीलता ज्या मला महत्वाच्या वाटतात. त्या मला पुर्णपणे राणी यांच्यात आढळतात. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाविषयी जो मला नितांत आदर आहे तोच व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आज अनेक लोक नुसते तोंडाने काय वाट्टेल ते बरळुन प्रत्यक्ष कृतीत दुसरेच काहीतरी करीत असतात त्यात मला राणी यांची त्यांच्या विचार-आचारातील एकरुपता फ़ारच महत्वाची वाटते. प्रसंग पडल्यावर प्रत्यक्ष वैयक्तीक कृतीतुन त्या त्यांची जी इंटेग्रीटी ज्या सहजतेने दाखवुन देतात ती, आणि त्यातुन दिसणारी त्यांची इतरांवीषयीची संवेदनशीलता या दोन्ही च्या दिसण्याने मी तरी हरखुन जातो. निदान माझ्यापुरत तरी ते मला फ़ारच विशेष अस वाटलं. संपुर्ण लेखाचा हेतु हे व्यक्त करण इतकाच साधा होता.
त्या आई नसत्या तरी त्यांच्या एकंदरीत निव्वळ कामावरुन ही त्यांच मत मला तितकच महत्वाच वाटल असत. तुम्ही खालील ओळी एकदा बघाव्या
तुम्ही म्हणता तस काहीही मला अभिप्रेत नाही.
वरील मागणी अत्यंत योग्य आहे. डॉ. राणी बंग जे काही बोलल्या त्यातला शब्द न शब्द अक्षरश: खराच आहे. याचे कारण त्यांची संस्था कुपोषणा वर अनेक वर्षे अत्यंत महत्वाचे असे काम गेली कित्येक वर्षे अत्यंत निष्ठेने करीत आहेत.
आणि त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यावरुन व या घटनेवरुन मनात त्यांच्या विषयीचा असलेला आदर अनेक पटींनी वाढतो.
आणि एकच साध विचारतो तुम्ही असा संवाद कधी ऐकलेला आहे का की “ माझी आई जगातली सर्वात बेस्ट मिसळ बनविते फ़ाइव्ह स्टार चा शेफ़ काय बनवेल अशी बनविते.”
यावर तुमची प्रतिक्रीया कशी असते ? या वरील विधानामागच्या भावनेला तुम्ही कस बघतात ? याचे विश्लेषण तुम्ही करता का ?
माझ शिर्षक तसच आहे.
30 Dec 2013 - 4:58 pm | परिंदा
लोक हे दुध, पंचामृताचे अभिषेक का करतात हे तो देवच जाणे. एकतर यातले पळीभर तिर्थ सोडता उरलेले सगळे पंचामृत गटारात जाते, शिवाय त्या मुर्तीची झीज होते ते वेगळेच. गाभार्यात कुजका वास भरुन राहतो तो वेगळाच.
महाशिवरात्र, श्रावण सोमवारी तर शेकडो लिटर दूध शिवपिंडीवरुन थेट गटारात जाते. हे बघताना खुप वाईट वाटते.
30 Dec 2013 - 4:59 pm | जेपी
राणि बंग यांच्यावर लेख सकाळच्या 2006 च्या दिवाळी अंकात आलता . त्यांचे अनुभव वाचण्यासारखे आहेत .त्यांना अदिवासी लोक 'पिशी ' मावशी असे बोलतात . आज हि तो अंक संग्रही ठेवला आहे .
30 Dec 2013 - 5:02 pm | प्रभाकर पेठकर
ह्यालाच 'दूधाआई' असे नामाभिमान आहे.
इतिहासात शिवा़जीमहाराजांचे पुत्र संभाजी महाराज ह्यांच्या जन्मानंतर त्यांची आई सईबाई आजारी होत्या. आणि बाळाला दूध पाजण्याच्या अवस्थेत नव्हत्या. तेंव्हा त्यांना दूसर्या एका बाईचे दूध पाजण्यात आले. तिला 'धाराऊ' म्हणत.
मुसलमानांमध्ये अशी दूसरी स्त्री (मूळ आई व्यतिरीक्त दूध पाजणारी दूसरी स्त्री) ही त्या मुलाची (नात्याने) आई मानली जाते. पुढे मोठेपणी त्यांच्या आपापसातील लग्नास धर्माने प्रतिबंध आहे.
30 Dec 2013 - 5:05 pm | प्रभाकर पेठकर
>>>>पुढे मोठेपणी त्यांच्या मुलांच्या आपापसातील लग्नास धर्माने प्रतिबंध आहे.
असे वाचावे.
30 Dec 2013 - 6:17 pm | आनंदराव
म्हणुनच हे लोक मोठे आहेत.
आज समाजात पाया पडावे असे पाय अशा लोकांचे आहेत.
आमटे कुटुंबिय त्यातलेच एक.
31 Dec 2013 - 3:08 am | अर्धवटराव
डॉ. राणी बंग समाजसेवीका झाली तिच मुळी या "आई" फॅक्टर मुळे. अन्यथा हे बंग दांपत्य खोर्याने पैसा ओढुन चैनीत जगले असते.
बाकी मुश्रीफ साहेबांकडुन काहि वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा नाहि. हे लोक दोन्हि कान उघडुन ऐकतात... एका कानाने ऐकायचं दुसर्याने सोडुन द्यायचं.
31 Dec 2013 - 4:43 pm | नाखु
(मि.पा.)प्रवक्ते "सपाटून मुक्ताफळे वेचीन कसे फिरकले नाहीत या धाग्यावर?
1 Jan 2014 - 3:30 pm | इरसाल
प्रवेश प्रतिबंधित असे दिसतेय त्यांना.
31 Dec 2013 - 8:56 pm | कुमारकौस्तुभ
कृपया वरील लेखाचे शीर्षक बदलुन "दुध" असे इतकेच ठेवावे.
सध्याच्या भडक/ अफलातुन शीर्षकासाठी मी सर्वांची जाहीर माफी मागतो.
धागा संपादनाची सुविधा नसल्याने नाइलाजाने हा त्रास आपणास देत आहे याबद्दल क्षमस्व.!