दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे. मुळात बहुतेक लोकांना माहित असलेली घटना म्हणजे भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारणे आणि त्यानंतर युधिष्ठीराचे ते सुप्रसिद्ध “नरो वा कुंजरो वा ” असे उत्तर देणे. त्यानंतर दु:खाने दोणाचार्यांचे शस्त्र खाली ठेऊन बसणे. आणि धृष्ट्द्युम्नाने त्याचे शीर तलवारीने उडवणे. सर्वजण परंपरेने सांगितलेल्या या कथेशी परिचित आहेत.
जेव्हा अश्वत्थामा मेल्याची आवई उठुनसुद्धा द्रोण शस्त्र खाली ठेवित नाही तेव्हाच या हा प्रसंग वाटतो तेवढा साधा नाही याची जाणीव होते. आपला मुलगा मृत्युंजय आहे हे द्रोणाला ठावुक होते. त्यामुळे पुन्हा त्याने लढायला सुरवात केली. तेव्हा मात्र भीमाने न राहवुन त्वेषाने आपल्या गुरुला स्वधर्माची जाणीव करुन देण्यास प्रारंभ केला आणि हा वार द्रोणाच्या वर्मी बसला. खिन्न होऊन त्याने शस्त्र खाली ठेवले. आणि पुढे धृष्ट्द्युम्नाच्या हातुन तो ठार मारले गेला. या घटनेचा बारकाईने विचार केला तर अनेक बाबी लक्षात येतात.
द्रोणाचा भीमावर मुळीच विश्वास बसला नव्हता. त्याने युधिष्ठीराला विचारुन खात्री करुन घेण्याचे ठरवले. या सार्या लांड्यालबाड्या पांडवांना कराव्या लागल्या याचं महत्वाचं कारण हे की द्रोणाच्या अफाट आणि अचाट पराक्रमामुळे पांडवांना विजयाचा भरवसा उरला नाही. भीष्माप्रमाणे “पांडवांना मारणार नाही” वगैरे बोलुन द्रोणाने दुर्योधनाची पंचाईत केली नव्हती. खाल्ल्या मीठाला जागुन त्याने पांडव सैन्याचा भयंकर संहार केला. अभिमन्युला एकटं गाठुन ठार मारायलाही द्रोणाला गैर वाटले नाही. द्रोणाचा हा झंझावात थांबविण्यासाठी ऋषीसुद्धा युद्धभुमीवर उपस्थित झाले होते. या ऋषींमध्ये महत्त्वाची नावे आहेत. विश्वामित्र, जमदाग्नी, भरद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप, अत्री यासारख्या ऋषींनी तेथे येऊन द्रोणाला शस्त्रत्याग करण्याची सुचना केली. यासर्व गोष्टींचा परिणाम इतकाच झाला की द्रोणाला ज्याच्या सत्यवचनाबद्दल खात्री होती त्या धर्मराजाला त्याने अश्वत्थाम्याच्या मृत्युच्या खरेपणाविषयी विचारले. द्रोणाच्या पराक्रमाने पांडवांचा नाश खात्रीने होणार हा धोका श्रीकृष्णाने सर्वप्रथम ओळखला आणि धर्मराजाला असत्य बोलुन पांडवांना वाचविण्याची विनंती केली.
अर्जुनाच्या पराक्रमाबाबत कुणी कितीही म्हणोत पण द्रोणाला मारण्याची ताकद अर्जुनात नव्हती हे मान्य करणं भाग आहे अन्यथा श्रीकृष्णाने ही गळ युधिष्ठीराला घातलीच नसती. युधिष्ठीराने नाईलाजाने हे मान्य केल्यावर चाचपडत “नरो वा कुंजरो वा” म्हटले. अगोदर तेथे उपस्थित झालेल्या ऋषींनी “हे युद्द तु अधर्माने केले आहेस” असा ठपका द्रोणावर ठेवला होताच. त्यातुन युधिष्ठीराने अश्वत्थाम्याच्या मृत्युला दुजोरा दिला. त्यानंतर आपल्या मृत्युसाठीच ज्याचा जन्म झालेला आहे अशा धृष्टद्युम्नाला चालुन येताना पाहुन द्रोण उदास झाला आणि त्याला पुर्वीसारखे त्वेषाने, कौशल्याने युद्ध करता येईना. मात्र कौशल्य कमी झाले तरी द्रोणाचा पराभव पांडवांना करता येईना. इथे भीमाने द्रोणाच्या मर्मस्थानी लागेल असे संभाषण केले. त्यातले प्रत्येक वाक्य महत्त्वाचे आहे.
भीम म्हणतो” आपल्या स्वतःच्या कर्माविषयी समाधानी नसलेल्या ज्ञानी ब्राह्मणांनी युद्धाचा (अव्यापारेषु) व्यापार सुरु केला नाही तर क्षत्रियांचा जगातुन नाशही होणार नाही. सर्व प्राण्याविषयी अहिंसा पाळणे हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असे ज्ञानी लोक म्हणतात. ब्राह्मण हा त्या धर्माचे मूळ आहे. आणि तु तर ब्रह्मवेत्त्यात सर्वश्रेष्ठ आहेस. एका पुत्रासाठी अधर्माचे आचरण करुन आणि स्वतःच्या नैसर्गिक कर्माचा त्याग करुन, आपापल्या कर्मात मग्न असलेल्या अनेक क्षत्रियांचा वध करताना तुला शरम कशी वाटत नाही? ज्याच्यासाठी तु शस्त्र धारण केलेस आणि ज्या पुत्राच्या विचाराने तु जगत आहेस तो हा तुझा पुत्र पाठीमागे मरुन पडला आहे. आणि त्याच्याविषयी धर्मराजाने स्वतः तुला माहिती दिली आहे. धर्मराजाच्या त्यावचनाविषयी तु शंका घेणे उचित नाही.”
मुळात ही सर्व योजना कृष्णाची. द्रोणाला रोखलं नाही तर पांडवांचा सर्वनाश अटळ आहे हे त्याला दिसु लागले होते. त्याने अश्वत्थामा मेल्याची आवई उठवुन द्रोणाला शत्रत्याग करण्यास भाग पाडावे ही मसलत युधिष्ठीराच्या गळी मोठ्या कष्टाने उतरवली. ज्याला “सीदन्ती मम गात्राणि” च्या अवस्थेतुन अठरा अध्यायी गीता सांगुन युद्धासाठी उभा केला त्या कृष्णसखा अर्जुनाला तर ही योजना आवडलीच नाही. भगवंताची योजना ताबडतोब कुणी उचलुन धरली असेल तर ज्याला गीता सांगण्याची कधी गरजच भासली नाही त्या भीमाने. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारुन द्रोणपुत्र अश्वत्थामा मेल्याची आवई भीमाने तात्काळ उठवली. त्यादरम्यानच ऋषींनी उपस्थित होऊन द्रोणाला युद्धापासुन परावृत्त होण्याची सुचना केली. तो अधर्माने लढत असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवला. पण द्रोण बधला नाही. त्याने पुत्राच्या मृत्युबद्दल सत्यवचनी युधिष्ठीराकडुन खात्री करुन घेतली. त्याच्या उत्तराने द्रोण विचलित जरी झाला तरी तो शस्त्रत्याग करेना आणि त्याचे बळ जरी कमी झाले तरी त्याचा पराभव होईना. तेव्हा ही सारी मसलतच फसण्याची वेळ आली. महाभारतात जरी उल्लेख नसला तरी माझ्या मनात एक कल्पना येते कि जर अशावेळी जिवंत असलेला अश्वत्थामा आपल्या पित्यासमोर आला असता तर पांडवांची अवस्था काय झाली असती? एका क्षणात पाण्डवांचा बनाव द्रोणाला कळुन चुकला असता आणि कदाचित त्याने भूतो न भविष्यती असे घनघोर युद्ध अतिशय त्वेषाने केले असते.
भीमाने मात्र प्रसंगावधान राखुन अत्यंत चलाखपणे, ज्यामुळे द्रोण खरोखरच अस्वस्थ होईल असा स्वधर्माचा अमोघ बाण काढला. महाभयंकर अस्त्र शस्त्रांना सहजतेने तोंड देणार्या महापराक्रमी द्रोणाला या बाणाचे मात्र निवारण करता आले नाही. भीमाचे वाग्बाण द्रोणाच्या मनात आरपार रुतले आणि त्याने शस्त्रत्याग केला.
स्वधर्माचे महत्त्व अपरंपार असलेल्या त्याकाळात वर्णानुसार कर्म करणे हा नियम असणार आणि तो नियम मोडणारे द्रोणासारखे महापराक्रमी पण लौकिकार्थाने भ्रष्ट समजले जाणारे असे ब्राह्मणसुद्धा असणारच. त्यातुन ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वर्ण. समाजासाठी गुरुपदी असणारा. त्याच्याकडे समाज नेहेमी मार्गदर्शनासाठी पाहाणार असा. अशा ब्राह्मणांच्या मनात आपण स्वधर्मापासुन ढळलो ही सतत कुडतरणारी, अपराधी भावना असण्याची दाट शक्यता आहे. नेमक्या या कमकुवत जागेचा फायदा भीमाने अत्यंत हुशारीने उचलला आणि द्रोणाच्या मर्मस्थानी बोट ठेऊन आपला कार्यभाग साधला.
द्रोणवधाचा खरेतर सुत्रधार कृष्ण. त्याची योजना पार पाडली भीमाने. शेवटी या योजनेला सुरुंग लागण्याची वेळ आली असताना आपली स्वतंत्र बुद्धी वापरली तीही भीमानेच. आणि द्रोणवधाचे सारे श्रेय दिले जाते ते शत्रत्याग करुन बसलेल्या माणसाचे डोके तलवारीने उडवणार्या धृष्टद्युम्नाला. (क्रमशः)
प्रतिक्रिया
1 Jan 2014 - 10:31 am | मृत्युन्जय
हा भाग विशेष आवडला.
2 Jan 2014 - 9:48 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
2 Jan 2014 - 12:56 pm | प्यारे१
हेच म्हणतो.
1 Jan 2014 - 10:36 am | मनराव
वाचतो आहे....
1 Jan 2014 - 10:40 am | अद्द्या
वाह . येउद्यात पुढचे भाग लवकर
1 Jan 2014 - 11:03 am | जेपी
वाचतोय
1 Jan 2014 - 11:12 am | सौंदाळा
मस्त लिहिताय.
त्या मोनालिसाचे चित्र कसे लोक अनेकदा बघतात आणि प्रत्येक वेळी त्यांना तिच्या स्मितहास्याची वेगवेगळी कारणे वाटतात तसेच महाभारताचे पण आहे जितक्या द्रुष्टीकोनातुन बघावे ते वेगळेच वाटते आणि प्रत्येक द्रुष्टीकोन आप-आपल्या जागी बरोबर.
1 Jan 2014 - 11:17 am | आनन्दा
द्रोणवधाचे श्रेय द्रुष्टद्युम्नाला कधीच दिले जात नाही. ते दिले जाते "नरो वा कुंजरो वा" ला.
2 Jan 2014 - 1:08 pm | आदूबाळ
मला नीटसं नाही पटलं.
हे द्रोणाला आधीपासूनच माहीत होतं. युद्धभूमीवर त्याला ते ऐकवल्यावर तो क्षणभर विचलित होईलही कदाचित, पण एकदम स्मशानवैराग्य येऊन शस्त्रं कशी काय खाली ठेवेल?
2 Jan 2014 - 2:32 pm | अनिरुद्ध प
+१
2 Jan 2014 - 1:20 pm | वडापाव
कृष्णाची योजना भीमाने जराही न संकोचता उचलून धरली याचं कारण म्हणजे अर्जुनाला जशी द्रोणांविषयी ते गुरू असल्याने आदर आणि प्रेम शेवटपर्यंत वाटत होतं ते भीमाला वाटेनासं झालं होतं. भर दरबारात द्रौपदीची विटंबना होत असताना द्रोण काहीही बोलले नाहीत. युद्धात ते कौरवांच्या बाजुने उतरले. दुर्योधनाला युद्धकाळात 'युधिष्ठिराला मी ठार मारणार नाही, पण जिवंत पकडून देतो. मग तू त्याच्याशी पुन्हा द्यूत खेळायला आणि पुन्हा वनवासात पाठवायला मोकळा' असं त्यांनी वचन दिलं. त्यात अभिमन्यूला एकटा गाठून मारण्यातही त्यांचा सहभाग होता. त्यात दृष्टद्युम्न हा भीमाचा जीवलग मित्र होता. या सर्व कारणांमुळे इतर पांडवांच्या मानाने भीमाला द्रोणांचा प्रचंड राग आला होता.
2 Jan 2014 - 6:13 pm | Atul Thakur
1."आपण ब्राम्हण आहोत" + "आपण युद्ध करत आहोत" = "ब्राह्मण्याचा धर्म सोडून आपण युद्ध करत आहोत"
हे द्रोणाला आधीपासूनच माहीत होतं. युद्धभूमीवर त्याला ते ऐकवल्यावर तो क्षणभर विचलित होईलही कदाचित, पण एकदम स्मशानवैराग्य येऊन शस्त्रं कशी काय खाली ठेवेल?
माहित असणं वेगळं आणि चारचौघांसमोर कुणीतरी सुनावणं वेगळं. त्याचा मानसिकदृष्ट्या वेगळा आणि जास्त घातक परिणाम होऊ शकतो असे मला वाटते. त्या आधी ऋषींनी येऊन हेच सांगीतले होते. मनात कुरतडत असलेली गोष्ट स्पष्टपणे तोंडावर बोलली गेली त्याचा तो परिणाम असावा.
2.हे इमोशनल ब्लॅकमेलिंग द्रोणाचंच का केलं गेलं? कृपाचार्य सुद्धा युद्धात होतेच की.
कृपाचार्यांनी लोकोत्तर पराक्रम केल्याचं ऐकीवात नाही. त्याचा धाक पांडवांना वाटला नसावा, शिवाय ते चिरंजीवही होते असे वाचल्याचे आठवते. माझ्या वाचनात एक लख्ख उल्लेख त्यांच्या नावावर इतकाच आहे की अश्वत्थामा आत पांडवांच्या शिबीरात रात्री धुडगुस घालत असताना बाहेर घाबरुन पळत असलेल्यांना कृपाचार्यांनी कापुन काढले. अशा माणसाला पांडवांनी फारसं महत्व दिलं नसावं.
3.बहुदा द्रोणाने आधी विराट राजाबरोबरच्या युद्धात भाग घेतलाच होता ना?
हा मुद्दा मला कळला नाही कृपया स्पष्ट करुन सांगावा.
3 Jan 2014 - 12:06 pm | परिंदा
कृपाचार्यांनी लोकोत्तर पराक्रम केल्याचं ऐकीवात नाही. त्याचा धाक पांडवांना वाटला नसावा
>>
कृपाचार्य हे युद्धर्विद्येत तेवढे प्रवीण नसावेत, म्हणून सगळे कुरु राजकुमार द्रोणांकडे शिकायला गेले असावेत. किंबहुना मला तर असे वाटतेय की द्रोण कृपाचार्यांच्या वशिल्यानेच कुरु कुमारांना शिक्षक म्हणून नेमले गेले असावेत. ती विहीरीतून अंगठी काढण्याची गोष्ट प्रक्षिप्त असावी.
3 Jan 2014 - 7:15 pm | विकास
कृपाचार्य चिरंजीव होते आणि ते मला वाटते कौरवांचे कधी सेनापती देखील झाले नव्हते. (त्याचे कारण तुम्ही म्हणालात ते असेल कदाचीत). त्या व्यतिरीक्त नंतर पांडवांच्या राज्यात कृपाचार्यांना परीक्षिताचे गुरू केले गेले होते..
2 Jan 2014 - 6:25 pm | वडापाव
+११११ सहमत!!
ते अर्जुन जेव्हा बृहन्नडेच्या वेषात लढला होता त्या युद्धाबद्दल बोलतायत!!!
2 Jan 2014 - 6:29 pm | Atul Thakur
ते अर्जुन जेव्हा बृहन्नडेच्या वेषात लढला होता त्या युद्धाबद्दल बोलतायत!!!
हो, पण त्यांचा नक्की आक्षेप कशाला आहे ते लक्षात आलं नाही. या मुद्द्यातुन ते काय सुचवु इच्छीत आहेत?
2 Jan 2014 - 6:35 pm | प्रचेतस
"अर्थस्य पुरुषो दासः !" हे भीष्मांचे सुप्रसिद्ध वचन या बाबतीत पुरेसे बोलके आहे.
2 Jan 2014 - 6:36 pm | Atul Thakur
झक्कास :) अगदी सहमत :)
2 Jan 2014 - 6:42 pm | आदूबाळ
मला असं सुचवायचं होतं, की द्रोणाचार्यांनी युद्धात सहभागी होणं यात नवीन काहीच नव्हतं*. ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नसला तरी "वहिवाट" (practice) होती. (विराटाबरोबरचं) छोटं युद्ध काय, किंवा मोठं (भारतीय) युद्ध काय - तत्त्वाशी प्रतारणा झालीच.
एखादी वहिवाट स्वपक्षीय / विपक्षीय दोहो बाजूंना मान्य असताना "मन खात राहिलं" हे पटत नाही.
(असो. मुद्दा तुम्ही मान्य करावाच असा अट्टहास नाही, वाटलं ते लिहिलं.)
*प्रोवायडेड विराट-युद्धात द्रोणाने भाग घेतला असेल तर. मला नक्की आठवत नाहीये.
2 Jan 2014 - 8:09 pm | Atul Thakur
एखादी वहिवाट स्वपक्षीय / विपक्षीय दोहो बाजूंना मान्य असताना "मन खात राहिलं" हे पटत नाही.
बाह्मणांनी युद्ध कला शिकवावी पण स्वतः युद्ध करु नये असा नियम असावा. त्यानुसार द्रोणाने कौरव पांडवांना ज्ञान दिले. सर्वप्रथम युद्धाचा उल्लेख द्रोणाच्या बाबतीत येतो तो द्रुपदाबरोबर. पण तेथे त्यांचा पट्टशिष्य द्रुपदाचा पराभव करुन त्याला गुरुदक्षिणा देतो. या युद्धात द्रोणाने स्वतः भाग घेतला नसावा. पुढे विराटाच्या गायी पळवळ्यानंतर कौरवांबरोबर झालेल्या युद्धात अर्जुनाने भीष्मासकट सर्वांचा पराभव केला. त्यात द्रोण होता असे मला वाटते.
मात्र हे युद्ध अखेरीचे किंवा निकराचे नव्हते. पळवलेल्या गायी सोडुन आणाव्यात, प्रतिपक्षाला पराभुत करावे इतपतच या युद्धाची व्याप्ती दिसते. अंतिम महाभारत युद्धात मात्र पराभव म्हणजे मृत्यु हेच समिकरण होते. ती निकराची शेवटची लढाइ होती. येथे शक्य ते सर्व डावपेच लढले गेले. मला हा सर्व प्रकार संधीसाधुपणाचा वाटतो. जर ब्राह्मणांनी युद्ध खेळणे हा अधर्म होता तर विराटाच्या प्रसंगी कौरवांकडुन याला कुणीही हरकत घेतेलेली दिसत नाही. याचा अर्थ ब्राहमण जर पराक्रमी आणि जय मिळवुन देणारा असेल आणि आपल्या पक्षातुन युद्ध करणारा असेल तर हरकत नाही. मात्र तो आपल्याविरुद्ध युद्धात उतरला असेल आणि आपल्या पक्षाची भयंकर कापाकापी करु लागला असेल तर मात्र अधर्म असाच हा खाक्या दिसतो.
त्यामुळे हे उभयपक्षी माहित असुन देखिल प्रसंगवशात चालवले गेले. याचा अर्थ ते समाजाला मान्य होते असा होत नाही. निव्वळ संधीसाधुपणा आणि सोय, स्वार्थ म्हणुनच हे चालवले गेले असावे असे माझे मत आहे. त्यामुळे हे चालवले गेले असुनही द्रोणाच्या मनात त्याबद्दल अपराधीपणाची भावना असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मला वाटते.
2 Jan 2014 - 9:16 pm | प्रचेतस
ब्राह्मणांनी युद्धे केलीत याची महाभारतात तशी काही अपवादात्मक उदाहरणे आहेत.
पहिला येतो तो अगत्स्य. पण याने युद्ध न करता वातापीला खाऊन पचविले. मग येतो भार्गव राम. ह्याने तर हैहय कुळाचा वंशविच्छेद करून २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली.
2 Jan 2014 - 10:52 pm | मारकुटे
नि:क्षत्रिय एकदा केली असतांना दुसर्यांदा करावी लागत नाही. मग २१ वेळा कशी आणी का करावी लागली?
2 Jan 2014 - 11:02 pm | प्रचेतस
क्षत्रियहीन पृथ्वी झाली असता क्षत्रिय स्त्रियांनी (बहुधा) कश्यपाच्या आज्ञेनुसार ब्राह्मणांपासून नियोगाद्वारे पुत्रोत्पती केली व परशुराम (चिरंजीवी असल्याने) पुनः पुनः पृथ्वी नि:क्षत्रिय करू लागला अशी आख्यायिका आहे.
3 Jan 2014 - 5:46 am | खटपट्या
मग नियोगाद्वारे झालेले सर्व ब्राह्मण नव्हेत काय ?
3 Jan 2014 - 7:07 am | प्रचेतस
नाही.
नियोगाच्या नियमांप्रमाणे नियोग ज्याच्यासाठी केला गेलाय त्याच्या कुळाचेच नाव लावता येते. ज्याच्याकरवी केला जातो त्याचे नव्हे.
3 Jan 2014 - 7:49 am | विकास
म्हणून तर सगळे पांडव होते आणि धृतराष्ट्र - पंडू देखील व्यासपुत्र असून कुरूवंशीय ठरले.
2 Jan 2014 - 8:55 pm | कानडाऊ योगेशु
इथे
ह्यानंतर जर पुढे द्रोणाला असे ओरडुन सांगितले कि " केवळ आणि केवळ ह्यामुळेच तुझा मुलगा अश्र्वत्थामा मारला गेला" तर त्यामुळे द्रोणावर होणारा परिणाम डेडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे द्रोणाने प्रथमपासुनच जो स्टँड,जी भूमिका घेतली होती तिचा पायाच कच्चा ठरतो.आणि भीमाने नेमके हेच केले असावे.द्रोणाला "अश्र्वत्थामा केवळ मेलाच आहे आणि तो ही तुझ्या ह्या आततायी भूमिकेमुळे " हे ठसविण्यात भीम यशस्वी झाला.
असा अनुभव आपल्यालाही बर्याच वेळेला येतो. एखाद्या परिक्षेत एखादे गणित आपण सोडवत आहोत. वेळ कमी उरला आहे अगदी शेवटची पायरी लिहायची बाकी आहे आणि उत्तर चुकते आणि कळते कि आपण हे गणित सोडवण्यासाठी घेतलेले सगळ्यात पहिले गृहितकच चुकीचे आहे.आता ते गणित पुन्हा सोडवण्यासाठी वेळही नाही.तेव्हा दरदरून घाम फुटतो.आता फक्त विचार करा ही बारावीची महत्वाची परिक्षा आहे आणि ह्या पेपरवर सगळ्या आयुष्याची भिस्त आहे.
द्रोणाची अवस्थाही इथे ह्याहून वेगळी झाली नसावी.
तसाही भीम तेजोभंग करण्यात पटाईत असावा कारण युध्दझाल्यानंतरही इतर पांडवांच्या मनात धृतराष्ट्राविषयी काही वैरभावना राहीली नसावी पण भीम मात्र धृतराष्ट्रासमोरून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपल्या दोन्ही मांड्यावर हाताने शड्डू ठोकूनच पुढे जायचा.दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या मीच मोडल्या ह्याची आठवण धृतराष्ट्राला राहावी म्हणुन. आणि ह्या गोष्टीनेच धृतराष्ट्राने थोड्याच काळात वानप्रस्थ स्वीकारला.
2 Jan 2014 - 6:32 pm | रमेश भिडे
महाभारताचा अर्थ प्रत्येक वाचकागणिक अन प्रत्येक वाचनागणिक निराळा लागु शकतो !
2 Jan 2014 - 7:04 pm | अत्रुप्त आत्मा
हा भाग जब्बरदस्त!
2 Jan 2014 - 9:30 pm | विकास
भीम हा जसा बलवान होता तसाच पांडवांच्या बाजूने राजकारणपटू देखील होता. द्रओपदी वस्त्रहरणानंतर त्याच्या दृष्टीने कौरव आणि त्यांना पाठबळ देणारे कोणीही, यांचे शंभर अपराध भरले होते. प्रश्न फक्त वेळेचा होता... १०० कौरवांना एकट्या भिमाने मारलेले आहे. हाच भीम शांतीपर्वात जेंव्हा युधिष्ठीरास युद्धानंतरची अवस्था पाहून उद्विग्नता येते तेंव्हा प्रोत्साहन देण्यासाठी गीतेप्रमाणेच तत्वज्ञान सांगून राज्य करायची विनंती करतो...
आपण अर्जूनाचे नाव कायम घेतो खरे, पण कर्ण आणि जयद्रथ या दोन्ही महारथ्यांना आणि अर्थातच भिष्माचार्यांना फसवून मारल्याचे सोडल्यास मोठ्या योध्यास अर्जूनाने मारलेले नाही.
2 Jan 2014 - 9:47 pm | प्रचेतस
हाच भीम कृष्णाला हस्तिनापुरात शिष्टाईसाठी जआण्यासाठी कुलक्षयाचा दोष लागू नये म्हणून होता होईतो दुर्योधनाशी शम करण्यासाठी विनवतो.
बाकी अर्जुनाने मारलेले काही महत्वाचे राजे.
प्रागज्ञोतिषपुराचा अधिपती भगदत्त,
वरूणाचा पुत्र शृतायुध
कांबोजराज सुदक्षिण
शृतायु अच्युतायु
अवंती नगरीचे अधिपती विंद-अनुविंद
त्रिगर्तराज सुशर्मा
कर्णपुत्र वृषसेन
3 Jan 2014 - 11:55 am | मृत्युन्जय
दुर्योधनाच्या बाजुला मोठे यौद्धे असे होतेच कितीक. नावे घेतो:
१. भीष्म - अर्जुन
२. द्रोण - दृष्ट्यद्युम्न
३. कर्ण - अर्जुन
४. शल्य - युधिष्ठिर
५. दुर्योधन - भीम
६. दु:शासन - भीम
७. अश्वत्थामा - चिरंजीव. त्यामुळे कोणीही मारु शकले नाही.
८. कृपाचार्य - चिरंजीव. त्यामुळे कोणीही मारु शकले नाही.
९. भगदत्त - अर्जुन
१०. भूरिश्रवा - सात्यकी
११. वृषसेन = अर्जुन
१२. सुदक्षिण - अर्जुन
१३. सुशर्मा - अर्जुन
१४. श्रतायुध - अर्जुन
१२. दुर्योधन, दु:शासन वगळता इतर ९ कौरव - भीम
१३. कृतवर्मा - शेवटपर्यंत जिवंत राहिला
यात शकुनी, लक्ष्मण, दौशासनी, कर्णाची इतर मुले, इतर ८९ कौरव मोजले नाहित कारण कितीही म्हटले तरीही ते महापराक्रमी म्हणुन ओळखले जायचे नाही.
हे बघता नाही म्हटले तरी अर्जुनाने ७ मोठे यौद्धे मारले. भीमाने त्याहुन जास्त मारले. तरीही भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादींचे कौशल्य लक्षात घेता इथे फक्त आकड्यांची तुलना करणे योग्य होणार नाही. अर्जुन हा नि:संशय सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि एक अतिश्रेष्ठ यौद्धा होता.
3 Jan 2014 - 7:54 pm | अशोक पतिल
अर्जुन हा नि:संशय सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि एक अतिश्रेष्ठ यौद्धा होता
.अगदी सहमत ! या सद्रंभात मी बाळ शास्त्री जाभेंकर ( बहुतेक),,यांचे महाभारतातील व्यक्तिरेखा हे पुस्तक वाचले आहे. त्यात अर्जुन हाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर असल्याचे वाचले आहे. बाकि कर्ण वगेरे यांच्या विषयी असलेल्या सागोंपागीं गोष्टींना हरदासी कथा म्हटलेले आहे.
4 Jan 2014 - 12:12 am | मृत्युन्जय
कर्णाचा पराक्रम म्हणजे सांगोपांग होता असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. कर्ण अर्जुनाला तुल्यबळ होता असे ह्मटल्यास वावगे नाही. मी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ म्हटले तेव्हा त्याची तुलना भीष्म द्रोणांशी करणे टाळले. ते नि:संशय त्याच्याहुन थोर धनुर्धर होते. भीष्मांनी तर साक्षात रामांना हरवले. केवळ हरवले नाही तर भीष्माच्या हातुन त्यांचा वधच व्हायचा पण अनेक ऋषींमुनींच्या विनंतीवर तसे केले नाही. द्रोणाचा पराक्रम बघता ते अवध्य होते असेच म्हणायला लागेल.
कर्णाच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. त्याच्या कवच कुंडलांमुळे मुळात ततो अवध्य होता. राजकुमारांच्या शस्त्रप्राविण्यपरिक्षेच्या वेळेस तो अर्जुनाला तुल्यबळ होता हे त्याने दाखवुन दिले. अर्जुनाने राज्सूयाच्या वेळस गाजवलेला पराक्रम त्याने दिग्विकयाच्या वेळेस गाजवला. अर्जुनाने देवांकडुन अस्त्रे मिळवली तशीच त्यानेही मिळवली. साक्षात परशुरामांकडुनही मिळवली आणि त्यांच्याकडुन सर्वष्रेष्ठ धनुर्धर असल्याची पावतीही मिळवली. भार्गवास्त्र रामांव्यतिरिक्त केवळ कर्णाकडे होते. घटोत्कचाला मारताना त्याने जे युद्ध केले त्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्धच होते. १६ व्या आणि १७ व्या दिवशी तो अजेय होता. १४ / १५ व्या दिवशी त्याच्या अस्त्राच्या प्रभावासमोर साक्षात अर्जुन युद्धभूमीवरुन पळुन गेला. रथचक्र जमिनीत अडकल्यावर त्याने पदाती होउन अर्जुनाला बेशुद्ध केले पण त्याला मारणे टाळले आणि अर्जुनाने शुद्धीत येताच तो नि:शस्त्र आणि पदाती असता त्याची हत्या केली. कर्णाचे शौर्य आणि कौशल्य कुठेही कमी पडलेले नाही. विराटात तो हरला, द्रौपदी स्वयंवरातही तो जिंकला नाही पण त्यामुळे त्याच्या शौर्याला आणि कौशल्याला उणेपण येत नाही. युद्धभूमीवरुन प्रसंगी माघार न घेतलेला किंवा कधीच न हारलेला यौद्धाच महाभारतात नाही (अर्जुन आणि कृष्ण धरुन). साक्षात कृष्णाला जिथे रणाछोडदास पदवी बहाला झाली तिथे कधीतरी हार पत्करल्याबद्दल कर्ण अर्जुनाला कसले आले आहे उणेपण.
सगळी गोळाबेरीज करता असे म्हणता येइल की अर्जुन कांकणभर सरस असु शकेल कदाचित (मी वर तुल्यबळ म्हटले आहे) पण त्यामुळे कर्ण उणा पडत नाही. जसे कार्ल्सन विरुद्ध हारला म्हणुन आनंदच्या महानतेत न्युनत्व येत नाही.
4 Jan 2014 - 1:06 am | अर्धवटराव
अर्जुनाचं प्राविण्य प्रामुख्याने धनुर्विद्येत होतं, पण कर्ण इतर शस्त्रांत देखील परंगत होता. तो मल्लयुद्धात देखील निष्णात होता व त्याचं बाहुबल अर्जुनापेक्षा उजवं असावं.
4 Jan 2014 - 6:40 am | राघव
भार्गवराम, भीष्म, द्रोण, अर्जुन, कर्ण.. सगळे नि:संशय श्रेष्ठ धनुर्धर होतेत.
पण मी मुळात अर्जुन आणि कर्ण यांच्या गाजलेल्या पराक्रमांची तुलना करायचा प्रयत्न केला तेव्हा कर्णासाठी विशेष संदर्भ सापडत नाहीत. कर्णाच्या दिग्विजयाचा उल्लेख हा मृत्यंजय कादंबरीव्यतिरिक्त कुठे असल्याचे वाचनात आले नाही.
अर्जुनाबद्दलही काही संदर्भ मुळात महाभारतात आहेत की केवळ कादंबर्यांमधेच ते माहीत नाही. जसे त्याचा निवातकवच राक्षससमूहावरील हल्ला व त्यांचा नि:पात.
कर्ण-अर्जुन यांची समोरासमोरची लढाई मला माहित असल्याप्रमाणे -
१. द्रौपदी स्वयंवरात
२. विराट युद्धात
३. महायुद्धात २ दा.
याव्यतिरिक्त आणिक आहेत काय?
त्याहून महत्त्वाचे म्हणजे मूळ महाभारत, वैशंपायनांनी भर घातलेले महाभारत आणि सूतांनी भर घातलेले महाभारत यांचे मूळ संदर्भ कुठे उपलब्ध आहेत काय? एकदा नीट वाचावे म्हणतो.
राघव
4 Jan 2014 - 11:23 am | मृत्युन्जय
कर्णाच्या दिग्विजयाचा उल्लेख महाभारतातदेखील आहे. त्यात त्याने यादव सोडुन सगळी राज्ये जिंकल्याचे संदर्भ आहेत. पण तो परिचय फारच त्रोटक आहे. बर्याच अभ्यासकांच्या मते तो प्रक्षिप्त भाग आहे.
अर्जुनाने निवातकवचांचा केलेला पराभव देखील महाभारतात आहे. कुठल्याही तर्काचा आधार घेउन विचार केल्यास ती प्रचंड अतिशयोक्ती आहे. त्यानुसार अर्जुनाने ३ कोटी निवातकवचांना मारले. एवढ्या मोठ्या संख्येने एखादा माणूस किड्या मुंग्यांना तरी मारु शकेल की नाही ही शंक आहे. पण तो भागही आहे. अभ्यासकांचे त्याबद्दल काय मत आहे याची कल्पना नाही.
कर्ण - अर्जुनाची अजुन कुठली लढाई मलादेखील आठवत नाही. पण अखेरच्या युद्धात बहुधा ते किमान ३ दा एकमेकांसमोर आले.
मूळ महाभारत हा खूप मजेशीर मुद्दा आहे. माझ्या माहितीनुसार मूळ महाभारत असा काही प्रकार आता अस्तित्वात नाही. महाभारत प्रथम व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहिले. त्यानंतर व्यासांनी ती कथा त्यांच्या शुक नावाच्या मुलासकट ४ इतर शिष्यांना सांगितली. त्यापैकी शुक आणि जैमिनि यांनी ते लिहुन काढले. शुक भारत पुर्ण नष्ट झाले तर कालौघात जैमिनी भारताचे केवळ अश्वमेध पर्व उरले आहे. त्यातील विवेचन सध्या प्रचलित असलेल्या सर्वमान्य वैशंपायन कथित महाभारत प्रतीपेक्षा खुप वेगळे आहे.
वैशंपायनांनी स्वतः महाभारत लिहिले नाही. पण त्यांनी सर्पसत्रा दरम्यान ते अर्जुनाचा पणतु आणि परिक्षिताचा मुलगा जन्मेन्जय याला सांगितले. त्याचे स्वरुप जन्मेन्जयाला त्याच्या पुर्वजांची नीट ओळख करुन देणे असे होते. त्या दरम्यान वेद व्यास देखील तिथे उपस्थित होते. पण कथा सांगितली वैशंपायन ऋषींनी. त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या सौती ऋषींनी ती ऐकली. नंतर त्यांनी अरण्यात फिरताना ऋषींच्या एका समूहाला ती सांगितली. त्यापैकी कोणीतरी किंवा त्यानंतर ज्यांनी ऐकली अश्यांपैकी कोणीतरी हे महाभारत लिहिले आहे. ज्याला आज मूळप्रत मानले जाते. सध्या हीच सर्वमान्य प्रत आहे. मात्र अभ्यासकांच्या मते त्यात प्रक्षिप्त भाग प्रचंड आहे.
3 Jan 2014 - 7:42 am | कैलासवासी सोन्याबापु
अतुल भौ , भारद्वाज हे फक्त एक ऋषी नसुन ते व्यासां प्रमाणे एक पद आहे असे वाटते (माझे स्वतःचे गोत्र ते असल्याने मी कुतुहलाने थोडा गुळ काढला ह्या विषयात), मुळ भारद्वाज हे धनुर्वेदाचे रचईते अन द्रोणाचे आजोबा असल्याचे वाचल्याचे स्मरते कुठेतरी, धनुर्वेद हे स्वसंरक्षणार्थ काढलेले शास्त्र वापरुन मनुष्य लोक एकमेकांची हत्या करु लागल्याने आहत होऊन ह्याच भारद्वाज मुनींनी आयुर्वेद हे शास्त्र सुरु केले (म्हणुनच कदाचित प्रथम धन्वंतरी म्हणल्याजाते त्यांना) ज्या प्रमाणे "धन्वंतरी" हे औषधी शास्त्र विचारातले एक आसन एक पदवी आहे तसेच "भारद्वाज" ही "भारद्वाज ज्ञानमार्ग उपासकांची" परमोच्च डीग्री ( पोस्ट डॉक्टोरल टाईप) असावी असं माझं मत पडतंय , द्रोण हा सुद्धा भारद्वाज गोत्रिय होता फक्त त्याने शस्त्रवेदाचाच विचार केला बाकी ज्ञानशाखांचा नाही म्हणुन त्याला "भारद्वाज पद" नव्हते, इतके सगळे पुराण सांगायचा अर्थ हा की आपण जो द्रोणाचार्यां ना रोखण्यासाठी युद्ध भुमीत आलेल्या ऋषीत भारद्वाज आल्याचा उल्लेख केलाय ते ओरिजिनल भारद्वाज होते का ? (शक्य आहे कारण ते द्रोनाचे आजोबाच होते ते जिवंत असणे ही शक्य आहे) की ती भारद्वाज पदवी धारण करणारी कोणी दुसरी यतीमुर्ती होती ह्यावर थोडा प्रकाश टाकाल का प्लिज ??
(आय नो प्रतिसाद अन प्रश्न मुळ विषयाला थोडा टँजेंट जातोय पण काय करा क्युरियॉसिटी वॉज किलिंग धिस बोक्या )
5 Jan 2014 - 7:15 pm | Atul Thakur
सोन्याबापु, उत्तराला विलंब झाल्याबद्दल आधी क्षमस्व.
माझ्या कल्पनेप्रमाणे ते सप्तर्षीतले भारद्वाज असावेत.
5 Jan 2014 - 7:23 pm | प्रचेतस
द्रोण हा भ्ररद्वाज ऋषीचा पुत्र. भरद्वाजाचा पुत्र म्हणूनच भारद्वाज.
महाभारतात आदीपर्वात द्रोणोत्पतिबद्द्ल पुढील माहिती आली आहे.
घृताची नावाच्या नुकत्याच गंगास्नान करून आलेल्या ओलेत्या अप्सरेला पाहून भरद्वाजाच्या मनात कामविकार उत्पन्न होऊन त्याचे वीर्यस्खलन झाले. ते वीर्य वाया जाऊ न देता त्याने एका द्रोणात ठेवले. त्यापासून जो पुत्र उत्पन्न झाला तो द्रोण.
4 Jan 2014 - 12:26 am | पैसा
हा भाग आवडला. भीमाचा एककलमी कार्यक्रम होता, आणि तो यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सगळं करायची त्याची तयारी होती!
4 Jan 2014 - 11:37 am | अर्धवटराव
आपल्या प्राणप्रिय मुलाचा वध करणार्याने "या वधाला तुच कारणीभूत आहेस" असं सांगीतल्यावर द्रोणाचा तेजोभंग झाला व या काहिशा हतबल अवस्थेत त्याला दृष्ट्द्युम्नाने संपवले... मुद्दा लॉजीकल वाटतो.
पण हि भीमाची मुत्सद्देगिरी होती कि चिडचिड? द्रोणांबद्दल मनात साचलेली खळखळ भीमाने फायनली ओकली व भीमासारख्या आडदांड निरागस पेहेलवानाच्या तोंडुन उमटलेली निर्भत्सना द्रोणाला फारच बोचली. द्रोण कुठेतरी आत्मपरिक्षण करायला लागला व त्याला आपला गुन्हा मान्य झाला. हे स्थळ-काळाचं भान काहि वेळपुरतं विसरणं द्रोणाला महागात पडलं.
4 Jan 2014 - 5:03 pm | स्वाती दिनेश
दोन्ही भाग आणि प्रतिसादांमधील चर्चा वाचते आहे, आवडत आहे.
स्वाती
4 Jan 2014 - 5:42 pm | बर्फाळलांडगा
आपले करावे तेव्हेड कवतुक कमीच आहे. धन्य जाहलो.