जेव्हा ग़ालिब दिल्लीत आला तेव्हा तो तसा तरुणच होता. म्हणजे त्याचे वय त्यावेळेस १९ असले तरीही कवी म्हणून त्याला थोडी फार प्रसिद्धी मिळाली होती. ती प्रसिद्धी पुढे वाढतच जाणार होती. पण त्याच्या लोकप्रियतेचे एकमेव कारण त्याचे काव्य नसून त्याचा स्वभाव हेही एक प्रमुख कारण होते. त्याचा मोकळेपणा, प्रामाणिकपणा हे गुण लोकांना त्याच्याकडे आकर्षून घेत. या सर्वांवर कडी करणारा त्याचा हजरजबाबीपणा त्याच्या आसपासच्या लोकांना फारच आवडे. (त्याची एक हकिकत सांगायचा मोह मला आवरत नाही. ग़ालिबला आंबे फार आवडत. मित्रांना गोळा करुन चारपाया टाकून आंबे व गप्पा हाणायच्या हा त्याचा आवडता कार्यक्रम. एकदा ते असेच आंबे खात असताना त्यांनी कोपऱ्यात टाकलेल्या सालींपाशी काही गाढवेही जमली पण त्यातील एकानेही त्याला तोंड लावले नाही. ते बघून त्याच्या एका मित्राने ग़ालिबला टोमणा मारला, ‘ देखो ग़ालिब गधेभी आम नही खाते’ ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दुसऱ्याच क्षणी ग़ालिबने प्रत्युत्तर दिले, ‘ जनाब गधेही आम नही खाते ’. ) त्याच्या या स्वभावाची खात्री देण्यासाठी अनेक कागद उपलब्ध आहेत पण त्यानेच लिहिलेल्या एका पत्रात आपल्याला हे दिसून येते. १८६१ साली त्याच्या एका मित्राने स्वत:चे एक चित्र करुन ग़ालिबला बघण्यासाठी पाठविले. त्याला उत्तर देताना ग़ालिब लिहितो,
‘तुझे चित्र बघून माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. गप्पा मारताना ‘मिर्झा हतीम अलीला एकदा पहायला हवे’ असे मी नेहमी म्हणतो ते उगाच नाही. मी नेहमीच तुझ्या मर्दानी सौंदर्याची तारीफ करतो. हेच मी मुगलजानकडूनही अनेकदा ऐकले आहे. ती तेव्हा नवाब हमीद अली खानकडे नोकरी करायची. आमची चांगलीच ओळख होती व आम्ही खूप गप्पाही मारायचो. तिनेच तू तिच्या सौंदर्यावर केलेल्या कविताही मला दाखविल्या.
मी जेव्हा तुझे चित्र बघितले तेव्हा तुझी उंची एकदम डोळ्यात भरली. पण मला तुझा बिलकूल हेवा वाटला नाही कारण मीही तेवढचा उंच आहे. तुझ्या गव्हाळ वर्णाचाही मला अजिबात हेवा वाटला नाही कारण मी बऱ्यापैकी गोराच म्हणायला हवा. व माझ्या रापलेल्या गौरवर्णाचे कौतुक मी खूप वेळ ऐकले आहे.’
त्याच पत्रात त्याने त्याला फॅशन्सबद्दल वाटणाऱ्या तिटकाऱ्याबद्दल लिहून, दाढी वाढवायचा निर्णय का घेतला हेही लिहिले आहे. तो लिहितो,
.....पण लक्षात घे या अडाण्यांच्या शहरात प्रत्येक जण एखादा गणवेष धारण करतो. मुल्ला, भंगाराचे व्यापारी, हुक्का भरणारे, धोबी, पाणके, खानावळींचे व्यवस्थापक, विणकर हे सगळे त्यांचे केस वाढवितात व लांब दाढी ठेवतात. ज्या दिवशी मी दाढी वाढविली त्याच दिवशी डोक्याचा गोटा केला.....शी देवा रे काय बडबडतोय मी हे !’
ज्या मुगलजानबद्दल त्याने लिहिले आहे ती एक नाचणारीण होती हे त्याने लपवून ठेवले नाही. तिच्याशी त्याची मैत्री होती हे ही त्याने प्रामाणिकपणे लिहिले. याच काळात त्याने त्याच्या इतर पत्रात तो एका नाचगाणे कारणाऱ्या दोम्नीच्या प्रेमात पडला होता हेही लिहिले आहे. (दोम्नी जमातीच्या या मुली नाचगाण्यात तरबेज असत) ही बाई मेल्यानंतर चाळीस एक वर्षांनंतर झालेल्या दु:खाबद्दल ग़ालिब ग़ालिब लिहितो,
‘.... आज त्या घटनेला चाळीस वर्षे झाली. मी जरी फार पूर्वीच हे सगळे शौक सोडले असले तरी तिच्या नजाकतीची मला अजुनही आठवण येते. मी तिला विसरुच शकत नाही.’
या पत्राआधी काही वर्ष त्याने एका फार्सी पत्रात याच बाईबद्दल लिहिले आहे. त्यात तो त्याला झालेल्या दु:खाबद्दल तर लिहितोच पण प्रेम आणि जीवन याच्या संबंधातील त्याचे स्वत:चे तत्वज्ञान त्याने जन्माला घातले जे त्याने आयुष्यभर उराशी बाळगले. त्याने हे पत्र त्याच्या एका मित्राला लिहिले आहे. बहुदा त्या मित्रावरही असाच प्रसंग ओढवलेला होता. ग़ालिब लिहितो,
‘माझ्याही तरुणपणी माझ्या काळ्या कृत्यांचा रंग माझ्या केसांपेक्षाही जास्त काळा होता व माझ्या डोक्यात त्या सुंदर स्त्रीच्या प्रेमाची हवा होती. पण दुर्दैवाने माझ्या पेल्यात हे वेदनेचे विष कालवले व मला माझ्या प्रियेची प्रेतयात्रा माझ्याच रस्त्यावरुन गेलेली बघावी लागली. त्या रस्त्यावरुन उठणाऱ्या धुळीशेजारी मी धीर धरुन उभा होतो. त्या दिवशी मी दिवसाढवळ्या काळे कपडे परिधान करुन एका जाजमावर माझ्या लाडकेच्या मृत्युचा शोक करीत बसलो होतो. मला क्षणभर असे वाटले की मी तिच्या विझलेल्या प्राणज्योतीवर झेप घेणारा एक पतंग आहे. वियोगाच्या दु:खाने ह्रदय विदिर्ण होते हे खरे आहे पण सत्य विरक्त माणसाला दु:खी करु शकत नाही हेही सत्य आहे. वेदनेने ह्र्दय फाटत असताना विचारही केलाच पाहिजे. पण या वेदना शमविण्यास कुठले मलम उपलब्ध आहे हे मला उमजत नाही. असे म्हणतात नाइटिंगेल पक्षी उमलणाऱ्या प्रत्येक गुलाबासाठी गाणे म्हणतो, आणि ज्या पंतगाबद्दल अनेक शायर बोलतात तो तर तिचे मुखकमल उजळून टाकणाऱ्या प्रत्येक ज्योतीवर आपले पंख जाळून घेतो. खरे तर अशा अनेक ज्योती असतात व असे अनेक गुलाब फुलतच असतात मग ती एक ज्योत विझली तर पतंगाला एवढे दु:ख करायची काय गरज आहे ? किंवा एखादे फुल कोमजले तर नाईटिंगेलने का आर्त सूर आळवावेत ? त्या ऐवजी माणसाने या जगातील रंग व सुगंध आपल्या ह्रद्यात भरुन घ्यावा व अशाच एका सौंदर्याला आपल्या मिठीत लपेटून आपले मन ताळ्यावर आणावे व चोरणारीला ते चोरु द्यावे.’
त्या काळातील कर्मठ वातावरणात जर ग़ालीब अशा भानगडींबद्दल उघडपणे लिहू शकत होता, बोलू शकत होता तर कर्मठ धर्माबद्दल त्याची जी मते होती त्याबद्दल आपल्याला आश्र्चर्य वाटू नये. त्याने दररोज नमाज़ पढला नाही ना रमज़ानचे रोजे पाळले. मक्केची यात्रा करावी असे त्याला कधी वाटले नाही. एवढेच नाही तर त्याने इस्लामची दारुबंदी कधीच अमलात आणली नाही. त्याबद्दल हालि लिहितो,
‘इस्लामच्या शिकवणीतून त्याने फक्त दोन गोष्टी उचलल्या. एक म्हणजे एकेश्र्वरवाद-परमेश्र्वर एकच आहे आणि पैगंबराबद्दलचा आदर. त्याच्या मते या दोनच गोष्टी मुक्तीसाठी पुरेश्या आहेत.’
ग़ालीब त्याच्या तिसाव्या वर्षापर्यंत दिल्लीतच मुक्काम ठोकून होता. त्यानंतर तो कलकत्याला गेला. तेथे तो तीन वर्षे राहिला. (ती एक वेगळी हकिकत आहे. त्याच्या पेन्शनच्या कामासाठी गेला होता एवढेच येथे सांगतो). त्याचे काम झाले नाही परंतू त्या निमित्ताने त्याला भरपूर हिंडण्यास मिळाले. त्याला कलकत्ता खूपच आवडले. आश्चर्य म्हणजे कलकत्याची दमट घाणेरडी हवाही त्याला आवडली. परत आल्यावर त्याने एका छोट्या कवितेतेत हिरव्यागार कलकत्त्याबद्दल, तेथील सुंदर स्त्रियांबद्दल, फळांबद्दल व मद्याबद्दल लिहिले आहे. तो लिहितो,
‘कलकत्त्याच्या नुसत्या नावाने
माझ्या ह्रदयात आठवांची उठते
एक जिवघेणी कळ.
वनराई व हिरवळ श्र्वास तुमचे,
मोहक स्त्रियांचे कटाक्ष
करीती तुम्हाला घायाळ.
स्त्रियांप्रमाणेच रसरशीत फळं,
तजेलदार आणि मधूर
मधूर मद्याची तुलना नसे.....
जेव्हा तो फळांची आठवण करतो तेव्हा ते रसरशीत गोड आंबे असणार याची शंकाच नको. त्याच्या
आंबाप्रेमाबद्दल आपण वरती वाचलेच आहे. त्याला आंबे आवडत व ते किती खायचे याचेही त्याचे एक गणित होते. एका पत्रात खंताऊन तो लिहितो,
‘.......मी एकदा म्हटले होते की कधी एकदा मऱ्हाराला जाऊन पोटभर आंबे खातोय असे मला झाले आहे पण आता ती ताकद कुठून आणू ? माझी आंब्याची भूकही आता कमी झाली आहे. मी सकाळी उठल्याउठल्या कधीच आंबे खाल्ले नाहीत किंवा दुपारच्या जेवणानंतरही लगेच कधी खाल्ली नाहीत. मी ते दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणांच्या मधल्या काळात खात असे असेही म्हणता येणार नाही, कारण आंब्याच्या मोसमात मी रात्री जेवतच नसे. संध्याकाळ पडू लागली की मी आंबे खाण्यास बसत असे व मी प्रामाणिकपणे सांगतो, मी ते ढेकर ये़ईपर्यंत खात असे. शेवटी मला श्वास घेणे जड जाई. आजही मी ते आवडीने खातो पण दहा बारा आंब्यांपेक्षा आता मला जास्त जात नाहीत. मोठे असतील तर सात आठच !’
कलकत्त्याहून ग़ालिब परत आला आणि त्याचे आयुष्य नेहमीप्रमाणे चालू झाले. त्याच्या कलकत्त्यातील कामाचा विचका उडाला असला तरीही त्याच्या दिनक्रमात काही विशेष फरक पडला नव्हता. तो सदा कर्जबाजारी असे कारण त्याची रहाणी त्याच्या उत्पन्नावर आधारित नव्हती उत्पन्न कमी व खर्च जास्त असे प्रकरण असल्यामुळे कर्ज काढणे आलेच. खर्च भागविण्यासाठी उत्पन्न वाढविण्याचा त्याने आयुष्यभर प्रयत्न केला पण त्यात त्याला कधीच यश आले नाही. या कर्जाने त्याने त्याच्यावर फार परिणाम झाला नाही हेच त्याचे मोठे यश म्हणावे लागेल. पण १८४७ साली त्याच्यावर एक भयंकर प्रसंग ओढवला. त्यावेळी त्याचे वय होते ५०. त्याच्यावर घरात जुगाराचा अड्डा चालविण्याचा आरोप ठेवण्यात आला. हा आरोप सिद्ध हो़ऊन त्याला तीन महिने तुरुंगवासही घडला. (ही अर्थात मोठी चूक होती). तुरुंगवासाचे त्याला जास्त दु:ख झाले नाही. पण त्या अडचणीच्या काळात त्याच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी त्याला सोडले हे त्याच्या सहनशक्तीच्या पलिकडे होते. फक्त त्याचा एकच मित्र मुस्तफा खान शफ्ता हा त्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या पत्नीचे नातेवाईक जे त्याचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करीत असत त्यांनीही त्याचे नाव टाकले. त्याने तुरुंगातच एक कविता लिहिली त्यात त्याच्या त्या वेळच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. तो लिहितो,
‘या तुरुंगाच्या भिंतींआड
मी माझ्या कवितेच्या तारा जुळवतोय,
पण ह्रदयातील वेदनेने
उमटत आहेत शोकगीते.
या तुरुंगातून मी जगात
मुक्त लोकांसाठी आश्रयस्थाने बांधेन.
ही बंधने माझा गळा घोटू शकत नाही
मी मुक्तकंठाने रडेन......’
याच कवितेत पुढे तो त्याच्या तथाकथित मित्रांबद्दल मोठ्या कडवटपणे लिहितो,
‘माझ्या मित्रांनो मला भेटण्याचा विचारही मनात आणू नका,
येथे येऊन माझा दरवाजा खटखटावू नका,
मी तो पूर्वी सारखा उघडणार नाही.
चोर, दरोडेखोर आता माझे मित्र आहेत
मी त्यांच्या आदरास पात्र आहे.
बाहेर किती बेइमानी आहे हे मी सांगतो जेव्हा
गडबड बंद होते त्यांची तेव्हा.
माझी शिक्षा काही आमरण नाही,
पण या जगातून आनंद मिळविण्याची आशा
मी केव्हाच सोडली आहे,
त्या विचारानेच मला मोकळे वाटत आहे.......
बंधमुक्त वाटत आहे.’
त्याच्या तथाकथित मित्रांबाबत भ्रमनिरास झाल्यावर तो त्याच्या कैदीमित्रांना अभिवादन करत त्याच्या बाजूने उभे ठाकणाऱ्या एकमेव मित्राचे, मुस्तफा खान शफ्ताचे आभार खालील शब्दात मानतो.
‘एकच गर्दी उडाली आहे कारण मी आलोय !
पहारेकऱ्यांनो दार उघडा मी आलोय !
कैद्यांनो, माझ्या मित्रांनो जल्लोष करा
कारण मी आलोय !
आता तुम्ही कविता ऐकणार आहात
कारण मी आलोय !
माझ्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी
पाठ फिरवली आहे,
आता या गुन्हेगारांचाच मला आसरा !
किठल्याही न्याधिशाने, पोलिसाने मला
येथे नाही पाठविले, ते तर माझ्या भाळीच लिहिले.
उघडा ती द्वारे कारण मी आलोय !
मुस्तफा सारखे मित्र असताना,
या नशिबाची कोण पर्वा करतोय ?
देवाने पाठविलेला देवदूतच आहे मुस्तफा....
मी मेल्यावर मुळीच रडणार नाही,
कारण मला माहिती आहे माझ्यासाठी
रडणारा मुस्तफा आहे......’
या कटू अनुभवातून ग़ालिबला न विसरता येण्यासारखे बरेच शिकण्यास मिळाले. मुख्य म्हणजे त्याला हे कळाले की समाजातील प्रतिष्ठित, वजनदार माणसे, वेळ आल्यावर पहिल्यांदा त्यांच्या तत्वाचा बळी सहजपणे देतात. जन्मभर जी तत्वे ते दुसऱ्याला शिकवितात बरोबर त्याच्या विरुद्ध वागण्यास त्यांना कसलिही शरम वाटत नाही. आणि समाजाने ठरविलेले कायदे कानून जे पाळतात (त्याच्यासारखे) त्यांना मात्र तुरुंगात खितपत पडावे लागते. या १८४७ साली झालेल्या छळानंतर चौदा वर्षांनंतर तो त्याच्या मित्राला लिहितो,
‘......धन्य त्या परमेश्र्वराची ! दुर्दैवाने आपल्या दोघांचीही पाठ सोडली नाही. आपल्या मित्रांकडून्, नातेवाईकांकडून आपला जो विश्र्वासघात झाला त्या बद्दल बोलतोय मी.
............या जगाच्या अन्यायास बळी पडून तुम्हाला यातना झाल्या हेच सत्य आहे कारण तुम्ही प्रामाणिकपणे त्याला सामोरे गेला आहात. यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे आहे ?....’
तुरुंगातून सुटल्यावर त्याच्या त्याच काळ्याकुट्ट नशिबाने त्याला हात दिला. त्याच्या काही नवीन मित्रांचे बहादूरशहा जफ़रच्या दरबारात चांगले वजन होते. जे ग़ालिबला आयुष्यभर जमले नाही ते या नवीन मित्रांनी करुन दाखविले. त्यांनी त्याला मोगल दरबाराचा आसरा मिळवून दिला. तीन वर्षांनंतर लगेचच त्याला मुगलांचा इतिहास लिहिण्याचे काम मिळाले. या पेक्षाही महत्वाचे म्हणजे तो बादशहाचा काव्याचा उस्ताद झाला आणि त्याला अवधच्या राजाकडून तनखाही चालू झाला. त्याच्या आयुष्यात त्याला एवढे आर्थिक स्थैर्य कधिच लाभले नाही. त्यालाहे त्याच्या कवितांसाठी व लिखाणासाठी असे पोषक वातावरण पाहिजेच होते. तो स्वत:ला एक पर्शियन कवि म्हणून आपली ओळख जनमानसात बिंबवायची होती पण राजांची त्याच्याकडून वेगळीच अपेक्षा होती. त्यांना त्याच्या कडून फार्सी गद्य, उर्दू काव्य व उर्दू गद्याची अपेक्षा होती. त्यामुळे नाराज झालेल्या ग़ालिबने तो जो मुगलांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करीत होता त्याच्या प्रस्तावनेत लिहिले,
‘.....एका रात्री मी माझ्या ह्रदयाशी हितगुज करत बसलो होतो. मी त्याचे नेहमीच ऐकतो कारण त्याला माझ्यापेक्षा जास्त कळते असा माझा विश्र्वास आहे. मी त्याला म्हटले, ‘मला जे वाटते ते बोलण्याची शक्ती दे ! मी त्या राजाच्या दरबारी जाऊन म्हणेन, ‘मी गुढ तत्वांचा आरसा आहे. मला पाणी देणे महत्वाचे आहे. मी एक कवि आहे आणि मला कवि म्हणूनच महत्व मिळाले पाहिजे.’
ह्रदयाने उत्तर दिले, ‘ अरे मुर्खा हे म्हणायची वेळ आता टळून गेली. आता तू फक्त हेच म्हणू शकतोस, ‘मी जखमी झालो आहे. मी माझे मरण डोळ्यांनी पाहिले आहे. मला जगायला पाहिजे....परत ताळ्यावर यायला पाहिजे......’
राजाच्या दरबारी त्याला तुलनेने दुय्यम दर्जाची कामगिरी मिळाली अशी तक्रार करत तो म्हणतो, मी नशिबवान की मला बादशहासाठी लिहिण्याची संधी मिळाली पण दुसऱ्याच क्षणी तो म्हणतो, पण मी त्याच्यासाठी लिहितोय म्हणजे तो खरा जास्त भाग्यवान म्हणायला अहे’.....
‘........मला माझ्या नशिबाचा अभिमान वाटतो की मला तुमच्यासारखा मालक मिळाला आहे. मी तुमच्यासाठी प्राणार्पण करण्यासही तयार आहे पण तुम्हीही तुमच्या नशिबाचे आभार मानावयास हवे ज्याने तुम्हाला ग़ालिब सारखा एक गुलाम दिला ज्याच्या शब्दात आग आहे...माझ्या शब्दांकडे लक्ष द्या मग तुम्ही तुमच्या ह्रदयाची कवाडे माझ्यासाठी आपोआप उघडाल.
बादशहाशी तो कुठल्याही दडपणाखाली न येता बोलत असे, वागत असे. त्याच्या कर्मठ इस्लामबाद्दलच्या कहाण्यांचा उगम याच काळात झाला. कर्मकांडांबद्दलची त्याची मते जगज़ाहीर होती. त्या कर्मकांडांबदद्ल गंभीर चर्चा सुरु झाली की ग़ालिब त्याच्या हजरजबाबीपणाने त्याची टर उडवित असे व तेथे हास्याचे धबधबे कोसळत असत. एक भर सभेत एका धर्ममार्तंडाने त्याला मद्याबद्दल चांगलेच सुनावले आणि म्हणाला, ग़ालिब दारुड्यांची प्रार्थना अल्लापर्यंत पोहोचत नाहीत’ ग़ालिबने लगेचच उत्तर दिले, ‘माझ्या मित्रा, माणसाकडे जर मद्य असेल तर तो कशाला कोणाची प्रार्थना करेल ?’
एकदा बादशासमोर ग़ज़ल पेश करताना त्याचा शेवट त्याने या शेराने केला,
‘ये मसाइले-तसव्वुफ, ये तेरा बयान ‘ग़ालिब’
तुझे हम वली समझते, जो न बादाख्वार होता......
म्हणजे प्रेम व सुफी गुढ तत्वज्ञानावर तुझे निरुपण इतके सुंदर असते,
तू जर मद्यपी नसतास तर आम्ही तुला सुफी संतच मानले असते.........
क्रमशः
जयंत कुलकर्णी
यातील कवितांकडे थोडे दुर्लक्षच करावे.......:-)
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 2:35 pm | जेपी
हा भागपण मस्त झालाय . लवकर टाकल्याबद्दल धन्यवाद .
30 Dec 2013 - 2:40 pm | मुक्त विहारि
पुभाप्र
30 Dec 2013 - 3:10 pm | कवितानागेश
वाचतेय....
30 Dec 2013 - 4:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हा भागही दमदार...
उत्कंठा वाढतेय, येऊद्या पुढचे भाग.
30 Dec 2013 - 11:22 pm | मारवा
आपण राल्फ रसेल च नेमक कुठल पुस्तक लेखमालेसाठी रीफर करत आहात नाव सांगितले तर बरे होईल. मी फक्त गालिब वरील एकच मराठी पुस्तक वाचलय. अजब आजाद मर्द गालिब हे फार सुंदर पुस्तक आहे वसंत पोतदार यांचे.
31 Dec 2013 - 2:33 am | खटपट्या
वाह वाह ! निव्वळ अप्रतिम !!!
8 Sep 2016 - 2:31 pm | सानझरी
दोनही भाग वाचले. मस्त लेख आहेत. गालिब बद्दल कितिही वाचलं तरी दर वेळेला नविन काहितरी वाचायला मिळतं.
लेखात ज्या ३ कविता दिल्या आहेत त्या मुळ स्वरुपात वाचायला आवडतील.
गालिबच्या या माझ्या आवडत्या ग़ज़ला--
१. कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझसे
जफ़ायें कर के अपनी याद शर्मा जाये है मुझसे
सम्भलने दे मुझे ऐ नाउम्मीदी क्या क़यामत है
के दामान-ए-ख़याल-ए-यार छूटा जाये है मुझसे
उधर वो बदग़ुमानी है इधर ये नातवानी है
न पूछा जाये है उससे न बोला जाये है मुझसे
हुये हैं पाँव ही पहले नबर्द-ए-इश्क़ में ज़ख़्मी
न भागा जाये है मुझसे न ठहरा जाये है मुझसे
२. इश्क मुझको नहीं वहशत ही सही
मेरी वहशत तेरी शोहरत ही सही
हम भी तस्लीम की खूं डालेंगे
बे-नियाजी तेरी आदत ही सही
हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है
तुम ही कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तगू क्या है
जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा
कुरेद्ते हो जो अब राख जूस्तज़ू क्या है
रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल
जब आँख से ही न टपका तो फिर लहू क्या है
रही ना ताक़त-ए-गुफ़्तार और अगर हो भी
तो किस उम्मीद से कहिए कि आरज़ू क्या है
हुआ है शाह का मुसाहिब फिरे है इतराता
वगरना शहर में ग़ालिब की आबरू क्या है
8 Sep 2016 - 5:58 pm | प्रभास
सुंदर लेख आहे... अतिशय मोजकं पण अगदी पुरेपूर चित्र उभं केलंय तुम्ही...
हा माणूस कुठेतरी मनास स्पर्शून गेला...
ये मसाइले-तसव्वुफ, ये तेरा बयान ‘ग़ालिब’
तुझे हम वली समझते, जो न बादाख्वार होता......
म्हणजे प्रेम व सुफी गुढ तत्वज्ञानावर तुझे निरुपण इतके सुंदर असते,
तू जर मद्यपी नसतास तर आम्ही तुला सुफी संतच मानले असते......... हे तर अतिशय क्लासच...
9 Sep 2016 - 10:14 am | पथिक
आवडले.
एक सांगण्यासारखं: पाकिस्तानी कलाकार झिया मोहियुद्दीन यांनी वाचलेली गालिब ची पत्रे ऐकणे हि एक पर्वणी आहे.
9 Sep 2016 - 12:27 pm | भ ट क्या खे ड वा ला
खुपच छान .
कविता मूळ स्वरुपात ही वाचायला आवडतिल .
अर्थात शब्दकोश हाताशी ठेउन .