या लेखातल्या एलिफंटवरून जाणवलं. आम्ही लहानपणी अगदीच खेडवळ होतो. आजकालची मुले छान
टाय, बूट मधे असतात. पाहूनच ती कशी स्मार्ट दिसतात. इंग्लिश फाड फाड बोलतात. आम्हाला इंग्लिश जाऊद्या हिंदीसुद्धा ऐकायला कधी मिळायचे नाही. चपला घालणे सातवीपर्यंत माहीत नव्हते. जीवन शिक्षण मंदिर नावाची शाळा. शाळेत गेल्यावर शाळेची घंटा अडकवण्यापासून, शाळा भरताना ती वाजवण्यापर्यंत सर्व कामे मुलांनाच नेमून दिलेली असत. शाळेत आलो की पहिल्यांदा खराटा हातात घेऊन अंगण झाडावे लागे. पडलेले कागदाचे कपटे बाजूला करून मैदान साफ करावे लागे. वर्ग साफ करावा लागे. वर्ग कुणी व्यवस्थितपणे झाडत असेल तर गुरुजींच्या डोळ्यात कौतुक दाटून येई.
महिन्यातून एकदा आमचे गुरुजी आम्हाला दोघा दोघांच्या जोड्या करून शेण आणायला गावात पिटाळत असत. छान नवाकोरा गाईचा पो पाहून कोण आनंद होई. आजही होतो. यामुळे गावात गायी कोठे आहेत हे आधीच हेरून ठेवलेले असे. मग शाळेत आल्यावर सगळ्यांनी आणलेले शेण पायरीच्या बाजूला साठवले जाई. मग वर्ग सारवायला सुरुवात होई. पाणी शेंदून आणण्याचे काम मुलांचे, सारवण्याचे काम मुलींचे असे. पुढचे काही दिवस त्या सारवलेल्या वर्गात बसताना विलक्षण प्रसन्न वाटे. स्वतःच शाळा स्वच्छ करावी लागत असल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये ही शिकवण कुणी देण्याची गरज पडली नाही.
शाळेला कुंपण नव्हते. मैदानातून कुणाचीही येजा आरामात चाले. दुपारच्या वेळी शेळ्यांचा एक कळप मैदानातून हमखास जाई. बहुधा मधल्या सुटीची वेळ असे. तो नेणारा मुलगा ओळखीचा झाला होता. तो कळप जाताना दिसला की मी तिकडे धाव घेई. मग तो मुलगा एका शेळीला पकडून आणी, मला तिच्याखाली हात धरायला सांगे. तो तिचे दूध काढून मला देई. शेळीचे ते धारोष्ण दूध विलक्षण उर्जा देणारे असे.
या सगळ्या वातावरणात मराठी/भारतीय संस्कृतीची वेगळी ओळख करून घ्यावी लागत नसे, ती आपोआप होत असे.
(अलिकडे झी मराठीच्या कार्यक्रमातून मराठी संस्कृती समजून घेणारे पालक पाहिले की गंमत वाटते...)
थंडीच्या दिवसात वर्ग कडूनिंबाखाली उन्हात भरे. मुलांनो मातीत हात घालू नका,
खड्यांशी खेळू नका हे अधून मधून गुरुजी सांगत. बहुतेक मुलांचा वेष अर्धी चड्डी, शर्ट आणि डोक्यावर टोपी असा असे. हे सगळे असले तरी तिथले शिक्षण मात्र उत्तम असे. तेव्हा शिकलेला भूगोल, गुरुजींनी आमच्यासमोर उभा केलेला इतिहास आजही विसरता येणे शक्य नाही.
तर एकूण असे आहे, बाकी गोष्टी नंतर केव्हातरी ...
प्रतिक्रिया
21 Nov 2013 - 11:13 am | नानबा
सुंदर लेखनचित्र मांडलंयत हो आशू राव.. :)
21 Nov 2013 - 12:41 pm | मेघा देसाई
खरच शाला ती शाला होति,घरी काम कारअय्ला आवददाय्चे नहि पन शालेत आवददाय्चे खुप
21 Nov 2013 - 12:50 pm | विटेकर
तंतोतंत वर्णन ..
आम्ही पण हेच केलयं .. दर शनिवारी शाला सारवायला लागायची ...
आमची पण शाळा - जीवन शिक्षण मंदिर .
चप्पल तर नव्हतीच पण , छत्री- स्वेटर अस्ले लाड नव्हते त्यामुळे निसर्गाचे सानिध्य होते. आणि भिजला म्हनून लगेच सर्दी होत नव्हती. थंडिच्या दिवसात शनीवारी सकाळी शाळेला जायचे जीवावर यायचे !
21 Nov 2013 - 12:57 pm | दिपक.कुवेत
शिक्षण मंदिर आहे होय? मला वाटलं आमच्या जीवभौच्या कथांचं मंदिर आहे. बाकि त्यांच्या कथा पण सामान्य जीवना वरच्या पण शैक्षणीक दर्ज्याच्या असतात. कधी तरी त्या पण वाचत चला/अनुभवा.
21 Nov 2013 - 2:53 pm | पैसा
आमची शाळा तर जीवन शिक्षण शेती शाळा होती. भात लावायला पण शिकवायचे!
26 Nov 2013 - 5:39 pm | विजुभाऊ
आमची लग्नानंतर शाळा सुरु झाली. कुकर लावायला शिकलो
26 Nov 2013 - 7:36 pm | पैसा
तो भात नव्हे. गुडघा गुडघा चिखलात लावायचे भाताचे रोप! =))
21 Nov 2013 - 3:16 pm | प्यारे१
शेणानं सारवायला लागलं नाही तरी बाकी बराच प्रकार असाच होता.
स्पर्धा आहे च्या नावाखाली प्लेग्रुप पासून ट्युशन लावणार्या पालकांना लाख लाख सलाम!
21 Nov 2013 - 5:41 pm | गजानन५९
स्पर्धा आहे च्या नावाखाली प्लेग्रुप पासून ट्युशन लावणार्या पालकांना लाख लाख सलाम! + १
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आणि स्पर्धेच्या नावाखाली शिक्षण सम्राटांच्या घशात लाख लाख रुपये घालणारे पालक पण धन्य ( पण खरे तर त्यांची पण काही चूक नाहीये परिस्थिती अशी आहे कि...च्यामारी मरुदेत बोलू तितके कमी आहे.)
21 Nov 2013 - 6:01 pm | यसवायजी
सेंटी केलं राव तुम्ही..
माझं गाव १९९२-९३ मधे ना-धड-खेडं-ना-शहर असं होतं.. आम्हा पोरांना शेण शोधायला लै हिंडायला लागायचं.
नंतर शाळाच बदलली. आता त्या सरकारी शाळेत फरशा बसल्या..
26 Nov 2013 - 10:54 am | आशु जोग
शेण्टी केलं...
26 Nov 2013 - 11:56 am | मृत्युन्जय
मस्त लेख आहे हो जोग. आवडला.
26 Nov 2013 - 12:07 pm | पिलीयन रायडर
एवढी सुंदर शाळा आमच्या नशिबात नव्हती.. पण जी होती ती छान होती..
आता मुला साठी शाळा शोधायचे दिवस आले. काल सकाळीच वहिनीने फोन करुन सांगितले की अबीर जुन मध्ये २ वर्शाचा होत आहे तेव्हा तुला ह्या नोव्हे - डिसेंबर मध्येच अॅडमिशन घ्यावी लागेल. २५ हजार + फिस असते. ऐकुन झोप उडाली ते उडालीच.. प्ले ग्रुप मध्ये टाकणं खरच गरजेच आहे का? आणि काल पेपर मध्ये आलं होतं की आता एप्रिल मे मध्येच अॅडमिशन करायच्या (ह्यावर वहिनी म्हणे की हे नाट्क मागच्या वर्षी पण झालं होत, काही फरक पडला नाही..)
मुळात पुण्यात चांगल्या शाळा कोणत्या??? अक्षरनंदन बद्दल ऐकुन होते पण ती शाळा बंद पाडायच्याच मागे लोक लागलेत असे दिसते..
(सॉरी हो आशु भाऊ.. हायजॅक केला तुमचा धागा.. पण शाळा कोणती हा ज्वलंत मुद्दा आहे सध्या घरात.. रहावलं नाही म्हणुन लिहीलं)
26 Nov 2013 - 12:25 pm | मृत्युन्जय
खालील शाळा चांगल्या आहेत असे ऐकुन आहे:
१. सेवा सदन
२. बाल शिक्षण
३. परांजपे हाय्स्कूल
४, अभिनव इंग्रजी
५. मिलेनियम
बाकी आपल्याकडे काही फर्ष्ट ह्यांड नॉलेज नाही.
26 Nov 2013 - 3:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा ज्वलंत विषय आहेच...कुठ्ल्या शाळेचा फॉर्म घेण्यासाठी पहाटेपासुन किंवा आदल्या दिवशीपासुन रांग लागते यावर तिचे स्टेटस ठरते...सेवा सदन,न्यु इंडिया,बाल शिक्शण या शाळांजवळ राहणार्या लोकांना विचारा
26 Nov 2013 - 1:05 pm | आदूबाळ
जोग साहेब, अजून लिहा...
26 Nov 2013 - 3:28 pm | इरसाल
आम्हीपण हेच केलय.
शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याने सकाळी सकाळी शाळेची जमीन शेण बुतारा घेवुन सारवावी लागत असे, बुतारा मुलांसाठी आणी मुली हाताने डि झाइन काढुन सारवत असत. बाकीचे झाडांची पाने गोळा करत व हिवाळ्यात हीच पाने शेकोटी साठी वापरली जात.
बाकी शेण गोळा करायला गावातलाच कोणी की ज्याच्याकडे गाईम्हषी असत. बाकीचे नंतर.....
26 Nov 2013 - 3:47 pm | आशु जोग
आजच्या शाळा पाहिल्या की 'शाळा शिकून कोणाचं भलं झालंय'
हे पटायला लागतं
26 Nov 2013 - 4:32 pm | वडापाव
आमच्या जुन्या सोसायटीत चिल्ल्या-पिल्ल्या मुलांची दाटी झालीये. तिकडे नेहमी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. एकदा वेशभूषा स्पर्धा (मराठीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन :) ) ठेवलेली होती. सोसायटीतल्या सोसायटीतच सूत जुळून आलेल्या एका जोडप्याच्या लहान मुलाला उघडा, कंबरेवर गुलाबी पानं, आणि एकूणच गुलाबी गुलाबी असा नट्टापट्टा केलेला पाहिला. त्याच्या चेह-यावर आणि छातीवर त्याची आई गुलाबी पट्टे ओढत होती. बाप बिचारा नुसता ते सगळं बघत बाजुला शांतपणे उभा होता. मी जाऊन सहज म्हटलं, 'काय जोकर झालाय का हा??' त्यावर त्याची आई भडकली. 'काय कौस्तुभ, ट्रायबल्स-मॅन आहे ना तो... दिसत नाई??' मी एकवार त्या मुलाकडे पाहिलं, मग त्याच्या बापाकडे पाहिलं. त्यानं मला एक केविलवाणं स्माईल दिलं आणि मी हसू आवरत तिथून सटकलो.
26 Nov 2013 - 5:23 pm | बाप्पू
स्पर्धा आहे च्या नावाखाली प्लेग्रुप पासून ट्युशन लावणार्या पालकांना लाख लाख सलाम...!!! +१
27 Nov 2013 - 10:28 pm | आशु जोग
http://www.loksatta.com/sampadkiya-news/general-knowledge-questions-rela...
या उदाहरणांवरून मला श्रीमती ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या शाळेत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली. त्यांच्या शाळेच्या तपासणीसाठी काही विद्वान गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाचे काही प्रश्न विचारले - अमक्या खात्याचा मंत्री कोण? वगरे वगरे. विद्यार्थ्यांना उत्तरे देणे फारसे जमले नाही. ताराबाईंनी हा सगळा प्रकार पाहून घेतला आणि तपासनीसांकडून जेवणाच्या सुट्टीपर्यंत वेळ मागून घेतला. सुट्टीच्या वेळात त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून आणण्यास सांगितले. पाने गोळा झाल्यानंतर त्यांनी एकेका विद्वान तज्ज्ञाला ही पाने कोणकोणत्या झाडांची आहेत असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. विद्वान तज्ज्ञ अर्थातच गडबडून गेले. याउलट, ताराबाईंच्या विद्यार्थ्यांना त्या त्या पानाच्या झाडाचे नाव एवढेच नाही तर त्या झाडांचे औषधी गुणही तोंडपाठ होते.
28 Nov 2013 - 3:00 am | खटपट्या
मस्त ! मला वाटत सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांचे नाव जीवन शिक्षण विद्या मंदिर असेच होते.