नव्हाळी

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
3 Dec 2007 - 12:10 pm

नव्हाळी

प्रीत ही जुनी जरी, रीत ही नवी नवी
जोड हा जुना जरी, ओढ ही नवी नवी

खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा
वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा

शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे
गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे

गीत हे जुने जरी, संगीत हे नवे नवे
गुंतणे जुने जरी, सावरणे नवे नवे

गोडवा जुना जरी, स्वाद हा नवा नवा
वेग हा जुना जरी, आवेग हा नवा नवा

ताटवा जुना जरी, गंध हा नवा नवा
तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा

बरसणे जुने जरी, भिजणे नवे नवे
बहर तो जुना जरी, फ़ुलणे नवे नवे

साद ही जुनी जरी, गवसणे नवे नवे
समजणे जुने जरी, उमजणे नवे नवे

जयश्री

प्रेमकाव्यअनुभव

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

3 Dec 2007 - 1:32 pm | धोंडोपंत

छान कविता. अभिनंदन.

आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत

काही ठिकाणी वृत्त ख़ारि़ज झाले आहे.

इतकं चांगलं काव्य वाचतांना वृत्तात झालेली चूक बिर्याणीत दाताखाली येणार्‍या खड्यासारखी वाटते. उदाहरणार्थ -

ताटवा जुना जरी, सुगंध हा नवा नवा
तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा

इतक्या चांगल्या कडव्यात (शेर म्हणणे टाळतो) सुगंध या एका शब्दाने वृत्ताची हानी केली आहे. सुगंध म्हणण्याऐवजी "गंध हा नवा नवा..." असे केल्यास अर्थाला धक्का न लागता वृत्त सांभाळले जाईल. गंध हा शब्द आपण सुगंध ह्याच अर्थाने घेतो .

ही ग़ज़ल नसल्यामुळे तुम्हाला क़ाफ़िया निभावण्याची बंधने नाहीत. त्यामुळे भरपूर चांगले शब्द उपलब्धआहेत. ग़ज़लेत ही सूट मिळत नाही. तिथे प्रत्येक शब्दाला कस लागतो. ( हेच तिचे वैशिष्ठ्य आहे, हीच तिची ख़ासियत आहे. असो.)

तर सांगायचा मुद्दा हा की, याप्रमाणे इतर ठिकाणीही योग्य ते बदल केल्यास कवितेत कोणताही दोष न राहता ती तंत्रशुद्ध होईल. कृपया राग मानू नये.

( मराठी संकेतस्थळावर कोणाला काही चांगले सांगायला गेलो की ते लगेच रागावतात असा आमचा अनुभव आहे.) त्यामुळे आम्ही कोणाला सुधारणा सुचवत नाही.

पण ही कविता आम्हाला इतकी आवडली की, ती निर्दोष व्हावी असे मनापासून वाटले म्हणून एवढे लिहीले.

करविली तैसी | केली कटकट | वाकडी का नीट | देव जाणे

आपला,
(रत्नपारखी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

जयवी's picture

3 Dec 2007 - 5:07 pm | जयवी

धोंडोपंत, तुमच्या इतक्या मनापासून केलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद !
राग मानायचं कारणच नाही हो...... उलट बरंच काही शिकायला मिळालं :)
वृत्त भंग झालाय काही ठिकाणी :(
सुगंध-गंध ही सुधारणा लगेच करतेय. जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... प्लीज सांगाल का ?

धोंडोपंत's picture

3 Dec 2007 - 6:33 pm | धोंडोपंत

जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो......

तुमच्या या वाक्याने आम्ही जरा गडबडलो.

कारण आम्ही सूचना तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी केल्या नसून कवितेतील त्रुटी दूर करण्यासाठी केल्या होत्या.

तुमच्या विधानाचा एकंदर सूर पाहता तुम्हाला काही सांगावे की नाही असा संभ्रम आम्हाला निर्माण झाला आहे.

पण ही कविता आम्हाला अत्यंत आवडल्याने आम्ही दुरूस्ती कोठे करायला पाहिजे ते सांगतो.

खरं तर कविता तिचे वृत्त घेऊनच जन्माला येते. आणि शब्द कोठे खटकत आहेत याची जाणीव कवीला सर्वप्रथम होते. असो.

या कवितेतील खालील शब्द वृत्तात बसत नाहीत.

संवाद, संगीत, आवेग, सावरणे, हे भिजणे, हे फुलणे.

वरील शब्दांत बदल केल्यास कविता तंत्रशुद्ध होईल असे वाटते.

आपला,
(चिकित्सक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

जयवी's picture

3 Dec 2007 - 6:54 pm | जयवी

कृपया गैरसमज नसावा..... मी खरंच अगदी मनापासून विचारलं होतं.
तुम्ही सांगितलेले शब्द बसवायचा प्रयत्न करेन....!
तुम्ही म्हणताय ते पटतंय की कविता वृत्त घेऊनच जन्माला येते. पण कधी कधी saturation होऊन काही सुचेनासं होतं. आणि मग घाईघाईने उरकल्यासारखी कविता संपते( हे सगळं माझ्याबद्दलच सांगतेय हं) पण ह्यापुढे नक्की काळजी घेईन.
तुमच्या सारख्या लोकांकडून काही टीप्स मिळाल्या तर खरंच हव्या आहेत...... ह्यापुढेही !

आधी मनात एक ठेका धरावा. मग त्या ठेक्यात बसत नाही तो वृत्तभंग... (नाहीतर लघुगुरू मोजायला शिकावे लागते. मनात ठेका धरता आला तर मोजण्याची आवश्यकता नाही.)

तुम्ही केलेले काही बदल आणखी गडबड करतात. (उदाहरणे पोष्टकार्डाने)

चिंता करू नका - अर्थाच्या दृष्टीने तुमचे गीत सुंदर आहे - हे साधणे कठिण असते. सवयीने वृत्त जमेल, ते तर केवळ तंत्र असते. बहुतेक ठिकाणी तुमचे वृत्त ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उपजत जाण आहे, आता फक्त सरावाची गरज आहे.

(कौतुक करणारा)
धनंजय

विसोबा खेचर's picture

3 Dec 2007 - 1:17 pm | विसोबा खेचर

छानच प्रतिसाद दिला आहेस..तुझ्यासारख्या तंत्रशुद्ध कवीच्या सूचनांचा लाभ सर्वांनाच व्हावा असे वाटते!

बाकी जयूची कविता मलाही आवडली..

जयूचं मिसळपाववर मनापासून स्वागत...

तात्या.

खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा
वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा

शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे
गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे

सगळीच कविता सुंदर आहे परंतु वरील ओळी अधिक आवडल्या.

आपला,
(जुना जुना, नवा नवा) तात्या.

जयवी's picture

3 Dec 2007 - 5:10 pm | जयवी

तात्या, तहे दिल से शुक्रिया :)
मस्त झालीये साईट्........अभिनंदन :)
इथे इमोशन्स मात्र हवीत हो.......!! बघा ना काही करता आलं तर :)