दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन

शरद's picture
शरद in काथ्याकूट
13 Nov 2010 - 8:17 am
गाभा: 

चार्वाक अर्थात लोकायत दर्शन

त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: !
जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य.

चार्वाकमताची ओळख करून देतांना माधवाचार्य चार्वाकाचे मत मांडत आहेत : " तीन वेदांची रचना विदुषक, धूर्त व राक्षसांनी केली आहे. जर्फरी, तुर्फरी इ. अर्थहीन वचने पंडितांचे उद्गार समजले जातात." इ.स.पूर्वी वेदांवर अशी तिखट टीका करणारा नक्कीच त्या काळातील मिपावर प्रतिसाद देणारा असावा

दर्शन म्हणजे तत्वज्ञान. मी कोण, मेल्यानंतर शरीरातून काय जाते, जगाची उत्पत्ती कशी झाली, अशा गोष्टींचा विचार दर्शने करतात. अशी दर्शने अनेक आहेत. वेदप्रामाण्य़ मानणारी, देवावर व परलोकावर विश्वास ठेवणारी ती आस्तिक. लोकायत हे एकमेव दर्शन या तिन्हीना नाकारते. बौद्ध व जैन दर्शने वेदप्रामाण्य व देव नाकारतात पण परलोकावर विश्वास ठेवतात. त्यांना नास्तिक म्हणावयाची पद्धत आहे.

दर्शन हे विचारधारा असते. त्यामुळे त्याचा सहसा एक कर्ता/लेखक नसतो. अनेक विचारवंतांचे एकाच धाटणीचे विखुरलेले विचार एक आचार्य एकत्र करतो. त्यावर अनेकजण टीका लिहतात. त्यांचे स्पष्टीकरण दुसरा लिहतो. दर्शन तयार होते. आपल्या मतांचे मंडन व दुसर्‍या मतांचे खंडन हा यातील प्रत्येक विद्वानाचा आवडता खेळ. आद्य शंकराचार्य अद्वैताचे मंडन करणार व सांख्यांचे खंडन.

बृहस्पती हा आद्य प्रवर्तक म्हणून दर्शनाचे दुसरे नाव बार्हस्पत्य. लोकांचे म्हणजे जनसामान्यांचे म्हणून लोकायत व महाभारतातील चार्वाक या व्यक्तीच्या विचारसरणीशी जुळते म्हणून चार्वाकदर्शन. बर्‍याच विद्वानांच्या मते चार्वाक हे व्यक्तीनाम नसून या विचारसरणीचे आचार्य ते चार्वाक. असो. याचा दर्शनातील विचारांशी संबंध नाही.

हे एक पुरातन दर्शन आहे. महाभारतात द्रौपदी धर्माला सांगते की" मी वडीलांच्या घरी भावाबरोबर याचा अभ्यास केला आहे". असाही उल्लेख सापडतो की निरनिराळ्या आश्रमात इतर शास्त्रांबरोबर या दर्शनाचा अभ्यास होत असे व त्यावर मोठे वादविवाद होत असत. तसेच कौटलीय अर्थशास्त्रात व न्यायसूत्रात लोकायताचा आदराने उल्लेख केला आहे. सांख्य, योग व लोकायत एका पंक्तीत बसवले आहेत; इतक्या योग्यतेचे दर्शन.

काळ :बुद्धपूर्व. पूर्व मींमांसेतील काही विचारांचे साम्य लक्षात घेतले तर विचारधारा श्रुतीकालातीलच.

प्रमुख आचार्य व त्यांचे ग्रंथ : बृहस्पती (बृहस्पतीसूत्र), पुरंदर, भागुरी,जयराशी (तत्त्वोप्लवसिंह )

बौद्ध व जैन धर्माच्या उदयानंतर मात्र लोकायतावर सडकून टीका झाली. बौद्ध भिक्षूंनी लोकायत वाचू नये असे सागण्यात आले. नंतर पुराणांनी व इतर लेखकांनी लोकायतावर ते भोगवादी आहे म्हणून इतकी टीका केली की हळूहळू लोकायताचा अभ्यास बंद पडला व त्याचे ग्रंथही लुप्त झाले. आज दुर्दैवाने आपल्याला या दर्शनाचा अभ्यास करावयाचा म्हणजे इतर दर्शनकार काय म्हणतात ते वाचूनच करावा लागतो. हे योग्य नव्हे पण त्याला इलाज नाही. बृहस्पती सूत्रातील २५-३० सुत्रे निनिराळ्या टीकांमध्ये मिळतात. तेवढाच मूलस्रोत. बाकीचे दुय्यम.

आता दर्शनांबद्दल काही प्राथमिक माहिती घेऊ. कशाला "मानाचयाचे" त्याला म्हणतात प्रमाण. हे ज्ञानाचे साधन. तीन प्रमाणे सर्व साधारणपणे सगळी दर्शने मानतात. (१) प्रत्यक्ष... इंद्रियाद्वारे येणरा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष. (२) अनुमान ... बुद्धीच्या सहाय्याने उपलब्ध माहितीवरून केलेला अंदाज म्हणजे अनुमान. (३) आगम-आप्तवचन-शब्द ... त्या त्या शाखेच्या ज्ञानी पुरुषाचे वचन म्हणजे आगम. सहा वैदिक व दोन अवैदिक दर्शनांना ही तीनही प्रमाणे मान्य असतात. लोकायत फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतो. (तसे काही बाबतीत अनुमान चालते, पण काही अपवादात्मक गोष्टीतच.) मोठा फरक. वेदात सांगितले आहे म्हणून काहीही ऐकावयाला लोकायत तयार नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे चेतनाकारणवाद - अचेतनकारणवाद. सर्व दर्शने जगाची उत्पत्ती, जीवाचे-जाणीवेचे रहस्य उलगडतांना "चेतने"चा भाग मान्य करतात. लोकायत फक्त पृथ्वी, आप, तेज वायू यंच्या संघातापासून (अचेतनेपासून) जीवस्वरूप जाणीव निर्माण होते म्हणते. लक्षात घ्या. देव -ईश्वर बादच झाले की !

लोकायतच्या माहितीकरिता बृहस्पतीसूत्रातील काही सूत्रांचे भाषांतर बघू.
(१)पृथ्वी, आप, तेज, वायू या चार तत्वांच्या संयोगासच शरीर, इंद्रिय, विषय या संज्ञा आहेत.
(२) त्यातून चैतन्याची निर्मिती होते.
(३) चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष.
(४) शरीर व इंद्रिये यांचा संघात हाच चेतन क्षेत्रज्ञ.
(५) प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण.
(६) परलोक नाही.
(७) इहलोकीचे व परलोकीचे शरीर व त्यामधील चित्त वेगवेगळे असल्यामुळे आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होत नाही.
(८) काम व अर्थ हेच एकमेव पुरुषार्थ आहेत.
(९) दण्डनीति हीच एक विद्या आहे.
(१०) वार्ता (कृषि,गोरक्ष, वाणिज्य) यातच समाविष्ट आहे.
(११) तीन वेद हा धूर्तांचा प्रलाप आहे.
(१२) फलप्राप्ती होत नसल्याने धर्माचे आचरण करू नये.
(१३) उद्याचे मोरापेक्षा हातचे कबुतर बरे.
(१४) संशयास्पद निष्कापेक्षा निश्नित रुपाने मिळणारे कार्पापण बरे.

निवृत्तीवादी बौद्ध धर्माला (व अद्वैतालाही ) हे इहवादी विचार न पटणारे असल्याने त्यांनी लोकायतवर कठोर प्रहार केले. बुद्धपूर्व लोकायताला दिला गेलेला सन्मान विसरून नंतरच्या सर्वांनी बौद्धांचीच री ओढली. नंतर लोकायताचे मूळ ग्रंथ मिळेनासे झाले. आता विरोधकांनी केलेले आरोप हे त्यांनीच केलेल्या लोकायत दर्शनाचे म्हणून दिलेल्या अवतरणांवर आधारित होऊ लागले. याचे एक उदाहरण म्हणजे लोकायताची विचारसरणी म्हणून दिले जाणारा श्लोक माधवाचार्य असा देतात

यावत्जीवं सुखं जिवेत ऋणं कृत्वा धृतं पिबेत !
भस्मीभुतस्य देहस्य पुनरागमनं कुत : !!
सरळसरळ भोगवादी विचार. पण ५०० वर्षे आधीच्या जयंतभट्टाच्या न्यायमंजीरीत हा श्लोक असा आहे

यावत जीवं सुखं जिवेत नास्ति मृत्युरगोचर: !
भस्मीभुतस्य शांतस्य पुनरागमनं कुत : !!

इथे सुखाने जगा म्हणण्यात इहवाद आहे, भोगवाद नाही.

काही विवादास्पद विचार लोकायतच्या संदर्भात मांडले गेले आहेत. त्यांचा विचार करू.
(१) लोकायत हे आर्यपूर्व सिंधू संस्कृतीच्या लोकांचे. जोवर सिंधू संस्कृतीच्या लोकांच्या लीपीचा उलगडा होत नाही तोवर एक तर्कच.
(२) लोकायताचा स्रोत सांख्य व तंत्र. चूक. ही दोनही दर्शने चेतनावादी आहेत व तंत्राचा उद्देश मोक्ष मिळवणे आहे. अचेतनवादी व मोक्षावर विश्वास नसलेल्या लोकायताशी दुवा जुळवता येत नाही.
(३) लोकायत हे वेदांच्या विचारसरणीच्या बाहेरचे कारण ते इहवादी आहे. बरोबर वाटत नाही कारण वेद सर्वस्वी इहवादी आहेत. यज्ञ करावयाचा, प्रार्थना म्हणावयाच्या, त्या ऐहिक ( व नंतर परलोकात तसलेच) सुख मिळवण्याकरिता. हे मुद्दे विस्ताराने देणे येथे शक्य नाही.

काही लोकायताबद्दल माहिती देणारी मराठी पुस्तके :
(१) आठवले सदाशिव .... चार्वाक इतिहास व तत्वज्ञान.
(२) कंगले र.प. ... माधवाचार्यांच्या सर्वदर्शनसंग्रहाचे भाषांतर.
(३)कुरुंदकर नरहर ... मागोवा.
(४) गाडगिळ स.रा. ... लोकायत.
(५) कुमठेकर उदय ... वेध चार्वाकाचा.
(६) चार्वाक ..... डॉ.आ.ह.साळुंके

शरद

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

13 Nov 2010 - 8:56 am | नगरीनिरंजन

सुंदर विवेचन! कष्टपूर्वक माहिती गोळा करून मांडल्याबद्दल शतशः धन्यवाद!

बाबय's picture

13 Nov 2010 - 8:33 pm | बाबय

> (६) चार्वाक ..... डॉ.आ.ह.साळुंके
नुसते 'चार्वाक' नव्हे, "आस्तिक शिरोमणी चार्वाक"!

जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर वाचावे.

अवलिया's picture

13 Nov 2010 - 11:00 am | अवलिया

उत्तम माहिती.

चार्वाक दर्शनातील मुद्यांचे इतर दर्शनांनी केलेले खंडन अथवा योग्य मुद्यांचे मंडन यावर एक लेख येवु द्या ! :)

आळश्यांचा राजा's picture

13 Nov 2010 - 1:49 pm | आळश्यांचा राजा

खंडन अथवा योग्य मुद्यांचे मंडन

हेच म्हणतो.

बाकी काही प्रश्न आहेत. विचारतो थोड्या वेळाने.

अवरंग's picture

13 Nov 2010 - 1:04 pm | अवरंग

चार्वाक शब्द चारूवाक मधुर बोलणारा शब्दापासुन तयार झाला असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.... बहुदा सदाशिव आठवले यांच्या पुस्तकात..... याच पुस्तकात चार्वाक आणि नैतिकवादी तत्वज्ञानांचा संबध दाखवला..नैतिकतावादी तत्वज्ञ हे चार्वाकवादीच असतात...त्यात एक कथा सांगितली होती...बुध्दाकडे सदाचारी विनय नावाचा एक नितीवादी येतो...तो बुध्दाला नैतिक तत्वे सांगतो.....त्यावर बुध्द म्हणतो......लहान मूल देखील असेच वागते ते देखील ते नीतीमत्तेचे पालन करते असते काय ? (माझ्या स्मृतीप्रमाणे संभाषण)

बहुतांश लोकांचा गैरसमज असतो की चार्वाकवाद बिघडलेल्या लोकांसाठी (समाजाच्या तथाकथित ’सुधारण’ या अपेक्षेतून) वाईट कृत्ये करण्यास प्रोत्साहन देणारे तत्वज्ञान आहे....आणि बहुतांश समाज ह्या दर्शनावर टिका करत आला आहे.
परंतु हाच समाज ह्या दर्शनाचा अवलंब करणारा असतो..त्यामुळेच चार्वाक ही समाजाची मानसिकता दर्शविणारे दर्शन म्हणुन बघता येते..

चार्वाकवाद्यांना नास्तिक म्हटले जाते परंतु नास्तिकाची व्याख्या ही बरीच गोंधळास्पद आहे.... त्यामुळे चार्वाक आस्तिक /नास्तिक ह्याबद्दल काही भाष्य निश्चितपणे करता येत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे जयराशीभट्ट तत्वोप्लवसिंहात काही प्रतिपादीत करत नाहि.....तो सर्व दार्शनिकांची मते खोडून काढ्तो आणि म्हणतो मला काही मांडायचेच नाही...

स्वानन्द's picture

13 Nov 2010 - 1:17 pm | स्वानन्द

माहितीपूर्ण प्रतीसाद. धन्यवाद.

स्वानन्द's picture

13 Nov 2010 - 1:18 pm | स्वानन्द

छान माहितीपूर्ण व मुद्देसुद लेख.

यशोधरा's picture

13 Nov 2010 - 5:44 pm | यशोधरा

हा लेख सगळ्यात बेष्ट!

विलासराव's picture

13 Nov 2010 - 9:19 pm | विलासराव

आवडले.

आळश्यांचा राजा's picture

13 Nov 2010 - 11:53 pm | आळश्यांचा राजा

दर्शन हे विचारधारा असते. त्यामुळे त्याचा सहसा एक कर्ता/लेखक नसतो. अनेक विचारवंतांचे एकाच धाटणीचे विखुरलेले विचार एक आचार्य एकत्र करतो. त्यावर अनेकजण टीका लिहतात. त्यांचे स्पष्टीकरण दुसरा लिहतो. दर्शन तयार होते. आपल्या मतांचे मंडन व दुसर्या मतांचे खंडन हा यातील प्रत्येक विद्वानाचा आवडता खेळ.

असे एकदा म्हटल्यानंतर

नंतर पुराणांनी व इतर लेखकांनी लोकायतावर ते भोगवादी आहे म्हणून इतकी टीका केली की हळूहळू लोकायताचा अभ्यास बंद पडला व त्याचे ग्रंथही लुप्त झाले.

हे म्हणणे तर्कसंगत वाटत नाही.

बुद्धपूर्व लोकायताला दिला गेलेला सन्मान विसरून नंतरच्या सर्वांनी बौद्धांचीच री ओढली

बुद्धपूर्व लोकायताला सन्मान दिला गेला होता ही माहिती नवीन आहे. कशावरुन असा सन्मान दिला गेला होता? असे कोणते उल्लेख आहेत? बृहस्पती कोणत्या काळातील, बुद्धपूर्व की नंतर? द्रौपदीच्या तोंडी घातलेले वाक्य हे महाभारतकाराचे (मूळ अथवा प्रक्षिप्तकाराचे) आहे, त्यामुळे ते महाभारत ज्या काळात घडले (असावे) त्या काळातील असे म्हणता येणार नाही. म्हणजेच ते वाक्य इसवीसनाच्या नंतरच्या काळातील आहे. (महाभारत इसवीसनाच्या नंतरच्या काळात लिहिले गेले आहे, असे त्यातील भाषेवरुन वाटते, असे वाचलेले आठवते.) शिवाय, द्रौपदीच्या तोंडी एक उल्लेख आहे. भावाबरोबर मी शिकले आहे असा. इतर कुठे तसा उल्लेख आहे का? भीष्माने परशुरामाकडे विविध विद्यांचे अध्ययन केले, कौरव पांडव द्रोणांकडे शिकले, कृष्ण सांदिपनींकडे शिकला, अशा अध्ययनांच्या उल्लेखांमध्ये किती ठिकाणी लोकायताचा उल्लेख आलेला आहे? उल्लेख जरी असला तरी त्याला सन्मानाचे स्थान दिले गेलेले आहे का? या दर्शनाचा गोषवारा देऊन ते स्वीकार्य आहे/ असू शकते (म्हणजेच सन्मानाचे स्थान) असे कुठे म्हटले आहे का? उलट महाभारत तर इतक्या आख्यायिकांनी आणि परलोकातील कथा-उपकथांनी भरलेले आहे, की असल्या गोष्टी लिहिणारी माणसे (परलोक न मानणाऱ्या )लोकायताला सन्मानाचे स्थान देतील असे वाटत नाही.

बौद्ध व जैन धर्माच्या उदयानंतर मात्र लोकायतावर सडकून टीका झाली. बौद्ध भिक्षूंनी लोकायत वाचू नये असे सागण्यात आले.

निवृत्तीवादी बौद्ध धर्माला (व अद्वैतालाही ) हे इहवादी विचार न पटणारे असल्याने त्यांनी लोकायतवर कठोर प्रहार केले. बुद्धपूर्व लोकायताला दिला गेलेला सन्मान विसरून नंतरच्या सर्वांनी बौद्धांचीच री ओढली. नंतर लोकायताचे मूळ ग्रंथ मिळेनासे झाले.

बौद्ध व जैन धर्मांना, अद्वैताला, हे विचार न पटणारे असल्याने त्यांनी असे कोणते कठोर प्रहार केले की लोकायत ढासळले? त्या प्रहारांमध्ये काही अर्थ होता की नव्हता? लोकायताला दिलेला तथाकथित सन्मान विसरुन लोकांनी जैनांची/ बौद्धांची री का ओढली? जर जैनांची/ बौद्धांची री ओढणे सोयीस्कर होते,(किंवा वेगळ्या शब्दांत, पारलौकिक संकल्पनांवर विश्वास ठेवणे सोपे होते, आवडीचे होते), तर मुळात लोकायताला सन्मानच कसा काय मिळाला? तेही वैदिक दर्शने असताना?
नंतर लोकायताचे मूळ ग्रंथ मिळेनासे झाले म्हणजे काय? असे ग्रंथ जाळून टाकले? दुसरे कोणते तत्त्वज्ञान/ दर्शन आहे ज्याचे ग्रंथ मिळेनासे झाले/ नष्ट केले गेले? बौद्धांची प्रमुख विरोधी आस्तिक दर्शने कशी काय शाबूत राहिली मग? त्यांचे मूळ ग्रंथ का नाही नष्ट झाले? लोकायताच्या मूळ ग्रंथांची यादी आहे का, ज्यावरुन असे म्हणता येईल, की असे ग्रंथ होते, त्यात संक्षेपाने असे असे म्हटलेले होते, या या काळापर्यंत म्हणता येते की हे ग्रंथ पाहण्यात होते, आणि नंतर गायब झाले? जर हळूहळू लुप्त झाले, तर तसे ते का लुप्त झाले? ज्या भारतात परस्परविरोधी अनेक दर्शने एकमेकांवर टीका, मंडन-खंडन करीत स्वत: समृद्ध झाली, दुसरे कुठलेच दर्शन सडकून टीका झाली म्हणून नष्ट नाही झाले, तिथे ‘सन्मानाचे स्थान’ असणारे लोकायत कसे काय लुप्त झाले? लोकायताला कुणीच वाली का नाही राहिला?

आता विरोधकांनी केलेले आरोप हे त्यांनीच केलेल्या लोकायत दर्शनाचे म्हणून दिलेल्या अवतरणांवर आधारित होऊ लागले. याचे एक उदाहरण म्हणजे लोकायताची विचारसरणी म्हणून दिले जाणारा श्लोक माधवाचार्य असा देतात

असे किती श्लोक सांगता येतात? की हा एकच एवढा आहे? असे विकृतीकरण तर अनेक दर्शनांनी आपल्या विरोधकांचे केलेले आहे. उदा. बौद्धांना निवृत्तीवादी म्हणणे हे सर्वात मोठे विकृतीकरण आहे. असे विकृतीकरण खोडून काढून तर दर्शने एस्टॅब्लिश होत असतात. लोकायताला काय प्रॉब्लेम होता, की कुणीतरी इहवादाला भोगवाद म्हटले, की लगेच दर्शन बदनाम झाले, आणि पर्यायाने गुमनाम झाले? पटत नाही.

लोकायत हे वेदांच्या विचारसरणीच्या बाहेरचे, कारण ते इहवादी आहे. बरोबर वाटत नाही कारण वेद सर्वस्वी इहवादी आहेत. यज्ञ करायचा, प्रार्थना म्हणायच्या त्या ऐहिक (व नंतर परलोकात तसलेच) सुख मिळवण्याकरता.

काय बरोबर वाटत नाही; लोकायत हे वेदांच्या विचारसरणी बाहेरचे, हे, की त्याचे दिलेले कारण, हे? वेदांमध्ये सर्वस्वी इहवादी आहेत असे म्हणून पुढे पुन्हा कंसात परलोकाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच वेद इहवादी नाहीत.

आपण संदर्भामध्ये दिलेली पुस्तके अद्याप वाचनात आलेली नाहीत. शक्य आहे, माझ्या शंकांची उत्तरे तिथे असतील. आपण/ इतर कुणी वाचली असल्यास कृपया खुलासा करावा.

शरद's picture

14 Nov 2010 - 6:52 pm | शरद

ही लेखमाला सुरू करतानाच मी स्पष्ट केले होते की हा माझा आवडीचा विषय आहे, अभ्यासाचा नाही. प्रतिसादांतील प्रश्नांना उत्तरे देणे जमणार नाही. हा उर्मटपणा नव्हे, अगतिकता आहे. मी लिहावयाच्या आधी शक्य तेवढी काळजी घेतो पण सर्व प्रश्नांची उत्तरे, प्राथमिक संदर्भासह द्यावयाचे म्हटले तर भांडारकर ग्रंथालयात सहा महिने सकाळ संध्याकाळ जाऊन बसावे लागेल. माझ्यासारख्या रिकामटेकड्यालाही हे शक्य नाही. मनुस्मृतीवर लिहतांना मी म्हटले होते की संदर्भ विचारतांना आपण ग्रंथालयात जाऊन ते तपासणार आहोत अशी खात्री जांना आहे त्यांनीच संदर्भ विचारावेत. परिक्षेला बसावे असे आता वय नाही; त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर खुशाल नापास करा, मला वाईट वाटणार नाही. असो. तरीही आरासाहेबांच्या काही शंका दूर करावयाचा हा प्रयत्न.

विनयपिटक,दिध्धनिकाय, अंगुत्तर्निकाय,दिव्य्यव्दान, जातक कथा,मिलिंदपन्हा, शांतरक्षिततत्त्वसंग्रह आदी बौद्ध ग्रंथात लोकायतावर टीका आहे.
विद्वानांनी खंडन-मंडन करणे व बौद्ध धर्माने लोकायताविरुद्ध मोहीम उघडणे यात फरक आहे.पहिली कुस्ती समाजातील फारफार तर शे-दोनशे लोकांचा खेळ आहे. पण सन्यासवादी बौद्धांना आपला धर्म जनसामान्यात वाढवावयाचा आहे. हे जनसामान्यच लोकायताच्या इहवादाला भुलणारे आहेत. तेव्हा येन केन प्रकारेण लोकायताला हाणून पाडणे बौद्धांना गरजेचे होते. प्राचीन पाली बौद्ध ग्रंथात लोकायताचा अभ्यास बौद्ध भिक्षूंसाठी निषिद्ध मानला आहे. (इ.स.पूर्व ३ रे वा ४ थे शतक) म्हणजे लोकायताचा अभ्यास जनसामान्यातच नव्हे तर बौद्ध विहारातही प्रचलित होता. याच काळातील कौटलीय अर्थशास्त्र लोकायताचा आदराने उल्लेख करते.(१.२.५) पाणनीय व्याकरणावरील भाष्यात लोकायतावरील ग्रंथांचा उल्लेख आढळतो.वैदिक परंपरेत लोकायताला आदराने उद्बोधिले आहे.

महाभारत इ.स.पूर्व २५०-३०० मध्ये लिहून पुरे झाले होते. महाभारतातील लोकायत संबंधित उल्लेख कोठे आले आहेत ते पहा.
आदि १००.३६-३७. शांती अ. ५९.. अ. १५०., ३८-३९. २१७-२१९मोक्षधर्म अ. २०१-२०६, वन. ३२. विष्णुपुराण :मायामोहाचा अवतार. रामायण.अ.कांड.सर्ग१००,१०८

द्रौपदी आपल्या पतीशी राजधर्माबद्दल बोलत आहे. त्या ठिकाणी लोकायताचा संबंध येतो. द्रोण कौरव-पांडवांना युद्धविद्या शिकवत होते. तेथे असा उल्लेख यावयाचे कारण नाही. सांदिपनींनी कृष्णाला काय काय शिकवले याचा उल्लेख नसेल तर कृष्ण काहीच शिकला नाही म्हणावयाचे काय?

हिंदू धर्म, खरे तर वैदीक म्हणावयास पाहिजे, यात बुद्धपूर्व आणि बुद्धोत्तर असा मोठा फरक करावयास पाहिजे. साधी देवता कल्पना घेतली तरी वैदिक देवता (उदा. इन्द्र,वरुण ) कोठल्याकोठे फेकल्या गेल्या व विष्णु - शंकर पुढे आले.त्यामुळे बौद्धपूर्व काळात जे दर्शन अभ्यसनीय होते ते बुद्धोत्तर काळात मागे पडले तर फार आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. निरिश्वरवाद वेद काळीही होताच व सर्वजण दोनही दर्शनांचा अभ्यास करत होते. पण वेदकालीन ऋषींना चालले ते शैव-वैष्णव पंथीयांना चालेलच असे म्हणावयाचे कारण नाही. सहिष्णुता जाऊन कट्टरपणा वाढलेला होता. तरीही सातव्या शतकातील जयराशी स्वत:ला बृहस्पतीचा अनुयायी म्हणत होता.

ग्रंथ नाहिसे होण्यास अनेक कारणे असतात. भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली. इतर दर्शनांचे व धार्मिक पंथांचे अनेक ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. त्यामुले लोकायताचे ग्रंथ मिळत नसतील तर त्याचा दोष इतरांच्या माथी मारणे चुकीचे ठरेल.

आज श्री. आरा यांच्या काही शंकांचे उत्तर द्यावयाचा प्रयत्न केला आहे. त्यांचे समाधान होईलच असे नाही. पण माझ्या बाजूने एवढ्या वेळात सांख्य दर्शानाची ओळख लिहून झाली असती. असो. कृपया माझ्या मर्यादा लक्षात घेऊन पुढे काही त्रुटी राहिल्या तर माफ करावे.

शरद

आळश्यांचा राजा's picture

14 Nov 2010 - 7:38 pm | आळश्यांचा राजा

श्री शरद जी.

आपली परीक्षा घेण्याच्या उद्देशाने मी प्रतिसाद लिहिला असावा असे आपल्याला वाटले याचे सखेद आश्चर्य वाटते. माझा प्रतिसाद प्रश्नांनी भरला आहे म्हणजे तो उद्धट होत नाही. असो. माझ्या मते मी व्हॅलिड शंका विचारल्या होत्या. चार्वाकाचे बरेच जण कौतुक करत असतात, ते दर्शन स्वरुपात उपलब्ध नसूनही. याचे मला कायम कुतुहल वाटत आले आहे. प्रश्न चार्वाकाविषयी आहेत. आपल्या व्यासंगाविषयी नाहीत. माझ्या शंकांसमाधानाच्या निमित्ताने आपल्या उत्तम लेखात भरच पडली असती.

अजून गैरसमज व्हायच्या अगोदर एक गोष्ट स्पष्ट करतो. आपण तासनतास/ दिवसचे दिवस संदर्भ ग्रंथ तपासून ही लेखमाला लिहित आहात हे दिसतेच आहे. आपण काही माहीत नसताना उगीचच काहीतरी लिहीत आहात असे वाटत असते, तर मीदेखील वेळ घालवून प्रतिसाद टंकत बसलो नसतो. सो, इट गोज विदाउट सेईंग, आपल्या अभ्यासाबद्दल आदर आहे, कौतुक आहे. तसे बोललेलो नसलो, तरीही.

आपल्या उत्तराने माझे शंकासमाधान झालेले नाही. माझे प्रश्न म्हणजे केवळ संदर्भ दाखवा या प्रकारचे नाहीत. संदर्भ असले तरीही इंटरप्रिटेशन हे राहतेच. मुद्देसूद उत्तरे मिळालेली नाहीत. म्हणजे काही मी तुम्हाला नापास केले असे होत नाही. मी कुणी मोठा पंडित नाही की तुमच्यासारख्या अभ्यासकांची परीक्षा घ्यावी आणि पास-नापास जाहीर करावे, त्रुटी शोधाव्या, आणि मर्यादा लक्षात घेऊन माफ वगैरे करावे.

माझ्य़ा शंकासमाधानापेक्षा त्या वेळात सांख्य दर्शनाची ओळख लिहून काढणे आपल्याला अधिक महत्त्वाचे वाटते, म्हणजेच माझ्या शंका महत्त्वाच्या नव्हत्या असे आपल्याला वाटते. असे असूनही वेळ घालवून आपण सविस्तर उत्तर दिलेत याबद्दल ऋणी आहे. स्वत: जाऊन संदर्भ शोधण्याचा आपला सल्ला रास्तच आहे. आपली अगतिकता समजू शकतो. माझ्यासारख्या कुणीही सोम्यागोम्याने स्वत: अभ्यास करायचा नाही, आणि उगाचच नसते प्रश्न विचारुन आपल्या अभ्यासाचा वेळ घालवायचा याला काहीच अर्थ नाही.

पुढील लेखमालेत शंका आल्यास अवश्य विचारीन. आपल्याला सवड नसल्यास उत्तर नाही दिलेत तरी वाईट वाटणार नाही. दुसऱ्या कुणी उत्तरे दिल्यास आनंदच वाटेल.

कळावे लोभ असावा.

श्री. आरासाहेब, पहिल्यांदी आपला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो व मग शंकांकडे परत वळू. उर्मटपणाचा उल्लेख माझ्यासंबंधी आहे. प्रतिसादांतील प्रश्नांना उत्तर देणे लेखकाचे कर्तव्य आहे, मला तसे जमणार नाही म्हणणे हा माझा उर्मटपणा आहे पण ते शक्य नाही ही माझी अगतिकता आहे. मी आपणास उर्मट म्हटलेले नाही, तसे मनातही आलेले नाही. आता "तेवढ्या वेळात सांख्य दर्शनावर लेख लिहून झाला असता" हे म्हणणे चुकलेच, म्हणजे वेळेचाच विचार केला तर ते बरोबर आहे पण आपल्या शंकांना उत्तरे देत बसण्यापेक्षा ते महत्वाचे असा त्याला अर्थ आला तर तसे लिहणे घोडचूकच झाली. खरे सांगू, दर्शनावरील लेख ५०-१०० जण तरी वाचतील असे मला वाटलेच नव्हते. त्यमुळे तीन लेखांत उरकून टाकावे असा विचार होता.पण आपल्यासारख्यांचे प्रतिसाद आले म्हणून लेखमाला वाढवली. आता सांख्यदर्शन झाले की झाले. आपण प्रश्न विचारा, मला जमले तर उत्तर द्यावयाचा अवश्य प्रयत्न करीन. आता "उत्तर मिळाले नाही तर नापास करा" यात आपण माझी परिक्षा घेणार असे म्हणायाचा उद्देश नसून थोडी जास्त तयारी करून लिहले पाहिजे एवढेच स्वत:ला बजावयाचे आहे. सांख्यांवरील लेखात तसा प्रयत्न करून बघतो. असो.
आता शंकांकडे परत एकदा वळू.
(१) हे तर्कसंगत वाटत नाही...
वेदकालीन ऋषींना/विचारवंतांना दुसर्‍याचे विचार पटले नाहीत तर खंडन-मंडन पद्धतीने वाद घालावयाची पद्धत मान्य होती.म्हणून वेदकाळापासूनच वेदविरोधी विचार (उदा. उपनिषदे) मान्य केली गेली. त्यांच्याबद्दल योग्य तो आदरही दाखविण्यात आला. पण पुराणे-बौद्ध यांचा विरोध तसा नव्हता. त्यांना जनसामान्यांना, विचारवंतांना नव्हे, "लोकायत चूक" सांगावयाचे होते. जवळचे उदाहरण द्यावयाचे म्हणजे तो "भांडारकर संस्थे"वरचा हल्ला होता. ऋणं कृत्वा धृतं पिबेत् असा खोटा उल्लेख माधवाचार्यांनी केला तो ही याचेच द्योतक.
(२)कशावरून असा सन्मान दिला गेला होता. बृहस्पतीचा काळ कोणता ?
बृहस्पती हा सुरगुरू. फार पुरातनकाळचा. कौटलीय अर्थशास्त्र, पाणिनी याची उदहरणे दिली आहेतच. "सांख्य योगो लोकायतं चेत्यान्वीक्षिकी"
असे कौटिल्य म्हणतो; आन्विक्षिकी म्हणजे तर्कशास्त्र. सांख्य व योग ह्या दोन महत्वाच्या दर्शनांच्या पंक्तीत लोकायताला बसविले आहे. महाभारतातील आणखी एक उदाहरण घेऊ. गंगेने जन्माबरोबर भीष्माला स्वर्गात नेले होते व त्याच्या शिक्षणाची सोय तेथे केली होती.
ती भीष्माला शंतनूच्या हवाली करतांना सांगते त्यात "याला बृहस्पतीनीती माहीत आहे" असे आवर्जून सांगितले आहे. एकदा बृहस्पती इंद्रावर रागावून असूरांकडे जातो. त्यावेली ब्रह्मदेव देवांना संगतो की "बृहस्पतीनीती तुमच्याकडे नाही, असूरांकडे आहे; तेव्हा ते तुम्हाला वरचढ झाले आहेत". या सन्मानाच्या सर्व गोष्टी बुद्धपूर्व.
(३) वेद इहवादी नाहीत. असे बघा वेदातील परलोक, स्वर्ग हा मोक्ष नव्हे की जेथून परत यावयाचे नाही. तुम्ही स्वर्गात जाता, तेथील सुख भोगता व परत मृत्युलोकात येता. म्हणजे पृथ्वी-स्वर्ग यातला फरक काय ? तुम्ही धारावीतील झोपडपट्टीतून आदर्शमधील एकतिसाव्या मजल्यात रहावयाला जाता. क्रेडिट संपले की परत धारावीला. दोहोतील फरक म्हणजे फक्त सुखातला तरतम भाव. माहीत आहे ? धर्मार्थकाममोक्ष यांपैकी धर्मार्थकाम ही त्रयीच वेदकाळी होती.
(४) "लोकायत हे वेदांच्या विचारसरणीच्या बाहेरचे कारण लोकायत इहवादी" हे पटत नाही.

आपल्या बहुतेक शंकांची उत्तरे द्यावयाचा प्रयत्न केला आहे. आणखी काही माहिती पाहिजे असेल तर अवश्य विचारा.
शरद

उद्दाम's picture

23 Sep 2013 - 2:30 pm | उद्दाम

ग्रंथ नाहिसे होण्यास अनेक कारणे असतात. भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली..............

This is very funny comment.

राजेश घासकडवी's picture

14 Nov 2010 - 8:51 am | राजेश घासकडवी

चार्वाकदर्शन हे सध्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी सगळ्यात जवळ येतं असा माझा समज आहे.

- प्रत्यक्ष प्रमाण (अनुमान थोडंसं)
- परलोक नाही
- जीव, प्राणी म्हणजे विशिष्ट रासायनिक घटकांच्या रचना

हेच आधुनिक विज्ञान मानतं. त्यांच्यातल्या साम्यावर अगर असल्यास विरोधांवर काही प्रकाश टाकाल का?

ज्ञानेश...'s picture

14 Nov 2010 - 10:23 am | ज्ञानेश...

आठवलेंचे पुस्तकही वाचायचे आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

24 Sep 2013 - 12:24 am | अविनाशकुलकर्णी

उदयनाचार्य : (दहावे शतक). न्यायशास्त्राचा एक प्रमुख आचार्य. त्यालाच ‘उदयकर’ असेही म्हणत. त्याचा जन्म मिथिलेचा. वाचस्पतिमिश्रावर कठोर टीका करणाऱ्या बौद्ध तर्कज्ञांना उत्तर देण्यासाठी त्याने न्यायवार्तिकतात्पर्यटीकापरिशुद्धि ह्या ग्रंथाची रचना केली. त्याने लिहिलेल्या इतर ग्रंथांत न्यायकुसुमांजलि, आत्मतत्त्वविवेक, न्यायपरिशिष्ट (याला बोधसिद्धि किंवा बोधशुद्धि असे म्हणतात) यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो. सांख्यादी वैदिक आणि बौद्धादी वेदबाह्य दर्शनांतील ईश्वरनिषेधविषयक प्रमाणांचे त्याने न्यायकुसुमांजलीत खंडन केले आहे.
उदयनाचार्या नावाचा राजा उदयास आला तो विद्वान होता आणि त्याने न्याय कुसुमंजली हा ग्रांथ लिहिला... त्यात त्याने सर्व नास्तिक मतांचे म्हणजे लोकायत, जैन, बौद्ध भरपूर खंडन केले आहे................. त्याचे म्हणणे हे की कुंभार जेंव्हा घडा बनवतो. तेंव्हा त्या घड्याचे भाग्य कोणीच लिहू शकत नाही...... तसेच जेंव्हा घडा किंवा त्याचा तुकडा सापडतो तेंव्हा त्याचा निर्माता असणारच हे प्रमाणाने सिद्ध होतो..... तो दृष्टीला दिसेलच असे नाही..... त्याच प्रमाणे विश्वाचा पसारा आहे म्हणजे एक निर्माता पण आहे......... एक सर्वशक्तिमान, सर्वव्यापी नियंत्रका शक्ती चे गुणगान करणे वाईट नाही..

अविनाशकुलकर्णी's picture

24 Sep 2013 - 12:26 am | अविनाशकुलकर्णी

. भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती.

मनुस्मृतिचे दहन केले गेले असे वाचनात आले एके ठिकाणी

उद्दाम's picture

24 Sep 2013 - 9:38 am | उद्दाम

ग्रंथच कशाला आण्णा, अख्ख्या चार्वाकालाच युधिश्ठिराच्या दरबारात जिवंत जाळले गेले.

उद्दाम's picture

24 Sep 2013 - 2:32 pm | उद्दाम

दुसर्‍यांच्या ग्रंथांचा नायनाट दोन पद्धतीनी करता येतो.

मुसलमानी पद्धत : शत्रूचे ग्रंथ जाळून टाकणे.

हिंदु पद्धत : दुसर्‍याच्या ग्रंथाविरोधात दिशाभूल करणारा दुसरा ग्रंथ लिहून स्वतःच्या त्या ग्रंथाची व्यापक पब्लिशिटी आणि इतरांच्या ग्रंथांचे सप्रेशन करणे. उदा. ख्रिस्ताचे हिंदुत्व, काबा म्हणजे शिवच आहे, ताजमहाली रहस्य असली पुस्तके, **लीलामृतात शेवटच्या अध्यायात दुसर्‍या एका धर्माबद्दल उघड उघड निंदा आहे.

कुणाला दात असतात, कुणाला नख्या असतात... बाह्य फरक फक्त इतकाच.

हल्लेखोर प्रवृत्ती प्रत्येकाच्या रक्तात सारखीच असते.

----------

शांततावादी उद्दाम.

स्वानुभव आहे का?

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Oct 2013 - 2:02 pm | llपुण्याचे पेशवेll

हिंदू पद्धत जास्त लोकशाहीवादी वाटते नाही? त्यांनी लिहीला चिखलफेक करणारा ग्रंथ; मग तुमचे कोणी हात बांधले होते ग्रंथ लिहीण्यापासून. त्यांनी केली बदनामी तुमची, मग तुम्हाला कोणी थांबवले होते त्यांची सप्रमाण बदनामी करण्यापासून वगैरे वगैरे. ज्याला जे लिहायचे असेल ते लिहीण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे त्यावेळे. नाही का!

खूप छान लेख. लिहायची पद्धत खूप आवडली. असे विषय दोन परिच्छेदापलिकडे वाचले जात नाहीत, पण हा वाचला, कळला, आवडला. पुनश्च धन्यवाद.

पिशी अबोली's picture

3 Oct 2013 - 11:31 am | पिशी अबोली

छान आहे लेख.

यावत्जीवं सुखं जिवेत ऋणं कृत्वा धृतं पिबेत !
भस्मीभुतस्य देहस्य पुनरागमनं कुत : !!

हा श्लोक,
यावज्जीवं सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः!
असा पाहिजे ना?

खाली विवादास्पद म्हणून मांडलेले विचार थोडेसे निराधार वाटतात. मला संदर्भ सांगितलेत तर खरंच जाऊन शोध घ्यायची इच्छा आहे.

चार्वाक दर्शनावर जोरदार आक्षेप आहेतच. पण अन्य दर्शनांच्या प्रत्येक मूलभूत आधारावर शंका घेतल्यामुळे चार्वाकांनी त्यांना त्या शंकांची उत्तरे देण्यास व त्यासाठी अधिक चिंतन करण्यास भाग पाडले. त्यामुळे अन्य दर्शनांना समृद्ध करण्यात मोठी भूमिका या दर्शनाने बजावली आहे.

अजून लेखनाची वाट बघत आहे.

यावज्जीवं सुखं जीवेत् नास्ति मृत्युतगोचरः
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः!

हा मूळ श्लोक आहे.

तो कर्ज आणि तुपाचा उल्लेख आदि शंकराचार्यंनी घुसडला, असे म्हणतात . ( बाकी, कर्ज काढून यज्ञात तूप जाळणार्‍या हिंदु आचार्यांनी चार्वाकाच्या कर्ज काढून तूप पिण्याला हसणे , हे म्हणजे आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला, असे म्हणावे का? )

पिशी अबोली's picture

3 Oct 2013 - 2:45 pm | पिशी अबोली

तो कर्ज आणि तुपाचा उल्लेख आदि शंकराचार्यंनी घुसडला, असे म्हणतात .

संदर्भ सांगा. तुम्ही सांगताय तोच मूळ श्लोक आहे यालाही सापडल्यास संदर्भ सांगा. प्राथमिक संदर्भ असल्यास अति उत्तम.

उद्दाम's picture

4 Oct 2013 - 11:37 am | उद्दाम

कोणता श्लोक मूळ आणि कोणता डुप्लिकेट हे वरच्या मूळ लेखातच दिलेले आहे. मी पुन्हा वेगळा पुरावा द्यायची गरज नाही.

अनिरुद्ध प's picture

4 Oct 2013 - 3:18 pm | अनिरुद्ध प

मुळ तसेच डुप्लिकेट श्लोकात त्यानी कुठेही श्री शन्कराचार्यनी श्लोक बदलला आहे असे म्हटलेले जाणवत नाही.

पिशी अबोली's picture

5 Oct 2013 - 12:26 pm | पिशी अबोली

मी संदर्भ मागतेय. लेख मीही वाचला आहे. आणि तो कितीही चांगला असला, तरी मला मूळ संदर्भ बघूनच त्यातील विधानांची सत्यासत्यता बघायची आहे.

अर्धवटराव's picture

4 Oct 2013 - 3:39 am | अर्धवटराव

शंकराचार्य वगैरे व्यक्तींबद्दल लिहीताना कृपया थोडी काळजी घ्या. आचार्यांची एकुण ग्रंथरचना, त्यांच्या ज्ञानसाधनेचा आवाका, परिश्रम वगैरेवर साधा दृष्टीक्षेप जरी टाकला तरी छाती दडपुन जाते. आचार्यांनी इतर मतांचं खंडन करताना इतरांच्या श्लोकांची अशी मोडतोड करावी म्हणजे भीमसेन जोशींनी हिमेश रेशमीयाची मिमीक्री करण्यासारखं झालं. असो.

पिशी अबोली's picture

4 Oct 2013 - 11:01 am | पिशी अबोली

म्हणजे भीमसेन जोशींनी हिमेश रेशमीयाची मिमीक्री करण्यासारखं झालं.

पर्फेक्ट... =))

अहो, हल्ली फ्याशन आलीये ना अधिकाराने मोठ्या माणसांच्या अकला काढायची... स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा शॉर्टकट.

उद्दाम's picture

4 Oct 2013 - 11:34 am | उद्दाम

मी कुठल्या तरी ग्रंथात ते वाचले आहे. डीट्टेल मिळाले की सांगेन .

( कंसातील कमेंटमधील आचार्य या शब्दाचा उल्लेख हा शंकराचार्यांना व्यक्तिशः उद्देशून मी वापरलेला नाही. तिथे तो आचार्य हा शब्द जनरल - कुणीही आचार्य, बुवा, साधू , धर्ममार्तंड इ इ अर्थाने वापरलेला आहे. )

अनिरुद्ध प's picture

4 Oct 2013 - 11:46 am | अनिरुद्ध प

प्रतिसाद लिहिण्या अगोदर जरा तपासुन पहा,आपण कन्सात नव्हे तर अगोदर चक्क श्री शन्कराचार्यान्चा नावाने उल्लेख केला आहे मग उलट प्रतिक्रीया आल्यावर सारवासारव करतानासुद्धा असे उताणे पडावे लागते.

उद्दाम's picture

4 Oct 2013 - 2:14 pm | उद्दाम

कंसाआधीचे वाक्य हे वेगळे आहे. ते त्या श्लोकात बदल करण्याबाबत आहे, त्याबाबत मी जे वाचले ते मी लिहिले.

त्यानंतर पूर्ण विराम आहे. तिथे तो विषय संपला.

कंसातील कमेंट ही तूप जाळणार्‍या लोकांनी तूप खाणार्‍या लोकांना का हसावे? अशा अर्थाने आहे.

अग्निकोल्हा's picture

4 Oct 2013 - 11:36 pm | अग्निकोल्हा

बाकी, कर्ज काढून यज्ञात तूप जाळणार्‍या हिंदु आचार्यांनी चार्वाकाच्या कर्ज काढून तूप पिण्याला हसणे , हे म्हणजे आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला, असे म्हणावे का?

भरकटलेले विधान, मुळात कर्जाकाढण्यावर टिका नसुन त्याच्या विनीयोगामधे असलेली फारकत हा "चर्वाक आणि इतर" यांच्यामधिल प्रमुख विवादाचे कारण आहे. थोडक्यात कर्ज काढले नाही तरी स्वपुष्टिसाठी तुप पिणे वा ते इश्वरी कार्याला वापरणे यावर वाद होइलही पण कर्ज काढुन तुप पैदा करणे हा मुद्दाच होउ शकत नाही विधानाचा!

म्हणूनच जर शेंबुड नसता नाकाला, चर्वाक का हसे लोकांला ? म्हणावे जास्त योग्य वाटते.
(इएमायप्रेमि- अग्निकोल्हा)

चौकटराजा's picture

5 Oct 2013 - 4:59 pm | चौकटराजा

१) निसर्ग ही एक योजना आहे तिला योजक नाही. एकमेकांवर परिणाम करणार्‍या घटकांवर ती चालते. सबब यात कोणी
भक्त नाही कोणी देव.
२)संकुचित अर्थाने मानवी समाज मानव व निसर्ग अशी फारकत करीत असला तरी व्यापक अर्थाने असा भेद काही नाही.
सबब मानवाचे कायदे , कानून, समजुती, भ्रम ज्ञान ई ई ई सर्व निसर्गाचाच एक भाग आहेत. मानवाची स्खलन शीलता
सृजकता ही निसर्गाचीच एक खेळी . त्यातून उत्पती स्थिती व लय यांचा अखंड खेळ चालतो.मुळात निसर्ग हा फारच असार असा आहे. त्यात कशाचीही निर्मिती होत नाही की र्‍हास.
३) आपल्याला दिसते अनुभवाला येते ते आपल्यासाठी प्रमाण हे बरोबरच पण आपल्या निरिक्षणाला मर्यादा आहेत सबब
आपण कोणाचे गुरू नसावे की कोणाचे शिष्य. आपला अनुभव वा अनुमाने ही ही कालसापेक्षच असतात.
४) काही प्रमाणात स्वतः चा मनाविरोधी वागावेच लागते. पण निसर्गाचाच आपण भाग असल्याने त्याचे नियम पाळावेच
लागतात त्यात मात्र मनासारखे व मनाविरोधी असा फरक करून चालतच नाही.
६) देव , धर्म, भाषा , वंश, देश याना निसर्गात काही स्थान नाही. सबब अशा गोष्टींचा अति अभिमान परिणाम हीन
.

उद्दाम's picture

6 Oct 2013 - 12:20 pm | उद्दाम

सुंदर

अनिरुद्ध प's picture

5 Oct 2013 - 10:01 pm | अनिरुद्ध प

आमच्यासारख्याच्या (अति सामन्य माणसाच्या ) आवाक्या पलिकडे आहे.