दर्शने (१)
( हे लेख केवळ संक्षिप्त माहिती करून देणे एवढ्या माफक उद्देशाने लिहले आहेत. मी दर्शनांचा अभ्यासू नाही. आपणास जास्त खोलात जावयाचे असेल तर स्वत: संदर्भ बघावे लागतील वा श्री. धनंजय यां सारख्याना विचारावे लागेल.)
भाग १ . दर्शन म्हणजे काय ? त्यांची विभागणी, संख्या इ.)
वेदांचा मोठा भाग हा ऐहिक व पारलौकिक सुखे प्राप्त व्हावित या करिता प्रार्थना करण्यात गेलेला आहे. मला पशुधन मिळावे, भाऊबंद (व सवतीचा) नाश व्हावा वगैरे, वगैरे. यज्ञ करावयाचे तेही त्यासाठीच. सर्वसामान्यांसाठी हे ठीक होते पण (त्या काळच्याही) विचारवंतांना यात आकर्षित होण्यासारखे काहीच नव्हते. मी कोण ? (माझी गाडी यावरून जसे लक्षात येते की मी म्हणजे गाडी नव्हे तसेच माझे शरीर यावरून मी म्हणजे शरीर नव्हे), माझ्यातला मी व त्याच्यातला तो यांचा संबंध काय, जगाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे कारण काय, माणुस मरतो तेव्हा शरीरातून नक्की काय जाते, चेतना म्हणजे काय, सर्व जगाला नियंत्रित करणारे कोणी असते का असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले व त्यांनी आपापल्या परीने त्यांची उत्तरे शोधावयाचा प्रयत्न केला. या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे एका सामान्य व्युहात गुंफता येणे शक्य आहे का, याचा शोध घेतांना , मूलभूत तत्वांचा, विशेषत: आत्मतत्वाचा, विचार जात येतो त्याला म्हणावयाचे दर्शन. तत्वज्ञान. साध्या मराठीत फिलॉसॉफी. अशा प्रश्नांची उत्तरे गणिताप्रमाणे एकच नसतात व म्हणून निरनिराळी दर्शने. जगाच्या इतिहासात पहिला प्रयोग भारतात झाला. बहुदा सांख्य दर्शन सर्वात पुरातन असावे.
दर्शने म्हणजे वैदिक धर्म नव्हे. पण धर्म, सर्वांना पुरून दशांगुळे उरणारा असल्याने त्याने दर्शनांना आपल्या पंखांखाली घेतले. मग बौद्ध दर्शन बुद्ध धर्माचे वा जैन दर्शन जैन धर्माचे ! पण धर्म व दर्शन यांची गल्लत न घालणेच बरे. तरीही प्राचिन काळापासून दर्शनांची आस्तिक-नास्तिक अशी विभागणी केली जाते. इथेच आस्तिक-नास्तिक म्हणजे काय ते बघून घेऊं.
(१) मूळ अर्थ वेदांवर विश्वास ठेवतो, वेद प्रामाण्य मानतो, तो आस्तिक, नाही तर तो नास्तिक.
(२) सर्वसाधारण लोक अर्थ करतात त्याप्रमाणे देवावर विश्वास ठेवतो तो आस्तिक, नाही तर नास्तिक.
(३) पाणिनी निराळेच म्हणतो ; परलोकावर जाचा विश्वास तो आस्तिक.
काही उदाहरणे घेऊं. बौद्ध व जैन वेदप्रामाण्य मानत नाहीत, म्हणून ती नास्तिक; पण पाणिनीच्यामते ती आस्तिकच.
चार्वाक,वेद्प्रामाण्य, देव व परलोक काहीच मानत नाही, तो नक्की नास्तिक.
बाकीची सर्व आस्तिक म्हणावयास हरकत नाही. तसे धरले जातेही. पण खरे पाहिले तर एक-दोन सोडली तर सर्वच दर्शने देव मानत नाहीत. (हो, वेदांतही!) तेव्हा दुसर्या मताने तिही नास्तिकच. ही विभागणी शाब्दिक, म्हणूनच फार उपयोगाची नाही. बर्याच खंडन-मंडनात दुसर्याला नास्तिक म्हणणे ही एक सौम्य शिविगाळच.
किती आहेत ही दर्शने ? बरीच. तुम्हीही वरील विषयावर आपली मते मांडलीत तर तेही दर्शनच. डॉ. वि.रा. करंदीकरांनी आपल्या अमृतानुभवावरच्या पुस्तकाला एक दर्शन म्हटले आहे. तरीही पूर्वाचार्यांनी नोंदवलेली पाहिली तर बाराव्या शतकातील आ. हरिभद्राने नोंदवलेली सहा व माधवाचार्याने नोंदवलेली सोळा जास्त महत्वाची. इतर तांत्रिक दर्शने धरून पंचवीसच्या आतबाहेर.
पुढील भागात त्यांची नावे व त्यातील काहींची महत्वाची मते अगदी थोडक्यात पाहू.
शरद
प्रतिक्रिया
21 Oct 2010 - 11:53 am | विसोबा खेचर
का बरं? भाउबंदांचा नाश का व्हावा?
आणि सवतीचा नाश व्हावा म्हणता मग ती सवत घरात आणतो त्या नवर्याचाही नाश का होऊ नये?
बाब्बौ! बराच गुंतागुंतीचा मामला दिसतो.. दोन पेग मारून थोडा यमन ऐकल्याशिवाय अंमळ चक्रावलेलं डोसकं शांत होयाचं न्हाई! ;)
शरदराव, आपला हा छोटेखानी लेख लै भारी आहे. आमच्या छोटेखानी बुद्धीच्या पल्याड असून आमच्या डोक्यावरून जाणारा आहे, तेव्हा आम्ही त्यावर काय दर्शने देणार?! :)
तरीही आपण ही आमची प्रतिसादरुपी दर्शने ग्वाड मानून घ्या! :)
(दर्शनकार) तात्या.
--
"अरे श्याम, ठेव बाबा ते गीतेचं पुस्तक बाजुला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना तितके थोर! आपली पट्टी काळी दोन. पांढरी चार, काळी तीन जमायची कशी?" ! :) -- (इति काकाजी, नाटक - तुझे आहे तुजपाशी)
21 Oct 2010 - 1:05 pm | भाऊ पाटील
छोटा लेख आहे, पण आवडला!
पुढील भाग मोठे असतील अशी अपेक्षा.
22 Oct 2010 - 12:22 am | चित्रा
माहितीपूर्ण लेख. वाचते आहे.
पण वर अमृतानुभवावरून विंदा करंदीकर असे हवे का?
22 Oct 2010 - 12:38 am | धनंजय
लेखमाला चांगली आहे. वाचतो आहे.
22 Oct 2010 - 1:14 am | मिसळभोक्ता
वा ! छान ! धर्माला आरसा दाखवला, की जे दिसते ते दर्शन !
वाट पाहतोय !
22 Oct 2010 - 10:31 am | बाबय
विन्दां चे 'अष्ट दर्शने' मधे त्यांना दखल घ्यावीशी वाटलेली ८ जागतिक दर्शने आहेत.
त्यात एकुलते एक भारतीय दर्शन आहे: चार्वाक दर्शन!!
बाकी वेद आणि त्यातली दर्शने म्हणजे निव्वळ टाकाऊ माल! (हे माझे मत...))
22 Oct 2010 - 10:34 am | नितिन थत्ते
येऊद्या अजून.
उपनिषदे
आरण्यके
यांवरही लिहा
22 Oct 2010 - 2:14 pm | यशोधरा
लेख आवडला, पण अतिशय लहान व त्रोटक आहे. वाचते म्हणे पर्यंत संपला! पुढील भाग मोठे व अधिक विस्ताराने असतील का?
23 Oct 2010 - 1:45 am | शहराजाद
+१
22 Oct 2010 - 2:42 pm | विजुभाऊ
आत्मतत्वाचा, विचार जात येतो त्याला म्हणावयाचे दर्शन. तत्वज्ञान.
आत्मतत्व म्हणजे काय?
22 Oct 2010 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
22 Nov 2010 - 2:15 pm | मुक्त
आजच वाचले.
प्राथमिक ओळख आवडली. छान माहीती.
22 Nov 2010 - 2:20 pm | चांगभलं
वाचले... काहीच कळले नाही......
(हो माहितेय आम्ही माठ आहोत......)
कसली दर्शन नि काय.........
नुसते bounser आपले...
22 Nov 2010 - 9:36 pm | विसोबा खेचर
असो..! ;)