दर्शने ३
काही दर्शने
(१) अद्वैत-वेदांत . (२)पातंजल-योग . (३) पाणिनी -(व्याकरण) (४) जैमिनि- मिमांसा . (५) अक्षपाद-न्याय . (६)औलूक्य- वैशेषिक ..रसेश्वर- शैवसंप्रदाय -४ . (७)प्रत्यभिज्ञा- शैवसंप्रदाय-३ . (८) शैव दर्शन . (९) नकुलीशपाशुपत- शैव दर्शन-१ . (१०)पूर्णप्रज्ञ दर्शन- द्वैत वेदांत
(११) रामानुज-दर्शन - विशिष्टाद्वैत . (१२) आर्हत-जैन . (१३) बौद्ध दर्शन (१४)चार्वाक-लोकायत (१५) सांख्य . (१६) कापालिक . (१७) पांचरात्र इत्यादी.
आज मींमांसा दर्शनाची ओळख करून घेऊ.
मीमांसा
मीमांसा म्हणजे वेदमंत्रांतला विरोध दूर करून त्यांच्या अर्थाचा निर्णय ठरवणे. श्रुतीचे कर्मकांड व ज्ञानकांड असे दोन भाग आहेत. यज्ञयागांच्या विधीचे व अनुष्ठानाचे वर्णन करणे हा कर्मकांडाचा विषय आहे. ज्ञानकांडात जीव, ईश्वर, जगत यांचे रूप, एकमेकांशी संबंध हे विषय येतात. पूर्वमीमांसा कर्मकांडाशी निगडीत आहे तर ज्ञानकांडाशी उत्तरमींमांसा.तिलाच वेदान्त किंवा अद्वैत म्हणतात.आज विचार पूर्वमीमांसेचा..
मीमांसा न्याय म्हणूनही ओळखली जाते व तीत न्यायकणिका, न्यायरत्नाकर, न्यायमाला इत्यादी ग्रंथ आहेत. न्यायालयांत निकाल देतांना या ग्रंथांचा उपयोग करत.प्राचिन काळीच नव्हे तर मुसलमान राजवटीत व इंग्रजी राज्याच्या सुरवातीला देखील ! कायद्याला उपयोगी पडणारे काही न्याय :
(१) प्रत्येक शब्दास, वाक्यास काही तरी हेतु आणि अर्थ असलाच पाहिजे.
(२) जेथे एका नियमाने काम भागण्यासारखे असेल तेथे अनेक नियमांचे अस्तित्व मानणे योग्य नाही.
(३) जेथे स्पष्ट विरोध असेल तेथे दोन पक्षांपैकी एकचा अवलंब करावा.
(४) शक्य असेल त्या ठिकाणी समन्वय करावा.
मीमांसा वेदांना अपौरुषेय मानते. ईश्वरनिर्मित नव्हे.
मीमांसेच्या मते मानवी जीवन स्वप्नवत किंवा मायिक नाही.
सुरवातीची मीमांसा निरीश्वरवादी आहे. मह्त्वाचा मुद्दा. यज्ञामधील विधी योग्य रीतीने पाळले तर फळ मिळालेच पाहिजे.ईश्वर या मध्यस्ताची गरज नाही. मात्र उत्तरकालीन मीमांसकांनी ईश्वराला स्विकारले.
विधी, मंत्र, नामवेध, निषेध व अर्थवाद हे वेदांचे पाच विषय आहेत.
मीमांसेने प्रत्यक्ष,अनुमान, उपमान, शब्द, अर्थोपत्ती व अनुपलब्धी ही सहा प्रमाणे स्विकारली. मात्र शबरपूर्व भवदास याची भूमिका पूर्णपणे प्रत्यक्ष प्रमाणवादीच आहे.
मीमांसेला अद्वैताचा मायावाद, (जग मिथ्या) अजिबात मान्य नाही. कारण हे मान्य केले तर यज्ञातील कर्मकांडांची गरजच उरत नाही.
मीमांसा साहित्य :
मीमांसा विचारांची सुरवात श्रुतीकाळापासून झाली. जैमिनी (इसपूर्व ३ रे शतक) आपल्या आधीच्या अनेक आचार्यांचा उल्लेख करतो जैमिनीने सोळा अध्यायांच्या मीमांसासूत्रांची रचना केली. (२६४४ सूत्रे, ९०९ अधिकरणे) यावर शबरस्वामीने शाबरभाष्य लिहले. यांनाच मीमांसेचे मूलग्रंथ मानले जातात. यावर व्याख्या करणारे कुमारिल भट्ट, प्रभाकर मिश्र व मुरारी मिश्र. मीमांसेतील ३ मतप्रणाली यांच्या नावानेच प्रसिद्ध आहेत.या शिवाय वाचस्पती मिश्र, पार्थसारथी मिश्र, अप्पय दीक्षित, रामानुजाचार्य, सोमेश्वरभट्ट,गोविंदस्वामी वगैरी अनेकांचे ग्रंथ आहेत.
जैमिनीसूत्रे व कुमारिलभट्टाच्या तंत्रवार्तिकामधील पूर्वपक्षाचे विचार लक्षात घेतले तर असे लक्षात येते की मीमांसकांतील एक विचारधारा
स्वतंत्रपणे विचार मांडित होती.
(१) वेदातील शब्दन्शब्द मान्य नाही. कर्मकांड सांगणारा भाग मान्य पण अर्थवाद समजण्यात येणारा भाग अमान्य.काही उदा. तो(रुद्र) रडला
म्हणून रजताचे रजतत्त्व आहे, जो हे जाणतो त्याचे मुख शोभायमान होते, ... अंतरिक्षात अथवा द्यु लोकात अग्निचयन करू नये,जनन-मरणशील व्यक्तींचे उल्लेख इ.
(२) प्रत्यक्ष प्रमाण महत्वाचे.
(३)शास्त्र वचन तर्क, बुद्धी व अनुभव यांच्याशी सुसंगत असेल तरच स्वीकार्य.
(४) फल प्राप्त होण्यास कर्म केले पाहिजे. विधी जाणल्याने फल मिळणार नाही.
( हा विचार बुद्धीप्रामाण्यवादी व इहवादी आहे.निरीश्वरवाद मिळवला तर वाटते हा चार्वाक दर्शनाचा मूलस्रोत तर नव्हे ना ?)
आज येथे थांबू. चवथ्या भागात अद्वैत दर्शन थोडक्यात सांगून दर्शनांचा निरोप घेऊ.
शरद
प्रतिक्रिया
6 Nov 2010 - 1:24 pm | रणजित चितळे
छान माहीती मिळाली. पहिले भाग मी वाचले नाहीत. त्याचा धागा कोणता.
6 Nov 2010 - 10:08 pm | राजेश घासकडवी
फक्त विषयाच्या व्याप्तीच्या मानाने थोडं त्रोटक वाटलं. निदान तांत्रिक शब्द पूर्णपणे माहीत नसल्याने मला तरी कळायला थोडा त्रास झाला.
हे मला खूपच ऑकॅमच्या वस्तऱ्यासारखं वाटलं. आधुनिक वैज्ञानिक विचारसरणीपासून ही दर्शनं कुठे फारकत घेतात, व कुठे समन्वय साधतात यावर थोडी टिप्पणी आवडेल.
लेखमाला पुन्हा एकवार वाचून पाहेन त्याने थोडा अधिक प्रकाश पडेल असं वाटतं. लिहीत राहा.