कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला. मधमाशीच्या अगदी जवळ जाताच मधमाशीने फ्रेडीच्या हाताला जोरदार डंख मारला. हाताला जोराचा झटका बसलेला फ्रेडी कळवळतच आईकडे धावला. आईने लागलीच जखमेवर मलमपट्टी करुन छोट्या फ्रेडीला समजावलं, "निसर्गाने संरक्षणासाठी मधमाशांना जन्मतःच तजवीज केलेली असते. नुसत्या हाताने मधमशी पकडायला गेलं तर त्या स्वरक्षणासाठी डंख मारतात. यापुढे कुठल्याही किट्काला नुसत्या हाताने स्पर्श करायला जाऊ नकोस." रोज खिडकीतून दिसणार्या पिटुकल्या मधमाशा इतक्या जोराने हल्ला करुन स्वतःच रक्षण करतात या गोष्टीचं फ्रेडीला राहून राहून कुतुहल वाटत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी किट्क जगताशी जवळून झालेली ही छोटी ओळख फ्रेडीच्या आयुष्याला पुढे एक अनपेक्षित कलाटणी देणार होती.
मेक्सिकोतल्या सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागातले रस्ते फुलपताकांनी सजले होते. आस्तेकांच्या काळापासून चालत आलेला 'एल दिया दे लोस मुएर्तोस" - मृतात्म्यांसाठी सणाचा आज दिवस. घरोघरी जय्यत तयारी चालली होती. मंडळी नविन कपडे घालून, तयार होऊन स्मशानाच्या दिशेने मृतात्म्यांसाठी भेट्वस्तू घेउन लगबगीने निघाली होती. जन्माने मेक्सिकन असलेली कॅथी, अमेरिकन केन सोबत थोड्या निराशेनेच स्मशानाकडे निघाली होती. कॅथी-केन दांपत्याच्या निराशेचं कारणंही तसंच होतं. गेले दोन वर्ष रोज मोटरसायकलवरुन गावोगाव फिरुन दोघे हताश झाले होते. जंगजंग पछाडूनही हाती काहीच लागलं नव्हतं. केनसोबत स्मशानाकडे जाताच कॅथीला प्रसन्न वाटू लागलं. जागोजागी थडग्यांवर ठेवलेली रंगीबेरंगी फुलं, मृतात्म्यांसाठी आणलेले गोड्धोड पदार्थ, फळांच्या वासाने वातावरण प्रसन्न झालं होतं. फुलाफळांच्या वासाने रंगीबेरंगी फुलपाखरं, मधमाशा स्मशानात भिरभिरत होत्या आणि अचानक कॅथीचं लक्ष सिएरा माद्रेच्या पर्वतरांगेकडे गेलं. केनला खूण करुन तिने त्या दिशेने काहीतरी दाखवलं. क्षणातच दोघांच्या चेहर्यावर पुसटशी आनंदाची लकेर उमटली. ज्या कोड्याची उकल शोधण्याकरीता कॅथी व केनच नव्हे तर दूरवर कॅनडात अहोरात्र कुणीतरी धडपडत होतं त्या कोड्याचा एक महत्वाचा दुवा हाती लागला होता. जिग्सॉ पझलच्या अनेक तुकड्यांच्या पसार्यात एक महत्त्वाचा तुकडा योग्य ठिकाणी जुळला होता.
खाली पसरलेला निळाशार अथांग समुद्र आणि त्याहून निळं डोक्यावरचं आकाश, मध्यान्हीचा सुर्य तळपत होता. हवेच्या प्रचंड झोताबरोबर चिमुकल्या पंखांच्या सहय्याने 'अॅना' जीव तोडून ऊडत होती. पंखातली शक्ती हळूहळू कमी होत होती. क्षणभर टेकायला दूरदूर पर्यंत जमिनीचा पुसटसा मागमूस दिसत नव्हता. छोट्या 'अॅना' साठी हे मोठं धाडस होतं पण 'अॅना'जवळ दुसरा पर्याय उपलब्ध नव्ह्ता. हिवाळा जवळ आल्याची चाहूल तिच्या तीक्ष्ण मेंदूला केव्हाच लागली होती. आणि हा दूरवरचा प्रवास करणारी ती काही एकटी नव्हती. तिच्या आधी कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष हा समुद्र पार करतच होत्या. तिलाही हे करावंच लागणार होतं. स्वतःसाठी नव्हे तर पुढच्या पिढीसाठी, ती जगवण्यासाठी, फुलवण्यासाठी. पण 'अॅना' नक्की कुठे चालली होती? आणि का?
निसर्गाच्या एका विलक्षण कोड्याचं गुपित 'अॅना'च्या प्रवासात दडलं होतं. प्रवास नुसत्या किलोमीटर, मैल असल्या फुटकळ परिमाणात मोजला जाणारा नव्हे तर प्रवास अनेक पिढ्यांचा, वर्षानुवर्षं अविरत चालत आलेला. किटकशास्त्रातलं एक अजब स्थलांतर.
फ्रेडीचं निसर्गावरचं निस्सिम प्रेम, वर्षानुवर्षं त्याने उपसलेले कष्ट, निराशेत जागलेल्या अनेक रात्री, कॅथी-केनची अफाट धडपड आणि त्याच्याच जोडीला अमेरिकेतल्या हजारो निरपेक्ष हातांनी केलेली मदत - या सर्वाचा परिपाक म्हणून निसर्गाच्या एका अनोख्या चमत्कारची उकल होणार होती. या जिग्सॉ पझलचा शेवटचा तुकडा जेव्हा जोडला गेला तेव्हा "२० व्या शतकातला किटकशास्त्रातला एक सर्वात मोठा शोध" जगाला अवाक करुन टाकणार होता.
क्रमशः
प्रतिक्रिया
17 Sep 2013 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोनार्कच्या सुंदर वर्णनाने पुढे कायची उत्सुकता लागलीच आहे. नव्या लेखमालिकेचं मनःपूर्वक स्वागत.
आणि शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
17 Sep 2013 - 11:59 am | मोदक
+१
17 Sep 2013 - 10:00 am | आनन्दिता
व्वा व्वा ...आली बुवा तुमची नवी लेखमाला एकदाची... ,,
17 Sep 2013 - 10:21 am | मुक्त विहारि
मस्त...
झक्कास सुरुवात...
17 Sep 2013 - 10:29 am | अग्निकोल्हा
प्रचंड उत्सुकता, पुढिल भाग लवकर येउदे.
17 Sep 2013 - 10:52 am | सुनील
पक्षी-माशांच्या वार्षिक स्थलांतराविषयी आहे काय?
उत्सुकता चाळवली गेली आहे!
17 Sep 2013 - 11:58 am | स्पंदना
मोनार्क....फुलपाखरांतल सगळ्यात मोठठ फुलपाखरु. जंगलभरुन झाडांना पानांसारखी लटकणारी फुलपाखरे.
व्वाह...लवकर टाका पुढील भाग.
17 Sep 2013 - 12:49 pm | पैसा
नवी मालिका सुरू झाली म्हणा! अगदी जीव भांड्यातच काय, सुपात पडला! त्यात मोनार्क म्हणजे सगळ्यात मोठ्या फुलपाखराच्या प्रवासाची कहाणी आहे का? जबरदस्त! येऊ दे पटापट!!
17 Sep 2013 - 6:46 pm | चाणक्य
सुरुवात. उद्याच पुढचा भाग आला पाहिजे
17 Sep 2013 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
वॉव ! मोनार्क म्हणजे अनपेक्षित, अनाकलनिय, अतर्क्य आणि असेच बरेच काही म्हणू शकू असे मोसमी प्रवासी... पहिल्या भागाने उत्सुकता चाळवली गेली आहे. पुभाप्र. लवकर लवकर टाका.
20 Sep 2013 - 12:40 am | खेडूत
छान .
पुन्हा एकदा चांगल्या लेख मालेची सुरुवात. उत्कंठा वाढली आहे.
आवश्यक तिथे फोटू पण टाकालच!
फुलपाखरांची सजावट 'लाइक' केल्या गेली आहे!
21 Sep 2013 - 1:00 pm | शिवोऽहम्
भन्नाट! सुरवात आवडली.
केऑस थेअरीत ब्राझीलमध्ये फुलपाखराने पंख फडफडविले की फिलीपाईन्स मध्ये वादळ येतं. त्याची उगाच आठवण झाली.
23 Sep 2013 - 12:56 am | एस
पुभाप्र.
23 Sep 2013 - 2:36 am | प्यारे१
vaachatoy!
23 Sep 2013 - 10:02 pm | अमित खोजे
वात पाहतोय पुढच्या भागाची
30 Sep 2013 - 1:13 am | किलमाऊस्की
या मालिकेतला पुढील भाग मोनार्क - २
1 Oct 2013 - 11:02 pm | धमाल मुलगा
The legend is back! :)