'दुहेरी फायदा' ही लघुकथा आवडल्या बद्दल धन्यवाद !!
-------------------------------------------------------------------------
पुरस्कार
पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या हॉटेलातून चहा आणि गरमागरम भजी आणली आणि चहा बरोबर तो भजी खाऊ लागला. भज्यांचा खमंग वास बायको मुलांच्या नाकात शिरला, तशी ती उठली.
बायको बघत राहिली. मुलांनी हात, तोंड न धुताच कागदातून भजी ओढून खायला सुरवात केली होती.
भजी संपली अन भिकूचं लक्ष कागदाच्या तुकड्याकडे गेलं. 'अरे हा तर आपलाच फोटो..' भिकूच्या तोंडून अभावितपणे बाहेर पडलं. फोटोत तो आपल्या बायको- मुलांबरोबर बसला होता. शेजारी फाटक्या गोधडया, चिंध्यांची गाठोडी ठेवलेली होती. साडीच्या चिंध्या पांघरलेल्या बायकोचा फाटका पदर डोक्यावर होता. मुलं माकडाप्रमाणे दात विचकत होती. भटक्या जिवनाचा तो वास्तव फोटो होता.
भिकूने तो फोटो सगळ्यांना दाखवला. फोटोखाली लिहिलं होतं, 'पुलाखालचं घर' . प्रथम पुरस्कार ५००० रु. अजय शर्मा- मुंबई.
आता त्याला आठवलं. काही दिवसापूर्वी एक फोटोग्राफर तिथे आला होता. त्या सगळ्यांना निट न्याहळून बघितल्यावर , त्यांचा फोटो काढण्याची ईच्छा त्याने प्रदर्शीत केली. मुलं तर एकदम खुश झाली. त्याने सांगितल्या तशा पोझेस त्यांनी दिल्या. जाण्यापूर्वी फोटोग्राफरने भिकूच्या हातावर ५० रु. ठेवले. त्या दिवशी सगले आनंदात होते. त्या दिवशी सगळ्यांनी भज्यांबरोबर जिलबीही खाल्ली.
भिकू आता विचार करु लागला, ५००० रु. म्हणजे किती वेळा ५० रु?
प्रतिक्रिया
19 Sep 2008 - 11:44 am | प्रभाकर पेठकर
मस्त आहे कथा. थेट काळजाला भिडली. अभिनंदन.
19 Sep 2008 - 2:15 pm | राघव
असेच म्हणतो. खुप सुंदर आशयघन कथा.
शुभेच्छा!
मुमुक्षु
19 Sep 2008 - 11:53 am | ऋचा
अगदी, पेठकर काकांशी सहमत!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
19 Sep 2008 - 12:11 pm | मदनबाण
कथा सुंदर आहे..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
19 Sep 2008 - 12:12 pm | स्वाती दिनेश
भिकू आता विचार करु लागला, ५००० रु. म्हणजे किती वेळा ५० रु?
पेठकर म्हणतात तसेच,कथा काळजाला भिडली.
स्वाती
19 Sep 2008 - 12:16 pm | अरुण मनोहर
कल्पना मस्तच.
19 Sep 2008 - 12:19 pm | निशा
छान आहे !
19 Sep 2008 - 12:22 pm | सखाराम_गटणे™
उत्तम
19 Sep 2008 - 12:38 pm | मिंटी
एकदम मस्त कथा....
पेठकर काकांशी सहमत :)
19 Sep 2008 - 12:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पेठकर काकांशी सहमत.
19 Sep 2008 - 12:56 pm | आनंदयात्री
कथा आवडली.
19 Sep 2008 - 12:57 pm | यशोधरा
सुरेख! पेठकरकाकांशी सहमत.
19 Sep 2008 - 1:24 pm | नंदन
दोन्ही लघुकथा आवडल्या.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Sep 2008 - 2:21 pm | अभिज्ञ
कथा फारच आवडली.
अजून येउ द्यात
अभिज्ञ.
19 Sep 2008 - 2:55 pm | मनिष
....दोन्हीही छान आहे. अशाच छान कथा अजून येऊ देत!
19 Sep 2008 - 3:06 pm | सुनील
लघु कथा आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Sep 2008 - 7:55 pm | धनंजय
मस्त शैली आहे.
पण नैतिक बोध पटला नाही. हा वादविवादात्मक मुद्दा पटवण्यासाठी अतिलघुकथेचा आवाका फार लहान आहे.
चित्रकाराने मॉडेलला नेमके किती शुल्क द्यावे - हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ लिओनार्दोने अमुक मॉडेलचे चित्र काढले आणि "स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन" आपल्याला "मोनालीसा" चित्रात दिसते. त्या मोनालीसा चित्राची किंमत करोडो रुपये आहे. मॉडेलला मोबदला मिळाला, त्याच्या कितीपट चित्राची किंमत आहे?
19 Sep 2008 - 8:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक "मॉडल"ला किती पैसे मिळावेत आणि एका भिकार्याला पैसे किती मिळावेत हे सर्वस्वी वेगळे प्रश्न आहेत असं मला वाटतं. मॉडल्सतर पैसे देऊन स्वतःची चित्र/छायाचित्र काढून घेत असतील, पण भिकार्याचं काय, ज्याला दोन वेळचं धड खाणंही परवडत नाही?
19 Sep 2008 - 8:44 pm | धनंजय
भिकूने अजयकडून भीक मागितल्याचा तपशील अतिलघुकथेत आलेला नाही.
अजयने "फोटो काढतो" म्हणून सांगितले आणि भिकूच्या कुटुंबाने संमतीच नव्हे पोझेसही दिल्यात.
समजा अजयला पारितोषिक मिळाले नसते - मग त्याने दिलेल्या ५०-५० रुपयांचा काय हिशोब लावावा? अजयला प्रत्येक वेळी पारितोषिक मिळतच असते, तर मग कदाचित त्याच्यापाशी ५०-५० रुपये देताना ५०००ची शाश्वती होती, त्याने निव्वळ नफा किती ठेवायला पाहिजे, कलात्मक फोटोचे मूल्य किती लावायला पाहिजे, वगैरे हिशोब करता येतील.
समजा - भिकू होताच भिकारी. आणि अजय व्यावसायिक छायाचित्रकार होता, आणि पुरस्कार नव्हे त्याला अमुक रुपये फोटो-विक्रीतून मिळणार अशी शाश्वती होती. व्यायसायिक छायाचित्रकाराने भिकार्यांचे फोटो काढण्याच्या वेळी कुठले निकष वापरावेत असे तुम्हाला वाटते? आपल्या पगाराचा/मिळकतीचा किती अंश त्याने भिकूला द्यावा - १०%, २०%, ५०%... वगैरे? यासाठी काय हिशोब वापरावा?
येथे माझा हा नैतिक आक्षेप नव्हे की असा हिशोब करू नये. अतिलघुकथेचा आवाका या मोठ्या प्रश्नासाठी फार लहान आहे, अशी साहित्यिक टिप्पणी आहे.
19 Sep 2008 - 10:09 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रकाराने गरीब भिकूला किती पैसे द्यावेत ह्याचा काही व्यावहारीक हिशोब मांडता येणार नाही.
त्या व्यावसायिक छायाचित्रकाराला 'फ्रेम' मध्ये पोटेन्शियल दिसले. म्हणून तो ५० रुपयांचा जुगार खेळला. तो हरला असता तरी त्यात काही गैर नव्हते. पण तो 'तो' जुगार जिंकला. त्याला पारितोषिक मिळाले. ५००० रुपये मिळाले. मानमरातब मिळाले असणार. व्यावसायिक बढती मिळाली असेल. त्यातून पुन्हा आर्थिक लाभही झाला असेल. त्या छायाचित्रकाराच्या जागी मी असतो तर त्या गरीब भिकूला गाठून पुन्हा हजार - दिड हजार नक्कीच दिले असते. कृतज्ञतेच्या भावनेतून.
असो. कथेचा आत्मा, म्हणजेच, भिकूचे प्रारब्ध मनाला स्पर्शून गेले. छायाचित्रकाराने त्याला लुटले, त्याच्या गरीबीचा गैरफायदा घेतला किंवा तो त्याला विसरला म्हणून नव्हे.
हा माझा व्यक्तिगत दृष्टीकोन आहे.
19 Sep 2008 - 11:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पेठकर काकांनी माझ्या भावनाच लिहिल्या की काय असं वाटलं. कुणाचं दारिद्र्य दाखवून स्वतः बरेचसे पैसे ठेवणं मला पटलं नसतं.
20 Sep 2008 - 8:33 am | चतुरंग
व्यवहारिक जगात सगळ्यांनाच तडजोडी कराव्या लागतात. थोडा फायद्याच्या बाजूला जो आहे त्याने यथाशक्ती जाण ठेवून कृतज्ञता ठेवावी हा विचार पटण्याजोगा आणि मुख्य म्हणजे अमलात आणण्याजोगा आहे.
चतुरंग
19 Sep 2008 - 8:05 pm | सर्वसाक्षी
अगदी मोजक्या शब्दात आणि सहजपणे लिहिलेली कथा
19 Sep 2008 - 8:20 pm | baba
आवडली.... अजुन येउ द्या.. असेच लिहित रहा...
19 Sep 2008 - 8:25 pm | प्राजु
कथा अतिशय सुंदर आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Sep 2008 - 8:29 pm | रेवती
शेजारी फाटक्या गोधडया, चिंध्यांची गाठोडी ठेवलेली होती. साडीच्या चिंध्या पांघरलेल्या बायकोचा फाटका पदर डोक्यावर होता.
शिवराज पाटील यांच्यावर या लघुकथेचा काही परिणाम होइल का?
रेवती
20 Sep 2008 - 9:06 am | अमोल केळकर
कथा आवडल्या बद्दल धन्यवाद !!
धनंजय साहेब, पेठकर साहेब, चतुरंग साहेब , आदिती मॅडम यांचा कथेकडे पहायचा दृष्टीकोन ही आवडला.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा