=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
...अशा तर्हेने आशियाचा (अतीउत्तरेकडचा सायबेरिया सोडता) बहुतेक सगळा भाग मानवाने पादाक्रांत केला.
पुढचा प्रवास सुरू करण्याअगोदर जरा दोन नैसर्गिक आश्चर्ये पाहून पुढे जाऊया.
वॉलेस रेखा
आल्फ्रेड रसेल वॉलेस या चार्ल्स डार्वीनच्या समकालीन शात्रज्ञाने एक फार आश्चर्यकारक सत्य नोंदवून ठेवले आहे. त्याने मलाय आणि इंडोनेशियन व्दीपसमुहामधे नकाश्यावर बोर्निओ आणि सेलेबेस बेटांच्या मधून जाणारी आणि बालीच्या पूर्वेकडे असणारी एक रेषा आखली, तिला वॉलेस रेखा असे म्हणतात.
या रेषेच्या जवळची बेटे जरी एकमेकापासून अगदी जवळ असली तरी... या रेषेच्या पश्चिमेस असलेल्या बेटांवर फक्त आशियन प्राणी आणि पूर्वेस असलेल्या बेटांवर फक्त ऑस्ट्रेलियन प्राणी आहेत. त्यांच्यात सरमिसळ झालेली नाही. हिमयुगाच्या अगदी कडाक्यातही हे दोन भूभाग पाण्याने विभागले होते त्यामुळे हे झाले असावे इथपर्यंत ठीक आहे. पण गमतीची गोष्ट अशी की काही थोडेसे अपवाद सोडता बहुतेक सगळ्या पक्षी जमातीही ही रेखा ओलांडून ओलांडून थोडेसे दूर असलेल्या रेषेपलीकडच्या बेटावर उडून जात नाहीत !
ही रेखा दाखवणारा इंटरअॅक्टिव्ह नकाशा येथे पहा.
=====================================================================
होमो फ्लोरेसिएन्सिस (Homo floresiensis) अथवा हॉबिट्स
इंडोनेशियाच्या फ्लोरेस नावाच्या बेटावर सन २००३ मध्ये सापडलेल्या काही मानवी अवशेषांनी शात्रज्ञांत मोठी खळबळ उडवली. या सांगाड्यांवरून असे दिसत होते की ती पूर्ण वाढीच्या मानव / मानवसदृश प्राण्याची हाडे होती... पण त्यांची उंची साधारण १.०६ मीटर म्हणजे साडेतीनफूटीच होती !
या भागात फार काळापासून बुटक्या जमातीचे तुरुतुरु धावणारे लोक बधितल्याच्या अनेक दंतकथा पसरलेल्या होत्या. त्यांच्यामुळे चर्चेला अगदी उधाण आले. पण येथे सापडलेल्या सांगाड्यांची वये ९४,००० ते १३,००० वर्षांमध्ये होती. त्यामुळे त्या मानवांना किंवा हॉबिट्सना प्रत्यक्ष धावताना बधितल्याच्या कथा केवळ मानवी कल्पनेचा आविष्कार होता हे नक्की झाले.
हे क्रॅनिओस्टेनॉसिस / मायक्रोसेफॅली (एका आजार, ज्याच्यात कवटीची हाडे सामान्य वेळेच्या अगोदर एकमेकाला कायम सांधली जातात आणि त्यामुळे कवटीचा आकार खूप लहान राहतो) या रोगाचे शिकार असलेले आधुनिक मानव होते असाही एक सिंद्धांत मांडला गेला. मात्र आता बहुतेक शास्त्रज्ञांचे असे एकमत झाले आहे की ते Homo floresiensis या स्पेसिजचे वेगळे मानव व आधुनिक मानवाचे चुलत भाऊ होते आणि साधारण १३,००० वर्षांपूर्वी नष्ट झाले.
नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी (वॉशिंग्टन, डी सी) मधील Homo floresiensis च्या अवशेषांच्या आधारे बनवलेला डोक्याचा पुतळा (आंतरजालाच्या सौजन्याने)...
=====================================================================
या थोड्याश्या गमतीदार अवांतरानंतर आपला प्रवास परत सुरू करूया.
४०,००० वर्षांपूर्वी मध्य आशियातील काही धाडसी मंडळी उरल पर्वताच्या उत्तरेकडे आर्क्टिक सर्कल ओलांडूनही अधिक उत्तरेला पोहोचली होती !
मात्र ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत मध्यउत्तर आशियात मानवाने बर्यापैकी बस्तान मांडले होते. हा मुख्यतः दक्षिण रशियातील अल्ताय (Altai) पर्वत आणि बैकल तळ्यापासून (Lake Baikal) ते पूर्वेकडच्या अल्दान (Aldan) नदीपर्यंतचा भाग त्या काळी जंगलाने भरलेला आणि प्राण्यांनी समृद्ध होता. त्याच्या मोहाने पूर्व युरोपातीलही काही टोळ्यांनीही या भागात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे सापडतात. पण त्यांचा प्रभाव खोलवर मध्य अथवा दक्षिण चीनपर्यंत पोहोचलेला दिसत नाही.
या काळात या मानवांचा नियांडरथाल आणि होमो इरेक्टस यांच्याशी संपर्क आला. जरी हे दोन मानव एकमेकाबच्या बाजूला हजारो वर्षे राहिले तरी त्यांचा संबद्ध फार जवळचा होता असे दिसत नाही. कारण आधुनिक मानवात नियांडरथालची फक्त १ ते ४ % जनुके आहेत.
साधारण ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत नियांडरथाल नष्ट झाले होते... ते का? याचे नक्की उत्तर अजून माहीत झाले नाही. पण जास्त सुधारलेल्या होमो सेपियन बरोबरच्या चढाओढीत ते हरले किंवा कोण्या रोगाच्या साथीचे बळी ठरले असे दोन मुख्य सिद्धांत आहेत. यातला पहिला सिद्धांत जास्त योग्य वाटतो... नियांडरथाल तुलनेने बुटके पण जाड्या बांध्याचे होते त्यामुळे त्यांना अधिक अन्नाची गरज असे. त्यांची हत्यारे तुलनेने खूपच बोथट आणि जुनाट प्रकारची होती त्यामुळे त्यांची शिकार करण्याची पद्धत धोकादायक आणि कुवत कमी होती. त्यामानाने आधुनिक मानव उंच आणि सडपातळ होते व त्यांची अन्नाची गरज तुलनेने कमी होती. त्यातच शारीरिक चपळपणामुळे, सुधारलेल्या मेंदूमुळे आणि सुधारलेल्या हत्यारांमुळे त्यांची शिकारीची क्षमता बरीच जास्त होती. अर्थात आधुनिक मानवापुढे नियंडरथालचा टिकाव लागला नाही.
आतापर्यंत जास्त अनुभवी झालेले आणि अन्नाच्या मुबलकतेने संख्या वाढलेल्या चुळबुळ्या मानवांना एका जागेवर फार काळ थांबता आले नाही. त्यातले काहीजण मॅमथ स्टेप्पे पासून वेगवेगळ्या दिशांनी दूर भटकायला लागले होते...
१. मध्य आशियाच्या पूर्वेकडच्या भागातले मानव हिमयुगाच्या थोडासा कमी होणार्या कडाक्याचा फायदा घेत पश्चिमेकडे निघाले आणि पूर्व युरोपात पोहोचले. त्यातले काहीजण थंडीला न जुमानता सरळ उत्तरेकडे निघाले आणि आता ज्याला आपण स्कँडिनेव्हिया म्हणतो त्याच्या अतीउत्तर टोकापर्यंत पोहोचले... हेच ते आर्क्टिक किंवा उत्तर धृवप्रदेशीय किंवा उत्तर टंड्रा भागात राहणार्या सामी अथवा लाप लोकांचे पूर्वज.
२. वरच्या लोकांच्या पूर्वेकडे असणारे मध्य आशियन पूर्वेकडे निघाले आणि बरीच मजल दरमजल करत सायबेरीयाच्या अतिपूर्व टोकाला पोहोचले.
३. व ४. चार महानद्यांच्या काठाने मध्य आशियात पोचलेले मानव आणि समुद्रकाठाने चीनमार्गे सायबेरियात पोहोचले मानव हे दोघेही उत्तरपूर्वेस जात जात वरच्या दुसर्या क्रमांकाच्या जथ्याच्या जवळपास सायबेरीयाच्या अतीपूर्व टोकावर पोहोचले.
=====================================================================
अमेरिकेत प्रवेश (२५,००० ते २२,००० वर्षांपूर्वी)
आजच्या घडीला सायबेरिया आणि अलास्का बेरिंग समुद्राने / खाडीने (Bering Strait) विभागले गेलेले आहेत. त्या काळात चालू असलेल्या शेवटच्या हिमयुगाच्या कडाक्याने (Last Glacial Maximum, LGM) समुद्राच्या पाण्याची उंची १०० मीटरपर्यंत खाली गेल्यामुळे तेथे उघड्या पडलेल्या जमिनीचा बेरिंगिया नावाचा १३ लाख चौरस किलोमीटर आकाराचा खंडप्राय भूभाग होता आणि त्याने सायबेरिया आणि अलास्काला जमिनीने जोडले होते.
सायबेरियाच्या पूर्व भागात अनेक ठिकाणाहून मानवी टोळ्या आल्या असल्या तरी तो भूभाग बराच मोठा असल्याने आणि प्रत्येक टोळीची पोचण्याची वेळ वेगळी असल्याने त्यांच्यात फार थोडीशीच सरमिसळ झाली. त्यामुळे अमेरिकेत अनेक विभिन्न जनुकीय (A, B, C, D आणि X ) आणि सांस्कृतिक वंशावळी स्वतंत्रपणे शिरल्या आणि विस्तार पावल्या. अमेरिका खंडाच्या प्रचंड आकारामुळेही या वंशावळींना एकमेकापासून दूर राहणे आणि स्वतंत्रपणे विस्तारणे शक्य झाले.
मानवाचा अमेरिकेत प्रवेश मुख्यतः दोन प्रकारे झाला...
एक जथा पूर्वीचा बीच कोंबींगचा अनुभव वापरत किनारपट्टीने जात प्रथम अलास्का आणि नंतर अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरून खाली जात राहिला. पाण्यातून होणारा हा प्रवास जास्त वेगाने झाला असे दिसते. एक विशेष म्हणजे हे होडकी वापरणारे बीच कोंबर ज्या जमातीतून पुढे आले त्यातले पूर्व इंडोनेशियात मागे राहिलेले मानवही दर्यावर्दी होते. त्यांनी १७,००० वर्षांपूर्वीपर्यंत दक्षिण आणि दक्षिणपूर्व प्रशांत महासागरातील बेटे (पॉलिनेशिया) काबीज केली होती.
दुसरा मार्ग पहिल्याच्या उत्तरेकडून आणि पूर्णपणे जमिनीवरून अथवा बर्फावरून प्रथम सरळ पश्चिमेकडे गेला आणि नंतर खाली वळून १९,००० ते १६,००० वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर पेन्सिल्वानिया आणि दक्षिण कॅरोलायना येथे पोहोचला.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
प्रतिक्रिया
13 Aug 2013 - 11:59 pm | कवितानागेश
मस्त.
या वॉलेस लाईनचा संबंध भूकंपप्रवण क्षेत्र/ रेखा याच्याशी असू शकेल का?
म्हणजे instinctively प्राण्याना कळले की या भागातली जमीन/ पाणी थरथरतंय... तिथे जायचं नाही... असं काही?
14 Aug 2013 - 12:18 am | डॉ सुहास म्हात्रे
ही रेषा युरेशियन सूंदा भूमीपृष्ठ आणि ऑस्ट्रेलियन साहूल भुमीपृष्ठ यांच्या संधीची रेषा आहे आणि तिच्या दोन बाजूचे भूभाग सतत पाण्याने विभागलेले राहिले आहेत, त्यामुळे प्राणीजीवन वेगळे आहे. मात्र काही पक्षी ही रेखा का ओलांदून जात नाही याचे कारण अजून माहित नाही. याचे भूकंप हे कारण नक्की नाही.
14 Aug 2013 - 12:40 am | कवितानागेश
ओक्के. धन्यवाद. :)
14 Aug 2013 - 12:02 am | अर्धवटराव
शेवटी एकदाचा माणुस हाम्रीकेत पोचला म्हणायचा. या माणसाचा "रेड इंडीयन" कसा झाला याची उत्सुकता आहे.
हा भाग थोडा लवकर संपल्यासारखा वाटला, पण क्वालीटीवाईज लेखमालेला अगदी साजेसा.
पु.भा.प्र.
अर्धवटराव
14 Aug 2013 - 12:02 am | राघवेंद्र
वॉलेस रेखा एकदम नवीन गोष्ट कळाली.
सहल छान चालु आहे.
पु. भा. प्र.
राघवेंद्र
14 Aug 2013 - 12:12 am | आदूबाळ
एक्कासाहेब, लेखमाला वाचतो आहे. दर वेळेस प्रतिसाद देत नाही, पण वाचतो आहेच.
पुभाप्र!
14 Aug 2013 - 4:48 am | स्पंदना
येस ! मी ही!
पण कधी कधी काहीच लिहावस वाटत नाही त्यामुले प्रतिसाद सुद्धा कमी होत जातात.
फार छान लिखाण आहे. तुम्ही प्रतिसादांची काळजे न करता लिहीत रहा. आम्ही जरा आळशी आहोत पण वाचतो आहोत.
14 Aug 2013 - 10:59 am | वसईचे किल्लेदार
हेच म्हणतो.
14 Aug 2013 - 12:25 am | डॉ सुहास म्हात्रे
अर्धवटराव, राघव८२ आणि आदूबाळ : सहलीतील सहभागाबद्दल धन्यवाद !
14 Aug 2013 - 9:20 am | वामन देशमुख
सहलीत आम्हीही सहभागी आहोत हं, इस्पीकराव एक्केकर; पण अतिमंद टंकणगती असल्यामुळे फारसे प्रतिसाद कुठे देत नाहीत. तुम्ही सहल अशीच चालवा, बस, विमाने, जहाजे गच्च्च भरलीयत...
14 Aug 2013 - 10:35 am | डॉ सुहास म्हात्रे
aparna akshay आणि वामनपंडित : अनेक धन्यवाद !
14 Aug 2013 - 10:48 am | जेपी
©*****
14 Aug 2013 - 10:59 am | सामान्य वाचक
मस्त सुरु आहे प्रवास
14 Aug 2013 - 11:24 am | मृत्युन्जय
मालिका मस्तच चालली आहे. प्रतिसाद पहिल्यांदाच देतो आहे. पण सगळे भाग वाचले. तुमचा अभ्यास एकदम जोरदार आहे आणि तुम्ही अतिशय ओघवत्या आणि सहज भाषेत वर्णन करता आहात. त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
14 Aug 2013 - 11:26 am | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय. हा भाग लहान झालाय पण खूप. वेळ घ्या हवं तर पण सविस्तर लिहा.
14 Aug 2013 - 2:24 pm | नानबा
एक्का साहेब, बरेच दिवस तुमची लेखमाला बघत होतो. पण तुमचं आधीचं लेखन वाचल्यामुळे शांतपणे आत उतरून वाचावं लागणार याची कल्पना होती. सो आज थोडा निवांत वेळ मिळाल्यावर सगळे भाग सविस्तरपणे वाचून काढलेत. अप्रतिम लेखमाला. जबरदस्त अभ्यास आणि संशोधन.
पुढील भाग वाचायला आवडतील हे सांगायला नकोच.
मनापासून शुभेच्छा.
14 Aug 2013 - 3:14 pm | पैसा
Homo floresiensis हॉबिट!! हे निअँडर्थल मानवाला जवळचे होते का? त्यांचंही वर्णन जवळपास येणारं दिसतंय.
14 Aug 2013 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
Homo या ग्रेट एप्सच्या प्रजातीमधून Australopithecus अनेक आदीमानव उत्क्रांत होत राहिले आणि सरतेशेवटी आधुनिक मानव उत्क्रांत झाला. Australopithecus प्रजातीत H. habilis, Homo ergaster, Homo erectus, Homo heidelbergensis, Homo neanderthalensis, इंडोनेशियाती फ्लोरेस बेटावर अवशेष सापडलेले Homo floresiensis and चीनच्या ग्वांगशी झुऑन प्रांतात रेड डियर आणि लाँगलीन गुहेत अवशेष सापडलेले Red Deer Cave people अशा अनेक स्पेसिज निर्माण झाल्या.
याचा अर्थ असा की Australopithecus पासून सर्व आदीमानवांचे व आधुनिक मानवाचे (Homo sapiens) पूर्वज उत्क्रांत झाले. म्हणून ह्या सगळ्या स्पेसिज एकमेकाचे चुलत (? मावस) नातेवाईक म्हणायला हरकत नाही.
***
Homo sapiens सोडून बाकी सगळ्या स्पेसिज एक एक करत नष्ट झाल्या आहेत आणि फक्त तीन स्पेसिज आधुनिक मानवाच्या कालखंडात जिवंत होत्या...
Homo neanderthalensis: साधारण २४,५०० वर्षांपुर्वीपर्यंत
Homo floresiensis: साधारण १३,००० वर्षांपूर्वीपर्यंत
Red Deer Cave people: साधारण ११,५०० वर्षांपूर्वीपर्यंत
***
Homo neanderthalensis पुरुषांची सरासरी उंची १६४ ते १६८ सेमी म्हणजे साधारण साडेपाच फूट आणि स्त्रियांची १५२ ते १५६ सेमी म्हणजे साधारण पाच फूट होती; ते शरिराने धिप्पाड होते, सरासरी वजन पुरुषाचे ७८ व स्त्रीचे ६६ किलो होते; आणि त्यांचा पुर्ण वाढ झालेला मेंदू आकाराने आधुनिक मानवापेक्षा मोठा. त्यांच्यातील काही जणांची कातडी उजळ वर्णाची आणि केस तांबडे असावे असा अनुकशास्त्रीय अंदाज आहे.
Homo floresiensis हे खूप खुजे म्हणाजे साधारण साडेतीन फुटी उंचीचे, गडद वर्णाचे आणि त्याच्या कवटीचा आणि मेंदूचा आकार आधुनीक मानवापेक्षा खूप छोटा (४२६ घन सेमी) आणि साधारण चिंपँझीएवढा होता.
14 Aug 2013 - 4:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
तथास्तु, सामान्य वाचक, मृत्युन्जय, वामनपंडित, वसईचे किल्लेदार, बिपिन कार्यकर्ते आणि प्रथम फडणीस : आपणा सर्वांना उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी अनेक धन्यवाद !
14 Aug 2013 - 5:36 pm | प्रसाद गोडबोले
वा !! मस्त चाललाय प्रवास ...मजा येते वाचायला !
इथे एक प्रश्न पडला ..
आधुनिक मानवाच्या त्वचेचे रंग कसे आणि कधी बदलत गेले ? म्हणजे सुरुवातीला सारेच काळे असणार ना ? मग आपल्यल्या सारखे गव्हाळ मग पिवळे मग ठार गोरे ...असे सॅग्रीगेस्गन कसे आनी कधी झाले ?
14 Aug 2013 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढच्याच भागात येत आहे.
14 Aug 2013 - 5:58 pm | अनन्न्या
सर्व भाग माहितीपूर्ण आहेत.
14 Aug 2013 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
15 Aug 2013 - 3:01 pm | तिमा
आंतरजालावर मिपा प्रगट झाले रे झाले की प्रथम तुमचा नवीन लेख आला आहे की नाही ते पहातो. वाचत आहे.
15 Aug 2013 - 3:07 pm | धन्या
तुम्ही जालावरचे दुवे दिलेच आहेत. परंतू या विषयावरील पुस्तकांची नावे सांगू शकाल का?
15 Aug 2013 - 5:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
तिमा आणि धन्या : धन्यवाद !
@धन्या: माझा कल जास्ती करून नवे पियर-रिव्हुड संशोधन वाचण्याकडे आहे. कारण पुस्तकात साधारणपणे एकाच बाजू (लेखकाला मान्य असलेली) जास्त जोरात सांगितलेली असते. पण त्याहून जास्त महत्वाचे कारण म्हणजे जनुकशात्राने दिलेले पुरावे हे फार जवळच्या काळातले आहेत आणि ते बरेच छापील पुरावे बाद करून टाकत आहेत / बदलत आहेत... त्यामुळे IT प्रमाणेच या अतिशय वेगाने पुढे जाणार्या शास्त्राचे ऑनलाईन लेखन जास्त विश्वासू आहे.
15 Aug 2013 - 5:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
ऑनलाईन लेखन जास्त विश्वासू आहे... अर्थात ते विश्वासू स्त्रोतांकडून केलेले असावे एवढी काळजी मात्र घ्यावी लागते.
17 Aug 2013 - 5:08 pm | अंतूशेठ
अप्रतिम! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
19 Aug 2013 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
24 Aug 2013 - 1:24 pm | नितिन१९८३
कडाक्याचा फायदा घेत पश्चिमेकडे निघाले आणि पूर्व युरोपात पोहोचल. हे चूक वाट्ते.
17 Nov 2013 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते संपूर्ण वाक्य खालीलप्रमाणे आहे...
मध्य आशियाच्या पूर्वेकडच्या भागातले मानव हिमयुगाच्या थोडासा कमी होणार्या कडाक्याचा फायदा घेत पश्चिमेकडे निघाले आणि पूर्व युरोपात पोहोचले.
जगाच्या नकाशात पाहिले तर पूर्व युरोप मध्य आशियाच्या पश्चिमेकडे असल्याचेच दिसेल.