पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०२ : पूर्वतयारी - हवामान

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
11 Jul 2013 - 2:32 pm

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

...मग काय, वाट कसली बघताय? करा सुरू प्रवासाची तयारी ! काय समजलात? हा चांगला दोन लाख वर्षांच्या मुदतीचा"पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" आहे, राजे !

आता जायचे नक्की झाल्यावर प्रवासाची पूर्वतयारी करणे आलेच. असल्या मोठ्या प्रवासासाठी खूप तयारी करायला लागते हे काय सांगायला नको. पण या खास सहलीची बरीचशी व्यवस्था मी तुमच्यासाठी अगोदरच केली आहे, तेव्हा निश्चिंत रहा. तरीसुद्धा सहलीची मजा पूर्णपणे उपभोगायला आपल्याला महत्त्वाच्या दोन गोष्टी नीट समजावून घेणे जरूरीचे आहे. त्या म्हणजे फिरायच्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज आणि आपल्याला योग्य वाटेवरून नेणारे मार्गदर्शक. तेव्हा त्यांची थोडी माहिती घेऊ या.

हवामान

सत्तर लाख वर्षांपूर्वी उत्तरपूर्व आफ्रिकेत प्रायमेट्समधली वेगळी झालेली एक शाखा काही जगावेगळे करेल अशी खास लक्षणे तिच्यात सुरुवातीला तरी दिसत नव्हती. हे प्राणी इतर प्रायमेट्स सारखेच त्यांच्या आयुष्याचा बहुतेक सर्व काळ उष्णप्रदेशिय वर्षारण्यांमधे झाडांवरच काढत होते. त्या काळी जंगलांत फिरत असणार्‍या श्वापदांच्या मानाने हे प्राणी अगदीच कमकुवत होते. त्यांच्याकडे अजस्त्र शरीर, टोकदार नखे अथवा तीक्ष्ण दात नव्हते. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी झाडांच्या पर्णभारात लपून राहून आणि जरूर तेव्हा झाडांच्या फांद्यांवर इकडून तिकडे पळण्याच्या आपल्या चापल्ल्याच्या जोरावर त्या प्राण्यांनी पुढची जवळ जवळ ३५ लाख वर्षे काढली. या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते. या काळात या शाखेत अनेक प्रजाती उत्पन्न झाल्या. आजूबाजूचा सतत (अर्थातच पृथ्वीवरील उत्क्रांतीच्या भाषेत सतत याचा अर्थ काही हजार अथवा काही लाख वर्षांच्या मुदतीत असा आहे) बदलणार्‍या वातावरणाचा आणि इतर परिस्थितीचा परिणाम होऊन त्यातल्या अनेक नामशेष झाल्या तर काही थोड्याच कश्याबश्या तग धरून जिवंत राहिल्या आणि परिस्थिती सोईस्कर बनताच परत जोमाने वाढू लागल्या.

ही बदलणारी परिस्थिती म्हणजे फक्त आजूबाजूचे हवामान आणि प्राणी एवढीच नव्हती. कारण अशी परिस्थिती फक्त एका प्राण्याच्या अथवा प्राणी समुदायाच्या जीवनावर प्रभाव पाडू शकेल. सर्व जमातीवर दीर्घकालीन प्रभाव पाडण्यास आजूबाजूची परिस्थिती सर्व जीवन एकतर उद्ध्वस्त किंवा सबळ होईल इतक्या प्रचंड प्रमाणात बदलली पाहिजे. असे दीर्घ परिणाम करण्याची ताकद मुख्यतः पृथ्वीवर काही ठरावीक कालखंडांनी येणार्‍या हिमयुगांत होती. हिमयुगांमुळे पृथ्वीवरच्या हवामानात झालेल्या दीर्घ आणि प्रचंड उलथापालथींनी दर काही लाख वर्षांनी पृथ्वीवरील प्राण्यांनी राहण्यास आणि वंशवृद्धी करण्यास योग्य अश्या जागा सतत बदलत राहिल्या.

गेल्या साठ कोटी वर्षांपासून, साधारणपणे दर वीस कोटी वर्षांनी, काही लक्ष / दशलक्ष वर्षांच्या कालावधीचे हिमयुग अवतरत होते आणि वनस्पती व प्राणी जीवनाची वाताहात करत होते. गेल्या २० लाख वर्षांत त्यांच्या वारंवारतेचे प्रमाण बरेच वाढले आहे आणि या कालावधीत ध्रुवीय बर्फाचे प्रमाण २० वेळा लक्षणीय प्रमाणात कमीजास्त झाले आहे. हिमयुगांमुळे अतिथंड होणारा पृथ्वीचा बराच मोठा भूभाग प्राण्यांच्या वस्तीला अयोग्य तर होत होताच पण ध्रुवीय प्रदेशांत समुद्रातले बरेचसे पाणी गोठून बर्फाच्या स्वरूपात अडकून पडल्याने समुद्रातील पाण्याची पातळी अगदी १००-१३० मीटरपर्यंत खाली जात होती आणि हिमयुग संपून परत वातावरण उष्ण झाले की तेवढीच वर येत होती. पाण्याची पातळी खाली गेली की उघड्या पडलेल्या समुद्रतळाने अनेक भूभाग एकमेकाला जोडले जात होते आणि त्यांना पायी अथवा कामचलाऊ होड्या वापरून पादाक्रांत करणे शक्य होत होते. तर पाण्याची पातळी वर गेली की दोन भूभागांत शे-दोनशे किलोमीटर अथवा जास्त दुरावा निर्माण होऊन त्यांचा लाखो वर्षे एकमेकापासून संबद्ध तुटत होता. हजारो-लाखो वर्षांमध्ये या वेगळ्या झालेल्या दोन भूभागांतील जीवांत संपूर्णपणे वेगळी जनुकीय सामग्री उत्क्रांत होत होती आणि त्यामुळे तेथील भूभाग, वातावरण व इतर परिस्थितीत तगून राहणार्‍याची पात्रता असणारे जीव शिल्लक राहत होते... ते न जमणारे नष्ट होत होते.

याशिवाय हिमयुगाने धृवप्रदेशांत गोठवून ठेवलेल्या पाण्याने तेथील भूमी बर्फाळ-निर्जन-निष्प्राण बनत होती. तर त्या बर्फरूपात अडकलेल्या पाण्यामुळे इतर ठिकाणी होणार्‍या पाण्याच्या आणि पर्यायाने पावसाच्या कमतरनेने तेथील विशाल वर्षारण्ये नष्ट होऊन तेथे भयानक वाळवंटे बनत होती. याच कारणाने ज्या उत्तर आफ्रिकेत एके काळी घनदाट उष्णप्रदेशीय जंगल होते आणि जिराफासारखे मोठे मोठे शाकाहारी प्राणी होते तेथे आज जगातले सर्वात मोठे रखरखीत सहारा वाळवंट आहे. तसेच आजच्या थंड प्रदेशीय ब्रिटिश बेटांवरही एका कालखंडात घनदाट उष्णप्रदेशीय जंगल होते व सद्या आफ्रिकेत असलेले प्राणी राहत होते तर दुसर्‍या एका कालखंडात बारा महिने बर्फाळ भूभाग आणि आता फक्त ध्रुवीय प्रदेशात दिसणारे रेनडियर, ध्रुवीय अस्वले यांच्यासारखे प्राणी राहत होते!

पृथ्वीच्या वातावरणावर आणि पर्यायाने जीवांवर प्रचंड परिणाम करणार्‍या दुसर्‍या महत्त्वाच्या घटना म्हणजे पृथ्वीच्या पोटातील आग बाहेरच्या वातावरणात ओकणारे ज्वालामुखींचे महाप्रचंड उद्रेक. हा प्रकार काही कोटी वर्षांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर होत असे. अश्या उद्रेकामुळे वातावरणात उडालेल्या धूर आणि राखेने सूर्यकिरण शेकडो-हजारो वर्षांपर्यंत रोखून ठेवल्यामुळे हिमयुगाची सुरुवात झाली किंवा चालू असलेल्या हिमयुगाच्या कालखंडात आणि प्रखरतेत भर पडली असे अनेकदा झालेले आहे. सद्या तुलनेने थंड झालेल्या पृथ्वीवर असे प्रकार जरी कमी प्रमाणात होत असले तरी आईसलँड मधील Eyjafjallajökull ज्वालामुखीच्या सन २०१० मध्ये झालेल्या उद्रेकाने हवेत पसरलेल्या राखेने संपूर्ण युरोपभरची विमानसेवा जवळ जवळ दहा दिवस ठप्प केली होती, हे आठवत असेलच. पृथ्वीवर याच्या अनेकपटींनी जास्त हाहा:कार माजवू शकणारी सुप्त ज्वालामुखींची स्थाने अजूनही अस्तित्वात आहेत. पण दु:खात सुख इतकेच की असा उद्रेक काही हजार ते काही लाख वर्षांतून एकदाच होण्याची शक्यता आहे. पण तो जर झाला तर पृथ्वीवरचे जीवन उद्ध्वस्त करण्याची अथवा नाहीसे करण्याची त्याची क्षमता असू शकते !

अशा या बदलणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यास प्रत्येक वनस्पतीला अथवा प्राण्याला कितपत जमते यावर ती जमात शिल्लक राहणार की नामशेष होणार हे ठरत होते. हवामानाच्या बदलांमध्ये टिकून राहण्यासाठी बहुतांश प्राण्यांना भूभागावरचे सहाय्यक हवामान जसजसे सरकत दुसरीकडे जाई तसतसे तिकडे स्थलांतरित होण्याशिवाय किंवा ते जमले नाही तर नष्ट होण्यापलीकडे काही उपाय नव्हता. बिचार्‍या वनस्पतींना तर स्थलांतराचा पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांतल्या नवीन वातावरणाला तोंड देण्याची क्षमता असणार्‍या कणखर वनस्पती शिल्लक राहत व इतर नष्ट होत होत्या.

जीवांच्या या होणार्‍या फरपटीचे मुख्य कारण म्हणजे हवामानाचा आणि इतर प्रतिकूल परिस्थितीचा प्रतिकार करणारी साधने स्वकृतीने बनवण्याएवढी पात्रता कोणत्याही जीवात वीस लाख वर्षांपूर्वीपर्यंत आलेली नव्हती. अशी पात्रता जेव्हा अगदी थोड्याफार प्रमाणात ज्याच्यात येऊ लागली तो Homo ergaster हा प्राणी १५ लाख वर्षांपूर्वी झाडांवरून खाली उतरून जमिनीवर इतर प्राण्यांशी स्पर्धा करत, त्यांना तोंड देत, आत्मविश्वासाने आपल्या दोन पायावर चालू लागला आणि नंतर आफ्रिका खंड सोडून पुढच्या काही लाख वर्षांत हळू हळू Homo erectus या नावाने आशियाभर पसरला. तशीच अजून एक Homo heidelbergensis या नावाचा प्राणी ५ लाख वर्षापूर्वीपर्यंत आफ्रिकेतून बाहेर पडून युरोपात पसरला आणि त्याच्यातूनच Homo neanderthalensis विकसीत झाला. Homo erectus ने आशियात जवळजवळ १० लाख वर्षे तर Homo heidelbergensis व Homo neanderthalensis या दोघांनी मिळून युरोपमध्ये जवळजवळ ५ लाख वर्षे निरंकुश सत्ता गाजवली.

हे सगळे होत असताना Homo प्रजातीतील एक शाखा आफ्रिकेतच विकसित होत होती. या प्राण्याचा विकास आणि पृथ्वीचे वातावरण व इतर परिस्थितीतील बदलांचे या प्राण्यावर झालेले परिणाम, तसेच त्याने केलेल्या उलाढाली व प्रवास; या सगळ्यात आपण पुढच्या काही भागांत खूप बारकाव्यांसकट सामील होणार आहोत.

पण त्याआधी आपण आपल्या प्रवासाच्या प्रमुख मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. ज्यांच्या भरवशावर प्रवास करायचा त्या वाटाड्यांच्या कर्तबगारीची आणि कामाच्या पद्धतीची माहिती मिळाल्याशिवाय आणि त्यांनी दिलेल्या माहितीची विश्वासार्हता पटल्याशिवाय आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे आणि पुरेपूर अनुभवता येणार नाही.

(क्रमशः )

=====================================================================

महत्त्वाचे दुवे

१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

प्रतिक्रिया

बापरे लाखात वर्षे म्हणजे किती मोठा कालावधी झाला ?

१९०० ते २००० या १०० वर्षातच केवढे बदल झाले ,,, मग हि लाखो वर्ष कशी काय पडली असतील

जाम रोचक सफर आहे .

कवितानागेश's picture

11 Jul 2013 - 3:25 pm | कवितानागेश

वाचतेय...
लव्कर लवकर लिहा. :)

प्रवासातली रंजकता आणि आव्हाने वाढतच आहेत. क्लिष्ट विषय मनोवेधक होत चालला आहे.

भाते's picture

11 Jul 2013 - 3:46 pm | भाते

सुरुवात तर छान झाली आहे. सोप्या आणि ओघवत्या भाषेत असल्यामुळे पुढचे वाचायची उत्सुकता वाढली आहे.

सध्या आपल्या प्रुथ्वीचे वय काय आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 3:22 am | डॉ सुहास म्हात्रे

पृथ्वीचे वय आहे ४.५४ बिलियन म्हणजे ४५४ कोटी वर्षे फक्त ;) आपल्या विश्वाचे वय १३.७७ बिलियन वर्षे आहे. म्हणजे पृथ्वी अजून तरुणच आहे !

तिमा's picture

14 Jul 2013 - 11:12 am | तिमा

पृथ्वी अजून तरुणच आहे !

म्हणूनच तिच्यावर एवढे बलात्कार होतायत.

अग्निकोल्हा's picture

11 Jul 2013 - 5:53 pm | अग्निकोल्हा

या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते.

हम्म :)

अवांतर :- माकडेही झाले 'मोबाईल सॅव्ही'

इतिहासापूर्वीचा इतिहास बेष्टच! आता येऊद्या ५०००० वर्षांपूर्वीची ग्रेट स्प्रेड फ्रॉम आफ्रिकावाली ष्टुरी लौकरात लौकर :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

जरा धीर धरा. प्रवास ५०,००० वर्षांच्या खूप अगोदर सुरु होतोय... त्या सगळ्या मजा भरपूर अनुभवायच्या आहेत आपल्याला. तुमच्याच शब्दात सांगायचे झाले तर... सबकुछ जरूर आंदेंगे, एक के बाद एक ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पा, लीमाउजेट, राही, भाते, आभि जित आणि सिवाजी-द-बॉस : आपल्या सर्वांना प्रतिसादाबाद्दल धन्यवाद !

रेवती's picture

11 Jul 2013 - 8:41 pm | रेवती

खूपच माहितीपूर्ण! पुढील लेखनाची वाट पाहते.

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Jul 2013 - 9:15 pm | लॉरी टांगटूंगकर

पण माझा गणेशा झालाय. एक पण चित्र नाय दिस्ला

प्रचेतस's picture

11 Jul 2013 - 9:26 pm | प्रचेतस

जबरदस्त.

35 लाख ते 70 लाख वर्षांपूर्वी जगाचा नकाशा नेमका कसा होता? खंड अलग झालेले होते का, का काही एकमेकांना जोडलेलेच होते?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 9:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

६५ कोटी वर्षांपूर्वीपासून आजपर्यंत पृथ्वीच्या भूभागात झालेले फरक येथे पहा.

आणि गेल्या साडेबावीस कोटी वर्षांपासून होत असलेले बदल खालील (जालावरून साभार घेतलेल्या) चित्रात आहेत...

प्रचेतस's picture

11 Jul 2013 - 10:02 pm | प्रचेतस

नकाशा आणि इतर माहितीबद्दल धन्यवाद.
पुढील प्रवासाबद्दल भारीच उत्सुकता आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

पृथ्वीचे भूभाग पुढच्या २५ कोटी वर्षांच्या कालावधीत कसे बदल जातील हे येथे बघू शकाल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरची लिंक नादुरुस्त झालेली दिसते... ती चित्रे (जालावरून साभार) अशी आहेत...

.

.

.

शिल्पा ब's picture

11 Jul 2013 - 11:26 pm | शिल्पा ब

थोडक्यात लाखों / करोडो वर्षांनी फिरुन सगळा भुभाग परत एकत्र येणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 3:04 am | डॉ सुहास म्हात्रे

"इतिहासाची पुनरावृत्ती होते" ही म्हण येथेही खरी होणार असेच दिसतेय ;)

कपिलमुनी's picture

12 Jul 2013 - 1:29 pm | कपिलमुनी

दक्षिण द्वीपकल्प अस्तित्व टिकवून रहाणार असा दिसतय !
( तेव्हा हा आपला भारत असेलच असे नाही..)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

रेवती आणि मन्द्या : प्रतिसादासाठी धन्यवाद !

@ मन्द्या : या भागात चित्रे नाहीत. पण पुढच्या भागांत त्यांची कसर भरून निघेल.

राजेश घासकडवी's picture

11 Jul 2013 - 10:15 pm | राजेश घासकडवी

रंजक शैलीत महत्त्वाच्या विषयावर दिलेली माहिती आवडली.

प्यारे१'s picture

11 Jul 2013 - 10:38 pm | प्यारे१

वाचतोय.

शिल्पा ब's picture

11 Jul 2013 - 11:36 pm | शिल्पा ब

<<< या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते.

याला नक्की काय पुरावा आहे? कारण डिस्कव्हरी / नॅशनल जिऑग्राफिक चॅनल वर याच्या विरुद्ध दाखवतात अन हे कार्यक्रम त्या त्या शाखांतील शास्त्रज्ञांनी केले असल्याने जास्त विश्वसनीय आहेत. हल्लीच एप्स झाडांच्या फांद्या तोडुन त्याचं एक टोक चावुन भाल्यासारखं टोकदार करुन छोट्या प्राण्यांची शिकार करुन खातात अशी एक डॉक्युमेंटरी पाहीली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 2:58 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

सर्वात प्रथम म्हणजे मी दिलेल्या माहितीत माझे स्वतःचे संशोधन काडीइतकेही नसून त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवर संशोधकाचे प्रसिद्ध झालेले ज्ञान आहे... मी मानववंशशास्त्राचा केवळ एक हौशी विद्यार्थी आणि मान्यवरांचे ज्ञान येथे आणणारा भारवाही हमाल आहे :)

या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते.

हे तुम्ही उदधृत केलेले वाक्य सुरुवातीच्या काळातल्या (७० लाख ते ३५ लाख वर्षांपुर्वींच्या) आदिमानवांबद्दल लिहीलेले आहे. आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यांप्रमाणे २० लाख वर्षांपूर्वी Homo habilis ने प्रथम मांस खाण्यास सुरुवात केली पण तो स्वतः शिकार करत नव्हता... स्कॅव्हेंजर होता हा उल्लेख पहिल्या भागात आला आहेच.

प्राचीन प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या सापडलेल्या दातांच्या रचनेवरून व दातांना चिकटलेल्या अन्नकणांच्या पृथक्करणातून खात्रीने ठरवल्या जातात (ह्या पद्धतीची तोंडओळख पुढच्या तिसर्‍या भागात येत आहे). त्याशिवाय जबड्याच्या रचनेवरून आणि जबड्यांच्या स्नायूंच्यामूळे जबड्यांच्या हाडांवर झाल्या असलेल्या खुणांवरूनही प्राण्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल अंदाज बांधला जातो.

हल्लीच एप्स झाडांच्या फांद्या तोडुन त्याचं एक टोक चावुन भाल्यासारखं टोकदार करुन छोट्या प्राण्यांची शिकार करुन खातात अशी एक डॉक्युमेंटरी पाहीली.

१. साधने बनवणे हे केवळ मानवाचे राखीव कौशल्य नाही तर ज्यांना ग्रेट एप्स असे संबोधले जाते ते गोरिला आणि विशेषतः चिंपांझी प्राथमिक प्रकारची साधने बनवतात. पण ते अजून तरी या प्राथमीक अवस्थेतच अडकलेले आहेत. या विषयावर बरेच संशोधन चालू आहे. काही इतर प्राणी आणि पक्षांमध्येही काड्या वापरून कीटकांना झाडाच्या सालीतून अथवा त्यांच्या वारूळातून बाहेर काढून गट्टम करण्याची कृती दिसून येते. कच्चा माल वापरून अधिकाधीक सुधारलेली साधने बनवणे आणि ती प्रथा पुर्वांपार चालवत अत्यंत प्रगत अवस्थेला नेणे हे आतापर्यंत फक्त आधुनीक मानवालाच (Homo sapiens sapiens) जमले आहे.

२. आजची काही माकडे मांस खातात म्हणून सरसकट सर्वच आदिमानव मांस खात असणार असे निदान काढता येत नाही. मानवाच्या जवळपास येणार्‍या ग्रेट एप्सपैकी गोरिला किटक खाणे सोडले तर शाकाहारी आहे; तर चिंपांझी बराचसा शाकाहारी आणि थोडासा मांसाहारी आहे.

अवांतरः माणसाच्या मांसाहारी बनण्याबद्दलची एक थियरी अशी आहे: आदिमानव झाडावरून खाली उतरला ते दलदलीत वाढणार्‍या वनस्पतीचे रसदार कोवळे कोंब आणि देठ खाण्यासाठी. दलदलीत वावरण्यासाठी त्याला दोन पायावर उभे राहणे भाग पडले. वनस्पतींबरोबर दलदलीतल्या पाण्यात सापडणारे मासे त्याचे खाद्य झाले. हा काळ माणसाच्या मेंदूची झपाट्याने वाढ होण्याचा होता... या वाढीत जनुकीय बदलाचा किती भाग होता आणि सामिष खाद्याचा त्याला किती हातभार लागला याबद्दल दुमत आहे... मात्र या दोन्ही गोष्टींचा माणसाच्या उत्क्रांतीला फार मोठा हातभार लागला हे नक्की.

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 3:31 am | धमाल मुलगा

बढिया चालली आहे मालिका.

साधने वापरण्यावरुन एकदमच आठवलं, असं ऐकलंय की अस्वलं देखील काड्या वापरुन झाडाच्या ढोलीतले वगैरे किटक खातात. तसेच फांदी वापरुन उंचावरचं पोळं पाडण्याचा प्रयत्न करतात. साधनं वापरण्याची ही प्राथमिक पायरी असावी. आणि अस्वलं अजूनतरी त्यापलिकडं गेलेली नसावीत त्यामुळं उत्क्रांतीच्या प्राथमिक पायरीवरच त्यांची वाढ खुंटली आहे असं म्हणावं का?
(उत्क्रांतीवरुन आठवलं, किटकनाशकांशी सामना करण्याची झुरळांची शक्ती सर्वात जास्त असते असं म्हणतात. एखाद्या किटकनाशकाच्या काही काळच्या वापरानंतर झुरळांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये त्या किटकनाशकाशी लढण्याची जनुकिय उत्क्रांती की कायसं होते म्हणे.)

२. मनुष्याच्या मांसाहारी (मिश्राहारी) असण्याबद्दल असा युक्तीवाद नेहमी ऐकला जातो की जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्या दातांची रचना सुळेविरहीत असते अन मनुष्याला मांसाहारी प्राण्यांप्रमाणे दातांची रचना लाभली आहे. त्याबद्दलही अधिक काही माहिती असेल तर लिहा की. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

माणसाच्या मिश्राहारी असण्याबद्दल हे माझे मत आहे:

माणूस मुळात शाकाहारी प्राण्यापासून उत्क्रांत झाला आहे. तो नैसर्गीक मांसाहारी नसून ती त्याची उपार्जीत आवड (acquired taste) आहे. त्यामुळे माणसाकडे नैसर्गीक / उपजत शिकार करण्याचे अवयव म्हणजे तीक्ष्ण नखे, सुळेदार दात, प्राण्यांचे कच्च्या मांसाचे कातडीसकट लचके तोडून चावायची ताकद असणारा जबडा, इत्यादीपैकी एकही गोष्ट नाही.

पण या सर्व गोष्टींवर माणसाच्या मेंदूच्या ताकदीने मात केली... मेंदूचा उपयोग करून माणसाने प्राणी पकडण्यासाठी / त्यांची शिकार करण्यासाठी / त्यांचे मांस खाण्याजोगे बनवण्यासाठी साधने / हत्यारे बनवली आणि मांस (व इतर अन्न) शिजवण्यासाठी अग्निवर सुरक्षित ताबा (controlled fire) मिळवला... आणि उरलेला इतिहास आपण सर्व जाणतोच !

अस्वलांचं बरं चाललंय की, मुंग्या आहेत, काड्या आहेत.
उत्क्रांती मध्ये समजा अस्वलांची बदल झालेली स्पिशीज तयार झाली, तर आहे ती अस्वलांची स्पिशीज नष्ट होण्याचं काहीच कारण नाही (सध्या तरी),
आणि उत्क्रांती मधले बदल हे चालूच असतात, मानवी टाईमलाईन वर ते लक्षात येणं अवघड आहे.

अर्धवटराव's picture

12 Jul 2013 - 1:22 am | अर्धवटराव

एक्कासाहेब... तुम्ही आमच्या शैक्षणीक जीवनाच्या कालखंडात एखाद्या शिक्षकाच्या रुपाने का हो नाहि आलात... ज्ञानदानाची प्रक्रिया इतकी सहज, आनंददायी, जिज्ञासावर्धक असती तर एव्हाना जींदगीचं सार्थक झालं असतं.

अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 3:01 am | डॉ सुहास म्हात्रे

राजेश घासकडवी, प्यारे १ आणि अर्धवटराव: आपल्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

पैसा's picture

12 Jul 2013 - 8:59 am | पैसा

लेख तर नेहमीप्रमाणे अप्रतिम आहेच, प्रतिक्रियांमधूनही खूप छान माहिती मिळत आहे. पेकिंग मानव, हैडेलबर्ग मानव आणि निअँडर्थल मानव यांच्याबद्दल आणखी बरंच काही वाचायची उत्सुकता आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही लिहिलेल्या महत्वाच्या गोष्टींचे संदर्भ पुढे जरुर येतील.

किलमाऊस्की's picture

12 Jul 2013 - 9:51 am | किलमाऊस्की

मघाशी वरवर वाचलेला. आता घरी येउन नीट वाचला. चांगली माहीती आहे. किचकट माहीती सोप्प्या भाषेत मांडणं दिसत तेवढं सोप्पं नाही आणि या विषयावर अफाट माहीती उपलब्ध असतांना योग्य ती माहीती गोळा करणं, तिचं पृथःकरण करुन रोचक पद्धतीने मांडणं यासाठी कोपरापासून ____/\____ !!!

या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते.

ही परीस्थीती काय होती याबद्द्ल अजून जाणून घ्यायला आवडेल. (मी शाकाहारी असल्याने अनेकदा 'घासफूस खाणारी' म्हणून चिडवणार्‍यांच्या तोंडावर थोडी माहीती फेकावी असा विचार करतेय. :-P )

अवांतर : बाकी लेखात चित्रं टाकलेली नाहियेत की मला दिसत नाहीयेत?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरुवातीच्या काळात (७० लाख ते २० लाख वर्षांपूवीपर्यंत) आदिमानवाचा बहुतेक सर्व काल झाडावरच व्यतीत होत असे. ही झाडे वर्षारण्यातील असल्याने भरपूर फळे आणि कोवळा पाला सहजपणे मिळत असे. त्यामुळे खाली उतरून जमिनीवरच्या हिंस्त्र प्राण्यांचा धोका पत्करून अन्नाकरता प्राण्यांची शिकार करण्याची त्याला गरज नव्हती. शिवाय त्या काळापर्यंत आदिमानवांची शरीररचना दोन पायांवर उभे राहून जमिनीवर धावण्यास योग्य झाली नव्हती. त्याची सुरूवात साधारण २०-२५ लाख वर्षांपूर्वी सुरू झाली आणि त्याचा फायदा प्रथम Homo ergaster, Homo heidelbergensis आणि Homo neanderthalensis आणि नंतर सर्वात सुधारीत शरीररचना असलेला Homo sapiens यांना शिकार करण्यास व भटकून पृथ्वीवर पसरण्यास झाला. अर्थात त्याच बरोबर होणार्‍या मेंदूच्या वेगवान वाढीचा आणी त्यामुळे माणसात आलेल्या अनेक विलक्षण पात्रतांचाही (उदा. साधने अथवा टूल्स बनवणे, भाषा, इत्यादी) त्या सगळ्या घटनांत सिंहाचा वाटा होता.

किलमाऊस्की's picture

12 Jul 2013 - 10:30 pm | किलमाऊस्की

ते हवामान मथळ्याखाली लिहिल्यामुळे मला हवामानाशी निगडीत काहीतरी असेल असं वाटलं होतं.

बाकी स्पष्टीकरणंही उत्तम लिहीताय आणि जास्त वेळ न दवडता त्यामुळे मजा येतेय. बाकी चर्चाही उत्तम चाललीय.

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे सर्व नक्कीच हवामानाशी निगडीत होते... जर मानवाची उत्पत्ती उष्णप्रदेशिय वर्षारण्याऐवजी वेगळ्या हवामानात झाली असती तर त्या वेगळ्या परिस्थितीत तगून राहणाची पात्रता देणारे वेगळे गुणधर्म (यात खाण्याच्या सवयी सामील आहेत) असलेला जीव तगला / उत्क्रांत झाला असता !

किलमाऊस्की's picture

13 Jul 2013 - 2:20 am | किलमाऊस्की

समजलं

चेतन माने's picture

12 Jul 2013 - 11:40 am | चेतन माने

किचकट माहिती खूप रंजक आणि वाचनीय झाली आहे … धन्यवाद
पुभाप्र :):):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 1:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद ! सफरीतला सहभाग असाच पुढेही चालू ठेवा.

आतिवास's picture

12 Jul 2013 - 12:27 pm | आतिवास

लेख आवडला.
पण 'हवामान' हे शीर्षक मात्र थोडं फसवं वाटलं.

म्हणजे पृथ्वीचं सरसकट हवामान असं आपण बोलतो - पण आजचा आपला अनुभव पाहता पृथ्वीवर एकाच वेळी 'अनेक' हवामान प्रकार नांदत असतात आणि ते एकमेकांवर परिणामही घडवत असतात. त्यातले सूक्ष्म फरक आता आपल्याला कळणं शक्य आहे का? म्हणजे त्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे का?

माणूस या सगळ्याला तोंड देऊ शकला की या सगळ्यातून माणसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती झाली - याबद्दलही अधिक जाणून घ्यायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे लिखाण जड शास्त्रिय लेखन न करता मनोरंजक वाटावे म्हणून थोडेसे प्रवासवर्णाच्या कलाने लिहीतो आहे... हे थोडेसे लिटररी लायसेंस समजा ;) .........अर्थात हे सर्व शास्त्रिय तथ्यांना अजिबात धक्का न लावता करत आहे.

प्रवासाला जाताना तो सुखकर व्हावा म्हणून आपण गंतव्य जागेच्या हवामानाची खात्री करून घेतो. मात्र यासारख्या लेखात दर ठिकाणाच्या वातावरणाबद्दलचे बरेच खोलवर लिखाण बहुसंख्य वाचकांना निरस वाटेल असे वाटते. यामुळे वातावरणातील बदलांच्या ताकदीची एक सर्वसाधारण कल्पना या भागात दिली आहे. त्यामुळे पुढच्या भागांतल्या सफरीच्या वर्णनातले हवामानाचे उल्लेख समजायला सोपे होईल असे वाटते.

आपल्या इतर सहलींप्रमाणेच मानवाच्या महाप्रवासावरही हवामानाच्या अनुकुलता/प्रतिकूलता यांनी सतत प्रभाव गाजवलेला आहे... काही वेळेला मानवाने त्याचा फायदा करून घेतला तर बर्‍याचदा हवामानाने मानवाला फरपटत पळवत नेले आहे... काही वेळा तर वातावरणातील बदलाने केवळ इतर प्राणी प्रजातीच नव्हे तर मानव प्रजातीलाही बहुतेक नष्टही करत आणलेले आहे.

आवांतर : गेल्या ५४ कोटी वर्षांत हवामानातल्या प्रचंड आणि जलद फरकामुळे पाचवेळा जीवसृष्टीची अपिरिमीत (कमीत कमी ५०% स्पेसिज नष्ट होणे ज्याला mass extinction किंवा biotic crisis म्हणतात अशी) हानी झाली आहे. त्यातील २५ कोटी वर्षांपूर्वीचा प्रसंग अनेक ज्वालामुखीचे एकत्र महाप्रचंड स्फोट झाल्याने झाला होता... यात जीवसृष्टीच्या 57% families, 83% genera आणि 90% to 96% species नष्ट झाल्या. तर दुसरा आपल्याला सर्वात जवळचा प्रसंग ६.६ कोटी वर्षांपूर्वी होऊन...यात 17% families, 50% genera आणि 75% species नष्ट झाल्या. त्यांत नष्ट झालेल्या डायनॉसॉर्स मुळे तो सर्वानाच परिचयाचा आहे. या प्रत्येक प्रसंगात पूर्वी प्रबळ (डॉमिनंट) असणार्‍या प्रजाती नष्ट होऊन पुढच्या काळात अधिक प्रगत प्रजाती निर्माण झाल्या आहेत... म्हणजे हे प्रसंग जीवसृष्टीला "शापयुक्त वरदान" असेच ठरले आहेत !

आदिजोशी's picture

12 Jul 2013 - 1:00 pm | आदिजोशी

एक्का काकाच्या सगळ्याच मालिका आणी सगळे भाग अत्यंत माहितीपूर्ण असून रटाळ नसतात. इपुस्तक काढाच आता एखादं.

स्मिता.'s picture

12 Jul 2013 - 1:35 pm | स्मिता.

माझ्या अत्यंत आवडीच्या विषयावर लेखमाला सुरू केल्याबद्दल इस्पीकचा एक्का यांचे अनेक आभार!!

आधीचा आणि हा भाग वाचला, भरपूर रोचक माहिती वाचायला मिळेल अशी खात्री वाटतेय. प्रतिसादांतूनही छान चर्चा होऊन बरीच माहिती मिळतेय. त्यामुळे पुढील लेखांबाबत उत्सुकता आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2013 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

आदिजोशी आणि स्मिता. : अनेक धन्यवाद ! असाच सहभाग चालू ठेवावा.

मस्त चालली आहे मालिका..पुभाप्र..

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2013 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jul 2013 - 11:07 am | ज्ञानोबाचे पैजार

वरच्या चित्रांमधला आपल्या भारतभुमीचा प्रवास फारच लांबचा झाला आहे असे दिसते. म्ह्णजे अंटार्टीकाला चिकटुन असलेला भारत पुर्ण गोलार्ध ओलांडुन आता कर्कवृत्ताला ओलांडताना दिसतो. अशियाखंडाला मारलेल्या या धडके मधुनच हिमालयाची निर्मीती झाली असे कुठेतरी वाचले आहे. कदाचीत याच कारणामुळे फक्त भारतिय उपखंडात मोसमी हवामान आढळते.

लेखमाला अतिशय रंजक होणार यात काही शंका वाटत नाही. पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2013 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे

भारताचा भूभाग (Indian plate) साधारण ८.४ वर्षांपूर्वी मकर वृत्ताकडून १६ सेमी/वर्ष या गतीने वर सरकू लागली आणि ६००० किलोमीटरचा प्रवास करून साधारण ४.८ ते ५.२ कोटी वर्षांपूर्वी युरेशियन प्लेटला धडकली आणि या दोन प्ल्टेट्स मधल्या जमिनीला ज्या वळ्या पडल्या त्या म्हणजे हिमालय पर्वत ! आजच्या घडीलाही भारताचा भूभाग प्रचंड युरेशियन प्लेटला अंदाजे ५ सेमी / वर्ष या वेगाने वर ढकलत आहे ! पाच कोटी वयाचा हिमालय हा जगातील सर्वात तरूण असणार्‍या पर्वतांपैकी एक आहे ! सह्याद्री त्याचा १० ते १५ कोटी वयाचा दादा आहे !

जमीन आणि समुद्राच्या पाण्याचे बदलणारे तापमान आणि त्यामुळे तयार होणारे मोसमी वारे व बदलणारे पावसाचे प्रमाण हे आशिया-ऑस्टेलिया आणि पश्चिम आफ्रिकेत पहायला मिळते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 2:06 am | डॉ सुहास म्हात्रे

वरच्या प्रतिसादातले "...८.४ वर्षांपूर्वी मकर वृत्ताकडून..." हे कृपया "...८.४ कोटी वर्षांपूर्वी मकर वृत्ताकडून..." असे वाचावे.

याच अनुषंगाने थोडे अवांतरः उत्तर भारतातले गंगेचे खोरे हे गेल्या फक्त ६-७ हजार वर्षांपूर्वी राहण्यायोग्य बनले आहे असे वाचले होते. त्याआधी सगळे पाणथळ प्रकरण होते. गाळ साचला तो इतका साचला की आजही गंगेच्या खोर्‍यात बेडरॉक अगदी २-३ किमीपर्यंत खणले तरी सापडत नाही-त्याच कारणामुळे तिथे खनिजेही सापडत नाहीत.

बाकी सह्याद्री हा हिमालयाचा खरेच दादा आहे यात शंकाच नाही. अरवली पर्वतही तसाच.

सस्नेह's picture

14 Jul 2013 - 8:00 pm | सस्नेह

माहितीपूर्ण असूनही रटाळ नसलेली रंजक मालिका आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2013 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !