=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
...गंमत अशी की "थोडीशी कातडी खरवडणे" हा एक वाक्प्रचार असला तरी जनुकशास्त्रिय तपासणीसाठी हीच सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे !!!
अमेरिकेत दक्षिण दिशेने स्थलांतर (१९,००० ते १२,५०० वर्षांपूर्वीपर्यंत)
मागच्या भागात आपण पहिले की हिमयुगामुळे पृथ्वीचा जवळ जवळ सर्व उत्तर गोलार्ध थंडीच्या कडाक्याने एकतर थंड वाळवंट किंवा पावसाच्या कमतरतेने रखरखीत उष्ण वाळवंट झाल्यामुळे काही मानव बर्फाळ, काही गवताळ तर फार थोडे जंगली रेफुजेसमध्ये छोट्या छोट्या टोळ्यांच्या स्वरूपात अडकून पडले. या सगळ्या बदलांत मानवांना जीवनमरणाच्या संघर्षाला तोंड द्यावे लागले आणि प्रचंड जीवहानी झाली. परत एकदा मानव जमात सर्वनाशाच्या जवळ पोहोचून कशीबशी तग धरून राहिली.
मात्र एका भूभागातील स्थलांतर जरा वेगळे होते... तो भूभाग म्हणजे अमेरिका खंड. हिमयुगाचा तडाखा सुरू होण्यापूर्वी उत्तर अमेरिकेत सहा फुटांपर्यंत मोठी शिंगे असलेले मोठे गवे, उंट, स्लॉथ, चितळ, बैल, मांजर प्रजातितील मोठ्या जाती, मॅमथ आणि मॅस्टॉडॉन (मॅमथ आणि हत्तींचे चुलत भाऊबंद) यांचे मोठे रानटी कळप होते. अर्थात उत्तरेकडचे हवामान जसजसे थंड होऊ लागले तसे हे प्राणी आणि मानव दक्षिणेकडे सरकू लागले. फार पूर्वी बेरिंगिया ओलांडून अमेरिकेत आलेल्या या मानवांची संख्या मुळातच मूठभर होती. त्यातच हवामानामुळे त्यात घट झाली. मात्र दक्षिणेकडे सरकणार्या या मानवांना विरोध करायला तेथे अगोदरपासून अस्तित्वात असलेले मानव नव्हते. या दृष्टीने ते इतरांपेक्षा नशीबवान होते, हे एक दु:खात सुख !
१९,००० ते १५,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात बेरिंगियातील रिफुजेसमधल्या मानवांना बर्फाने आणि थंडीने जखडून ठेवले होते. त्यांना हालचाल करायला हवामान सुधारण्याची वाट पाहणे भाग होते. पूर्व किनार्यावरून आणि उत्तर अमेरिकेत मार्गक्रमण करणार्या टोळ्या नष्ट झाल्या होत्या. १९,००० वर्षांपूर्वी जास्तीत जास्त दक्षिणेकडे पोहोचलेल्या अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरच्या मानवांना या हवामानाच्या फरकाचा तडाखा जरासा कमी आणि उशीरा बसला. शिवाय बेरिंगियातील रिफुजेसमधील मानवांप्रमाणे ते चारही बाजूंनी बर्फाने घेरले गेले नव्हते. अर्थातच या कालखंडात तेच काय ते स्थलांतर करू शकले. ते किनारपट्टीचा मार्ग चोखाळत मध्य अमेरिकेत आणि नंतर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्व किनार्यावर पसरले.
१५,००० वर्षांनंतर हवामान जरा सुधारू लागल्यावर बेरिंगियाच्या दक्षिणेकडील रिफुजमध्ये अडकलेल्या टोळ्या हालचाल करू लागल्या. त्यातले काही मानव पूर्व किनारपट्टीने दक्षिणेकडे स्थलांतर करू लागले. १५,००० ते १२,५०० या केवळ अडीच हजार वर्षांत त्यांनी दक्षिण चिलीच्या किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. पूर्वेच्या किनार्यावरून स्थलांतर करणारे मानवही या वेळेत ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या किनार्याने थेट अमेरिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचले होते. त्यांच्यातले काही धाडसी मानव किनारपट्टीचा पारंपरिक ओळखीचा आणि तुलनेने निर्धोक मार्ग सोडून अमेरिका खंडाच्या मध्यभागातही पसरले.
हे मार्गक्रमण खालच्या चित्रात दाखवले आहे...
या स्थलांतराचे एक विशेष म्हणजे ह्या मानवांच्या टोळ्या स्वतंत्रपणे मार्गक्रमण करत राहिल्या. त्यामुळे जसजसे ते कायम वस्ती करू लागले तसतश्या वेगवेगळे शारीरिक आणि सांस्कृतिक रूप असलेल्या मानव संस्कृती जागोजागी स्वतंत्रपणे विकसीत होत गेल्या. हे वेगळेपण आजच्या काळातही शाबूत आहे. मुख्य म्हणजे या वेगळेपणाचे पुरावे त्यांच्या जनुकांत अजूनही सापडतात... या प्रत्येक जमातीत त्यांनी त्यांच्या आशियातील मूळ भूमीतून बेरिंगियामार्गे बरोबर आणलेली जनुके सरमिसळ न होता अजून शाबूत आहेत. तसेच उत्खननात सापडलेली त्यांची हत्यारे त्यांच्या आशियाई पूर्वजांच्या हत्यारांशी जुळतात.
खालील चित्र जनुकशास्त्रिय दृष्टीने स्वतंत्र टोळ्यांचे अमेरिकेतले मार्गक्रमण दाखवते (www.bradshawfoundation.com च्या सौजन्याने)...
हे का झाले याबद्दल शास्त्रज्ञांत अजून एकमत नाही. याची बरीच कारणे असू शकतात, पण दोन सर्वात जास्त महत्त्वाची आहेत. पहिले कारण असे की ह्या टोळ्या अमेरिकन भूमीच्या अफाट पसार्यामुळे एकमेकापासून विभागून राहिल्या असाव्या आणि त्यांच्या संख्येच्या मानाने मुबलक अन्नपुरवठ्यामुळे त्यांना एकमेकाशी झगडण्याची गरज भासली नसावी. दुसरे कारण असे की या टोळ्या वेगवेगळ्या काळात दक्षिणेकडे सरकल्या आणि त्यामुळे त्यांचा एकमेकाशी संबद्ध आला नाही. त्या काळचा स्थलांतराचा वेग पाहिला तर १०-१५ वर्षांच्या किंवा कमी फरकाने निघालेल्या टोळ्या एकमेकाबद्दल पूर्ण अनभिज्ञ असू शकतात. या दोन कारणांपैकी एकामुळे किंवा दोन्हींमुळे तसे झाले असावे. परंतु सद्या यातील पहिल्या कारणाचे पुरावे जरा जास्त सबळ आहेत.
दक्षिण अमेरिकेत प्रथम पाय ठेवणार्या मानवांबद्दलही अनेक सिद्धांत प्रचलित होते.
त्यातल्या एका सिद्धांताप्रमाणे दक्षिण अमेरिकेत प्रथम पाऊल ठेवणारे मानव ऑस्ट्रेलिया अथवा पॉलिनेशियामधून समुद्रमार्गे आले. कारण तेथे सापडलेल्या जुन्या मानवी कवट्यांचे अवशेष प्राचीन आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियातील कवट्यांशी मिळते जुळते आहेत. त्यामानाने नवीन कवट्यांच्या अवशेषांचे चीन आणि मंगोलियातील मंगोलियन वंशाच्या कवट्यांशी जास्त साधर्म्य आहे.
दुसर्या सिद्धांताप्रमाणे यातले पहिले मानव दक्षिण आशिया-ऑस्ट्रेलिया-दक्षिण चीन-बेरिंगिया मार्गे हिमयुगाचा कहर सुरू होण्याअगोदर अमेरिकेत शिरले आणि पश्चिम किनारपट्टीमार्गे दक्षिण अमेरिकेत पोचले असावेत व त्यानंतरच्या हिमयुगाचा कहर कमी झाल्यावर मंगोलियन वंशाचा पगडा असणारे मानव तेथे पोचले असावे.
यातल्या दुसर्या मताला आजच्या घडीला जास्त पुष्टी मिळत आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक नविन पुरावे हे सिद्ध करतात की बेरिंगियाला पूर्वीच्या समजाप्रमाणे एक सरळसोट किनारा नव्हता. तेथे अनेक बेटे, दलदलीचे भाग आणि उथळ पाण्याचे भूभाग होते. या सगळ्यांचा आशियाच्या किनारपट्टीने पुढे सरकणार्या पट्टीच्या बीचकोंबरनी मॅमथ आणि इतर प्राण्यांचा मागोवा घेत अमेरिकेत प्रवेश करायला नक्कीच फायदा घेतला असणार. त्यामानाने ऑस्ट्रेलियापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेपर्यंत समुद्रप्रवास करण्याइतपत त्या काळच्या बीचकोंबर्स कडे असलेल्या होड्या प्रगत नव्हत्या.
=====================================================================
उत्तर अमेरिकेत मानवाचे पुनःप्रसरण (१२,५०० ते १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत)
सर्वसाधारणपणे प्रवासात मूळ जागी असलेली असलेली जनुके आणि उत्परिवर्तने घेऊन प्रवासी जथे पुढे जातात आणि त्यांच्यात नवीन "तरुण" उत्परिवर्तने तयार होत जातात. म्हणजे अमेरिकेत उत्तरेला जास्त मूळ जनुके आणि नवीन उत्परिवर्नांचा अभाव असायला पाहिजे. उत्तर अमेरिकेतली जनुकीय विभागणी याच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचे कारण हिमयुगाच्या कहरात दडले आहे.
हवामानात होणार्या बदलाने मानवांना उत्तर अमेरिका सोडून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कसे जायला भाग पाडले हे आपण पाहिले. त्या काळात उत्तर अमेरिकेत असलेल्या लहानसहान वस्त्या नाहीश्या होऊन त्यांचा काही पूर्व किनार्यावरचे अपवाद वगळता मागमूसही उरला नाही हे आपण अगोदर पाहिले आहेच. साधारण १२,५०० वर्षांपूर्वी हवामान सुधारू लागले आणि बर्फ वितळू लागला तसे बेरिंगियातले आणि उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागातले लोक उत्तर अमेरिकेतल्या उत्तरेकडच्या निर्मनुष्य भागांत पसरू लागले. अर्थातच या भागांतल्या मानवांत दक्षिणेकडील मानवांपेक्षा जास्त 'तरुण' उत्परिवर्तने आढळतात !
हे उत्तर अमेरिकेतले ५५ अंश अक्षांशाच्या उत्तरेकडचे पुनःप्रसारण खालच्या चित्रात दाखवले आहे...
या सगळ्या जनुकीय गडबडीत अजून एक महत्त्वाचा घोळ होता. तो म्हणजे अतीउत्तरेकडच्या अमेरिकन जमातींची जनुके दक्षिणेकडच्या जमातींकडून येणार्या जनुकांच्यापेक्षा खूपच वेगळी आहेत. आणि ही जनुके हवामान सुधारल्यावर आशियातून आलेल्या नवीन मानवी लाटांबरोबर आली असे म्हणावे तर तसेही नव्हते, कारण ती नजीकच्या भूभागातील आशियाई जमातींच्या जनुकांपेक्षा बरीच वेगळी आहेत.
सन १९९६ मध्ये या सगळ्या रहस्याचा उलगडा पीटर फोस्टर, अंतोनिओ तोरिनि आणि हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञांच्या गटाने केला. बेरिंगिया हिमयुगात कमी झालेल्या समुद्राच्या पाण्यामुळे आशिया व अमेरिकेला जोडणारा भूभाग होता हे अगोदरपासून माहिती होते. पण या गटाच्या पुराव्यांनी दाखवले की २५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इथला १३ लाख चौ किमी चा भूभाग हिमाच्छादित नसून गवताळ टंड्रा प्रदेश होता आणि तेथे शाकाहारी प्राण्यांचे कळप होते. त्या काळचा तेथला उन्हाळा हल्लीपेक्षा थंड होता पण आश्चर्यकारकरीत्या त्या काळचा हिवाळा हल्लीपेक्षा जास्त गरम होता ! आणि हा मानवासाठी रहायला तुलनेने सुसह्य भूभाग (रेफुज) २२,००० ते १५,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इतर जगापासून (पूर्व आशिया व अमेरिकेपासून) त्याच्या चारहीबाजूस असलेल्या बर्फाळ वाळवंटाने पूर्णपणे अलग झालेला होता. याचमुळे अतीउत्तर अमेरिकेतल्या ना-देने आणि ईन्विट-अल्युट या जमातीत आशियातून आलेली A1 / A2 मूळ जनुके आहेत पण त्यांची इतर उत्परिवर्तने सर्व आशियाई व अमेरिकन लोकांपेक्षा फार वेगळी आणि जास्त तरुण आहेत.
उत्परिवत्नांचे पुरावे वापरून जनुकीय नकाशे बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञाचा सिंहाचा वाटा आहे.
=====================================================================
भारतीय प्रस्तरकला (Indian Rock Art)
"फार महत्त्वाच्या प्राचीन भारतीय ठेव्यांबद्दल (नेहमीचीच) कमालीची अनास्था" हे वर्णन भारतीय प्रस्तरकलेला तंतोतंत लागू होते.
जगात एकूण तीन ठिकाणी महत्त्वाचे प्रस्तरकलेचे खजिने आहेत... भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. यातल्या भारत सोडून इतर ठिकाणच्या कलांच्याबद्दल भरभरून वाचायला मिळते आणि त्यांचा पर्यटनासाठीही कल्पक उपयोग झालेला आहे. केवळ भारतीय प्रस्तरकलेचा उल्लेख अभावानेच आढळतो. गंमत म्हणजे यांत शात्रज्ञांच्या सो कॉल्ड कंपूबाजीचा अजिबात हात नाही, कारण पाश्चिमात्य संशोधकांच्या लेखनात या अनास्थेबाबत सतत आश्चर्य व्यक्त केले जाते !
भारतातील ही प्राचीन कलाक्षेत्रे इतर खंडांतील कलेपेक्षा जास्त संख्येने आणि जास्त मोठ्या भूभागावर आहेत... आतापर्यंत एकूण तेरा राज्यांत ७०० पेक्षा जास्त ठिकाणी ही कला सापडली आहे. ही कलाक्षेत्रे जवळ जवळ सर्व भारतभर पण प्रामुख्याने भारताच्या मध्य भागात आहेत. फार मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर असूनसुद्धा उत्तरेकडच्या कुमाऊ पासून आंध्रप्रदेशातल्या चंद्रमौली पर्यंत या कलेतील विषय, आकार आणि संकल्पनांत आश्चर्यकारक समानता आहे (Kumar 1992: 56). ही कला बहुतांशी प्रस्तरचित्रांच्या स्वरूपात तर फार थोड्या ठिकाणी प्रस्तरावरच्या कोरीवकामाच्या स्वरूपात आहे. अश्या कलेच्या व्यवस्थापनाबद्दलचा आपला पूर्वेतिहास बघता अजून बरीच कला कोठेतरी कडेकपारीत पडून असली किंवा कोणत्या तरी "विकासाच्या" बांधकामांत नष्ट झाली असली तरी आश्चर्य वाटायला नको. असो.
या कलेत अर्थातच मुख्यत: ती निर्माण केली गेली त्या काळची स्थिती, मानव आणि प्राणी यांचे चित्रण आहे. या सगळ्यातले वैविध्य युरोपियन कलेपेक्षा अधिक आहे हे आतापर्यंत सर्वमान्य झाले आहे. उदाहरणार्थ:
१. चंबळच्या खोर्यातल्या कलेत जवळ जवळ ३० वेगवेगळे प्राणी आहेत (Badam & Prakash 1992).
२. मानव आणि प्राण्यांचे आकार काही ठिकाणी फक्त बहिर्रेखांनी दर्शवले आहेत तर इतर ठिकाणी रेषा अथवा इतर प्रकारे भरीव आहेत.
३. एका चित्रात गरोदर मातेच्या पोटातले बाळ एक्स रे मध्ये दिसावे त्या प्रकारे दाखवले आहे !
४. या कलेत मानवांच्या अनेक अवस्था... उभे, बसलेले, धावणारे, नाचणारे, शिकार करणारे, पायी अथवा घोड्यावरून शस्त्रे घेऊन लढणारे, इ... दाखवलेल्या आहेत.
ही कला पाहण्यासाठी आणि अधिक माहितीकरिता या दुव्यावर पाहणी करावी. तेथून अजून काही दुवे मिळू शकतील.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
प्रतिक्रिया
24 Aug 2013 - 10:39 pm | भाते
माझ्यासारख्या मराठी माध्यमातुन शिकलेल्या आणि आणि इंग्रजीचा आणि माझा ३६ चा आकडा असल्यामुळे आंतरजालावरील न समजलेला इतका अवघड विषय सोप्या भाषेत सांगितल्यापद्धल धन्यवाद. संपुर्ण मालिका खरोखरच जतन करून ठेवण्यासारखी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
24 Aug 2013 - 11:12 pm | अशोक पतिल
मी नियमितपणे ही लेखमाला वाचतोय . आयुष्यात जे काही लिखान मनाला भिडले, त्यात या लेखमालेचा सर्वोत्तम मध्ये समावेश ! अतिशय माहीतिपुर्ण विषयावरची लेखमाला ! जर इतके सहज पणे विषय शाळेत शिकवले असते तर....
एक प्रश्न.. मानवाच्या जीन्स मधे गत २०००-२५०० वर्षे एकदम सर्मिसळ झाली नसनार पण युरोपियन लोकां व अन्य च्या वसाहत विस्तारा मुळे गेल्या १०००-५०० वर्षे मानवी जीन्स मध्ये तीव्र प्रमाणात सरमिसळ झाली असेल्,तर ती जनुकीय उत्परिवर्तने कशी माडीफाइड झाली असणार ?
25 Aug 2013 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
भाते आणि अशोक पतिल: आपल्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद !
@ अशोक पतिल:
युरोपियन वसाहतवादामुळे जरी युरोपियन लोकांनी जगभर वसाहती स्थापन केल्या असल्या तरी युरोपियन व इतर वंशांची सरमिसळ अत्यंत कमी म्हणजे १ % पेक्षाही कमी झाली आहे. उदा. युरोपियन वसाहती भारतात १५० वर्षांपेक्षा जास्त होत्या पण भारतीय-युरोपियन (उदा. अॅग्लो-इंडियन) लोकांचे प्रमाण नगण्यच (१ % पेक्षा कितितरी कमी) आहे. त्याविरुद्ध भारतभर पौरात्य (ब्रम्हदेश आणि मलायन द्विपकल्पातून मागे फिरलेले) आणि पाश्चिमात्य (आफ्रिका अथवा मध्य आशियातून आलेले) लोकांची गेल्या काही सहस्त्र वर्षांत भरपूर सरमिसळ झालेली आहे... हे भारतियांच्या वर्ण, शारिरिक रचना, भाषा आणि चालीरिती यांच्या एकते/अनेकते-वरूनही बरेच स्पष्ट दिसते.
ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, कॅनडा, युएसए व दक्षिण अफ्रिकेमध्ये युरोपियन मोठ्या संख्येने गेले आणि कायमस्वरूपी राहिले. पण स्थानीक लोकांबरोबर त्यांचे रोटीबेटी व्यवहार तुलनेने तसे नगण्यच राहिले आहेत.
जनुकीय उत्परिवर्तने ही सर्व मानवांत नैसर्गिक रितीने सतत होतच असतात. आपण फक्त त्यांचा मानवांच्या मोठ्या स्थलांतरासाठी किंवा एखाद्या समाजाच्या / व्यक्तीच्या वंशावळीचा शोध घेण्यासाठी उपयोग करतो.
25 Aug 2013 - 10:34 pm | दशानन
पुर्ण लेखमाला मनलावून वाचतो आहे, काही प्रश्न आहे, त्याची उत्तरे पुढे पुढे मिळतील व त्यातून जे प्रश्न उरतील या बद्दल एक प्रश्न - उत्तराचा धागा नक्कीच तयार करा.
हा भाग ही आवडला!
25 Aug 2013 - 11:17 pm | अतुलनियगायत्रि
कौतुक करावे तेवढे थोडे.. तुमची ओस्त्रेलिया आनि न्युझिलंड सफारी सुध्दा अतिशय आवडली होती. मिपा वरच्या सर्र्वात आवडत्या लेखांपेकी एक..
पुढच्या भागांची आतुरतेनी वाट बघत आहोत..
मिपा वर नविन असल्याने लिहिताना काहि चुका झाल्या असतिल तर क्षमस्व..
26 Aug 2013 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
दशानन आणि अतुलनियगायत्रि : अनेक धन्यवाद !
26 Aug 2013 - 2:03 pm | प्रचेतस
जबरदस्त प्रवास नकाशांमुळे खूपच माहितीपूर्ण होत आहे. भीमबेटकाची प्रस्तरचित्रे बघायला गेले पाहिजे आता.
26 Aug 2013 - 2:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या सारख्या दर्दी, वल्ली आणि अभ्यासू माणसापासून ह्या असल्या एकमेवाद्वितीय प्राचीन ठेव्याची माहिती गुप्त रहावी इतकी त्याबाबच्या प्रसिद्धीची उदासी आणि गल्लीबोळातल्या उद्यान नामक झाडापाल्याला आपल्या पूर्वजांचे नांव देण्यासाठी चढाओढ; यात आपल्याला जगात तोड नाही !!! म्हणजे आहे ना "माझा भारत महान" ?
26 Aug 2013 - 8:16 pm | प्रचेतस
तरीही ही माहिती गुप्त राहणेच जास्त श्रेयस्कर असे खेदाने म्हणावेसे वाटते. इतकी वर्ष नैसर्गिक संकटांना तोंड देत जो ठेवा टिकून राहिलाय तो मानवी हस्तक्षेपा पासून मात्र सुरक्षित राहू शकत नाही.
अजिंठ्यातल्या भित्तिचित्रांची गेल्या शेदिडशे वर्षात जितकी हानी झालीय तितकी त्याआधीच्या तेराशे चौदाशे वर्षातही झालेली नव्हती.
26 Aug 2013 - 9:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे खरी. मात्र इतर ठिकाणी अश्या कलेची अभिमानने प्रसिद्धी करून मान मिळवला जातो आणि पर्यटनावर भरपूर आर्थिक फायदाही कमावला जातो हे पाहून काय वाटते ते शब्दात सांगणे कठीण आहे.
26 Aug 2013 - 4:37 pm | तिरकीट
या विषयावर यापेक्षा साधी आणी सोपी मांडणी कधीही वाचनात आली नाही....
अनेको धन्यवाद!!!
26 Aug 2013 - 9:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
26 Aug 2013 - 5:06 pm | मालोजीराव
नागरी सभ्यतेचा उगम झाला एकदाचा :)
26 Aug 2013 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
नागरी सभ्यतेसाठी अजून थोडा वेळ आहे.
26 Aug 2013 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
नागरी सभ्यतेसाठी अजून थोडा वेळ आहे. अजून सफर चालूच आहे.
26 Aug 2013 - 11:29 pm | मालोजीराव
जगातिल सर्वात जुन्या civilization चे अवशेष नुकतेच मिळाले आहेत...आणि ते ठोस पपणे 12000 वर्षांपूर्वी चे आहेत...19 फुट उंच प्रत्येकी 15 टन वजनी एकसमान तासलेले पिलर वर्तुळाकारात असून मध्यभागी मंदिर आहे.तसेच काही कोरीव शिल्पे आहेत.
उत्खनन अजुनही चालू आहे...अजुन अनेक गोष्टी मिळण्याची शक्यता आहे,अधिक माहिती नंतर जोड़तो.
27 Aug 2013 - 10:15 am | डॉ सुहास म्हात्रे
बातमी खूपच उत्सुकतापूर्ण आहे. कृपया दुवा देवू शकाल काय?
27 Aug 2013 - 11:18 am | मालोजीराव
Nat Geo
Nat Geo- Göbekli Tepe
Göbekli Tepe
उत्खनन अजूनही चालू आहे, कदाचित पूर्ण संकृती उजेडात येऊ शकेल
27 Aug 2013 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
फारच उपयोगी माहिती ! धन्यवाद !!
तुम्ही दिलेले दुवे नोंदवून ठेवलेले आहेत. शांतपणे नीट वाचले जातील.
जरा गडबडीत केलेल्या जालीय उत्खननात विकीवर हा खालचा दुवा सापडला,,, त्यांत चाळीच्या वर संदर्भ आहेत...
http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6bekli_Tepe
म्हणजे काही दिवसांच्या वाचनाची सोय झाली :)
26 Aug 2013 - 5:37 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम लेख मालिका !!
एक प्रश्न : हा सगळा प्रवास करत असताना मानव कोणत्या भाषेत कम्युनिकेशन करत होते ?
26 Aug 2013 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुरुवातीला संवाद करण्यासाठी खाणाखूणा आणि आवाज यांची आदीभाषा... त्यातून नंतर प्राचीन भाषा तयार झाल्या. ज्या टोळ्यांतले अंतर वाढले आणि देवाणघेवाण कमी होत गेली त्या टोळ्यांच्या भाषांत अर्थात फरक पडत गेला. सुरुवातीला अनेक दशसहस्त्र भाषा असणार. नंतर राजकीय, सामाजीक, आर्थिक कारणाने काही भाषा इतरांपेक्षा वरचढ झाल्या आणि विकसित होत राहिल्या. इतरांचा वापर कमी कमी होत बर्याच नष्ट झाल्या. हा प्रकार अजूनही चालू आहेच. गेल्याच आठवड्यात सद्या जगात आस्तित्वात असणार्या अंदाजे ७,००० भाषांपैकी ५०% नष्ट होण्याबद्दल UNESCO ला काळजी वाटत आहे अशी बीबीसी वर्ल्ड टिव्हीवर बातमी होती.
26 Aug 2013 - 9:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर लिहायला विसरलो, म्हणून इथे :)
27 Aug 2013 - 10:20 am | डॉ सुहास म्हात्रे
अगोदरच्या एका भागात इथे भाषा या विषयावर जरा सविस्तर लिहीले होते ते आठवले.
26 Aug 2013 - 10:49 pm | शिल्पा ब
भारतात अशी भित्तिचित्र आहेत हे माहितच नव्हतं. नेहमीप्रमाणेच छान माहिती.
27 Aug 2013 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
28 Aug 2013 - 1:57 pm | प्रज्ञाताई
भारीये लेख मालिका इस्पिक एक्केराव!
28 Aug 2013 - 6:13 pm | तिमा
खिळवून ठेवलंय तुम्ही या लेखमालेने. पुलेशु.
28 Aug 2013 - 6:22 pm | बॅटमॅन
पुढचे भाग वाचायला लै लेट झाला. पण वाचून डॉळ्यांचे पारणे फिटले!!!!! अतिशय जबरी माहितीपूर्ण लेखमाला, अमेरिकेतल्या जनुकीय वैविध्याबद्दल इतकी डीटेलवारी माहिती पहिल्यांदाच वाचायला मिळाली.
भारतातल्या प्रस्तरकलेबद्दलही आता दिलेल्या लिंका सवडीने वाचीन.
मालोजीने दिलेली लिंकही रोचक आहे. तुर्कीमध्ये सर्वांत जुने डीटेल्स कायम सापडत राहतात कारण जे "बेसिक सांस्कृतिक प्याकेज" आहे ते तिथे परिणत झाले आणि तिथून लै मोठ्या एरियात पसरले. तशी अख्ख्या जगात बेसिक वाली सेंटर्स वट्ट ५-६ आहेत. गन्स जर्म्स अँड स्टील या पुस्तकात याबद्दल डीटेलवारी माहिती दिलेली आहे.
28 Aug 2013 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रज्ञाताई, तिमा आणि बॅटमॅन : अनेक धन्यवाद !
30 Aug 2013 - 12:56 pm | इशा१२३
माहीती अगदी मनोरंजक लिहीली आहे.त्यामूळे वाचायला आणि समजायला सोप्पी!पु.भा.प्र.
31 Aug 2013 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
5 Sep 2013 - 1:48 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण! भारतातल्या प्रस्तरकलेचे नितांतसुंदर नमुने मी रिवण(गोवा) इथे पाहिले आहेत. काही छायाचित्रे http://www.misalpav.com/node/17609 या लेखात दिली आहेत. सर्वच चित्रांची छायाचित्रे मी घेऊ शकले नाही. पण वेळ मिळाला की परत नक्की जाणार आहे.
5 Sep 2013 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !