=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
...सद्याच्या युरोपातील लोकांमध्ये असलेले जनुकीय पुरावेही त्यांचे पूर्वज ५०,००० वर्षांपूर्वी दक्षिण आशियातून आले असे दाखवतात असे सिद्ध झाल्यावर तर "युरोपमध्ये वेगळ्या मानवी संस्कृतीची स्वतंत्र सुरुवात होऊन ती वेगाने प्रगत झाली आणि मग त्यांनी ती प्रगती इतर ठिकाणी पसरवली" ही कल्पना पूर्णपणे खोटी ठरली. अजून एका कपोलकल्पित स्वप्नावर आधारलेल्या सिद्धान्ताला (थियरीला) जनुकशास्त्राने सुरुंग लावला आणि अगोदर आशियात झालेल्या सगळ्या मानवी सुधारणांचा फायदा युरोपात उशीरा घुसणार्या मानवांना झाला हे तथ्य सर्वमान्य झाले !
शेवटच्या हिमयुगातील सर्वात गरम असलेल्या ५,००० वर्षांचा कालच्या कालखंडाने मानवाला युरोपमध्ये शिरकाव करण्याची संधी प्राप्त करून दिली या बाबत संशोधकांचे एकमत आहे. पण हे मानव कोठून आले याबाबत फार पूर्वीपासून अनेक अंदाज, सिद्धांत आणि समजुती होत्या. अगदी पाच दहा वर्षांपूर्वीपर्यंत जनुकशास्त्राने निर्विवाद पुरावे द्यायला सुरुवात करेपर्यंत कोणताच दावा मग तो कितीही सामान्य पुराव्यावर अवलंबून असला तरी पूर्णपणे खोडून काढणे शक्य नव्हते... कारण त्या काळापर्यंत याबाबतीत बहुतेक सर्व अंदाज, सिद्धांत आणि समजुती अश्याच सबळ नसलेल्या पुराव्यांवर अवलंबून होत्या ! हा सगळा गुंता उलगडणारा शास्त्रीय प्रवास खूपच रोचक आहे, म्हणून त्याबाबत थोडी माहिती घेऊ या.
लेव्हांत मार्गे ५०,००० वर्षांपूर्वी युरोपमध्ये प्रवेश केलेल्या मानवांच्या वंशजांत U5 हे युरोपातले सर्वात जुने आणि आजतागायत शिल्लक असलेले उत्परिवर्तन सापडते. याचा अर्थ असा नाही की हेच एक उत्परिवर्तन झाले... या कालावधीत नक्कीच अजून अनेक उत्परिवर्तने निर्माण झाली असणार, मात्र आजतागायत हे एकच शिल्लक राहिले आहे आणि त्या काळाची इतर परिवर्तने असणारे वंश नष्ट झाले आहेत. त्यामुळे U5 ला सर्व युरोपची जननी समजले जाते.
"U" आणि U5 ही तिची पाचवी मुलगी (आणि युरोपची आई) मायटोकाँड्रियल इव्ह सारख्याच जनुकशास्त्राने सिद्ध झालेल्या सैद्धांतिक मातृवंशावळी आहेत. मानवाच्या युरोप प्रवेशाच्यावेळी निर्माण झालेले U5 हे उत्परिवर्तन आर्मेनिया, तुर्कस्तान, अझरबैजान आणि कुर्दिस्तानापासून सुरू होऊन पूर्व, मध्य आणि दक्षिण युरोपमध्ये गेले... स्पेनच्या बास्क प्रांतातील जुन्या जमातीत हे उत्परिवर्तन मूळ रूपात कायम आहे. (हे फक्त तेथेच तसे मूळ स्वरुपात का राहिले? याचे कारण पुढच्या भागात येईल). हा युरोपातील प्रवासाचा मार्गही तेथल्या त्या काळच्या हवामानाशी मिळता जुळता आहे, कारण हिमयुगाच्या त्या काळात उत्तर युरोप आणि स्कँडेनेव्हिया थंडीच्या कडाक्याने गोठलेले भूभाग होते आणि तेथे मानववस्तीसाठी योग्य परिस्थिती नव्हती.
"U" ची वंशावळ जरी लेव्हातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तरी अतिपूर्वेत तिचा पूर्ण अभाव आहे. मात्र तिची एक प्राचीन बहिणवंशावळ अरबी खाडीच्या पूर्व किनाऱ्याच्या आणि भारतीय महासागराच्या किनाऱ्याच्या मार्गाने (आताच्या इराण, पाकिस्तान मार्गे) भारतातील "U2i" शी जोडलेली आहे.
अजून फार खोलात न जाता हे सगळे मातृवंशपुराण सोपे करून असे आहे :
१. आफ्रिकेत मायटोकाँड्रियल इव्ह ही आज जिवंत असणाऱ्या सगळ्या मानवांची जननी आहे.
२. मायटोकाँड्रियल इव्हच्या आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या मुलींपैकी "L3" ह्या एकुलत्या एका मुलीची वंशावळ जिवंत आहे... म्हणजे ती अफ्रिकन सोडून इतर सर्व मानवांची जननी आहे.
३. "L3" ची मुलगी "N" (Nasreen).
४. "N" ची मुलगी "R" (Rohani).
५. "R" ची मुलगी "U" (Europa).
६. "U" ची मुलगी "U5", जी सगळ्या युरोपियन मानवांची जननी आहे.
"U" ची आई "R" आणि आजी "N" ही उत्परिवर्तने दक्षिण आशिया सोडून इतर कोठेच सापडत नाहीत. आणि भारतात सापडणारी "R" ची अनेक उपउत्परिवर्तने इतर कोठेच सापडत नाहीत आणि त्यांच्यावरून केलेला "R" च्या वयाचा अंदाज ५५,००० वर्षांपूर्वीचा आहे. हा काळ मानवाच्या युरोपात शिरण्याच्या काळाच्या (५०-५१,००० वर्षांपूर्वीच्या) अगोदरचा आहे. यावरून युरोपियन मानव भारतीय उपखंडातून पुढे तेथे गेला हे सिद्ध होते.
=====================================================================
दक्षिण युरोपमध्ये मानवाचा शिरकाव होत होता त्या वेळेस मानवाचा वावर सर्व ऑस्ट्रेलियाभर पसरला होता. ऑस्ट्रेलियात पदार्पण करणाऱ्या आधुनिक मानवांना तेथे कोणताच प्रतिकार झाला नाही कारण ते तेथे पाय ठेवणारे पहिले मानव होते आणि आतापर्यंतच्या तीसएक हजार वर्षांच्या शिकारीच्या अनुभवामुळे इतर प्राण्यांचा त्यांना फार प्रतिकार होणेही शक्य नव्हते. पण याचा अतिरेकी परिणाम असा झाला की मानवाने तेथील बरेचसे प्राणीजीवन गट्टम करून नष्ट केले. यात ऑस्ट्रेलियात प्राचीनकाळी असणाऱ्या मॅमथसारख्या प्रचंड प्राण्यांचाही समावेश होता. काही शास्त्रज्ञांच्या मते या मानवांनी आपल्या अग्नीसंबद्धीच्या ज्ञानाचा उपयोग जंगले जाळून प्राण्यांची शिकार करण्यासाठीही केला.
=====================================================================
उत्तर आफ्रिकेत व उत्तर आशियात पदार्पण (४५,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी)...
मागच्या सगळ्या सफरींप्रमाणेच पुढची वाटचालही काही मुख्य नियमावली पाळत पुढे चालू राहिली, ती नियमावली अशी :
१. जीवनाला आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांपासून फार दूर भटकू नका.
२. नियमित पावसाची हमी असणाऱ्या भागातच वस्ती अथवा प्रवास करा.
३. प्रवास करताना वाळवंटी अथवा उंच डोंगर असलेला भूभाग टाळा.
४. प्रवास समुद्रकाठाने अथवा नदीकाठाने आणि मुबलक शिकार असलेल्या भागातून करा.
४५,००० वर्षापुर्वी सुधारणाऱ्या हवामानाचा फायदा घेत लेव्हांतमधले काही मानव दक्षिणेकडे वळून इजिप्तमार्गे उत्तर आफ्रिकेत भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्याने पुढे निघाले. त्यांची पुढची वाटचाल बहुतांशी वरची नियमावली पाळत पुढे सुरू राहिली.
मात्र यावेळेपर्यंत अशियातील मानव समुद्राकिनारा सोडण्याचे धाडस करू लागले होते. आफ्रिका सोडल्यावर समुद्रकिनाऱ्याने पुढे पुढे जाताना त्यांना दर शंभरएक किलोमीटरला आडव्या येणाऱ्या खाड्या पार करत जावे लागले होते. त्यामुळे त्यांच्यातले काही मळलेली वाट सोडून नदीकिनारा धरून उत्तरेस जाण्याचे धाडस करू लागले असावेत. नदीकिनाऱ्याने असलेले भरपूर वनस्पतीजन्य अन्न आणि गोड्या पाण्याच्या साठ्याजवळ मिळणारी भरपूर शिकार ही कारणेही त्यांना आकर्षक वाटली असावी. मात्र जास्त उत्तरेकडे गेल्यावर कमीत कमी ३ किलोमीटर उंच असणार्या हिमालय पर्वताच्या रांगांचा मोठा अडथळामध्ये येत होता. त्याचबरोबर जास्त जंगली प्रदेशात गेल्यास त्यातल्या श्वापदांचा धोकाही होता. तरीसुद्धा ४५ ते ४०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात हे अडथळे पार करून मानवांच्या अनेक धाडसी जथ्यांनी यशस्वी गिर्यारोहण करत उत्तर आशियात प्रवेश केला.
हे प्रवास मुख्यतः नदीकिनार्यांना धरून उत्तरेकडे जाणार्या चार मार्गांनी झाले...
१. एक मार्ग सिंधू नदीच्या काठाने वर जात जात कश्मीरमार्गे मध्य आशियात (आताच्या ताजिकिस्तान, किर्घिस्तान आणि कझाकिस्तान मध्ये) शिरला. या मार्गातले काहीजण जरा जास्त पश्चिमेकडे जात अफगाणिस्तानमार्गे खैबर खिंड पार करत मध्य आशियात पोहोचले. हा दुसरा मार्ग वाटेत असलेल्या वाळवंटी प्रदेशामुळे जरी जास्त खडतर होता तरी या धाडसी प्रवाश्यांना अशक्य मुळीच नव्हता.
मध्य आशिया आणि पूर्व चीनचा शिनजियांग प्रांत आज जरी वाळवंटी असले तरी त्याकाळी ते हिरविगार कुरणे आणि नद्या असलेले समृद्ध भूभाग होते. त्याकाळी तेथे वाढलेले मॉस, लिचेन्स, गवत आणि छोटी झुडूपे हे मॅमथ, घोडे, बायसन, जायंट हरिण आणि रेन्डियर यांचे आवडते खाद्य होते. असा या भागात असलेला आवडत्या अन्नाचा मुबलक साठा हे मानवासाठी एक फार मोठे आकर्षण होतेच ! या भागाला तेथिल मॅमथच्या मुबलकतेमुळे "मॅमथ स्टेप्पे" असे नाव पडले आहे.
२. दुसर्या भागातले म्हणजे हिमालयाच्या पुर्वेच्या बाजूने जाणारे चार मार्ग होते. आताच्या बांगलादेशातून वाहणार्या ब्रम्हपुत्रा नदीच्या काठाने; ब्रम्हदेशातून वाहणार्या सालवीन नदीच्या काठाने; व्हिएतनाममधील मेकाँग नदीच्या काठाने; आणि चीनमधील यांगत्सेच्या काठाने ते मार्ग उत्तरेकडे गेले. या चारही महानद्या दक्षिणपूर्व तिबेटमध्ये एकमेकाजवळ उगम पावून १५० किलोमीटरपर्यंत एकमेकापासून फक्त काही किलोमीटर अंतरावरून वाहतात. या नद्यांच्या प्रवाहांनी बनलेल्या कमी उंचीच्या दर्या आणि खोर्यांनी या मानवाना तिबेटच्या दक्षिणपूर्वेस पोचायला मदत केली. तेथून ते पुढे तिबेट, मध्यपूर्व आणि मंगोलियापर्यंत पसरले. यातला शेवटचा यांगत्सेवरचा मार्ग अजूनही चीन-तिबेट व्यापारासाठी वापरात आहे.
३. समुद्रकिनार्याने अगदी पुढे जाऊन चीनमध्ये पोहोचलेले काही मानव मागे फिरून काही काळानंतर रेशिम मार्ग म्हणून प्रसिद्ध झालेल्या मार्गावरून पश्चिमेकडे निघून मॅमथ स्टेप्पेपर्यंत पोहोचले.
४. या वरच्या जथ्याच्याही पुढे गेलेले आणि आताच्या रशियाच्या अतीपूर्व भागात पोहोचलेल्या मानवातील काहीजण परत फिरून पश्चिमेकडे निघाले आणि मॅमथ स्टेप्पेपर्यंत पोहोचले. यांच्यातले काही त्याकालच्या उथळ समुद्रमार्गाने साखालीन (सोहालिन, कोरफुतो) बेटामार्गे जपानमध्ये गेले.
हा सगळा प्रवास जरी ४२-४०,००० वर्षांपूर्वी सुरू झाला असला तरी जवळ जवळ ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत मानवी लाटांच्या स्वरुपात अव्याहत चालू होता. त्याकाळातल्या हिमयुगाच्या मधून मधून येणार्या गरम कालखंडांनी (interstadials) या प्रवाश्यांना खूपच मदत केली.
अशा तर्हेने आशियाचा (अतीउत्तरेकडचा सायबेरिया सोडता) बहुतेक सगळा भाग मानवाने पादाक्रांत केला.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
प्रतिक्रिया
10 Aug 2013 - 2:58 am | अर्धवटराव
या एवढ्या कालखंडात जगभर घडलेल्या घटना... एक एक बिंदु जोडत त्यांची संगती लावणारं शास्त्र काय कमाल आहे.
हा भाग देखील सुरेख जमलाय.
अर्धवटराव
10 Aug 2013 - 9:26 am | प्रचेतस
असेच म्हणतो.
लेखमाला कमालीची रोचक बनत चालली आहे.
10 Aug 2013 - 11:21 am | सामान्य वाचक
ह्या भागाची फार वाट पहायला लावलीत.
10 Aug 2013 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद आणि क्षमस्व ! गेले दोन आठवडे जरा पोटापाण्याच्या उद्योगाच्या अचानक पुढे आलेल्या तातडीच्या कामात गुंतलो होतो :)
10 Aug 2013 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
अर्धवटराव आणि वल्ली : अनेक धन्यवाद !
10 Aug 2013 - 2:16 pm | तिमा
अति पूर्वीचा ईतिहास हा तर रोमांचक आहेच पण खरी मजा इस. पूर्वी ५००० सालापासून सुरु होसा, कारण ते आपल्याला जास्त जवळचे वाटते.
11 Aug 2013 - 10:25 am | डॉ सुहास म्हात्रे
मानवाने गेल्या पाच हजार वर्षांपुवीपासून केलेले उद्योग-उलाढाली, कपट-कारस्थाने, प्रगती-अधोगती खूप रोचक आहेत यात काहीच संशय नाही.
पन आमाला जरा लय जुनी मढी उकरून ये अस्ले धंदे करनारी बेनी कुटून आनी कशी आली हेबी पायला लईच आवडतंय बर्का ;)
12 Aug 2013 - 1:34 am | शिल्पा ब
एक बारीक शंका : द्वारकेचे पुरावे मिळालेत ते १०,००० वर्षांपुर्वीचे आहेत असं म्हणतात. (इथेच मिपावरपण कोणीतरी लिंकवलं होतं.) तर याचा अर्थ महाभारत त्या काळातलं अन रामायण कदाचित त्याआधीचं. मग सगळे ५००० वर्षांचा हिशेब कसा लावतात?
12 Aug 2013 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे
याबाबतीत माझा काहीच अभ्यास नाही तेव्हा मी काही मत व्यक्त करणे योग्य होणार नाही... जाणकारांनी काही प्रकाश टाकला तर मलाही वाचायला आवडेल.
14 Aug 2013 - 5:18 pm | चित्रगुप्त
'गॉड' ने आदम आणि ईव्ह ला किती हजार वर्षांपूर्वी निर्माण केले, याचे जे काही उत्तर बायबलात दिले असेल त्यावर जगातील इतर संस्कृती किती प्राचीन आहेत, हे ठरवले जात असे. अर्थातच त्यापूर्वी कोणीही मनुष्य अस्तित्वात नसल्याने त्या सर्व संस्कृती नंतरच्या, वगैरे...
अर्थात आता बायबलातील गप्पा कोणीच खर्या मानत नाहीत.
याविषयी थोडी गंमत खाली वाचा:
http://www.misalpav.com/node/23698
14 Aug 2013 - 5:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
बायबलवर आता फारसा कोणी विश्वास ठेवत असेल असे वाटत नाही... अंधविश्वास असणारे आणि त्यावर ब्रेड-बटर (आणी जॅम) अवलंबून असणारे अलाहिदा. गेल्या वर्षा दोन वर्षात तर कपाटातली इतके सापळे बाहेर घरंगळले आहेत की चर्चची आहे ते सावरण्याची धडपड चालू आहे.
तुमचा लेख पूर्वीच वाचला होता. तुमची लिखणशैली आवडते... आणि लिखाण चित्रमय करण्याची हातोटी आणि चित्रसंग्रहसुद्धा !
तुमचा
12 Aug 2013 - 11:40 am | पैसा
हा सगळाच प्रवास थरारक आहे! अशा साखळ्या जुळवण्यासाठी फार प्रचंड अभ्यास आणि चिकाटीची गरज होती.द. फ्रान्समधल्या Lascaux Caves हे युरोपमधल्या मानवाचे सुरुवातीचे घर असावे अशा कल्पनेवर आधारित Jean M. Auel ची Earth's Children मालिकेतील कादंबर्या वाचल्या होत्या. त्यातले बरेच समज या संशोधनानंतर कालबाह्य ठरले असणार. तसेच आर्यांचे उगमस्थान कोणते याबद्दलही पूर्ण नव्याने संशोधन झाले असणार.
तुम्ही लिहिलेला मानवाच्या प्रवासाचा मार्ग अचंबित करणारा आहे. जनुकीय उत्परिवर्तनाच्या पुराव्यांवरून आर्य आणि अनार्य (२ प्रकारचे नमुने) दोन्ही एकाचवेळी भारतात रहात होते असे दिसते. आर्ष संस्कृत ही सर्व इंडो आर्यन भाषांची जननी असे म्हणतात, तेही खरे असावे. फक्त आर्यांच्या आणि संस्कृत भाषेच्या प्रवासाची दिशा पूर्वीच्या समजाच्या बरोबर उलट असावी हा तर्क जास्त पटण्यासारखा आहे.
12 Aug 2013 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे
हा सगळाच प्रवास थरारक आहे!
एकदम सहमत.जनुकशास्त्रात अनेक कारणांनी अतिशय वेगाने संशोधन होते आहे आणि त्याचा उपयोग मानववंशशास्त्राला आपोआप होत आहे. दर महिन्याला काहितरी नवीन संशोधन / नविन जास्त विश्वासू तारखा / धक्कदायक माहिती मिळत आहे.... उदाहरणाखातर मागच्या भागाच्या एका प्रतिसादातील अवांतरमध्ये दोन गरमागरम ताजे दुवे दिले होते.
12 Aug 2013 - 12:08 pm | पैसा
हो, ते वाचले! जातीबाहेर लग्नांवर बंदीची प्रथा सातवाहनांच्या काळात सुरू झाली असे त्या संशोधनावरून दिसते.
भाषा नाहीशा होणे हे मात्र जरा विचित्र प्रकरण आहे. त्याच बातमीत म्हटल्याप्रमाणे सरकारच्या बदललेल्या धोरणामुळे १०००० पेक्षा कमी बोलणारे असतील त्या भाषांची नोंद करणे सरकारने थांबवल्यामुळे काही भाषा "हरवल्या" आहेत.
12 Aug 2013 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
सरकारी विनोद सोडला तरी वापर बंद झाल्याने जगभर अनेक भाषा नाहिश्या होत आलेल्या आहेत आणि काळाच्या ओघात हे असे पुढे चालूच राहणार आहे.
12 Aug 2013 - 3:15 pm | पैसा
ते आहेच. अवांतराच्या भीतीने इथे आणखी लिहीत नाही. बॅटमन्/प्रास्/पिशी अबोली कोणीतरी स्वतंत्रपणे यावर जरा जास्त लिहितील असे समजूया!
12 Aug 2013 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय योगायोग पहा आजच संध्याकाळच्या बी बी सी वर्ल्ड न्युज मध्ये बातमी होती : UNESCO ला काळजी पडलीय की जगातल्या ७,००० पैकी ५०% भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत !
17 Aug 2013 - 10:53 pm | अतुलनियगायत्रि
अतिशय सुन्दर लेखमाला...