मोदकेन ताडय

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
3 Aug 2013 - 7:22 am

एक दंतकथा

एका राजाची कन्या उपवर झाल्यावर त्या राजाच्या प्रधानाला वाटले की राजकन्येने आपल्या मुलाशी विवाह करावा. पण राजकन्येने ते नाकारले. प्रधान अतिशय भडकला. त्याने सूड उगवावयाचे ठरविले. राजाने त्याला कन्येकरिता वर शोधावयास सांगितले. वरसंशोधनाकरिता हिंडत असतांना त्याला एक अतिशय सुस्वरूप मुलगा एका झाडाच्या फांदीवर बसून बुंध्याकडून ती फांदी तोडतांना दिसला. प्रधानाने त्याला "असे कां करतोस ?" विचारले. तो मुलगा उत्तरला "खाली उतरण्याकरिता". हा महामूर्ख तरुण पाहून प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्याला खाली उतरवून, प्रधानाने त्याला आपल्याबरोबर राजधानीला आणले. त्याला बजावले कीं "तू तोंडातून एक शब्दही काढावयाचा नाही. जे काही सांगावयाचे ते हातवारे करून सांगावयाचे. ही तुझ्याबरोबर असलेली दोन माणसे बोलतील. तुला राजकन्या बायको म्हणून मिळेल" आणि त्याच्याबरोबर दोन विद्वान दिले व दोघांना सांगितले कीं कोणी प्रश्न विचारले कीं तुम्हीच उत्तरे द्यावयाची. मग त्या मूर्ख तरुणाला उत्तम वस्त्रे नेसवून, दागिने घालून दरबारात नेले. राजाला प्रधान म्हणाला, "हा विद्वान तरुण आहे. याच्यासह याचे दोन शिष्य आहेत. काही कारणाने याने तूर्तास मौन व्रत धरले आहे. याला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे हा हातवारे करून सांगेल व त्याचे हे शिष्य त्याचा अर्थ तुम्हाला सांगतील." एवढ्या लहान वयांत या सुस्वरूप तरुणाने एवढी विद्वता प्राप्त करावी व वयाने मोठे असलेल्यांनी त्याचे शिष्यत्व स्विकारावे याचे राजाला मोठे कौतुक वाटले.विद्योत्तमा राजकन्या सुसंस्कृत होती. तिने निरनिराळे प्रश्न विचारले. तरुणाने काहीही हातवारे केले की त्याचे शिष्य त्यांची योग्य उत्तरे द्यावयाचे. राजकन्येला आपल्याला इतका सुंदर विद्वान पती मिळतो याचा आनंद झाला. दोघांचे लग्न झाले. त्याच दिवशी सगळे जलविहाराकरिता तलावात गेले असतांना हा तिच्यावर जोराने पाणी उडवू लागला. राजकन्या म्हणाली "मोदकेन ताडय" (मा+उदकेन ताडय..पाण्याने मारू नकोस) हे चिरंजीव अति हुषार. लागलीच राजवाड्यात जाऊन मोदक घेऊन आले व त्यांनी राजकन्येला मारावयास सुरवात केली. आता राजकन्येला याची विद्वत्ता कळली. तिने सर्वांसमोर याची छीतू केली व त्याला हाकलून दिले.

अपमानित तरुणाने तातडीने नगर सोडले व दूर अरण्यात जावून एका कालिमातेच्या मंदिरात आश्रय घेतला. तिथे त्याने केलेल्या कठोर तपश्चर्येने कालिमाता प्रसन्न झाली व तिने त्याला संस्कृतमधील सर्वोत्तम कवी केले. तो हा "कालिदास"

या दंतकथेचा पुढचा भागही असाच मनोरंजक आहे. कालिदास लगेच नगराला परतला. त्याने राजकन्येचा बंद दरवाजा ठोठावला. कालिदास म्हणाला "द्वारं देहि अनावृत्तं कपाटम् ", दार उघड, आंत येऊं दे. राजकन्येने थोड्या तिरस्कारानेच आतून विचारले " अस्ति कश्चितवाग्विशेष:?" काही सांगण्यासारखे, बोलण्यासारखे आहे कां ? ..... आणि कालिदासाने आपल्या तीन महान काव्यांची सुरवात अस्ति, कश्चित व वाक् या तीन शब्दांनी केली.

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः !
पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः !! कुमारसंभव

कश्चित कांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त: मेघदूत

वागर्थिव संप्रुक्तौ वागर्थ प्रतिप्रत्यये
जगत:पितरौ वंदे पार्वतीपरमेश्वरौ ! रघुवंश

(श्री. वल्ली यांच्या एका प्रतिसादात "मोदकेन ताडय" असा उल्लेख असलेला श्लोक होता. त्यावरून आठवलेली एक दंतकथा वर दिली आहे. श्री. बॅटमन यांची "चौरपंचाशिका" आपण पहाणारच आहोत पण दुधाची तहान पाण्यावर भागवावयाची असेल तर वा अपीटायज़र म्हणून बिल्हणची मराठी कविता http://misalpav.com/node/13683 पहा. कस्येयं तरुणि हा श्लोक श्रीसुभाषित-रत्न-भांडागारम् मध्ये ३५५/१२२ येथे पहावयास मिळेल.
शरद

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

3 Aug 2013 - 8:33 am | चित्रगुप्त

आवडले.
तरुणीशिक्षणनाटिका' आताच वाचले, तेही खूपच छान.
'पांडव प्रताप' मधील काही अद्भुत कथा सुद्धा सांगा ना. हा ग्रंथ जालावर आहे का ?
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

प्रचेतस's picture

3 Aug 2013 - 8:53 am | प्रचेतस

उत्तम स्फुट.
वा. वि. मिराशींनी संशोधनसिद्ध केलेले कालिदासाचे चरित्र येथे पाहायला मिळेल.

सुधीर's picture

3 Aug 2013 - 9:41 am | सुधीर

लिंक ऑफलाईन आहे. पुन्हा ट्राय करावी लागेल. लेख आवडला.

प्रचेतस's picture

3 Aug 2013 - 9:53 am | प्रचेतस

नाही. लिंक चालू आहे.

author च्या पुढे mirashi टायपून शोधा. तसेच तुम्हाला पुस्तक वाचण्यासाठी Alternatiff प्लग-इन डाउनलोड करावा लागेल.

सुधीर's picture

3 Aug 2013 - 7:23 pm | सुधीर

हो चालू आहे. उपयुक्त संस्थळ आहे. धन्यवाद!

विटेकर's picture

3 Aug 2013 - 10:14 am | विटेकर

+१

कवितानागेश's picture

3 Aug 2013 - 11:38 pm | कवितानागेश

मस्त. :)

इन्दुसुता's picture

4 Aug 2013 - 8:52 am | इन्दुसुता

मस्त
+१

रमेश आठवले's picture

4 Aug 2013 - 1:08 pm | रमेश आठवले

श्री शरद यांनी त्यांच्या लेखात त्याच शब्दांचा दुसरा अर्थ लावण्याची दोन उदाहरणे दिली आहेत. त्यावरून स्मरण झाले---
संस्कृत मध्ये सहा समास आहेत. त्या समासांची नावे वापरून त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दाखविणारे खालील कडवे आमच्या संस्कृत च्या सरांनी शिकविले होते.
द्वन्द्वो द्विगुरपि चाहं मद्गेहे नित्यमव्ययीभावः।
तत् पुरुष कर्म धारय येनाहं स्यां बहुव्रीहिः॥
अर्थ:
आम्ही दोघच आहोत आणि आमच्याकडे दोन गाई पण आहेत. तरीही माझ्या घरात आर्थिक चणचण असते.
तेंव्हा हे गृहस्था मला काही काम दे म्हणजे आमच्या घरात भरपूर तांदूळ असतील (समृद्धि असेल) .
समासांची नावे आणि त्याच शब्दांचा दुसरा अर्थ खालील प्रमाणे ----
१.द्वन्द्व समास - दोघे
२.द्विगु समास- दोन गाई
3 अव्ययीभाव समास - आर्थिक टंचाई
४. तत्पुरुष समास -तेंव्हा हे पुरुषा (गृहस्था)
५ .कर्म धारय समास -काम दे
६. बहुव्रीहि समास -पुष्कळ तांदूळ

पैसा's picture

4 Aug 2013 - 2:52 pm | पैसा

लेख आणि श्री रमेश आठवले यांच्या प्रतिक्रियेतील श्लोक खूप आवडला.

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2013 - 3:30 pm | स्वाती दिनेश

लेख आणि श्री रमेश आठवले यांच्या प्रतिक्रियेतील श्लोक खूप आवडला.
ज्योतीसारखेच म्हणते,
स्वाती

स्पंदना's picture

5 Aug 2013 - 6:15 am | स्पंदना

मोदकेन ताडय....शाळेत शिकवल होतं बाईंनी.
खाली क्रमशः विसरल काय?

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 11:26 am | बॅटमॅन

लेख आणि रमेश आठवल्यांचा प्रतिसाद दोन्ही जबरी आवडले. चौरपंचाशिकेबद्दल बोलायचे तर शरद यांनीच लिहिलेल्या "तरुणीशिक्षणनाटिका" या नाटकात त्याचा अगदी डीटेलवारी उल्लेख आलेला आहे.

मदनबाण's picture

5 Aug 2013 - 4:02 pm | मदनबाण

मस्त !