जे के रोलिंग - गुपचूप गुपचूप

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
29 Jul 2013 - 3:34 am

एप्रिल २०१३ मध्ये स्फीअर बुक्स या ब्रिटिश प्रकाशन संस्थेने एक पुस्तक प्रकाशित केलं. प्रकार नेहेमीचाच. लिहून लिहून बुळबुळीत झालेला. रहस्यकथा. लेखक नवखा - रॉबर्ट गाल्ब्रेथ नावाचा. विशेष कोणाचं या पुस्तकाकडे लक्ष जाण्याचं कारण नव्हतं. गेलंही नाही - पुढच्या तीन महिन्यांत त्या पुस्तकाच्या जेमतेम दीड हजार प्रती विकल्या गेल्या. समीक्षकांनी मात्र कादंबरीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. एकाने त्याला "दैदिप्यमान पदार्पण" असं म्हटलं, तर दुसर्‍याला त्यातलं ठसठशीत पात्रवर्णन आवडलं.

इंग्रजी ग्रंथप्रकाशनाचं जग मोठं क्रूर आहे. दर आठवड्याला शेकडो पुस्तकं प्रकाशित होता असतात. दिग्गजांची पुस्तकं तीन महिन्यात क्षितिजाखाली गडप होतात तिथे पहिलटकरीण लेखक - लेखिकांचा काय पाड? अमेझॉनच्या बेस्टसेलर यादीत हे पुस्तक अडीच हजाराच्या भाराखाली दाबलं गेलं.

असाच जुलै महिना उजाडला. हे पुस्तक संडे टाईम्सची वार्ताहर इंडिया नाईटच्या वाचनात आलं. तिला आवडलं. लगेच तिने ट्विटरवर लिहिलं, "पहिल्या प्रयत्नाच्या मानाने पुस्तक फारच सफाईदार आहे". सत्त्याण्णव हजार लोक इंडिया नाईटला ट्विटरवर 'फॉलो' करतात. त्यातल्या एका जुड केल्गरीकडून तिला मध्यरात्री उत्तर आलं "हे पुस्तक 'पहिला प्रयत्न' नाही!" इंडिया नाईटमधला वार्ताहरी भोचकपणा जागा झाला, आणि जूडने सांगितलं की या पुस्तकाची लेखिका आहे - Harry Potterफेम - जे के रोलिंग!

पण ही माहिती दिल्या दिल्या जूडबाई गायब झाल्या. ते ट्विट्स (ट्विटर संदेश) सुद्धा डिलीट केले गेले!

इंडियाबाईंनी हा प्रकार तिच्या बॉसला, रिचर्ड ब्रूक्सला कळवला. या बॉसने आपलं डोकं चालवलं. त्याने हे पुस्तक आणि रोलिंगची इतर पुस्तकं दोन भाषा शास्त्रज्ञांना पाठवली. हे दोन भाषा शास्त्रज्ञ - पीटर मॅकमिलन (ऑक्स्फर्ड) आणि पॅट्रिक युओला (पिट्सबर्ग) - हे forensic linguistics मधले तज्ज्ञ मानले जातात. वाङ्मयचौर्याच्या (plagiarism) तपासात त्यांनी शोधलेल्या पद्धती वापरल्या जातात. त्यांनी एकमुखाने सांगितलं, की या लेखनाची शैली रोलिंगची असण्याची शक्यता सर्वात अधिक आहे.

दरम्यान, ब्रूक्सला लक्षात आलं, की या रॉबर्ट गाल्ब्रेथचा आणि रोलिंगचा एजंट एकच आहे! एवढंच नाही, तर प्रकाशक स्फीअर बुक्स हे रोलिंगचे प्रकाशक लिटल, ब्राऊन आणि कंपनीचंच एका पिल्लू आहे!

आता रिचर्ड ब्रूक्सने एक खेळ खेळायचं ठरवलं. त्याने स्फीअर बुक्सला फोन केला आणि पुस्तकाची बेफाट स्तुती केली. लेखकाची मुलाखत घ्यायची इच्छा व्यक्त केली. स्फीअर बुक्सने त्याला नकार देताच ब्रूक्सने सरळ सरळ विचारलं, "हे पुस्तक रोलिंगने लिहिलं आहे ना?"

संडे टाईम्स हे समीक्षाजगातलं मोठं नाव आहे. त्यांना दुखवणं भल्याभल्यांना परवडत नाही. मग मात्र स्फीअर बुक्स लायनीवर आले आणि त्यांनी 'ती' रोलिंगच असल्याचं कबूल केलं!

संडे टाईम्सने लगेचच ही ब्रेकिंग न्यूज छापून टाकली. रातोरात हे पुस्तक अडीच हजाराव्या नंबरावरून पहिल्या नंबराकडे झेपावलं. आजही ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे!

जिच्या ट्विटमुळे हे सगळं घडलं ती जूड केल्गरी कोण आहे? तर रोलिंगचे वकील, रसेल्स, यांच्या फर्ममधल्या एका पार्टनरच्या बायकोची ही जिवलग मैत्रीण! त्या पार्टनरने तिला "कुण्णा कुण्णाला सांगू नकोस बर्का" म्हणून विश्वास टाकला आणि बाईने नेमकी माती खाल्ली! रोलिंगने चिकार थयथयाट केला. रसेल्सने बिनशर्त माफी मागितली आहे, पण बूंदसे गयी, वो…

प्रस्थापित लेखकाला रहस्यकथा लिहावीशी वाटावी, याची चिक्कार उदाहरणं आहेत. सत्यजित रायचा फेलुदा प्रसिद्धच आहे. अगदी मराठीतसुद्धा. गोनीदांनी "रुमाली रहस्य" नावाची एक पेशवाईची पार्श्वभूमी असलेली कादंबरी लिहिली आहे*. फास्टर फेणे कार भा. रा. भागवतांनी "भटजीबुवा"** हे पात्र असलेली दोन पुस्तकं लिहिली आहेत. जे. के. रोलिंगला त्याचा मोह पडणं स्वाभाविकच होतं.

हे रहस्य प्रकाशात आल्यावर तिने या पुस्तकाच्या संस्थळावर तिला रहस्यकथा लिहावीशी का वाटली, याच्यावर सविस्तर उहापोह केला आहे. तो मुळातूनच वाचण्यासारखा असल्याने मी इथे दुवा देत आहे. एकच महत्त्वाच्या भागाचा भावानुवाद इथे लिहितोय:

"मला रहस्यकथा लिहायची होती. तीसुद्धा कोणत्याही अपेक्षांचं जू मानेवर न ठेवता. प्रसिद्धीच्या लखलखाटापासून दूर, मला माझ्या रहस्यकथा लेखनावर खऱ्या खऱ्या प्रामाणिक प्रतिक्रिया हव्या होत्या."

रोलिंगच्या पात्रांच्या नावातसुद्धा काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो. उदा. हॅरी पॉटरच्या शत्रूच्या Voldemort या नावाचा फ्रेंचमधला अर्थ म्हणजे "मृत्यूपासून दूर पळणारा". आणि खरंच तो अमरत्व मिळवण्यासाठी नाना प्रकार करतो. तसाच, रॉबर्ट गाल्ब्रेथ या (टोपण)नावाचा (जुन्या जर्मेनिक आणि गेलिक मुळांमधला) अर्थ "famous stranger" असा आहे! (रोलिंगने संस्थळावर मात्र वेगळंच लिहिलं आहे.)

रोलिंगने दुसरा भाग लिहून पूर्ण केला आहे. सन २०१४मध्ये तो प्रकाशित होईल.

स्वत:पुरतं बोलायचं तर मला ही कादंबरी आवडली. कथानायक डिटेक्टिव्ह कारमोरन स्ट्राईक आणि त्याची सेक्रेटरी रॉबिन ही दमदार पात्रं वाटतात. त्यांच्यातलं नातं हळुवार उमलताना जाणवतं आहे. वाचकांची इच्छा असेल तर पुस्तकाचं रसग्रहण लिहावं असं मनात आहे.

*अवांतर: त्यात डिटेक्टिव्ह म्हणून चक्क घाशीराम कोतवाल आहे! अगदी आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे.
**हे पात्र जी. के. चेस्टरटनच्या फादर ब्राऊनवरून प्रेरित आहे असं भा. रां.नी प्रस्तावनेत लिहिलं आहे.

वाङ्मयमाध्यमवेध

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

29 Jul 2013 - 5:47 am | शिल्पा ब

रसग्रहण लिहा.

मुक्त विहारि's picture

29 Jul 2013 - 8:12 am | मुक्त विहारि

हेच म्हणतो...

सुधीर's picture

29 Jul 2013 - 8:57 am | सुधीर

लिहाच.

जॅक डनियल्स's picture

29 Jul 2013 - 7:14 am | जॅक डनियल्स

ओह्ह्ह हे ते रोलिंग बाईचे पुस्तक का...एकडे फार त्याचा आवाज होत होता,पण इस्टोरी माहिती नव्हती. मोठ्या लोकांच्या समस्या नेहमी वेगळ्याच असतात त्याचा मी विचार पण नाही करू शकत.
रसग्रहणाची वाट बघत आहे.

नवीन माहिती मिळाली आणि तुमची लिहायची पद्धतही मस्त आहे!
खरंच रसग्रहण लिहा.

पुस्तक परिचयाची वाट पाहते.
म्हणजे मूळ वाचायचं का नाही हे ठरवता येईल.

सौंदाळा's picture

29 Jul 2013 - 10:42 am | सौंदाळा

लेख आवडला.
लेखिका असल्यामुळे रोलिंगबाईंची इच्छा पुर्ण झाली पण बरेच चित्रपट कलाकार मात्र चाकोरीबाहेर जायचा प्रयत्न करुन आपटतात.
जर सुरुवातीलाच हे पुस्तक रोलिंगबाईंच्या नावावर आले असते तर इतके चालले असते का? आणि हा (स्वतःचे नाव नंतर उघड करण्याचा)प्रयत्न रोलिंगबाईंचाच असावा का? असे वाटुन गेले.

आदूबाळ's picture

2 Aug 2013 - 9:24 pm | आदूबाळ

हा (स्वतःचे नाव नंतर उघड करण्याचा)प्रयत्न रोलिंगबाईंचाच असावा का? असे वाटुन गेले.

असं अनेकांना वाटलं.

झालं असं:
हॅरी पॉटर मालिका संपल्यानंतर रोलिंगने प्रकाशक बदलला. ब्लूम्सबरी कडून लिटल ब्राऊनकडे गेल्या. लिटल ब्राऊनने त्यांची पहिली मोठ्यांसाठीची कादंबरी "अ कॅज्युअल व्हेकन्सी" प्रकाशित केली. [कॉन्स्पिरसी थिअरी सुरू] त्यात लिटिल ब्राऊनला मोठ्ठं नुकसान झालं. ते भरून काढण्यासाठी रोलिंगच्या नवीन पुस्तकाबाबत अशी खेळी खेळली गेली, जेणेकरून खप वाढावा. [कॉन्स्पिरसी थिअरी समाप्त]

मला यात काही तथ्य वाटत नाही, कारणः
"अ कॅज्युअल व्हेकन्सी"ला समीक्षकांनी ठोकलं असलं तरी कादंबरीचा खप मजबूत झाला. त्यामुळे लिटल ब्राऊनला तोटा वगैरे झाला असावा यावर विश्वास बसणं कठीण आहे.
समजा जरी तोटा झाला, तरी रोलिंगने ते मनावर घ्यायचं काहीच कारण नव्हतं. तिच्या एका हाकेसरशी दहा उत्तमोत्तम प्रकाशक धावत येतील. त्यामुळे रोलिंग या मीडिया सर्कसला मान्यता देईल याची शक्यता कमीच आहे.

जर सुरुवातीलाच हे पुस्तक रोलिंगबाईंच्या नावावर आले असते तर इतके चालले असते का?

मला वाटतं चाललं असतं.

एक तर रोलिंग रहस्यकथा लिहीत आहे अशी कुजबूज दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. रोलिंगचा स्नेही (आणि आघाडीचा स्कॉटिश रहस्यकथाकार) इयन रानकिन याने अशी टिप मागेच दिली होती.

दुसरं म्हणजे रोलिंग बालकथालेखिका आहे हा शिक्का आता इतिहासजमा झालाय. पाचव्या पुस्तकापासून पुढचे हॅरी पॉटरचे भाग हे टिपिकल बालकथेच्या साच्यात बसतच नाहीत. (त्यात लाडक्या पात्रांचे मृत्यू आहेत, माफक/सूचक सेक्स आहे, लोभ-क्रोध-मद-मोह-मत्सर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिलनला संपवायचं, त्याचा खून करायचा या उद्देशाने हीरो निघाला आहे.)

पिशी अबोली's picture

2 Aug 2013 - 11:16 pm | पिशी अबोली

लिंग्विस्ट लोकांना काम मिळवून देण्यासाठी प्रथितयश लेखकांनी असेच उद्योग करावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना.. ;)

मेघना भुस्कुटे's picture

3 Aug 2015 - 10:28 pm | मेघना भुस्कुटे

"वाचकांची इच्छा असेल तर..." हे काय प्रकरण आहे? इच्छेकरता अडलंय का? घ्या - मी एकदम साडेतेहेतीस हजार इच्छांची माळ पेटवून देते. लिहा.

आदूबाळ's picture

3 Aug 2015 - 10:36 pm | आदूबाळ