गज्याचे दुकान

सार्थबोध's picture
सार्थबोध in जनातलं, मनातलं
22 Jul 2013 - 3:15 pm

बऱ्याच दिवसांनी; एका अगदी लहान गावाकडे जायचा योग आला; खेडेगाव म्हणा हवे तर. मी एका मास्तरांना भेटायला गेलो होतो
तिथे एक लहान शाळा आहे असे ऐकले होते; शाळा फारच साधी आहे आणि एकूणच डबघाईला आलेली परिस्थिती आहे. शाळेला
काही मदत म्हणून वह्या-पेन, पाट्या-पेन्सिली, प्लास्टिक फळे-मार्कर-डस्टर असे साहित्य घेऊन गेलो होतो. प्रवास झाला; काम झाले,
पण एक गोष्ट कायमची लक्षात राहिली. गावात ज्यांच्याकडे काही कामाकरिता गेलो होतो, तिथे त्यांच्या आळीत एक दुकान पहिले;
किराणाचे, ते काही केल्या डोक्यातून जाईना. तुम्ही म्हणाल इतके काय आहे त्या दुकानात?;
तर आता टेकवलीच आहे लेखणी तर जरा कागद रंगवतोच.

मी ज्या शाळेला भेट द्यायला गेलो होतो तिथल्या मुलांना काही खाऊ घेऊन द्यावा म्हणून मी मास्तरांना विचारले; कि मला काही
वस्तू हव्या आहेत; जवळ कुठे काही दुकाने आहेत का? मास्तरांनी मला शाळेच्या बाजूच्या गल्लीकडे बोट दाखवून तिकडे एक दुकान
आहे आणि गावात एवढे एकच दुकान आहे असे सांगितले. दुकान मालकाचे नाव गज्या आहे असे कळले, झाले मी त्या रस्त्यातून
गज्याच्या दुकानाकडे चालू लागलो. दुतर्फा लहान लहान घरे होती. घरासमोर सारवलेले होते. घरा बाजूला रस्त्याला समांतर गटारे होती.
गटाराच्या कडेला नुकतेच सकाळी ग्रामपंचायतीच्या लोकांनी काढून ठेवलेले गाळ/कचऱ्याचे ढीग अजून तिथेच होते. घराघरातील कोंबड्या
त्या कचऱ्यावर तुटून पडल्या होत्या; पायाने कचरा विसकटून त्यातील किडे वगैरे खायचे त्यांचे काम चालू होते, काही कचरा पुन्हा
गटारात पडत होता. मी तसाच पुढे चालत गेलो. कोपऱ्यावर लांबून दुकान दिसले, खूण पटली हळूहळू पुढे चालत गेलो. जाता जाता
एक दोन निरोप द्यायचे म्हणून भ्रमणध्वनी काढून फोन लावत होतो, एक मित्र लगेच परत फोन करतो म्हणाला म्हणून लगेच दुकानात
न जाता तिथेच दुकानासमोर जरा घुटमळत राहिलो. हळूहळू दुकान कसे आहे? हे पाहण्यात मी नकळत व्यस्त झालो.

शाळेच्या बाजूच्या आळीत (गल्लीत) गज्या वाण्याचे दुकान आहे, हे दुकान पहिले आणि मला माझ्या लहानपणीच्या आठवणी
माझ्याभोवती फेर धरून नाचत आहेत असे वाटले. मी लहान होतो तेंव्हा अशी एक ३-४ दुकाने आमच्या पेठेत होती.
पण इथे हे एकच दुकान आहे; ते इतके विलोभनीय का आहे? हे आपणास बालपणी असे दुकान पाहिले असल्यास कळेल.

गज्याचे दुकान आळीतल्या रस्त्यापासून चार पावले आत आहे, दुकानाचा आकार रस्त्यास समांतर आडवा आहे. दुकानाला
निळ्या रंगाच्या फळ्यांचे दरवाजे आहेत; ज्याचा नीळा रंग आता धुळीमुळे थोडा मातकट झाला आहे. दुकानात समोर तीन लाकडी
कपाटे एकास एक जोडून एक कट्टा (काउंटर) बनवला आहे. त्या कपाटाच्या वर काचेच्या बरण्यांची भली मोठी रांग आहे.
बरण्या उंचीने कमी अधिक आहेत; त्यांचे झाकणाचे रंग जणू जीवनातील विविधता भासवतात. बरण्यांच्या काचेमध्ये बुडबुडे अडकेल
आहेत, ते बरण्या तयार होताना अडकलेले हवेचे बुडबुडे असावेत. या बरण्या पडू नयेत म्हणून बाहेरील बाजूस स्टीलच्या नळ्यांचे
आडवे कठडे बनवले आहेत, त्या नळ्याही मधेमधे तुटल्या आहेत, त्यांना तिथे तिथे सुतळीने बांधले आहे. बरण्यांच्यामागे तराजू;
वजने; वर्तमानपत्राचे रद्दीचे गठ्ठे आहेत. दुकानाच्या उजव्या बाजूस शेवटच्या कपाटाला जोडून एक माणूस जाईल अशी एक आडवी
फळी मारली आहे, ती उचलून गजा आत-बाहेर करीत असतो. गज्याची मुले फळीखालूनच वाकून येत जात असतात.

दुकानाला दरवाजा असा एक नाही फळ्या एकमेकाला जोडून एकावर एक घडी पडतील आणि उघडतील अशी दोन मोठी दारे आहेत.
ती दोनही जिथे एकत्र येतात तीथे कडी-कोयंडा आहे. फळ्या खालून इतक्या वाकड्या झाल्या आहेत कि त्यातून मांजर आरामात
ये-जा करते; दुकान बंद असले तरी.

दुकानासमोरील रस्त्यापर्यंतचा भाग शेणाने सारवला आहे, दुकानला लागून गटार आहे-त्यावर आडवे दगड टाकले आहेत,
आणि या सगळ्या जागेवर वाळके पिवळे गवताचे तुकडे पडलेले असतात. दगड आणि सारवलेली जागा जिथे भेटते
तिथे थोडे हिरवे गवत गटाराच्या ओलाव्यावर उगवलेले आहे.

गज्या लाकडी कपाटाच्या मागे डाव्या बाजूस बसतो तिथे एक जुनी सागवानी लाकडी खुर्ची आहे, तिच्यावर एक फाटकी उशी;
जुने सोगयाचे पांढरे कापड टाकून ठेवली आहे. दुकानाचा मालक गज्या त्यावर वहीतले हिशोब मांडत-तपासत बसलेला
असतो; कोणी गिऱ्हाईक आले कि कामाला लागतो; काम झाले कि परत याच जागेवर.

दुकानाच्या वरील बाजूस असंख्य लहानमोठ्या वस्तू टांगलेल्या आहेत, त्यात पिवळ्या ज्युली/बॉबीचे पुडे; पतंग; फिरक्या,
हातरुमाल, झाडण्या, तेलाचे पत्र्याचे छोटे दिवे/चिमण्या आहेत. इथे एक खूप जुना प्लास्टिकचा न्हाणी घासायचा ब्रश आहे,
तो गावात कुणीच घेतला नसावा आणि गज्याने पण तो "कशाला वापरा? विकून पैसे मिळतील" या भरवशावर तिथेच
टांगला आहे,त्याचे आवरण इतके मळले आहे, त्यावरून हा किती जुना असेल याचा अंदाज येतो; हा ब्रश गज्याने का आणला
किंवा त्याच्याकडे कसा आला हे कळणे अवघड आहे.

ज्युलीची पाकिटे एका तारेच्या आकड्यात खोवलेली आहेत, कुणी ज्युली मागितली कि गज्या खुर्चीवर उजवा पाय ठेवून
अर्धा चढतो आणि एक पाकीट ओढतो, पाकीट फाटून येते आणि पिशवीच्या वरच्या प्लास्टिकचा तुकडा त्या आकड्यातच
अडकून राहतो, अशा प्लास्टिकचा एक पुंजका त्या आकड्यात साठलेला दिसला.

एव्हाना हे पाहता पाहता माझे निरोप देण्याचे काम झाले, मी दुकानाकडे चालत गेलो. गज्याकडे मास्तरांची ओळख सांगून
गेलो, मी काय कामाकरिता आलो आहे,हे त्याने मी प्रथम सांगितले नाही तरी खोदून खोदून विचारून घेतलेच. गज्याकडून
वस्तू घेत असता गप्पा चालू झाल्या आणि बऱ्याच गोष्टी निरीक्षण करता करता समजत गेल्या.

गज्या बसतो त्यावरच्या बाजूला फळ्यांच्या मधील एका चौकटीत एक लाकडी देव्हारा आहे, त्यात लक्ष्मी; गज्याची कुलदेवी
आणि गणपती असे लहान फोटो आहेत, बाजूलाच दुकानातील उदबत्तीचा पुडा; काडेपेटी; एक लहानसा मळका तेलाचा
दिवा आहे, फळीच्या आणि देव्हाऱ्याच्या मध्ये कापसाच्या वातीची पुडी कोंबलेली दिसते.

बरण्यांमध्ये गोळया; पार्लेची चॉकलेट, पार्लेचे दोन रुपयेचे बिस्कीट पुडे, शेंगदाणे लाडू, चिक्की; गोट्या -लहान आणि मोठ्या,
भिंगऱ्या, मांजाची रिळे, षटकोनी बिस्किटे, लहान छिद्रे असलेली खारी बिस्किटे इत्यादी खजाना भरलेला असतो. रस्त्यावरून
जाणारी मुले पायात चप्पल न घालता आणि खिशात पैसे न घेता त्या बरण्यांकडे एका अनाहूत नजरेने; काही स्वप्न
पाहिल्यागत बघत जात असतात, पैसे मिळाले घरातून तर ती लालगी गोळी घेऊ असे एकमेकाला समजावत जात असतात.
एखादी मोठी मुलगी तिच्या लहान भावाला दुकानासमोरून फरफटत ओढत नेत असते- पैसे नाहीत हे त्याला समजावून सांगत
असते. गज्याचे दुकान आणि त्या खाऊच्या बरण्या म्हणजे अलीबाबाच्या गुहेसारखेच काहीसे त्या मुलांना वाटत असावे. गज्याचे
ते दुकान, खाऊच्या बरण्या आणि ती समोरून जाणारी लहान मुले पाहिली आणि मला माझ्यातील लहानपणीचा मी;
त्यांच्यात दिसल्याचे जाणवले.

आजकालच्या मॉलचा झगमगाट, आणि भारी वस्तूंची रेलचेल हि सगळी असल्या दुकानापुढे फिकी पडली. आजकालच्या
लहान मुलांना वस्तू चटकन आणि इतक्या सहज उपलब्ध झाल्या आहेत कि त्यांना या असल्या दुकानाची मजा; त्या
बरणीतून हातात सावकाश सांभाळत घेतलेल्या गोळ्या घेऊन; पळत घरी अथवा उंबराच्या पारावर सावलीत जाऊन त्याची
गोडी चाखायचा आनंद काय कळणार?

माझे काळीज जरा गलबलले, इतर वेळी आम्ही मॉल मध्ये हजार रुपये अस्से उडवून येतो; तिथे फूड-कुपन संपवायचा
एक बहाणा असतो, पण इथली परिस्थिती विदारक होती; एक-दोन रुपये पण या लहान मुलांना मिळत नसतात. गज्या मात्र
हे धीरोदात्त मनाने पाहत असतो. कारण इथे सगळेच असे गरीब; जरी काळीज हेलावले तरी तो तरी किती जणांना मदत करील?

गज्याच्या दुकानात आत लहान मोठी धान्याची पोती आहेत, गोळ्या-बिस्किटांच्या रिकाम्या प्लास्टिक बरण्यात; कडधान्ये, मसाले
भरले आहेत, दुकानातील आतील भिंतीस फळ्यांची चौकट आहे, त्यात साबण, तेल, असे लहानसहान सामान भरले आहे, मधेच
एक दोरी टांगून त्यावर शाम्पू, चहा,इत्यादी लहान वस्तूंची माळ झुलत आहे. एका कोपऱ्यात नारळाचे पोते आहे. त्यातल्या त्यात
महाग वस्तू म्हणेज चहा-कॉफी, मोठे बिस्कीट पुडे, शाम्पू बाटल्या, दात घासायची राखुंडी/पेस्ट अशा वस्तू जरा आतल्या बाजूस
ठेवल्या आहेत. तिथेच एका लाकडी खोक्यावर तेल-डालडा यांचे डबे अर्धे फोडून; आत मापट्याचे डाव घालून ठेवलेले आहेत

गज्याच्या खुर्ची बाजूला एका खणात गाय-छाप तंबाखू आणि चुना, बडीशेप असा माल-मसाला भरला आहे, तो त्याने मुद्दाम स्वत:चे
लक्ष राहील असा आत ठेवला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत गज्या या दुकानात बसून असतो, फारच कुणी अडला- नडला असेल तर
गज्याच्या एका वहीत लिहून ठेवले जाते आणि उधारीवर वस्तू दिल्या जातात. फक्त कुणास द्यावे; कुणास न द्यावे हे गज्या स्वत:
ठरवतो, मला वाटते दारुड्या माणसांना गज्या काहीच देत नाही, त्याच्या घरचे आले तर मात्र तो वस्तू देऊ करतो. त्याला कारण
तसेच झाले होते, असे त्याच्या सांगण्यात आले, एका दारुड्या माणसाने काही वस्तू घरी पाहिजेत म्हणून उधार घेतल्या, आणि त्या
कुणाला तरी फुटकळ किमतीत विकल्या आणि त्या पैशाची दारू प्यायला, नंतर हिशोबाच्यावेळी त्याच्या घरचे लोक "आम्ही हे मागितले
नव्हते" असे म्हणल्यामुळे गजाला हि गोष्ट समजली. एकूणच गज्याचा ज्याच्यावर विश्वास आहे असा माणूस म्हणजे खरोखर विश्वास
ठेवण्यास योग्य असला पाहिजे.

बोलता बोलता गज्याला जेंव्हा; मी येउन शाळेला काय मदत करणार आहे हे कळले, तसा तो एकदम आश्चर्यचकित झाला, अहो आमच्या
गावाकडे शाळेला मदत करायला कोणी अस बाहेरचा माणूस येईल असे वाटले पण नव्हते; म्हणाला. आमच्या शाळेला तुम्ही मदत करता
म्हणून गज्याभाऊंनी मला चहा पण दिला. गज्याच्या दुकानात त्याच्या शेजारी बसून चहा पिणारा; हा कोण साहेब? अशा नजरेने येणारेजाणारे
लोक मला कुतूहलतेने पहात होते.

एकूणच गज्या आणि त्याचे दुकान माझ्या फारच लक्षात राहिले आहे. गज्याला येताना काही पैसे आगाऊ रक्कम म्हणून देऊन आलो आहे.
त्याच्या त्या वहीत "माझे नाव आणि शाळा" असे त्या पानावर वरच्या बाजूला लिहिले आहे. शाळेतल्या मुलांना दर शनिवारी सकाळी
काही खाऊ त्या पैशातून द्यावा; या उद्देशाने मी ते पैसे तिथे ठेवून आलो आहे. किंवा कोणी लहान मुले बरण्या बघत पुढे जात असतील
किंवा कोणी मोठी मुलगी तिच्या लहान भावाला गोळ्या मागतो-पैसे नाहीत म्हणून ओढत नेत असेल तर त्यांना गज्याने गोळी/बिस्कीट
द्यावे आणि ते या वहीत मांडून ठेवावे असा उद्देश आहे. असे करून त्या लहानग्यांना जो आनंद होईल तो पाहायला मी तिथे नसेन पण
किती आनंद झाला असेल? तो त्या वहीत मांडलेला मला माझ्या पुढच्या भेटीत नक्की दिसेल. पुढच्या शाळेच्या भेटीत अजून काही पैसे
गज्याकडे ठेवायचे आणि हा आनंद वृद्धिंगत करत राहायचा असा मानस आहे

मला वाटते काही शे रुपये मॉल/ डीओ/ परफ्युम/ सिनेमा /पिझ्झा -बर्गर अशा वस्तूंवर आपण असे बऱ्याच वेळा सहज खर्च करतो.
थोडा हिस्सा बाजूला काढून डीओ-परफ्युमपेक्षा अधिक आल्हाददायक आणि पिझ्झा-बर्गर पेक्षा अधिक मनमुराद आनंद हा त्या गावातल्या
मुलांना झालेल्या आनंदातून आपल्याला मिळत असेल तर त्याची मजा काही औरच आहे.

आजपासून गज्याने खाऊ दिल्यावर कुणाला काय आनंद झाला असेल, हा विचार मी परत येताना करत होतो.

www.saarthbodh.com

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

22 Jul 2013 - 5:15 pm | अनिरुद्ध प

लेख आवडला.

प्रसाद१९७१'s picture

22 Jul 2013 - 5:16 pm | प्रसाद१९७१

चांगला उपक्रम आहे

मोहनराव's picture

22 Jul 2013 - 5:16 pm | मोहनराव

छान आहे गज्याचे दुकान!!

छान लेखन. बरण्यांतल्या पदार्थांची यादी आणि त्याच्यासमोरुन जाणार्‍या मुलांची मनःस्थिती वाचून स्वतःच्या लहानपणी अस्सेच बरण्यांकडे आशाळभूतपणे बघण्याचे दिवस आठवले. सर्वच मुलांच्या बाबतीत गरीबी म्हणूनच असं व्हायचं असं नाही. घरचं ठीकठाक असूनही मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत लहान गावांत तरी नव्हती.

दुकानाचं वर्णन एकदम फिट्ट..

घरचं ठीकठाक असूनही मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत लहान गावांत तरी नव्हती.

हे बाकी खरं! १-२ रुपये मागतानाही भीती वाटत असे असा काळ अजूनही आठवतोय :)

मी_देव's picture

26 Jul 2013 - 9:45 am | मी_देव

+१ .. अगदी..

दादा कोंडके's picture

22 Jul 2013 - 5:32 pm | दादा कोंडके

आवडलं.

देवांग's picture

22 Jul 2013 - 6:05 pm | देवांग

आमच्या इथे पण असेच एक दुकान होते. दुकानाचे नाव होते "प्रपंच भांडार". पण सगळे लोक त्याला लक्ष्मन बुरुडाचे दुकान म्हणायचे. तिथे पाहिजे ती गोष्ट मिळायची. पण आम्हाला लहानमुलांना तिथे मिळायचा भवरा,गोट्या, पतंग,भिंगरी, गोळ्या, १० पैशाची ३ छोटी बिस्कीट, खायची भिंगरी, लिमलेटच्या, दुधाच्या,साखरेच्या,श्रीखंडाच्या आणि पेपर मिंटच्या गोळ्या, देवाचे व हीरोचे फोटो, प्लास्टिकचा बॉल . कधी घरच्यांनी ५० पैसे दिले तर तिथे सोरट होते. त्याच्याकडे कित्येक स्कीम यायच्या, उदा. रामायण,शेहनशहा. आता गाव, शहर झाले आहे. बुरुड पण वारला …. त्याच्या दुकान करून टेम्पो घेतला …असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ।

सार्थबोध's picture

23 Jul 2013 - 9:06 am | सार्थबोध

धन्यवाद अनिरुद्ध प, प्रसाद१९७१, मोहनराव,गवि, बॅटमॅन, दादा कोंडके, अमित तलथि जी

आपण माझा लेख वाचल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियांबद्दल मी आभारी आहे

-सार्थबोध

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2013 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख. तुमची निरिक्षणशक्ती जबरदस्त आहे... आणि ते निरिक्षण शब्दात मांडण्याची हातोटीसुद्धा.

तुमचा लेख आवडला आणि उपक्रम सुद्धा..
आमच्या गावाला पण असेल एक दुकान होते, त्याची आठवण झाली. उन्हाळ्यात गावाला गेल्यावर आज्जी आम्हा मुलांना १-१ रुपया द्यायची आणि मग ते घेउन त्या दुकानातुन आम्ही बॉबी घेउन खायचो. मस्त दिवस होते ते. :)

सुजित पवार's picture

23 Jul 2013 - 4:00 pm | सुजित पवार

खुपच सहि झाला आहे हा लेख. माझ्या चुलत मामचे असेच दुकान आहे. खुप आठवनि ताज्या झाल्या.. लिहित रहा...अनि आप्ल्या उपक्रमाला शुभेच्च्या...

मन१'s picture

24 Jul 2013 - 9:27 am | मन१

शब्दांनी उभे केलेले चित्र आवडले.

सार्थबोध's picture

24 Jul 2013 - 9:31 am | सार्थबोध

धन्यवाद इस्पीकचा एक्का, मृणालिनी, सुजित, मन१ जी

आपण माझा लेख वाचल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियांबद्दल मी आभारी आहे

कोमल's picture

24 Jul 2013 - 11:01 am | कोमल

आवडेश.. :)

मंदार कात्रे's picture

24 Jul 2013 - 12:19 pm | मंदार कात्रे

आपला उपक्रम प्रशंसनीय आहे ,तसाच अनुकरणीय देखील आहे!

किसन शिंदे's picture

24 Jul 2013 - 1:13 pm | किसन शिंदे

नॉस्टॅल्जिक करणारं लेखन!!

चिर्कुट's picture

26 Jul 2013 - 1:52 am | चिर्कुट

असंच..अगदी असंच दुकान माझ्या सख्ख्या मामाचं आहे.

लहानपणी आजोळी गेल्यावर तुम्ही वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत. नॉस्टॅल्जिक झालो एकदम. :)

उपास's picture

26 Jul 2013 - 2:43 am | उपास

छान वर्णन केलय.. हरिकाका आणि मगनकका आठवले गिरगावातले शाळेसमोरचे!
अवांतर -
>>आजकालच्या लहान मुलांना वस्तू चटकन आणि इतक्या सहज उपलब्ध झाल्या आहेत कि त्यांना या असल्या दुकानाची मजा;
आणि
>>किती आनंद झाला असेल? तो त्या वहीत मांडलेला मला माझ्या पुढच्या भेटीत नक्की दिसेल. पुढच्या शाळेच्या भेटीत अजून काही पैसे..
गज्याकडे ठेवायचे आणि हा आनंद वृद्धिंगत करत राहायचा असा मानस आहे

आता बघा, प्रश्न तुमचाच आणि उत्तरही तुम्हीच दिलेत. अहो, आजकालचे आईवडिल मुलांच्या डोळ्यात हाच आनंद शोधतात आणि त्यांना परवडतं म्हणून आणि परवडत तेच घेतात. आता पूर्वी इतकी अपत्यही नसतात संख्येने.. :)

मस्तच वर्णन केलत.. लहानपण आठवलं.. अशी दुकानं म्हणजे फुल्ल ऑफ खजाना वाटायची.. मॉलही फिके पडतील त्यापुढे..

गुरुचरण's picture

22 Aug 2013 - 4:13 pm | गुरुचरण

भयंकर निरीक्षण शक्ती आहे तुमची सुरेख जुन्य आठवणी जाग्या झाल्या