कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.
लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती. नंतर आजीने गवंड्याकडून सळया घालून सिमेंटची चूल करून घेतली. मी थंडीत रोज उठल्या बरोबर चुलीजवळ जाऊन शेकायला बसायचे. चाळा म्हणून मधून मधून लाकडे ढकलणे, पात्या, कागद जाळणे असा खोडकरपणा चुलीबरोबर करायचे. असे करताना बरेचदा निखार्याचा चटका बसे किंवा पाती किंवा कागद जळत हातावर येत असे.
सकाळी आजीची देवपूजा झाली की आजी चुलीतील निखारे धुपांगणात घेऊन त्यावर धुप घालून ते देवाला दाखवायची मग ते पूर्णं घरात फिरवून घराभोवतीही फिरवायची. फार प्रसन्न वाटायचं तेव्हा. दसरा आला की ह्या चुलीला गेरू किंवा शेणाने सारवले जायचे. दसर्याच्या दिवशी आई-आजी चुलीची पुजा करायच्या. मी कधी आजारी वगैरे असले की आजी दृष्ट काढून चुलीत टाकायची. आजी सकाळी चहा घ्यायला चुली जवळच बसायची. पहिला कपातील ती थोडा चहा नैवेद्य म्हणून चुलीत टाकायची. मला फार गंमत वाटायची ते पाहून. काही दिवसांनी मी पण तिचे अनुकरण करू लागले. अगदी लहान होते तेव्हाचे आठवते की ह्याच चुलीची राख आई-आजी भांडी घासण्यासाठी घ्यायच्या. नंतर शायनेटची पावडर आली मग राख बंद झाली.
पूर्वी गावात ज्यांची गुरे असत ते शेणी थापून जाळण्यासाठी इंधन म्हणून विकायचे. शेणी म्हणजे शेणाच्या गोल थापून केलेल्या सुकवलेल्या जाड चकत्या. आमची वाडी असल्याने आम्हाला कधी लाकडांचा तोटा नव्हताच चुलीसाठी उलट आमच्या वाडीतूनच आमच्या आजूबाजूचे लोक चुलीसाठी लाकडे घेऊन जायचे. कुणाकडे लग्न कार्य असले की आधीच वडिलांना सांगून ठेवायचे गावकरी. माझ्या वडीलांना सगळे अण्णा म्हणतात. अण्णा अमुक महिन्यात लाकडे लागतील. मग एखादे सुकलेले झाड किंवा झाडांची डुखण (मोठ्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या) लग्नघराच्या नावे होत. वडील एकही पैसा त्यांच्याकडून घेत नसत. तेव्हा तशी लाकडांना किंमतही नव्हती. माझ्या आईने प्रार्थमिक शिक्षिकेची नोकरी केली. ती दुपारी शाळेतून आली की लाकडे गोळा करण्यासाठी वाडीत जात. मी पण तिच्याबरोबर जात असे. माझ्या हातात मावतील तितक्या काड्या छोटी लाकडे मी आई बरोबर गोळा करून आणत असे.
मला आठवते आजी चुलीवर रुचकर पदार्थ बनवायची. हे पदार्थ गॅस ऐवजी चुलीवरच रुचकर लागायचे. त्यात असायचे भानवल्या. भानवल्या बनवण्यासाठी खास बिडाचा खडबडीत तवा असायचा. ह्यात आंबोळ्या, घावन पण छान व्हायचे. उकडीचे पदार्थ जसे शेंगा, करांदे, कोनफळे अशा पदार्थांना चुलीवर शिजवल्याने विशिष्ट चव येते.
तांदूळ गिरणीतून दळून आणला की त्याचा कोंडा निघे. त्या कोंड्याचे आजी पेले बनवायची. हे कडवट गोड लागायचे. हे करताना पाहायला मला गंमत वाटायची. हे एका मोठ्या टोपात पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून त्यात छोटे छोटे घरातील पेल्यात ह्या कोंड्याचे गूळ घातलेले मिश्रण आजी भरायची आणी ते पेले वाफवायची. ह्या कृतीमुळेच कदाचित ह्याचे नाव पेलेच आहे. चुलीवरची भाकरी पण मस्त खरपूस पापुद्रा आलेली आजी करायची. ह्या भाकरी बरोबर खायला त्याच चुलीच्या निखार्यावर आई-आजी वाकट्या, बोंबील, बांगडा भाजून द्यायची. बांगडा भाजला म्हणजे अख्ख्या गावाला वास जायचा. ह्या चुलीत भाजलेल्या बांगड्याचा वास इतर कुठल्या घरातून आला तरी मला लगेच भूक लागायची. त्या काळी मटण महिन्यातून एखादं दिवशी असायचे. ते चुलीवरच. चुलीवरच्या मटणाची चवच काही न्यारी असते.
तसेच आम्ही कधी कधी चुलीत एखादा बटाटा, रताळं, करांदा, कोनफळ, बाठ्याची कोय असे प्रकार भाजायचो. ह्यांची ती करपट मिश्रीत रुचकर चव अप्रतिम लागायची. दिवसभरासाठी चाळा म्हणून चिंचेच्या सीझन मध्ये चिंचोके भाजायचे. भाताची कापणी झाली, शेतातून भारे वाहून नेले की शेतात जायचे आणि शिल्लक राहिलेल्या कुठे कुठे पडलेल्या तांदळाच्या कणश्या (कणसे) गोळा करायच्या आणि त्या आणून चुलीत निखार्यावर टाकायच्या मग त्याच्या फाट फाट लाह्या होत. ह्या लाह्या खाणेही एक छंदच असायचा.
थोडी मोठी झाले म्हणजे ५ वी ६ वीत असेल तेव्हा मग घरातल्यांचे चुलीचे काम झाले की मी भातुकली आमच्या पडवीतच खर्या चुलीवर खेळायचे. मग ह्या चुलीवर कधी मुगाची भाजी, कधी अंड्याचे कालवण, भात, अंडे तळणे, असे प्रकार करू लागले. हे प्रकार मी बिचार्या घरातल्यांनाही खायला द्यायचे आणि ते माझी वाहवा करायचे.
माझी चुलत भावंडे दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरी यायची. अशा वेळी आम्ही पार्टी करायचो. पार्टी म्हणजे आम्ही स्वतः वाडीत एखाद्या झाडाखाली चूल मांडून जेवण किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवायचो. ही चूल बनवण्यासाठी आम्ही तीन विटा घ्यायचो. जास्त करून बटाट्याची भाजी, भात किंवा अंड्याचे कालवण असायचे कारण हेच करायला सोपे असायचे. पण अंड्याचे कालवण बर्याचदा पचपचीत व्हायचे. हे जेवण आम्ही चुलीजवळच केळीच्या पानात जेवायचो. वाट्या वगैरे नसायच्या त्यामुळे कालवण पानातून ओघळायचे. ते पचपचीत कालवण पण गरम-गरम भाताबरोबर खाताना मौज वाटायची, शिवाय आपण केल्याचा एक वेगळाच आनंद असायचा. एकदा तर कोजागीरी निमित्त बटाटे वडे पण केले होते.
मला असे वाटत होते की लग्न ठरल्यावर आपल्याला चुलीचा सहवास मिळणार नाही. कारण लग्न ठरलेल्या घरी चुलीला जागाच नव्हती. पण सासर्यांनी आधीच जवळ वाडी घेऊन ठेवली होती व तिथे घराचे काम चालू केले होते. लग्न झाल्यावर साधारण दीड वर्षातच आम्ही नवीन वाडीत राहायला गेलो. मला चुलीची अत्यंत आवड असल्याने व घराच्या मागील बाजूस भरपूर जागा असल्याने मी तिथे तीन विटा मांडून चूल पेटवली. बहुतेक रविवारी मी त्यावर मटण शिजवू लागले. चूल पेटविल्याने सासूबाई माझ्यावर खूश झाल्या कारण त्यांना चूल आवडते आणि नोकरी करूनही मी हा छंद जोपासते ह्याचे घरात सगळ्यांनाच कौतुक वाटते.
हळू हळू आम्ही पाठी पडवी बांधली. एक दिवस मी मिस्टरांबरोबर जाऊन एका कुंभारवाड्यातून मातीची चूल, तवी (कालवण करण्यासाठीचे मातीचे भांडे) खापरी (भाकरी करण्याचा मातीचा तवा) घेऊन आले व पडवीत ठेवले. संध्याकाळी कामावरून आले की मी चूल पेटवायचे. रोज नाही पण काही सणांच्या व्रतांच्या दिवशी आम्ही धुपांगणात धुप जाळून घरभर फिरवतो. त्यामुळे तोच जुना प्रसन्नपणा मला अनुभवायला मिळतो.
संध्याकाळी चूल लावली की माझा पुतण्या शेकण्यासाठी माझ्या बाजूला बसून अभ्यास करायचा. चुलीच्या निखार्यावर तोही वाकट्या बोंबील भाजू लागला. साधारण वर्षानंतर मातीची चूल पाण्याने खराब झाली तेव्हा वाईट वाटले. मग मी परत विटाच मांडल्या. आम्ही वरचेवर रविवारी मटण/चिकन चुलीवरील तवीत शिजवून झाडाखाली पारावर एकत्र जेवायला बसतो. त्यामुळे मला पूर्वीचे जास्त काही हरवल्यासारखे वाटत नाही. कधी कधी मी भातही ह्या तवीत शिजवते. मातीच्या भांड्यातील पदार्थांना वेगळीच रुची असते. धुराचा व दाहकतेचा थोडा त्रास होतो पण त्यापेक्षा मला त्यातून आनंद जास्त मिळतो.
माझ्या मोठ्या मुलीला श्रावणीलाही समजायला लागल्यापासून चूल आवडते. अजूनही चुलीवरचे जेवण म्हटले की तिला आनंद होतो. माझ्या बरोबर ती पण येते चुलीजवळ. आता दुसरी मुलगी
राधा हिला शेक, धुरी ह्याच चुलीच्या निखार्यांपासून दिली जाते. माझ्या मुली माझा वारसा चालवतील की नाही हे माहीत नाही आणि माझी बिलकुल सक्तीही नाही. पण चूल म्हणून एक इंधनाचे साधन असते किंवा असायचे, मातीची भांडी असतात किंवा असायची आम्ही ती वापरली आहेत ह्याचे ज्ञान, अनुभव त्यांना आहे तसेच त्या हे अनुभव पुढे त्यांच्या पुढच्या पिढी बरोबर शेअर करु शकतील.
हा लेख शनिवार, २७/०४/२०१३ ला लोकसत्ता - वास्तुरंग पुरवणी (पुणे आवृत्तॉ) मध्ये तसेच ०१/०६/२०१३ ला इतरत्र प्रकाशीत झाला. http://epaper.loksatta.com/120968/indian-express/01-06-2013#page/26/2
प्रतिक्रिया
18 Jul 2013 - 1:17 pm | गणपा
दुसरा पॅराग्राफ तंतोतंत जुळणारा.
बाकीचा लेखही बर्याच जुन्या आठवणींना उजाळा देणारा.
मस्त लिहिलस गं.
18 Jul 2013 - 1:31 pm | त्रिवेणी
खुप छान वाट्ले वाचुन. मी आज्जी बरोबर तिच्या माहेरी जात असे तेव्हा रोज चुलीवरचे जेवण खुप आवडायचे. आज्जीपण मी लहान होते तेव्हा कधी कधी चुलीवर करायची स्वयंपाक.
18 Jul 2013 - 2:14 pm | उद्दाम
तुमच्या मुली तुमचा वारसा नक्की चालवतील.
18 Jul 2013 - 2:27 pm | आतिवास
लेख आवडला.
पण एक प्रश्न पडला - चुलीसाठी तुम्ही लाकडं कुठून आणता? कोणती लाकडं वापरता?
18 Jul 2013 - 2:28 pm | विक्रान्त कुलकर्णी
छान.. लेख आवडेश...
18 Jul 2013 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा
18 Jul 2013 - 3:02 pm | प्रभाकर पेठकर
मला माझे बालपणच आठवले. अगदी तंतोतंत सर्व नसले तरी अर्ध्यांहून जास्त अनुभव मलाही लाभले.
आमच्या घराच्या ओट्यावर, चांगला ७-८ फुट रुंद आणि २५ फूट लांब, ताई आणि तिच्या मैत्रीणी भातुकली खेळायच्या. त्यात गुळ, शेंगदाणे, पोहे वगैरे पदार्थ (खरे) असायचे मला त्याचा मोह असायचा. त्यांमुळे मीही त्यांच्या खेळात सामील व्हायचा प्रयत्न करायचो. ताईच्या मैत्रीणी ह्याला आक्षेप घ्यायच्या. ताईलाही कानकोंडं व्हायचं. मग ती आईकडे तक्रार करायची. आई तिला समजावयाची,' अग! घे त्याला खेळायला. तो काही त्रास द्यायचा नाही. लहान भाऊ आहे नं तुझा?' ताई वैतागायची, 'अग पण तो मुलगा आहे. मुलींमध्ये का खेळतो? मला माझ्या मैत्रीणी हसतात.' मग आई तिला कांही तरी 'कानमंत्र' द्यायची. आईने काय सांगितलं हे मला कळायचं नाही. पण गुळ, शेंगदाणे आणि पोहे मला खुणावत असायचे. मला खेळात सामावून घेताना ताई मला बाजारहाट करायला पाठवायची (खोटा-खोटा) . सामानाची यादी देऊन 'जा हे घेऊन ये' असा हुकुम सोडायची. मी कुरकुर केली तर 'तू पुरुष आहेस नं! बाजारहाट पुरुषांनीच करायचा असतो. आम्ही (बायका) स्वयंपाक करतो तो पर्यंत.' मी एक चक्कर टाकून लगेच परतलो तर ताई ओरडयची, 'एवढ्यात कसा झाला बाजारहाट? जा. दूरच्या दुकानात जा.' ह्या मुली गुळ, शेंगदाणे आणि पोहे संपवतील आणि आपल्याला काही मिळायचे नाही ही मला काळजी असायची. कधी बाजारहाट कधी 'नोकरीवर जा' असे करून नेहमी मला बाहेर हाकलायच्या. कधी कधी दोन-चार शेंगदाणे, गुळाचा खडा, चमचा भर कच्चे पोहे (खरे), खोटी खोटी आमटी, खोटे चटणी-लोणचे वगैरे भरगच्च जेवण मिळायचे. मी खुश. एकदा जेवण झाले की मी पळून जायचो. आणि त्या सर्वजणी सुखात भातुकली खेळायच्या.
अगदी मुंबईत राहूनही आमच्या घरी चुल होती. एक मोठी आणि बाजुलाच छोटी अशा दोन चुली लाकूडफाट्याच्या आणि एक छोटी बादलीची पोर्टेबल चुल होती त्यात बदामी कोळसे वापरले जात. ह्या चुलीवर आई मस्तं दणगेलं बनवायची. खालीवर निखार्यांवर खरपूस भाजलेले दणगेलं, कच्चे तेल घालून खायचो. अजूनही आठवणीने पाणी सुटते तोंडाला.
आंघोळीचे पाणी तापवायला तांब्याचा बंब होता. डोक्याला लावायचे तेल थंडीच्या दिवसात गोठले की ह्या बंबात तापलेल्या पाण्यात तेलाची बाटली धरायची की थोडे (डोक्याला लावण्यापुरते) वितळले की ते तेल वापरायचे. पावसाळ्यात शाळेचा गणवेष (बहुधा चड्डीच) ओली असेल तर तापलेल्या बंबाला बाहेरून लावून ठेवली की १० मिनिटात वाळायची.
आई साईबाबांची भक्त होती. दर गुरुवारी धुपदाणीत रसरशीत निखारे ठेवून त्यावर धुपाचे खडे टाकले जायचे. खडे टाकल्यावर येणारा सुगंधी धूर मला आवडायचा. आरती नंतर ती धुपदाणी घरभर फिरवायची जबाबदारी माझ्याकडे असायची. मी अत्यंत आवडीने पार पाडायचो.
आजारपणात दृष्ट काढण्याचे प्रकार आमच्या घरातही क्वचित घडले आहेत. ही 'उतरवलेली' दृष्ट शेगडीत टाकली आणि 'तडतड' असा आवाज आला म्हणजे 'दृष्ट लागली होती' असे समजले जायचे. चुलीची राख घरची भांडी घासायला वापरली जायची. त्या काळात अजून राख विकायला कोणी दारावर येत नव्हते. तो प्रकार पुढे सुरु झाला. मला वाटते शेगड्या मागे पडून रॉकेलचे स्टोव्ह आले त्यामुळे भांडी घासायला घरची राख मिळेनाशी झाली, त्यामुळे असेल. पण आमच्याकडे कधी राख विकत घ्यावी लागली नाही. हे विक्रेते स्मशानातली राख सुद्धा विकतात असा एक विचार जनमानसात होता.
शेण्या कधी वापरल्याचे आठवत नाही. पण अंगणात सडा टाकायला, सारवायला शेण लागायचे. ते आणायचे कामही माझ्याकडे होते. एक जुनी बादली होती ती घेऊन मी 'मिशन'वर निघायचो. शेजारीच गोठा होता तिथे गाईचे शेण मिळायचे. तसेच, रात्रीच्या वेळी, गल्लीत कुठल्या झाडाखाली गाई बसतात/झोपतात हे निरिक्षणातून मला माहित असायचे तिथे जाउन गाईंनी टाकलेले शेण मी आणायचो. अनुभवातून कुठल्या शेणाची 'प्रत' चांगली आहे आणि कुठले शेण 'ब्येक्कार' आहे हे मला कळायचे. चांगल्या, ताज्या शेणाचा वास मला आवडायचा. सारवणे आणि शेणसडा ही कामेही मी केले आहे.
तुमच्या ह्या लेखाने, बालपणीच्या त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. आज, गेली ३२ वर्षे इथे रखरखित वाळवंटात राहतो आहे. बालपण नुसते आठवणीतच राहीले होते. ते पुन्हा एकदा जगण्यास मिळाले असे वाटले. आता मुंबईतलं ते आमचं, आमच्या बालपणीचं जुनं घर मोडून तिथे नविन इमारत उभी राहणार आहे. समृद्ध बालपणाच्या हृद्य आठवणींचे साक्षीदार, ते घर, उद्या काळाच्या पडद्या आड जाईल. ती ओट्यावरची भातुकली, दिवाळीत कठड्यावर, पायर्यांवर, मागच्या दारी आणि न्हाणीघराच्या खिडकीवर लावलेल्या, बाहेरच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर उजळलेल्या, पणत्या, शेणसडा, हौशीने केलेले मातीचे किल्ले, दसर्याला दारावर लावलेली तोरणे, हळदीकुंकवाला आईने, दोर्यांनी विणलेले, पानाफुलांचे तोरण सर्व सर्व आता एक 'आठवण' म्हणूनच उरणार आहे.
मला खात्री आहे ह्या विचारांनी जेवढे दु:ख आम्हाला होते आहे तेवढेच, कदाचित त्याहून जास्त, ते घर आता व्यथित असेल. साथ, संगत, सोबत संपली, आपले कर्तव्य पूर्ण झाले अशीच भावना त्या घराचीही असेल. छायाचित्र रुपात ते घर आमच्या नजारेसमोर आणि त्याच्या स्मृती आमच्या मनांत मरेपर्यंत राहतील.
18 Jul 2013 - 3:11 pm | प्रकाश घाटपांडे
लेख व प्रतिसाद दोन्ही एकदम झकास.
18 Jul 2013 - 3:23 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. "कृतार्थ होणे" म्हणजे नक्की काय ते पहायचे असल्यास पेठकरकाकांचा प्रतिसाद पाहणे.
18 Jul 2013 - 7:56 pm | सुबोध खरे
पेठकर साहेब
आपला प्रतिसाद आणी मुळ लेख मला बालपणी घेऊन गेला. जन्म मुंबईत गेला तरी दोन्ही आजोळच्या घरी चुली असत पण आईच्या माहेरी नागाव ( अलिबाग) ची आठवण विशेष आहे. माझी आई आणी तिच्या दोन बहिणी आणी त्यांची मुले असे आम्ही माझ्या नववी पर्यंत दर उन्हाळ्यात जात होतो ( व्हेकेशन क्लास) हा प्रकार तेंव्हा ऐकलेला नव्हता. दुर्दैवाने त्यावर्षी आजी गेली आणी नंतर ते प्रचंड दुमजली घर शेणाने सारवलेली जमीन,मागचे आणी पुढचे अंगण मागे असलेली वाडी त्यातील रायवळ आंब्याची, नारळाची झाडे, आतली (स्वयंपाक घरातील) आणी बाहेरची(पाणी तापवण्याची) चूल त्यात नारळाच्या साली(चूड) टाकून पेटवलेली चूल त्यावर कला झालेला पाण्याचा हंडा या आठवणी तशाच राहिल्या. आता मामानी घर मुंबई फाशनचे (सेल्फ कंटेण्ड ब्लॉक, टाईल्स वगैरे ) केले आहे. पण आता तेथे जावेसे वाटत नाही. कालाय तस्मै नमः
19 Jul 2013 - 9:23 am | मी_देव
वा.. लेख आणि काका तुमचा प्रतिसाद वाचून मन भरुन आले. खुप आठवणी जाग्या झाल्या!!
18 Jul 2013 - 3:25 pm | दिपक.कुवेत
आता उरण मधे आलो कि एक दिवस तुझ्याकडे चुलीवरच्या जेवणाचा बेत फिक्स...जास्त काहि नको....त्या मौ लुशलुशीत तांदुळाच्या भाकर्या, अंड्याचं किंवा कोलंबीच कालवण आणि फिश फ्राय......बास!
18 Jul 2013 - 3:27 pm | दिपक.कुवेत
तो जाड तांदुळाचा भात. काय टेस्टि लागतो!
18 Jul 2013 - 3:32 pm | जागु
प्रभाकरजी तुमचा प्रतिसाद भिडला मनाला. फार छान वाटले तुमच्या आठवणी वाचून.
18 Jul 2013 - 3:39 pm | प्रभाकर पेठकर
प्रभाकरजी??
नको नको. नुसते प्रभाकर किंवा प्रभाकर पेठकर किंवा पेठकर काका असे काही म्हणा.
18 Jul 2013 - 3:32 pm | जागु
दिपक नक्की.
18 Jul 2013 - 3:36 pm | मन१
आठवणींचा पट....
थोडंसं असच काहिसं मीही इथे लिहिलय :- http://www.misalpav.com/node/22647
18 Jul 2013 - 3:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त लेख. लहाणपणीच्या आजोळच्या आठवणी जाग्या झाल्या.
18 Jul 2013 - 5:50 pm | निवेदिता-ताई
:)
18 Jul 2013 - 3:45 pm | garava
तुमचा लेख आणि पेठकरांचा प्रतिसाद दोन्हि मस्त..
18 Jul 2013 - 4:01 pm | कपिलमुनी
दिवाळीच्या सुट्टीमध्ये अभ्यंग स्नान आणि चुल याच्या छान आठवणी आहेत ..
पहाटे पहाटे थंडी मध्ये कुड कुडत चुलीसमोर बहीण भाउ गर्दी करून बसायचो ..त्याची आठवण झाली ..
जागु तै , तुमच्या सुगरणपणाची चिन्हे लहानपणापासूनच दिसू लागली होती :)
18 Jul 2013 - 4:04 pm | जागु
ठिक आहे पेठकर काका.
मन, एक्का, गारवा, कपिलमुनी धन्यवाद.
18 Jul 2013 - 4:15 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
18 Jul 2013 - 4:28 pm | चावटमेला
सुंदर लेख आणि तितकाच सुंदर पेठकर काकांचा प्रतिसाद.
18 Jul 2013 - 4:37 pm | मदनबाण
जागु तै इज बॅक अगेन ! :)
18 Jul 2013 - 7:39 pm | रेवती
तुझं खरच कौतुक वाटतं जागु! आम्ही काकांकडे कोकणात गेल्यावर चुलीचा अनुभव अनेक वर्षे घेतलाय त्याची आठवण आली. परसदारच्या चुलीवर अंघोळीचे पाणी तापवणे, नंतर नाष्त्याची पेज असे त्यावर होत असे. बाकी स्वयंपाकही त्यावर होत असे पण नंतर कुकींग गॅसमुळे चुलीचा वापर पाणी तापवण्यापुरताच राहिला.
18 Jul 2013 - 9:17 pm | राही
पेठकरकाकांचा प्रतिसाद अतिशय आवडला. मुंबईच्या उपनगरात राहिल्यामुळे आमच्याकडेही घर, अंगण, माड,आंबे होते. मागीलदारी चूल आणि बंब ढणढणत असायचा. तो बंब म्हणजे एक वेगळेच प्रकरण होते. भला उंच पण अरुंद तांब्याचा सिलिंडर. त्यात तापलेले पाणी उंचीमुळे वरच्या थरात येई. तिथे आउट्लेट म्हणून हत्तीच्या सोंडेसारखा लांब पितळी पाइप असे. गरम पाणी बाहेर येण्यासाठी आत थंड पाणी ओतावे लागे. त्यासाठी सिलिंडरच्या वरच्या गोलाकृती पृष्ठभागात एका मोठ्या छिद्रातून एक लांब नळी आत सोडलेली असे. थंड पाणी थेट खाली जाई आणि वरचे गरम पाणी बाहेर ढकलले जाई. ही म्हणजे बंबाची आदिम आवृत्ती असावी. शाळासोबती घरी आले तर या बंबावरून आम्हाला चिडवत.
बाकी आंब्याचे बाठे भाजून तुरट कोय खाणे, चवळीच्या शेंगा, आठळ्या, करांदे भाजणे हा आमचाही सुट्टीच्या दिवशी रिकामपणचा उद्योग होता. इतर दिवशी शाळेतून घरी येईपर्यंत चूल थंड झालेली असे. सुरुवातीला स्वयंपाक स्टव्ह आणि शेगडीवर होई. एक पोर्टेबल चूल असे. पण तिला कुंभारीण म्हणत, चूल म्हणत नसत. म्हणजे ती 'कुंभारीण उचलून आण जरा' असे म्हणत. नंतर गॅसचे स्टव्ह आले. दिवे,पणत्या, रांगोळ्या,आकाशकंदिल, गोठलेले खोबरेल, सगळे तसेच. आता आठवणी गोठून राहिल्या आहेत. अशा कधीतरी वितळतात.
जागू, मायबोलीवर लेख आवडल्याची प्रतिक्रिया दिली होतीच. इथेही तसेच. लेख खूप आवडला. तुझ्या उत्साहाची कमाल आहे.
18 Jul 2013 - 9:24 pm | सखी
खरच कौतुक वाटतं तुमचं एकविसाव्या शतकातही ह्या गोष्टी टिकवून आहात, जमलं तर हा वारसा चालवायला आवडेल... तसेही लोक कॅम्पफायर करत असतातच मग हे का नसावे.
थोडसे अवातंर: २००३-०४ मध्ये इथे अमेरीकेत मोठा ब्लॅकआउट झाला होता, आमच्याकडे २-३ दिवस वीज नव्हती, त्यामुळे पाणीही येत नव्हते. बाहेर काही गोष्टी विकत मिळायची मुश्किल, दुकानांपर्यंत जाणेही अजुन अवघड कारण बहुतेक कारमधले पेट्रोल संपलेले. ब्रेड वगैरे तत्सम गोष्टी संपल्यावर मी बाहेर ३ विटांची चुल मांडून पिठलं+भात आणि पोळ्या केल्या, शेवटची पोळी केल्यावर जोरात पाऊस आला, आणि आम्हाला प्यायचे पाणी साठवता आले.
18 Jul 2013 - 9:27 pm | सस्नेह
भाग्यवान आहात जागुताई, अजून चुलीशी नातं जोडून आहात !
18 Jul 2013 - 9:58 pm | jaypal
लेख एकदम फ्क्कड जमलाय.
अवांतर = आमच्या गावी चुली शक्यतो घरातच असत त्या मुळे संपुर्ण घरात किंवा घरातील कपड्यांना देखिल त्या धुराचा विषीष्ठ वास यायचा. हा लेख वाचताना तो परत एकदा दरवळला.
18 Jul 2013 - 10:29 pm | विजुभाऊ
जागु तै. एकदम फक्कड लेख.
पेठकर काका.
आमच्या पार्ल्याच्या वाडीत मस्त चूल आहे.बंब देखील आहे. लोकमान्य सेवासंघाच्या ग्राउंड समोर गायी बसतात.पार्ले स्टेशनावरून घरी येताना तेथून मी मस्त पैकी एक टोपली शेणी गोळा करून आणतो.
पार्ल्याच्या थंडीत सकाळी पाण्यासाठी बंब पेटवलेला असतो. त्यात कधी कधी शेंगा /रताळे वगैरे भाजून खातो. पार्ल्याच्या थंडीत बंबातील निखार्या समोर भाजलेले रताळे खात खात शेकायची मजा काही औरच आहे.
कधी कधी माडावरचे थोडेसे जूनवट शहाळे देखील भाजतो, आतले शेकलेले गरम गरम खोबरे गुळ किंवा लसणाच्या चटणीबरोबर खाउन बघा. फास्टरफेणेप्रमाणे टॉक्क्क्क्क्क्क्क कराल
पार्ल्याच्या वाडीत कौलारु घरात मातीच्या दोन चुली आहेत. त्यावर केलेले फोडणी दिलेले घट्ट वरण अन उन उन ज्वारीची भाकरी अन त्या सोबत कोल्हापूरहून आणलेली तिळकुटाची चटणी अन कांदा म्हणजे आहाहाहा स्वर्ग.
जेवण झाले की मी दुभाषी मैदानात खेळायला जातो.लेझीम खेळतो, विटीदांडू किंवा खो खो, कबड्डी खेळतो. संध्याकाळी हातपाय धुवून कांबळी वाडीतल्या इतर मुलांसोबत परवचा म्हणतो.
घुर्र्.........घुर्र्....घुर्र...
ऑ.काय! काय!! काय!!!.... विजुभाऊ जागे व्हा जागे व्हा.स्वप्नं बघणं पुरे. लॅपटॉपवर कळफलक बडवा. क्लायंटच्या एस्केलेशन मेल ला तडक उत्तर द्या
19 Jul 2013 - 4:25 am | स्पंदना
आहा! चुल!
माझ्या माहेरी अजुनही आहे. निखार्यावर भाजलेली,टम्म फुगलेली भाकरी पाहिली की पहिला तुपाची बरणी शोधायची अजुनही खोड आहे.
घर गरम रहाण्यासाठी म्हणुन आम्ही अजुनही चुल पेटवतो.
मस्त हो जागू. फार छान आठवणी जागवल्यास.
पेठकर काका अन विजुभाऊही सुरेख प्रतिसाद देउन गेले.
19 Jul 2013 - 4:49 am | रामपुरी
सुंदर लेख आणि तेवढाच मस्त पेठकर काकांचा प्रतिसाद. जुन्या आठवणी जाग्या केल्यात. आता हे जागं झालेलं मोहोळ बसायला किती दिवस लागतील कुणास ठाऊक. :(
19 Jul 2013 - 9:42 am | नक्शत्त्रा
खुप सुंदर लेख. पेठकर काका न चे मनोगत ते माजे हि. मामाचे गाव अठवला. गोबर गस, LPG पण आले आहेत आता. आणि अजून हि तिथे चुलीवरच स्वयपाक करतत जेव्हा आम्ही जातो …खुप चं छा न आणि रुचकर जेवण लागते ते. गेली बरीच वर्षे ह्या सुखाला मुकले आहे . पण आता इथे हि चूल मांडतेच एरवी BBQ चालतो न. मग थोडा हा वेगळा प्रकार पण chiense लोकांना आवडेल . जागु धन्यावाद
19 Jul 2013 - 10:05 am | शिल्पा ब
चुलीवरच्या स्वयंपाकाची चवच निराळी ! पण चुलीसाठी सरपण लागते त्यासाठी खुप झाडं तोडली जातात अन हे मी स्वत: पाहीलंय. गवर्या फारतर आग पेटवण्यासाठी वापरता येतात पण सरपणाशिवाय चुल पेटत नाही...वरच्या फोटोत दाखवलं आहेच. या लेखाने आजीची आठवण अजुनच तीव्र झाली.
असो. बाकी जागुतै इथे फक्त लेख टाकण्यापुरतीच येते याची नोंद घेतली आहे.
19 Jul 2013 - 11:49 am | जागु
अपर्णा, रामपुरी, नक्षत्र, शिल्पा धन्यवाद.
शिल्पा तुला व्यनि करते.
19 Jul 2013 - 11:53 am | स्वाती दिनेश
जागु, तुझा लेख आणि पेठकरांचा प्रतिसाद दोन्ही आवडले.
स्वाती
19 Jul 2013 - 5:08 pm | Gawade Jawaharl...
लेख खूपच आवडला …. आजही सुट्टीमध्ये मामाच्या गावी जावून आस्वाद घेत आस्तो ……………।
19 Jul 2013 - 10:47 pm | अर्धवटराव
लेख वाचताना प्रचंड भूक चाळवली.
करा लेकहो चैन .. खा.. रोज चुलीवरचे बोंबील खा, मटण खा.
अर्धवटराव
20 Jul 2013 - 2:46 pm | मोदक
लेख हेरून ठेवला होता. आता निवांत वाचला.
चुलीवरचा स्वयंपाक वेगळ्याच चवीचा असतो आणि त्याची एकदा चटक लागली की सुटता सुटत नाही.
घराला मोकळेढाकळे टेरेस मिळाल्याने लगेचच एक कोळशाची शेगडी, कोळसे, लाकडाच्या ढलप्या वगैरे गोष्टी जमा केल्या व चुलीचा आनंद पुन्हा शोधण्यास सुरूवात झाली.
सुरूवातीला शेगडी पेटवता येत नव्हती.. आता बर्यापैकी जमते ;-)
शेगडीवर वांगी भाजून भरीतासाठी पाठवल्यावर कांदे, बटाटे, लसूण, बीट, कणीस, गाजर, रताळी वगैरे निखार्यांवर भाजून खाणे म्हणजे ऐश आहे ऐश!!!!
चुलीवर भाजलेल्या वांग्याचे भरीत (त्यातला कांदाही चुलीतच भाजलेला!) भाकरी, शेंगदाण्याची चटणी, खरडा, तेल आणि नंतर डेर्यातले वाळा घातलेले गार पाणी - वाह्ह!
धन्यवाद जागुतै!
20 Jul 2013 - 10:42 pm | लॉरी टांगटूंगकर
एक कोळशाची शेगडी, कोळसे, लाकडाच्या ढलप्या वगैरे गोष्टी
हे कधी केलंस बे?
21 Jul 2013 - 2:57 am | मोदक
लै दिवस झाले.. तुझा मुक्काम नेमका पावसाळ्यात होता त्यामुळे विषय निघाला नाही!
20 Jul 2013 - 3:05 pm | पैसा
प्रतिक्रियाही मस्त आहेत. माझ्या सासरच्या घरात अजून चुली आहेत. बरेच लोक असले की स्वयंपाक त्यावर होतो. एरवी पाणी तापवायला उपयोग होतो. गरम राखेत मांजर बसते. हिवाळ्यात निखार्यांचा पुरसा करता येतो. सरपणासाठी लाकडे मुद्दाम तोडायची गरज नसते. बरीच वाळकी पाने फांद्या असतातच. फक्त जेव्हा कधी धूर होतो तेव्हा मात्र सगळ्यांना पळ काढायची वेळ येते. सगळा स्वयंपाक ज्या माउल्यांना चुलीवर करावा लागतो त्यांच्याबद्दल मला प्रचंड सहानुभूती आहे.
20 Jul 2013 - 3:15 pm | प्राजक्ता पवार
छान लिहले आहेस
20 Jul 2013 - 3:25 pm | पिशी अबोली
मस्तच लेख...
आमच्या घरी चूल आहे जिचे मुख्य उपतोग सेम पैसाताईंनी सांगितल्यासारखे. एखादे नवीन मांजर राखेत बसत नसेल तर त्याला आम्ही 'आधुनिक मांजर' म्हणतो.. ;)
घराजवळच्या झाडांची पाने, फांद्या, माडाच्या झावळ्या, करवंट्या इ. गोष्टी सरपण म्हणून पुरतात. चुलीतली राख झाडांच्या मुळात घालता येते. काजूबिया, आठळ्या भाजणे वगैरे उद्योग चुलीत होतात. भरीत करण्यासाठी वांगी, काजूचे कच्चे फळ वगैरे पण आई भाजते. थंडीत तर चुलीजवळ बसण्याचे सुख अवर्णनीय... :)
बाकी आमच्या बर्याच नातेवाईकांच्या घरी चूल आहे.. गरे तळणे, आंब्याचा साठवणीचा रस आटवणे वगैरे कामं चुलीवरच.. खूप मजा येते एकूण...
शहरात रहावं लागलं तर चूल खूप मिस करेन मी... :(
20 Jul 2013 - 3:47 pm | जागु
स्वाती, गावडे, अर्धवटराव, मोदक, पैसा, प्राजक्ता, अबोली धन्यवाद तुमचे अनुभवही छान आहेत.
आम्हालाही लाकडे तोडावी लागत नाहीत. झाडावरून पडलेल्या वाळक्या फांद्या, करवंट्या, नारळ सोलून निघालेली साले, नारळाच्या झावळ्यांची लाकडेच पुरेशी होतात. कारण रोज लावतच नाही. कधीतरीच लावतो.
20 Jul 2013 - 7:41 pm | बॅटमॅन
चूलपुराण मस्त आवडले. घरी चूल कैकदा वापरल्या जाते, पण पाणी तापवायला :) अर्थात त्याचाही ताव काही वेगळाच असतो. नारळाच्या सरपणाचा वापर होतो तेवढाच.
बाकी चुलीवरचा स्वयंपाक फारसा कधी खाल्ला नाही, पण प्रतीक्षेत आहे. जरूर खाल्ल्या जाईल.
20 Jul 2013 - 10:45 pm | लॉरी टांगटूंगकर
लेख कमालच,
पेठकरकाकांचा प्रतिसाद वाचून अजून आणखीन एक झकास लेख वाचल्याचा आनंद आला.
21 Jul 2013 - 1:30 am | अभ्या..
मस्त आठवण. पेठकर काकांचा प्रतिसाद पण सुरेख.
मला लहानपणी फक्त चुलीत काड्या सारत जाळ बघत बसायची आवड होती आणि त्यासाठी मोठ्या लोकांकडून एक टीपीकल धमकी पण मिळत असे. ;)
21 Jul 2013 - 1:51 am | बॅटमॅन
काडी सारायची सवय तेव्हापासूनची आहे तर ;)
21 Jul 2013 - 1:56 am | अभ्या..
लहानपणी काड्या, आता ओंडके. ;)
बॅट्या तू सारलेल्या ह्या काडीसाठी तुला बिना फुंकणीची चूल पेटवण्याची सजा देण्यात यावी.
21 Jul 2013 - 11:56 am | बॅटमॅन
बाब्बौ ओंडके =)) =))
अन विना फुंकणीच्या चुलीवरची मृगजळ घालून केलेली पेज तुला दिल्या जाईल.
21 Jul 2013 - 9:55 am | सुधीर
माझी चूलीशी (गॅस शेगडीशीपण) इतकी जवळीक नाही. पण लेख खूप छान उतरला आहे. एकदम भावस्पर्शी.
21 Jul 2013 - 1:31 pm | पद्मश्री चित्रे
कायम मुंबै त राहिल्यामुळे आणि माहेर् -सासर पण इथेच असल्याने,गाव ही नसल्याने चुलीशी गट्टी तर दूर ओळख पण नाही. हा लेख वाचून वाटलं कि मी कित्ती मजा "मिस" केली आहे . पण लेख आणि प्रतिक्रिया वाचून समाधान मानलं …
21 Jul 2013 - 3:33 pm | मुक्त विहारि
आवडला...
21 Jul 2013 - 9:54 pm | मितभाषी
छान लेख, आवडला.
22 Jul 2013 - 11:45 am | जागु
सुधिर, फुलवा, मुक्त-विहारी, मितभाषी धन्यवाद.
22 Aug 2013 - 8:49 pm | शुचि
या लेखातील हे वाक्य वाचून पुढील कविता शोधली. इथे देते आहे.
अंतिम कौर तक / स्वप्निल श्रीवास्तव
» रचनाकार: स्वप्निल श्रीवास्तव » संग्रह: ताख पर दियासलाई
गुंधे हुए आटे के भीतर
छिपी हुई हैं अनगिनत रोटियाँ
और वे औरतें जानती हैं
जो जाँते में पीसती हैं पिसान
जिनके भीतर धधक रहा होता
है तन्दूर
जो बहुत दूर से कुँए से
खींचती हैं जल
जंगल से बीनती हैं लकड़ियाँ
जो चूल्हे की पूजा करती हैं
और भोजन बनाने के बाद
पहला कौर अग्नि को
समर्पित करती हैं
ये औरते जानती हैं
रोटियों के अन्दर छिपी हुई है
अनन्त भूख
और हर रोज़ उनकी तादाद
कम होती जा रही है
चौके में बढ़ते जा रहे हैं लोग
वे तो भूखे पेट सो जाती हैं
लेकिन अन्तिम कौर तक
गेहूँ और चूल्हे के सम्मान की
रक्षा करती हैं.