महाराष्ट्रात जन्माला येऊन आषाढीची वारी माहित नसणारा माणूस विरळाच. त्यातही मराठी माणसाला, विशेषत: माझ्यासारख्या सोलापूरकडे आजोळ असणा-या माणसाला वारीबद्दल आकर्षण नसणं म्हणजे सच्च्या क्रिकेटप्रेमीला सचिनची खेळी लाईव्ह पाहण्याबद्दल आकर्षण नसण्याइतकंच अशक्य. लहानपणी दोन तीनदा गावी वारी पाहिली, तेव्हापासूनच तिचा एक भाग होण्याची इच्छा मनात घर करून होती. ४ वर्षांपूर्वी या इच्छेला मूर्त स्वरूप मिळालं. कॉलेजमधल्या एका मित्राने वारीतल्या वैद्यकीय शिबीराला स्वयंसेवक म्हणून येण्याबद्दल विचारलं, आणि तेव्हापासून दरवर्षी वारीला जाण्यास सुरूवात झाली.
ठाण्याच्या काही डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक सेवेच्या हेतूने "सह्याद्री मानव सेवा मंच (SMSM)" या संस्थेची स्थापना १९८२ साली केली. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या दुर्बल समाजासाठी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी अनेक उपक्रम ही संस्था चालवते. २७ वर्षांपूर्वी या डॉक्टरांना जाणवले की आषाढीच्या वारीत सहभागी होणा-या ब-याचशा व्यक्ति वय वर्ष ५० किंवा त्यावरील असतात. ही वारी या वारक-यांच्या प्रतिकारशक्तीची जणू परिक्षाच असते. वाईट हवामान, पाण्याचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा अनेक अडचणींना यांना सामोरं जावं लागतं. तेव्हापासून वारीमार्गावर SMSM दोन वैद्यकीय शिबीरं आयोजित करते. पहिलं शिबीर दिवेघाटापासून सासवडपर्यंत असतं. पुणे ते सासवड हा वारीमार्गातला सर्वात कठीण आणि मोठा टप्पा वारक-यांना एका दिवसात पार करायचा असतो. त्यातच मधल्या दिवेघाटातल्या चढणीच्या रस्त्यामुळे ब-याच लोकांना पाय दुखणे, स्नायू आखडणे, श्वसनाचे त्रास असे त्रास होत असल्यामुळे दिवेघाटानंतर पहिलं शिबीर सासवडमध्ये घेतलं जातं. तर वारीच्या अखेरच्या टप्प्यात नातेपुते आणि माळशिरसमध्ये शिबीराचा दुसरा टप्पा घेतला जातो.
यंदा चवथ्या वर्षी वारी याचि देहि याची डोळा अनुभवायला मिळाली. वारक-यांचा उत्साह, प्रतिकूल परिस्थितीतही विठोबाच्या दर्शनाची त्यांची आस, उन्हापावसाची तमा न बाळगता डोक्यावर तुळशी वृंदावन आणि खांद्याला सामानाची पिशवी घेऊन चालणा-या बायका, तर टाळ मृदुंगाच्या गजरात भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जाणारे वारकरी, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बायकामंडळींची चालणारी स्वयंपाकाची गडबड, ओळखीपाळखीची तमा न बाळगता निस्सीम मनाने एकमेकांना मदत करणारे वारकरी, वारीमागून साफ़सफ़ाई करत जाणारे काही वारकरी, सगळंच अप्रतिम.
वैद्यकीय शिबीरात तर भन्नाट अनुभव येतात. एक ५५-६० वर्षांची माऊली शिबीरात आली, तेव्हा तिचा पाय घोट्याजवळ फ़ाटून आतलं हाड तुटलं होतं आणि मांस अक्षरश: बाहेर आलं होतं. इमरजन्सी केस म्हणून डॉक्टरांनी तिथल्याच एका टेंपोला ऑपरेशन थिएटर बनवून इलाज केला. तशाही परिस्थितीत तिचा उत्साह मात्र दांडगा. पायाला अपघात कधी झाला विचारलं तर म्हणाली, झाले ५-६ तास. आणि तशा स्थितीत ही माऊली तेवढं अंतर पायी चालत आली. दिंडीच्या गाडीत बसून यायचंस, या डॉक्टरांच्या सल्ल्यावर "पायी वारी केली न्हाई तर इठोबा कसा पावणार आमाला?" या तिच्या उत्तराने सगळ्यांनाच निरुत्तर केलं.
दुस-या एका काकांना त्यांच्या दिंडीतल्या इतर मंडळींनी उचलून शिबीरात दाखल केलं. रक्तातली साखर प्रचंड कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आली होती आणि ते जवळपास बेशुद्धीत होते. ताबडतोब सलाईन लावलं, आणि ५-१० मिनीटांत ते शुद्धीवर आले. "कोणती दिंडी चाललीये?" या प्रश्नाला दिंडी क्रमांक सांगितल्यावर, "आवं माजी दिंडी गेली की पुढं निघून" असं म्हणत हातात टोचलेली सुई खेचून बाहेर काढली आणि आपल्या दिंडीला सामील व्हायला हे काका पळत सुटले. हे आणि असे बरेच अनुभव शिबीरात आले.
असो. वारीला जाण्याची इच्छा असलेल्या पण काही कारणास्तव न जमलेल्या मंडळींकरीता हा धागा. सोबत फ़ोटू आहेतच.
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल ।
डॉक्टर मंडळींची बस..
तपासणीसाठी बसलेली डॉक्टर मंडळी..
आम्ही पडीक कामगार..
सह्याद्री मानव सेवा मंच चा कंपू.
शिबीराची पूर्वतयारी
चिमुरडी माऊली आणि तिची सेवा.
सह्याद्री मानव सेवा मंचाचे मुख्य आधार - ठाण्याचे डॉ. सापटणेकर.
सलाईन विभाग
वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट.
ही अशीच फुकट वेळेतली फोटूग्राफी..
मॅक्रो चा मोह आवरला नाही.
या फोटूसाठी विशेष धन्स टू सौरभ उप्स अन स्पावड्या.. :)
अजून काही मॅक्रो..
आणि बोके..
प्रतिक्रिया
17 Jul 2013 - 11:42 am | मोदक
स्तुत्य उपक्रम..
अकुशल कामगारांची गरज असल्यास हाक मारणे!
17 Jul 2013 - 11:44 am | नानबा
आम्ही पण अकुशल कामगारच आहोत. डॉक्टरांना लागतील त्या वस्तू हातात नेऊन देणे, सलाईन तयार करणे आणि संध्याकाळी कचरा गोळा करून पेटवणे एव्हढेच आमचे काम. :))
17 Jul 2013 - 11:45 am | सुहास झेले
व्वा माऊली ... एक वेगळा अनुभव :)
17 Jul 2013 - 11:53 am | नानबा
धन्यवाद. :)
पुढल्या वर्षी येण्याचे करावे.
17 Jul 2013 - 12:35 pm | सुहास झेले
यप्प... नक्कीच. बोलव आठवणीने. विसरू नकोस :) :)
17 Jul 2013 - 11:59 am | यशोधरा
उत्तम उपक्रम. काही हातभार लावता येण्याजोगा असेल, तर अवश्य सांगावे.
17 Jul 2013 - 11:09 pm | कवितानागेश
चांगला उपक्रम.
17 Jul 2013 - 12:49 pm | स्पा
सहि रे
प्रथम , खूपच भारी .
लोकांच्या सहनशक्तीची पण बाकी कमाल , खरच विठ्ठलालाच त्यांची काळजी
17 Jul 2013 - 1:03 pm | स्पंदना
पाहुनी सेवा खरी
पाहुनी सेवा खरी
थांबला हरी
गोप हा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी॥
17 Jul 2013 - 1:03 pm | दिपक.कुवेत
उपक्रम आणि फोटो दोन्हि स्तुत्य. खरचं एकदा वारी अनुभवायचीच आहे. ईकडे राहुन तो चान्स कधी मिळणार हे तो विठठलच जाणे.
17 Jul 2013 - 1:45 pm | प्रभाकर पेठकर
वारीचा अनुभव घेण्याची अज्जिबात इच्छा नाही. पण डॉक्टर मंडळी आणि तुम्ही सर्व त्यांचे साहाय्यक, ह्यांच्या सेवाभावी वृत्तीला आदरयुक्त प्रणाम. तुम्ही करीत आहात तीच खरी इश्वर सेवा. कांही आर्थिक मदत हवी असल्यास व्यनि करावा. बाकी इतक्या दूर असल्याने शारीरीक मदत अशक्य आहे.
17 Jul 2013 - 2:53 pm | सुधीर
स्त्युत्य उपक्रम.
17 Jul 2013 - 2:55 pm | आदिजोशी
एकच सल्ला. कॄपया कचरा पेटवू नका. विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा नेचरफ्रेंडली मार्ग शोधा ही विनंती.
18 Jul 2013 - 7:27 am | स्पंदना
आदिजोशी तो मेडीकल कचरा आहे. अन तो पेटवणे हाच योग्य मार्ग आहे.
नाहीतर महानगर पालिकेत जाऊन पैसे भरुन तो नष्ट करावा लागतो.
17 Jul 2013 - 2:56 pm | नि३सोलपुरकर
वाह प्रथम उत्तम उपक्रम
डॉक्टर मंडळी आणि तुम्ही सर्व त्यांचे साहाय्यक, ह्यांच्या सेवाभावी वृत्तीला आदरयुक्त प्रणाम.
बाकी मोदक ह्यांच्याशी १००% सहमत.
17 Jul 2013 - 3:10 pm | आतिवास
चांगला उपक्रम आहे.
असे अनेक लोक सातत्याने काही ना काही प्रयत्न करत असतात चांगला बदल घडवून आणण्याचा. ही आशादायक बाब आहे.
पण अर्थात बदल व्हायला अजून "बरेच काही" व्हायला हवे -तुमचा वाटा तुम्ही उचललात हे कौतुकास्पद आहे.
17 Jul 2013 - 3:10 pm | नानबा
@ यशोधरा , सुधीर , नि३ - सर्वांचे धन्यवाद. कोणालाही येण्याची इच्छा असल्यास पुढील वर्षी नक्की या. १० लाख वारकर्यांच्या सेवेसाठी ६०-७० जण कमीच पडतात.
@ पेठकर काका - आर्थिक हातभाराची गरज भासतेच. एका दिवसाच्या शिबीराचा खर्च अंदाजे ३-३.५ लाख रुपयांच्या आसपास येतो. आणि हा सगळा भार मंचाला स्वतःच्या बळावर उचलता येत नाहीच. पुढल्या वर्षी नक्की सांगेन.
@आदिजोशी - या विषयावर डॉक्टर मंडळींशी मी चर्चा केली. काही दुसरा मार्ग अवलंबता येईल का याबद्दल बोललो. बराचसा कचरा हा सिरींजेस, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या असा प्लॅस्टिक स्वरूपात असतो. त्यामुळे जमिनीत पुरणे हा उपाय करता येत नाही. तसंच सगळा कचरा गोळा करून सोबत आणून इकडे त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणं हा प्रचंड किचकट, खर्चिक आणि अशक्यप्राय उपाय आहे. कारण एका दिवसाच्या शिबीरात अंदाजे ६०००-८००० सलाईन्स लावली जातात, १५०००-२०००० इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे इतका प्रचंड कचरा सोबत आणणं शक्य होत नाही. तरी या विषयाबद्दल काहीतरी दुसर्या मार्गाबद्दल विचार चालू आहेत.
17 Jul 2013 - 3:26 pm | मोदक
सगळा कचरा गोळा करून सोबत आणून इकडे त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणं
याचे कारण कळाले नाही. निव्वळ विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईपर्यंत कचरा वागवण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.
प्रत्येक शिबीराच्या जवळपास एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याची सिस्टीम तयार असेलच (अशी आशा आहे!) तुम्ही फक्त त्यांना तुमचा कचरा सप्रेम भेट द्यायचा.
आणखी निश्चिततेसाठी एखाद्या आरोग्य मंत्र्याकडून / तत्सम अधिकार्याकडून वारीमार्गावरील कोणत्याही प्रा.आ. केंद्राला "असा कचरा विनातक्रार स्वीकारण्याचा विनंतीवजा आदेश" बनवून घ्या.
17 Jul 2013 - 3:33 pm | आदिजोशी
एस. टी. वाल्यांशी बोलून असा कचरा तालुक्याच्या सरकारी रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची सोय करता येते का ते पहा.
17 Jul 2013 - 5:19 pm | यशोधरा
नक्की येईन.
17 Jul 2013 - 3:16 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद. जरूर सांगा. नक्की मदत करेन.
17 Jul 2013 - 5:03 pm | त्रिवेणी
मस्तच.
मी ही आर्थिक मद्त करु शकेन. प्लीज पुठ्च्या वर्शी जरा लवकर सांगाल म्हणजे मदत वेळेत पोहोचवता येईल.
17 Jul 2013 - 9:55 pm | धमाल मुलगा
भ्येटशिला तवा 'माऊलीऽऽ' म्हणून पाया पडिन गा. सध्या यवडा व्हर्चुअल दंडवतच घ्या.
17 Jul 2013 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
__/\__/\__/\__
18 Jul 2013 - 12:09 am | नाच ग घुमा
मी ही आर्थिक मद्त करु शकेन.नक्की कळ्वा.
22 Jul 2013 - 9:31 pm | पैसा
फारच चांगला उपक्रम! दंडवत घ्या. पुढच्या वर्षी काही करता येईल का ते तेव्हा पाहू. मिपावरून काही लोक एकत्र जाऊ शकतात का ते.
23 Jul 2013 - 4:15 pm | दादा कोंडके
छान उपक्रम.
अरेरे. या लोकांना शारिरीक उपचारांबरोबर मानसिक उपचारांचीही गरज आहे.
23 Jul 2013 - 4:27 pm | स्वाती दिनेश
उत्तम उपक्रम..
फोटो मलाच दिसत नाहीयेत का?
स्वाती
23 Jul 2013 - 5:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
उत्तम उपक्रम, दर वर्षी उत्साहाने सहभागी होणार्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन,
फोटो मलाही दिसत नाहिये.