२०५० सालातला भारत. नक्षलवादी फक्त दुर्गम भागात असायचे ते आता सर्व भारतभर पसरले होते.बहुतेक भाग त्यांनी काबीज केला होता. बरेच राजकीय नेते मारले गेले होते. उरलेले दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात मिलिटरीच्या संरक्षणाखाली रहात होते. बाकीच्या देशांत त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता. तरीही बाहेरच्या जगात अजून 'नक्षलीस्तान' ला मान्यता मिळाली नव्हती. शहरातल्या जनतेला अंगमेहनतीची कामे करावी लागत होती. नक्षलींनी जी शहरे काबीज केली, तेथील वस्तीत जाऊन सर्वप्रथम तिथल्या खाजगी गाड्या जाळून टाकल्या. एसयूव्ही सारखी खाजगी वाहने स्वतःच्या वापरासाठी बळजबरीने घेतली. फ्लॅटस मधे रहाणार्या सर्व लोकांना बाहेर काढून सोसायटीतल्याच मोकळ्या जागेत झोपड्या बांधून रहायला भाग पाडले. रिकाम्या फ्लॅटस मधे गरीब, आदिवासी आणि मोलमजुरी करणारे राहू लागले. जे सुशिक्षित लोक 'त्यांच्यासाठी' काम करायला तयार झाले त्यांना झोपड्यांत राहू दिले, बाकीच्यांना मारुन टाकण्यात आले. अनेक शहरांचे कॉन्सट्रेशन कँपमधे रुपांतर झाले. जे निरुपयोगी, म्हातारे, अशक्त लोक होते त्यांना खतम करण्यात येऊ लागले.
शहरातला व्यापार्,उदीम हा नक्षलींच्या बंदुकीसमोर काम करु लागला. बँकातले पैसे नवीन शस्त्रे विकत घेण्यासाठी वापरले जाऊ लागले. प्रत्येक शहरांत सर्वोच्च स्थानी देखरेख करण्यासाठी चिनी अधिकार्यांची नियुक्ती झाली. धर्म हा शब्द उच्चारायलाही बंदी झाली. बरेच सुशिक्षित भारताबाहेर पळून जाऊ शकले, पण त्यापैकी फारच थोडे युरोप वा अमेरिकेत आश्रय घेऊ शकले. बाकीचे पाकिस्तान, बांगलादेश इथल्या तुरुंगात खितपत पडले.
एरवी सगळ्या जगातल्या घडामोडीत नाक खुपसणार्या अमेरिकेने हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून हात झटकून टाकले. कारण तोपर्यंत अमेरिकाही आर्थिक दृष्ट्या चीनची मांडलिक झाली होती. दिल्लीतल्या उरल्यासुरल्या राजकीय नेत्यांनी सर्व जगाकडे मदत मागायचा प्रयत्न केला होता पण कोणीच मदतीला धावून आले नाही. युनो तोपर्यंत चीन व रशियाची बटीक झालेली होती. बीबीसीने घेतलेली नक्षलप्रमुखाची मुलाखत जगभर दाखवण्यात आली. त्यात त्याने ठामपणे सांगितले की भारतात ब्रिटिशांपासून आदिवासींवर प्रचंड अत्याचार झाले आहेत. तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यावरही ती पिळवणुक वाढतच गेली. आमचा प्रथम उद्देश हा संपूर्ण विनाश हाच आहे. त्यानंतरच आम्ही विकासाबद्दल विचार करु. या देशातल्या सर्व उच्च्वर्णीयांमधे ही पिळवणुकीची शिकवण भिनली आहे. त्यामुळे या सर्वांना ठार मारले तरच हा देश पिळवणुकीच्या 'जीन्स' चा कचाट्यातून सुटेल. त्यांना एकदम ठार मारणे आम्हाला शक्य नाही म्हणून आम्ही त्यांना सक्तीने शिक्षक बनवले आहे. एकदा सर्व आदिवासी, मागास जमातीचे लोक शिकले की त्यांच्याच हस्ते आम्ही या पापींना जिवंत पुरणार आहोत. हिटलरने कैद्यांना जाळून टाकून चूक केली. यांना मोठ्या प्रमाणावर पुरले तर आमच्या पुढच्या पिढ्यांना त्यापासून खनिज तेल मिळेल. या दूरदृष्टीमुळे भविष्यात आमचा नक्षलीस्तान स्वयंपूर्ण होईल.
पण हा त्यांचा स्वप्नविलास फार काळ टिकला नाही, कारण शेवटी चीनने सर्व नक्षल्यांनाही गोळ्या घालून ठार मारले आणि भारत,नेपाळ,पाकिस्तान,बांगलादेश,लंका,ब्रह्मदेश यासहित संयुक्त चिनी साम्राज्य या भरतवर्षावर स्थापन झाले.
प्रतिक्रिया
14 Jun 2013 - 8:40 pm | पैसा
भयानक आहे. पण चीन ज्या प्रकारे आर्थिक आणि भौगोलिक आक्रमणे करत आहे आणि नक्षलवाद्यांचेही वाढते हल्ले पाहता ही शक्यता आहेच. अगदीच वाईट स्वप्न म्हणून सोडून देण्यात अर्थ नाही.
14 Jun 2013 - 11:49 pm | मंदार कात्रे
horrible¬!
15 Jun 2013 - 9:07 am | शिल्पा ब
हं..अशक्य नाही.
15 Jun 2013 - 10:43 am | चित्रगुप्त
होऊ शकते असे सुद्धा.
खरोखर आपल्या सरकारला यावर आत्तापासून उपाय योजना करायला हवी. ती कोणती, यावर इथे उहापोह व्हावा.
15 Jun 2013 - 11:08 am | मदनबाण
15 Jun 2013 - 12:16 pm | चित्रगुप्त
हा लेख फार महत्वाचा आणि गंभीर आहे, आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे, असे वाटते. या धाग्याचे नाव बदलून जर 'संपूर्ण भारतावर चीनचा कब्जा' असे काहीतरी करता आले, तर जास्त वाचक आणि जास्त चर्चा घडेल, असे वाटते.
असे करता येइल का?
15 Jun 2013 - 4:08 pm | स्पंदना
हे महत्वाच.
भयानक लिहिता तिमा तुम्ही.
15 Jun 2013 - 8:50 pm | श्रीरंग_जोशी
कल्पनाविस्तार जमलाय पण ही समस्या सध्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा फारशी वाढेल असे वाटत नाही.
बरेच लोक उदारमतवादाला, संयमाला कमजोरी समजतात पण प्रत्यक्षात मोठ्या काळाचा विचार केल्यास तीच खरी शक्ती असल्याचे सिद्ध होते. संकुचितता, आक्रमकता या गोष्टी थोड्या काळापर्यंत परिणाम दाखवू शकतात नंतर पाला पाचोळ्यासारख्या उडून जातात.
15 Jun 2013 - 9:20 pm | क्लिंटन
ही complacency एक ना एक दिवस आपल्याला भयंकर गोत्यात आणणार आहे. असो.
15 Jun 2013 - 11:10 pm | आदूबाळ
+१
16 Jun 2013 - 3:20 am | श्रीरंग_जोशी
आपल्या देशात १९६७ पासून नक्षलवाद अस्तित्वात आहे. जे ४६ वर्षांत जमले नाही ते अचानक पुढे कसे काय जमेल?
दोन / अडीच दशकांपूर्वीच्या दूरदर्शनवरील रात्रीच्या बातम्या आठवून बघा. कश्मीर घाटी में / पंजाब में यहा यहा मुठभेड / हमला हुई / हुआ और इतने लोगों की मौत हुई... पंजाबमध्ये तर दहशतवाद कधीच संपला आहे अन काश्मीरमध्ये संपण्याच्या मार्गावर आहे. काश्मीरमधली सुधारलेली परिस्थिती वर्षभरापूर्वी प्रत्यक्ष अनुभवली आहे.
त्यामुळेच मुख्य प्रवाहात राहणार्यांनी नक्षलवादाचा बागुलबुबा करू नये असे वाटते.
स्वतःच्या देशाच्या व्यवस्थेच्या व मुल्यांच्या सामर्थ्यावर विश्वास असणे ही माझासाठी तरी समाधानाची बाब आहे.
16 Jun 2013 - 6:21 pm | क्लिंटन
काश्मीरात भारतविरोधी तत्वे अगदी १९४७ पासून होतीच पण प्रत्यक्ष प्रमाणावर दहशतवाद सुरू झाला १९८९ मध्ये.हिंदूंना भारत आणि मुस्लिमांना पाकिस्तान मिळाला तसा शीखांसाठी स्वतंत्र देश मिळायला हवा अशी मागणी करणारे लोक पंजाबमध्ये सुध्दा सुरवातीपासून होते.पण तिथे प्रत्यक्ष दहशतवाद सुरू झाला १९८० च्या दशकाच्या सुरवातीला. त्याचे काय कारण होते?तुम्ही म्हणता त्या न्यायाने ३०-४० वर्षे त्यांना जमले नाही पण नंतरच्या काळातही जमायला नको होते.भारताच्या सुदैवाने परिस्थिती अगदी प्रचंड चिघळलेली असली तरी फुटून निघण्यापर्यंत पंजाब-काश्मीरात परिस्थिती गेली नाही.पण म्हणून ४६ वर्षात जमले नाही म्हणून नंतरही होणार नाही ही आत्मवंचना करणे मूर्खपणाचे ठरेल.
पंजाब-काश्मीरटाइप दहशतवाद मोठ्या प्रमाणावर फैलावायला अशा प्रवृत्तींना एक critical mass यायला लागते.आणि ते critical mass यायला एखादी घटना ट्रिगर म्हणून कारणीभूत ठरते.अर्थातच काही असंतुष्ट तत्वे असतातच पण अशा तत्वांना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळते ते अशी एखादी ट्रिगर घटना झाल्यानंतर. काश्मीरात शेख आणि फारूख या अब्दुल्ला पितापुत्रांनी (आणि इतर शासकांनीही) आधीच स्वत:चे खिसे भरपूर भरले होते पण काश्मीरी जनतेला चांगले प्रशासन मात्र दिले नाही. काश्मीरात दिल्लीवरून मुख्यमंत्री लादले जातात आणि निवडणुकांमध्ये गैरव्यवहार होतात ही एक तक्रार होतीच.१९८७ च्या निवडणुकांमध्ये या प्रकाराचा अगदी कहर झाला.नंतरच्या काळात भारतविरोधी भावना वाढली त्यामागे १९८७ च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले गैरव्यवहार हा मुद्दा ट्रिगर घटना झाली. (हिजबुल मुजाहिदीनचा दाढीवाला सलाहुद्दिन पण १९८७ च्या निवडणुकांमध्ये Muslim United Front चा उमेदवार होता). पंजाबात बिघडलेल्या परिस्थितीत ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यापेक्षाही जास्त दिल्लीतील शिखविरोधी दंगली हा मोठा ट्रिगर होता.त्यापूर्वी परिस्थिती बिघडलेली होतीच पण दहशतवाद्यांना व्यापक समर्थन मिळाले ते या ट्रिगरनंतर.
काही प्रमाणावर नक्षलवाद्यांना हे critical mass आधीच आलेले आहे असे वरकरणी वाटते.दुसरे म्हणजे पंजाब आणि काश्मीर हे काहीही म्हटले तरी सीमावर्ती प्रांत.इथे नक्षलवादाने भारताला अगदी मध्यभागी पोखरले आहे.स्वत: पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी नक्षलवादी हिंसाचार हा सगळ्यात मोठा धोका आहे हे मान्य केलेले आहे.तिसरे म्हणजे पंजाब आणि काश्मीरातील हिंसाचाराला भारतविरोधा बरोबरच "धर्म" हा एक aspect होता.तसेच (विशेषत: काश्मीरातील) प्रकारांना पाकिस्तानचे उघडउघड समर्थन होते हे अगदी जगजाहिर होते.त्यामुळे इतर राज्यांमधील मुस्लिम युवक बहुतांश या प्रकारांपासून दूर होते.तरी जे बळी पडले (अबु जुंदाल, आझाद मैदान प्रकरणातील तत्वे इत्यादी) त्यांनीही मोठी डोकेदुखी निर्माण केली आहेच.पण नक्षलवादामध्ये "गरीब" हा एक all pervading मुद्दा आहे.गरीबांचे शोषण होतेच यात अजिबात शंका नाही.तरीही अनेकदा रस्त्यावर झोपणाऱ्याला जर सांगितले की मी २० रूपये देतो माझी गाडी पुसून दे तर अनेक गरीब ते करणार नाहीत ही पण सत्य परिस्थितीच आहे.अशांना "ते श्रीमंत लोक तुमच्यावर अन्याय करत आहेत" असे म्हणून चिथावणे फार सोपे आहे. अशी पेटवापेटवी करणारे अनेक राजकारणी असतात.पण या प्रकारात टिपीकल डाव्या subtle पध्दतीने अशी पेटवापेटवी चालू असेल तर नक्की या प्रचाराला किती बळी पडले आहेत हेच मुळी समजायला बराच उशीर झालेला असेल.
२००५ मध्ये नक्षलवाद्यांनी आंध्र प्रदेशात एक बसचे अपहरण केले होते.हा प्रकार काही तासात सोडविला गेला.पण नंतरच्या काळात त्यांचे प्रकार अधिकाधिक audacious होत गेलेले आहेत हे समोर दिसतच आहे. दांतेवाडा काय,बस्तर काय आणि ज्ञानेश्वरी एक्सप्रेस उडविणे काय.पूर्वीही मला असेच वाटत होते (अगदी २००५ पासून) की यापुढे त्यांची मजल जाणार नाही पण प्रत्येक वेळी त्यांची कृत्ये अधिकाधिक खुनशी होत गेली आहेत.
निकाह चित्रपटातील प्रसिध्द गाणे "दिल के अरमा आसूओं मे बह गये" मधील एक वाक्य आहे--"शायद उनका आखरी हो यह सीतम हर सीतम यह सोचके हम सह गये". नक्षलवाद्यांसंबंधात अगदी हेच मला वाटते. आणि हो असे वाटणे हसण्यावारी न्यायचे असेल तर जरूर न्या.
16 Jun 2013 - 7:36 pm | राही
" पंजाबात बिघडलेल्या परिस्थितीत ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यापेक्षाही जास्त दिल्लीतील शिखविरोधी दंगली हा मोठा ट्रिगर होता.त्यापूर्वी परिस्थिती बिघडलेली होतीच पण दहशतवाद्यांना व्यापक समर्थन मिळाले ते या ट्रिगरनंतर."
नेमके उलट आहे. पंजाबमध्ये आधी परिस्थिती अगदी चिघळली. अनेक हिंदू आणि शिखांच्या हत्या झाल्या. सुवर्णमंदिरात शस्त्रास्त्रांचे आणि अंमली पदार्थांचे साठे जमू लागले, मंदिराच्या आतून सीमेपर्यंत बोगदे खणण्याचे प्रयत्न सुरू झाले, पोरीबाळींना जबरदस्तीने मंदिरात 'तैनाती'साठी कोंडणे सुरू झाले (हे सर्व माधव गडकरींनी लोकसत्तामध्ये लिहिलेले होते आणि इन्डिअन एक्स्प्रेस ने पंजाबमधल्या खालिस्तानी दहशतवादातली मृतांची संख्या प्रसिद्ध केली होती ती काही हजारांत होती.) त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार झाले. ऑ. ब्लू स्टार हा ट्रिगर नव्हता. ह्या ऑपरेशनचा सूड म्हणून इन्दिरा गांधींची हत्या झाली आणि तिचा सूड म्हणून दिल्लीमध्ये शिखांचे हत्याकांड झाले.(अवांतर : इंदिरा गांधींच्या हत्येनंतर
16 Jun 2013 - 7:54 pm | क्लिंटन
ऑपरेशन ब्लू स्टार आणि दिल्लीतील दंगली हा नक्की कशाचा ट्रिगर होता असे मला म्हणायचे आहे?तो ट्रिगर दहशतवादी कारवायांचा नव्हे तर त्या कारवायांना पंजाबात लोकांचे समर्थन मिळाले (तात्कालिक) त्याचा ट्रिगर होता.दहशतवादी कारवाया तर ब्लू स्टार पूर्वीपासून सुरू होत्या.काही प्रमाणावर लोकांचे समर्थनही त्याला होतेच पण या दोन घटनांनंतर लोकांचेही समर्थन त्याला मिळाले.लोकांचे समर्थन मिळाले असे कोणत्या आधारावर मी म्हणतो? १९८९ मध्ये सीमरनजीत सिंह मान या माजी आय.पी.एस अधिकार्याची तुरूंगातून मुक्तता केली गेली होती.त्याने भारत सरकारवर किती गरळ ओकली होती हे वेगळे सांगायलाच नको.पण त्याला १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्ये तरण तारण लोकसभा मतदारसंघातून ८५% पेक्षा जास्त मते मिळाली होती आणि काँग्रेस उमेदवाराला १०% पेक्षा कमी.यात दहशतीचा वाटा नक्कीच असणार पण तरीही ८५% पेक्षा जास्त मते मिळणे हे अशा तत्वांना लोकांचेही समर्थन होते याचेच चिन्ह नाही का?
पुढे पंजाबातल्या लोकांना समजले की आपले भवितव्य भारताशीच निगडीत आहे आणि ते हिंसाचाराला कंटाळले त्यामुळे जो काही पाठिंबा दहशतवाद्यांना मिळत होता तो १९९२ पासून कमी झाला आणि बियंत सिंह-के.पी.एस गील यांनी दहशतवाद्यांचा खातमा केला.दहशतवादाचा खातमा केला असे म्हणू शकत नाही विशेषतः २००९ च्या निवडणुकांच्या वेळी पंजाबात भिंद्रनवालेची पोस्टर्स झळकणे, २०१२ मध्ये कुलदिप सिंह ब्रार वर लंडनमध्ये हल्ला होणे इत्यादी घटनांवरून अशी तत्वे अजूनही आहेतच हे दिसते.
16 Jun 2013 - 7:58 pm | क्लिंटन
दहशतवादी कारवाया तर ब्लू स्टार पूर्वीपासून सुरू होत्या.काही प्रमाणावर लोकांचे समर्थनही त्याला होतेच पण या दोन घटनांनंतर लोकांचे अधिक व्यापक समर्थन त्याला मिळाले.
16 Jun 2013 - 11:11 pm | राही
"दहशतवादी कारवाया तर ब्लू स्टारपूर्वीपासूनच सुरू होत्या"
खरे तर दहशतवादी कारवाया ब्लू स्टार च्या आधीच अधिक प्रमाणात सुरू होत्या. त्यांना प्रचंड लोकाश्रय आणि सीमेपलीकडून चिथावणी होती. ब्लू स्टार ने दहशतवादाचा कणा मोडला. नंतर तो हळूहळू थंडावत गेला. सुवर्णमंदिराचा पावित्र्यभंग केला म्हणून लोक काँग्रेसवर खवळले. काँग्रेस नेस्तनाबूत झाली खरी पण दहशतवाद निमाला. १९८१ मध्ये पंजाब केसरीचे संपादक लाला जगत नारायण सिंहांची हत्या झाली, एव्हढेच नव्हे तर हिंद समाचार ग्रूप आणि विशेषकरून पंजाब केसरीच्या ६२ कर्मचार्यांची हत्या झाली. हे हत्याकांड ब्लू स्टार नंतर कमी झाले.
21 Jun 2013 - 10:49 pm | क्लिंटन
पंजाबात दहशतवाद सुरू झाला १९८० च्या दशकाच्या सुरवातीला.ब्लू स्टार झाले जून १९८४ मध्ये.आणि पंजाबात दहशतवाद चालू होता अगदी १९९२ पर्यंत.ब्लू स्टार नंतर दहशतवाद थंडावत गेला म्हणजे नक्की काय झाले हे समजले नाही. राजीव-लोंगोवाल करारानंतर जून १९८५ मध्ये पंजाबमध्ये निवडणुका झाल्या आणि अकाली दलाचे सुरजीतसिंह बर्नाला मुख्यमंत्री झाले.पण त्यांच्या सरकारला दहशतवादाचा बिमोड करता आला नाही म्हणून १० मे १९८७ रोजी कलम ३५६ अन्वये ते सरकार बरखास्त करण्यात आले.
नाही हो.पंजाबी दहशतवाद्यांनी अधिक खुनशी हल्ले नंतरच केले.उदाहरणार्थ:
१. ९-१० मे १९८५ रोजी इंदिरा गांधींच्या हत्याकांडाविषयीचा खटला दिल्लीत सुरू झाला.नेमक्या त्या दिवशी दिल्लीत अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी "ट्रान्झिस्टर बॉम्ब" द्वारे स्फोट घडवून आणले आणि त्यामध्ये किमान ६० लोक मारले गेले.
२. २२ जून १९८५ रोजी टोरांटोहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान आयर्लंडजवळ दहशतवाद्यांनी उडविले.विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी (३०० पेक्षा जास्त) मारले गेले.त्याच दिवशी कार्गोमध्ये वेळेआधी स्फोट झाला नसता तर जपानहून भारतात येणारे दुसरे विमानही उडविले गेले असते.
३. ७ जुलै १९८७ रोजी दहशतवाद्यांनी हरियाणामधील लालरू येथे दोन बस अडवून त्यातील शीखेतर प्रवाश्यांवर बेछूट गोळीबार केला.त्यात किमान ७० लोक मारले गेले.
४. २० ऑक्टोबर १९८७ रोजी दिल्लीमध्ये दहशतवाद्यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी काही ठिकाणी random गोळीबार केले आणि त्यात किमान २० लोक मारले गेले.
५. नोव्हेंबर १९८९ मध्ये पतियाळामधील थापर इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गॅदरिंग बघायला आलेल्या राज्याबाहेरील २० विद्यार्थ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली.
६. ऑगस्ट १९९० मध्ये कर्नाटकमध्ये बिदर येथे एका सिनेमा थिएटरमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला.त्यात किमान २५ लोक मारले गेले.
७. १५ जून १९९१ रोजी रात्री दहशतवाद्यांनी लुधियानाजवळ दोन रेल्वेगाड्यांमध्ये गोळीबार केला आणि किमान १२० जणांना ठार मारले.१६ जून पासून लोकसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी सुरू झाली.२२ जून रोजी पंजाबमध्ये मतदान होणार होते.२१ जूनला नरसिंह राव सरकार सत्तेवर आले आणि त्या सरकारने पहिला निर्णय घेतला तो म्हणजे पंजाबमधील मतदान पुढे ढकलायचा.या निर्णयाला लुधियाना रेल्वे हत्याकांडाची पार्श्वभूमी होती.या निवडणुका पुढे फेब्रुवारी १९९२ मध्ये झाल्या.
८. दहशतवाद्यांनी डिसेंबर १९९१ मध्ये अशाच प्रकारे परत एकदा दोन रेल्वे गाड्या थांबवून गोळीबार केला आणि त्यात ५०+ लोक मारले गेले होते.
९. १९९२ मध्ये वर्षाच्या सुरवातीला भारताचे रूमानियामधील राजदूत आणि पंजाब पोलिसांचे माजी महासंचालक रिबेरो यांच्यावर बुखारेस्टमध्ये प्राणघातक हल्ला झाला.१९९२ च्या ऑक्टोबर महिन्यात रूमानियाचेच भारतातील राजदूत लिव्हियु राडू यांचे अपहरण करून त्यांना पंजाबमध्ये नेले गेले होते.पुढे त्यांची सुटका दहशतवाद्यांनी नक्की का केली हे माहित नाही.
तसेच या यादीत दिल्लीमधील ISBT बस टर्मिनलमधील बॉम्बस्फोट आणि अबोहरमधील शॉपिंग सेंटरमधील बेछूट गोळीबार या घटनांचा समावेश नाही.याचे कारण या घटना झाल्या होत्या हे मला माहित आहे पण त्या नक्की कधी आणि किती लोक त्याला बळी पडले हे माहित नाही.तसेच या घटना मला माहिती असलेल्या.मला माहित नसलेल्याही घटना त्यावेळी झाल्या असतीलच.
13 Jul 2013 - 11:25 am | अमोल खरे
अतिशय अभ्यासपुर्ण माहिती. पण काय आहे ना क्लिंटन, की नक्षलवादी म्हणजे भोळे भाबडे, बिच्चारे असं म्हणायची फॅशन आहे. नक्षलवाद्यांचे समर्थन करणारी माणसे मोठ्या प्रमाणावर आहेत. मिपावर पण काही जण होतेच. गेलेल्या माणसांविषयी वाईट बोलायचे नाही म्हणुन त्यांची नावे घेत नाही, पण नक्षलवाद्यांची सतत बाजु घेत राहुन शब्द बंबाळ प्रतिसाद देत राहणे अशी कामं त्यांनी केली आहेत. नक्षलवाद आपल्या सर्वांना अतिशय भारी पडणार आहे हे सत्य आहे. आज मुंबई पुण्यात नक्षलवाद्यांचा त्रास होत नाहीये म्हणुन भरल्या पोटी लोकं त्यांचे कौतुक करत आहेत. पुढे मुंबईत ज्यावेळी हल्ले होतील तेव्हा खुप उशीर झालेला असेल असं मला नेहेमी वाटतं. आत्ताच नक्षलवाद्यांना चिरडुन टाकणं हाच एक उपाय आहे, पण तेही होताना दिसत नाही ही खुप दुर्दैवाची गोष्ट आहे.
14 Jul 2013 - 10:43 pm | आळश्यांचा राजा
तुम्ही श्रावण मोडकांविषयी बोलत असाल, तर दोन गोष्टी - १. त्यांनी कधीही हिंसेचे समर्थन केलेले नाही. २. समजा एखाद्याने नक्षलवादाची बाजू घेऊन काही बोलले, तर त्याच्याविषयी बोलणे हे 'वाईट बोलणे' होत नाही.
तुमचा रोख श्रावण मोडकांकडे नसेल तर माझा प्रतिसाद बाद. अन्य कुणाचा संदर्भ असल्यास मला काही म्हणायचे नाही. मोडकांचे विचार आणि त्यांचे नक्षलवादाविषयीचे आकलन असामान्य होते.
16 Jun 2013 - 8:03 pm | श्रीरंग_जोशी
नक्षली समस्या गांभिर्याने घेतली जाऊ नये असे मी म्हंटले नाहीये. केवळ तिचा मुख्य प्रवाहातील लोकांद्वारे बागुलबुवा केला जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे. अन सध्याच्या तीव्रतेपेक्षा भविष्यातली तीव्रता फारच वाढेल असे मला वाटत नाही.
विविध सुरक्षा दले त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेतच, कारवाईदरम्यान निरपराधांचे प्राण जाऊ नयेत म्हणून त्यांच्या कारवाईला मर्यादा येतात. आर्थिक सुबत्तेचे व मोकळ्या सामाजिक वातावरणाचे लाभ अधिक प्रमाणात नक्षलींच्या प्रभावक्षेत्रातील सामान्य जनांपर्यंत आजपेक्षा अधिक प्रमाणात पोचू लागल्या की नक्षलींना मिळणारा पाठिंबा व सरकारी व्यवस्थेविरुद्ध लढा सुरू ठेवण्याची कारणेही कमी होऊ लागतील.
टिपः शीर्षकामध्ये मी केवळ ':-)' वापरतो तेव्हा इतरांचे विचार हसण्यावारी नेतो असे अजिबात नाही. समोरासमोरील चर्चेत दुसर्याचा मुद्दा मांडून झाल्यावर आपला मुद्द मांडण्यापूर्वी थोडे स्मितहास्य देतो त्याचे हे प्रतिकात्मक रूप आहे. जालावर असे करणे जर जालिय शिष्टाचाराला धरून नसेल तर मी तसे करणे थांबवीन.
9 Jul 2013 - 5:36 pm | मालोजीराव
22 Jun 2013 - 12:34 pm | श्रीगुरुजी
>>> बरेच लोक उदारमतवादाला, संयमाला कमजोरी समजतात पण प्रत्यक्षात मोठ्या काळाचा विचार केल्यास तीच खरी शक्ती असल्याचे सिद्ध होते.
म्हणजे भारत १९६१ पासून चीनबाबत जो संयम दाखवित आहे ती प्रत्यक्षात भारताची खरी शक्ती आहे तर. आम्हाला नव्हतं हे माहीत. आम्हाला वाटायचं भारत चीनसमोर दुर्बल आहे.
15 Jun 2013 - 10:18 pm | दशानन
चीन दिसतो तेवढा बळकट आहे का?
11 Jul 2013 - 2:31 pm | ऋषिकेश
चीन आणि नरेन्द्र मोदी या दोघांबद्दलही हा प्रश्न सध्या अनेकदा विचारला जातो ;)
11 Jul 2013 - 3:06 pm | श्रीगुरुजी
>>> चीन दिसतो तेवढा बळकट आहे का?
चीनने नुसती भृकुटी ताणली तरी भारत घामाघूम होऊन थरथर कापायला लागतो. यातच या प्रश्नाचं उत्तर आलं.
15 Jun 2013 - 11:29 pm | आतिवास
भीषण चित्र आहे.
पण एक तर आजही अनेकांना या भीषण छायेत जगावं लागत आहे.
दुसरं म्हणजे चीनच्या आर्थिक प्रगतीचा प्रचंड उदोउदो होत असला (आणि तो एका अर्थी स्वाभाविकही आहे) तरी त्यांच्या स्वतःच्या प्रजेचं जे शोषण चालू आहे ते पाहता तिथंही असा एखादा 'वाद' निर्माण झाल्यास नवल नाही.
आणि जगातली सगळी युद्धं बंद झाली तर "काही" अर्थव्यवस्था कोलमडून पडतील - त्याचं काय? !!
16 Jun 2013 - 2:57 pm | बॅटमॅन
हाहाहा, +१०^१००.
तसे होऊ नये म्हणून त्या "काही" अर्थव्यवस्था आटोकाट झटतीलच. पण ते सोडून सोडले तरी जगातली युद्धं बंद होणं अशक्य आहे असं आपलं मला वाटतं.
बाकी लेखाबद्दल काय बोलावे? असे एंपायर सस्टेनेबल ठरणे फार अवघड आहे असे वाटते. पण या जरतर ला काही अर्थ नसतो हेही तितकेच खरे. सजग राहणे इतकेच आपल्या हातात असते.
16 Jun 2013 - 3:33 pm | आशु जोग
फ्लॅटस मधे रहाणार्या सर्व लोकांना बाहेर काढून सोसायटीतल्याच मोकळ्या जागेत झोपड्या बांधून रहायला भाग पाडले. रिकाम्या फ्लॅटस मधे गरीब, आदिवासी आणि मोलमजुरी करणारे राहू लागले
एक शंका आहे. गरीब लोक फ्लॅटमधे आल्यावर श्रीमंत होतील. मग पुन्हा त्यांना हूसकावून लावावे लागेल. फ्लॅटमधे आणण्यासाठी नव्याने गरीब लोक शोधावे लागतील वगैरे वगैरे...
हे लोक श्रीमंतांना लूटून संपत्ती गरीबांमधे वाटणार, समानता आणणार हे चित्रपटातच शक्य आहे.
सध्या जे प्रकार चालू आहेत त्यात काही तत्त्व, वाद, इझम, समाजवाद, कम्युनिझम शोधू नये. इतर दहशतवादांसारखाच तो एक दहशतवाद आहे. पाकच्या मदतीने चालतो तो हिरवा दहशतवाद. चीनच्या मदतीने चालणारा तो लाल दहशतवाद. पण तो दहशतवादच.
या लोकांना गरीबांची कणव वगैरे आहे असे मानणे अगदी चूक आहे.
गरीबीतून केलेली चोरी आणि देशद्रोह यात फरक आहे.
16 Jun 2013 - 3:52 pm | राही
इथल्या मुस्लिमांचा प्रश्न ते कसा काय हाताळतील याविषयी कुतुहल आहे. त्यांच्या देशातले मुस्लिम त्यांना डोईजड होउ लागले आहेत अशा बातम्या येतात. इथल्या मुस्लिम दहशतवादाला ते कसे तोंड देतील? हिंदू-मुस्लिम सगळ्यांनाच 'बारा टक्के' करून सरसकट दमन करतील? की हिंदु-मुस्लिमांमध्ये अधिकाधिक फूट पाडून फोडा आणि झोडा करतील? अर्थात 'झोडा' हे त्यांहे तत्त्वच असणार आहे त्यामुळे 'फोडा' ची स्पेशल अशी गरज त्यांना नसणारच. अरबस्तान, पाकिस्तान, अफ्घानिस्तान यांविषयी त्यांचे धोरण काय राहील?
16 Jun 2013 - 6:58 pm | माझीही शॅम्पेन
अगदी काहीही ....कल्पना विलास अगदी हास्यास्पद वाटला :)
मला पण प्लॅनेट्स ऑफ एप्स चे सगळे चित्रपट आठवले , माणूसच काय आता माकडाञ्चे राज्य यायला फारसा वेळ नाही
16 Jun 2013 - 8:50 pm | माझीही शॅम्पेन
कृपया कथा विनोदी वाटली अस वाचाव
24 Jun 2013 - 12:27 am | विजुभाऊ
चीन असे काही करेल असे वाटत नाही. त्या ऐवजी ते त्यांचे नागरीक / प्रॉड्क्ट्स इथे घुसवेल.
आपली डीपेन्डन्सी वाढवेल. अर्धी लढाइ जिंकलेली असेल
चीनला इथले लोक / नेते यात इन्ट्रेस्ट नाही. त्याला जमिनीत इन्ट्रेस्ट आहे
9 Jul 2013 - 2:14 pm | श्रीगुरुजी
गेल्या १-२ दिवसांत चीनने पुन्हा एकदा लडाख भागात अतिक्रमण केल्याचे बातम्यात ऐकले. आधुनिक नेहरूंच्या राजवटीत १९६२ नंतर चीन पुन्हा एकदा भारताचा लचका तोडणार असं दिसतंय. १९४८ व १९६२ मध्ये भारताने मोठा भूभाग गमावून नामुष्की पदरात घेतली. आणि आता २०१३ मध्ये इतर सर्व क्षेत्रात जगभर भारताची नाचक्की झालेली असताना पुन्हा एकदा आपल्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळे भारत आपला भूभाग गमावू नये हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!
9 Jul 2013 - 5:10 pm | मदनबाण
गेल्या १-२ दिवसांत चीनने पुन्हा एकदा लडाख भागात अतिक्रमण केल्याचे बातम्यात ऐकले.
ही ती बातमी...
9 Jul 2013 - 5:53 pm | बाळ सप्रे
झकास जमलाय कल्पनाविलास!! याचप्रमाणे जगाचे इस्लामीकरण, महाराष्ट्राचे ब्रिगेडीकरण, जगाचे निधर्मीकरण, सीमाभागाचे कन्नडीकरण, तामिळनाडूचे सिंहलीकरण, पॅलेस्टिनचे इस्राइलकरण ..... होउन जाउ द्या !!
9 Jul 2013 - 6:07 pm | सचिन कुलकर्णी
बाकी काही नाही पण 'महाराष्ट्राचे ब्रिगेडीकरण'नक्कीच होऊ शकते सरकारच्या निष्क्रीयतेमुळे.
11 Jul 2013 - 12:57 pm | श्रीगुरुजी
मला हे कळत नाही की चीन सरळ भारतात घुसून दिल्ली आणि इतर भाग का ताब्यात घेत नाही? बॉम्बस्फोट, सीमेवरील अतिक्रमण, सैनिकांवरील हल्ला, भ्रष्टाचार, महागाई, केदारनाथचा पूर . . . अश्या कितीही आपत्ती आल्या पंतप्रधानांची झोपमोड होत नाही व इतर मंत्री लुटालुटीत गर्क आहेत. त्यामुळे चीनचे सैनिक पार दिल्लीपर्यंत आले तरी कोण प्रतिकार करणार आहे? पंतप्रधांनांना जागे करून ही बातमी दिली तर नेहमीप्रमाणे "हा प्रश्न आम्ही चर्चेने सोडवू" असे उत्तर फेकून ते परत झोपी जातील आणि इतर कोणाकडूनही चीनला काहीच प्रतिकार होणार नाही.
26 Jul 2013 - 3:58 pm | मृत्युन्जय
जोवर बूडाखाली जळत नाही तोवर राजकारणी काहीच करायचे नाहित. सरळ हल्ला केल्यास सत्ता जायच्या भितीने हेच लोक नक्की हालचाली करतील. दूर कुठेतरी लडाख, तिबेट, अक्साई चीन, पाकव्याप्त काश्मीर, अरुणाचल प्रदेशाचा शेपटाकडचा भाग, पुर्वेत्तर राज्ये इथे काही झाल्यास यांना काही प्रत्य्क्ष फरक पडत नाही. त्यामुळे काही होतही नाही.
26 Jul 2013 - 3:37 pm | मदनबाण
चीनची घुसखोरी वाढता वाढता वाढे
8 Aug 2013 - 10:30 pm | श्रीगुरुजी
चिनी सैनिक नियमितपणे भारतीय भागात सहलीसाठी येतात आणि आल्यावर भारतीय सैनिकांना "हा भाग आमचा आहे. तुम्ही इथून निघून जा." असा आदेश देतात. पाकडे आत घुसून सैनिक मारून जातात, सैनिकांचे शिरच्छेद करतात. आपण मात्र तोंडी निषेध करून "मैत्री चर्चा थांबविणार" नसल्याचा निर्धार व्यक्त करतो.
भारताची इतकी दयनीय अवस्था कोणामुळे व का झाली? यातून भारत कधीच सुधारणार नाही का?
23 Aug 2013 - 9:12 am | मदनबाण
११ ऑगस्टला पीएलए{{ People's Liberation Army } ने अरुणाचल प्रदेशमधे २० /३० किमी आत पर्यंत घुसखोरी केली. इतक्या वर्षां नंतर दोन्ही देशाच्या सैन्यात झालेली शारिरिक झटापट प्रथमच व्हिडीयो मधे रेकॉर्ड झाली आहे.
या व्हिडीयोत आपले सैनिक चीनी सैनिकांना मागे जाण्या बद्धल सुचना करताना तर दिसतात तसेच त्यांना हाताने मागे ठकलताना सुद्धा दिसुन येत आहेत. आपला लुंग्या अँटोनी यावर काही बोलताना दिसत नाही.
काही दुवे :-
Now, Chinese intrude 30 km into Arunachal Pradesh
Chinese incursions
http://timesofindia.indiatimes.com/videos/news/Exclusive-Chinese-incursi...
23 Aug 2013 - 12:59 pm | श्रीगुरुजी
याच जागी आपल्याऐवजी चिनी सैनिक असते व चिनी सैनिकांच्या जागी भारतीय सैनिक असते, तर चिनी सैनिकांनी घुसलेल्या सर्व भारतीय सैनिकांना अटक करून बिजिंगला नेऊन तुरूंगात टाकले असते व नंतर त्यांच्या सुटकेसाठी भारताला मनधरणी करायला लावून गुडघे टेकायला लावले असते.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे एक विमान चुकून (?) चीनमध्ये उतरल्यावर चीनने दोन्ही सैनिकांना तुरूंगात टाकले होते. नंतर बुशने (की क्लिंटन?) राजनैतिक पातळीवर अनेक हालचाली केल्यानंतर अमेरिकेची प्रचंड नाचक्की करून उपकार केल्याच्या आविर्भावात अनेक दिवस कैदेत ठेवून चीनने सैनिकांना सोडून दिले होते.
23 Aug 2013 - 12:07 pm | सुहासदवन
भारताविरुद्ध पद्धतशीरपणे केला जाणारा कट आहे हा
एकीकडे पाकिस्तानने सीमा रेषेवर हल्ला करायचा, सैन्याचा अपमान करायचा
एकीकडे चीनने सीमा रेषेवर हल्ला करायचा, सैन्याला गुंतवून ठेवायचे
आणि वर कहर म्हणून अमेरिकेने भारतातील गुंतवणूक काढून घेऊन रुपया दुर्बल बनवायचा.
अजून एक शक्यता
आता तिकडे दक्षिणेकडे श्रीलंकेतील तामिळी वाघांकडून काही होते आहे का हे पाहायचे
15 Dec 2013 - 9:07 pm | श्रीगुरुजी
चीनने गेल्या वर्षात अनेकवेळा भारताच्या हद्दीत अतिक्रमण करून भारताने नाकदुर्या काढल्यावर स्वतःच्या अटीवर चीनचे सैनिक परत गेले. त्याचवेळी ही शंका आली होती की भारत किती प्रतिकार करेल याचा चीन अंदाज घेऊन पुढील कारवाई करेल.
http://indiatoday.intoday.in/story/chinese-troops-enter-ladakh-again-pic...
आता परत चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून ५ भारतीयांना पकडून नेले व नंतर चर्चेअंती मुक्त केले. चीन भारताचे पाणी जोखत आहे. अत्यंत दुर्बल नेतृत्व व निर्नायकी अवस्थेमुळे भारताचा प्रतिकार शून्य आहे. चीनने आगळीक केल्यावर चीनचे पाय धरून चीनला मागे जायची विनंती करायची एवढेच भारत करत आहे.
भारताच्या विद्यमान अत्यंत कणखर व खंबीर नेतृत्वाचे शेवटचे ५ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे चीन याच काळात सैनिक पाठवून भारताचा काही भूभाग कायमस्वरूपी गिळंकृत करेल अशी भीति वाटत आहे.
16 Dec 2013 - 6:34 pm | प्रसाद१९७१
मी तर ह्या चीनी साम्राजाची मनापासुन आतुरतेने वाट बघतो आहे.
भारताच्या जनते ची स्वतंत्र रहायची लायकीच नाही.