माहितिये ? पंचम पुरीवाला ?
इथली पुरी भाजी खास भय्या स्टाइल, क्रमांक १ ची, वादच नाही.
माझे एक नातेवाईक- जे आर.बी.आय. मधे असतात, ते तर म्हणतात : पु~या साजूक तुपातल्या असतात म्हणे.
असो.माझे वडील आम्हाला पूर्वी इथे कायम घेऊन जायचे. मुळात मुलुंडसारख्या उपनगरातून त्या वेळी ( साधारण ७९-८० चा काळ असेल तो) VT ला जाणं, हेच मुळी कस्सलं भार्री वाटायचं तेव्हां.
तर एकदा दादा मला ह्या पंचम पुरी वाल्याकडे घेऊन गेले. तिथली ती लाल भोपळ्याची भाजी, त्याच्याबरोबर मिळणा~या त्या मिरच्या, सग्गळं मी माझ्या जिभेवर तश्शाच ठेवून अगदी अलिकडे गेलो होतो.अपेक्षित गर्दी, तिथे मुंबईचा घाम वगैरे सगळं होतच आणी तश्शीच चव, अज्जूनही. यावेळी मी पालक सुद्धा खाल्ली. अ.प्र.ती.म.......फक्त !
आणखी एक गोष्ट विषेश उल्लेख करायची....
मी काऊंटरला बिल द्यायला गेलो आणी गल्ल्यावरच्या तरूणाला जस्ट म्हणालो...
"कुछ २०-३० साल पहले मेरे पिताजी और मैं यहां अक्सर आया करते थे"
"..."
" अब भी वोही टेस्ट हैं"
पुन्हा हा तरूण माझ्याकडे पाहून "म्यूट"च.
अखेर त्यानी "एक मिनट" म्हणून बेसनात पिचकारी थुंकली , आणी म्हणाला ..
"अभी क्यों नही आये पिताजी, उनको भी लेके आते"
(तो वडिलांना ओळखत-बिळखत नाही बरं का)
मी जरा ओशाळून..."वो......अब नही हैं"
पुन्हा तरूण "म्यूट" प्रोफाईलात, पण ह्या वेळी भाव मात्र वेगळा होता.
असो. तर मी बिल सरसावलं, तर "म्यूटा"तल्या तरूणाची "म्यूटा"तलीच, फक्त हातानीच खूण :-
"पैसे राहूदेत" अशी.
मी निघालो, ५-१५ ची डेक्कन पकडायची होती.
प्रतिक्रिया
29 May 2013 - 1:44 pm | गवि
देजावू फीलिंग का येते आहे ?
29 May 2013 - 1:59 pm | पिलीयन रायडर
पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!
प्रेषक, विसोबा खेचर,
29 May 2013 - 2:24 pm | १००मित्र
व्वा व्वा... सुरेखच आहे हा लेख, विसोबा [म्हणजे तुम्ही दिलेली लिंक]
आधीचं चेक न केल्यानं घोळ झाला बहुधा
29 May 2013 - 2:28 pm | १००मित्र
लेख डिलीट करता येइल का ?
अस्सच नुकतंच पब्लिश झालंय.
29 May 2013 - 1:53 pm | १००मित्र
काहीतरी अस्संच familiar घडलं असेल, दुसरं काय !
29 May 2013 - 1:55 pm | स्पा
गवी उर्फ गंदे अंकल
तातुलीने हा धागा टाकलेला होता असे वाटते
29 May 2013 - 2:26 pm | १००मित्र
होय, लिंक पाहिली, माझा पाहतो डिलीट मारता येतूय का ते!
29 May 2013 - 2:29 pm | गवि
नाही.. असू दे हो.. एका विषयावर किंवा जागेविषयी एकाहून जास्त धागे येण्यात काही प्रॉब्लेम थोडाच आहे? हा काही कॉपी पेस्ट धागा नव्हे, तुमचा अनुभव, तुमचा एक वेगळा अँगल.
29 May 2013 - 2:53 pm | सचिन कुलकर्णी
का डिलीट करताय? मला आवडला तुमचा अनुभव. तुम्ही तात्याचा धागा वाचून लिहिला असता तरी this is totally different article. हि तुमची आठवण आहे..
29 May 2013 - 2:59 pm | प्रभाकर पेठकर
धागा नष्ट (डिलीट) करण्यापेक्षा (कारण ह्या धाग्यातही एक जबरद्स्त आशय आहे), आहे तस्साच, तात्यांच्या त्या धाग्याच्या 'प्रतिसादात' टाकता येइल.
आहे तस्सा इथेच ठेवला तरी हरकत नाही.
29 May 2013 - 6:14 pm | १००मित्र
मलाही हेच वाटत होतं प्रभाकर !
29 May 2013 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे परमपूज्य दारु पित असते तर किती बरे झाले असते.
असो....
29 May 2013 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
फार स्वप्नं बघू नयेत माणसाने...
दारूचा दुकानदार एक वेळ तशीच पिचकारी टाकेल पण एक पेग फुकट देणार नाही ;)
(मनातल्या मनातः सुपुत्राचे हे सुविचार वाचले असते तर 'परमपूज्य' यांनी 'तीर्थ' न देता फक्त 'प्रसाद' दिला असता, ते वेगळेच +D)
29 May 2013 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार
ते उम्मीदपे दुनिया कायम हय का काय म्हणतात ना.
29 May 2013 - 3:17 pm | इनिगोय
तुमी फकस्त लिवता.. वाचीत नै, ह्ये कळलं! ;-)
पण लिवता ते छान लिवता. ह्या पुऱ्या जास्त आवडल्या. :-)
29 May 2013 - 6:50 pm | आदूबाळ
"थर्मास छान आहे हो तुमचा. अमेरिकन दिसतोय..." हे आठवलं अचानक! :))
29 May 2013 - 7:15 pm | सूड
सहमत !!
29 May 2013 - 6:13 pm | १००मित्र
मिपावर इतकी प्रचंड वाचन-सामुग्री असते; काय वाचू अन काय नको.
काही काही 'मिस' होतंय हे मात्र नक्की.
29 May 2013 - 6:28 pm | स्पंदना
मागच सगळ वाचा निवांत वेळ मिळेल तसं, पण आता जरा आजुबाजुचे प्रतिसाद पहा. मिपा एखाद्या घरासारख एकमेकाला, अहो जाहो, काका वगैरे वगैरे म्हणत. ते का? हे जरा पहा.
बाकि लिखाण मस्तच. म्युट तरुणाची बोलकी अॅक्शन आवडली.
29 May 2013 - 6:33 pm | रेवती
मीही म्यूट झाले. ;) चांगले लेखन.
29 May 2013 - 9:11 pm | jaypal
मित्रा काय खतरनाक लिखाण आहे यार तुझ ? एकदम सुसाट लिहीतोस बघ. अस्साच लिहीत रहा.
तुझ्या लेखणितील शाई कधीच संपु नये या साठी शुभेच्छा
29 May 2013 - 10:57 pm | १००मित्र
प्रेरक, धन्यवाद !
29 May 2013 - 9:23 pm | अर्धवटराव
मला बेसनातली पिचकारी म्हणजे बेसन पिठातली वाटली अगोदर... आणि हेच का ते अप्रतीम चविचे रहस्य असं वाटुन गेलं. पण लेखात तसा काहि राग-रंग दिसेना... मग परत विचारचक्र सुरु झाले... आणि पुर्या बेसनाच्या नसतात, व हे बेसन म्हणजे बेसीन आहे, अशा दोन उलगड्यांसह सांगता झाली.
अर्धवटराव
29 May 2013 - 11:01 pm | १००मित्र
आइला, खरंच की.
मी सुद्धा वाचकासरखा पुन्हा एकदा वाचलं.खरंच असं गोंधळण्याइतपत गोची होत असावी.
उत्तम कोटी करण्याच्या नादात...अनर्थ पण होवू शकतो, अर्धवट्राव, खराय !
29 May 2013 - 11:51 pm | चिगो
हे बेसन खाद्यपदार्थ करायला वापरत नाही ना? नसले म्हणजे मिळवली..
30 May 2013 - 10:53 am | बाळ सप्रे
बेसिन असु शकेल !!
पण "पिचकारीसाठी" बेसिनपर्यंत म्हणजेसुद्धा जरा जास्तच झाल नाही का..
1 Jun 2013 - 3:15 pm | गवि
आत्ताच आस्वाद घेतला मिपा पोस्ट्स च्या इम्पाक्ट मुळे.
1 Jun 2013 - 3:34 pm | अनुप ढेरे
कसं होतं त्ये सांगा की...
1 Jun 2013 - 9:47 pm | १००मित्र
वा व्वा गवि, मानलं,
जागा छोटीश्शीच आहे ना ?
कशी वाटली पंचम-पुरी ?
कद्दू [भोपळा भाजी] दिसत नहिये ताटात !
1 Jun 2013 - 10:44 pm | गवि
अगदी छोटी आणि भट्टीस्वरुप उष्ण जागा. बाहेर उभ्याने खाल्लेली परवडली असती.
नंतर आमरसही मागवला साध्या बिनमसाल्याच्या पुरीसोबत.
जेवणातली पुरी ही मसाला पुरी म्हणजे कचोरीप्रमाणे आत मसाल्याचा एक थर.
उत्तम पुर्या होत्या. पण परिसर तेलाच्या धुराच्या वासाने आणि टोयलेट टाईप दुर्गंधी येत होती.
अगदी रोडसाईड ठिकाण म्हटले तरी अन्नाखेरीज इतर सडके वास आणि खरकट्या गटारातून वाट काढणे किळसवाणे ठरते.
चव चांगली. पोटभरीचे आहे सर्व. पण परत परत उठून खास जावे इतके वाटले नाही. आमरस प्रोसेस्ड होता.
1 Jun 2013 - 10:18 pm | बंडा मामा
ही जागा आता ट्राय केलीच पाहिजे.
एक शंका : तात्यांच्या लेखात त्यांनी हा पंचम पुरीवाला अन्नात सोडा मारत नाही असे लिहिलेले वाचले. हे सोडा मारणे प्रकरण काय असते? भजीच्या पीठात सोडा घालतात हे माहित आहे. त्यालाच सोडा मारणे म्हणतात का?
1 Jun 2013 - 10:58 pm | आदूबाळ
जेवण बनवताना त्यात सोडा घातला की जेवणार्याला पोट लवकर भरल्यासारखं वाटतं (आणि पर्यायाने हॉटेल/मेसवाल्याचा फायदा होतो). सोड्याचा परिणाम साधारण २-३ तासांनी उतरला की परत भूक लागते.
2 Jun 2013 - 6:35 am | बंडा मामा
मेस वाल्यांचे समजू शकतो पण हॉटेलवाले का बरं असं करतील? तुमची भूक लवकर भागली तर त्यांचे नुकसानच आहे की. उलट तुमची भूक चाळवली तर तुम्ही जास्त पदार्थ ऑर्डर कराल ना.
दुसरी गोष्ट म्हणजे सोडा मारल्याने लवकर पोट भरल्यासारखे वाटते ही एक गैरसमजच वाटतो. त्याला शास्त्रीया आधार नाही. तज्ञांनी अधिक खुलासा करावा
2 Jun 2013 - 7:13 am | गवि
तद्न्य म्हणून नव्हे पण जनरल मत असे की पोट भरण्याचा संबंध नसून तळलेले अथवा कदाचित उकडलेले पदार्थ अधिक फुलून यावेत आणि कमी कच्च्या मालात अधिक आकाराचा दिसणारा फुगीर अतएव खुसखुशीत / कुरकुरीत पक्का माल बनावा हा उद्देश असेल. भजी , शेव .पापडी .फाफडा कचोरी, पुरी अशा पदार्थात हे केले जात असावे. काहीवेळा हे प्रमाण फारच जास्त झाल्याने सोड्याची तुरट चव तोंडात येते किंवा क्वचित सोड्याचे छोटे ढेकूळही पदार्थात सापडू शकते.
मर्यादित प्रमाणात सोडा घालण्याने चांगला इफेक्ट होत असावा. घरगुती पदार्थातही स्त्रिया काहीवेळा वापरताना दिसतात. सोडा ओव्हर ओल वाईट नसावा एरव्ही तो घरी कशाला आणला गेला असता ? अतिरेक वाईट असणार.
2 Jun 2013 - 9:07 am | प्रभाकर पेठकर
सोड्याचा आणि आंबट पदार्थाचा संपर्क आला की कर्बद्विप्राणिल वायू ( बरोबर आहे नं? थोडक्यात, CO2) मुक्त होऊन पदार्थ फुगतो होतो. त्यामुळे पदार्थ खुसखुशीत/हलका होतो. पदार्थ आंबविण्याच्या कामीही सोड्याचा फायदा होतो. कमी कच्च्या मालात अधिक आकाराचा दिसणारा पदार्थ बनवावा (आणि जास्त नफा मिळवावा) असा उद्देश नसतो.
सोडा घातल्याने शिजण्याची प्रक्रिया लवकर होते ( शास्त्रीय कारण माहित नाही) त्यामुळे शिजण्यास कठीण असणारे पदार्थ (उदा. वाटाणे, पांढरे चणे) शिजवताना सोडा घालतात. भाज्या उकडताना (पुलावसाठी वगैरे) त्यात अगदी किंचित (शेंगदाण्याच्या आकाराचा) सोडा घालतात त्याने भाज्यांचे रंग टिकून राहतात, काळवंडत नाहीत.
खानावळीतील जेवणात सोडा मिसळतात आणि त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटून माणूस कमी खातो हाही एक गैरसमज आहे. कोणी उपहारगृवाले असे प्रयोग करीत असतील असे वाटत नाही. निदान माझ्या पाहण्यात तरी नाही. मी ही कधी असले प्रकार केले नाहीत.
माझ्या एका मित्राला, उपहारगृहातील जेवणांत, भात पांढराशुभ्र दिसला की त्यात सोडा घातला आहे असा साक्षात्कार व्हायचा. ताक पितानाही, तोंड वाकडे करून, त्यात सोडा घातला असल्याचे अगदी अधिकारवाणीने तो सांगायचा. त्याच्याशी मी कधी वाद घातला नाही. पुढे जेंव्हा मी ह्या व्यवसायात आलो तेंव्हा मला खुप वेगळे अनुभव आले. उपहारगृहात (आणि घरातही) सोडा वापरला जातो पण तो वरील कारणांसाठी, कमी जेवणांत पोट भरल्याची भावना निर्माण व्हावी म्हणून नाही.
सोड्यात वाईट कांहीच नाही. उलट सोड्यामुळे अन्न पचनास मदत होते असे ऐकले आहे.