ही कथा साधारण १९८५ सालची. कथानायक माधव आणि नायिका रमा त्या काळाप्रमाणे चाळीतल्या दोन खोल्यात राहणारे तसे मध्यमवर्गीय सुखी जोडपे. रमा भविष्याविषयी काहीशी जागरूक तर माधव वर्तमानात रमणारा बराचसा बेफ़िकीर वृत्तीचा. विज्ञान कथा वाचन आणि भटकंती हे माधवचे छंद, तर असल्या छंदात पैसे उडवण्यापेक्षा बचत करून घर, जमीन-जुमला अशी स्थावर मालमत्ता वाढवायची असे रमाचे व्यवहारी विचार. असे असले तरी त्यांचे निदान अजून तरी खटके उडत नव्हते कारण त्यांच्या लग्नाला आता कुठे जेमतेम वर्षं पूर्ण होत आले होते.
अशात एक दिवस माधवला त्यांच्या कारखान्यात वेतनवाढ होत असल्याची बातमी कळली. ही वेतनवाढ १ वर्षं अगोदर च्या तारखे पासून लागू होणार असल्याने सर्व कर्मचा-यांना वर्षभराच्या वेतनातील फ़रकापोटी रूपये १५,०००/- एवढी संचित रक्कम एकदम मिळणार होती. माधवने ही आनंदाची बातमी रमाला सांगितली आणि तेव्हा तीही हरखून गेली. पण लगेच भानावर येत तिने माधवला सूचवले की ही रक्कम एखाद्या चांगल्या दीर्घकालीन बचत योजनेत गुंतवावी जेणेकरून त्यांना भावी आयुष्यात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
माधव काही बोलला नाही पण त्याच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. बरेच दिवसांपासून (खरे म्हणजे लग्न झाल्यापासूनच) कुठे मनसोक्त भटकायला जमले नाही याची त्याला फ़ारच खंत वाटत होती. नाही म्हणायला वेगवेगळ्या देशांची वर्णने असलेल्या चिकार विज्ञान कथा त्याने या काळात वाचल्या होत्या. डोळ्यांसमोर हुबेहूब वास्तव उभे करणा-या त्या सर्जनशील लेखकांच्या सशक्त लेखणीने त्याला जणू त्या परक्या भूमीवर फ़िरून आल्याचे समाधान मिळाले होते. पण हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे होते, आणि आता या अचानक मिळणा-या रकमेचा उपयोग करून कुठेतरी दूर फ़िरायला जायचा त्याचा विचार होता.
१५ एप्रिल रोजी ही रक्कम त्याच्या हातात पडणार होती. १४ च्या संध्याकाळी तो असाच निवांत वर्तमानपत्र वाचत पडला होता. आतल्या खोलीत रमा स्वयंपाक करीत होती. सोबत तिची बडबड चालूच होती - कुठे गुंतवणूक करावी याविषयी. इतक्यात माधवचे लक्ष एका जाहिरातीने वेधून घेतले.
संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात
आम्ही तुम्हाला सा-या जगाची सफ़र दोन महिन्यात घडवू आणि तीही प्रतिव्यक्ती केवळ रूपये ५,०००/- या अशक्य वाटणा-य़ा दरात! त्वरा करा ही सुवर्णसंधी फ़क्त मर्यादित कालावधीकरीता. संपर्क - डॊ. सेन, एस.टी. स्टैंड समोर, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५.
ही जाहिरात वाचताच माधव आनंदाने वेडा झाला. काही झाले तरी ही संधी सोडायची नाही हे त्याने ठरवले. रमाला लगेच त्याने सांगितले की दोघांच्या प्रवासासाठी १०,०००/- रुपये आणि उरलेल्या ५,०००/- रुपयांत तिथे खरेदी करून दुस-या दिवशी मिळणारे हे पंधरा हजार रुपये सत्कारणी लावायचे. त्याचे हे बोलणे ऐकून रमाला धक्काच बसला. दोन महिने कारखान्यात रजा मिळणार नाही. म्हणजे पगार बुडणार. आपल्या पतीला भविष्याची काहीच चिंता नसून तो इतका अव्यवहारी विचार करू शकतो याचे तिला आश्चर्य वाटले आणि त्याच वेळी अतिशय संताप ही आला. त्यानंतर त्यांच्यात थोडी कूरबूर झाली. मग त्याचे रूपांतर वादात, आणि सरतेशेवटी हा वाद विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. परिणामी रात्री ११:३० वाजता उपाशी पोटी माधव बाल्कनीत आणि रमा एकटीच आत पलंगावर असे दोघेही झोपी गेले. झोपी गेले म्हणजे फ़क्त अंथरूणावर पडले, कारण लग्नानंतर झालेले असे हे दोघांचे पहिलेच मोठे भांडण होते. त्यामूळे अंथरूणावर पडल्या पडल्या दोघांच्या डोक्यात विचार चालुच होते.
रमाला वाटले, अरे! आज आपण काय काय ठरवले होते आणि काय घडले. खरे तर त्या दोघांच्या राजा-राणीच्या संसारात तिस-याची चाहूल लागल्याचे तिला त्या दिवशी सकाळीच जाणवले होते, परंतू माधवला हे दुस-या दिवशी त्याची फ़रकाची रक्कम मिळाल्यावरच सांगायचे म्हणजे त्याला दुधात साखर पडल्याचा आनंद होईल असे तिने ठरवले होते. आणि आता तर त्या दोघांनी एकमेकांशी अघोषित अबोलाच धरला होता.
इकडे माधवलाही बाल्कनीत झोप येत नव्हती. त्याला राहून राहून सारखे वाटत होते की ५,०००/- रुपयात संपूर्ण जगप्रवास करायला मिळणार हे कळून रमाला काहीच आनंद कसा झाला नाही. त्याने स्वत: हिशेब केला तरी त्याला असे जाणवले की अगदी आपण विमानाने न फ़िरता बोटीने फ़िरलो तरी सुद्धा इतक्या कमी खर्चात जगप्रवास शक्य नाही तेव्हा हे लोक नक्कीच काहीतरी वेगळे तंत्रज्ञान वापरणार अशी त्याला खात्री वाटू लागली. अर्थात ते काहीही असो दुस-या दिवशी रक्कम हाती पडताच या संधीचा लाभ घेण्याचे त्याने ठरवले.
रात्री उशिरा केव्हा तरी दोघांचाही डोळा लागला. सकाळी रमाला जरा उशिरानेच जाग आली. आदल्या रात्री झोप नीट न झाल्यामूळे तिचे डोके दुखत होते. तरी ती कशीबशी उठली, आणि बघते तो काय - माधव घरात नव्हताच. तो बहुधा कालच्या भांडणामूळेच आपल्याला न उठवता निघून गेला असे रमाला वाटले. त्यानंतर ती पुन्हा आदल्या दिवशीचा प्रसंग तपशीलाने आठवू लागली. आपले काही चूकले असे तिला अजिबात वाटत नव्हते. परंतू आता माधवला कसे समजवायचे हे तिला कळेचना.
शेवटी बराच विचार केल्यावर तिला असे जाणवले की आपण माधवला बाळाच्या आगमनाची बातमी सांगितली की तो जगप्रवासाचा नाद नक्की सोडून देईल आणि सारे काही सूरळीत होईल. ह्या विचारासरशी तिची डोकेदुखी कुठल्याकुठे पळून गेली आणि ती उत्साहाने कामाला लागली.
सकाळची सारी कामे आटोपून, जेवण वगैरे झाल्यावर दुपारची तिने मस्तपैकी ताणून दिली. मग सावकाश थेट पाच वाजताच ती उठली. आदल्या रात्रीच्या झोपेचा Backlog दुपारी भरून काढल्यामूळे ती fresh दिसत होती. मग ठेवणीतली एक ब-यापैकी साडी नेसून तिने आपल्या मनासारखा हलकासा मेक्अप केला. आज बहुधा बाहेरच जेवण्याचा योग येईल असा विचार तिने केला त्यामूळे स्वयंपाकाचीही गरज भासली नाही. निवांतपणे फ़क्त माधवची वाट पाहात ती थांबली. कालचा राग ओसरला नसेल तर कदाचित माधव थोडासा उशिराच येईल हे ती गृहीत धरूनच होती, पण तरी आता आपण त्याचा राग घालवू शकू अशी तिला खात्री पटल्यामूळे ती निर्धास्त होती.
कारखान्यातून नेहमी पाच वाजेपर्यंत येणारा माधव रात्रीचे नऊ वाजले तरी आला नाही तशी तिला काळजी वाटू लागली. इतक्यात खाली टैक्सी थांबल्याचा आवाज आला म्हणून तिने सहज नजर टाकली तर तिच्यातून माधवच बाहेर पडताना तिला दिसला. विशेष म्हणजे त्याच्या हातात मोठी प्रवासी बैग होती. म्हणजे परदेशप्रवासाचे खूळ अजून याच्या डोक्यातून गेले नाही तर असा विचार तिने केला.
माधव आत आला तोच मोठ्या खुशीत, गाणी गुणगुणत. तो चांगल्या मूडमध्ये आहे हे पाहून रमालाही समाधान वाटले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रवासाला निघण्याच्या गोष्टी करण्याऐवजी तो आपण आताच सा-या जगाची सफ़र करून आलो आहे असे तो सांगू लागला. सुरूवातीला रमाला वाटले की आपण त्याच्या परदेशप्रवासाला विरोध केला त्यामूळेच त्याने ही चेष्टा चालविली आहे आणि तिने त्याचे बोलणे फ़ारसे गांभीर्याने घेतले नाही.
पण जसजसा माधव एकेका देशाचे विस्ताराने वर्णन करून सांगू लागला तसतसे रमाचे आश्चर्य वाढत गेले. अखंड पंधरा मिनीटे त्याची बडबड ऐकल्यावर तर एका क्षणी तिला असेही वाटून गेले की हा खरंच आताच दोन महिने जगप्रवास करून आलाय. पण दुस-याच क्षणी तिने स्वत:ला सावरले. हे सारे कुठेतरी थांबवायला हवे होते.
ती माधवला म्हणाली,"दमला असशील. भूकही लागली असेल ना? चल आज आपण बाहेरच कुठेतरी जेवायला जाऊया."
"काहीतरीच काय? अगं आताच तर मी बोटीतून मुंबईला उतरलो आणि तिथून टैक्सीने इथपर्यंत आलो. मला आंघोळ करायला हवीय. पाणी गरम कर माझ्यासाठी. शिवाय गेले दोन महिने बाहेरचेच जेवण जेवतोय. आज आपण घरीच जेवुयात." मग तिच्याकडे नीट लक्ष देत तो पुढे म्हणाला,"हे दोन महिने चांगलेच मानवलेले दिसतायत तुला. मी गेलो त्या दिवसापेक्षा आता बरीच जाड झालेली दिसतेयस."
हे ऐकून रमा एकदम उसळत म्हणाली,"माधव आता चेष्टा पुरे! मला माहितीय काल मी तुझ्या जगप्रवासाच्या योजनेला हरकत घेतली म्हणून तू रागावला आहेस. पण मी असं का केलं हे ऐकून तर घेशील?"
"एक मिनीट!" तिला मध्येच थांबवत माधव म्हणाला,"मी कशाला रागवेन? उलट मी तर दोन महिने मनाप्रमाणे भटकून आल्यामूळे एकदम खूश आहे. मला तर वाटतंय, तूच थोडीशी नाराज असशील कारण मी तुझ्यासाठी काहीच घेऊन येऊ शकलो नाही."
आता रमाच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. ती चिडून म्हणाली,"माधव आतातरी भानावर ये आणि मी काय म्हणतेय ते नीट लक्ष देऊन ऐक. गेले दोन महिने तू भारतातच होतास. रोज सकाळी ठरल्या वेळी कारखान्यात जात होतास आणि ठरलेल्या वेळी घरी येत होतास. काल रात्री आपले याच जगप्रवासाच्या विषयावरून भांडण झाले. तूझ्या या योजनेला मी विरोध केला म्हणून तू चिडलास. बाहेर बाल्कनीत झोपलास आणि मला न उठवता सकाळीच कारखान्यात निघून गेलास तो थेट आताच घरी आलास. कळलं? "
"आणि हा विरोध तरी तू का केलास म्हणायचा?" तिचे बोलणे शांतपणे ऐकत परंतू चेह-यावर कमालीचा अविश्वास दर्शवित माधवने विचारले.
त्याच्या हा प्रश्नावर रमा एकदम गंभीर झाली आणि अगदी मऊ आवाजात म्हणाली,"अरे! आता हा काही आपल्या दोघांचाच संसार राहिलेला नाहीय. आपल्या संसारात आता तिसरं माणूस येणार आहे. आपल्या खर्चाला आपण यापुढे आवर घालायला नको? बरं चल आता सगळं विसरून जा आणि ही आनंदाची बातमी ऐकल्यावर आता तरी मला बाहेर जेवायला घेऊन चल"
हे ऐकून माधव कमालीचा संतापला,"रमा! मी गेले दोन महिने वेगवेगळ्या देशात हिंडत होतो. तेव्हा हे मूल माझे नाहीच. तू माझी घोर फ़सवणूक केली आहेस आणि वर आता ते लपवण्यासाठी मी इथेच होतो असे सांगतेस"
त्याच्या या बोलण्याने रमा अतिशय दुखावली गेली कारण माधवने सरळ सरळ तिच्या चारित्र्यावरच बोट ठेवले होते. पण मग तिला जाणवले की माधवने आपल्या होणा-या मुलाचे पितृत्व नाकारण्याचे काहीच कारण नाही. त्या दोघांचे रीतसर आणि तेही त्यांच्या आईवडिलांनी ठरवून लग्न झाले होते. शिवाय माधव जरी काहीही सांगत असला तरी गेले दोन महिने तो इथेच असल्याचे अनेक साक्षीदार (उदाहरणार्थ - शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, इत्यादी) आणि पुरावे (उदाहरणार्थ - त्याची कारखान्यातील हजेरी आणि त्याप्रमाणे मिळालेला पगार इत्यादी) ती सादर करू शकत होती.
पण मग माधव असे का करतोय हे जाणून घेणेही गरजेचे होते. जरावेळ शांतपणे विचार करीत तिने माधवला विचारले,"तू दोन महिने इथे नव्हतास याविषयी काही पुरावा सादर करू शकशील काय?"
ताबडतोब माधवने दोन महिन्यांपूर्वी तो मुंबई येथून लंडनला जाणा-या विमानात बसल्यापासून ते थेट आता बोटीतून पुन्हा मुंबईला उतरेपर्यंतचा सारा प्रवास तपशीलाने कथन केला. रमाने त्याचे सारे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि तो कुठेही खोटे बोलतोय असे तिला वाटले नाही. तरीही गडबडून न जाता तिने माधवला त्याच्या हातातील मोठी प्रवासी बैग उघडण्यास सांगितले.
माधवने तसे केले असता त्याला मोठा धक्काच बसला कारण त्यात फ़क्त आदल्या दिवशीचे वर्तमानपत्र आणि माधवने सकाळी कारखान्यात जाताना नेलेली डब्याची छोटी पिशवी होती. ते पाहताच रमा अतिशय खुश झाली आणि तिने माधववर प्रश्नांची सरबत्ती चालू केली.
"तर तू दोन महिने या एकाच पोशाखात जगभर हिंडत होतास वाटतं? कारण आत तर काहीच कपडे दिसत नाहीत. बरं आपण असे समजू की तुझे सर्व कपडे चोरीला गेले असतील. मग माझा पुढचा पुढचा प्रश्न - तुला हे कालच्या तारखेचे पुण्यातील वर्तमानपत्र बोटीवर विकत मिळाले काय़? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही तुझी डब्याची पिशवी जगप्रवासात बरोबर कशासाठी नेलीस?"
आता चकित व्हायची पाळी माधवची होती. रमाच्या एकाही प्रश्नाला तो समाधान कारक उत्तर देऊ शकत नसल्याने मटकन खालीच बसला आणि त्याने कपाळाला हात लावला.
आता माधव काहीच उत्तरे देऊ शकणार नाही याची खात्री पटल्यावर रमानेच सारी सूत्रे आपल्या हाती घेतली. प्रथम तिने ते आदल्या दिवशीचे वर्तमानपत्र उघडून पाहिले तर त्यात ती जगाच्या सफ़रीची जाहिरात होती आणि तिच्याभोवती स्केचपेनने वर्तूळ आखलेले होते. त्यानंतर तिने डब्याची पिशवी उघडली तर त्यात रोख १०,०००/- रूपये होते. त्याशिवाय ५,०००/- रुपये भरल्याची डॊ. सेन यांच्या कार्यालयाची एक पावती होती.
"हे बघ माधव, तू म्हणतोस की दोन महिन्यांपासून तू जगाच्या सफ़रीवर आहेस. असे असेल तर मग ह्या कालच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीवर तू खुण का केलीस? शिवाय हे पाच हजार भरल्याची पावती नीट बघ. त्यावर आजचीच तारीख आहे. म्हणजे अगोदर प्रवास करा आणि नंतर पैसे भरा अशी काही योजना होती का?"
रमाने माधवला विचारले.
"छे! मला तर काहीच समजेनासे झालेय" माधव हताश पणे उत्तरला.
"मला मात्र थोडे थोडे समजू लागले आहे. पण पूर्ण सत्य कळण्यासाठी आपल्याला आता या क्षणी निघायला हवे. तेव्हा चल घाई कर." रमा.
"पण कुठे?" माधव.
"या पावती वर लिहीलेल्या पत्त्यावर. आपण प्रयत्न केला तर कदाचित अजूनही डॊ. सेन भेटू शकतील!" रमा.
काहीच पर्याय नसल्याप्रमाणे माधव मुकाट्याने उठला आणि रमा बरोबर चालू लागला. सोबत ती प्रवासी बॆग आतल्या सर्व वस्तूंसकट जशीच्या तशी बरोबर घ्यायला रमा विसरली नाही.
रिक्षा करून अर्ध्या तासात ते दोघेही डॊ. सेन यांच्या कार्यालयापाशी आले. डॊक्टर कार्यालय बंद करून निघण्याच्या तयारीतच होते पण रमाने त्यांना थांबण्याची विनंती केली. माधव कडे पाहताच डॊ. सेन हसून म्हणाले,"या श्रीयूत जोशी. कसा काय होता जगप्रवासाचा अनुभव?"
पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता माधवने उलट त्यांनाच प्रतिप्रश्न केला,"तुम्ही मला कसे काय ओळखता डॊक्टर? मी तर तुम्हाला आता प्रथमच भेटतो आहे."
"अरे हो! विसरलोच की. तुम्ही तरी आता कसे ओळखणार मला म्हणा?" डॊक्टर स्मितहास्य करीत म्हणाले,"बरं ते जाऊ द्यात. माझ्याकडे आता काय काम काढलंत ते सांगा."
यावर माधवला काही बोलू न देता रमाने आदल्या रात्री जाहिरात वाचल्यापासून ते आता माधव घरी आल्यापर्यंतची सर्व हकीगत कथन केली. याशिवाय आता जो पेचप्रसंग निर्माण झाला होता तो सोडवण्यासाठी डॊक्टर काही मदत करू शकतील काय याबाबतही विचारणा केली.
रमाचे बोलणे ऐकल्यावर डॊक्टर जरावेळ स्तब्ध बसले. नंतर मग शब्दांची जुळवाजूळव करीत सावकाशपणे एक एक वाक्य ते उच्चारत गेले."हे पाहा त्याचे असे आहे सौ. जोशी की तुमची आताची ही अडचण ऐकल्यावर कोणालाही नक्कीच वाटेल की तुमच्या दोघांपैकी (माधव आणि रमा यांचेपैकी) एक कोणीतरी नक्कीच खोटे बोलत आहे. एकतर श्री. जोशी तरी जगप्रवास करून आले असण्याचे शक्य नाही. किंवा मग ते जर सत्य सांगत असतील तर तुम्हाला होणारे मूल त्यांचे असणे शक्य नाही म्हणजे मग तुम्ही खोटे बोलत आहात असेही ऐकणा-यास वाटू शकेल. पण खरी परिस्थिती अशी आहे की, तुम्ही दोघेही खरेच बोलत आहात, आणि हे फ़क्त मलाच माहीत आहे."
डॊक्टरांचे शेवटचे वाक्य ऐकताच रमाचा जीव भांड्यात पडला. पण तरी तिने लगेचच विचारले,"हे कसे शक्य आहे? हकीगत काय आहे हे तुम्ही मला सांगू शकाल काय?"
"तुम्हाला मी नक्कीच सांगू शकेल सौ. जोशी. पण सद्यपरिस्थितीत श्रीयूत जोशींना याविषयी काही सांगणे म्हणजे त्यांच्या डोक्यातील गोंधळ अजूनच वाढवण्यासारखे आहे. तेव्हा...."
डॊक्टरांच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात येताच रमाने माधवला बाहेर जायला सांगितले आणि ती एकटीच डॊक्टरांच्या खोलीत बसली.
डॊक्टरांनी तिला जे काही सांगितले ते ऐकताच तिला सत्याचा पूर्णपणे उलगडा झाला. पण ते सारेच कल्पनेपेक्षाही अद्भूत होते.
तिला समजलेले सत्य अखेर होते तरी काय?
FLASHBACK
बाल्कनीत झोपलेल्या माधवला १५ एप्रिल रोजी सकाळी नेहमीपेक्षा जरा लवकरच जाग आली होती. उठल्याबरोबर त्याने वेगाने सकाळची आन्हिके उरकली. रमावर त्याचा अजूनही राग होताच त्यामूळे तिला न उठवताच तो निघाला. बरोबर त्याने डब्याची पिशवी घेतली आणि तिच्यात आदल्या दिवशीचे वर्तमानपत्र टाकले. डबा घ्यायचा तर काही प्रश्नच नव्हता.
कारखान्यात चार वाजेपर्यंत कसेबसे काम आटोपून त्याने जाताना रू.१५,०००/- ची रक्कम ताब्यात घेतली आणि तो तडक डॊ. सेन यांच्या कार्यालयात आला. वर्तमानपत्रातली जाहिरात दाखवून त्याने डॊक्टरांना विचारले,"फ़क्त ५,०००/- रूपयांत तुम्ही एखाद्याला जगाची सफ़र कशी काय घडवून आणू शकाल? माझा तर यावर विश्वासच बसत नाहीय!"
"तुमची शंका बरोबर आहे. ५,००० रूपयात आम्ही तुम्हाला जगप्रवास घडवणार नाहीच तर आम्ही तुम्हाला जगप्रवासाचा फ़क्त अनुभव देणार आहोत." डॊ. सेन.
"म्हणजे मला काही कळले नाही" माधव चकित झाला,"जगप्रवास न करताच जगप्रवासाचा अनुभव?"
"हे बघा तुम्ही जरी हजारो रुपये खर्चून काही दिवस पर्यटन केले तरी तुम्ही तो आनंद फ़क्त तेवढ्या दिवसांसाठीच मिळवता. मग तुमची वर्षभराची कमाई त्यावर कशाला खर्च करता?" डॊक्टर.
"कारण त्या आठवणी आपल्याला आयुष्यभर सोबत करतात" माधव.
"बरोबर! आता तुम्हाला माझा मुद्दा पटलाय तर." डॊक्टर सेन उत्तेजित होत म्हणाले,"आम्ही काय केलंय, तर आमच्या एका सदस्याला आम्ही दोन महिने जगाच्या उत्तम सफ़रीवर पाठविले आणि त्याचा अनुभव आम्ही संगणकावर साठवून ठेवलाय. ज्या कुणाला आमच्या या योजनेत सामील व्हायचे असेल त्याचेकडून आम्ही ५,०००/- रुपये घेऊन त्या बदल्यात त्याच्या मेंदूवर संगणकावर साठविलेला अनुभव भरणार"
"त्यासाठी काय करावे लागेल?" माधवने उत्सुकतेने विचारले.
"तुम्हाला थोडा काळासाठी बेशुद्ध करावे लागेल. मग तुमच्या आयुष्यातील कुठलेतरी दोन महिने पुसून त्या जागी हा अनुभव टाकावा लागेल. मग त्यानंतर जेव्हा तुम्ही शुद्धीवर याल तेव्हापासून तुमच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आम्ही टाकलेला हा जगप्रवासाचा अनुभव तुमची साथ करेल. तर मग या प्रयोगासाठी तुम्ही तयार आहात काय?" डॊक्टर सेन.
"हो लगेचच! भरून टाका माझ्या मेंदूत हा अनुभव" माधव.
"पण तुमच्या आयुष्यातले कुठले दोन महिने पुसू म्हणता?" डॊक्टर सेन.
"आताचे, गेले दोन महिने. कारण मला एकदम ताजा ताजा अनुभव हवा" माधव.
"जशी तुमची इच्छा. त्याला थोडा जास्त खर्च येईल. पण काही हरकत नाही. तो मी सोसेन." डॊक्टर म्हणाले.
मग माधवने आपल्या पिशवीतून पाच हजार रूपये डॊक्टरांना देऊन त्याची रीतसर पावती घेतली. डॊक्टरांनीही माधवचा संपूर्ण पत्ता लिहून घेतला.
त्यानंतर डॊक्टरांनी माधवला बेशुद्ध केले. त्याच्या मेंदूतून गेल्या दोन महिन्यांची स्मृती पुसून त्या जागी जगाच्या सफ़रीचा अनुभव टाकला. त्यानंतर तो शुद्धीवर यायच्या आत त्यांनी परदेशप्रवासाला नेतात तशी एक मोठी बॆग आणून ठेवली व तिच्यात माधवची पिशवी आणि त्याचे वर्तमानपत्र ठेऊन दिले. तसेच एक टॆक्सीही बोलावून घेतली आणि माधव हळूहळू शुद्धीवर येऊ लागताच त्याला चालकाच्या मदतीने टॆक्सीत बसवले. त्याचा अनुभव काळाशी अशाप्रकारे जुळवून घेतला होता की त्याला वाटावे तो बोटीतून नुकताच उतरून मुंबईतूनच टॆक्सीने पुण्याला येत आहे आणि टॆक्सीचे भाडेही सहलीच्या आयोजकांनीच अगोदरच चालकाला दिले आहे. (प्रत्यक्षात हा स्थानिक प्रवास होता आणि त्याचे भाडे डॊक्टरांनीच सोसले होते) त्यामूळे तो डॊक्टरांनासुद्धा विसरणार होता आणि हा अनुभव आपण आपण कृत्रिम रीतीने घेत हे सुद्धा त्याच्या स्मृतीत असणार नव्हते.
हे भयाण वास्तव ऐकल्यावर रमा तर हतबुद्धच झाली. जरा वेळाने तिने डॊक्टरांना आगतिकपणे विचारले,"पण आता ही समस्या सोडवायचा काहीच मार्ग नाही का?"
"तसा एक मार्ग आहे म्हणा. मी श्रीयूत जोशींची स्मृती त्यांच्या मेंदुतून काढून टाकली असली तरी ती माझ्या संगणकावर साठवून ठेवली आहे. म्हणजे मी नेहमीच तसे करतो. कारण कधी कुणा व्यक्तीला एखाद्या महत्त्वाच्या माहितीची गरज लागली आणि ती नेमकी त्या कालावधीच्या स्मृतीत असेल तर त्याच्या मेंदूत ती स्मृती परत टाकता येते. अर्थात अजून तसे कधीच घडले नाही." डॊक्टरांनी एक आशेचा किरण दाखविला.
"डॊक्टर मग वाट कसली बघताय? लगेच करून टाका हा तुमचा प्रयोग" रमा उतावीळपणे म्हणाली.
"हे पाहा त्यांची मूळची स्मृती पुसणे हे तूलनेने सोपे काम होते. पण ही नवी जगप्रवासाची स्मृती त्यापेक्षा फ़ारच ठळक आहे. लोकांना हा आनंद त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत अनुभवता यावा म्हणून आम्ही मुद्दामच असे करतो. त्यामूळे हा नवीन प्रयोग करण्यास बराच वेळ जाईल शिवाय १०,०००/- रूपये खर्च येईल. "
डॊक्टरांचे हे बोलणे ऐकून रमाला फ़ार वाईट वाटले. मिळालेल्या रकमेपैकी ५,०००/- रूपये तर माधवने अगोदरच घालवले होते. आता अजून दहा हजार खर्च होणार म्हणजे हाती काहीच उरणार नव्हते. पण आपला संसार टिकवायचा तर रमा समोर दुसरा काहीच पर्याय नव्हता. तेव्हा तिने जास्त वेळ न दवडता जवळचे १०,०००/- रुपये डॊक्टरांच्या हवाली केले.
अगोदर सांगितल्याप्रमाणे डॊक्टरांनीही मग लगेचच माधवला आत बोलावून बेशुद्ध केले आणि त्याच्या मेंदूत आवश्यक तो स्मृतीबदल केला. अर्थात यात बराच वेळ गेला. मध्यरात्र ही उलटून गेली होती.
प्रयोग संपल्यावर डॊक्टर बाहेरच्या खोलीत जाऊन झोपले. तर रमा माधवच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत त्याच्या शेजारी तशीच बसून राहिली. जरा वेळाने माधव हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. अर्धवट गुंगीतच तो बडबडू लागला,"रमा, मी आपले सगळे पैसे वाया घालवले गं. माझ्या मुर्खपणामूळे प्रथम पाच हजार खर्च झाले आणि तो निस्तरायला पुन्हा तुला दहा हजाराचा भूर्दंड पडला. तुझे न ऐकून मी फ़ार मोठी चूक केली. मला माफ़ कर. डॊक्टर, मी आता शुद्धीवर आलोय. मला घरी जाऊ द्यात."
शेवट
"माधव, अरे हे काय बडबडतोयस झोपेतच? काल रात्री माझ्याशी भांडून तू बाल्कनीत झोपलास आणि तापाने फ़णफ़णलास. आज सकाळी तुला कसेबसे मी शेजा-यांच्या मदतीने आतल्या खोलीत आणून झोपवले. कारखान्यात तरी कुठे गेलास तू आज? पैसे वाया जायला ते तुझ्या हातात आले तरी कधी? आणि काय रे, कारखान्यात एवढी मोठी रक्कम कधी रोखीने देतात का? तुझ्या मित्राने कारखान्यातून मिळालेला तुझा धनादेश आताच थोड्यावेळापूर्वी माझ्यापाशी आणून दिलाय. आता तुझा तापही उतरलाय तेव्हा उठ आणि बघ तू घरीच आहेस कुठल्या दवाखान्यात नाहीय." रमा माधवला उठवत म्हणाली.
माधव आता पूर्ण जागा झाला आणि त्याने पाहिले तर तो चाळीतील त्याच्या खोलीतच होता. "अगं कुठल्या दवाखान्यात नाही तर मी डॊक्टर सेन यांच्या कार्यालयात झोपलो होतो काल रात्री."
त्याच्या या बोलण्यावर हसत रमा म्हणाली,"अरे! तुला काहीतरी स्वप्न पडले असेल. डॊक्टर दवाखान्यात असतात नाहीतर इस्पितळात. कार्यालयात त्यांचे काय काम?"
आपल्याला बहुधा स्वप्नच पडले असावे असे माधवला वाटले. त्याने तसे रमाला सांगितले. ते ऐकून रमाची छान करमणूक झाली. त्याच्या विज्ञान कथा वाचनाचाच हा परिणाम आहे असे ती माधवला म्हणाली.
दुस-या दिवशी माधवने तो धनादेश बॆंकेत भरला आणि नंतर ती रक्कम रमाच्या सल्ल्याप्रमाणे एका दीर्घ मुदतीच्या योजनेत गुंतवली.
आता माधवने तीन गोष्टी सोडून दिल्या आहेत -
१. विज्ञान कथा वाचणे.
२. भटकंती करणे किंवा त्याविषयीच्या जाहिराती वाचणे.
३. रमाशी वाद घालणे.
आता तो फ़क्त आर्थिक गुंतवणूक विषयीच्या जाहिराती आणि त्यांची माहितीपत्रके वाचतो. तीही रमाच्या सल्ल्यानेच.
प्रतिक्रिया
14 Sep 2008 - 8:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वरील गोष्ट = Total recall + Eternal sunshine of the spotless mind + मराठी मध्यमवर्ग
शेवट = Click
14 Sep 2008 - 8:25 pm | सहज
सहमत [TR+ESotSM+C]+ मराठी मध्यमवर्ग
अर्थात कथा क्रमशः न करता संपवल्याने कथा आवडली हाच अभिप्राय. :-)
पु ले शु.
14 Sep 2008 - 8:30 pm | अवलिया
अर्थात कथा क्रमशः न करता संपवल्याने कथा आवडली हाच अभिप्राय मला ही देता आला असता तर किती बरे वाटले असते
असो छान कथा
14 Sep 2008 - 9:01 pm | चेतन सुभाष गुगळे
आपण आपल्या नावातील 'विक्षिप्त' शब्दाला साजेशी प्रतिक्रिया दिली आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
14 Sep 2008 - 11:41 pm | श्रावणी
कथा फार सुंदर आहे.
पण भ्रमण ध्वनी देण्याचे प्रयोजन काय?
15 Sep 2008 - 12:25 am | भडकमकर मास्तर
पण भ्रमण ध्वनी देण्याचे प्रयोजन काय?
त्यावरून प्रतिसाद द्या... बोला.. एस एम एस करा , असे असावे प्रयोजन बहुतेक.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
14 Sep 2008 - 8:43 pm | देवदत्त
चांगली आहे कथा :)
14 Sep 2008 - 9:04 pm | चेतन सुभाष गुगळे
आभारी आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
14 Sep 2008 - 9:54 pm | १.५ शहाणा
या कथेवर आधारीत नाटक साधार १९९३-९४ दरम्यान पुणे आकाशवाणी वर around the world असे सादर झाले होते मि.पा. संपादक लक्ष द्या
14 Sep 2008 - 10:55 pm | चेतन सुभाष गुगळे
अर्धवटराव,
१९९३-९४ नव्हे तर त्यापुर्वीच (१९९० च्या पुर्वीच) असे नाटक आकाशवाणीवर सादर करण्यात आले होते. अर्थात हेदेखील original नव्हतेच. मी orkut वर ही कथा post केली तेव्हाच या सर्व बाबींची तेथे चर्चा झाली होती.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com