माझ्या इनबॉक्स मधले वरुन तिसरे इमेल / फेसबुक नोटीफिकेशन -Shravan Modak mentioned you on Facebook
श्रामो , आपल्या पैकी बरेच जण त्यांना श्रामो याच नावाने संबोधित करतो.
सरकारी धोरणे, आदिवासी लोकांचे प्रश्न, आंदोलने, डावी विचारसरणी असे धाग विषय आले की लगेच मी श्रामो यांचा प्रतिसाद वाचायला/शोधायला उत्सुक. त्यांच्या डाव्या बाजूला झुकलेल्या मतांमुळे किंवा माझ्या मनात खटकलेल्या / नकोश्या वाटणाऱ्या विचारसरणीमुळे थोडा बहुत मी कायमच श्रामो यांच्या पेक्षा जरा वेगळ्या मताचा होतोच पण श्रामो काय म्हणतायत, त्यांची माहिती काय याबाबत कुतूहल कायम असायचे.
दोन वेळेला ग्रुप/ कट्या मधे त्यांना भेटायचा योग आला. एकदम शांत, सज्जन, हुशार, मुद्देसूद इसम ही जालावरची ओळख अगदी प्रत्यक्षातही डिट्टो निघाली. पत्रकारिता, लेखक, संगीत कंपनी (राहुल देशपांडे सीडी ), आय टी कंपनी, भाषांतरसंबधी काम, देशातील करपलेले , होरपळलेले भूभाग, लोकं, आंदोलन यांचा मागोवा घेता घेता, कविता, संगीत या धाग्यात अर्थवाही रसग्रहण करणारा रसीक अशी सर्व ओळख जालावर होत गेली.
माझ्या माहिती प्रमाणे श्रामो "सिंगल" (मराठीत अविवाहित??) होते. गम्मत म्हणजे फेसबुकवर एकदा रिलेशनशिप स्टेटस त्यांनी अपडेट केले होते की बहुदा फेसबुकाचे सेटिंग करताना गडबड झाली होती कल्पना नाही पण त्यांच्या एका दोन मित्रांनी लाईक केले होते. मी आपली नोंद घेतली होती. खरे काय ते त्यांना व त्यांच्या जवळच्या मित्रांना ठावूक. तरी 'सिंगल' श्रामो हे कायम गोतावळ्यात सापडलेले/ रमलेले दिसले. त्यांची खरडवही पाहिली तर किती लोकांशी त्यांचा संबध आला होता ते दिसेल पण हा इसम जालावर जितका दिसला ते हिमनगाचे टोक. बाकी भला मोठा भाग त्यांनी महाराष्ट्र नव्हे तर देशभर व्यापला असणार हे त्यांचे लेखन वाचणारा जाणून आहे. मराठी आंतरजालावर फार मोजकी लोक आहेत ज्यांनी अनेक लोकांवर प्रभाव टाकला आहे त्यातले श्रामो हे अग्रणी असावेत! लोक जमवण्याची ही त्यांची चुंबकशक्ती काही औरच. अनेक पुतणे, पुतण्या जमवलेले हे काका. एकदा सहज खरडवह्यातुन दंगा करायच्या दिवसात, त्यांना विचारले होते की मग इस्टेट (पुस्तके) पुतण्यांना (धमु, नायल्या) की पुतणींना(स्वाती, आदिती), तेव्हाचा तो थट्टेतला प्रश्न आज फार क्रूर वाटतोय. भले काही वर्षापूर्वी असेच अचानक कोणत्या धाग्यात / प्रतिसादात स्वताच्या अंजीओप्लास्टी, स्वता कोणाला न कळवता अॅडमिट होणे हा गुगली टाकला होता. पण पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे श्रामो मोड मधे उर्फ सतत कार्यमग्न. तब्येतीची काही वाच्यता नव्हती, त्यानंतरची ही एक्झीट फार शॉकिंग आहे.
मागल्या एक दोन वर्षात भेट झाली नाही व तसेच प्रतिसादात मतभिन्नता होती त्यामुळे आता परत ते भेटणार नाहीत ही रुखरुख कायम रहाणार, संवाद अर्धवट राहीला आहे. श्रामो यांना अजुन जाणून घ्यायलाच हवे आहे....
------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्हाला उमगलेले श्रामो लिहून त्यांना जाणुन घ्यायला मदत करा.
प्रतिक्रिया
30 May 2013 - 8:06 pm | सुबोध खरे
मला वाटते कि श्रामोनच्या कार्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती करून दिली आणी ते कार्य पुढे चालू ठेवले तर त्यांना खरी श्रद्धांजली वाहिल्यासारखी होईल
31 May 2013 - 12:12 pm | खबो जाप
+१
30 May 2013 - 8:13 pm | मुक्तसुनीत
मित्राबद्दलचं हृद्य लिखाण.
30 May 2013 - 8:22 pm | लाल टोपी
नव्या मिपाकरांसाठी दखल मध्ये त्यांचे लेखन दाखवले गेले आहे. सं.मं हीच सूचना करण्यास आलो होतो धन्यवाद
30 May 2013 - 8:39 pm | विकास
सहजराव तुम्ही सर्व मुद्दे कव्हर केले आहेत. एक प्रत्यक्ष भेट सोडल्यास, तुमच्याप्रमाणेच डावे विचार आणि नक्षलवादा संदर्भात त्यांच्याशी मतभेद नक्कीच झाले होते, पण त्यातून कधी कटूता नव्हती. जरी कार्यपद्धतीसंदर्भात वैचारीक मतभेद असले तरी त्यांच्या तळागाळातील जनतेबद्दलच्या तळमळीबद्दल कधी शंका नव्हती. श्रामो असे अचानक निघून जातील असे स्वप्नात देखील वाटले नव्हते....
30 May 2013 - 8:53 pm | मदनबाण
माझ्या आठवणी नुसार माझे एक-दोनदाच मोडक काकांशी बोलणे झाले होते.
संगीत कंपनी (राहुल देशपांडे सीडी ) कबीर बानीच्या गाण्याची झलक त्यांनी मला मेल केली होती.मला त्यांच्याकडुन ती सीडी घ्यायची होती, ती इच्छा राहुन गेली. :(
30 May 2013 - 8:58 pm | सुहास झेले
काय बोलू... काहीच सुचत नाही.
आजवर जे बोलणे झाले ते व्यनि आणि खवमध्येच. कधी भेटायचा योग आला नाही... त्यांच्या समाजकार्याचा आवाका फारच मोठा याची जाणीव त्यातून झाली होती. त्यांना मनापासून आदरांजली :-|
30 May 2013 - 9:03 pm | प्रकाश घाटपांडे
श्रामो खर्या अर्थाने मला विवेकवादी वाटत. अंनिस, निरिश्वरवाद, विवेकवाद यावर त्यांच्याशी नेहमी चर्चा होत. तर्ककर्कशतेला त्यांचा नेहमी विरोध होता. माणस जोडणे महत्वाचे आहे.त्यासाठी तात्विक तडजोडी करण त्यांना मान्य होत. विवेक असल्यावर वाद कशाला? असे ते गमतीने म्हणत.
30 May 2013 - 10:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजशेठ धन्स.
औरंगाबादला एका मिपाकराच्या लग्नानिमित्तच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात श्रामोला भेटता आलं. 'कुठं हे गोडधोड खाता राव, बाकी, मिपाकरांच्या जेवणावळी उरकेपर्यंत आपण मैफील रंगवू असा विचार मांडल्यानंतर, श्रामोची आलेला होकार पण परत लगेच परत फिरायचं आहे अशा मिपाकर मित्रांच्या आग्रहामुळे आमचा तो बेत राहीला, पुढे कधी तरी येईन तेव्हा रात्रभर गप्पा हानू... गप्पा राहील्या त्या राहील्याच.
श्रामोंशी ओळख झाली ती जालावरच.तेव्हाच त्यांची तिढा कादंबरीबद्दलही ओळख झाली होती. विस्थापितांचे प्रशन, आंदोलन, सामाजिक कार्याची ओळख, सामनाचे पत्रकार, अशी ओळख वाढली होती. मिपावर वावरतात म्हटल्यावर एक आदरयुक्त दबदबा असायचा. विषयाची जाण, खोल मांडणी, अभ्यासू प्रतिसाद, शब्दांशी खेळायचा नाद, तीरपे प्रतिसाद, खोचकपणा, खोडकरपणा, अशा जालवृत्तीही त्यांच्याशी संबंध वाढला. मागे भोचक गेले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांशी सतत संपर्कात असलेला माणूस आणि त्यांची उत्तम व्यवस्था केली ती श्रामोनीच. आणि वेळोवेळी त्याबद्दलचे अपडेट्स श्रामोंनी दिले. माझा आदर त्यांच्याबद्दल वाढला तो असाच.
मराठी आ.जालावर कधी कोणत्या सदस्याशी कसे जमेल आणि कधी कोणाशी कोणत्या प्रसंगाने बिनसेल याचा काही नेम नाही. अशा अनुभवाचा आता मोठा साठा होत चालला आहे. प्रतिसादात कोणी कोणाची बाजू घेतली आणि कोणी कोणावर अन्याय केला. कोण कसं चूक आहे आणि कोण कसं बरोबर आहे वगैरे याबाबतीतचे समज आणि गैरसमज ही जालावरची मोठी गोची आहे. स्पष्टीकरणापेक्षा मौन बरं असं आपण म्हणतो खरं पण त्यामुळे अनेक गोष्टी बोलायच्या राहून जातात, कधी कधी त्या कायमच्याच राहून जातात. कोणाकोणाचं कोणत्या कारणामुळे मन खट्ट होईल काही सांगता येत नाही. श्रामोच्या काही प्रतिसादांबद्दल विशेषत: तिरप्या प्रतिसादांबद्दल (मला नव्हते ते) माझं हल्ली मत बदलत चाललेलं होतं. मला आताशा त्यांच्या न पटणा-या प्रतिसादाची मोठी गम्मत वाटायची. मागे एकदा माहिती अधिकाराच्या एका धाग्याबाबत तर..... माहिती अधिकाराचा आम्हीही वापर करतो म्हणून मला तर एक धागाही काढावा लागला होता असा आमचा अहंकार....मलाही काही कळतंची ती एक स्पर्धा.
श्रामो, तळमळीने लिहायचे बोलायचे ते प्रामाणिकपणे आवडायचे कधी दाद दिली कधी दिली नाही. डबल ब्यारल म्हणून केलेली गम्मत आवडायची. कधी टीका केली पण मनात कधी कायमची अशी अढी ठेवली नाही. श्रामोचे आंदोलनाच्या धाग्याबाबतचा फीडब्याक असो, माहिती असो, ती तत्त्परतेने यायची. कधी आम्हीही खोड काढायचो, चिमटे घ्यायचो. मजा केली.
आज दुपारी मिपाकरांचा वाट्सपर श्रामोबद्दलचा मेसेज पाहिला आणि धक्काच बसला. विश्वासच बसला नाही. परवा त्यांना मिपावर कितीतरी वेळ मी पडीक पाहिल्याचं मला आठवतं. असं कसं होईल, कशामुळ झालं, काय नी काय. फेसबूकवर नक्षलींच्या नव्या कृत्याबाबत लिहा, असे ष्टेटसला लाईक करुन त्यांच्या लेखनाची वाट पाहात होतो, आता ते लिहिणं नाही आणि काही नाही. आयुष्या्त येणारी काही कोडी सुटत नाही. आयुष्य नावाचं हेच सालं मोठं लफडं आहे.
-दिलीप बिरुटे
30 May 2013 - 11:41 pm | निनाद मुक्काम प...
डॉ चा प्रतिसाद आवडला ,
अश्याच प्रतिसादांच्या प्रतीक्षेत
30 May 2013 - 11:48 pm | विकास
म.टा. मध्ये आत्ताच ही बातमी वाचली...
प्राडॉ, प्रकाशराव आणि क्लिंटनचे प्रतिसाद आवडले...
31 May 2013 - 5:15 am | धमाल मुलगा
गेले! कधी एके ठिकाणी शांतपणे थांबायचं ठाऊकच कुठे होतं त्यांना? सतत आपली फिरस्ती चालूच. कधी अड(व)लेल्या पाण्यासाठी, कधी नाडलेल्या आदिवासींसाठी...
सकाळी ही बातमी वाचली अन बधीरच झालो. अजूनही काही सुचत नाहीये...पण काहीतरी लिहायचं ठरवलंय! माझ्या दोस्तासाठी शेवटचे दोन शब्द तरी लिहवेसे वाटताहेत...मनात असूनही केलं नाही म्हणून 'हॅत्तिच्यायला! समाजवादी लेकाचे तुम्ही..घोळ नुसते!' म्हणून एखादी टपली मारतील असंच वाटतंय अजूनही.
ओळख कशी झाली, मैत्री कधी झाली..असले प्रश्नच न पडण्यासारखं व्यक्तिमत्व. जालावरच्या ओळखीचं रुपांतर घरगुती मैत्रीत कसं झालं कळलंही नाही. नेहमीच्या भेटीगाठी, जवळपास रोज संध्याकाळी पूनममध्ये गप्पा...कधी सगळ्या ग्रुपसोबत तर कधी मुद्दाम आधीच ठरवून दोघंच भेटायचो...मग पहाटपर्यंत गप्पा चालायच्या. डावे-उजवे, नक्षली, आध्यात्म, अँथ्रोपॉलॉजी, गाणी-गिणी, साहित्य, पत्रकारिता, त्यांचं अनुभवविश्व....त्यांनी एकेक सांगत जावं अन आपण नुसतं आ वासून ऐकत रहावं....कधी वाद घालत बसायचो; म्हणजे, मी अडेलतटूपणे माझी बाजू धरुन बसायचो अन मग सरकार त्या विषयात चहुकडे फिरवून आणायचे. शेवटी "मी हलकट आहेच, पण तूही हलकट आहेस. मला कळतंय तुझं काय चाललंय ते!" असंही म्हणायचे. पण ज्ञान देण्याचा, शिकवण्याचा मूळ स्वभाव असल्याने असेल, त्यांना ते आवडायचं. टिपकागद म्हणायचे मला, टिपकागद! सांगितलेलं, शिकवलेलं, वाचायला दिलेलं सगळं बरोब्बर शोषुन घेणार, पण त्याचा उपयोग करायची वेळ आली म्हणजे शून्य! म्हणून मी टिपकागद. अन मी त्यांना सॉक्रेटिस म्हणायचो. सगळं ठाऊक असायचं, पण मुद्दाम वेड पांघरुन बसायचं. समोरचा तावातावानं बोलायला/लिहायला लागला की ह्यांचे एकेक प्रश्न सुरू. एकातून दुसरा, दुसर्यातून तिसरा....शेवटी समोरचा जेरीला येणार. अन एकदम त्याला साक्षात्कार होणार, च्यायला....आधी आपण जे बोलत होतो ते चुकीचं आहे हे आपणच सिध्द करुन दाखवलंय ह्यांना उत्तरं देताना. ही अशी शिकवायची पध्दत.
स्वतः देव, कर्मकांडं वगैरेच्या विरोधात. पण जेव्हा मी सत्यनारायणाच्या पुजेला विरोध केला तेव्हा साधं सोपं गणित सांगितलं - पूजेला बसू नकोस. मान्य आहे, तुपातला, केळी केशर वेलची घातलेला शिरा तर आवडतो ना? बस्स...तो खा की! तत्वाचा टेंभा महत्वाचा की म्हातारीच्या चेहर्यावरचं समाधान महत्वाचं? संतुलित विचार करणं म्हणजे काय ते आमच्या ह्या मास्तरांकडून शिकावं.
काय काय म्हणून आठवणी काढायच्या? डि.व्हि.पलुस्करांची गाणी ऐकत बसायचं होतं, मामासाहेबांच्या केतकावळ्याच्या फार्महाऊसला जाऊन रात्रभर गप्पा मारत, गाणी ऐकत स्कॉच प्यायची होती, राहूल देशपांडेची गाण्याची मैफिल जमवायची होती...सोबत नर्मदेकिनारी फिरायचं होतं.....
एक चांगला मित्र, एक हक्कानं कान उपटणारं वडिलधारं व्यक्तिमत्व, एक गुरु...काय काय हरवलं एका क्षणात
अलविदा मास्तर....सलाम! शेवटचा सलाम!!!
31 May 2013 - 5:48 am | स्पंदना
31 May 2013 - 1:50 pm | भडकमकर मास्तर
छान लिहिलंस धम्या..
श्रामो , तू आणि अभिज्ञाबरोबर एकदा मिपा कट्टा केला होता त्यावेळी बराच वेळ बोललो होतो...
शॉकिंग न्यूज.. चेपु वरती दोन दिवसांपूर्वीच श्रामोंना नक्षलवादावरती लिहायची विनंती आल्यावर आम्हीही त्यावर लाईक करून लेखाची वाट पाहत बसलो होतो तर काल सकाळी केसुंनी चेपुवरती कळवले की श्रामो क्रिटिकल आहेत ... एकदम विश्वासच बसेना... आणि दुपारी उशीरा बातमी आलीच... :(
31 May 2013 - 8:14 am | सुनील
नेमके.
म सं वरील अशा काही मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे श्रामो.
31 May 2013 - 9:47 am | अडगळ
या माणसाबरोबर कधीच बोलणं / खरड / व्यनि काही झाला नाही. पण कुठल्याही लेखावर जेव्हा प्रतिक्रिया यायच्या , त्यात यांचं नाव दिसलं तर ते ओलांडून पुढं जाणं कधी जमलं नाही. रो़ज दिसणारं एखादं वडाचं मोठं, डेरेदार, शांत, अनेक पावसाळे पचवलेलं झाड अचानक उन्मळून पडलेलं दिसावं तसं काही तरी वाटलं.
31 May 2013 - 12:56 pm | वाहीदा
Truly hurt to learn about Shramo's Death !
I remember while my conversation with him after Yaku's death he has asked me to get hold of Zen Stories and read them beyond religion.
Sorry Shramo, haven't got time to get hold of beautiful Zen Stories.
But I will definately do that in near future.
You will always be remembered with Fond Memories !
May Your Soul Rest in Peace, Ameen !!
~ Wahida
31 May 2013 - 1:18 pm | सृष्टीलावण्या
कलियुगाचे वर्णन आहे की सज्जन कमी जगतात आणि दुर्जन दीर्घायुषी होतात. त्याची आठवण झाली. अभिवादन.
31 May 2013 - 1:41 pm | विसोबा खेचर
श्रामो अकाली गेले..
ज्याची दोरी संपली तो गेला.. नियतीपुढे कुणाचाच इलाज नाही..
वाईट झालं..
त्यांच्या स्मृतीस प्रणाम..
तात्या.
31 May 2013 - 2:51 pm | प्यारे१
श्रामो त्यांच्या लिखाणातनंच भेटले.
अभ्यासू प्रतिसादांमधून वेगळी अशी निर्माण केलेली शैली आपोआपच जाणवत होती.
हाडाच्या पत्रकारीतेतून बातमी फक्त पोचवण्याचं काम त्यांना बरोबर जमत होतं किंबहुना तोच त्यांचा स्वभाव बनला होता.
काहीही झालं तरी स्वतःच्या साधारण डाव्या विचारसरणीच्या धाटणीत बातमीची मांडणी करुन आपल्याला अस्वस्थ करुन श्रामो समस्येचं स्वरुप आपल्यासमोर मांडतात. त्यातली नेमकी समस्या आपल्यासमोर पोचते.
पत्रकार म्हणून सखोल माहितीसकट बातमी पोचलेली असते, त्यांच्या स्वतःच्या विचारधारेतून निर्माण झालेला बातमीमागचा अंडरकरंट देखील पोचतो नि तरीही श्रावण मोडक ह्या व्यक्तीचं व्यक्तीगत मत काय हे पडद्याआडच राहतं. बसा ओरडत. ह्याच गोष्टीची बर्याचदा चीड यायची.
'काही नोंदी अशातशाच' मधून मी काम करत असलेल्या प्रकल्पावर आलेला लेख मला बर्यापैकी अपराधीपणाची बोच देत होता त्याबद्दल थोडी चर्चा देखील झालेली होती. ह्या माणसाच्या पूर्ण प्रवाहात असून देखील तटस्थ नि त्रयस्थपणं बातम्या देण्याच्या कसबाला खरंतर सलाम म्हणावंसं वाटतं पण तरी म्हणणार नाही कारण उत्तरं माहिती असून देखील ती त्यांनी व्यक्त केली नाहीत अथवा जाणीवपूर्वक टाळली त्यामुळं उत्तरं शोधण्यात जाणारा वेळ वाढलाच खरंतर.
पत्रकारानं नेहमीच खर्या सामाजिक कार्यकर्त्याला मागं टाकलं.
तुम्हाला भेटून हेच सांगायचं होतं.
श्रामो तुमच्याच शैलीत मात्र अतिशय अस्वस्थ होऊन म्हणतोय
- नाही भेटलात. ठीकच.
2 Jun 2013 - 2:19 am | संजय क्षीरसागर
हा माणूस त्याच्या केवळ एका शब्दामुळे आयुष्यभर लक्षात राहिल, `समुहोन्माद'.
प्रत्येक ग्रुपमधे, प्रत्येक सामाजिक चळवळीत, प्रत्येक नेत्याचं वक्तव्यं जोखतांना, स्वतःच्या बाबतीत... कुणी मागे असतांना, नसतांना; तो स्वतःची मतं मांडायला योग्य शब्द सुचवत राहिल.
वंचितांप्रती सहानुभूती असणार्या आणि झटणार्या अशा दुर्लभ माणसाला विनम्र श्रद्धांजली .