बोट किंवा बस लागणे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
22 May 2013 - 7:10 pm

आपल्यातील बर्याच लोकांना बोट किंवा बस लागते. म्हणजे काय होतं?
बोट किंवा बस एका जागी उभी असते तेंव्हा काहीच होत नाही पण ती जेंव्हा हलू लागते तेंव्हा थोड्यावेळाने चक्कर येते. पोटात ढवळून येते आणि उलटीची भावना होते किंवा उलटी होते.
हे असे का होते याचे मूळ आपल्या कानाच्या आत असते कानाच्या आत अर्ध वर्तुळाकृती नलिका, utricle आणि saccule (पिशवी) हे तीन अवयव असतात. या अर्ध वर्तुळाकृतीनलिका तीन मितीत (थ्री डाय मेन्शन) आपल्या मेंदूची परिस्थिती काय आहे याची मेंदूला सतत माहिती देत असतात. याच बरोबर तेथे हे नंतरचे दोन अवयव मेंदूला आपल्या डोक्याची स्थिती गुरुत्वाकर्षण च्या तुलनेत कुठे आहे आणि सरळ वेगाने जाताना कुठे आहे ते दर्शवते.अर्ध वर्तुळाकृती नलिका मेंदूची स्थिती डोके तिन्ही मितीमध्ये वळवल्या मुळे कुठे आहे ते मेंदूला कळवत असते.थोडक्यात हे तीन अवयव मेंदूला डोक्याची स्थिती स्थिर अवस्थेत( STEADY STATE) , सरळ रेषेत त्वरण(LINEAR ACCELERATION) झाल्यावर आणी वर्तुळाकृती त्वरण(ROTATIONAL ACCELERATION) झाल्यावर काय आहे ते सतत कळवत असतात.
ज्यावेळेला आपले डोके सतत वळत असते (जसे घाटामध्ये एस टी ने गेल्यावर) तेंव्हा त्या नलीकेतील द्रव पदार्थ स्थिर स्थितीतून सतत गतिमान स्थितीत गेल्यामुळे आपण बस मधून उतरल्यावर सुद्धा आपले डोके गरगरते आहे अशी भावना होते. हीच परिस्थिती जेंव्हा आपला वाहन चालक सारखा गचके घेत (सतत वेगाने पुढे जाणे आणी एकदम ब्रेक लावून थांबवणे)चालवत असतो तेंव्हा होते.
एकदा आपल्या कानातील वरील अवयवात असलेला द्रव गतिमान झाला कि तो बराच वेळ आपल्याला आपले डोके हलत आहे अशी जाणीव करीत राहतो. दुर्दैवाने या हालचालीचे केंद्र मेंदूच्या खालच्या भागात जेथे आहे त्याच्या शेजारीच उलटीचे केंद्र असते.
या उलटीच्या केंद्र शेजारी एक रासायनिक पृथक्करण विभाग(CHEMORECEPTOR TRIGGER ZONE किंवा CTZ ) असतो.
जर विषबाधा झाली तर विष रक्तात मिसळून मेंदूकडे येते आणी ते विष या CTZला उत्तेजित करते. हा CTZ उलटीच्या केंद्राला संदेश पाठवून उलटी करून आणतो त्यामुळे जठरात आलेले विष हे उलटीच्या वाटेने बाहेर फेकले जाते. याच कारणामुळे काही औषधे घेतल्यावर आपल्याला उलटीसारखी भावना किंवा शिसारी( NAUSEA) आणतात. गरोदर पणाच्या पहिल्या तीन महिन्यात संप्रेरकांची रक्तातील पातळी एकदम वाढल्यामुळे हाच परिणाम होऊन गरोदर स्त्री ला ओकारीची भावना किंवा ओकारी होते.
ज्यावेळेला आतल्या कानाच्या केंद्राला संवेदना जास्त प्रमाणात येतात तेंव्हा त्या ओसंडून बाजूच्या केंद्रांना पण उत्तेजित करतात यामुळे आपल्याला शिसारी( NAUSEA) येते आणी उलटी पण येते.हीच परिस्थिती आपण एस्सेल वर्ल्ड ला चक्राकार फिरणाऱ्या पाळण्यात बसलो तरी येते.
कोणतीच हालचाल न करता जर या आतल्या कानाला विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर बसल्या जागी आपल्याला गरगरते, चक्कर येते आणी उलट्या येतात. याला VERTIGO म्हणतात.
डीझेल ची वाहने यांचे चक्राकार त्वरण जास्त असते( TORQUE) त्यामुळे या वाहनांच्या इंजिनचे RPM पेट्रोल च्या वाहनांच्या RPM पेक्षा कमी असतात आणी पेट्रोलच्या वाहनांचा TORQUE कमी असतो त्यामुळे डिझेलची वाहने कमी वेगात पटकन वेग घेतात पण त्यांचा सतत गियर बदलावा लागतो त्यामुळे डिझेलची वाहने जास्त गचके देत चालतात.त्यात आपल्याकडे चालकांचे प्रशिक्षण हा एक संशोधनाचा विषय आहे). शिवाय डिझेलच्या वाहनाचे हादरे पेट्रोलच्या वाहनांपेक्षा कितीतरी जास्त असतात.डीझेल वाहनाचा धूर हा एका विशिष्ट वासाचा असतो त्यामुळे आपल्याला ट्रक किंवा एस टी च्या धुराचा वास आला तरी डचमळल्याची भावना होते ( याशिवाय आपल्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेत स्वच्छता हा एक ऐच्छिक विषय असल्याने त्याबद्दल न बोलणे बरे) त्यातून घाटात जाताना शेजारचे मुल ओकत असेल तर आपली अवस्था अजून बिकट होते)
ज्यांना ज्याना एस टी / बोट लागते त्यांनी याचा चांगलाच( किंवा वाईट) अनुभव घेतलेला आहे.
पहिली गोष्ट म्हणजे असे काही लोकांना होते आणि काही लोकांना होत नाही असे का?
काही लोकांचे वरील अवयव अति संवेदना शील असतात त्यांना नुसते टीव्ही वर हलणारे जहाज पाहून सुद्धा डचमळल्याची भावना होते. याविरुद्ध मी विक्रांत मध्ये असताना आम्ही जुलै महिन्याच्या सरावानंतर मुंबई बंदरात परत येत होतो तेंव्हा बर्याच लोकांची अवस्था कठीण होती. असेच बाहेर पाहत असताना एक मच्छिमार आपल्या बारक्या होडक्याच्या डोलकाठी च्या टोकावर असलेल्या एका फळकुटावर बसून दोन्ही हात सुटे सोडून विडी ओढत बसला होता आणि त्याच दहा फुटाचे होडके कमीत कमी ५-६ फुट वर खाली होत होते. आणि त्याला कोणताही त्रास किंवा दुखः नव्हते हे दुसरे टोक.
हा भाग सवयीने होतो कारण तुमचा मेंदू काही वर्षांनी अशा हालचालींना सरावतो. यामुळेच लहान मुलांना बस फार पटकन लागते आणि मोठ्या माणसाना नाही.
सवय तर पटकन होत नाही. आता यावर उपाय काय ?
बोटीचा पुढचा भाग जास्त हलतो म्हणजे जास्त वर खाली (pitching) होतो तेंव्हा बोटीच्या मागच्या भागात बसणे त्यातून बोटीचा वरचा मजला जास्त डावी उजवीकडे( rolling) होतो म्हणून सर्वात खालच्या मजल्यावर बसणे. याविरुद्ध बसमध्ये पुढचे चाक आणि मागचे चाक याच्या मध्ये बसलात तर तरफेच्या आतल्या भागात बसल्याप्रमाणे आपली हालचाल वर खाली आणि वळणाच्या रस्त्यावर डावी उजवीकडे कमी होईल. याशिवाय बोटीत बसल्यावर आपली नजर जर आपण लांबवर क्षितिजाकडे ठेवली तर आपले हलणे क्षितिजाच्या मानाने कमी असल्यासारखे वाटल्याने आपल्याला डचमळल्याची भावना कमी होईल. यासेच एस टी मध्ये बाहेर क्षितिजाकडे पाहत राहिलात तर डचमळल्याची भावना कमी होईल. आतमध्ये खाली पहिले तर फार लवकर चक्कर आल्यासारखे वाटते तेंव्हा ते टाळावे.ज्यांना बस किंवा बोट लागते त्यांनी प्रवास सुरु करण्याच्या अर्धा तास अगोदर अवोमीन( avomin) हि गोळी घ्यावी. पोट शक्यतो रिकामे ठेवावे याचे कारण अन्न असले तर ते पचवण्यासाठी जठरात आम्ल तयार होते आणि जर उलटी झाली तर त्यातून हे अन्न आणि आम्ल बाहेर पडते. याशिवाय उलटीचा ऐवज जास्त असल्याने ती थांबवून ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे कठीण जाते. दुध तर मुळीच पिऊ नये कारण पोटातील आम्लाने त्याचे दही बनते आणि उलटीला अत्यंत घाणेरडा वास येतो.( एस टी मध्ये हमखास कोणीतरी मुलाला दूध पाजून आणलेले असते आणि त्याने उलटी केली तर तो वास आजूबाजूच्या लोकांना खूप वेळ त्रास देत राहतो)
जर रोज आपल्याला प्रवास करणे आवश्यक आहे आणि रोज औषध घेऊ नये असे वाटत असेल तर किसलेल्या आल्यात लिंबाचा रस साखर मीठ आणि थोडेसे सैंधव आणि पादेलोण करून फ्रीज मध्ये ठेवावे. आल्याचा रस हा या मेंदूतील केंद्राला स्थिर करतो असे डॉक्टर शरदिनी डहाणुकर यांच्या गटाने मुंबईत के इ एम रुग्णालयात केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
यात मूळ घटक "आले" हा आहे आणि आल्याचा कीस हा जास्त गुणकारी आहे मिक्सर मध्ये आले फिरवून त्याचे बारीक वाटण करण्यापेक्षा कीस जास्त उपयुक्त असतो. शुद्ध आल्याने तोंड कोरडे पडते. लिंबाचा रस साखर आणि मीठ( सैधव आणि पादेलोण) यांनी आल्याच्या गुणधर्मात वाढ होते त्या पदार्थाला चव येते आणि तोंडाला पाणी सुटून तोंडाचा कोरडेपणा कमी होतो.
याच कारणास्तव एस टी स्टेण्ड वर आलेपाक मिळत असावा. त्याचा प्रयोग करून पहा.
खरं तर हा उपाय गरोदर स्त्रियांनी जरूर करून पाहावा असा आहे. ( माझ्या बर्याच रुग्ण स्त्रियांनी त्यांना खूप चांगला फायदा झाल्याचे मला आवर्जून सांगितले).

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

22 May 2013 - 7:27 pm | नितिन थत्ते
सुबोध खरे's picture

22 May 2013 - 7:35 pm | सुबोध खरे

आपण सर्व गोष्टी लिहिल्या होत्याच. क्षमा करा मी अगोदरचे लेख वाचले नाहीत
कदाचित हा धागा अनावश्यक आहे ( काढून टाकला तरी चालेल- सं मं ला विनंती )

चौकटराजा's picture

23 May 2013 - 8:39 am | चौकटराजा

आपले विवेचन सर्वस्पर्शी आहे. मला नैनिताल- कौसानी, मुन्नार- पेरियार, जमू- श्रीनगर, सिमला- चैल या मार्गावर असा त्रास झाला आहे. तेथील लोकानी " समोर पहा" असा सल्ला दिला.बाकी या सर्व प्रवासात नंतर हा त्रास झाला नाही पहिल्या दिवशीच होतो. असा अनुभव आला.
आपली माहिती ज्ञानानंद देणारी आहे. धन्यवाद !

नितिन थत्ते's picture

22 May 2013 - 7:28 pm | नितिन थत्ते

पुढच्यावेळी आल्याचा वापर करून पाहीन.

मदनबाण's picture

22 May 2013 - 7:35 pm | मदनबाण

आल्याचा रस हा या मेंदूतील केंद्राला स्थिर करतो असे डॉक्टर शरदिनी डहाणुकर यांच्या गटाने मुंबईत के इ एम रुग्णालयात केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
अरे वा... नविन माहिती कळली ! :)

पैसा's picture

22 May 2013 - 7:42 pm | पैसा

धागा अनावश्यक नाही. तेव्हा बरीच चर्चा झाली होती, पण त्यात सगळ्यांचे अनुभव आणि गमतीजमतीही खूप होत्या. अशी शास्त्रीय माहिती तेव्हा फारशी पुढे आली नव्हती.

मला वाटतं दोन्ही धाग्यांचा उद्देश सारखा असला तरी माहिती शास्त्रीय आहे आणि नविन गोष्टी कळल्या आहेत. दोन्ही धागे आपोआप लिंक करायची सोय आहे की नाही माहित नाही.

प्रभाकर पेठकर's picture

22 May 2013 - 7:56 pm | प्रभाकर पेठकर

कांही गोष्टी माहित होत्या त्यांची शास्त्रीय कारणे आज समजली.

बोटीत, बस मध्ये गरगरायला लागल्यावर डोळे मिटून कांही फायदा होतो का?

सुबोध खरे's picture

23 May 2013 - 9:24 am | सुबोध खरे

डोळे मिटून घेतल्यास आपले डोके हलते आहे हे डोळ्याकडून मेंदूला जाणारे संदेश बंद होतात त्यामुळे मूळ अंतरकर्णाकडून जाणार्या संदेशाचे प्रबलीकरण( reinforcement) होत नाही त्यामुळे चक्कर येणे बरेच कमी होते. ज्या लोकांना चक्कर येत असेल त्यांनी पुढच्या सीट ला डोके टेकवून डोळे बंद करून घेतले तर गरगरणे आणि चक्कर येणे खूप कमी होते.

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2013 - 11:08 am | प्रभाकर पेठकर

उपयुक्त माहिती.

चौकटराजा's picture

23 May 2013 - 5:19 pm | चौकटराजा

बरोबर हाच प्रयोग मी पेरियार ते कोट्टायम या प्रवासात केला. निसर्गसौंदर्य पहायला मिळाले नाही पण ओकारी टळली.

अशोक पतिल's picture

22 May 2013 - 10:43 pm | अशोक पतिल

अतिशय महत्वाचा धागा ! ही समस्या मला अजिबात नाही,परंतू पत्नि व कन्येला हमखास बस मध्ये बसल्यावर होते. पत्निला तर कार मध्येही हा त्रास होतो. मुळ धागा व पॅलवान यांचा धागा आज वाचला, दोन्ही लेख व श्री नितिन थत्ते यांचा प्रतिसाद खुप उपयोगी आहे.

आशु जोग's picture

22 May 2013 - 10:57 pm | आशु जोग

विमानामधे कान दुखायला लागतात त्यासाठी काय करावे...

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2013 - 3:36 am | प्रभाकर पेठकर

डोक्याच्या कवटीतील हवेचा दाब आणि बाहेरील हवेचा दाब ह्यातील फरकामुळे कान/डोळे दुखतात असे ऐकले आहे. विशेषतः सायनसचा त्रास असेल, सर्दी, कफ असेल तर असे हमखास होते. त्यासाठी ऑट्रिव्हिन हे नेसल ड्रॉप्स बरोबर ठेवावे आणि नाकात २-२ ड्रॉप्स टाकावेत. बंद असलेले नांक उघडून तसेच घशातील युस्टेशियन ट्यूब्सचा मार्ग मो़कळा होऊन कान दुखणे टळते.

हा स्वानुभव आहे.

सुबोध खरे's picture

27 May 2013 - 10:38 am | सुबोध खरे

ऑट्रिव्हिन (xylometazoline) या औषधाने रक्त दाब वाढतो म्हणून हे औषध सर्व सामान्य माणसाने केंव्हाही घ्यावे असा सल्ला देणे कठीण आहे. याचे कारण लोकांचा अधिरेपणा. दोन दोन थेंब टाकून नाक साफ होत नाही म्हणून पुढच्या २ मिनिटात लोक अजून थेंब टाकतात आणि तरीरही होत नाही म्हणून परत एकदा थेंब टाकतात हा सहज येणारा अनुभव आहे आणि यामुळे रक्तदाब वाढून लोकांना डोके दुखणे चालू होते. दुर्दैवाने हि डोकेदुखी सर्दीची आहे असे गृहीत धरून लोक सर्दीची गोळी ( डी कोल्ड , कोल्डारीन किंवा तत्सम) घेतात. या गोळीत सुद्धा एफेड्रीन किंवा PPL( phenyl propanolamine) हे बंदी घातलेले औषध असते. अशी औषधे घेऊन एक ३२ वर्षाचा रुग्ण माझ्याकडे डोकेदुखीसाठी आला होता त्याचा रक्तदाब पहिला असता तो २०० /११० निघाला. यावर आपण काय औषधे घेत असे विचारल्यावर वरील माहिती बाहेर आली होती. त्याचा रक्त दाब नंतरच्या काही दिवसानी सामान्य झालेला आढळला.
वरील औषध आपल्या फामिली डॉक्टर च्या सल्ल्याने घेणे
या कारणास्तव मी साधे चोकोलेट किंवा च्युइंग गम खाण्याचा सल्ला देतो.
कान साफ करणे यासाठी पहा
https://en.wikipedia.org/wiki/Ear_clearing

सुनील's picture

27 May 2013 - 10:47 am | सुनील

लेख आणि प्रतिसादांतून चांगली माहिती मिळते आहे. अर्थात, नेहेमी प्रतिसाद दिला जातोच असे नाही. ;)

या गोळीत सुद्धा एफेड्रीन किंवा PPL( phenyl propanolamine) हे बंदी घातलेले औषध असते

तुम्ही उल्लेखलेल्या कोल्डारीन इ. गोळ्या अधिकृतपणे विकत मिळतात. मग त्यात हे बंदी घातलेले औषध कसे काय असते?

नितिन थत्ते's picture

27 May 2013 - 11:09 am | नितिन थत्ते

आपणहून औषधोपचार करण्याबाबत सहमत.
नुकताच आलेला अनुभव--
रोहतांग पास येथे गेले असता खूप उंचीवरील हवेच्या कमतरतेमुळे त्रास होतो* असे सांगण्यात आले. तसेच परिचयातल्या व्यक्तीला लदाखमध्ये त्रास झाल्याची माहिती होती. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून डायमॉक्स (acetazolamide) नावाची गोळी घेणे हा उपाय स्थानिक लोकांनी सांगितला. म्हणून आदल्यारात्री ती गोळी घेऊन गेलो. गोळी घेतलेल्या सर्वांना गुंगी आणि अ‍ॅसिडिटीचा बर्‍यापैकी त्रास झाला. (भीक नको कुत्रा आवर).

*आम्ही नंतर याविषयी जालावर वाचन केले त्यात विशेष गंभीर सहसा होत नाही असे दिसले आणि आजार मुख्यत्वे गिर्यारोहकांना (चढण्याचे कष्ट आणि ऑक्सिजनची कमतरता) होतो असे दिसले.

डायमॉक्स ही गोळी एकदा काही कारणाने घेतली असता (डॉक्टरी सल्ल्यानेच) हातपाय बधीर झाले. बोटे, पावले अन चेहर्‍याला इतक्या मुंग्या आल्या की घबराटच झाली. तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन हे काही झेपत नाही बुवा असे सांगितले.

त्यांनी अर्धीच गोळी घ्या म्हटले तरी परिणाम तस्साच. तेव्हा काही औषधे काही जणांना पचनी पडत नाहीत हेच खरं.

नितिन थत्ते's picture

27 May 2013 - 12:07 pm | नितिन थत्ते

हातापायाला मुंग्या सुद्धा आल्या

कधीतरी एकदा कारणपरत्वे ऑट्रिव्हिन ड्रॉप्स वापरले. अत्यंत जादुई परिणाम झाल्याने परत एकदा वापरले. नाक ताबडतोब खुलत असल्याने प्रत्येक वेळी वापरणे सुरु झाले. नंतर लक्षात आले की सर्दी वगैरे नसतानाही ऑट्रिव्हिन नाही टाकले की नाक बंद राहते. श्वासच येत नाही. त्यामुळे झोपताना नाईलाजाने सुटका म्हणून थेंब टाकणे सुरु झाले. आता ऑट्रिव्हिन स्प्रेने नाक धुतल्याशिवाय रात्री झोपण्याची कल्पनाच करवत नाही.

मेडिकल दुकानांमधे हे ओव्हर द काउंटर मिळत असल्याने ही अ‍ॅडिक्टिव्ह पोटेन्शियलची कल्पना आली नव्हती. आता सुटणे कठीण झालेय. नवीन ऑट्रिव्हिनच्या पोस्टरवजा जाहिरातीत एक मिनिटांत नाक मोकळे होण्याची "गॅरंटी" दिली आहे.

हे सुटणे कठीण झाले आहे आता.. चांगलाच फसलो.

सुबोध खरे's picture

27 May 2013 - 12:20 pm | सुबोध खरे
गवि's picture

27 May 2013 - 12:42 pm | गवि

मेलो..

प्रभाकर पेठकर's picture

27 May 2013 - 4:36 pm | प्रभाकर पेठकर

गवि,

ऑट्रिव्हीन बंद करा. 'इकॉर्टीन' (की 'इप्कॉर्टीन') नांवाचे ड्रॉप्स मिळतात ते, डॉक्टरशी सल्लामसलत करून, वापरा.
ऑट्रिव्हिनवर अवलंबितता सुरू होते पण इकॉर्टीन बाबत तसे होत नाही. हे एका इएन्टी सर्जनने मला सुचविले होते. मला त्याचा फायदा झाला.

तसेही, नांक बंद होण़्यावर आयुर्वेदात औषधे आहेत. आयुर्वेदीक औषधोपचार करून पाहा. उपयोग होईल.

माझे ऑट्रीव्हिन असेच सुटले. आता कुठलेही नेसल ड्रॉप्स लागत नाहीत.

इथे इकॉर्टीन मिळत नसल्याने अगदी सर्दी झाल्यास ऑट्रिव्हिन अल्प काळासाठी वापरतो.

खूप खूप धन्यवाद. आता शोधून पाहतो अशा नावाचं औषध, डॉक्टरांना विचारुन.

सुबोध खरे's picture

27 May 2013 - 7:24 pm | सुबोध खरे

'इकॉर्टीन' (की 'इप्कॉर्टीन')बहुधा एफकॉर्लीन असावे. कॉर्टीन' या औषधात सुद्धा (कॉर्टीको) स्टीरोईड असते तेंव्हा डॉक्टरच्या सल्ल्या शिवाय न घेणे. स्टीरोईड चे आपले साईड इफेक्ट्स असतात.

नितिन थत्ते's picture

27 May 2013 - 8:56 pm | नितिन थत्ते

कॉर्टिकोस्टिरॉइड्स सुद्धा हॅबिट फॉर्मिंग असतात असे ऐकले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2013 - 2:08 am | प्रभाकर पेठकर

तेंव्हा डॉक्टरच्या सल्ल्या शिवाय न घेणे.

मग, मी काय सांगितले आहे माझ्या प्रतिसादात?

गविंना व्यवस्थित समजले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

27 May 2013 - 4:52 pm | प्रभाकर पेठकर

ऑट्रिव्हिन (xylometazoline) या औषधाने रक्त दाब वाढतो म्हणून हे औषध सर्व सामान्य माणसाने केंव्हाही घ्यावे असा सल्ला देणे कठीण आहे.

मला रक्तदाब विषयी माहिती नव्हती. पण अनेक वर्षे वापरून मला तरी रक्तदाबाचा त्रास झाला नाही. (म्हणजे इतरांनाही होणार नाही असा माझा दावा नाही.) असो. आता नव्याने ही माहिती कळली आहे. कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त काळाकरीता घेत राहू नये हे तर खरे आहेच.

पण ऑट्रिव्हिन जर एवढे धोकादायक औषध असेल तर, औषधालयात ते डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय, का विकले जाते?

सुबोध खरे's picture

23 May 2013 - 9:35 am | सुबोध खरे

आजची विमाने हि हवेचा दाब नियंत्रित केलेली असतात तरीही जेंव्हा विमान वेगाने वर जाते किंवा खाली येते तेंव्हा आपल्या कानावर पडणारा हवेचा दाब वेगाने कमी जास्त होतो. मुळात कानाच्या पडद्यावर पडणारा दाब दोन्ही बाजूना( बाहेर आणि शरीराच्या आतल्या) समान करण्यासाठी कानाच्या आत एक नळी बसवलेली असते तिला युस्तेशियन( EUSTECHIAN TUBE) नलिका म्हणतात. हि नळी कानाच्या आतल्या भागाला घशाशी जोडते आणी आपण जेंव्हा लाळ गिळतो तेंव्हा ती उघडते आणी कानाच्या दोन्ही बाजूंचा दाब समान करते. यामुळे घास किंवा लाळ गिळल्या वर आपल्याला कधी कधी कानात आवाज आल्यासारखे जाणवते.
विमान वेगाने खाली आले किंवा वर गेले तर कानाच्या पडद्यावरचा दाब अनुक्रमे जास्त आणी कमी होतो त्यामुळे कानाचा पडदा आत किंवा बाहेर ओढला जातो म्हणून कान दुखतो. यासाठीच विमानात गोळ्या किंवा चॉकलेत देण्याची पद्धत आहे ज्यामुळे आपली लाळ गिळताना कानाच्या पडद्यावरचा दाब एक समान होऊन कान दुखत नाही. त्यामुळे जेंव्हा हवाई सुंदरी येते तेंव्हा न लाजता किंवा संकोच न करता बचकभर गोळ्या घेऊन खिशात ठेवाव्या आणी विमान चढता उतरताना खात राहावे दुसरा अतिशय साधा उपाय म्हणजे चुईंग गम चघळणे.
एवढे करून हि जर कान दुखत असेल तर आपल्या कानाला आजार झाला आहे हे समजून डॉक्टरला दाखवणे

सखी's picture

23 May 2013 - 11:03 am | सखी

माहीतीपूर्ण धागा. मला लहानपणी एसटी (अगदी बैलगाडीसुद्धा :)) लागायची नाही. शाळेच्या सहलींना कित्येक मैत्रिणी एसटी लागते या एका कारणाने यायच्या नाहीत - म्ह्णून मी स्वत:ला नशिबवान समजायचे कि असा त्रास होत नाही. आता परिस्थिती एकदम उलटी आहे, कधी कधी कार लागते - मागच्या दोन-तीन वेळेस हमखास विमानात त्रास होऊ लागला (मळमळणे, डोके जड होणे इ.) हे कशाने होत असेल आणि यावर उपाय काय करावा? (कान वगैरे दुखल्याचे नाही आठवत.)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 May 2013 - 10:28 am | निनाद मुक्काम प...

सहमत
लहानपणी आपल्याला कायपण लागायचे नाही.
आता ३० ओलांडली व लागायला लागले.
ह्या शास्त्रीय माहितीचा उपयोग नक्कीच होईन
आम्लपित्त झालेल्या लोकांना बस किंवा बोट हमखास लागते का

नितिन थत्ते's picture

25 May 2013 - 2:11 pm | नितिन थत्ते

आम्लपित्त आणि बस लागणे हे दोन वेगळे विकार आहेत.
एकमेकांचा संबंध नाही. म्हणून आम्लपित्तावरचे उपाय कामी येत नाहीत.

सुबोध खरे's picture

25 May 2013 - 6:37 pm | सुबोध खरे

एकदम सहमत.
फक्त एक फरक कि आम्ल पित्त झालेल्या लोकांच्या पोटात आम्ल अगोदरच तयार असते आणि त्याने त्यांचे जठर अगोदरच नाजूक स्थितीत असते त्यामुळे थोडीशी जरी अस्वस्थता वा व्यत्यय आला तरी लगेच उलटीची भावना होते. बाकी चक्कर येण्याचा आणि आम्ल पित्ताचा संबंध नाही. ( कित्येक आम्ल पित्ताचे लोक त्यातून मुक्तता मिळवण्यास उलटी करत असतात)

आशु जोग's picture

26 May 2013 - 4:03 pm | आशु जोग

चूकून ऑलिम्पिक आणि बस लागणे असे वाचले.

धागा लागला बहुतेक

नितिन थत्ते's picture

23 May 2013 - 3:13 pm | नितिन थत्ते

जांभई दिली की सुटतो प्रॉब्लेम.

आशु जोग's picture

24 May 2013 - 1:18 am | आशु जोग

जांभई म्हटलं की मिसळीवर एखाद्या गोर्‍या माणसाचा जांभई देतानाचा फोटो टाकण्याची पद्धत आहे.

आशु जोग's picture

24 May 2013 - 1:33 am | आशु जोग

मलाही कधीच एस टी बैलगाडी, महिंद्राच्या जीपडीतूनही घाटरस्त्यातून खूप फिरलो पण कधी लागली नाही
पण विमानात मात्र कान किंवा कानशीले दुखु लागतात असा अनुभव आला

यापुढे गोळ्या, चिंगम यांचा वापर करून पाहीन.
उपयुक्त माहिती दिलीत आपण

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2013 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

विमानात मात्र कान दुखणे फार वेगळॅ. ह्याचा बोट / गाडी लागण्याशी काही संबंध नाही.

विमान वर जाताना आणि उतरताना हवेचा दाब कामी / जास्त होतो. कानामध्ये मध्यकर्णाची पोकळी आणि घसा (व पर्यायाने बाहेरील वातावरण) यांना जोडणारी युस्टॅशियन ट्युब नावाची नळी असते आणि तिच्यामुळे कानाच्या पडद्याच्या दोन्हीकडचा हवेचा दाब समान ठेवला जातो. काही कारणाने (खोकला, पडसे, इ. ने) जर सुजेमुळे किंवा अगदी घशातल्या जाड म्युकसने (शेंबडाने) ती नळी बंद झाली असली तर कानाचा पडदा बाहेर / आत खेचला जाउन त्याच्यावर पडलेल्या ताणामुळे कळ लागते.

उपायः

१. प्रथम नाक चिमटीत पकडून आणि तोंड बंद करून नाकातून जोराने श्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्न करावा. बर्‍याचदा येवढ्यानेच युस्टॅशियन ट्युब मोकळी होऊन बरे वाटते. हा अनुभव कधी कधी घाटातून चारचाकीने / रेल्वेने जातानाही होऊ शकतो... कारण तेच. त्यावेळेस बहुतेक येवढेच पुरते.

२. विमानप्रवासात हवेच्या दाबातला फरक फार मोठा असतो. त्यामुळे जर वरच्या प्रयत्नाने फरक पडला नाही (विशेषतः खोकला, पडसे असेल) तर मात्र खूप बळजबरी करू नये ! कानाच्या पडद्याला दुखापत होउ शकते. खोकला, पडसे असले तर खबरदारी म्हणून "Otrivin ((xylometazoline nasal drops)" नावाचे नाकात टाकायचे थेंब मिळतात ते जवळ ठेवावे व प्रतिबंधक उपाय म्हणून (विमान उडण्याच्या अगोदर पाच मिनिटे आणि उतरण्यासाठी "कुर्सीकी पेटी" बांधायची घोषणा झाली की लगेच) दोन दोन थेंब प्रत्यक नाकपुडीत टाकावे. त्रास होणार नाही.

*** खास सूचना*** लहान मुलांसाठी वेगळे (पेडियाट्रीक) थेंब असतात. तेच वापरावे. नाईलाजास्तव चार पेडियाट्रीक थेब मोठ्या माणसाला चालतील पण मोठ्या माणसांचे थेंब लहान मुलांना अजिबात वापरू नयेत. मात्र दोघांकरता वेगळी औषधे खरेदी करणे हेच सर्वोत्तम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2013 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरेच्च्या वर डॉ साहेबांनी युस्टॅशियन ट्युबबद्दल अगोदरच लिहिलेले दिसते... तेव्हा पुनरावृत्तिबद्दल दिलगिर आहे.

पण Otrivin (xylometazoline nasal drops) चा मुद्दा नविन आणि खूप उपयोगीआहे.

मोदक's picture

26 May 2013 - 7:33 pm | मोदक

एक शंका.

युस्टॅशियन ट्युबच्या कार्यामध्ये कानातला मळ (इअर वॅक्स) कॉप्लीकेशन्स वाढवतो की याचा काहीच संबंध नाही..?
कानात मळ जास्ती असेल तर घाटामध्ये / विमानात कानाला दडे बसण्याचा त्रास होतो असे ऐकले आहे.
तसेच कानातला मळ नैसर्गीकरीत्या कानातूनच पडून जातो की तो नियमीतपणे सॉलीवॅक्स सारखे औषध कानात घालून बाहेर पडू द्यावा / ENT तज्ञाला भेटावे..?

जाता जाता - Ear wax melts many a 'fauji' dream

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2013 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे

कानातला मळ हा बहिर्कर्णात (ear canal) असतो. बहिर्कर्ण आणि मध्यकर्ण हे कानाच्या पडद्याने (ear drum) विभागलेले असतात. युस्टॅशियन ट्युब मध्यकर्णाला घशाबरोबर जोडते. खालच्या चित्रात ही रचना दिसते आहे...


(चित्र आंतरजालाच्या सौजन्याने)

त्यामुळे युस्टॅशियन ट्युबच्या कार्यामध्ये कानातल्या मळाचा प्रत्यक्ष संबध नाही.

कानातला मळ (वॅक्स) हा बहिर्कणाच्या त्वचेने निर्माण केलेले तेल साठल्याने बनतो. त्यासाठी अंघोळीच्या वेळेस कान नियमित पाणी आणि साबणाने साफ केले तरी नॉर्मल कानासाठी पुरेसे असते. न दुखणार्‍यात कानात जर घट्ट मळ असेल तर कधीकाळी एखाद्या वेळेला मळ मउ करणारे सॉलीवॅक्स सारखे औषध वापरले तर ठीक आहे... ते एकदा वापरल्यावर कानाची नियमीत काळजी घेऊन ते परत वापरण्याची गरज पडणार नाही अशी खबरदारी घेणे जास्त चांगले.

खूप दिवस कान साफ न केल्याने कानातला मळ खूप घट्ट झाला असल्यास अथवा कानातून स्त्राव होत असला अथवा कान दुखत असल्यास इन्फेक्शन असण्याची शक्यता असू शकते आणि कानाचा पडदा फाटलेला असण्याची शक्यता असते. तेव्हा मात्र इतर काही न करता सरळ कान-नाक-घसा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा..

जाता जाता:

Ear wax melts many a 'fauji' dream

केवळ कानातल्या मळामुळे कोणाला वैद्यकीय तपासणीत बाद करत नाहीत... बर्‍याचदा अशा वेळेस फाटलेला कानाचा पडदा अथवा इतर काही महत्वाचे कारण असते.

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2013 - 10:31 pm | प्रभाकर पेठकर

सुबोध खरे ह्यांच्या प्रतिसादा आधी ह्या प्रतिसादात दोन्ही मुद्दे, युस्टेशियन ट्यूब आणि ऑट्रीव्हीन येऊन गेले आहेत.

सुबोध खरे ह्यांची माहिती जास्त शास्त्रीय आहे, तेंव्हा विश्वसनिय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2013 - 1:18 am | डॉ सुहास म्हात्रे

नमस्कार साहेब!

जर १९८० साली एम डी (मेडिसिन) झालेल्या आणि काही वर्षे एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांना शिकवले असणार्‍या वैद्यकीय व्यावसाईकाचा वैद्यकीय सल्ला तुम्हाला शास्त्रीय आणि विश्वसनिय वाटत असला, तर माझा सल्ला योग्य मानायला हरकत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

27 May 2013 - 1:51 am | प्रभाकर पेठकर

सुबोध खरे ह्यांची माहिती जास्त शास्त्रीय आहे, तेंव्हा विश्वसनिय.

ह्यात तुमचा सल्ला आणि सुबोध खरे ह्यांचा सल्ला अशी तुलना नसून. माझी माहिती आणि सुबोध खरे ह्यांची माहिती अशी तुलना आहे. त्या मध्ये सुबोध खरे ह्यांची माहिती शास्त्रीय अभ्यासातून आलेली असल्याने माझ्या माहिती पेक्षा जास्त विश्वसनिय असे मी म्हंटले आहे.

तुमची माहिती अविश्वसनिय आहे असे मी म्हंटलेले नाही. गैरसमज नसावा.

बाळ सप्रे's picture

27 May 2013 - 11:39 am | बाळ सप्रे

प्रथम नाक चिमटीत पकडून आणि तोंड बंद करून नाकातून जोराने श्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्न करावा

असे कधीही करु नये.. सर्दि झाल्यावर नाक मोकळे करण्यासाठी असे करण्याच्या नादात अस्मादिकांच्या कानाच्या पडद्याला भोक पडले होते.. 'tympanoplasty' करावी लागली होती.
अति जोरात नाक शिंकरणे कानाच्या पडद्याला फार घातक आहे..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2013 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

मला वाटते तुम्ही माझा प्रतिसाद पूर्णपणे वाचला नाही...

जर वरच्या प्रयत्नाने फरक पडला नाही (विशेषतः खोकला, पडसे असेल) तर मात्र खूप बळजबरी करू नये ! कानाच्या पडद्याला दुखापत होउ शकते.

अतिरेक सगळीकडेच मारक ठरतो... अगदी चांगल्या गोष्टींचा सुद्धा. अतिरेकाने नुकसान झाले म्हणुन दुसरे टोक पकडणेही विरुद्ध दिशेने केलेला अतिरेक होय !

आनंद घारे's picture

25 May 2013 - 10:00 am | आनंद घारे

अत्यंत चांगली आणि व्यवस्थित मांडणी करून दिलेली माहिती या लेखात वाचायला मिळाली.
माझा अनुभव असा आहे की कानावर प्रेशर आल्यासारखा भास व्हायचा आणि आवंढा गिळला की तो नाहीसा होत असे. हा उपाय मला अचानकच सापडला होता. त्याचे शास्त्रीय कारण कळले.

चौकटराजा's picture

26 May 2013 - 8:03 pm | चौकटराजा

हा ब्लॉग जरूर वाचावा. मी मिसळपाव चा सदस्य होण्याअगोदर वाचला आहे !!

रेवती's picture

23 May 2013 - 12:32 am | रेवती

माहितीपूर्ण धागा.

नितिन थत्ते's picture

23 May 2013 - 7:57 am | नितिन थत्ते

याचसाठी आपल्या पूर्वजांनी समुद्रप्रवासास बंदी घातली होती. ;)

सुबोध खरे's picture

23 May 2013 - 9:38 am | सुबोध खरे

साहेब
हा त्रास खाडीत/नदीत सुद्धा होतो. शिवाय मच्छी मार लोक समुद्रावर जातच होते. त्यांना सुद्धा सुरुवातीला हा आजार होतोच.
समुद्रप्रवासास बंदीची करणे वेगळी आहेत

ब़जरबट्टू's picture

23 May 2013 - 11:19 am | ब़जरबट्टू

एसटीवाल्यानासुद्धा आता चाकलेट वाटायला सान्गा राव...

विसोबा खेचर's picture

23 May 2013 - 11:34 am | विसोबा खेचर

अहो आलेपाकाची वडी खायची.. त्रास होत नाय:)

आमच्या मुंबई-देवगड लाल डब्याच्या रातराणीमध्ये विकायला येतो आलेपाक.. एमदम मस्त! :)

मस्त माहिती योग्य वेळेस मिळाली.धन्यवाद्.
ह्या वीकेंडला फेरी ने प्रवास करणार आहे त्या वेळी उपोयोग होइल.

एक्सलंट माहिती. अतिशय उपयुक्त.

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2013 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार

मला हवाई जहाज, पाण्यातले जहाज, वाळवंटातले जहाज अशा सगळ्या प्रवासाचा अनुभव आहे. पण असा त्रास कधीच झाला नाही, इव्हन व्हेन आय व्हॉज इन मीग-२१ तेव्हा देखील त्रास नाही आय टोल्ड यू. हान पण रशियाला पाणबुडीतून जातान एकदा पोटात ढवळल्यासारखे झाले होते. तेव्हा मग बेंबीत बोट दाबून शिर्षासन केले आणि शनीमहात्म्याचे १४ - १९ आणी ४३ वे चरण म्हणले. त्रास ताबडतोब थांबला.

नितिन थत्ते's picture

25 May 2013 - 7:53 pm | नितिन थत्ते

>>तेव्हा मग बेंबीत बोट दाबून शिर्षासन केले

एकदा आपल्याशी या विषयावर चर्चा करायचीये.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2013 - 11:28 pm | प्रसाद गोडबोले

तेव्हा मग बेंबीत बोट दाबून शिर्षासन केले

कुणाच्या ? =))

अमोल खरे's picture

26 May 2013 - 9:01 pm | अमोल खरे

त्यावेळी मी पण पराबरोबर होतो. मीग २१ तर मीच चालवत होतो. पण नेमका पाणबुडी चालवायचा कंटाळा आला म्हणुन दोन मिनिटे दुस-याला चालवायला दिली. तेवढ्यात समोरुन एक पाणबुडी सिग्नल तोडुन आणि वर हॉर्न न देता बाजुने कट मारुन गेली त्यामुळे आमचा ड्रायव्हर बावचळला आणि पाणबुडी थोडी हलली ज्यामुळे पराला त्रास झाला. त्या पाणबुडीचा नंबर पण नोट करता आला नाही मला.

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2013 - 11:19 pm | परिकथेतील राजकुमार

त्या आठवणी काढूस, त्रास होतो मनाला.

मी काय म्हणतो, ह्या अनुभवावरती आधारीत तू एखादी लेखमाला का लिहित नाहीस ? आपले आयुष्य म्हणजे Life of PI वैग्रे असल्यासारखे 'माझे पाणबुडीवरील आयुष्य भाग ०.० ते १०००.१०००' किंवा 'एका मीगची गोष्ट भाग ०.० ते ७८.९८' असे लिखाण का करत नाहीस ? गेला बाजार 'मीगचे फंडे भाग १ ते ४९.९५०' असे देखील मनोरंजक लेखन तू करू शकशील.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2013 - 5:26 pm | प्रसाद गोडबोले

मला ३डी कॉम्पुटर गेम खेळताना , त्यातही फर्स्ट पर्सन शूटिंग गेम खेळताना मळमळते ...डॉस बेस्ड वुल्फ नावाची एक गेम यायची ठवते का ? ते पाहुन ओकलो होतो ... कॉम्पुटर थोडक्यात बचावला .

ह्यावर काही उपाय ?

ह्या प्रॉब्लेममुळे गेमिंग्च्या अप्रतिम विश्वाला मुकतो आहे :(

नितिन थत्ते's picture

26 May 2013 - 7:11 pm | नितिन थत्ते

डोम थिएटरमध्ये सिनेमा पाहताना असा अनुभव येतो. त्यावेळी थोडावेळ डोळे मिटून घेतले असता बरे वाटते.

आशु जोग's picture

26 May 2013 - 11:55 pm | आशु जोग

ते पाहुन ओकलो होतो ... कॉम्पुटर थोडक्यात बचावला .

ह्यावर काही उपाय ?

कंप्युटरला प्लॅस्टिकचे कव्हर घालावे. पुण्याच्या अप्पा बळवंतात ते कंप्युटरचा रेनकोट या नावाने विकले जाते

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2013 - 11:57 pm | परिकथेतील राजकुमार

हे असे अनुभवी सल्ले वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2013 - 12:34 am | प्रसाद गोडबोले

कॉम्पुटर चा रेनकोट

=))

आज संध्याकाळ फुल्ल राडा चाल्ल्लाय ,
कॉम्पुटर्चा रेनकोत काय ... बोट लागणे काय ... मिग विमान लागणे ..पाणबुडी लागणे काय ...शी लागणे काय ...

=)) =)) =))

आशु जोग's picture

23 Jun 2013 - 11:20 pm | आशु जोग

इथे गमतीने रेनकोट वगैरे कमेंट टाकली आणि ध्यानात आले. 'रेनकोट' पहायचा राहीला आहे. मुद्दाम डाऊनलोड करून पहीला
आणि ऋतूपर्णची बातमी आली.

प्रेरणा पित्रे's picture

26 May 2013 - 9:59 pm | प्रेरणा पित्रे

मला पण प्रवासात असा त्रास होतो.. मला याचे कारण पित्त वाटत होते.. आत्ता खरे कारण कळाले..

इरसाल's picture

27 May 2013 - 12:06 pm | इरसाल

अशा प्रकारे डॉ. खरेंच्या चांगल्या धाग्याचे पानिपत करण्यात आले आहे.

बॅटमॅन's picture

27 May 2013 - 12:10 pm | बॅटमॅन

+१.

nishant's picture

27 May 2013 - 6:34 pm | nishant

उपयुक्त माहिती. धन्यवाद!

आशु जोग's picture

23 Jun 2013 - 11:22 pm | आशु जोग

उंच डोंगरावरून खाली खोल दरीत पहिल्यावर चक्करल्यासारखे होते. पण तेवढेच अंतर समोर पाहील्यावर चक्करल्यासारखे का होत नाही.

नितिन थत्ते's picture

26 Jun 2013 - 8:22 am | नितिन थत्ते

सेन्स ऑफ स्टेबिलिटी.

त्याच डोंगरावरून त्याच दरीत पाहताना चार पायांवर उभे राहून पहा (म्हणजे हात सुद्धा जमीनीला टेकवून पहा). चक्करल्यासारखे वाटणार नाही.