कविवर्य बा.भ.बोरकर यांची माफी मागून,
माझ्या पूण्याच्या भूमीत, गड्या प्रदूषणाचे ढग |
कड्या कपारी मधोनी, धूर निघे भकाभक ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, उन्हाळ्यात घामाच्या धारा |
पावसाळ्यात दारापूढे, बनती रस्त्यांच्या नद्या ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, काळी माती काळे पाणी |
एके काळी या मातीत, सुवर्ण नांगर फिरवला जाइ ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, इतिहासाची पाळेमूळे |
आणि अडकतात वादात, आमच्या इथले पुतळे ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, परप्रांतीयांची रे रास |
'भाऊ', 'दादा' शब्द गेले, बनले भैया सगळेच ||
माझ्या पूण्याची भूमीही, असे विद्येचे माहेरघर |
विद्वत्तांची परंपरा, आहे इथुनच थोर ||
माझ्या पूण्याच्या भूमीत गणेशपूजा दिन-रात |
भोळ्या भाबड्या भक्तांचे येथे होइ चित्त शांत ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, अशी सरमिसळ आढळे |
अन् प्रत्येकाच्या मनी असे, पुणे तिथे काय उणे ||
प्रतिक्रिया
20 May 2013 - 4:34 pm | चौकटराजा
माझ्या पुण्याच्या भूमीत मोटर धुण्या पाणी असे
दांडेकर पुलाशी नळावर, बाई दुसरीशी भांडत बसे ...
हे कसे वाटते ... ?
20 May 2013 - 4:37 pm | यशोधन वाळिंबे
नाव पाहून विडंबन असणार हे हेरले होते.. पण अभिमानपर असेल असा तर्क लावला.. असो जे लिहिलंय ते सत्य आहे हे दुर्दैवाने खरे..!!
20 May 2013 - 5:39 pm | पैसा
पुणे तेथे काय उणे!
20 May 2013 - 7:18 pm | आदूबाळ
कुठे गेले? आहेत की! एकच वादा, अजितदादा
20 May 2013 - 7:24 pm | संजय क्षीरसागर
माझ्या पुण्याच्या भूमीचा गड्या माहौल अलग
एक-एका नज़ार्याला, कशी हृदयी धक-धक
माझ्या पुण्याच्या भूमीत, होई वसंत उन्हाचा
वर्षा बरसे अशी की, गर्भारती ओढे नद्या
माझ्या पुण्याच्या भूमीत, शब्द-शब्द होती गाणी
रंगे सवाई सोहळा, स्वर होती रत्नमणी
माझ्या पुण्याच्या भूमीत, संस्कृतीची पाने-फुले
बहरला इथे त्याला, जग भासते सानुले
माझ्या पुण्याच्या भूमीत, सगळ्यांचा मुक्त श्वास
भल्याभल्यांची ही चाले, इथे जपून मिजास
माझ्या पुण्याची भूमीही, असे विद्येचे माहेर
संत इथे समाधिस्त, स्वर्ग धरेशी उतार
माझ्या पुण्याची भूमीत, शांत गणेश तळ्यात
हरवर्षी उत्सवाला, नाचे भक्तांच्या तालात
माझ्या पुण्याची भूमीत, भाग्य निवांत बैसले
जो रमला पुण्यात, त्याला कशाचे ना उणे
20 May 2013 - 7:28 pm | प्यारे१
सर ,
खूप छान कविता.
(दुर्दैवानं व्हॅलिडीटी १९९५-२००० पर्यंतचीच.)
20 May 2013 - 7:39 pm | संजय क्षीरसागर
आणि पुढे तसंच चालू ठेवायला पुणेकर जागरुक आहेत
20 May 2013 - 7:46 pm | प्यारे१
परफेक्शन को इम्प्रूव्ह करना नामुमकीन है
- 'दिल चाहता है' आआआअकाआआश
21 May 2013 - 3:55 pm | चौकटराजा
संजय राव, यकंदरीत सुमिता हत्तीण, बाबु टांगेवाला, सगुणा, प्रबाजोग, फुटका बुरूज., आपटे घाट, तळ्यातला गणपती, बेलबाग चौकात अडलेली गणापतीची मिरवणूक, मानाचे गणपती, निरनिराळे मारूती नि विठोबा.......सगळ्याचा जबरदस्त अभिमान आहे हं !!!
20 May 2013 - 8:26 pm | सौंदाळा
सुंदर.
तुम्ही कविता लिहा अजुन. मस्त कविता करता एकदम.
21 May 2013 - 12:10 am | कोमल
धन्यवाद संक्षी तुम्ही कविता वाचून त्यावर परिक्षण केल्याबद्दल.
तुमची कविता पण वाखणण्याजोगी आहे.
हो मी पुण्याची नाहीये पुणे जगायला. तुम्ही वर्णन केलेल्या १० किंवा जास्त वर्षांपूर्वीचं पूणे मी नाही पाहिलेलं, पण म्हणून याचा अर्थ असा नाही होत की पूणे आजही तसंचं असेल.
गेल्या पाच वर्षातील मी अनुभवलेली पूण्याची स्थिती वर्णन करण्याचा हा प्रयत्न होता.
मी वास्तविकतेतील पूणे उभारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही अस्सल पुणेकराच्या मनात लपून राहीलेलं पूणे कागदावर(? किंवा मिपावर म्हणा हवं तरं) उतरवलतं.
आज पूण्याच्या वातावरणाच्या दयनिय अवस्थेवर भाष्य करणारा वेगळा धागा निघु शकेल. असो
आणि हो गैरसमज झाला असेल तर स्पष्टंच सांगते, मलाही पूणे प्रचंड आवडतं.
21 May 2013 - 10:29 am | संजय क्षीरसागर
पुणं तुम्ही वरवर पाहिलंय. इतकं निवांत तरीही विकासाच्या सर्व संधी उपलब्ध असलेलं दुसरं शहर नाही.
धावपळीच्या मेट्रोसिटीत तुम्हाला त्या वेगाशी एकरूप झाल्याशिवाय जगता येत नाही तसं पुण्याच्या `मध्यलयीशी' समरस झाल्याशिवाय तुम्हाला पुणं कळणार नाही. पुण्याच्या जगण्याची मध्यलय साधणं कौशल्य आहे.
इथली अंतरं इतकी आवाक्यातली आहेत की तुमची इच्छा आणि तृप्ती यात कधीही फारसं अंतर पडत नाही. अर्थात तसं जगायला तुमच्याकडे पुरेशी संपन्नता, रसिकता आणि मुख्य म्हणजे फुरसत हवी.
21 May 2013 - 12:53 pm | कोमल
अरे बापरे
फारच धाडसी विधान आहे.
आज जसं आहे तसं पुणे आधी नव्हतं. आणि यापुढे पण पुणे बदलेल. हं जर तुम्ही पेठेतील पुण्याबाबत फक्त सिमीत राहात असाल तर हे घडू शकेल. पण विस्तारलेल्या पुण्याचा विचार केल्यास शेंबडं पोरं पण सांगेल पुणे किती बदललं आहे ते
सांस्कृतीक पुण्याबदद्ल बोलायचं झाल्यास ते अतिशय उत्तम आहे आणि यापुढेही असेल. पण सांस्कृतीक पुणे म्हणजे संपूर्ण पुणे नव्हे.
अवांतरः आमच्या कडे असलेल्या संपन्नतेची, रसिकतेची आम्ही झैरात करत फिरत नाही.
चुभुदेघे
21 May 2013 - 1:33 pm | आदूबाळ
चुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र......................धडाम!
21 May 2013 - 6:37 pm | संजय क्षीरसागर
ज्या पुण्याचं तुम्ही वर्णन केलंय त्यात तुम्ही राहता आणि माझ्या वर्णनाच्या पुण्यात मी राहतो, इतकाच फरक आहे.
20 May 2013 - 7:33 pm | जेनी...
अगदि समते एकेक शब्दाशी ... भारी लिवलय कोमाबाय :D
21 May 2013 - 5:28 pm | कोमल
ठ्यांक्स् "पू" तै
काय गंमत आहे बघना
पूना-पूजा
एका इटुकल्या कर्व्ह चं डीश्टनश आहे फक्त तुझ्या माझ्यात /(किंवा पुण्यात) ;)
20 May 2013 - 10:27 pm | रमेश आठवले
बा.भ. बोरकरांच्या मूळ कवितेचा धागा कोणी मिपाकर येथे देऊ शकतील का ?
20 May 2013 - 10:40 pm | आदूबाळ
माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे !!
माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास!!
माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी!!
माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा!!
माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा!!
माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले
भोळा भाबडा शालिन
भाव शब्दाविण बोले!!
माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात!!
माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी
आथित्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी!!
- बा. भ. बोरकर
21 May 2013 - 11:18 am | रमेश आठवले
सद्ध्याच्या कडक उन्हाळ्यात हि कविता वाचल्यावर काही काळ तरी गारवा वाटत रहातो.
21 May 2013 - 7:23 am | वेल्लाभट
बाकी सगळं छान, पण पुण्यातला `पु' पहिला आहे ! हिंदीत `पूना' असा दीर्घोच्चार होतो त्याचा, मराठीत नव्हे. :)
21 May 2013 - 12:23 pm | आदूबाळ
दीर्घ "पू" बहुदा वृत्ताचा तोल सांभाळण्यासाठी केलं असावं. मूळ कवितेत "गोव्याच्या" हा दीर्घोच्चार आहे.
21 May 2013 - 11:30 am | Bhagwanta Wayal
छान कविता...!
माझ्या पुण्याच्या भूमीत
आवतरले शिवराजे।
नाश यवनांचा करुन
स्थापियले स्वरज्य॥
21 May 2013 - 12:16 pm | मी_आहे_ना
पुण्याला पूणे केलं ते बघून हिंमत झाली नाही उघडून बघायची, प्रतिक्रिया वाढतायेत हे बघून उघडली. (एकदा वाटलं पाप-पुण्य असं पण काही असू शकेल)... असो, एक हुकूमाचे पान वाया ;)
21 May 2013 - 2:49 pm | गवि
शहरांवर बेतलेली गाणी या निमित्ताने आठवली.
अहा तुमी शुंदोरी कॉतो.. कोलकाता..
असं एक गाणं पूर्वी ऐकलं होतं. त्यात कोलकात्यातलं प्रदूषण, लोडशेडिंग आणि असंख्य समस्यांविषयी मजेदार शब्द होते, आणि प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ, तोबु (की तोबी.. चुभूदेघे)तुमी शुंदोरी कॉतो.. कोलकाता.. अशी होती. म्हणजे हे सर्व वाईट आहे तरी तू खूप सुंदर वाटतोस असं आपल्या शहराला उद्देशून म्हणणारं हे गीत खरोखर खूप मस्त आहे.
बॉम्बे मेरी जानमधेही वाईटसाईट सगळ्याचा (सट्टा, पत्ता, डाका वगैरे) उल्लेख आहे आणि तरीही शेवटी "ये है बॉम्बे मेरी जान.." असंच म्हटलेलं आहे.
याच बाबतीत "यहां आसू और गीत.. और जवानी थी मैने तेरे नाम की, आवारा थी रात, और सडकें थी सब मेरे बाप की.. और मैं था.. तू थी और थी दिल्ली बस्स.." असं म्हणत थोडं पर्सनलाईज्ड पण तरीही दिल्लीला स्वतःच्या भावविश्वात मध्यभागी ठेवून केलेलं गाणं हेही आवडलं होतं.
21 May 2013 - 5:21 pm | कोमल
तुमचा प्रतिसाद आला, कवितेचे सार्थक झाले.
__/\__
तुम्ही म्हणालेलात ते गाणं उशा उथ्थपूने एक्दा गायले आहे.
अहा तुमी शुंदोरी कॉतो.. कोलकाता..
21 May 2013 - 9:42 pm | मराठे
+१
"रेहेनेको घर नही है | सारा जहां हमारा |"