अक्षर

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
11 Jan 2013 - 12:16 pm

मुक्कामाचं ठि़काण ठाऊक नसतानाही चालत होते.
आजूबाजूला सगळी अनोळखी गर्दी असतानाही चालत होते.
सावलीचा स्पर्श तर कोण जाणे अखेरचा कधी झाला होता!
पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती. इतकंच.

आणि अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसली. ती लिहिणारा हात कोणाचा आहे, हे उरलीसुरली ताकद एकवटून पाहायचा यत्न केला. पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं. वाळूवरच्या अक्षरांची का होईना सोबत तर लाभली. तळावलेले डोळे कितीतरी काळाने किंचित शांत झाले. नजरेला काहीतरी वेगळं दिसलं.

त्या लिहित्या हाताला आपसूकच उत्तर दिलं गेलं. तसंच. वाळूत अक्षरं रेखाटत.
आह..! किती काळाने आतलं काहीतरी 'व्यक्त' झालं होतं. कितिक काळ ओलावा न मिळाल्याने कोरडीठक्क पडलेली का होईना, पण तरीही तगलेली अक्षरं होती ती. आपल्या आत अजून संवादाची आस आहे, याची ग्वाही होती ती.

सुरुवातीला विरळ असणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला.
अक्षरं उमटत राहिली. समोरून, माझ्याकडून. एकमेकांना शिंपत राहिली.
पालवी कशी कोण जाणे फुटत गेली. वाट नकळत जीव धरू लागली.
तू. मी. मी. तू. संवादाचा पूल उलगडत गेला.
आता अक्षरं पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्‍याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मनातच.

तुझ्या सोबतीने नुसत्याच असण्याचं जगणं झालं.
इतकं इतकं बोललेय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. असं.

"तुझसे कभीभी करू युंही बाते
मुकेपण तुझ्याशीच संपून जाते
मरासिम बुना यूं पता ना चला कब
सभोवार आता ऋतू कोवळे बघ.."

पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.
काही काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांमधल्या निमक्षणांतच का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षर हेच एकमेव साधन आहे, हे जाणून फार तगमग होते.
नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ.
ज्याच्याशी स्वतः असल्याप्रमाणे व्यक्त व्हावं, त्याला स्वतःइतकं जवळ घेता येत नाही. आनंद देणार्‍या इतर कोणत्याच गोष्टी त्याच्यासोबत करता येत नाहीत.

तसं स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघता तरी येईल. पण तुला बघताही येत नाही?
नाहीच!

तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?

ओह! खरंच.
आरशात दिसते त्या पलीकडच्या 'मी' चा शोध मला अजूनही लागलेला नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग? याच विचारात मग्न असताना कुणीतरी मेहदी हसनची 'अब के हम बिछडे' गझल लावली. अचानक उत्तर मिळूनही गेलं. 'जैसे दो साये तमन्ना के सराबों में मिले'. एकरूप असणे, समरस होणे तसेही अनुभवतेच आहे की प्रत्येक क्षणी. मृण्मयाशी नातेच नसलेली अशी चिन्मयाची सोबत मिळणे हे माझे अहोभाग्यच!

तेव्हा तुझंमाझं नातं.
निरंतर टिकणारं.
निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं... अ-क्षर.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

11 Jan 2013 - 12:28 pm | किसन शिंदे

जबराट!!

निव्वळ अप्रतिम लिहलंय.

मृण्मयाशी नातेच नसलेली अशी चिन्मयाची सोबत मिळणे हे माझे अहोभाग्यच!

एकदम अचुक शब्दात लिहण्याची हि कला तुझ्याकडून शिकावी अशी खास!

स्पंदना's picture

11 Jan 2013 - 4:59 pm | स्पंदना

अचुक प्रतिसाद.

अक्षया's picture

11 Jan 2013 - 12:31 pm | अक्षया

मुक्तक खुपच आवडले.

मूकवाचक's picture

11 Jan 2013 - 1:41 pm | मूकवाचक

अप्रतिम मुक्तक.

प्रचेतस's picture

11 Jan 2013 - 2:26 pm | प्रचेतस

मुक्तक अतिशय आवडले.

रणजित चितळे's picture

11 Jan 2013 - 2:07 pm | रणजित चितळे

सुरवाती पासून सुरेख लिहिले गेलेले मुक्तक, शेवटी जेव्हा त्याला क्षर - अक्षराचा मुलामा लागतो तेव्हा सोन्याहूनही पिवळा.

वरवर पाहिले तर मस्त मनातल्या झोक्यावर चाललेले मुक्त विचार आठवणींचे. खोलवर अर्थ समजून घेतला तर थेट गीतांमृत!

अनिल तापकीर's picture

11 Jan 2013 - 2:33 pm | अनिल तापकीर

अप्रतिम

रुमानी's picture

11 Jan 2013 - 3:28 pm | रुमानी

मस्त ....!
आवडले.

पियुशा's picture

11 Jan 2013 - 3:32 pm | पियुशा

सुरेख !

अभ्या..'s picture

11 Jan 2013 - 4:51 pm | अभ्या..

इन्नातै
काय लिहिलात हो तुम्ही. केवळ अप्रतिम.
दोन क्षणांमधल्या निमक्षणांतच का होईना पण तुझ्याशी जोडलं जाणारं अक्षर नातं. वाव.
धन्यवाद इन्नातै, इतक्या सुंदर प्रकटनासाठी.

पैसा's picture

11 Jan 2013 - 5:02 pm | पैसा

आवडले!

मन१'s picture

11 Jan 2013 - 6:20 pm | मन१

पुरेसे स्पष्ट झाले नाही. तरी काहीतरी जाणवले, आवडले.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Jan 2013 - 6:43 pm | प्रकाश घाटपांडे

काही कळले नाही. असो. आपली ती कुवत नाही हे मान्य!

इनिगोय's picture

11 Jan 2013 - 7:08 pm | इनिगोय

प्रकाशजी, एकमेकांना कधी न भेटणार्‍या पण एकमेकांचे निव्वळ 'व्हर्च्युअल स्नेही' असणार्‍यांचं मनोगत आहे हे.. आता बघा संदर्भ जुळतोय का.

प्रामाणिपणे कबूल करतो सुरवातीला माझाही घाटपांडे काका झाला होता. :p
तरी शेवट येता येता काही गवसलं.
तुझ्या वरील प्रतिसादाने ते अगदीच चुकलं नाही हे स्पष्ट झालं. :)

इनिगोय's picture

13 Jan 2013 - 5:16 pm | इनिगोय

:)

लीलाधर's picture

11 Jan 2013 - 8:18 pm | लीलाधर

इनितै मुक्तक आवडले गेले आहे.

दादा पेंगट's picture

11 Jan 2013 - 8:46 pm | दादा पेंगट

अप्रतिम लिहलंय.. निव्वळ अप्रतिम
वर्चुअल ओळखीतून झालेली एक मैत्री आठवली. अजूनही प्रत्यक्ष भेट झालेली नाही, पण मैत्री अगदी जीवाभावाची.

सस्नेह's picture

11 Jan 2013 - 9:34 pm | सस्नेह

शब्द अन अर्थ यांची सुरेख जुगलबंदी.!

कवितानागेश's picture

11 Jan 2013 - 11:02 pm | कवितानागेश

केवळ अप्रतिम...
पुढचा भाग कधी? :)

१००मित्र's picture

11 Jan 2013 - 11:17 pm | १००मित्र

पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती

काय म्हणू ह्या शब्दांना ?

गुलाम अली ची "आवारगी" आठवली ...
"कल शब मुझे बे-शक्ल की आवाज नें चौका दिया"
किंवा
"सेहरा की भीगी रेत पर ...मैने लिखा आवारगी"

अजून एक गजल आहे गुलाम अली-आशाबाईंची ...
"गये दिनों का सुराग लेकर,
किधर से आया, किधर गया वो"

अशा असंख्य आठवणींनी नोस्टालजिक केल्याबद्दल,
शतशः धन्यवाद !

इनिगोय's picture

12 Jan 2013 - 12:14 am | इनिगोय

वाह.. सुरेखच गज़ला आठवून दिल्यात.
आभार.

आनन्दिता's picture

11 Jan 2013 - 11:46 pm | आनन्दिता

___/\___

तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षर हेच एकमेव साधन आहे, हे जाणून फार तगमग होते.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2013 - 4:40 am | अत्रुप्त आत्मा

अ क्षरं मुक्तक :-)

५० फक्त's picture

12 Jan 2013 - 8:51 am | ५० फक्त

थोडं कळालं थोडं नाही, पण म्हणुनच या जगण्यात मजा असावी असं वाटतंय. धन्यवाद.

फुल डोक्यावरून गेलं

असो ,

मी-सौरभ's picture

14 Jan 2013 - 4:23 pm | मी-सौरभ

हेही दिवस जातील

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2013 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

बोंबला !!

'फुलपाखरी' काहीतरी वाटले.

स्पंदना's picture

12 Jan 2013 - 2:57 pm | स्पंदना

फुलपाखरी नाही, फुल्ल पांखरी. कस ते सांगते हं थांब. काय झालय हल्ली तूला घरचं जेवण नाही ना त्यामुळे हे अस जरासही अवजड तूला पचेना बघ.
लेख हा मनाला लागलेल्या पंखांबद्दल आहे. आता हे पंख कसले? तर स्वतःला निर्भिडपणे व्यक्त करण्याचे. तू तूझ्या आईशी बोलतोस. कस बोलतो? ते नात राखुन, त्या आईपणाचा मान राखून. उगा उचलली जीभ लावली टाळ्याला नाही करत तू. माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की नातं जपण्यासाठी आपण हातचं राखुन बोलतो. पण इथे मिपावर तू तूला टवाळक्या कराव्याश्या वाटल्या तरी बिन्धास्त करू शकतो. अन त्यातही तूला एक सुप्तसा आधार असतो तूझ्या समान विचारांचे काहीजण ते खपवुन घेतील.
वरिल लिखाण हे ही असच आहे, जे आप्तस्वकियांत मोकळेपणान बोलता आल नाही ते विचार घेउन; काहीस गर्दीतही एकटेपण असणारं कुणीस, असच अचानक जालावर समविचारी व्यक्तीला भेटतं. अन मग विचारांच्या देवाणघेवाणीत जाणवत, अरे मी एकटाच नाही, माझ्यासारखा विचार करणारं आणि कुणीतरी आहे. या नात्याला कोणतंही नांव नसतं, ना ही कसल बंधन्(मी चांगल्या अर्थी म्हणतेय) पण आपण जे काही व्यक्त होतो त्यातला अर्थ उलगडतो आहे कुणाला तरी. हे समविचारांच नात कोणत्याही चेहर्‍याशिवाय, कोणत्याही ओळखीशिवाय जुडत जातं. आठव तूझाच एक लेख, कुणी पकिस्तानी हॅकर.... त्याच्या मरणाच वृत्त तूला कळवाव अशी त्याची इच्छा. अन ती इच्छा सार्थ ठरवत गोष्टीतल्या तूला होणारं दु:ख. अगदी तेच, तेच मांडलय इनिगोय यांनी मुक्तक रूपात.
आज मी तूला पाहिलय का? पन "पर्‍या? लय खोडील" असा एक स्नेहल उद्गार मी काढते तो याच नात्याच्या बळावर.
बघ तू काही फार कट्टर मतांचा नाही आहेस नशिबाने त्यामुळे तूला समजेल. अजुन मनाची दार उघडी आहेत तूझ्या. घुसेल काही आत अशी अपेक्षा.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2013 - 6:49 pm | परिकथेतील राजकुमार

लेख हा मनाला लागलेल्या पंखांबद्दल आहे. आता हे पंख कसले? तर स्वतःला निर्भिडपणे व्यक्त करण्याचे. तू तूझ्या आईशी बोलतोस. कस बोलतो? ते नात राखुन, त्या आईपणाचा मान राखून. उगा उचलली जीभ लावली टाळ्याला नाही करत तू.

सहमत !
पण म्हणजे मी मनमोकळेपणाने बोलतच नाही असे काही नाही. जे काय आहे ते बिनधास्त सांगत असतो आपण. 'तिच्यापाशी मुक्त होता येत नाही' वैग्रे काय भानगड नसते.

माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की नातं जपण्यासाठी आपण हातचं राखुन बोलतो.

जिथे हातचे राखून बोलावे लागते तिथे एकतर तोंड उघडायला जाऊच नये, रादर असली नाती जपूच नयेत असे आपले स्पष्ट मत आहे. ते चुकीचे असेल देखील, पण माझ्या मनाला माझे मत पटणारे अहे. ;)

पण इथे मिपावर तू तूला टवाळक्या कराव्याश्या वाटल्या तरी बिन्धास्त करू शकतो. अन त्यातही तूला एक सुप्तसा आधार असतो तूझ्या समान विचारांचे काहीजण ते खपवुन घेतील.

कशाला लागतोय आधार ? व्यक्त होताना ते विचर कोणी खपवून घेईल का ? कोणी त्याला वाह वाह करेल का? असले विचार माझ्या मनात येतच नाहीत. एखादे लेखन वाचून जे काय मनात येते ते मी लिहून मोकळा होतो. व्यक्त झालेले शब्द टिकले तर उत्तम, आणि पंख लागले तर संपादकाच्या नावाने शिमगा करून मोकळे.

आणि एखादे लिखाण नाही कळले, किंवा आपल्या बुद्धीला ते नाही पचले तर सांगायची लाज कशाला बाळगायची ? नाती जपायला ?

मी जे काही लिहितो ते मला फार्फार सुरेख वाटते, पण आमचा नान्या त्याला 'काय उकिरडा केलाय?' असे म्हणतो. मला ती प्रतिक्रिया जास्ती जवळची वाटते. उलट काही काही 'लै भारी' 'परा रॉक्स' वैग्रे प्रतिक्रिया न वाचताच दिल्यात का काय असे वाटून जाते. :P

असो..

प्रामाणीकपणे आमच्या डोक्यात काही शिरवायचा प्रयत्न केल्याबद्दल धन्याचे वादस.

अवांतर :- तुमच्या प्रतिक्रियेची प्रिंट ऑट काढून घेतली आहे. आणि हो मी त्याचा अभ्यास करीनच. असो.. बदलीन.

(सदर प्रतिक्रिया आमचे अ(ति)विचारी आणि समविचारी होऊ न शकणारे मित्र नानबा आणि कोदा ह्यांना समर्पित)

कवितानागेश's picture

13 Jan 2013 - 1:39 am | कवितानागेश

परा रॉक्स!! :P

स्पंदना's picture

13 Jan 2013 - 2:16 am | स्पंदना

येस्स! अ‍ॅज एव्हर!

स्पंदना's picture

13 Jan 2013 - 2:16 am | स्पंदना

सी? नानबा अस म्हणतो. हा जो तू विचार करतोस तेच सार आहे या लेखाचे.

कपिलमुनी's picture

13 Jan 2013 - 1:21 pm | कपिलमुनी

+१

जेनी...'s picture

13 Jan 2013 - 2:21 am | जेनी...

" लै भारी " =))

स्पा's picture

13 Jan 2013 - 10:22 am | स्पा

'फुलपाखरी' काहीतरी वाटले.

बोंबला आम्हाला हे 'फुलपाखरी दिवस' आठवले
परा सर =))

इनिगोय's picture

13 Jan 2013 - 5:37 pm | इनिगोय

सगळ्या वाचकांचे खूप आभार.
कधीच न भेटणार्‍या, पण तरीही एकमेकांचे जिवलग मित्र झालेल्या लोकांचं हे मनोगत आहे. ही दोन माणसं जगाच्या कुठच्याही कोपर्‍यात असतील, पण केवळ संपर्कमाध्यमांतून एकमेकांचे मित्र आहेत. अशा व्हर्च्युअल रिलेशन्सची व्याप्ती समजून घेणं खरंच अवघड.. म्हटलं तर आहेत, म्हटलं तर काहीच नाही.
आणि ही अशी जी मैत्री आहे, ती टिकणं न टिकणं सर्वस्वी त्या दोघांवरच अवलंबून आहे. कारण या मैत्रीला स्थळाकाळाचं बंधन नाहीय. हेच तिचं लिमिटेशन आणि हीच तिची ताकद.

पण सगळेच हे नातं जपतिलच असं नाहि , काहिना ओझं वाटु लागतं ...
त्यावेळी कळतं कि आपण जे जपतोय ते समोरच्याला त्रासदायक ठरतय ...
अश्यावेळी नात्यातले गुंतलेले धागे आपोआप सैल होउ लागतात ...

अभ्या..'s picture

13 Jan 2013 - 10:22 pm | अभ्या..

अगदी मनापासून सहमत. ;)

समयांत's picture

14 Jan 2013 - 8:17 pm | समयांत

सुंदर हो, काहीच्या काही सुंदर लिहीता राव. :)

प्यारे१'s picture

6 May 2013 - 12:06 am | प्यारे१

हे वाचलंच नव्हतं.
अप्रतिमच!

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 6:15 pm | ढालगज भवानी

अफाट अफाट तरल!!!

सूड's picture

6 May 2013 - 7:01 pm | सूड

कळलं नाही.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:02 pm | ढालगज भवानी

प्रकाशजी, एकमेकांना कधी न
इनिगोय - Fri, 11/01/2013 - 19:08
प्रकाशजी, एकमेकांना कधी न भेटणार्‍या पण एकमेकांचे निव्वळ 'व्हर्च्युअल स्नेही' असणार्‍यांचं मनोगत आहे हे.. आता बघा संदर्भ जुळतोय का.

सूड's picture

6 May 2013 - 7:16 pm | सूड

धन्यवाद, ढालगजकाकूबाई भवानीमावशीबाई!! ;)