मनोगतावर हेमंत पाटील यांनी हे गाणं दिलं आणि या सारखी आणखी कडवी रचता येतील का अशी विचारणा केली.. त्यावर मी खालील कडवी रचली. निश्चितच ती तितक्या ताकदिची नाहीत तरिही मिसळपावकरांनी चमचमीत मानून घ्यावीत...
त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?
जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?
गीतकार : सूर्यकांत खांडेकर
छान गाणे आहे ना? पण ही अवघी तीनच कडवी आहेत. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान होत नाही. अजून एक दोन कडवी असती तर मजा आली असती. पण तसे नाही ना... कुणाला पुढे कडवी रचता येतील का?
खाली मी २ कडवी रचली आहेत.. पाहा कशी वाटतात..
सावळ्याच्या गाईच्या त्या, तू दूधाची धार का?
शूरवीराच्या त्या तळपत्या, तलवारीचा वार का?
माथ्याला त्या डोंगराच्या, भेटणारा मेघ का?
मेघालाही खेचणारा, वायूचा तू वेग का?
पाखाराच्या खोप्यातील, इवलासा जीव का?
चहूदिशांना गोठणारी, तू काळोखी हिव का?
सूर्य तू अन चंद्र तू रे, अवनीचा तू श्वास का?
ईश्वराच्या मन्मनीचा, ध्यास तू आहेस का?
- प्राजु.
प्रतिक्रिया
24 Nov 2007 - 11:14 pm | धनंजय
... पण बहुतेक ठिकाणी वृत्त जमलेले नाही. त्याच चालीवर या ओळी म्हणता येणार नाहीत :-(
25 Nov 2007 - 12:30 am | विसोबा खेचर
माझं हे अतिशय आवडतं गाणं आहे.
प्राजू, तुझा प्रयत्न निश्चितच चांगला आहे, पण गाताना काही ठिकाणी शब्द चालीत नीट बसत नाहीत. धन्याशेठशी सहमत...
मात्र,
माथ्याला त्या डोंगराच्या, भेटणारा मेघ का?
या एका ओळीला माझे लाख सलाम...! फारच सुरेख, चित्रदर्शी ओळ आहे आणि चालीतही छान बसते आहे!
आपला,
(मेघवेडा) तात्या.
--
वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत! (-विंदा)
26 Nov 2007 - 8:22 am | सर्किट (not verified)
उद्या मी पण प्रयत्न करून पाहतो.
माझ हे आवडतं गाणं आहे. माझ्या ओबडधोबड आवाजात म्हणण्याचा मी प्रयत्नही करतो कधी कधी.
पण म्हणूनच ह्या गाण्याला हात लावण्याचा आजवर प्रयत्न केलेला नाही.
आता, करून बघावा, म्हणतो.
- सर्किट
26 Nov 2007 - 9:25 am | पुष्कर
अत्यंत आवडतं गाणं आहे हे. हृदयनाथांचं संगीत तर अप्रतीम आहे. विशेष करून प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या दोन ओळींची चाल ही 'यासम हीच' अश्या प्रकारची आहे.
त्या काव्याचा केलेला विस्तार स्तुत्य आहे. काही कल्पना चांगल्या वाटल्या, पण त्या वृत्तात बसत नसल्यामुळे चालीवर म्हणता येत नाहीत.
- (गानवेडा) पुष्कराक्ष
26 Nov 2007 - 11:16 pm | सर्किट (not verified)
हे गाणे हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेले असले, तरी संगीत त्यांचे नाही, असे वाटते.
(वसंत प्रभू ?) चुभूद्याघ्या.
- सर्किट
27 Nov 2007 - 9:06 am | विसोबा खेचर
तरी हे गाणे हृदयनाथ मंगेशकरांचेच आहे. वसंतरावांचे नसावे...
असो, चूभूद्याघ्या...
तात्या.
26 Nov 2007 - 11:19 am | ध्रुव
माथ्याला त्या डोंगराच्या, भेटणारा मेघ का?
मेघालाही खेचणारा, वायूचा तू वेग का?
हे फारच आवडले.
बाकी छान.
--
ध्रुव
27 Nov 2007 - 11:50 am | कोलबेर
मी चूकून शिर्षक 'त्या फुल्यांच्या' असे वाचले.. म्हंटले अजुन एक अविश्वास समर्थक आहे वाटतं!! असो .. चालू द्या!!
27 Nov 2007 - 10:58 pm | टग्या (not verified)
किंबहुना, आजकालचे या स्थळावरचे सरासरी प्रतिसाद बघता, 'त्या फुलांच्या'नंतर टिंबटिंब पाहून पुढील काही शब्द लिहायचे राहून गेलेत किंवा मुद्दाम लिहिलेले नाहीत असे वाटले.
*** एका सुंदर कवितेचा रसभंग करून पचका करणार्या प्रतिसादाबद्दल आगाऊ क्षमायाचना! प्रतिसादाचा रोख कवितेकडे नाही, तर या संकेतस्थळावर रुजू पाहणार्या एका अनिष्ट प्रथेकडे आहे. ***
28 Nov 2007 - 1:27 am | विसोबा खेचर
मी चूकून शिर्षक 'त्या फुल्यांच्या' असे वाचले..
हा हा हा! त्या फुलांच्या ऐवजी त्या 'फुल्यांच्या' हे बाकी सहीच आहे! त्या 'फुल्याफुल्यांच्या'ही चाललं असतं! :)
आपला,
तात्या फुले.