तिरंगा

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
19 Apr 2013 - 9:21 pm

कलाकारांची ओळखः हीरो लोकः
हीरो-१: नाना- सतत वैतागलेला. उसूल "पहले लात (लाथ), फिर मुलाकात, फिर बात"
हीरो-२: राजकुमार - चेहरा व मिशी यांच्या अलाइनमेंटमधे पृथ्वीच्या अक्षासारखा फरक. मेकअप टीमने डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या चेहर्‍यावर मिशी लावण्याचा खेळ खेळलेला केलेला आहे (चित्रातील गाढवाला शेपटी लावतात तसे) असे सतत वाटणारा. उसूल "पहले मुलाकात, फिर बात, फिर जरूरत पडे तो लात"
हीरॉइन्स - हरीश, ममता,कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर ("इसे समझो ना रेशम का तार भैय्या")
चरित्र ई. अभिनेते - आलोक नाथ व सुरेश ओबेरॉय तर
व्हिलन्सः
दीपक शिर्के ("जंग के मैदान मे कोई भी परमवीर चक्र चटकही लेता है, लेकिन मेरी तलवार की धार के आगे..."), मनोहर सिंग, बॉब क्रिस्टो व इतर अनेक वाईट लोक

हरीश व ममता कु. यांचे एक रोमँटिक गाणे. आधी मला वाटले दोन मैत्रिणींची गाणी असतात, "सुन री ओ सहेली, तू चंपा मै चमेली" तसे काहीत॑री असेल. पण हे खरे डुएट निघाले. यात एकाच गाण्यात ते सुमारे २५ ड्रेस बदलतात (म्हणजे तेवढे ड्रेस दिसतात. गाण्यात ते बदलत नाहीत. नंतर अपेक्षाभंग होऊ नये म्हणून मुद्दाम खुलासा). प्रत्येक कडव्यात वेगळा ड्रेस सगळ्याच गाण्यांत असतो पण येथे तर एकाच शॉट मधे हवेत उडी मारताना एक, तर हवेतून खाली येताना दुसरा असाही प्रकार आहे.

कोठेही दोन लोक बोलत असताना मधे विविध थोर लोकांचे फोटो ठेवून दिग्दर्शकाने लोकांना "थोरांची ओळख बिंगो/हाउझी" खेळायची संधी दिलेली आहे. मी गांधीजी, नेहरू, इंदिरा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन एवढे मी ओळखले. पोलिस स्टेशन वगैरे सोडा, पण मुख्य व्हिलन प्रलयनाथच्या घरी सुद्धा नेहरू व गांधींचे फोटो आहेत. याखेरीज प्रमुख नेपथ्य म्हणजे सर्किट बोर्ड्स व पिवळे-लाल लुकलुकणारे दिवे.

हिन्दी चित्रपटात सगळे ब्लॅक अॅण्ड व्हाईट असते. ग्रे शेड्स नसतात अशी टीका होत असते. त्याला चोख उत्तर देण्याकरिता दीपक शिर्केचे केस तसे ग्रे केले आहेत.

तर नेपथ्य, कॉस्च्युम व मेकअप या बाबी कव्हर केल्यावर आता कथेकडे वळू.

पण हा चित्रपट वेगवेगळ्या पातळ्यांवर समजून घेण्याकरिता एक क्विझ घेणे आवश्यक आहे. यातून तुमचा सिनेमा-आयक्यू तुम्हाला समजेल.
काही प्रसंग व संवाद.
१. सूर्यदेवसिंग, शिवाजीराव वागळे व प्रलयनाथ गेंडास्वामी. यातील व्हिलन कोण असेल? यातले नानाचे नाव काय असेल?
२. राखी का दिन. तीन भाऊ, एक बहीण. आधीच्या अन्यायामुळे त्यातील एक दोन जण रागावले आहेत. तिसरा त्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून देतो. तो त्या तिघातील कोण असेल? (हिंटः त्यातील एक मुस्लिम आहे). नंतर एकजण मरतो. तो कोण असेल? (हिंटः मागची हिंट पाहा).
३. तीन "ऐटम बम" वाले शास्त्रज्ञ. त्यांना व्हिलन धमकावतो "सिक्रेट" देण्यासाठी. त्यातील एकजण 'आमच्या रक्तात बेइमानी नाहीये' असे सांगून ते साफ नाकारतो व मरतो. तो कोण असेल? (हिंटः बाकीचे दोन हिंदू आहेत).

खालील संवाद कोण म्हंटले असतील ते ओळखा. नाना पाटेकर (चिडलेला), दीपक शिर्के (चिडलेला), राज कुमार (चिडलेला असावा. चेहर्‍यावरून पत्ता लागत नाही). हे संवाद कोणास उद्देशून व का म्हंटले ते चित्रपटातील इतर अनेक बाबींप्रमाणे इररिलेव्हंट आहे:
१. "जिस दिन भी मुझे तेरे खिलाफ एक भी सबूत मिला, तुझे ऐसी मौत मारूंगा, कि तेरी पापी आत्मा अगले सात जनम तक किसी दूसरे के शरीर मे घुसने के पहले काँप उठेगी" (हे म्हणजे पुढच्या पन्नास वर्षात तुला अधूनमधून भीती वाटेल अशी धमकी देण्यासारखे आहे. कारण आत्म्याला भीती फक्त एका शरीरातून दुसरीकडे जातानाच्या ट्रान्झिशन मधे वाटेल. what will it do at other times – live happily ever after? )
२. "नौकरी करते हो १५०० रूपयोंकी, और बात करते हो...."
३. "हमारा ये हथियार आग उगलता है, अगर तुमने something something नही किया तो हमारा ये हथियार तुम्हे जला देगा"

यावरून तुम्हाला एकूण कथेचा अंदाज आला असेल. दीपक शिर्केला कोणत्यातरी 'विदेशी ताकत' ला भारतात राज्य करण्यास मदत करून स्वतःचे जुगार, दारू, ड्रग्स व इतर अवैध धंदे चालू ठेवायचे असतात. पण एका शहरातील एक डीआयजी (रूद्रप्रताप चौहान उर्फ "नामुमकिन को मुमकिन करनेका दूसरा नाम". पण ते अशा नावाच्या लोकांना "ना" सुनने की आदत नसल्याने असावे) त्यांच्या मधे येत असतो.

यावर व्हिलनच्या अड्ड्यावर एक हाय लेव्हल मीटिंग चालू आहे. त्यात मुख्य विदेशी ताकद बॉब क्रिस्टो व इतर फुटकळ विदेशी ताकदी आलेल्या आहेत. तेथे प्लॅन्स आखले जात आहेत. मधे एक पोलिस अधिकारी काहीतरी बोलतो. बॉब क्रिस्टोचे कुतूहल वाढते:
"आप की तारीफ?"
बॉब क्रिस्टो ने हिन्दीच्या अनेक परीक्षा दिल्याने त्याला कोणत्याही लहेजासकट ती बोलता येते. आणि ज्या देशावर कब्जा करायचा आहे तेथील फुटीर लोकांशीसुद्धा तो आदबीने बोलतो, "आप की तारीफ?"
दीपक शिर्के: "पोलिस ऑफिसर सत्यवादी, लेकिन ये सिर्फ नाम के सत्यवादी है"
यातील विनोदही बॉ.के. ला कळतो.

भारताच्या एका राज्यातील तिसर्‍या-चौथ्या रँकचा पोलिस अधिकारी त्रासदायक आहे. मग त्यावर तोडगा काढण्याचे खालील मार्ग असू शकतातः
१. आपले उद्योग दुसर्‍या एखाद्या राज्यात हलविणे.
२. गृहमंत्री आपलेच प्यादे असल्याने त्याला त्या डीएसपीची बदली करायला लावणे.
३. तो डीएसपी त्याच्या मुलाबरोबर बीचवर घोडेस्वारी करत असताना मुख्य व्हिलनने स्वतः दुसरा घोडा घेउन हेल्मेट घालून हातात तलवार घेऊन जाऊन त्याला मारणे. त्याचा मुलगा बघत असताना हेल्मेट चा पुढचा भाग उघडून हॉ हॉ हॉ करून हसणे.
यातील तिसरा मार्ग सर्वात सोपा व बिनधोक असल्याने तोच पत्करला जातो.

मग आता सरकारच्या बाजूने एक हाय लेव्हल मीटिंग होते. प्रमु़ख आलोक नाथ असतो, म्हणजे तो मंत्री करप्ट नसणार हे उघड होते. आता प्रलयनाथला कसा आवर घालायचा यावर सुझाव मागितले जातात. आर्मीशिवाय पर्याय नाही असे ठरते. आर्मी चा ही वेळ जात नसल्याने ते ही लोक तेथेच बसलेले असतात. पण तेथे पूरी फौज पाठवण्याऐवजी एकच असा माणूस पाठवू की जो "शेरो मे शेर है व आणखी काय काय आहे" असे ते सांगतात. कारण त्याने १९६५ च्या युद्धात एकटाच मशीन गन घेऊन पुढे शत्रूच्या हद्दीत जाऊन चार ठिकाणी तिरंगा लावलेला असतो. बहुधा तो एक ८-१० झेंडे सुद्धा बरोबर घेऊन युद्धात लढत असावा. ६२ च्या युद्धातील कामगिरीमुळे त्याला परमवीर चक्र तर मिळालेले असतेच पण मेजर चा ब्रिगेडियर ही तो झालेला असतो. नंतर मात्र तीसेक वर्षे तो ब्रिगेडियरच राहिलेला असतो हे मात्र आश्चर्यच आहे. कारण तशीच जोरदार कामगिरी त्याने ६५ व ७१ च्या युद्धात केलेली असते, त्यामुळे कथेच्या काळापर्यंत तो किमान राष्ट्रपतीतरी व्हायला हवा.

त्याची एक मिलीटरीने बनवलेली "इण्ट्रो" फिल्म एक करप्ट पोलिस ऑफिसर प्रलयनाथच्या खाजगी थिएटर मधे त्याला दाखवतो. मग प्रलयनाथ माझ्या तलवारीपुढे त्याचे काही चालणार नाही वगैरे वल्गना करतो. तेव्हाच मोठे ब्याकग्राउंड म्युजिक वाजल्याने सगळे मागे बघतात (नाहीतर त्या सीन मधे त्यांना दचकून मागे बघायला दुसरे काहीच कारण नव्हते). तर मागच्या दारात राजकुमार उभा. गुरूत्वाकर्षणाची गडबड असलेल्या ठिकाणच्या गोष्टींप्रमाणे तो तिरपा उभा असतो. व "ना तलवार की धार से, ना गोलियोंकी बौछार से..." चालू होते.

तसे सगळे देशभक्त लोक. हीरोच नव्हे तर व्हिलन्सही. व्हिलन्सच्या अड्ड्यातही भारताचा नकाशा पूर्ण आहे. म्हणजे व्हिलन्सही "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे" हे मान्य करतात. मात्र अवघ्या भारताच्या रक्षणाची काळजी असलेल्या राजकुमारच्या बंकर मधे फक्त महाराष्ट्राचा नकाशा असतो. नशिबाने सगळे व्हिलन्स जेव्हा राजकुमारने ट्रान्स्मिटर लावलेल्या गाडीतून जातात ते महाराष्ट्राच्या आसपासच फिरतात. नाहीतर याला ते कोठून सापडणार होते माहीत नाही.

मग राजकुमारला अडकवण्यासाठी शहीद स्मारक कार्यक्रमाला त्याला बोलावले जाते. तेथे त्याच्यावर हल्ला करणार्‍या माणसाला मारण्याकरिता कमांडोज गोळी झाडतात तेव्हा तेथे असलेले तोतये पोलिस सर्वत्र गोळीबार करतात. हा आदेश राजकुमारने दिला असे ठरवून त्याच्यावर खटला भरला जातो.

हा खटला चित्रपटसृष्टीतील खटल्यांच्या इतिहासात लॅण्डमार्क समजला जाईल. राजकुमारने फायरिंगच्या ऑर्डर दिल्या, तोतया पोलिसांनी फायरिंग चालू केले, मंत्र्यांसकट सर्वांनी बघितले. या आरोपाचा इन्कार राजकुमारने कोर्टात केला नाही. हे सगळे पहिल्या पाच मिनीटांत होते. मग बाकीचा खटला नक्की कशासाठी चालू होता? एकामागून एक लोक येउन राजकुमारकडे बोटे दाखवून दाखवून काहीतरी सांगत होते. पोलिस त्यांचा अधिकारी तेथे उपस्थित असताना एका मिलीटरी ऑफिसरच्या आदेशानुसार फायरिंग करतात. आधी ते पोलिसच तोतया. त्यांचा जाबजबाब वगैरे? बहुधा आवश्यक नाही. ते पोलिस होते का महत्त्वाचे नाही, त्यांनी कोणाच्या आदेशानुसार फायरिंग केले हे महत्त्वाचे.

त्यात एक ऐसा गवाह जिसकी सच्चाई पर कोई शक नही कर सकता, म्हणून नाना येतो. म्हणजे कोर्टाच्या दृष्टीने पोलिसांमधील लोकांचे सच्चाईनुसार एक विश्वासार्हता रँकिंग असावे जबाब ग्राह्य धरण्यासाठी. नानाही राजकुमारलाच जबाबदार धरतो. मग राजकुमारचे निलंबन ई. पायर्‍या न होता त्याला थेट तुरूंगात टाकले जाते. पण नंतर कळते की हा सगळा राजकुमारचाच बनाव होता. "हम यहॉ आये थे अपने हुकूम से, और जायेंगे..." ई.ई.

आता राजकुमार व नापा यांचे मुख्य काम सुरू होते. ते म्हणजे बराच वेळ डॉयलॉगबाजी करणे (व प्रत्येक पंचला इफेक्ट साठी पूल टेबलच्या पॉकेट मधे एक बॉल मारणे. त्यात दोन तीन वेळा तो पांढरा Cue Ball ही पॉकेटमधे जातो) व त्यातून वेळ उरलाच तर व्हिलन्सचे अड्डे शोधणे. एक क्लू मिळतो. "शहर के बाहर, काली पहाडीके पीछे" एवढ्यावर अचूक पत्ता सापडणार्या एका आमराईत बॉम्ब बनवायचे काम चालू असते. आमराईची निवड बरोबर आहे - कारण आंबा हे बारमाही पीक असल्याने वर्षभर तेथून पेट्या बाहेर जात असलेल्या बघून कोणालाही संशय येणार नाही. तसेच तेथे पोलिस वगैरे येउ नयेत म्हणून ठिकठिकाणी बॉम्ब पेरून ठेवलेले असतात व जरा कोणी इकडेतिकडे पाय ठेवला तर स्फोट होत असतात. मात्र एरव्ही तेथून हातगाड्या, ट्रक आरामात फिरत असतात. तसेच प्रत्येक झाडावर आंबे लगडलेले असतात, जे कधीही पडू शकतात. सॉलिड प्लॅन.

तेथे दोन व्हिलन्स जी माहिती त्यांना तोपर्यंत "कॉमन नॉलेज" असायला हवी ती केवळ प्रेक्षकांना माहीत व्हावी म्हणून एकमेकांना मोठ्याने सांगत असतात. उदा: एक बॉम्ब, जो २५ मीटर लांबच्या ट्रकला उडवू शकतो, तो दाखवायला तो एक जण तो लांब टाकून दाखवतो. मग एक स्फोट व "हॉ हॉ हॉ". पण यावर दुसर्‍या व्हिलनचे समाधान होत नाही. तो म्हणतो हा बॉम्ब यूपी व आसाम साठी ठीक आहे, पण मला असा एक बॉम्ब दे जो ब्रिगेडियर सूर्यदेवसिंगला उडवू शकेल (यावर यूपी व आसाममधे निदर्शने कशी झाली नाहीत हे एक आश्चर्यच आहे). मग यावर एक दुसरी कैरी दाखवली जाते जी म्हणजे असा बॉम्ब असतो की जो जो ५० दूरच्या माणसाच्या हाडाचा भुगा करू शकतो. मग तो व्हिलन तो बॉम्ब थ्रो करतो ते दाखवायला.

तर त्या दिशेने फक्त एका कोकिळेचा आवाज येतो. दोन मिनीटे शांतता झाल्यावर निष्पन्न होते की राजकुमारने तो कॅच केला आहे. असे दोन रॅण्डम लोक एका रॅण्डम टाईमला डेमॉन्स्ट्रेशनसाठी एखादा बॉम्ब कोणत्या दिशेने फेकतील हे राजकुमारला बरोबर माहीत असते, तेथे कोठेतरी लपून तो बॉम्ब कॅच करायचे व नंतर व्हिलन्स जे संवाद म्हणत आहेत त्याला योग्य प्रत्युत्तर देत तेथून बाहेर यायचे याचेही प्रशिक्षण त्याला मिळालेले असते.

कल्पना करा. तुमच्या कडे आंब्याच्या अनेक पेट्या भरून बॉम्ब आहेत, समोरच्या जमिनीत काही पुरलेले आहेत. अशा वेळेस ज्याला मारायचे आहे तो डुलत डुलत समोरून येतो आहे, तुम्ही काय कराल? तेच ते करतात. एकजण राजकुमारच्या मागून त्यावर बॉम्ब फेकायला येतो. पण राजकुमारची पेरिफेरल व्हिजन ३६० अंशाची असल्याने त्याला ते दिसत असते, व तो बॉम्ब बरोबर मागे फेकून त्याला उडवतो (५० मी रेंजवाला तो आधी कॅच केलेला व इतका वेळ स्पिनर सारखा हातातल्या हातात उडवत असेला बॉम्ब. तो मागे फेकण्याची पॉवर इतकी की हिन्दी सिरीयलमधल्या स्त्रिया लग्नानंतर मैका सोडताना ते तांदूळ का काय मागे टाकतात ते सुद्धा जास्त जोरात टाकत असतील). आता राजकुमारकडे एकही बॉम्ब नाही. व्हिलन्स कडे हजारो आहेत. आणखी काही जमिनीतही आहेत. राजकुमारला मारायचे आहे. काही सुचते का? बरोब्बर! ते सगळे फायटिंग करतात.

असे करत करत रखडत शेवटी सगळे प्रलयनाथच्या अड्ड्यावर क्लायमॅक्ससाठी पोहोचतात. नमनाचे डॉयलॉग, मारामारी ई. होउन स्टेलमेट अवस्था येते तेव्हा प्रलयनाथ, तांडेल, बॉके हे सर्व सुटे उभे असतात. नाना, राजकुमार, व त्यांच्या कमांडोज च्या मागे गन्स घेऊन प्रलयनाथचे लोक उभे असतात, आणि हरीशची आई, वर्षा व इतर दुर्बल लोक बांधलेले असतात व त्यांच्या केबिनच्या बाँबचा रिमोट प्रलयनाथकडे असतो.

आता तीन मिसाईल ("प्रलय-१, २, ३") भारताच्या इस्ट, वेस्ट व नॉर्थ ला जाउन पडणार (उपस्थित सर्वांच्या दिशाज्ञानाबद्दल शंका आल्याने येथे भारताचा नकाशा दाखवून इस्ट, वेस्ट व नॉर्थ म्हणजे कोठे ते ही दाखवले जाते) आणि याचे थेट प्रक्षेपण सर्वांना दाखवले जाणार असे जाहीर होते. तेव्हा मग राजकुमार एक ओढण्याचा पाईप तोंडात धरतो व पेटवणार, एवढ्यात प्रलयनाथ पुढे होऊन "खडे हो बारूद के ढेर पे, और पी रहे हो पाईप" हे "कोनाड्यात उभी व्हिंदमाता" च्या तोडीचे यमक जुळवलेले वाक्य म्हणतो, व तो पाईप फेकून देतो. मग धूरच धूर होतो. पाच मिनीटे कोणालाच कोणी दिसत नाही. नंतर राजकुमार व नानापुढचा धूर क्रमाक्रमाने क्लिअर होऊन ते तेथेच आहेत हे निष्पन्न होते.

आता दोन तीन वेळा हॉ हॉ हॉ झाल्यावर मिसाईल उडवण्याची ऑर्डर दिली जाते. काउंटडाउन होऊन मिसाईल उडणार म्हणून सगळे श्वास रोखून बघू लागतात. पण...

एकदम शंभरएक कोकिळा गाउ लागल्याचा आवाज होतो. मशीन मधले प्रत्येक रंगाचे दिवे लुकलुकू लागतात. मिसाईल्स मधून धूर बाहेर येतो, आणि पुढे काहीच होत नाही. मग निष्पन्न होते की इतका वेळ राजकुमार हातात तीन "फ्युज कंडक्टर" धरून बसला होता. त्यात ते बर्‍यापैकी मोठे तीन फ्यु.कं. स्क्रीन वर आपल्याला तोपर्यंत दिसत नसल्याने चित्रपटसृष्टीच्या नियमानुसार आजूबाजूच्या गार्ड्सनाही ते दिसले नव्हते (नियम #१: "स्क्रीनवर क्लोजअप मधे आपल्याला जेवढे दिसते तेच त्या सीनमधे वेगवेगळ्या दिशांना व अंतरांवर उभ्या असलेल्या इतरांनाही तेवढेच दिसते"). ती मिसाईल लाँच सिस्टीमही इतकी प्रगत असते की फ्यु.कं नसताना "फ्युज मिसिंग" असा मेसेज देण्याएवजी सगळे दिवे कलात्मकरीत्या लुकलुकतात व वेगवेगळे आवाज येतात. हे म्हणजे कारमधले पेट्रोल संपल्यावर तसा इंडिकेटर येण्याऐवजी गाडीचे सगळे हॉर्न, बीपर्स व ब्लिंकर्स एकदम वाजू/लुकलुकू लागले तर कसे होईल तसे होते. तो शास्त्रज्ञही "बहुतेक हे पिवळे बटण... हा, हेच असेल" असा चेहरा करून असतील नसतील तेवढी सगळी बटने दाबून पाहतो.

तरीही चित्रपटात या क्षणी परिस्थिती फारशी बदललेली नसते. जे बांधलेले लोक आहेत ते तसेच आहेत, प्रलयनाथ चे लोक अजूनही राजकुमार व नाना च्या मागे गन्स धरून उभे आहेत. फक्त राजकुमार कडे आता फ्युज कंडक्टर आहेत. मग जुनीच धमकी परत देऊन ते फ्युज कंडक्टर परत घेऊन पुन्हा बसवायचे, की फायटिंग पुन्हा सुरू करून काही निष्पन्न होते का पाहायचे? साहजिकच प्रलयनाथ दुसरा मार्ग पत्करतो.

मुळात त्याचा प्लॅन नक्की काय असतो?. तीन मिसाईल. ऐटम बम वाली. ती बनवायला ते हेवी वॉटर, युरेनियम, मोठे रिअॅक्टर्स ई. लागत नाहीत, फक्त शास्त्रज्ञांकडून "सिक्रेट" मिळाले की झाले. ती इस्ट, वेस्ट व नॉर्थला कोठेतरी जाऊन पड्णार. व देशावर विदेशी हुकूमतचा झेंडा लहरायेगा. कोण विदेशी ताकत? फक्त बॉब क्रिस्टो ला पुढे पाठवून उर्वरित सैन्य नंतर येणार का? काही पत्ता नाही. फक्त मिसाईल आडव्याचे उभे झाले, आकाशात कोठेतरी नेम धरला, आणि "हॉ ह्हॉ ह्हॉ ह्हॉ ह्हॉ"

तेव्हा मला कळाले मिलीटरीने एकच माणूस का पाठवला ते!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

19 Apr 2013 - 9:44 pm | आदूबाळ

:)) :)) :)) :))

एक लंबर! तुम्ही "तिरंगा"चे नुसते रसग्रहण नाही तर रसपान केलं आहे!

माझा एक मित्र 'तिरंगा'चा भयंकर चाहता आहे. त्याला ही लिंक सेंडवतो.

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2013 - 10:49 pm | श्रीरंग_जोशी

यापूर्वी माध्यमिक शाळेत असताना एका वर्गमित्राने पहले लात, फिर बात वाले संवाद ऐकवत मोठ्या भक्तिभावाने या चित्रपटाची कथा सांगितली होती त्याचे स्मरण झाले.

असेच सौदागर वर पण येउद्या!!

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2013 - 12:41 am | श्रीरंग_जोशी

फारएन्ड यांनी सौदागर बद्दल बरेच आधी लिहिले आहे. रसिक वाचकांनी जरूर आस्वाद घ्यावा :-).

पण राजकुमारची पेरिफेरल व्हिजन ३६० अंशाची असल्याने त्याला ते दिसत असते

हाहाहा. इतर जोक्स वाचूनही हहपुवा.

'गेंडास्वामी' हे नाव पण अगदी सामान्यच! बाकी ते रंगित चमकणारे दिवे,ऐटम बाम (म्हणजे जणू कपाळाला लावायचा टायगर बामच आहे) वगैरे थेट 'मि. इंडिया' ची कॉपी वाटते.

मुक्त विहारि's picture

19 Apr 2013 - 10:29 pm | मुक्त विहारि

मिसाईल वाला सीन बघतांना मी जबर्दस्त हसलो होतो.

अर्धवटराव's picture

19 Apr 2013 - 10:35 pm | अर्धवटराव

नानाचं व.ऊ. ला उद्देशुन "ये मिर्ची है... *** जलाएगी" वगैरे अतिप्रासंगीक(प्रसंगीसुद्धा) रोमॅण्टीक डॉयलॉग, स्मशानात "इमानदार पुलीसवाले को यातो सस्पेण्ड किआ जाता है.." वगैरे सेस्टीमला शिव्या देणारे डॉयलॉग, रा.कु. आणि नानाचे "पीले पीले" वगैरे मदहोश गाणि आणि नशेबाज मदहोश अभिनय... अशा अनेक कलाप्रसंगांचा उल्लेख देखील केला नाहित. कदाचीत वाचकांना ह.ह.पु.वा करायची, पण मारायचे नाहि असा अहिंसात्मक निर्णय घेतला तुम्ही :)

अर्धवटराव

अभ्या..'s picture

20 Apr 2013 - 12:45 am | अभ्या..

नानाच्या मागे वाजणारे ते सायरनचे मुजिक अन उंदराची पिशवी पण राहिलेच. ;)
बाकी राजकुमारच्या गुहेतल्या ट्रान्स्मीटरची झीरो बल्बाची लायटींग जत्रेतल्या लायटींगपेक्षा सरस.
सगळे बजेट नानाजानी वर संपल्यावर प्रोड्यूसर तरी काय करणार. करावे लागतेत असे पत्र्याच्या नळ्कांड्याचे मिसाइल. :(

फास्टरफेणे's picture

19 Apr 2013 - 10:50 pm | फास्टरफेणे

ह. ह. पु. वा.
के. के. सिंग (कथा) यांना साष्टांग दंडवत!

पैसा's picture

19 Apr 2013 - 11:00 pm | पैसा

मेले हसून हसून! गोष्ट सुसंगत रीत्या समजून घ्यायचा गंभीर प्रयत्न करत आहे. पण इतके हसण्याचे ब्रेक्स घेऊन ते एका दिवसात शक्य दिसत नाही!

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Apr 2013 - 11:09 pm | लॉरी टांगटूंगकर

आवरा आवरौ, आवराः!!!!!
आवरेश्वरेन्द्रा!!!! कमाल प्रकार झालेला आहे

तुम्ही त्यात आवरा ची रुपं लिहून भर टाकू नका =))

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 11:14 pm | प्यारे१

अत्युच्च रसग्रहण!
चित्रपट पाहण्याची खरी दिव्यदृष्टी मिळालीये आपल्याला मुनिवर आणि ती आमच्यासारख्या पामरांना देखील देऊन आपण उपकृत करीत आहात.

तहे दिल से शुक्रवार आपलं ते हे शुक्रगुजार हय!

स्पंदना's picture

21 Apr 2013 - 1:42 pm | स्पंदना

+१
दिव्य दृष्टी!!

बादवे ममता, कुलकर्णी असे लिहुन ती दोन हिरॉइनची कामे एकटी करते अस दाखवायचे आहे का?

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2013 - 12:20 am | श्रीरंग_जोशी

हीरॉइन्स - हरीश, ममता,कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर

हे फारच भारी. प्रेमकैदी (१९९१) चित्रपटाचा हा एक फोटो.

Harish - Prem Qaidi

आदूबाळ's picture

20 Apr 2013 - 12:41 am | आदूबाळ

a

अभ्या..'s picture

20 Apr 2013 - 12:48 am | अभ्या..

बाळासाहेब, ममता येगळी नगमा येगळी. ;)
तसेच हरीश येगळा आन सौरभ गांगुली येगळा.

त्या हरीश का कॉणाची लायकी आहे का हीरो बनण्याची? काय माठाड चेहेरा आहे.

अभ्या..'s picture

20 Apr 2013 - 1:05 am | अभ्या..

हरीशचे खरे स्थान गोविंदाने आंटी नं.१, कुली नं.१ मध्ये दाखविले आहे. ;)
त्याचा श्रीदेवीबरोबर पण एक पिच्चर हाय म्हणे.

तुषार काळभोर's picture

22 Apr 2013 - 5:34 pm | तुषार काळभोर

तो 'कलाकार' पिच्चर वेगळा!!
त्यात हरीश नाही, तर 'कुणाल गोस्वामी' आहे.
कुणाल गोस्वामी हा मनोजकुमारचा कुलदीपक आहे.

तुषार काळभोर's picture

22 Apr 2013 - 5:35 pm | तुषार काळभोर

कलाकार म्हणजे, नीले नीले अंबर पर

मृत्युन्जय's picture

23 Apr 2013 - 10:34 am | मृत्युन्जय

आर्मी मध्ये हरीश आणि श्रीदेवी दोघेही आहेत. अर्थात नायक - नायिकेच्या भूमिकेत नाहित. आर्मी म्हणजे सुदेश बेरी, शाहरुखखान, हरीश, किरणकुमार, श्रीदेवी यांचा आर्मी.

अर्धवटराव's picture

20 Apr 2013 - 1:53 am | अर्धवटराव

शुचीतै... अगं तो हरिश "वेगळ्याच" रोल्स करता प्रसिद्ध होता साऊथमधे.

अर्धवटराव

निमिष ध.'s picture

20 Apr 2013 - 1:46 am | निमिष ध.

लाजवाब वर्णन - तिरन्गा एके काळी पारायणे केलेला चित्रपट. ड्वाय्लोग पाठ होते सर्व मित्राना. मग सुरु व्हयचे - ना तलवार की धार से ना गोलीयो की बौछार से बन्दा डरता है तो सिर्फ परवर्दिगार से!!

पिंपातला उंदीर's picture

20 Apr 2013 - 9:02 am | पिंपातला उंदीर

लै भारी : )तिरंगा चा दिग्दर्शक मेहूल कुमार ने त्याच्या पोरीला 'हीरो' बानवून क्रांतीवीर चा सीक्वल काढला आहे. तो पण असाच स्फोटक आहे. हास्य स्फोटक.

मुक्त विहारि's picture

23 Apr 2013 - 12:25 am | मुक्त विहारि

" मेहूल कुमार ने त्याच्या पोरीला 'हीरो' बानवून क्रांतीवीर चा सीक्वल काढला आहे."

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Apr 2013 - 9:25 am | श्री गावसेना प्रमुख

बहुतेक तेव्हाच्या काळात हा हास्यास्पद नसेल्,त्याला बनवुन २० वर्ष लोटली आहेत्,

दिपक's picture

20 Apr 2013 - 1:26 pm | दिपक

सॉल्लीड !!
वाक्यावाक्याला तुफान ह.ह.पु.वा ! =)) =))
बाकी नानाच्या प्रत्येक ऎन्ट्रीला तो येणारा सायरनचा आवाज भारीच :)
ते 'फ्युज कंडक्टर’ 'सीआरटी बेस पीसीबी' सारखे दिसतात. ;-)

इरसाल's picture

23 Apr 2013 - 10:46 am | इरसाल

बाकी नानाच्या प्रत्येक ऎन्ट्रीला तो येणारा सायरनचा आवाज भारीच

तो सायरनचा आवाज पुर्वीच्या गौतम-गोविंदा या शशी कपुरच्या पिच्चरातुन उचलला आहे. त्यात शशी पोस्ट्मन असतो.
त्यातल एक गाणं ... इक रुत आये इक रुत जाये मौसम बदलेना बदले नसीबा.

अर्धवटराव's picture

24 Apr 2013 - 8:30 am | अर्धवटराव
पुलीसवाला असतो. विजय अरोरा पोस्टमन असतो. अर्धवटराव
परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2013 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार

पेहले फारएन्ड..बादमे फारएन्ड.. वन अँड ओन्ली फारएन्ड..

जबर्‍यादस्त हो शेठ !

बाकी ते 'जीवन तंडेलच्या पोरीची झालेली फसवणू़ आणि त्या विषयावरती गेंडास्वामीचे प्रवचन' हे महान दृष्य कसे विसरलात ? त्यावर एक संपूर्ण लेख लिहाच.

दादा कोंडके's picture

20 Apr 2013 - 8:04 pm | दादा कोंडके

हा चित्रपट बघता बघता मोठ्ठा झालो. कारण नेहमी कुठल्या न कुठल्या च्यानल वरती लागलेलाच असायचा.
खतरनाक परिक्षण. :))

कवितानागेश's picture

21 Apr 2013 - 12:37 am | कवितानागेश

खतरनाक लिहिलय परीक्षण. पुन्हा एकदा पहायला हवा हा सिनेमा. :)

आतिवास's picture

21 Apr 2013 - 1:46 pm | आतिवास

असल्या गंमतीजमतीविना लोकप्रिय हिंदी चित्रपट काढताच येणार नाही कुणाला असं एक मत बनलं आहे अनुभवाअंती :-)

किसन शिंदे's picture

21 Apr 2013 - 1:53 pm | किसन शिंदे

=)) =)) =))

ज ह ब रा ट!!!

योगी९००'s picture

22 Apr 2013 - 8:46 am | योगी९००

तिरंगा पाहताना जितका नसेल हसलो तितके हे परिक्षण वाचून हसू आले.

इतक्या मोठ्या(?) मिसाईलचे फ्युज कंडक्टर बाहेर का प्रश्न चित्रपट पाहताना पडला होता...कदाचित मा. मेहूलकुमार यांना फारएन्ड यांचे नाव आधी कळले असावे. माझ्यामते कॉमेडी मुव्ही बनवायचा किंवा फारएन्ड यांनी त्यावर लिहून लोकांचे आणखी मनोरंजन करावे असा उद्देश ठेवूनच बनवला आहे.

मृत्युन्जय's picture

22 Apr 2013 - 11:37 am | मृत्युन्जय

देवा. खतरनाक परीक्षण आहे रे. तिरंगा लै वेळा बघितला आहे. फुल्ल टाइमपास म्हणुन बघितला. पण ही चिरफाड पाहुन हसुन हसुन जीव गेला. पुल म्हणतात त्याप्रमाणे पहिल्या ५ वाक्यात हशा मिळाला नाही तर भाषण बाद ठरवावे तद्वत तुम्ही केवळ पाचव्या वाक्यात हरीशची वर्णी हिरोइन्स मध्ये लावल्यान खळ्ळकन फुटलो राव.

अमोल खरे's picture

23 Apr 2013 - 10:13 am | अमोल खरे

वाट लागली हसुन हसुन.

जे.पी.मॉर्गन's picture

23 Apr 2013 - 11:46 am | जे.पी.मॉर्गन

>>पाचव्या वाक्यात हरीशची वर्णी हिरोइन्स मध्ये लावल्यान खळ्ळकन फुटलो राव<<
बास बास... तिथून जी काही सुरुवात झालियेना! कहर लिहिलंय परीक्षण! तिरंगा तसाही आपला फेव्हरेटेस्ट पिक्चर... अजूनही १५ ऑगस्ट / २६ जानेवारीला झी सिनेमा लावून चातकासारखी वाट बघत असतो ह्या शिणेमाची. आणि ह्यानी तर सगळ्या आठवणी जाग्या केल्या! बघावा लागणार परत!

जे.पी.

नगरीनिरंजन's picture

22 Apr 2013 - 12:53 pm | नगरीनिरंजन

फारएन्ड इज ब्याक!
हहपुवा झाली वाचताना. वाक्यावाक्याला गदगदत, फुसफुसत होतो. गेंडास्वामीचं स्मार्ट लॉजिक तर लैच भारी.
ते नानाचं शांती तू नै जान्ती राह्यलं पण.

मन१'s picture

22 Apr 2013 - 5:39 pm | मन१

"ले जाओ अपने इस कबूतर बेटे को" वाल असीन.
त्यात मागे न पाहता दोन किलोमीटार दूर पाठिमागे दूर बिल्डिंगमधील ग्यालरीत असलेल्या एका नेमबाजाला मागे न पाहताच राजकुमार गोळी मारतो; तो सीन सुटला वाटतं परीक्षणातून?
असो. बाकी चित्रपट व परीक्षण दोन्ही भन्नाटच.

हुप्प्या's picture

22 Apr 2013 - 7:58 pm | हुप्प्या

तिरंगासारख्या अफाट नि अचाट पिक्चरचे परीक्षण लिहायला तोलामोलाचा परीक्षक पाहिजे तो असा फारएण्ड सारखाच.
लिहिण्याची शैली कित्येकदा वूडहाऊसची आठवण करून देते.
लगे रहो!

लिहिण्याची शैली कित्येकदा वूडहाऊसची आठवण करून देते.

+१११

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

तिरंगा पिच्चरला केले तुम्ही धरून चौरंगा =)) =)) =))

मान गये सरजी . येद दंडवत घ्यावा _/\_

(फारएंडसाहेबांचा व्यजन) बॅटमॅन.

चावटमेला's picture

22 Apr 2013 - 9:38 pm | चावटमेला

हाहाहाहा, भारीच.

बाकी , सिनेमात नाना कायम वैतागलेला का दाखवलाय ते कधीच कळलं नाही
(तिरंगा प्रेमी) चावटमेला

कपिलमुनी's picture

23 Apr 2013 - 12:17 am | कपिलमुनी

नाना पाटेकर एखादा अपवाद वगळता सर्व हिंदी चित्रपटांमधे वैतगलेला चेहरा करून असतो ..बहुधा मनाविरुद्ध हिंदी मधे काम करत असेल...

सुहास झेले's picture

22 Apr 2013 - 10:43 pm | सुहास झेले

हा हा हा ... अशक्य भारी =)) =)) =))

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Apr 2013 - 10:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

फारएंड साहेब, सध्याच्या गदारोळातील मरूस्थल आहे हो तुमचा लेख.
तुम्ही कधीमधीच लिहिता पण जबराट लिहिता :-)

बॅटमॅन's picture

22 Apr 2013 - 11:22 pm | बॅटमॅन

मरुस्थल की ओअ‍ॅसिस?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Apr 2013 - 12:37 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयमाय स्वारी. ओअ‍ॅसिसला चुकून मरुस्थल म्हटले :-)
ओअ‍ॅसिसला मराठीत काय म्हणतात ???

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2013 - 12:44 am | श्रीरंग_जोशी

भूगोलाच्या पुस्तकात 'मरुद्यान' असा उल्लेख असायचा...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Apr 2013 - 12:54 am | विश्वनाथ मेहेंदळे

हम्म... म्हणून गोंधळ झाला असेल माझा.
फारएंड साहेब.. मरुद्यान, नॉट मरुभूमी, बर्का :-)

बॅटमॅन's picture

23 Apr 2013 - 1:01 am | बॅटमॅन

रैट्ट, मरुद्यानच.

तेव्हा मला कळाले मिलीटरीने एकच माणूस का पाठवला ते!

या शेवटच्या वाक्यापर्यंत अगदी कहर आहे ......

सुहास..'s picture

23 Apr 2013 - 2:53 pm | सुहास..

क ह र !!

चित्रपट आणि परीक्षण ही ;)

मला त्ये स्साल " हमारे सायंटीस्ट को छोड दो और अपने ईस कबुतर बेटे को ले जावो " आठवले ;)

उत्खनक's picture

23 Apr 2013 - 6:17 pm | उत्खनक

अशक्य लिहिलंय..
कितीतरी वेळचा उगाच हसत बसलोय असं वाटतंय हापिसात मित्रांना...
मायबाप.. जोहार घ्यावा.. __/\__

अनुप ढेरे's picture

24 Apr 2013 - 4:18 pm | अनुप ढेरे

व्हिजिल इडियट या ब्लॉगची आठव्ण झाली. अशीच धमाल परिक्षणं असतात.

अनुप ढेरे's picture

24 Apr 2013 - 4:18 pm | अनुप ढेरे
उत्खनक's picture

12 Aug 2014 - 2:11 am | उत्खनक

१५ ऑगस्ट निमित्त हा लेख पुन्हा वर आणावासा वाटला... *pleasantry*

टवाळ कार्टा's picture

12 Aug 2014 - 8:03 am | टवाळ कार्टा

कहर आहे...:)

पिलीयन रायडर's picture

14 Aug 2014 - 10:37 am | पिलीयन रायडर

कितीही वेळा वाचला तरी मरुस्तोवर हसायला येतं राव!! चेपुवर टाकतेय हो लिंक!!

प्यारे१'s picture

14 Aug 2014 - 1:54 pm | प्यारे१

पुन्हा एकदा हास्यस्फोट...

स्वातंत्र्यदिन चिरायु होवो!

अजया's picture

14 Aug 2014 - 10:12 pm | अजया

अफलातुन!!=))

vikramaditya's picture

14 Aug 2014 - 11:11 pm | vikramaditya

मेहुल कुमार ने पण कोर्टाच्या प्रसंगात वर्णी लावली आहे. ह्या चित्रपटात काम करायला अभिनयाची गरज नाही हे त्याला माहित असल्याने त्यानेपण हौस फिटवुन घेतली.

योगी९००'s picture

7 Nov 2014 - 12:52 pm | योगी९००

चला हवा येऊ द्या..या झी मराठीच्या एका एपिसोड मध्ये नाना पाटेकर "प्रकाश आमटे" यांच्यावरील चित्रपटाचे प्रमोशन करायला आला होता.

त्यावेळी त्याच्या समोर तिरंगा चित्रपटाची नक्कल करण्यात आली. खुद्द नानाच्या डोळ्यातही पाणी आले (हसून हसून..). तो एपिसोड पहाताना मला प्रकर्षाने या लेखाची आठवण झाली...!!

@फारएन्ड : नवीन परिक्षण केव्हा टाकताय?

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2014 - 1:19 pm | टवाळ कार्टा

अगदी अगदी

सांरा's picture

16 Dec 2017 - 9:03 pm | सांरा

धुळवडीचे धागे आणि पोकळ बांबू पाहून मज म्हाताऱ्याचा उर भरून आला. म्हणून मिपाच्या ग्लोरी डेज मधला लेख वर काढला आहे. थोडे वातावरण हलके व्हावे हि अपेक्षा.

धनावडे's picture

7 Sep 2022 - 8:59 pm | धनावडे

हॉ ह्हॉ ह्हॉ ह्हॉ ह्हॉ