नशीब एकेकाच

Primary tabs

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जनातलं, मनातलं
31 Mar 2008 - 12:04 am

तिने कपाटाचे दार उघडले आणि आत न बघताच हातातले खोके आत भिरकावून दिले. अगदी त्यात काचेची वस्तू आहे अथवा नाही याची एवढीही फिकीर न करता.

आत पडताक्षणी मी बघितले तर माझ्यासारखेच काही खोके तिथे होते. काही आपल्या शोभिवंत कागदातून बाहेर आले होते तर काही माझ्याच सारखे रंगीबेरंगी कागदात बंदिस्त.

"ए ,ओळखलेस का? "
एकदम आलेल्या प्रश्नाने मी जरा बावचळून गेलो खरा.
पण लगेचच आठवले की काही महिन्यांपूर्वी त्या खोक्याला मी भेटलो होतो. आमचा अगदी सार्वजनिक पंचनामा झाला होता. वेष्टनातून काढून अगदी आतून बाहेरून लोकांनी आम्हाला बघितले होते. काय तो रंग, अगदीच जुनाट डिझाइन इत्यादी अलंकारांनी नटवून मग आमची रवानगी झाली होती अंधाऱ्या कपाटात अशीच...

"काय म्हणतोस दोस्ता? भेटून आनंद झाला." सराईतासारखे मी सांगितले. मग आम्ही कोणाकडे आणि कोठे भेटलो याच्या गप्पा मारायला सुरुवात केली.

लग्न, मुंज, बारस , नवे घर यापैकी काही निमित्त्य मिळाल तर आमची सुटका अंधारकोठडीतून व्हायची. नशीब बर असल तर देखण्या कपाटात जागा नाही तर प्लॅस्टिमध्ये, पोत्यात कोंबून आम्हाला माळ्यावर सुद्धा फेकलेले आठवतय मला. थोडक्यात काय तर असच वेष्टनासकट अंधारकोठडीतून जागा बदलत एकमेकांना खो देत राहण आमच्या नशीबात लिहिलेले.

"कशाला देतात ही माणस भेटवस्तू?. नको तर द्या ना टाकून ... पण नाही ..मी तर अगदी कंटाळले आहे अशा अंधार कोठडीतल्या प्रवासाला " एका गुलाबी चपट्यापेटीतून एक हळवा आवाज कानावर आला.

"मी तर एकदम खूष आहे. विश्वास बसणार नाही तुमचा पण तब्बल पाच वर्षांनी इथेच परत आलो आहे मी. हे घर, ही माणस , हे कपाट सगळ आठवतय मला. दुकानातून थेट वास्तूशांतीच्याच तर दिवशी या कपाटात आलो होतो मी पहिल्यांदा. ..."

एका खोक्यातून आनंदाची ललकारी ऐकून सर्वांनी कुतुहलाने त्याकडे पाहिले.

"तुम्हाला म्हणून सांगतो अगदी काही म्हणून काही बदलल नाही..मला आणि त्यांना सुद्धा थोडी जुनाट कळा आली आहे एवढच. पण घरी परत आल्याचा आनंद काही विरळाच. आता हक्काच्या घरात आल्यासारख वाटतय. खूप झाली धावपळ."

"हक्काच घर कसल? कैदखाना म्हणा. ज्यांना हक्काचे म्हणता त्या माणसांना काही जाणीव आहे का?अरे , प्रसंग साजरा करायला त्यांना काही चालत! मी म्हणतो नाही जिव्हाळा तर जाऊ नका.., भेटू नका, उगीच भेटवस्तूचा देखावा कशाला?" तीच वस्तू कधी त्याच कागदात तर कधी प्लॅस्टिकमध्ये तर कधी दुसऱ्या वस्तूच्या वेगळ्या रंगीत कागदात!

वाक्यागणिक त्या खोक्याचा आवाज चढत होता. काही वेळाने खोक्याचे हृदयाचे ठोके भावनातिरेकाने जास्तच वाढले . त्याला शांत करायचा प्रयत्नात दोन खोकी एकमेकांवर आदळली..आई ग.̱
पण त्यांनी पाठीवर हात फिरवून थोडे विषयांतर करून त्या मोठ्या आणि जरा जीर्ण दिसणाऱ्या खोक्याला थोड्यावेळात कसेबसे शांत केले.

तर दुसरीकडे आनंदाने नाचणाऱ्या खोक्याला काय घडले त्याचे एवढेही सोयरसुतकच नव्हते. तो आपला आपलीच कहाणी सांगण्यात गुंग होता. एका घरातून दुसऱ्या घरात, कोणकोणत्या प्रसंगाने तो गेला. त्याला कसे कोणी उघडून पाहिले. कोणी स्वयंपाकघरात मोकळे ठेवले , एकदा वापरले आणि पुन्हा कागदात घातले, कुणाला भेट म्हणून दिले... ते सारे सारे दंग होऊन सांगत होता. आपण आपल्या घरी आलो या एका विचाराने सर्व मानापमानांचा त्याला विसर पडला होता. त्याचा ऊर भरून आला होता. (सावरकरांचा आत्माही लाजला असेल स्वर्गात या खोक्याचे घराचे प्रेम पाहून.)

तेवढ्यात एका कोपऱ्यात आतापर्यंत गप्प बसलेली एक कागदी पिशवी मोठ्याने हसायला लागली. त्या आवाजाकडे साहजिकच सर्वांचे लक्ष गेले.

"नवा कागद आणि नवे खोके म्हणता आहात ना. हे मला पहा. त्या बारक्या माणसाला जर ढगळ कपडा घालायला दिला तर घालेला का लेकाचा? त्यांना हवा अगदी मापाचा आणि नव्या फॅशनचा कपडा. माझ पहा. माझ्या आत एक मोठं खोक आहे. आणि त्या खोक्याला ढीगभर कागद. त्या खोक्यात काय आहे माहिती आहे? एक बारका गणपती! आणि त्याच्याभोवती भलमोठे थर्मोकोल बॉल्स.. कागदाच्या रिबिना.. बस्स. पण सोंग अस केलय की काय देणारा कर्णाचा अवतार वाटावा. "

ते ऐकल्यावर सगळेच हसायला लागले. आणि मग आपलही असेच कसे आणि केव्हा झालेच्या गोंगाटाने कपाटातला अंधार भरून गेला..

"मी म्हणतो, द्यायच ना जे द्यायच आहे ते खुलेपणे. दिखावा कशाला?"

"अमिताभकडे पण असेच होत असेल का रे? अभिषेकच्या लग्नात काय देखणी खोकी होती ती सगळी." एका खोक्याने स्व्प्नाळू आवाजात विचारले.

"काय माहिती मोठयांच्या सर्वच गोष्टी वेगळ्या.."

"काही येत नाही तर कशाला मध्ये तोंड खुपसायच" दोन खोकी कुजबुजली.

"अहो, इज्जतीचा पंचनामा होईल याची भीती.. म्हणून हा दिखावा. पण काही म्हणा मी तर अशा मुद्दयावर आलो आहे की या लोकांपैकी काहींची गरीबी म्हणजे कमीपणा आणि श्रीमंताचा कद्रूपणा म्हणजे दागिना असा जमाना आहे. "

त्या पिशवीकडे पाहत एक खोका म्हणाला, " घरातल्या बायकाच याला जबाबदार. भेदभाव, जिव्हाळा, हा जवळचा तो दूरचा , हा माहेरचा , हा सासरचा ही त्यांचीच खुळ. ज्या गोष्टी त्या बायका वापरत नाही ते इतर घरात तरी कसे वापरतील? "

"ह्यांचे झाडणे म्हणजे आपला कचरा दुसऱ्याच्या अंगणात तसलाच प्रकार आहे हा" दुसऱ्याने वैतागून दुजोरा दिला.

" त्यांना सल्ले देणारे पुरूष जसे तुम्ही पाहिलेच नाही? हा मित्र, हा लंगोटीयार, हा साहेब विसरलास वाटत सर्व?" नाकाला मिरच्या झोंबाव्या अशा तिरमिरीने एका पिशवीने उत्तर दिले.

"लहान मुलांची खेळणी निदान ती निदान खोक्यातून काढतात, मुले खेळतात, मोडतात पण वापरतात. या मोठ्यांच्या आणि तशा दिखाव्याच्या वस्तूचे खोके होण्यासारखे दुःख नाही. "एकाने आपले मत मांडले.

गरजेच्या आणि ज्यांना खरच गरज आहे त्यांनाच भेटवस्तू कशा द्याव्या यावर बराच वेळ त्या खोक्यांनी चर्चा केली. निदान वस्तू आणि खोके दोघांचे भाग्य उजळेल असा आशेचा किरण त्यात त्यांना दिसत होता.

भेटवस्तू कशाच हवी मी म्हणतो.. एकाने मूलभूत विचार मांडला. कपाटात काही काळ शांततेचा गेला...

"परदेशात म्हणे वधूवर त्यांना काय हवे आहे याची एका दुकानात यादीच ठेवतात आणि त्यापैकीच काही तरी भेटवस्तू द्यावी लागते. आपल्याकडे सुद्धा असे केले तर कित्येक वस्तूंच्या आणि खोक्यांच्या नशीबातले दुःख टळेल. आपल्याकडे गिफ्ट कार्ड मिळतात ती सुद्धा चांगली नाही का? " एका खोक्याने सांगितले.

"हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली.

"इकडे काय आणि तिकडे काय सगळीकडे माणसे सारखीच. फक्त तिकडच वाईटच सांगायच किंवा चांगलच सांगायच असे एकच धोरण काही स्वीकारतात. दुसऱ्या खोक्याने मान उडवत सांगितले. "

इकडचे तिकडचे असे शब्द ऐकल्यावर काही खोकी तेवढ्यात डोलर ते रू दराच्या तर काही परदेशवारीच्या स्वप्नात दंग झाली. जरा विषयांतर झाले होते एवढे नक्की!.

"तुमची दुःख शेवटी भरल्या पोटाची! आमच्याकडे बघा तेव्हा कळेल की तुम्हीच किती सुखी आहात ते!" रिकाम्या लिफाफ्यांच्या ढिगातून आवाज आला.

लोकांनी आपल्याच आनंदात किंवा दुःखात राहावे हे काहींना मंजूर नसते. फक्त माझ्याकडे लक्ष द्या एवढीच त्यांची भूमिका असते. बहुधा अशापैकी कोणी त्या ढिगात असावे.

"आईजवळून बाळ हिसकावून घ्यायच आणि तिला एकट सोडून द्यायच. काय वाटत असेल तिला? अगदी अशी गत आहे झाली आहे आमची. "
'सप्रेम भेट' एवढाच मजकूर असणारी, सहज उघडता येणारी काही पाकिटे एका कोपऱ्यात रचलेली होती. बघितली तर अगदी कोरी आहेत असे वाटणारी ती पाकिटे तक्रारीचे सूर काढत होती. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या धारांनी कपाटातली इतर खोकी ओली होतील की काय अशी भीती वाटू लागली.

"भेट म्हणून दिलेली फुले आठवतात ना तुम्हाला.. त्यांच्यापेक्षा आपण बरे नाही का? ती कोमेजली की सरळ कचऱ्यात! आपल्याला निदान एक हक्काचे घर तर मिळते. " एका खोक्याने पोक्त आजीबाईच्या सुरात समजावले.

अमूक अमूक माणसापेक्षा आपले दुःख कसे जास्त.. तर कोठे दुसऱ्यापेक्षा आपण कसे सुखी अशा विविध विचारात ती खोकी बुडाली. शेवटी खोकीच ती.

एके दिवशी कपाटाचे दार पुन्हा करकरले... एक हात आत आला. दोन डोळे भिरभिर फिरले. दोन चार खोकी वर खाली करून त्या हाताने एक भलेमोठे पण हलके खोके उचलले. हाताबरोबर ते खोके कपाटातून नाहिसे झाले.

"अरे वा! तुम्ही आलात. किती छान वाटले म्हणून सांगू..अहो याची काय गरज होती, थॅक्स तरी पण... असे शब्द , (नेहमीचेच तस म्हटल तर )कानावर पडत असतांना एव्हाना सराईत झालेल्या खोक्याला हातबदल जाणवला होता.

पुन्हा कपाटाचे एक दार करकरले.. आत खोक्यांची रवानगी झाली.. थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली.

मांडणी

प्रतिक्रिया

वरदा's picture

31 Mar 2008 - 12:37 am | वरदा

कल्पना आहे....थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली.
वा वा..आपणही अगदी असेच नांदतो नाही....छान ओघवती मांडणी...
लोकांनी आपल्याच आनंदात किंवा दुःखात राहावे हे काहींना मंजूर नसते. फक्त माझ्याकडे लक्ष द्या एवढीच त्यांची भूमिका असते.
अगदी खरं आणि असे इतके भेटतात रोज्.....सुरेखच लिहिलय.....

विसोबा खेचर's picture

31 Mar 2008 - 1:55 am | विसोबा खेचर

"भेट म्हणून दिलेली फुले आठवतात ना तुम्हाला.. त्यांच्यापेक्षा आपण बरे नाही का? ती कोमेजली की सरळ कचऱ्यात! आपल्याला निदान एक हक्काचे घर तर मिळते. " एका खोक्याने पोक्त आजीबाईच्या सुरात समजावले.

वा!

अमूक अमूक माणसापेक्षा आपले दुःख कसे जास्त.. तर कोठे दुसऱ्यापेक्षा आपण कसे सुखी अशा विविध विचारात ती खोकी बुडाली. शेवटी खोकीच ती.

हम्म! खरं आहे... शेवटी खोकीच ती!

क्य बात है सोनाली, सुंदर लिहिलं आहेस...

आपला,
(किंचित अंतर्मूख) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 7:20 am | प्रभाकर पेठकर

कल्पना सुंदर आहे. पण जरा चर्चेतच रेंगाळली. अजून जरा क्ल्पनाविस्तार करता आला असता असे वाटते.
अभिनंदन.

मदनबाण's picture

31 Mar 2008 - 7:43 am | मदनबाण

"हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली.
क्या बात है !!!!!

(ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर मधील कन्सलटंट )
मदनबाण

प्राजु's picture

31 Mar 2008 - 8:31 am | प्राजु

खरंतर.. खोक्यांच्या भूमिकेतून हा विचार अगदी पटणारा आहे.
सोनाली, अभिनंदन.
खोक्यांची ही व्यथा समर्थपणे मांडली आहेस.
"हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली.
हे एकदम आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

स्वाती दिनेश's picture

31 Mar 2008 - 12:03 pm | स्वाती दिनेश

वेगळ्या विषयावरची कल्पना आवडली.
थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली.

हे खासच!
स्वाती

कोणे एके काळी लेमन सेट ने थैमान घातले होते.....बाकी घरी प्लॅस्टीक च्या ग्लासात कोण लिंबू सरबत पिते हा संशोधनाचा विषय आहे
त्या अगोदर कूकर्/मिल्क कूकर / गजराची घड्याळे ......माझ्या एका नातेवाइकाच्या लग्नात सहा कूकर/ आणि वीस गजराची घड्याळे आली होती......लग्न झालेल्या नवीन दांपत्याला झोपेतुन उठवण्यासाठी वीस घड्याळे?
त्यापेक्षा सर्वात धमाल आली होती म्हणजे एका मित्राला कोणी तरीबॉक्स भरून कोंडोंम दीली होती....ते बॉक्स उत्साही वर्हाडी मंडळीनी सगळ्यांदेखत उघडले होते..............
त्यानन्तर सगळेच बराच वेळ एकमेकांकडेही पहाणे टाळत होते.

वरदा's picture

31 Mar 2008 - 4:49 pm | वरदा

विजुभाऊ सहीच....

मीनल's picture

1 Apr 2008 - 2:28 am | मीनल

मला मागे एक इ मेल आली होती .`यु इंडियन्स `नावाची.
ती वाचून ती एका इंडियननेच लिहिली होती याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही .

तर त्या इ मेल मधे आपण भारतिय कसे आहोत याचे वर्णन होते.
In particular खरे नसले तरी in general खरे होते.

त्यात एक गुणधर्म दिला होता भारतियांचा--
भारतिय लोक आपल्याला आलेल्या भेट वस्तू त्यांना नको असतील तर दुस-याला आपली भेट म्हणून देऊन टाकतात.(थोडक्यात `खपवतात`)

वरील खोक्यांच्या संभाषणातून हाच भारतियांचा गुणधर्म दिसतो आहे.
तो गुणधर्म `चूक की बरोबर` हा विषय इथे नाही .म्हणून लिहित नाही.

हाहाहा! मलाही अशाच काही भेटवस्तू खपवायच्या आहेत. कोणाकडे काही समारंभ वगैरे काही आहे का? सांगा हं आवर्जून! ;-)

बेसनलाडू's picture

1 Apr 2008 - 8:33 am | बेसनलाडू

आवडला.
(कल्पनाविलासी)बेसनलाडू

नंदन's picture

1 Apr 2008 - 8:36 am | नंदन

लेख आवडला. शिवाय त्यामागचे 'आऊट ऑफ बॉक्स' थिंकिंगही :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 10:35 pm | स्वाती राजेश

छान लेख आहे...थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली.
हे खासच.

शुचि's picture

18 Apr 2013 - 7:00 am | शुचि

अफाट वेधक लेख.

खोक्यांचे आत्मकथन आवडले आणि पुष्पक मधला कमल हासन आठवला.

वेगळ्या कल्पनेवरचा लेख आवडला.