अन्नपुर्णा
आपल्या येथे भक्त व देव यांचे एक अतूट नाते आहे. देव आपला माय-बाप असतो, बंधु-भगिनी आणि सखा-शेजारीही असतो, आपल्यातलाच एक असतो. आता शेजारी म्हटले की आपण शेजारच्या घरांत चाललेले नवरा-बायको यांचे तंटे-बघेडे जेवढ्या चवीने ऐकतो व इतरांना रसभरीत भाषेत, थोडा पदरचा मसाला घालून, सांगतो, तेचढ्याच तन्मयतेने कवींनी देवांच्या घरी चाललेली भांडणे रंगविली आहेत. आता घरांत लक्ष्मीची चणचण असेल तर भांड्याला भांडे जास्त वेळेला लागणार व आवाजही मोठा होणार हे ओघानेच आले. एकदा काय झाले
आता शंकर हा "विश्वनाथ", विश्वाचा अधिपती, पण यांनी त्याच्या हातात दिले काय तर भिक्षापात्र ! " जा, चार घरांत जाऊन भिक्षा माग, मिळेल काय ते घरी आण, मगच जेवण !" बिचारा हिंडायचा खरा, पण रोज मिळेलच याची खात्री काय ? एक दिवस हात हलवत घरी आले व पार्वतीला म्हणाले " मला तर काय मिळाले नाही, आज तू जा व बघ काही सोय होते कां." घरांत काहीच नाही म्हटल्यावर चरफडत का होईना पार्वती बाहेर पडली, जगन्माता घरी आली म्हणून लोकांनी भरभरून दिले. पोटभरून खावयाला मिळाले म्हटल्यावर खुष होऊन शंकर म्हणाले, " देवी, तू खरी "अन्नपूर्णा" ". आता मात्र पार्वती भडकली. आधीच लोकांकडे जाऊन पदर पसरावा लागला म्हणून अपमान झाला असे वाटणाया प्रजापतीदुहितेला संताप आवरेना. ती जरा तडकलीच व रागाने, थोड्या तिरस्कारानेच म्हणाली
रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्ला
रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्लाङ्गलं
प्रेतेशान्महिषं तवास्ति वृषभ:फालं त्रिशुलं तव !
शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कंदोस्तिगोरक्षणे,
खिन्नाहं हर भिक्षया कुरू कृषिं गौरीवच: पातु व: !
( रामात्. ..परशुराम, मेदिनी ..पृथ्वी, धनपती ..कुबेर, बालाल्लाङ्गलं .. बलरामाकडून् नान्गर, प्रेतेश् .. यम
फालं ..नान्गराचा फाळ, गोरक्षणे .. गाय-रेडा राखावयाला, स्कन्द् ...कार्तिकस्वामी, पातु व: जगाचे कल्य़ाण करो.)
या जगताच्या मातापित्यांचे गीर्वाणभारतीतील संभाषण जरा मराठीत बघू.
गौरी म्हणते, " देवा, या भीक मांगण्याचा खरचं कंटाळा आला आहे. थोडी शेती कां करत नाही ?" आता बायकोने कुठलेही काम सांगितले की नवरा ते टाळण्याकरित सबबी शोधतोच. शंकर म्हणतो, " बाई, तू म्हणतेस ते ठीक माहे पण माझ्याकडे जमीन कुठे आहे ?" गौरी म्हणते " तो परशुराम, तुमचा शिष्य, तर सगळी पृथ्वीच वाटावयास निघाला आहे, मागवा त्याच्याकडून ".( क्षत्रिय संहारानंतर परशुरामाने सगळ्या पृथ्वीचे दान केले होते) "अग, पण बियाणे ? " शंकराचा प्रश्न. शेतकरी सावकाराकडून बियाणे उसने आणतो, ते लक्षात ठेऊन गौरी म्हणते " आणा कुबेरा (जगाचा सावकार)कडून " "आणि नांगराचे विचारू नका, बलरामाकडून मिळेल." पुढच्या प्रश्नाचे उत्तर आधीच. "पण माझ्याकडे तर एकच बैल आहे ". "मग ? यम देईल की त्याचा रेडा नांगरणीपुरता." आणि हां, फाळाचे विचारू नका, तो काय तेथे त्रिशुल पडलाय !"
शंकराला काळजी आपल्या न्याहरीची, गौरी म्हणते, " मी आणीन बांधून". आता प्रश्न न्याहरीच्या वेळी बैल-रेड्याकडे कोणी लक्ष द्यावयाचे. गौरी म्हणते, "तो रिकामटेकडा कार्तिकेय, त्याला काय उद्योग आहे, बघेल त्यांच्याकडे."
असा गौरी-शंकराचा॒ संवाद जगाचे कल्याण करो.
मित्रहो, " नवरा काय प्रश्न विचारणार व त्याचे उत्तर काय " हे बायकांना आधीच कसे माहित असते या तुम्हाला नेहमी सतावणार्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ? आदीमातेने ते बाळकडून आपल्या सगळ्या लेकींना जन्मजातच पाजलेले असते !
शरद
प्रतिक्रिया
27 Mar 2013 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, संवाद आवडला.
-दिलीप बिरुटे
27 Mar 2013 - 2:44 pm | नाना चेंगट
समस्त नवर्यांवर डाफरण्याची शिकवण देणार्या आदिमायेचा निषेध ! :)
27 Mar 2013 - 4:27 pm | सस्नेह
आणि समस्त नवर्यांना आळशीपणाची संथा देणार्या शिवशंभूंचे काय ?
27 Mar 2013 - 10:17 pm | नाना चेंगट
http://www.zpub.com/notes/idle.html
27 Mar 2013 - 3:00 pm | ऋषिकेश
ठ्ठो!ऽऽऽ
27 Mar 2013 - 3:53 pm | शुचि
वा अमीट गोडी असलेला लेख. खूप सुंदर.
27 Mar 2013 - 4:32 pm | अभ्या..
ब्येस्ट :)
27 Mar 2013 - 4:38 pm | धन्या
संवाद छानच आहे.
देवांना माणसानेच निर्मिले आणि मग माणसांचेच गुणावगुण त्यांना चिकटवले याचा हा पुरावा.
31 Mar 2013 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा
+१
बाकि वाचताना लै मज्जा आली...
27 Mar 2013 - 6:23 pm | सव्यसाची
छान संवाद आहे. आवडला :)
27 Mar 2013 - 6:35 pm | प्रचेतस
लै भारी.
मजा आली वाचून.
27 Mar 2013 - 6:44 pm | पैसा
मस्त संवाद आहे. देवांना मानवी गुण अवगुण लावून लिहिलेले असे खूप मजेचे संवाद आहेत. आणखी येऊ द्या.
28 Mar 2013 - 5:35 am | स्पंदना
एक फार मोठा बदल म्हणजे बदललेली भाषा. इतकी खेळीमेळीची इतकी छान की बस!
सर तुम्हाला ९८/१०० भाषेसाठी.
लेख आतिशय आवडला. देव झाला तरी काय झाल? जरा शरीराला कष्ट पडले तर काय बिघडल नाही का?
का सगळ्यांनीच राहुल गांधीचा मार्ग धरायचा नाही का?
31 Mar 2013 - 9:30 am | जेनी...
भारी वाटलं लेखन एकदम ...
शरद मस्तच ....
31 Mar 2013 - 10:53 am | श्रिया
मस्त आणि मजेदार.
31 Mar 2013 - 6:17 pm | प्रास
व्वा शरदकाका, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी गोष्ट एकदम मस्त सांगितलीत.
झक्कास!
1 Apr 2013 - 8:30 am | इन्दुसुता
शरद, लेख आवडला.
पण मी म्हणत्ये आदिमायेने सौम्य भाषा वापरलीन बरीक !! ( नाही म्हणजे काये की मला संस्कृत समजत नाही म्हणून तसं वाटलं ). तस्मात् आदिमायेचा मिपाप्रथेनुसार निषेढ ! :)