कोकणातील शिमगोत्सव

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
17 Mar 2013 - 10:58 am

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।

हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो.

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी,चाकरमानी घरी जातात ॰ मग थोडेसे झोपून/आंघोळ -देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्‍हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो .

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव ! मंडळी , गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

श्रिया's picture

17 Mar 2013 - 11:08 am | श्रिया

छान वर्णन केले आहे शिमगोत्सवाचे.

किसन शिंदे's picture

17 Mar 2013 - 12:02 pm | किसन शिंदे

प्रत्येक गावाची एक वेगळी परंपरा असते सण उत्सव साजरा करण्याची, कोकणातला शिमगोत्सवही त्यातलाच! आयुष्यात एकदातरी हा शिमगोत्सव पाहायची इच्छा आहे.

पैसा's picture

17 Mar 2013 - 12:06 pm | पैसा

यात खेळे नमन खेळे, दशावतारी खेळे, टिपर्‍यावाले खेळे, संकासूर वगैरे विसरलात का? मला तर तो

"आयनाच्या बायना,
घेतल्याबिगर जायना
या या घराचा पोकल वासा
दे गे माय ढबू पैसा
हूऽऽऽ"

म्हणणारा संकासूर आणि इतर सोंगे भयंकर आवडतात!

मंदार कात्रे's picture

17 Mar 2013 - 2:40 pm | मंदार कात्रे

सध्या गेली काही वर्षे संखासूरचे प्रस्थ जरा कमी आहे ... 10-15 वर्षापूर्वी हमखास असायचा संखासुर.........

अविनाशकुलकर्णी's picture

17 Mar 2013 - 3:28 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त लिहिले आहे मंदार भाऊ..

अनन्न्या's picture

17 Mar 2013 - 5:08 pm | अनन्न्या

ताड रत्नागिरीत नाही, तो सुरमाड असतो. बाकी माहिती छान!!

बॅटमॅन's picture

18 Mar 2013 - 3:00 am | बॅटमॅन

एक अवांतर शंका.

माडाचे किती प्रकार असतात? माड म्हंजे नारळाचे झाड, रैट्ट?

पैसा's picture

18 Mar 2013 - 11:22 pm | पैसा

http://www.flickr.com/photos/dinesh_valke/5493561161/ इथे नमुना बघ.

पाम कुळातलाच एक प्रकार. मात्र हा नारळ नव्हे. त्याला सुपार्‍यांसारखी घोसांनी फळे येतात. सुर (दारू) काढायचा माड.

बॅटमॅन's picture

19 Mar 2013 - 1:46 am | बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद. सुपारीचाच भौ दिस्तोय.

मंदार कात्रे's picture

18 Mar 2013 - 9:34 pm | मंदार कात्रे

तो ताड नाही ,सुरमाड असतो .

आशिष सुर्वे's picture

17 Mar 2013 - 10:33 pm | आशिष सुर्वे

यंदा हा चाकरमानी गावाला चालला आहे.. प्रकाशचित्रे इथे डकवण्याचा प्रयत्न नक्की करेन..

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 10:37 pm | पिशी अबोली

राजापुरात माझ्या मामाच्या घरी 'कावड' म्हणून प्रकार असतो.. पालखीसोबत तीही नाचवायची असते..
मस्तच पण..आठवण आली शिमग्याची.. :)

५० फक्त's picture

18 Mar 2013 - 8:17 am | ५० फक्त

मस्त, एकदाच अनुभवली आहे श्रीवर्धनची.

नन्दादीप's picture

19 Mar 2013 - 9:08 pm | नन्दादीप

ताड, आंबा, काटे शेवर ही झाडे होळी म्हणून वापरतात. होळीच्या बोंबा हा पण एक मस्त प्रकार असतो इकडे...
उदा....
हुरा रे हुरा, नि आमच्या ****(देवाचे नाव) ला सोन्याचा तुरा रे....... होलियोssssssssss (कोरस मध्ये)
अटकी रे अटकी, नि ***** वर आली रे पटकी (फटकी)..रे....... होलियोssssssssss (कोरस मध्ये)

मंदार कात्रे's picture

11 Mar 2014 - 10:49 pm | मंदार कात्रे

यंदा शिमगा /होळी १६ मार्च ला आहे !

मंदार कात्रे's picture

11 Mar 2014 - 10:51 pm | मंदार कात्रे

शिमगा म्हणजे होळी सणाच्या अगोदर १० दिवस छोट्या शेवरीच्या होळ्या जाळण्याची प्रथा आहे . फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाक-पंचमी पासून चतुर्दशी पर्यंत रोज वाडीतील मुले संध्याकाळी होळी उभी करतात ,मग रात्री ११ च्या दरम्याने गवत /लाकडे चोरून आणायची आणि रात्री १ च्या दरम्याने होळी जाळायची ,असा हा कार्यक्रम असतो … यावेळी "डीन्गा पाणी " नावाचा खेळ रात्रीच्या चांदण्यात खेळला जातो, तसेच कोणाची उन्हाळी शेती असेल तर तिथून काकड्या/ कलिंगड आणि आंबे/काजू फणस चोरून आणले जातात आणि ते खाउन मग होळी जाळतात

आमच्या गावच गार्‍हाण ....

व्हssssssय म्हाराजा !

जय देवा धोपेश्वरा, लक्ष्मीनारायणा, महापुरुषा, बारा गावच्या, बारा वाडीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा,
व्हय म्हाराजा .....
मी जे काय कार्य योजलेलो असा, जो काय खेळ मांडलेलो असा म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तो नीटपणे तडीस जाऊ दे रे म्हाराजा .....
व्हय म्हाराजा ......
जर काय कोणी वाईट मनाने चालगत, चेटूक बिटूक, करणी बिरणी केली असेल म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तर त्याचे दात त्याच्या घशात घाल रे म्हाराजा
व्हय म्हाराजा ......
वडाची साल पिंपळाक कर, पिंपळाची साल वडाक कर, ह्ये बारा पाचाचा गणित येक कर रे म्हाराजा
व्हssssssssय म्हाराजा
आणि माझे जे कोण मित्र, मैत्रिणी, हितचिंतक या फेसबुकावर असतील, त्या सर्वांका सुखी ठ्येव रे म्हाराजा
व्हsssssssssssssssय म्हाराजा !!!!!!!!

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2014 - 1:10 pm | अत्रन्गि पाउस

इतकी डायरेक्ट मागणी करणारी प्रार्थना पहिली नाही +)) ...आवडेश ..

पण ती

" वडाची साल पिंपळाक कर, पिंपळाची साल वडाक कर, ह्ये बारा पाचाचा गणित येक कर रे म्हाराजा"

जरा समजावून घ्यायची आहे

त्रिवेणी's picture

12 Mar 2014 - 10:35 am | त्रिवेणी

मस्त माहिती,
आता शिमगोत्सवाचे फोटोही येऊ द्या.

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2014 - 1:05 pm | अत्रन्गि पाउस

नुसते ऐकून आहे ह्या विषयी, आज नीट वाचले...पण एकदा अनुभवायचा आहे ..
कोकणातल्या एखाद्या पर्यटन स्थळी हे अनुभवता येईल का? नसल्यास कसे ?

....

मंदार कात्रे's picture

5 Mar 2015 - 10:43 am | मंदार कात्रे

यंदाच्या शिमगोत्सवासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण अन शुभेच्छा !

मंदार कात्रे's picture

5 Mar 2015 - 10:44 am | मंदार कात्रे