फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो. ज्या शाळा कॉलेजच्या मित्रांना फ्रेंडलिस्टमध्ये जमा केले होते ते औपचारिकता म्हणून एखाद दुसरा स्क्रॅप करून पुढे बोलायचे नावच घेत नव्हते. ऑर्कुट समूह नावाचा प्रकारही माहीत नव्हता. दोनचार फोटो अपलोड केले, चारचौघांचे अपडेट्स चेक केले, पण आता पुढे या ऑर्कुटवर करायचे काय हा एक यक्षप्रश्न..! आणि ऑर्कुट नाही वापरायचे तर नेटचे बिल कसे वसूल करायचे हा होता दुसरा प्रश्न..!! या दोघांवर तोडगा म्हणून मग नेट फ्रेंडस जमवायला सुरुवात केली आणि अंदाजापेक्षा भरभर जमतही गेले. काय कसे जमवायचे याचीही काही खास स्ट्रॅटेजी नव्हती, मात्र या आभासी जगात ज्यांच्याशी माझी मोडकीतोडकी का होईना ओळख व्हायची त्यांच्याशी चॅटवर माझ्या खर्या मित्रांपेक्षाही जास्त बोलणे व्हायचे. काही दिवसांतच मी एक गोष्ट समजून चुकलो की भिन्नलिंगी आकर्षणाचा फंडा इथेही आपले काम करतो. मुलामुलांची किंवा मुलीमुलींची मैत्री होण्यापेक्षा मुलांची मुलींशी अन मुलींची मुलांशी इथे जास्त जमते. तसेही प्रत्यक्ष आयुष्यात पोरींशी खुलून बोलायला मी लाजायचोच, म्हणून मग इथे येऊन ऑर्कुट मैत्रीणी जमवायला सुरुवात केली. अनोळखी मुलींना त्यांचे प्रोफाइल्स (अर्थात फोटोच) बघून रॅंडम फ्रेंड रीक्वेस्ट पाठवायचो. खोर्याने पाठवलेल्या रीक्वेस्टपैकी बर्याचश्या रीजेक्टच व्हायच्या पण कधीतरी एखादी अॅक्सेप्ट झाली की आनंदाला पारावार नाही उरायचा. त्या मुलीला लगेच वेलकम केले जायचे आणि तिचा रीप्लाय येऊन ती आपल्या मैत्रीखात्यात जमा झाली की त्या महिन्याचे नेटचे बिल वसूल झाल्यासारखे वाटायचे.
झाले.... वैतागलात हे पारायण वाचून... चला थेट मुद्द्यालाच येतो...!
अश्यातच एका महिन्यात बोनस लॉटरी लागल्यासारखेच वाटले जेव्हा हेतल शाहने (मुलीचे नाव बदलले आहे, पण होती ती गुज्जूच) माझी रीक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. माझ्या स्क्रॅप्सनाही तुरंत रीप्लाय आले, एवढेच नव्हे तर दुसर्याच दिवशी प्रॉपर चॅट ही सुरू झाली. ओळख-पाळख, आवडीनिवडी सारख्या फॉर्मॆलिटी भराभर उरकत आमची गाडी कधी मुक्त फ्लर्टींगवर घसरली माझे मलाच समजले नाही. कारण समोरून देखील पावले दणादण पडत होती. आठवड्याभरातच फोन नंबर एक्सचेंज झाले. तसे त्या आधीही मी ऑर्कुटवरून चार-पाच मुलींचे फोन नंबर मिळवले होते, (कधी फोनवर बोलायची हिंमत झाली नव्हती ती गोष्ट वेगळी) पण त्यामुळे या गोष्टीचे एवढे अप्रूप वाटले नाही. तरीही आठवड्याभरातच ही कामगिरी बजावल्याने या "केस"बाबत आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. (खरे तर आधी मी "केस" च्या जागी "शिकार" हा शब्द वापरायचो पण पुढे दोन-तीन ठिकाणी माझीच शिकार झाली असल्याने तेव्हापासून मी हा शब्द वापरणे सोडून दिले. असो, त्याबद्दल पुन्हा कधीतरी..)
तर, आमची ओळख झाल्यापासून दहा-बारा दिवसांनंतरचीच गोष्ट. एके दिवशी चॅटवर बोलताना तिने दुसर्या दिवशी मी बहीणींबरोबर सिनेमाला जातेय असे सांगितले. मी तिला सिनेमाचे नाव विचारले आणि सहजच म्हणालो, "क्या बात है, मलाही बघायचा आहे हा सिनेमा. मलाही ने की मग बरोबर...." खरे तर तो कोणता सिनेमा होता हे आता आठवतही नाही. कारण तो कुठे खरेच माझ्या आवडीचा होता, पण चॅट ही अशीच केली जाते. आपल्या आवडीनिवडी जुळतात हे सांगायचा एकही मौका इथे सोडला जात नाही.
(इथे आणखी एक गोष्ट वेळीच नमूद करतो - मुलगी गुजराती असूनही अगदी अस्सखलित नसली तरी एकदम फाकडू मराठी बोलायची. आमची सारी चॅट मराठीतच चालायची. त्यामुळे मी सुद्धा मातृभाषेत चॅट करत असल्याने बेफाम सुटायचो आणि मुलींना ईंम्प्रेस करायचे माझे सारे पैतरे आजमावू शकायचो.)
असो,
तर ती म्हणाली, "अरे बरोबर सिस्टर आहेत ना, त्यांच्याबरोबर नाही नेऊ शकत रे. समजा करो यार. त्यापेक्षा आपण रविवारी भेटूया ना. बोल, क्या बोलता है." .........अन मी खल्लास.
मला ती सिनेमाला नाही बोलणार याची खात्री होतीच, नव्हे या व्यतीरीक्त तिने काही बोलावे अशी अपेक्षाही नव्हती... पण चक्क रविवारी भेटूया असे म्हणेल हे कल्पनेच्या बाहेर काय अगदी आरपार पल्याड होते. गोड धक्का होता तो एक. धक्क्याच्या पलीकडेही एक शॉक होता तो ज्यातून पुढची पंधरा मिनिटे मी स्टेप बाय स्टेप सावरतच होतो. कारण हे ती केवळ मला टाळण्यासाठी किंवा औपचारीकता म्हणून म्हणाली नव्हती. पुढच्या पंधरा-वीस मिनिटांच्या चॅटींगमध्ये आमचा येत्या रविवार भेटीचा प्रोग्राम नुसता फिक्सच नव्हता झाला, तर काय कुठे अन कसे याची सारी रुपरेषाही ठरली होती.
तर मित्रांनो,
येत्या रविवारी ती..., माझी गुज्जू ऑर्कुट फ्रेंड..., मिस हेतल शाह..., मला ठीक संध्याकाळी साडेपाच वाजता..., वडाळा-माटुंगा जवळच्या..., फाईव्ह गार्डनला..., भेटणार्रच होती..!
फाईव्ह गार्डन म्हणजे माझी डिप्लोमाची चार अन डीग्रीची तीन वर्षे ज्या वी.जे.टी.आय. मध्ये गेली त्याच कॉलेजला लागून असलेला परीसर. कॉलेज बंक करून किंवा सुटल्यावर संध्याकाळी किंवा स्टडीनाईट मारायला म्हणून हॉस्टेलला जायचो तेव्हा अभ्यास करून वैताग आला की आमची जी काही फिरण्याची ठिकाणे वा अड्डे होते त्यातील सर्वात वरच्या नंबरवर हे फाईव्ह गार्डन. रात्रीचे जेवण जिरवण्यासाठी म्हणून याला दोन चकरा मारणे हा आमचा नेहमीचा शिरस्ता कारण याचवेळी आजूबाजुच्या काही अप्सराही इथे याच कारणासाठी अवतारायच्या. त्यामुळे या परिसराचा चप्पा चप्पा मला ठाऊक होता. याचा फायदा असा की निदान जागा तरी माझ्या सवयीची असणार होती.
तिथून पहिला आम्ही एका हॉटेलमध्ये जाणार होतो, जे जवळच होते, पण कॉलेजच्या दिवसांत महागडे वाटत असल्याने फारसे जाणे व्हायचे नाही. तिथे अर्थातच खाणेपिणे होणार होते आणि ते उरकल्यानंतर पुढे आपण काय करणार असे मी भोळेपणाचा आव आणत चॅटवर विचारताच ती म्हणाली, "अरे फाईव्ह गार्डन पडा है ना इतना.. वही घूमेंगे, फिरेंगे... बाकडे पे बैठेंगे... बाते करेंगे... और क्या...!"
बस्स.....! ती, मी अन फाइव्ह गार्डन परीसरातील सुनसान अंधेर्या गल्ल्या क्षणभरासाठी डोळ्यासमोर तरळून गेल्या..! अन त्या "और क्या" च्या जागी "और बहुत कुछ" दिसायला लागले..!!
माझ्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. ऑफिसमध्ये मित्रांना सांगून झाले होते.. काय काय मी करू शकतो आणि त्यातले काय काय खरेच मला करता येईल याच्या रोजच्या रोज चर्चा झडत होत्या.. तिला भेटल्यावर काय गिफ्ट देता येईल याच्या याद्या बनत होत्या.. भेटीच्या दिवशी घालायचे कपडे वेळीच धुवायला टाकले होते.. दर दीड दिवसांनी उगाचच्या उगाच दाढी करून क्लीन शेव राहण्याची सवय करत होतो.. तिचा एक फोटोही तिच्या ऑर्कुट अल्बममधून डाऊनलोड करून मोबाईलवर घेतला होता. जो अधूनमधून बघत राहायचो जेणे करून तिला भेटल्यावर एका जुन्या ओळखीच्याच व्यक्तीला भेटत आहे असे वाटून कम्फर्टेबल फील करेन..... अजूनही काय काय केले त्या धुंदकीत आठवत नाही पण जवळपास हवेतच तरंगत होतो काही दिवस.. पहिल्यांदाच जे मी अश्या ऑर्कुटच्या माध्यमातून एका मुलीला भेटायला जाणार होतो..!
भेटीचा रविवार उजाडला. भेट संध्याकाळची असली तरी सकाळीच बिछान्यात उठून बसलो. इतक्यात आठवले की पुरेशी झोप नाही झाली तर चेहरा फ्रेश नाही दिसणार म्हणून पुन्हा चादरीत घुसलो. मग मात्र सुर्य डोक्यावर आल्यावरच उठलो. आंघोळपाणी नाश्ता जेवण एकेक करत सारे उरकून घेतले. अधूनमधून टेबलवर उघडूनच ठेवलेल्या कॉम्प्युटरवर नजर टाकत होतो.. पण ती ऑनलाईन दिसत नव्हती.. भेटायचा टाईम संध्याकाळी सहाचा होता.. घरच्या घड्याळात पाच वाजत आले पण तरीही ती ना ऑनलाईन येत होती ना तिचा फोन येत होता....
..........आणि अचानक सव्वा-पाचच्या ठोक्याला रींगच वाजली आणि मोबाईलच्या स्क्रीनवर तिचे नावच बघून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला..!!
फोन उचलता समोरून तिचा चिडलेला स्वर, "सो गये थे क्या? फोन क्यू नही लग रहा था?? कबसे ट्राय कर रही हू..."
मला समजले नाही, खरेच तिचा फोन लागत नव्हता की आणखी काही... म्हणजे... विचार वगैरे तर बदलला नव्हता तिचा...
पण नाही मित्रांनो... तसे काही नव्हते...
"चल ये आता लवकर ठरलेल्या ठिकाणी...." असे ती म्हणाली आणि मी फोन उराशी कवटाळून थेट कपाटातच शिरलो..!
तेव्हाची माझी फेवरेट कडक ब्लॅक जीन्स आणि नवीनच घेतलेले ब्ल्यू रंगाचे डेनिमचे शर्ट, त्याला शोभेलसे सिल्वर डायलचे घड्याळ एका हातात अन चांदीचा कडा दुसर्यात, बारीकशी सोनसाखळी गळ्यात अन वूडलॅडचे शूज पायात. उन्हे उतरली असल्याने आता उगाच शायनिंग मारायला घेतल्यासारखे वाटू नये म्हणून गॉगल तेवढा अनिच्छेने घेतला नाही, मात्र अंगभर परफ्यूम फुसफुसवायला विसरलो नाही.
एकंदरीत, पेहराव एका मुलीला प्रथमच भेटायला जातोय, जिला आता इम्प्रेस होण्यावाचून पर्याय नाही अगदी अस्साच..!!
वडाळा स्टेशनवर ट्रेनने उतरण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. कॉलेजची कित्येक वर्षे तीच ट्रेन, तेच प्लॅटफॉर्म आणि तोच येण्याजाण्याचा रस्ता. पण आज मात्र त्याच्या दोन्ही बाजूंनी फुलांचे ताटवे उगवल्यासारखे वाटत होते आणि मी भर फूटपाथवरून आमीरखान सारखे पहला नशा करत चाललोय असे स्वतालाच वाटत होते. मध्येच आठवण झाली, अरे चॉकलेट घ्यायचे राहिलेच की...
रविवारचा दिवस, एखादे चॉकलेटचे दुकान उघडे सापडेल तर शप्पथ. नशीबाने एका छोट्याश्या पानाच्या गादीवर नजर पडली जिथे छोट्यामोठ्या कॅडबर्या लटकवलेल्या दिसल्या. मोठ्या दिमाखात त्या पानवाल्यासमोर उभा राहून ठाकलो आणि चुटकी वाजवतच त्याला ऑर्डर केली, "जो भी सबसे मेहंगावाला चॉकलेट होगा, एक दे देना..."
त्याने कुठून आत हात घालून एक चॉकलेटचा सजवलेला रंगीबेरंगी पुडका काढला देव जाणे. स्वताला बिडीकाडीचा शौक नसल्याने त्या पानवाल्याची पोहोच कुठवर आहे याची मला कल्पना नव्हती, मात्र आता स्वताच्या शब्दाची किंमत राखायला मला तो रंगीबेरंगी पुडा तब्बल २३५ रुपये खर्चून स्विकारावा लागला. आयुष्यात कधी गर्लफ्रेंड असतीच तर तिला वॅलेंटाईन डे’ला गिफ्ट द्यायलाही मी एवढा खर्चा केला नसता जो मी आंतरजालावर सापडलेल्या मैत्रीणीच्या पहिल्या भेटीवर करत होतो. पण हौसेला मोल नसते आणि मलाच हौस होती असे एखाद्या ऑर्कुट फ्रेंडला भेटायची. अर्थात, ही तर फक्त सुरुवात होती, अजून खिश्याला बरीच फोडणी बसायची बाकी होती.
चालता चालता तिला फोन लाऊन बोलता बोलता मी इच्छित स्थळी पोहोचलो. ती तिथे आधीच माझी वाट पाहत उभी होती. अत्यंत साधीसुधी वेशभुषा. जीन्स अन शॉर्ट टॉप घातलेली मात्र जराही नट्टापट्टा नाही किंवा नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसावे यासाठी विशेष मेहनत घेतल्यासारखे जाणवत नव्हते. माझ्या अगदी उलट. तरीही तिचा वावर सराईत अन माझा मात्र किंचित गळपटलेला. तिनेच हात पुढे करून माझ्याशी हस्तालोंदन केले तसे मी काहीतरी बोलायचे म्हणून ठरवूनच आलेले वाक्य पुटपुटलो, "खूप छान दिसत आहेस.."
"ए बस, अभी यहा पे भी मराठी नही हा." तिची पहिलीच प्रतिक्रिया अनपेक्षित.
तिला हिंदी अपेक्षित असावी, मात्र मराठी नाही हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर पहिला इंग्लिश आली आणि आता सारी भेटच बोंबलणार असे वाटू लागले.
"क्या हुआ? गुजराती मे बात करनेको नही बोल रही हू, हिंदी नही आती क्या?"
हिंदीचे नाव काढताच जरासे हायसे वाटले खरे, मात्र लहानपणापासून कितीही रोमॅंटीक हिंदी सिनेमे बघितले असले तरीही जेव्हा एका मुलीशी हिंदीत बोलायची वेळ येते तेव्हा एका मराठी मुलाची कशी तंतरते याचा अनुभव मला पुढच्या काही क्षणातच आला. सुदैवाने माझ्या हालत पे तरस खाऊन तिनेच स्वत: पुन्हा अधूनमधून मराठी सुरू केले अन्यथा आज यापुढे लिहिण्यासारखे माझ्याकडे काहीच नसते. अगदीच एकतर्फी सामना झाला असता.
...............................पण तसाही तो होणारच होता म्हणा.
कधी तिच्या पुढेपुढे, तर कधी तिच्या मागेमागे, तिच्यासाठी हॉटेलचा दरवाजा ढकलणे, तर लेडीज फर्स्ट करत खुर्चीवर तिला पहिले बसू देणे. याप्रकारचे सारे शिष्टाचार कसेबसे काटेकोरपणे पाळत मी तिच्या जोडीने हॉटेलच्या एका कमी गजबजलेल्या कोपर्यात स्थिरावलो. वेटरेने मेनूकार्ड आणून दिले तेव्हा मी त्याच्या हातून घेऊन ते तिलाच देणार होतो (अर्थात हा ही एक शिष्टाचार मी रटूनच आलो होतो) मात्र तिनेच थेट झडप घातल्यासारखे ते खेचून घेतले अन तिची नजर झरझर करत मेनूवर फिरू लागली. कधी डावीकडचे जिन्नस तर कधी उजवीकडच्या किंमती चाळू लागली. ते पाहून मी सुखावलो. या विचाराने की एखादी लग्नाची बायकोच अशी नवर्याच्या खिशाची काळजी घेऊ शकते. पण हा माझा भ्रम होता हे मला लवकरच समजणार होते. तिच्या डोक्यात नेमका उलटा हिशोब चालू होता की आता याला जास्तीत जास्त कसे कापायचे. मध्येच तिने मेनूकार्डमध्ये खुपसलेले डोके वर काढले, माझ्याकडे बघून एकदा गोडूस हसली आणि पुन्हा आत खुपसले.
"स्पेशल चीज पनीर पावभाजी हंड्रेड रुपीज, स्पेशल कॉर्न-चिल्ली-मशरूम पिझ्झा वन फोर्टी रुपीज, अॅंड वन वर्जिन पिनाकोलाडा मॉकटेल हंड्रेड एंड टेन रुपीज... टोटल थ्री हंड्रेड अॅण्ड फिफ्टी ओनली... इतने पैसे है ना, वैसे कार्ड भी चलता है यहा पे." आत खुपसलेल्या तोंडातून आवाज आला.
तिच्या या व्यावहारीकपणाचे कौतुकच वाटले मला. चार दिवसांपूर्वी झालेली आमची चॅट आठवली ज्यात तिने माझा पगार किती हे विचारला होता आणि मी माझे अॅन्युअल पॅकेज (वार्षिक उत्पन्न) सांगताच दर महिन्याला ईंकम टॅक्स आणि प्रॉविडंट फंड कापून हातात किती पडत असतील याचा तिने चटदिशी हिशोब लावला होता. मात्र तो पगार तिने का विचारला होता ते मला आता समजत होते.
"कार्ड तो है ही, लेकीन पार्सल नही लेके जाओगी तो उतनी कॅश भी है मेरे पास.." काहीतरी पाणचट विनोद मारायचे म्हणून मी बोललो खरे, पण नंतर असे बोलायला नको होते असे वाटून पटकन जीभ चाऊन घेतली. तिला चिडवतोय असे वाटल्याने नाही तर उगाच पार्सलची आयडीया तिच्या डोक्यात भरायची चूक केली म्हणून..
तिला मात्र याचे काहीच पडले नव्हते. तिचे यापेक्षा अजून काही महागडे कॉम्बिनेशन बनवता येईल का याचेच गणित चालू होते. ते सुचण्याआधी मी पटकन वेटरला बोलाऊन तिच्या लिस्टमध्ये माझ्यासाठी एक टोस्ट सॅंडवीच अॅड करून ऑर्डर दिली. तसे तिनेही मोठ्या जड अंतकरणाने ते मेनूकार्ड बाजूला ठेवले.
"सर, मिनरल वॉटर चाहिये या साधा वॉटर?" वेटरच्या या प्रश्नाने मी चपापलोच.
हल्ली मिनरल वॉटर पिण्याची फॅशन वगैरे आली आहे हे सारे ठिक, पण म्हणून ज्या पाण्यावर आपण आजवर वाढलो त्याला लगेच साधा वॉटर बोलायची काय गरज. मुंबईसारख्या शहरात एवढ्या मोठ्या हॉटेलमध्येही शुद्ध पाणी मिळत नसेल तर हा बृहनमुंबई महानगरपालिकेचा अपमान नाही का झाला. पण तुर्तास हा अपमान गिळण्याव्यतिरीक्त माझ्याकडे पर्याय नव्हता. आता तिच्यासमोर कसे त्या वेटरला ‘हमको साधा वॉटरहीच मंगता है’ बोलणार. लाज राखायला म्हणून मग मी,
"हा हा बिनधास्त.. मिनरल क्या डबली मिनरल वॉटर ला.." पुन्हा असेच काहीतरी बरळलो. ज्याचा फटका मला ३० रुपयाला पडला जेव्हा तो दोन बाटल्या पाणी घेऊन आला.
आता ऑर्डर येईपर्यंत वेळ होता. एकदा आली की ही त्यावर अशी तुटून पडणार की माझ्याकडे जराही लक्ष देणार नाही हे मी तिच्या तोंडाला सुटलेल्या पाण्याकडे बघून समजून चुकलो होतो. ती मेकअप न करता, लिपस्टीक न लावता का आली होती या एकेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होत होता. तरी मी घातलेले नवीन कोरे शर्ट तिच्या नजरेस पडावे म्हणून मुद्दाम तिच्या समोर हात नाचवत त्याचे बटण उगाचच्या उगाच काढून लावल्यासारखे केले.
"नया शर्ट?" लक्ष गेलेच तिचे.
"हा.. नही... म्हणजे हा.. तसा नवीन पण तसा जुना पण नाही .. " मी नक्की काय उत्तर द्यावे या गोंधळात. नवीन बोलावे तर आपल्याला भेटायला खास नवीन शर्ट घालून आला असे मला तिला वाटू द्यायचे नव्हते आणि मुद्दाम जुने बोलावे तर मला भेटायला जुनेच शर्ट घालून आला असेही तिला जाणवू द्यायचे नव्हते.
"ओके ओके, जो भी है, अच्छा है. जच रहा है तुमको. पर पता नही सब लडके डेट पे ब्लू शर्ट ही पहन के क्यू आते है..."
डेट पे... अईई ग्ग... पुनश्च काळजात धस्स... म्हणजे मी हिच्याबरोबर, म्हणजे आता आम्ही जे हॉटेलात खायला बसलो होतो ते, म्हणजे ही डेट होती तर.... मन पुन्हा एकदा फाईव्ह गार्डनच्या अंधेर्या गल्ल्यांमध्ये फिरून आले.. त्यातील "सब लडके" हा शब्द सोयीस्कररीत्या दुर्लक्षून.
इतक्यात ऑर्डर आली आणि ती खाण्यामध्ये तर मी खयालोमे गुंग झालो.
"मुझे बच्चे बहोत पसंद है.. आय लव किडस.." बाजुच्या टेबलवर गोंधळ घालणार्या लहानग्यांकडे बघत तिला ईम्प्रेस करायच्या हेतूने काहीतरी विषय काढायचा म्हणून मी बोललो.
"दुसरोके है ना इस लिये.. खुद के होंगे ना, तो पता चलेगा.." तिने मला उडवूनच लावले. हि बाई माझी सारी गणिते चुकवत होती. चॅटवरून मी हिच्याबद्दल जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा सारे वेगळेच घडत होते.
"तो तुम को क्या पसंद है?" मी विषय पुढे रेटला.
"डार्क चॉकलेट चिप्स विथ वॅनिला आईसक्रीम.... एटी रुपीज प्लस टेन रुपीज वॅफल कोन.." पुन्हा एकदा माझे गणित चुकले होते. उगाच नको तो विषय काढून फसलो होतो.
मिनिटभराची शांतता..........
"मंगाऊ" .... "मंगाओ" ... आमच्या दोघांच्याही तोंडून एकत्रच बाहेर पडलेले समानार्थी विरुद्द शब्द.
ती याचसाठी आली होती आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आतापावेतो एक गोष्ट समजून चुकलो होतो ती म्हणजे मराठी मुलाला गुजराती मुलीबरोबर "डेट" वर जायचे असल्यास आपली मध्यमवर्गीय वृत्ती घरीच ठेऊन यायला हवी.
तिचे खाणेपिणे एकदाचे आटोपले तसे मला अर्धवट पोटी असूनही जरा तरतरी आली. अजून काही ऑर्डर व्हायच्या आधी मी बडीशेप तिच्या तोंडी कोंबून तिला हॉटेलच्या बाहेर काढले. एव्हाना बाहेर छानसा अंधार पडला होता. जमेची बाजू ही की चांदणे देखील नव्हते. फाईव्ह गार्डनच्या दिशेने जाणार्या त्या अंधार्या गल्ल्या आणखी काळ्याकुट्ट भासत होत्या. यापेक्षा रोमॅंटीक वातावरण ते काय.. मी माझी पावले नकळत अशी जाणूनबुझून त्या दिशेने वळवली. आमचे चॅटवर ठरल्याप्रमाणे ती देखील पाठोपाठ येणारच होती.... मात्र तेवढ्यातच माशी शिंकली.. आय मीन कुत्री भुंकली... आणि आमचा अबाऊट टर्न..!
पण मी इतक्यात हार मानणारा नव्हतो. एकदा मूड तयार झाल्यावर आता पीछे मूड.. छ्या शक्यच नाही. माझ्याच कॉलेजचा परीसर होता तो. तेथील कुत्रे भले मला विसरले असतील, पण रस्ते माझ्या ओळखीचे होते. दुसर्या रस्त्याने आम्ही फाईव्ह गार्डन गाठले. पंचउद्यानाच्या मध्यभागी आम्ही दोघे. पांच ही उद्याने आम्हाला हाका मारून मारून बोलवत आहेत असा भास मला होऊ लागला. कोठे अंधार जास्त आहे तर कोठे माणसे कमी आहेत, तर एकीकडचा बाकच जेमेतम दोघे बसतील एवढा छोटा आहे. मी कुठे जावे आणि कुठे नको या गोंधळात असताना तीच म्हणाली, "यहा पे नही, मामा उठा लेंगे"
"मामा? किसके मामा?"
"तेरे मामा, मेरे मामा, हम सबके मामा.. मुझे नही चाहिये ये सब ड्रामा.."
मी काय ते समजलो. पोरगी फारच पोहोचलेली होती. मी आता या परिस्थितीत नक्की उतावीळ व्हावे की घाबरावे हे न समजल्याने गोंधळून कसेबसे उसने अवसान आणून तिला विचारले, "फिर....., अब कहा?"
"वहा......" मानेला हलकासा झटका देत, पापण्यांची अलगद फडफड करत तिने मला दिशा दाखवली. त्याच वेळी तिने खालचा ओठ ही दातांमध्ये चावल्याचा मला भास झाला खरे, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत तिने दाखवलेल्या दिशेला नजर टाकली तर पुन्हा एक अंधेरी गल्ली.. आणि मन पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा..
प्रकाशातून काळोखाकडे प्रवास करताना फक्त एकच अपेक्षा मनात होती ते आता परत इथे ही कुत्रे निघू नयेत. आली तर एखादी घूसच यावी जिला घाबरून हिने टुनकून उडी मारावी आणि...... पण घूस काही यायची नव्हती. आम्हीच हळूहळू गल्लीत घुसत होतो. काहीही न बोलता. माझी घूसमट वाढू लागली तसे मीच तिला म्हणालो, "और कितना अंदर घसीटोगी? वो भी इतने अंधेरेमे, मेरा पैर घसर गया तो?" काही तरी "घ" ला "स" जोडून बोलायचे म्हणून बोललो. तसे ती म्हणाली, "अरे रस्ते पे पाणी थोडी ना है, नही घसरेगा पाव." .... माझे तिच्याबद्दलचे मत पुन्हा बदलले. मुलगी तेवढीही पोहोचलेली नव्हती.
अखेर एका टुमदार घराशी थांबलो. दारात मिणमिणता दिवा. अंगणाचे बंद फाटक ज्याला रेलून ती उभी राहिली. माझ्या डोक्यात आम्ही कुठेतरी बाकड्यावर बसून बोलणार असे होते, या पोजिशनचा मी विचारच करून आलो नव्हतो. आता कसे उभे राहायचे याच विचारात मी दोनचार वेडेवाकडे अंगविक्षेप दिले. तसे ती म्हणाली, "अरे ऐसे मत करो, वरना मम्मी देख लेगी."
"मम्मी?" मी किंचाळलोच, "इकडे कुठे मम्मी? अग डेटला आलोय ना आपण"
"अरे ऐसे मत चिल्लाओ, बंटी जाग जायेगा"
"आता हा बंटी कोण? जागतोय तर जागू दे", हा बंटी नक्कीच तिचा भाऊ असणार, कारण ज्या घरासमोर आम्ही उभे राहिलो होतो ते तिचेच होते हे एव्हाना मला उमजले होते.
बंटी मात्र त्याचे नाव ऐकताच जागा झाला. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज त्या भयाण शांततेचा भंग करत माझ्या कानात शिरला तेव्हा या अंधार्या गल्लीत शिरताना या मुलीला कुत्र्यांची भिती का नाही वाटली याचा उलगडा मला झाला. कारण हा तिच्या बंटीचा इलाका होता.
गुजराती कुत्र्याला कसे चुचकारतात याची मला काहीच कल्पना नव्हती. ‘केम छे’ अन ‘सारू छे’ हे माझ्या शब्दकोषातील दोन शब्द तरी नक्कीच पुरेसे नव्हते. उलट "छे" च्या जागी त्याने "छू" ऐकले तर आणखीनच मागे पडण्याची शक्यता होती. हळूहळू गुरगुर-ए-बंटी वाढू लागली तशी डोक्यात धोक्याची घंटी वाजू लागली. गुर्रगुर्र गुर्रगुर्र ठणठण ठणठण........ ठणठण ठणठण गुर्रगुर्र गुर्रगुर्र..... धूम ठोकण्याआधी मी शेवटची नजर मागे टाकली ते फाटकाला ओलांडून बाहेर यायच्या प्रयत्नात असलेल्या बंटीचे दोन भलेमोठे पाय नजरेस पडले. त्यानंतर अध्येमध्ये थांबण्याचा प्रश्नच नव्हता.
ज्या पानवाल्याकडून चॉकलेटचे पुडके घेतले होते त्याच्यासमोरच मी धापा टाकत उभा होतो. या नादात खिशात ते पुडके तसेच राहिले होते. निम्म्या किंमतीत तो ते परत घेतो का म्हणून विचारायचे होते. पण धावण्याच्या नादात त्याचा पार चेंदामेंदा झाला असल्याने आता तो प्रश्नच उदभवत नव्हता. मी निराश हताश असा आता यापुढे या प्रकारचा गेम कधीच खेळायचा नाही असा कानाला खडा लाऊन तिथून निघालो. पाठीमागून पानवाल्याने रेडीओवर लावलेल्या गाण्याचे सूर कानावर पडत होते.... जिस गली मे तेरा घर जो हो बालमा... उस गली से मुझे तो गुजरना नही...
- तुमचा अभिषेक
प्रतिक्रिया
19 Feb 2013 - 1:31 pm | पैसा
=))
19 Feb 2013 - 1:36 pm | मन१
पुन्हा वाचलं. पुन्हा आवडलं.
19 Feb 2013 - 7:53 pm | तुमचा अभिषेक
पुन्हा वाचले ही कॉम्प्लीमेंट माझ्या खास आवडीची म्हणून तुम्हाला खास धन्यवाद मनोबा. :)
19 Feb 2013 - 1:50 pm | मृत्युन्जय
:)
अपनी गली मे ले जाकर मारा यार उसने तो तुझे :)
19 Feb 2013 - 1:52 pm | गवि
धमाल.. भारी स्टाईल आहे सांगण्याची.. लगे रहो.. :)
19 Feb 2013 - 1:55 pm | बॅटमॅन
ही ही ही. मस्त ष्टाईल सांगण्याची. आवडेश!!!
19 Feb 2013 - 2:24 pm | संजय क्षीरसागर
अत्यंत उत्तम निवेदनशैली
लिहीत राहा.
19 Feb 2013 - 5:02 pm | वेताळ
मस्त पोपट झाला...मग पुढे काय?
19 Feb 2013 - 7:58 pm | तुमचा अभिषेक
मग पुढे काय... दुसरीशी भेट.. तिसरीशी भेट.. चौथीशी भेट....... आणि सरते शेवटी सध्या जिला झेलतोय आणि आयुष्यभरासाठी झेलावेच लागणारेय तिच्याशी भेट... याच ऑर्कुटच्या माध्यमातून.. :)
19 Feb 2013 - 5:30 pm | लक्ष्या
:)
19 Feb 2013 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिण्याची शैली लै भारी आहे. मस्त रंगलय प्रकरण.
अजून येऊ दे....!!!
सारांश : आंजालावर आयडीच्या मागेमागे जायचे नाही, गेलातर तर बंटी अंगावर येतो. :)
-दिलीप बिरुटे
19 Feb 2013 - 6:42 pm | ५० फक्त
कुणाला सिंहिण आठवली नाही अजुन, मला तर चवथ्याच परिच्छेदात आठवली, कुठं असतात ओ हल्ली सिंहिणवाले.
19 Feb 2013 - 7:08 pm | सुधीर
सही. शाळा सोडल्यावर फारच धमाल केलीस लेका.
19 Feb 2013 - 8:04 pm | तुमचा अभिषेक
मनाने अजूनही शाळा कॉलेजमध्येच आहे रे... फक्त मधल्यामध्ये चुकून बालविवाह तेवढा झालाय.. :)
इथे लिहायला आलो आणि शाळेतला एक मित्र भेटला, त्याला हे आवडले आणखी काय पाहिजे, धन्य झालो.. :)
19 Feb 2013 - 7:29 pm | कपिलमुनी
>>आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो,
एक नंबर वाक्य हां !!
बाकी "शिकार" असले शब्द वापरत जाउ नका ...पाशवी शक्तींनी सीरीयसली घेतला तर बंटी मागे लागल्यासारखी अवस्था होइल
19 Feb 2013 - 8:13 pm | तुमचा अभिषेक
ते वाक्य तसे खरेच आहे, अर्थात तो गंमतीचा भाग आहे हे ही खरे. मुळात ही कथा एक अनुभव म्हणून ऑर्कुटवरच लिहायला घेतली असल्याने तिथे तसा उल्लेख मुद्दामच केला होता.. पण कथेत ते अगदी अनावश्यकही नसल्याने इथे प्रकाशित करतानाही राहू दिले.. :)
शिकार वगैरे शब्द लेखाला अनुसरून हलकेच घ्या, बाकी जे काही लिहितो त्याची पहिली वाचक माझी बायकोच असल्याने माझ्याकडून कधी काही भलते सलते लिहिले जाणार नाही याची खात्री आहे. :)
अवांतर - ब्रह्मे काकांचा आंजा व्हर्जन ?? म्हणजे?? नाही झेपले :(
20 Feb 2013 - 1:51 pm | कपिलमुनी
http://online3.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm
19 Feb 2013 - 7:51 pm | दिपक.कुवेत
खुप मजा आली वाचुन :)) लगे रहो!
19 Feb 2013 - 10:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
:D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D :D:D
हा हा हा हा...एकच नंबर.. ;)
19 Feb 2013 - 10:24 pm | मदनबाण
:D
19 Feb 2013 - 10:48 pm | अग्निकोल्हा
आजपासुन तुमी आमचे पण सुपरस्टार.
क्लास! लिखाणात वास्तववाद नेमका उतरलाय.
हिहिहॅ!
19 Feb 2013 - 10:57 pm | Mrunalini
खुप मस्त... :D :D
19 Feb 2013 - 11:36 pm | आदूबाळ
:)) काय राव!
एक रिक्वेष्टः मिपा साठी पेशल लिहा ना कधीतरी
20 Feb 2013 - 8:23 pm | तुमचा अभिषेक
धन्यवाद,
पण अशी रीक्वेस्ट करण्याएवढा मी स्वता पेशल नाही हो, बिजी शेड्यूलमधून लिहिणे असे खरे तर कमीच होते. तसे माझे लेटेस्ट लिखाण हेच आहे, तरीही आता पुढे भविष्यात जे काही लिहेन ते मिपावर असेलच. असा प्रतिसाद असेल तर नक्कीच असेल.. :)
20 Feb 2013 - 12:22 am | स्मिता.
बर्याच दिवसानी असं लिखाण वाचलं. मजा आली.
20 Feb 2013 - 4:12 am | विजुभाऊ
गुजराथी हा जनसमुहवाचक शब्द प्रयोग खटकला.
बाकी चालू द्या
20 Feb 2013 - 9:17 am | नानबा
:)) :)) झकास... आवडेश.. :))
20 Feb 2013 - 4:56 pm | अविनाशकुलकर्णी
खुप मजा आली वाचुन
20 Feb 2013 - 5:02 pm | प्रसाद१९७१
खोटी वाटते. जरी सत्यकथा असल्याचा आव आणला असला तरी तद्दन खोटी वाटते, फॉर्मुला हिंदी सिनेमा सारखी.
20 Feb 2013 - 8:17 pm | तुमचा अभिषेक
मान गये उस्ताद, अगदी बरोबर पकडले.
आता पकडलेच तर खुलासा करायला हरकत नाही.
१. पहिल्या दोन परीच्छेदांमध्ये शंभर टक्के सत्यता आहे.
२. तिसर्या परीच्छेदातील चौथी ओळ अर्धसत्य आहे.
३. चौथ्या परीच्छेदातील पाचवे वाक्य आतिशयोक्तीचा कळस आहे.
४. शेवटून दुसर्या परीच्छेदातील शेवटून तिसर्या वाक्यातील शेवटून चौथा शब्दच तेवढा काय तो खरा आहे.
५. इतर सारे परीच्छेद कथेच्या दृष्टीने काहीही महत्वाचे नसल्याने खरे असो वा खोटे काही फरक नाही पडत.
तळटीप - वरील ५ पैकी मुद्दा क्रमांक २ आणि ४ काय तेच खरे आहेत. उरलेले ३ असेच फेकले आहेत.
जस्ट किडींग .. हलके घ्या.. प्रत्येक कथेत काही ना काही खरे खोटे हे असणारच.. सारेच खरेखुरे लिहायचे ठरवले तर लोकांना नीरस कथा वाचायला लावायचे पाप माथी बसणार नाही का.. :)
21 Feb 2013 - 4:24 pm | चिगो
मजा आली राव वाचतांना.. :D
21 Feb 2013 - 5:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त लिहिलेय... वाचताना मजा आली. लिहीत रहा.
21 Feb 2013 - 6:08 pm | kanchanbari
अनुभव भारी....लिखाण छान जमलय......वाचतांना हसायला आले आणी शेवट काय होता यासाठी उत्सुकताही खुप होती :)
21 Feb 2013 - 6:39 pm | दादा कोंडके
मजा आली! :))
22 Feb 2013 - 4:00 pm | सुहास..
हा हा हा , टिपिकल अभ्या !
( प्रकाशित करताना : ईतरत्र प्रकाशित वा पुर्व-प्रकाशित चे डिसक्लेमर टाकत जा , उगा काही आंजा माकडांच्या हातात कोलीत नको ;) )
26 Feb 2013 - 11:56 am | तुमचा अभिषेक
हे गरजेचे असते का, म्हणजे नियमानुसार वगैरे, कारण अजून २-३ असेच पूर्वप्रकाशित लेख इथे डकवण्याचा फुल्ल चान्स आहे म्हणून विचारतोय..
बाकी ते आंजा माकड वगैरे मी एंजॉयच करतो.. :)
22 Feb 2013 - 5:38 pm | सानिकास्वप्निल
वाचताना मजा आली =))
लेखनशैली आवडली
23 Feb 2013 - 3:41 pm | यशोधन वाळिंबे
कालच पेपरात बातमी वाचली. आजकाल चेहरा पुस्तक (फेसबुक) वर म्हणे फेक प्रोफाईल चा सुळसुळाट झाला आहे आणी त्यावरून नियमितपणे काहीही 'फेक'ले जाते. सर्वाना नम्र विनंती आहे कि वरील कारणांसाठी रिक्वेस्ट पाठवताना लिंग आणी फोटो सोडुन इतर गोष्टींच्या रकान्यावर थोडी नजर फिरवली तर तुमची 'शिकार' होणार नाही..
23 Feb 2013 - 5:07 pm | अधिराज
छान आहे लिखाण, अजून येउ दे भराभर.
23 Feb 2013 - 11:33 pm | लौंगी मिरची
ठिक वाटला लेख . शेवट अजुन खुलवला असता तर ईफेक्टिव झाला असता लेख .
पूढिल लिखानास शुभेच्छा .