खरंय! बेचैन नक्कीच आहे मी. अगदी फारच.
आधीही तसंच होतं आणि आत्ताही आहे. पण मला वेड लागलं आहे असं काय म्हणून म्हणाल तुम्ही? या आजाराने माझ्या जाणिवा तुम्हाला वाटतंय तशा नष्ट केलेल्या नाहीत, तर अतिशय तीक्ष्ण केल्या आहेत. त्यात सगळ्यात तीव्र आहे ती म्हणजे माझी ऐकण्याची क्षमता. अस्पष्टशा आवाजालाही वेधणारी. अत्यंत अचूक. अगदी स्वर्गातला असो, की पृथ्वीवरचा किंवा मग पाताळातलाही, कोणत्याही आवाज ऐकू शकेन मी. आता सांगा.. हा काय भ्रमिष्टपणा आहे? मी जे सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे मी किती शांतपणे ही पूर्ण घटना सांगणार आहे ते समजेल तुम्हाला.
पहिल्यांदा ती कल्पना माझ्या डोक्यात कशी आली हे नेमकं सांगता यायचं नाही. पण एकदा ती मला पटल्यानंतर मात्र तिने माझा दिवसरात्र पिच्छा पुरवला. माझा हेतू काही नव्हता. मला कसलाही ध्यास नव्हता. मला आवडायचा तसा तो म्हातारा. ना तो माझ्याशी कधी वाईट वागला. ना अपमानास्पद वाटेलसं वागला. ना मला त्याच्या संपत्तीची अभिलाषा वाटली. पण.. पण त्याचा तो डोळा!! मला वाटतं.. तेच कारण होतं. त्याचा तो डोळा! अगदी गिधाडासारखा होता - फिकुटलेला, मळकट निळसर रंगाचा, पातळसा पडदा असलेला. ज्या ज्या वेळी ती मळकट निळी नजर माझ्यावर पडे, त्या त्या वेळी माझे शरीर ताठून जाई, रक्त गोठून जाई. हळूहळू, क्रमाक्रमाने माझा निश्चय बळावत गेला. त्या निळ्या डोळ्यापासून सुटका हवी तर त्या म्हातार्याचा जीव घेण्याशिवाय काही पर्यायच नव्हता, माझी खात्रीच झाली तशी.
आता हे बघा, मला वेड लागलं आहे, असं तुम्हाला वाटतंय. पण वेड्या माणसांना कळत असतं का काही? नाही ना? तुम्ही मला पाहायला हवं होतंत. तुम्ही पाहायला हवं होतं, किती सावधपणे मी पावलं टाकली - किती दूरदर्शीपणे - केवढ्या बेमालूमपणे - मी माझी मोहीम सुरू केली! त्या म्हातार्याचा जीव घेण्याअगोदर पूर्ण आठवडा त्याच्याशी माझं वागणं किंचितही बदललं नाही, त्यात कोणताही अवाजवी दयाळूपणा आला नाही. आणि रात्री? अंधार पडला की मध्यरात्रीच्या सुमारास मी त्याच्या दाराचं लॅच फिरवून ते दार उघडत असे.. अगदी अलगऽऽद! आणि मग, ते दार माझं डोकं आत शिरेल इतकं किलकिलं झालं, की त्या खोलीतल्या अंधारात माझ्या हातातला दिवा प्रवेश करत असे - पूर्णपणे झाकलेला! इतकाही उजेड दिसणार नाही असा झाकलेला. आणि मगच मी माझं डोकं आत घालत असे. माझी ही चलाखी बघून तुम्हाला नक्कीच हसू फुटल्याशिवाय राहिलं नसतं! मी माझं डोकं धीमे धीमे .. अगदी धीमे धीमे आत शिरू देत असे. आता मला त्याची झोपमोड थोडीच करायची होती?? तब्बल एक तास लागायचा मला फक्त माझं डोकं आत घालायला, मग कुठे माझं लक्ष्य, तो म्हातारा मला पलंगावर झोपलेला दिसू लागे. आता सांगा.. एखादी वेडी व्यक्ती अशा हुशारीने वागू शकते का?
तर.. एकदा का माझं डोकं पूर्ण आत शिरलं, की माझा दिवा मी सावकाऽऽश मालवत असे.. त्याचा आवाज होऊ नये इतका सावकाश, आणि त्यातून केवळ एकच प्रकाशकिरण बाहेर येऊन त्या गिधाडासारख्या डोळ्यावर पडेल इतकाच..!
सतत सात रात्री मी हे केलं. नेमक्या मध्यरात्रीच्या वेळी. मला त्या म्हातार्याचा काही त्रास नव्हता, हे सांगितलंय मी तुम्हाला. पण तो निळा डोळा! खिजवत असे तो डोळा मला!! पण दरवेळी तो डोळा मिटलेलाच दिसे. त्यामुळे मग.. त्या निळ्या डोळ्यापासून सुटका हवी तर त्या म्हातार्याचा जीव घेण्याशिवाय काही पर्यायच नव्हता! हो की नाही?
दररोज सकाळी मात्र मी सहजपणे त्याला भेटत असे, अगदी त्याच्या नावाने हाक मारून त्याची विचारपूस करत असे. रात्री शांत झोप लागली ना.. हेही विचारत असे! अगदी साधा सरळ म्हातारा होता हो तो.. तो झोपलेला असताना दर मध्यरात्री त्याच्या खोलीत शिरून कोणी त्याला निरखतं आहे, अशी शंकाही येणं शक्य नव्हतं त्याला.
आठवी रात्र. मी रोजच्यापेक्षा अधिकच सावध असल्याचं चांगलं आठवतंय मला. घड्याळाचा मिनिटकाटादेखील माझ्या मनापेक्षा जलद धावत होता, हे अगदी खात्रीपूर्वक सांगू शकेन मी. माझ्या ताकदींची, माझ्या बुद्धिमत्तेची इतकी जाणीव मला पहिल्यांदाच होत होती. मी माझ्या ध्येयाच्या जवळ पोचत असल्याचा आनंद माझ्या मनात मावत नव्हता. मी इथे दार उघडून त्या खोलीत प्रवेशत असताना त्याला मात्र माझ्या अंतस्थ हेतूंची, आणि कृतींचीसुद्धा स्वप्नातही कल्पना नव्हती! माझ्या मनाला या विचाराने गुदगुल्या होत होत्या, मला आलेलं हसू मी दाबलं खरं.. पण तरी बहुधा त्याने ते ऐकलं असावं!! झोपेत दचकावं तसा तो पलंगावरच हलला!! आता सांगा.. मी मागे फिरण्याचा विचार केला असेल असं वाटतंय ना तुम्हाला? छे, मुळीच नाही. कारणच नव्हतं तसं. एक म्हणजे त्या खोलीत डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार होता (खिडक्या घट्ट बंद करून घ्यायची त्याची सवय माहीत होती मला), आणि दुसरं, त्या पलंगावरून खोलीचा दरवाजा मुळीच दिसत नसे. त्यामुळे मी माझं आत शिरायचं काम सुरूच ठेवलं. डोकं आत घातल्यावर रोजच्याप्रमाणे दिवा मालवण्यासाठी मी हालचाल केली.. आणि माझं बोट सटकलं!! अस्पष्टसा आवाज झाला!!
म्हातारा ताडकन् उठून बसला! 'कोण आहे??' त्याचा भ्यायलेला आवाज खोलीत घुमला!
मी स्तब्ध राहून तोंडातून अवाक्षरही काढलं नाही. गप्प! निश्चल! पूर्ण एक तास! पण त्या एक तासात तो अजिबात आडवा झाला नाही. खोलीत नेमकं काय आहे याची चाहूल घेत राहिला. जशी मी त्याच खोलीत गेले सात रात्री घेतली होती - त्याच्या मृत्यूची.
अचानक त्याच्या तोंडून भयाचा सुस्कारा ऐकू आला. मरणाच्या भीतीने. शंकाच नको. अगदी व्यवस्थित समजलं मला ते. या उद्गाराशी चांगलाच परिचय होता ना माझा.. सगळं जग झोपलेलं असताना, न संपणार्या मध्यरात्रीच्या गडद एकटेपणात माझ्याच खोलीत कितीदा माझ्याच तोंडून आलेला ऐकलाय तो मी! दया आली मला त्याची, आणि हसूही फुटलं मनातल्या मनात. मला चांगलंच ठाऊक होतं, तो पहिल्यांदा पलंगावर वळला, त्या क्षणापासून त्याची झोप उडालेली होती. त्याची भीती नकळत त्याचा पुरता कब्जा घेत होती. ती भीती निरर्थक ठरवायचा तो आटोकाट प्रयत्न करत असणार, पण ते जमत नव्हतं त्याला. तो स्वतःशी बोलत असणार.. 'छे! एखादा उंदीर.. नाहीतर किडा.. बाकी काही नाही..'. त्या आवाजाचं पटेलसं स्पष्टीकरण शोधत होता ना तो.. पण नाईलाज होत होता त्याचा. कारण खरोखरच मृत्यू त्याच्या खोलीत उभा राहून त्याच्याकडे गालातल्या गालात हसून पाहत होता. त्या काळोख्या अंताची चाहूल नाकारणं शक्य तरी होतं का त्याला? डोळे टक्क उघडे ठेवून तो पलंगावर बसला होता...
..डोळे टक्क उघडे ठेवून तो पलंगावर बसला होता! तो निळा डोळा! सताड उघडा! गेले सात रात्री मी ज्याची वाट पाहिली तेच होतं हे.. तेच!!
मी दिव्यावरचं आवरण अगदी स्थिर हाताने किंऽऽचित हटवलं. प्रकाशाची एक तिरीप थेट त्या गेले सात दिवस माझं लक्ष्य बनलेल्या, मला बेचैन करणार्या, गिधाडासारख्या, निळ्या डोळ्यावर पडली!
- क्रमशः
(ही अनुवादित कथा आहे. रहस्य राखण्यासाठी मूळ कथा कोणती, हे पुढच्या भागात उघड करत आहे..)
प्रतिक्रिया
16 Feb 2013 - 12:57 am | श्रीरंग_जोशी
खिळवून ठेवणारी वर्णनशैली.
पुढचा भाग लौकर येउद्या...
16 Feb 2013 - 1:02 am | किसन शिंदे
नीट अंदाज बांधता येत नाहीये, आणि कथाही एका नेमक्या टप्प्यावर क्रमशः झाल्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकताही शिगेला पोहचलीय.
लवकर टाका हो पुढचा भाग, उगा जास्त वेळ घालवू नका.
16 Feb 2013 - 1:04 am | अग्निकोल्हा
वर्णन मात्र एकदम सॉयकोलॉजिकल थ्रिलर.. क्रमशः खटकला.
16 Feb 2013 - 8:27 am | लीलाधर
वरण आपलं वर्णनशैली मजा आली आणि अता पुढे काय याची उत्सुकता शिगेला पोचुन राहीलेय. त्यातच ते क्रमाने शहा आलेत तर त्यांच्याच करवी पुढील पोस्ट धाड हो लौकर :))
16 Feb 2013 - 8:37 am | रेवती
अग्ग्ग्ग्ग्ग्ग! मस्त अनुवाद! पुरती खिळवून ठेवणारी कथा. पुढील वाचनास उत्सुक. फार ताणू नकोस बै आता!
16 Feb 2013 - 8:42 am | चावटमेला
उत्सुकता वाढलेली आहे. अगदी सहज, खिळवून ठेवणारं लिखाण. पुभाप्र
16 Feb 2013 - 8:50 am | यशोधरा
मस्त!
16 Feb 2013 - 8:52 am | बहुगुणी
मस्त अनुवाद!
16 Feb 2013 - 9:02 am | प्रचेतस
एकदम मस्त अनुवाद
18 Feb 2013 - 3:26 pm | मूकवाचक
_/\_
16 Feb 2013 - 9:18 am | अक्षया
उत्सुकता वाढ्ली आहे. पु.भा.प्र. :)
16 Feb 2013 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय. झकास. पुभाप्र.
-दिलीप बिरुटे
16 Feb 2013 - 9:39 am | तिमा
कथेचा पूर्वार्ध आवडला. दिवा कशा प्रकारचा असावा याचा मात्र अंदाज नाही आला.
प्रतीक्षेत.
16 Feb 2013 - 10:14 am | गौरव जमदाडे
मुळ कथेबरोबरच तुमचे लेखन कौशल्य आवडले.
पुभाप्र.
16 Feb 2013 - 10:19 am | नानबा
मस्त लिवलयंस इनिगोय अगदी.. वरील सगळ्या प्रतिक्रियांसारखीच माझी शेम टू शेम आहे, एकदम खिळवून ठेवलंय.. पुभाप्र. :)
16 Feb 2013 - 10:22 am | पैसा
पुढचा भाग लौकर टाक!
16 Feb 2013 - 10:26 am | तुमचा अभिषेक
काहीतरी जबरी घडणार आहे असे प्रत्येक वाक्यागणिक वाटावे अशी लिखाणशैली... क्रमशा तेवढा ताणू नका जास्त .. उद्याच येऊद्या पुढचे..
16 Feb 2013 - 10:33 am | अन्या दातार
उत्कंठावर्धक!
16 Feb 2013 - 10:41 am | परिकथेतील राजकुमार
पुभाप्र..
16 Feb 2013 - 12:18 pm | स्पंदना
डोळ्याचे वर्णन आवडले.
16 Feb 2013 - 12:30 pm | बॅटमॅन
अरे डोळा रे डोळा रे डोळा रे...
आवडलंय, आउर आंदो रे जल्दीच!!!
16 Feb 2013 - 1:46 pm | सानिकास्वप्निल
मुळ कथी वाचलीये त्यामुळे पुढे काय होणार ह्याची कल्पना आहे :)
अनुवाद खूप छान जमलाय, लेखन सुंदर :)
16 Feb 2013 - 2:20 pm | प्यारे१
क्रमशः का टाकलंय असं वाटायला लावणारा अनुवाद.
पुढचा भाग सात दिवस वाट पहायला न लावता लौकर लिहा!
16 Feb 2013 - 4:08 pm | सस्नेह
काय अंदाज लागेना बै !
16 Feb 2013 - 4:14 pm | ५० फक्त
मस्त झालंय एकदम. मजा आली वाचताना. इथं आधीच एक कंदिल आहे, त्यात दिव्याची भर.
16 Feb 2013 - 4:50 pm | आनंद
मुळ कथा बहुगुणींनी दिलेल्या हिंट वरुन वाचली . मस्त झालाय अनुवाद.
16 Feb 2013 - 5:38 pm | हारुन शेख
भन्नाट अनुवाद ! पुढचा भाग अधिक उत्कंठा न लावता टाकावा हि विनंती.
16 Feb 2013 - 6:17 pm | अभ्या..
थरार राखण्यात एकदम पैकीच्या पैकी मार्क्स.
आणि सेम भाषाशैली आणि शब्दवापरांच्या बाबतीत पण.
सुरेख लेखन इन्नातै. धन्यवाद.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
16 Feb 2013 - 6:59 pm | क्रान्ति
खिळवून ठेवणारी कथा! पुढच्या भागाची उत्सुकता वाढलीय!
17 Feb 2013 - 1:35 am | शुचि
बाप रे!
17 Feb 2013 - 3:04 am | स्मिता.
एकीकडे जीव मुठीत घेवून बसले असले तरी कथेत गुंतून गेले होते आणि अचानक आलेला तो क्रमशः किती खटकला!! आता पुढचा भाग लवकरात लवकर टाका.
अनुवाद एकदम छान झालाय, खरं तर अनुवाद आहे असं वाटलंच नाही.
18 Feb 2013 - 5:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आता लवकर सांगा...