पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ?

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
12 Feb 2013 - 1:07 pm

"चल ए छोटूss त्या तीन नंबरवर फडका मार... ए बब्बन, त्या दोन पोरी केव्हाच्या बसल्यात बे, ऑर्डर घे ना बेटा त्यांची... हा बोलो साब..??",
"एक चिकन हंडी... पार्सल", मी मेनूकार्डवर नजर न टाकताच ऑर्डर केली.
"बस..."
बस? च्यायला ह्याला काय पडलीय आम्ही एक डिश मागवू नाहीतर दहा.. गुमान ऑर्डर घे आणि निघ ना.. पण त्याचीही काही चूक नव्हती. आज वर्षाची अखेरची रात्र होती, ३१ डिसेंबर.. सारे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील चायनीजच्या गाड्या देखील हाऊसफु्ल होत्या. लोक फॅमिलीच्या फॅमिली घेऊन घराबाहेर जेवायला पडले होते. तिथे माझ्या एका चिकन हंडीच्या ऑर्डरवर त्याची प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित नव्हती. सकाळपासून डोक्यात पित्त चढले नसते तर मी देखील आता मिथिलासोबत कुठल्याश्या थ्री-स्टार हॉटेलमध्ये रेशमी कबाबच्या जोडीने रेड वाईन रिचवत बसलेलो असतो..

"साथ मे रोटी नही चाहिये क्या?", त्याचा पुढचा प्रश्न..
‘नको रे बाबा, आईने चपात्या केल्यात घरी, आणि माझ्या नशिबी नुसतीच दालखिचडी आहे..’, मी नकारार्थी मान हलवत मनातल्या मनात बोललो. आजूबाजूला नजर टाकली तर सारे जण नुसते चिकन मटण वर तुटून पडले होते. नाक्यावरचे एक साधेसे रेस्टॉरंट, फॅमिलीटाईप वाटायचे नाही म्हणून मिथिलाबरोबर कधी जाणे झाले नव्हते. एकदोनदा फोनवर पार्सल काय ते मागवले होते. पण आज मात्र बरेच जण तिथे सहकुटुंब आलेले दिसत होते. त्यांना हसत-खिदळत खाताना पाहून क्षणभर त्यांचा हेवा वाटला.

"और थंडा वगैरे कुछ..?", अजून याचे होतेच का, साला मागेच पडला होता. उगाच असे वाटले की त्याची नजर सांगतेय, ‘एवढे चांगले नवीन वर्षाचे ओकेजन आहे आणि हा चिकट एवढीशी ऑर्डर करतोय.’ आता मला काहीच नको म्हणून ठणकावून सांगावेसे वाटले, पण पुन्हा एकदा फक्त मुंडी हलवली. अर्थात नकारार्थी..

ऑर्डर दिल्यावर आता त्या गर्दीत जास्त वेळ उभे राहणे शक्य नव्हते. छोटीशीच असली तर आज किमान वीस-पंचवीस मिनिटे तरी लागली असती. तसेही मिथ माझी वाट बघत बाहेर उभी होती. बाहेर आलो तर बाईसाहेब कुठे दिसल्या नाहीत. आजूबाजूला नजर टाकली तर एका आईसक्रीमच्या दुकानाजवळ पोहोचल्या होत्या. अर्थात, घेणे शक्य नव्हते. कालपासून तिलाही खोकला झाला होता. तरीही नजर मात्र तिथेच लागली होती. मी काय ते समजलो. मुद्दाम जवळ जाऊन विचारले, "काय बाप्पू.. काय बघतेस?", "जळतेय रे", ती फटकन उत्तरली. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो.

"चल तुला पाणीपुरी खिलवतो" तिचे लक्ष तिथून विचलित करायला म्हणून मी म्हणालो. खरे तर पाणीपुरी ही मिथिलाची फेवरेट असली तरी ही वेळ नक्कीच पाणीपुरी खायची नव्हती. पण खायला तयार झाली. फारशी गर्दी नव्हती ठेल्यावर. बाजूची पावभाजीची गाडी मात्र बर्यापैकी गर्दी राखून होती. पाणीपुरीपेक्षा त्या भाजीचाच वास मस्त नाकात शिरत होता. लहानपणी अश्या गांड्यांवर बर्याचदा खाणे व्हायचे. तेव्हा बजेटही एवढेच असायचे की या गाड्याच परवडाव्यात. आजही काही तिथे वेगळे चित्र नव्हते. काही टॅक्सी ड्रायव्हर, रोजगारी करणारे वगळता लहान मुलांचेच ग्रूप जमले होते. तेवढ्यात दोन-तीन लहान मुलांचा गोंगाट कानावर पडला. त्या आजूबाजुच्या कोलाहलातही तो आवाज गोड वाटला. कारणही तसेच होते. आज आई पावभाजी खाऊ घालणार म्हणून स्वारी खुश होती. एक मुलगा जवळच्या खांबाला लावलेला बोर्ड मोठ्या आवाजात वाचत होता.. बटर पावभाजी, चीज पावभाजी, पनीर पावभाजी... एकेक नाव घेऊन त्याचे, ‘आई हे काय असते ग, आई ते काय असते ग’, चालू होते. आई काहीच उत्तर देत नव्हती. जे घ्यायचेच नाही ते उगाच मुलांच्या मनात भरवा कशाला, असा साधासरळ हिशोब होता त्या माऊलीचा. उगाच एखाद्या दिवशी बटर, चीज वगैरे घेतले आणि मुलांना त्याची चटक लागली तर दरवेळी तेच मागतील ही भितीही होतीच. त्यातला एक लहान भाऊ नुसताच आईचा पदर पकडून उड्या मारत होता. त्यांची ताई वयाने त्यांच्यामानाने मोठी दिसत होती, पण तिचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. मगाशी त्या हॉटेलमध्ये हसत खिदळत गप्पा मारत मटणावर ताव मारणारे आणि आता आपण गाडीवरची पावभाजी खाणार आहोत या निव्वळ कल्पनेनेच उजळलेले तीन चेहरे. पण या चेहर्यांवरील आनंद पाहताना मात्र मला त्यांचा हेवा वाटत नव्हता. उलट नकळत मन भूतकाळात रमले.

मी एकुलता एक असल्याने सख्ख्या भावंडांचे सुख कधी लाभले नाही पण शाळेत असताना सुट्ट्या पडल्या की माझी २-३ चुलत भावंडे आमच्याकडे राहायला यायची. जेमतेम दहा-बारा रुपये असायचे आम्हा सर्वांकडे मिळून आणि त्याच्या जीवावर सारी मे महिन्याची सुट्टी काढायचे आव्हान. त्यामध्ये मग पंचवीस-पंचवीस पैशाला मिळणारी चिंच-बोरे, कधी ऐश करावीशी वाटली तर आठाण्याचा बर्फाचा गोळा, रोज रोज ही ऐश करू शकत नाही म्हणून चार आण्याच्या पाच या दराने मिळणार्या लिंबाच्या गोळ्या पाण्यात विरघळवून केलेले सरबत, एखादे रुपया-दोन रुपयाचे बक्षीस लागेल आणि पैसे वाढतील या आशेने दहा-दहा पैशाच्या काढलेल्या सोरटी.. सारे काही एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून गेले. थोडा मोठा झालो, प्राथमिक शाळेतून दादरच्या एका नावाजलेल्या माध्यमिक शाळेत जाऊ लागलो तसा पॉकेटमनी वाढला. गाडीभाडे आणि खाऊचे मिळून दिवसाला चार रुपये मिळू लागले. पण बसचे येण्याजाण्याचे तीन रुपये काढले तर खाण्यासाठी एक रुपया शिल्लक राहायचा. त्यात शाळेबाहेरच्या गाडीवर मिळणारा दोन रुपयाचा वडापाव माझ्या आवडीचा म्हणून एकदोन दिवस काही न खाता पैसे साठवले जायचे. कधीतरी जवळच्या एखाद्या ठिकाणी चालत जायचे आणि आईकडून बदल्यात आठ आणे मिळवायचे. ही बचत कधी सात-आठ रुपयांच्या वर गेलेली आठवत नाही. अर्थात यापेक्षा जास्त पैसे कंपासपेटीत ठेवणेही रिस्की होतेच म्हणा..

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी एक समजूतदारपणा होता त्या वयात. कदाचित परिस्थितीनेच आणलेला असावा. आईकडे कधी हट्ट केल्याचे आठवत नाही. आईसक्रीम, चॉकलेट हे चोचले फक्त श्रीमंत मुलांचे असतात हे मनाशी पक्के होते. पण स्वताहून जेव्हा ती केळ्याची वेफर आणायची, जी केवळ पगारालाच आणली जायची, तेव्हा ती जगातली बेस्ट आई वाटायची. अर्ध्याअधिक पाकिटाचा उघडल्या उघडल्या फडशा पाडायचो. उरलेले दुसर्या दिवशी संपायचे. आईने कधी त्यातील एखादे चवीला तरी खाल्ले असेल का याचे उत्तर आजही माझ्याकडे नव्हते. तिला पण आपल्यातले जरासे भरवावे एवढी अक्कल त्या वयात नव्हती याची खंत अचानक मनात दाटून आली. बायकोकडे सहज नजर गेली तर तिचे पाणीपुरीवर ताव मारणे चालू होते. ती खात्यापित्या उच्च मध्यमवर्गीय घरातली असल्याने तिचे बालपण माझ्या अगदीच उलटे होते. चॉकलेट-आईसक्रीमची आवड तशीच ठेवत पिझ्झा-बर्गर खातखातच ती वयात आली होती आणि माझी गाडी पहिला पगार हातात येईपर्यंत कधी मसालाडोसाच्या पुढे गेली नव्हती. आज मला रोज बाहेर खाणे सुद्धा आरामात परवडू शकत होते. त्यामुळे कधीकधी त्या खाण्याची किंमत काय असते हे विसरायला व्हायचे. पण असे कधी बालपण आठवले की याची जाणीव व्हायची. आताही तेच झाले. मगासपासून ऑफ झालेला मूड सुधारला. समाधानी वाटू लागले. तब्येत बरी नाही म्हणून काय झाले, मस्त तुपाची धार सोडून मी आज दालखिचडी खाणार होतो, आईसाठी चिकन हंडी पार्सल घेऊन जात होतो. बायकोलाही मनसोक्त पाणीपुरी खाऊ घालत होतो... सुखाची व्याख्या समाधानात शोधली तर हे सारे सुखी व्हायला पुरेसे होते. त्या मुलांच्या चेहर्यावरील आनंदात मी नकळत माझा आनंद शोधू लागलो होतो.

तेवढ्यात त्यातील एक मुलगा समोरच्या बेकरीतून पाव घेऊन आला. अर्थात त्या पावभाजीच्या गाडीवरच का नाही घेतले हे समजायला मला वेळ नाही लागला. पाव पिशवीतून काढून दोन्ही भावंडे ते मोजत होते आणि आई त्यांना ओरडत होती. पण ते मात्र कोण किती खाणार याचा हिशोब करण्यात गुंतले होते. कोणता पाव छोटा आहे आणि कोणता मोठा, इतपर्यंत गहन चर्चा चालू होती. मला ते बघून अंमळ मौज वाटू लागली.

एव्हाना माझ्या बायकोची पहिली प्लेट खाऊन झाली होती. मला किंचित गालातल्या गालात हसताना बघून विचारले, "काय रे, लाजायला काय झाले?" जवळपास एकही सुंदरी दिसत नसताना माझ्या चेहर्यावरील ते भाव तिच्यासाठी अनाकलनीय होते.
"काही नाही ग, जरा त्या मुलांची गंमत बघतोय.", मी म्हणालो.
तसे तिलादेखील तान्हुल्या बाळांना ‘अलेल्लेले’ करत त्यांचे गालगुच्चे घेत त्यांची गम्मत बघण्यात आवड होती. पण मी त्या सात-आठ वर्षांच्या मुलांकडे का तसल्या नजरेने बघतोय हे तिला नाही समजले. तिचा प्रश्नार्थक चेहरा आणि मी नक्की यात काय एंजॉय करत आहे यामागील कारण जाणून घेण्यातील उत्सुकता बघून मी तिला नेहमीसारखा माझ्या बालपणीचा एक किस्सा सांगायला घेतला, जो आताच त्या मुलांना पाव मोजताना बघून आठवला होता.

मी तेव्हा पाचवीत की सहावीत होतो. मे महिन्याची सुट्टी चालू होती. आमचे गली क्रिकेट फुल फॉर्मात चालू होते. प्रत्येक जण स्वताला सचिन तेंडुलकर समजायचा. पण खरेच आमचा खेळही चांगला होता. फक्त कधी आजमावण्याचा मौका आला नव्हता. कारण गल्लीच्या बाहेर कधी पडलो नव्हतो ना.. पण एक दिवस आमच्याच एरीआतील जवळच्या एका वाडीतील सात-आठ पोरे आम्हाला मॅच घेतात का म्हणून विचारायला आली. त्यांच्या वाडीतील लोकांनी दुपारच्या वेळी आरडाओरडीने झोपमोड होते म्हणून हाकलले असावे बहुधा. आम्ही त्यांना आमच्या गल्लीत असे काही खेळायला देणार नाही म्हणून मग मॅचचे निमित्त पुढे केले असावे. आम्ही या आधी असे कधी बाहेरच्या कोणा मुलांशी खेळलो नव्हतो. त्यांचा खेळ कसा आहे हे देखील माहीत नव्हते. पण त्या वयात कोणाचा खेळ कसा असेल हे त्याच्या हाईट-बॉडी वरून ठरवले जायचे. ती सारी साधारण आमच्याच वयाची आणि आमच्याच शरीरयष्टीची दिसत होती. सामना ठरवायला काही हरकत नव्हती. तसा त्यांनी आणखी एक पत्ता फेकला. प्राईझ मनी.. मॅच खेळायची तर काहीतरी बक्षीस हवे ना. आता मात्र आम्ही विचारात पडलो. तरी किती दिवस असे आपसातच खेळत राहणार होतो. कधी ना कधी बाहेरच्या जगात चालत असलेल्या स्पर्धेत उतरावे लागणारच होते. विचारविनिमयाअंती आम्ही तयार झालो. पूर्ण साडेपाच रुपयांची मॅच ठरली. प्रत्येक संघात सात-सात खेळाडू होते, म्हणजे प्रत्येकाला किमान रुपया तरी द्यावा लागणार होता. त्या वयात कोणी खिशात पाकीट घेऊन तर फिरत नसायचे की घातला खिशात हात आणि काढले पैसे. तरी बिनधास्त पैसे जवळ नसतानाही कबूल झालो. सामना हरलो तरच पैश्यांची जमवाजमव करावी लागणार होती. पण करावी लागणारच होती या वास्तवाचे भान ठेऊनच आम्ही जिद्दीने खेळलो. समोरचेही काही कमी चांगले खेळणारे नव्हते. खरे तर दोन्ही संघ तोडीस तोड होते, पण त्यांनी आम्हाला कमी समजण्याची चूक केली जी आम्ही केली नव्हती. आणि इथेच आम्ही जिंकलो.

आम्ही आमच्या आयुष्यातील पहिला सामनाच नाही तर तब्बल साडेपाच रुपये जिंकलो होतो. स्वताच्या जीवावर, स्वताच्या मेहनतीवर.. आमच्यासाठी ती पहिली कमाई होती असे म्हणालो तरी वावगे ठरू नये. पण आता या पैश्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नच होता. ते साडेपाच रुपये सार्यांचे मिळून होते. वाटणी करण्यात अर्थ नव्हता, की तशी कोणाला अपेक्षाही नव्हती. का नाही मग पहिलाच विजय साजरा करावा असे ठरले. दोघातिघांना घरून बोलावणे आल्यामुळे ते निघून गेले. आम्ही पाच जण उरलो होतो आणि जवळ होते ते साडेपाच रुपये. म्हणजे पुन्हा एकदा चिंच-बोरे किंवा बर्फाचा गोळा या पलीकडे जाणे काही शक्य नव्हते. पण आम्ही मात्र कल्पनेपलीकडचा विचार केला होता. हॉटेलमध्ये जायचे ठरवले. अर्थात आमच्याच नाक्यावरचे रामकृष्ण हिंदू हॉटेल. पैश्याचा आणि सर्वांच्या आवडीचा विचार करता उसळपाव हा मेनू फायनल झाला. खरे तर सर्वांना मिसळपाव खायची इच्छा होती. पण एकाला पाणी पिण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये पाठवलेले आणि पदार्थांचे रेट वाचून यायला सांगितले होते. त्याच्या अहवालानुसार उसळपाववरच समाधान मानावे लागणार होते. तेही हॉटेलमध्ये पाव घ्यायचे म्हणजे आठ-आण्याचा पाव एक रुपयात. साडेचार रुपयाची उसळ वगळता आमच्याकडे केवळ एकच पाव खाण्यास पैसे शिल्लक होते. म्हणून मग बेकरीतून एक रुपयाचे दोन पाव घेण्याचे ठरले. ते तसेच कागदात लपवून नेणे भाग होते. कारण हॉटेलमध्ये बाहेरचे खाण्यास मनाई होती. आणि आम्ही पडलो लहान मुले. मालकाने हाकलला असता तरी गुमान बाहेर पडावे लागले असते. कोपर्यातील एखादे टेबल पकडून बसलो. पाव एकाने घट्ट मांडीशी पकडून ठेवले होते. मेनूकार्ड घेऊन वेटर आला. परत एकदा उसळ साडेचार रुपयालाच आहे खात्री केली. आणि जराश्या संकोचानेच त्याला ऑर्डर दिली, "एक उसळ..."

"बस.." मगासचा वेटर एका चिकन हंडीची ऑर्डर घेतल्यावर पटकन मला म्हणाला होता ते आता सहज आठवले. पण त्यावेळी आम्ही पाच जणांत एक उसळ ऑर्डर केली होती. ती देखील पार्सल नाही तर हॉटेलमध्ये जाऊन. तो वेटर तेव्हा ‘बस?’ नाही म्हणाला तर पुढच्या ऑर्डरची वाट बघत बसला. जरासा वेळ लागला त्याला ही गोष्ट पचवायला की आम्ही फक्त एकाच उसळची ऑर्डर केली आहे. त्याक्षणी त्याच्या चेहर्यावर जे भाव होते, त्यानंतर त्याची जी प्रतिक्रिया होती ती आमच्यातील पाचही जण आयुष्यभर नाही विसरणार. एकदम आश्चर्यचकीत झाल्यासारखे भाव चेहर्यावर आणत आणि उजव्या हाताची पाच बोटे हवेत फिरवित तो म्हणाला, "पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ?"

जेव्हा आम्ही मित्र परत जमतो तेव्हा हा प्रसंग आणि त्याचे हे उद्गार नेहमी आठवतो. आयुष्यात असे पण दिवस पाहिलेत आणि त्यातही लाईफ एंजॉय केली आहे याचे समाधान जाणवते. त्यानंतरही असे बरेच किस्से घडले. आमचे बजेट हळूहळू वाढू लागले. तशी उसळीची जागा पावभाजीने घेतली, त्यावर मस्काही आला, पण पाव मात्र आम्ही बाहेरूनच घेऊन जायचो. मोठमोठ्या हॉटेलातही गपचूप ते टेबलाच्या खालून एकेमेकांना पास करायचो. सारे काही आज आठवू लागले. बायकोला सांगतानाही चेहर्यावर स्वताबद्दलचे कौतुक होते. गरीबीतल्या दिवसांतही किती गमतीदार आठवणी असतात याचे तिला अप्रूप वाटत होते.

इतक्यात बाजूच्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याच्या आईने त्याला धपाटा घातला होता. भाजीची पिशवी त्याच्या हातून खाली पडली होती. पातळ प्लास्टीकच्याच पिशव्या त्या, पडताक्षणीच फुटल्या असाव्यात. जमिनीवर नुसता लाल रंगाचा सडा पसरला होता. आजूबाजुचे आपल्या अंगावर तर नाही ना पडले हे चेक करत कपडे झटकत बाजूला सरकत होते. गाडीवाल्यानेही वैतागून आपल्या पोर्याला ते लगेच साफ करून घ्यायला सांगितले. तो सगळी भाजी खराट्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात ढकलत होता. पण त्या बाईची विषण्ण नजर अजूनही त्या भाजीवरच अडकून राहिली होती. आणि माझी तिच्यावर.. तिच्या मनात आता काय चालू असेल हे मी समजू शकत होतो. बदल्यात नवीन भाजीची ऑर्डर अजून दिली नव्हती. त्यासाठी लागणारे ज्यादा पैसे जवळ नसावेत, किंवा असले तरी ते खर्च करण्याची ताकद आता तिच्यात नसावी. मगासपासून त्या आपल्याच नादात हसणार्या खिदळनार्या, पैसा पैसा म्हणजे असा काय असतो याची चिंताही नसणार्या मुलांचा चेहरा आता बघवत नव्हता. आईचा धपाटा खाल्यावर हाच आपल्या पार्टीचा दी एण्ड आहे हे ती समजून चुकली होती. एक पावभाजी ती काय ते आज खाणार होते. आजूबाजूला इतर लोक या पेक्षा उंचे उंचे पदार्थ खात आहेत, धमाल करत आहेत याच्याशी त्यांना काही देणेघेणे नव्हते की त्यांच्याबद्दल यांच्या मनात असूयाही नव्हती. ती मुले माझी भावंडे नव्हती, ना ती बाई माझी आई होती. पण यांनी आज नकळत माझ्या काही आठवणी जागवल्या होत्या. सुख म्हणजे काय असते, समाधान कश्यात मानायचे असते, याची पुन्हा नव्याने जाणीव करून दिली होती, जी लाखमोलाची होती. आज मी यांच्या आयुष्यात एक अशी आठवण सोडून गेलो तर ती याची परतफेडच झाली असती. गपचूप मी मागच्या बाजूने त्या गाडीवाल्याजवळ गेलो आणि एक शंभराची नोट त्याच्या हातावर टेकवली. ‘बदल्यात त्यांना मस्का भाजी देऊ का?’, असे गाडीवाल्याने विचारले तर मी नकोच म्हणालो... मला त्या आईची मदत करायची होती, मेहरबानी करून तिचा अपमान नाही.. जाताना माझे नाव चुकूनही घेऊ नकोस असे बजावायला विसरलो नाही. परत आलो तर मिथिलाच्या चेहर्यावरही तेच समाधान दिसत होते जे मला माझ्या स्वतामध्ये जाणवत होते. माझ्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा तिने अलगद पुसून घेतल्या आणि नेहमीसारखे माझ्यातल्या लहान मुलाला थोपटले. त्या धपाटा खाल्लेल्या मुलाच्या डोक्यावरून सहजच हात फिरवून आम्ही तिथून निघालो. आमचे चिकन हंडीचे पार्सल आमची वाट बघत होते...

...तुमचा अभिषेक

कथाअनुभव

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

12 Feb 2013 - 1:07 pm | तुमचा अभिषेक

मिसळपाव वर हा माझा पहिलाच प्रतिसाद........ सांभाळून घ्या :)

सुहास..'s picture

12 Feb 2013 - 9:07 pm | सुहास..

कुठेही लिही अभ्या, नवीन लिही ..नाहीतर सगळीकडे वेगळ लिही ...कॉम्पीटिशन खराब आहे रे !!

यशोधरा's picture

12 Feb 2013 - 1:30 pm | यशोधरा

:)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2013 - 1:34 pm | अत्रुप्त आत्मा

"अभिषेक" छान केलात हो! लै गार गार वाटलं बगा मनाला.

सस्नेह's picture

12 Feb 2013 - 1:38 pm | सस्नेह

छान लिहिले आहे.

मृत्युन्जय's picture

12 Feb 2013 - 1:49 pm | मृत्युन्जय

हे कुठेतरी आधीदेखील वाचले होते. तुमचा ब्लॉगही आहे का?

पण एकुणात खुपच सुंदर लिहिले आहे तुम्ही. एक मिसळ ८ जणात आणि पाव लादी बाहेरुन हे असले प्रकार आम्हीही केले आहेत ते ही कॉलेजमध्ये असताना. त्या मिसळपावाचा आनंद कशातही नाही. आता तो प्रसंग आठवुन आम्ही मित्र जेव्हा आठवणीत रमतो तेव्हा आमच्या बायकांना मात्र वैताग येतो. काय रे त्याच त्याच आठवणी परत एकमेकांआ ऐकवता. हजार वेळा ऐकले आहे आतापर्यंत म्हणुन. पण परत परत तेच तेच उगाळण्यात पण मजा आहे. :)

तुमचा अभिषेक's picture

13 Feb 2013 - 12:51 pm | तुमचा अभिषेक

एकदोन मराठी संकेतस्थळावर प्रकाशित केले होते, किंवा ऑर्कुटवर वाचले असण्याची शक्यता.

स्मिता चौगुले's picture

12 Feb 2013 - 1:52 pm | स्मिता चौगुले

लहानपनीच्या आठवणी जाग्या झाल्या...

मन१'s picture

12 Feb 2013 - 1:59 pm | मन१

इथेही आलात; बरे केलेत.
वाचनखुणेत टाकलाय; सध्या फक्त सुरुवातीचा भागच वाचलाय.
फुरसतीत परतेन.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार

"चल ए छोटूss त्या तीन नंबरवर फडका मार... ए बब्बन, त्या दोन पोरी केव्हाच्या बसल्यात बे, ऑर्डर घे ना बेटा त्यांची... हा बोलो साब..??"

काही जुन्या मिपा आठवणी ताज्या झाल्या. ;)

चावटमेला's picture

12 Feb 2013 - 2:14 pm | चावटमेला

छानच लिहिलंय. कॉलेज मधल्या समोसा पाव, पॅटीस पाव पार्ट्यांची आठवण झाली.

सुजित पवार's picture

12 Feb 2013 - 2:30 pm | सुजित पवार

सुखाची व्याख्या समाधानात शोधली तर हे सारे सुखी व्हायला पुरेसे होते - अप्रतिम...

स्पंदना's picture

12 Feb 2013 - 2:34 pm | स्पंदना

बरं वाटल वाचुन.

नासिकचे महाराज's picture

12 Feb 2013 - 2:52 pm | नासिकचे महाराज

विषय आणि लिखाण दोन्हिही आवडले .माझ्याहि लहानपणीच्या आठवणी अश्याच प्रकारच्या आहेत. पण आता कितीहि छान वाटले तरीहि पुन्हा ते दिवस जगायला नक्किच आवडणार नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार

पण

लहानपणीच्या आठवणी

???

पण आता कितीहि छान वाटले तरीहि पुन्हा ते दिवस जगायला नक्किच आवडणार नाही. +१०००, बाकी लिखाण आवडलं.

चिगो's picture

12 Feb 2013 - 3:50 pm | चिगो

आल्याआल्याच सिक्सर हाणलात, राव.. अत्यंत सुंदर लेख. आवडला..

रुमानी's picture

12 Feb 2013 - 5:19 pm | रुमानी

मस्त लिहिताय.
आवडले

वाह्यात कार्ट's picture

12 Feb 2013 - 5:22 pm | वाह्यात कार्ट

खूप छान !! मनापासनं अवडलं :)

मनराव's picture

12 Feb 2013 - 5:52 pm | मनराव

मस्त... किस्सा.......

पैसा's picture

12 Feb 2013 - 5:58 pm | पैसा

पण या अभिषेक नावाने जरा गोंधळ उडणार बहुतेक. मिपाकर २ अभिषेक आधीच आहेत. आपला अभिषेक, अभ्या आणि आता तुमचा अभिषेक! :)

मन१'s picture

12 Feb 2013 - 6:04 pm | मन१

तरी सांगत होतो. उगा वैयक्तिक ओळखी काढून खरी नावं लक्षात ठेवायचा हट्ट करु नका म्हणून.
आयडीच लक्षात ठेवा की सरळ.
उद्या पैसातैंचच नाव असणार्‍या अजून एक ताई आल्या, से, पेनि/पेन्स आणि परवा त्याच नावाच्या अजून एक ताई सेन्ट्स किंवा येन असलं कायतरी अयडी घेउन आल्यातरी आमाला काही प्रॉब्लेम येणर नै.
आमच्या पैसातै एकच आहेत.(नाव सोडा; आयडी पकडा. तसेही प्रतिसाद, रुसवे फुगवे आयडीचेच असतात; व्यक्तीचे नाही. )

पैसा's picture

12 Feb 2013 - 6:07 pm | पैसा

लोक जसे अजून मन आणि मनराव यात कन्फुज होतात तशी मी सुरुवातीलाच आपला अभिषेक आणि तुमचा अभिषेक यांत कन्फूज झाले! :D तरी बरं, त्या 'अमीना'ने आयडी बदलून अभ्या केला म्हणून!

हं. पैसातै इतक्यात नाही संपलं कन्फुजन. अभ्य, अभि, अभिजीत, अभिजीत मोटे, अभिजित१, अभिषेक ७९ असे काहीतरी आकडेवाले अजून आहेत. काय काय लक्षात ठेवणार?
पण या अभिषेक रावांचे लेखन आवडले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा त्यांना. :)

पैसा's picture

12 Feb 2013 - 6:27 pm | पैसा

मनापासून स्वारी! यांचा आयडी "अभिषेक" आहे. "अभिजीत" नाही. आता लक्षात राहील!

"मना"पासून सॉरी म्हणायची गरज तुम्हास ती काय? ती मलाच.
.
बादवे, मन, मनराव ह्यात कन्युज व्हायला काय झालं? "मनोबा" हे सध्याला तरी एकच आहेत.

मन मी देखील कन्फ्युझ झाले बरं का मन व मनराव यात :D

असंच कन्प्युजन अर्धवट आणि अर्धवटराव मधेही आहे.

तुमचा अभिषेक's picture

13 Feb 2013 - 12:56 pm | तुमचा अभिषेक

अरे बापरे, आपला अभिषेक देखील आहे का इथे.. आणि काही आंतरजालावरील मित्र मला अभ्या अशी हाक देखील मारतात.. एकंदरीत कठीणच आहे.. :)

दादा कोंडके's picture

12 Feb 2013 - 6:09 pm | दादा कोंडके

खुप आवडला.

सुपरमॅन's picture

12 Feb 2013 - 7:12 pm | सुपरमॅन

लै भारी अभिषेक..लिखते रहो

अनन्न्या's picture

12 Feb 2013 - 7:26 pm | अनन्न्या

सगळ्या मैत्रिणी वाढदिवसाची पार्टी द्यायच्या. ती मलाही द्यावी लागणार म्हणून वर्षभर काहीही बाहेर खायचे नाही, तेव्हा कुठे वडापावची पार्टी देता यायची. वरती कॉफी म्हणून कॉफी बाइट!
एक मैत्रिण मात्र इरसाल होती. मिसळ घ्यायची, संपत आली की त्यात केस टाकायची आणि परत मिसळ वसूल करायची. स्वतःचे हॉटेल होते त्यांचे, परिस्थिती उत्तम पण व्रुत्ती ही अशी!!

इरसाल's picture

12 Feb 2013 - 8:27 pm | इरसाल

एक मैत्रिण मात्र इरसाल होती. मिसळ घ्यायची, संपत आली की त्यात केस टाकायची आणि परत मिसळ वसूल करायची.

मेरे नाम को बट्टा !!!!!

प्यारे१'s picture

12 Feb 2013 - 7:55 pm | प्यारे१

मस्त लिहीता अभिषेकबुवा!

पप्पु अंकल's picture

12 Feb 2013 - 7:58 pm | पप्पु अंकल

मिपावर डेब्यूलाच शतक ठोकलत राव

सौरव जोशी's picture

12 Feb 2013 - 8:02 pm | सौरव जोशी

खूप सुंदर लेख...

मला परळच्या "लंगड्याच्या" पाव्-भाजीच्या गाडीवर मनाने घेउन गेलास मित्रा.... जिंकलस! भारतात आल्यावर नक्की परळला जाईन.

तुमचा अभिषेक's picture

13 Feb 2013 - 1:03 pm | तुमचा अभिषेक

क्या बात है.. आपण परळचे का.. आणि मी माझगावचा.. एकंदरीत हा सारा विभागच असा की एकदा आपले बालपण इथे गेले की जगाच्या पाठीवर कुठेही जा, आपण मनाने दूर जाऊच शकत नाही..

स्वाती दिनेश's picture

12 Feb 2013 - 8:21 pm | स्वाती दिनेश

छान लिहिले आहे,
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2013 - 8:41 pm | प्रभाकर पेठकर

भाजीची पिशवी त्याच्या हातून खाली पडली होती. पातळ प्लास्टीकच्याच पिशव्या त्या, पडताक्षणीच फुटल्या असाव्यात. जमिनीवर नुसता लाल रंगाचा सडा पसरला होता. आजूबाजुचे आपल्या अंगावर तर नाही ना पडले हे चेक करत कपडे झटकत बाजूला सरकत होते. गाडीवाल्यानेही वैतागून आपल्या पोर्याला ते लगेच साफ करून घ्यायला सांगितले.

वाईट वाटले वाचून. आमच्या इथे असे घडले तर आम्ही दूसरी पावभाजी विनामुल्य देतो. कोणी स्वतःहून हातातली पावभाजी जमिनीवर टाकत नाही. ते एक दुर्दैव असतं. पण त्यामुळे गिर्‍हाईकाला पावभाजीच्या आनंदापासून वंचित ठेवणं मनाला रुचत नाही. आणि असे किती प्रसंग येतात? अगदी नगण्य. असो.

आमच्या इथेही काही सुखवस्तू गिर्‍हाईकं येतात जी १ भाजी आणि १५ पाव घेऊन जातात.

अविनाशकुलकर्णी's picture

12 Feb 2013 - 9:03 pm | अविनाशकुलकर्णी

लाईकले

उपास's picture

12 Feb 2013 - 9:23 pm | उपास

जुने दिवस आठवले.. फरक इतकाच होता की उसळ/ भाजी वेगळी, पाव वेगळे, कुणाच्या तरी घरातून कांदा असं सगळं आणून गच्चीत किंवा बोळात बसत असू आम्ही ;) पैसे वाचवायचे आणि जपून वापरायचे धडे गिरवले ते असेच..
ते इतके भिनले की आता पिझ्झा/सब घेताना कोल्ड्रींक वेगळ्या दुकानातून घेतले जाते, तेवढेच दोन पैसे वाचतातच ना! आणि किती पैसे वाचले ह्यपेक्षा त्या वाचवबण्याच्या समाधानातच आनंद अधिक.. :)

मला नेमकं काय आवडलं सांगू?

यांनी आज नकळत माझ्या काही आठवणी जागवल्या होत्या. सुख म्हणजे काय असते, समाधान कश्यात मानायचे असते, याची पुन्हा नव्याने जाणीव करून दिली होती, जी लाखमोलाची होती. आज मी यांच्या आयुष्यात एक अशी आठवण सोडून गेलो तर ती याची परतफेडच झाली असती.

अशा गोष्टी मेहेरबानी किंवा कणव किंवा (क्वचितप्रसंगी) कर्तव्य म्हणून न करता स्वान्तसुखाय करायच्या असतात. कधी कधी समाजापेक्षा आपण आपल्या स्वत:चंच देणं जास्त लागतो.

लिखते रहो भैया...

तुमचा अभिषेक's picture

13 Feb 2013 - 1:04 pm | तुमचा अभिषेक

आपला प्रतिसाद आवडला :)

मराठे's picture

12 Feb 2013 - 10:35 pm | मराठे

खूप छान लिहिलंय.

श्रीरंग_जोशी's picture

12 Feb 2013 - 11:00 pm | श्रीरंग_जोशी

लेखन आवडले.

पु.ले.शु.

शैलेंद्रसिंह's picture

12 Feb 2013 - 11:31 pm | शैलेंद्रसिंह

ऑर्कुटवर वाचली होती ही कथा. अभिषेकच्या सगळ्याच कथा अप्रतिम असतात. ऑर्कुट कम्युनिटीजचा सुपरस्टार आहे अभिषेक. मिपा आता अधिकच बहरणार हे मात्र नक्की.

तुमचा अभिषेक's picture

13 Feb 2013 - 1:10 pm | तुमचा अभिषेक

अहो शैलेंद्रजी उगाच इथे अफवा पसरवू नका. ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे लिखाणामुळे नाही तर वेगवेगळे धागे काढणे, समूह सक्रिय करणे आणि खरे तर किड्यांमुळे झालोय. जोपर्यंत ऑर्कुट आहे तोपर्यंत आपले पहिले प्रेम तेच, सारे वादविवाद तिथेच. इथे मी चांगल्या लिखाणाच्या शोधात आलोय आणि ऑर्कुट आटोपले की भविष्यकाळाची तरतूद म्हणून.. :)

शैलेंद्रसिंह's picture

13 Feb 2013 - 10:19 pm | शैलेंद्रसिंह

किडे करुन कोणी सुपरस्टार बनत नाही..तु लिहितोच खुप छान...अजुन लिखाण येऊ दे..मिपावर लिहिता होऊन भविष्यकाळाची तरतुदही चांगलीच केलीयस..पुढील लिखाणाला शुभेच्छा :)

ब़जरबट्टू's picture

24 Jul 2014 - 4:07 pm | ब़जरबट्टू

ऑर्कुट आटोपते घेतेय, म्हणून तुमचा हा आवडलेला लेख वर ओढतोय,... :)

तुमचा अभिषेक's picture

29 Jul 2014 - 9:35 pm | तुमचा अभिषेक

हा हा .. हो, ३० सप्टेंबरला आटोपतेय, त्यानुसार तेथील वावरही आताच आटोपता घेतलाय. :(
आता मिपा/माबो या दोन्ही मराठी संकेतस्थळांवरचा वावर वाढेल. चांगले लिखाण आणि चांगल्या चर्चा वाचल्या जातील. जे होते ते चांगल्यासाठीच.
हा माझा अगदी सुरुवातीच्या काळातला आणि आवडता लेख वर काढून मलाच परत त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद :)

यसवायजी's picture

12 Feb 2013 - 11:46 pm | यसवायजी

:)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Feb 2013 - 12:44 am | विश्वनाथ मेहेंदळे

मस्त लिखाण. पदार्पणात शतक ठोकले हो.

अवांतरः- "राजा शिवाजी"चे का हो तुम्ही ??

तुमचा अभिषेक's picture

13 Feb 2013 - 1:12 pm | तुमचा अभिषेक

हो, मी राजा शिवाजीचाच, दादर हिंदू कॉलनी.. कसे ओळखलेत.. लेखात काही उल्लेख आहे का तसा..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Feb 2013 - 1:03 am | विश्वनाथ मेहेंदळे

लेखात थेट उल्लेख नाही काही. पण Deductive reasoning हा आपला आवडता प्रकार आहे :-)

प्राथमिक शाळेतून दादरच्या एका नावाजलेल्या माध्यमिक शाळेत जाऊ लागलो तसा पॉकेटमनी वाढला

असा उल्लेख करावा अशा मराठी शाळा दादरला दोनच (माझ्या लेखी, उगाच परत वाद नको). एक राजा शिवाजी आणि दुसरी बालमोहन. एकूणच लिखाणात उल्लेख केलेली परिस्थिती पाहता बालमोहन सारख्या तशा थोड्याश्या upscale शाळेतली परिस्थिती वाटत नाही. बालमोहन मधील मुले साडेपाच रु च्या म्याचेस घेतील हे जरा कठीण वाटते.

पण एक दिवस आमच्याच एरीआतील जवळच्या एका वाडीतील सात-आठ पोरे आम्हाला मॅच घेतात का म्हणून विचारायला आली.

ही भाषा बालमोहनीय वाटत नाही. शिवाय वडापाववाल्याचा उल्लेख आहे. बालमोहनमधील मुले थेट फ्रान्की खात असतील असे मला उगाचच वाटते ;-)

म्हणून तुम्ही राजा शिवाजीचे मावळे असाल असा कयास बांधला.

उपास's picture

14 Feb 2013 - 1:17 am | उपास

जियो! बरोब्बर अंदाज बांधलात..मलाही तस्सच वाटलं, कारणांसहित तंतोतंत! द्वारकानाथ संझगिरीचा एक लेख नुस्ताच वाचला त्यात त्याने 'बालमोहन' आणि 'राजा शिवाजी' ह्या संस्कृतीवर काहिसं असंच बोट ठेवलं होतं.. :) एरवी शिवाजी पार्क आणि माटुंगा जिमखाना/दडकर मैदान हा कालातीत वाद! :) दादर पूर्व आणि पश्चिम मधले हे वैचारिक/ भावनिक वेगळेपण समजण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी तेथे काही काळ घालवायला लागतो हे ही खरचं!
-(दादरप्रेमी गिरगावकर)
उपास

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Feb 2013 - 1:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

बालमोहनच्या मुलांबद्दलची सगळीच मते मला इथे नाही मांडता येणार. आमचे काही जवळचे मिपामित्र बालमोहन वाले आहेत ;-)

(राजा शिवाजीचा कट्टर मावळा) विमे :-)

तुमचा अभिषेक's picture

14 Feb 2013 - 8:01 pm | तुमचा अभिषेक

क्या बात है, अगदी बरोबर... पुढच्या वेळी शाळा कॉलेज ऑफिस घरचापत्ता फोननंबर सारे उल्लेख जपूनच.. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Feb 2013 - 12:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

अहो इतकेच कशाला, वडापावच्या किमती वरून ही किती सालची गोष्ट आहे ते पण ओळखता येईल की. मला त्याच्या किमतीची हिस्ट्री पण बर्यापैकी आठवते आहे ;-)

आदूबाळ's picture

15 Feb 2013 - 1:01 am | आदूबाळ

माझा अंदाज १९९३-९५ ची गोष्ट असावी!

असले उद्योग करायला खूप मजा येते. असलंच डिडक्टिव्ह रीझनिंग वापरून लंपनकथा बेळगावात घडल्या आहेत आणि "शाळा" कादंबरीचं गाव डोंबिवली आहे असं मला वाटतं.

उपास's picture

15 Feb 2013 - 2:00 am | उपास

दादर पूर्व - हिंदू कॉलनीचा एरिया आणि २० वर्षांपूर्वीचा कालखंड वाटतोय. आम्ही सुद्धा त्या दरम्यान अश्याच वाड्या-वाड्यांत मॅचेस घ्यायचो (वाडी हा उल्लेख खास गिरगावकरी - फणसवाडी, केळेवाडी, कांदेवाडी). त्यावेळी दुचाकी आणि चारचाकींची गर्दी नसल्याने निवांत खेळता येत असे (वाळवणांची काळ्जी घेऊन),

कथेसंदर्भात :
गोष्ट शेवटाला अली तशी पु लंं च्या 'एक शून्य मी' मधली पणती मध्ये तेल मागणारी मुलगी डोळ्यासमोर आली, तसं काहीसं वाटून गेलं.

अवांतर :
बरं, त्या वडा-पावच्या किंनतीवरुन - मेहेंद्ळे मुंबईतील वर्षागणिक वाढणारी किंमत असा विदा मिळू शकेल काय कुठे? म्हणजे ८०-८२ तो ६० पैसे होत, ८५-८६ तो ७५ पैसे, ८८-९० तो १ रुपया.. असं काहीसं. त्याचा ग्राफ मिळाला तर उत्तम!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Feb 2013 - 5:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शाळेबाहेरचा वडापाव १९९१ साली सव्वा रुपयाला होता, तो १९९७ साली अडीच पर्यंत गेला. त्यावरून काळाचे रफ गणित मांडता येईल. स्थळ हिंदू कॉलनी वाटत नाही. गिरणगाव वाटते. म्हणजे साधारण लालबाग-परळ किंवा फारतर नायगाव. पण वरील एका प्रतिसादात लेखकाने आपण माझगावचे असे लिहिले आहे, त्यामुळे प्रश्नच संपला.

तुमचा अभिषेक's picture

15 Feb 2013 - 8:48 pm | तुमचा अभिषेक

मान गये उस्ताद... सारे अंदाज अचूकतेच्या अगदी जवळ.. :)

तसेही माझे बरेच लिखाण वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असते. काल्पनिक किंवा हवेत लिहिण्याएवढी प्रतिभा नाहिये माझ्यात, त्यामुळे पुढेही जसा मिसळपाववर लिहिता होईन तसे माझे नाव गाव फळ फूल एकेक गोष्टी बाहेर पडणारच.. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Feb 2013 - 12:50 am | विश्वनाथ मेहेंदळे

Dont worry, काल्पनिक लिहिले तरी ते कळतेच. मिपा के जासूस चारो ओर फ़ैले हुए हय !!!

काळजात लक्कन हलविणारे लिखाण.

कवितानागेश's picture

13 Feb 2013 - 12:50 am | कवितानागेश

छान लिखाण. :)

वाचनखूण साठवल्या गेली आहे. लैच उमदे लिखाण!!!!!

उमदं लिखाण .... छान विशेषण वापरलं आहे. :)

मोदक's picture

13 Feb 2013 - 1:57 am | मोदक

+१ हेच बोल्तो...

सुधीर's picture

13 Feb 2013 - 11:48 am | सुधीर

सहीच! मजा आली वाचून.

किसन शिंदे's picture

13 Feb 2013 - 10:56 pm | किसन शिंदे

लहानपणातली खाद्यजत्रा अगदी नेमकी लिहली आहे. तुम्ही लिहलेले बालपणातले प्रत्येक क्षण मी स्वतः जगलो असल्यामुळे हे लिखान खुप जवळचं वाटलं. खुप सुंदर लिहताय, असेच छान छान लिहीत रहा. :)

मिपावर स्वागत!

मिहिर's picture

14 Feb 2013 - 10:47 pm | मिहिर

लेखन फार आवडले.

अर्धवटराव's picture

16 Feb 2013 - 2:44 am | अर्धवटराव

सगळच लाजवाब... ति मॅच, ति उसळ, पाचांतली कॅमेस्ट्री, रस्त्यावर सांडुन देखील एका सहृदयातुन पुनर्जीवीत झालेली पाव विरहीत भाजी... क्लास

अर्धवटराव

तुमचा अभिषेक's picture

21 Feb 2013 - 9:29 am | तुमचा अभिषेक

सर्व प्रतिसादांचे एकत्रित आभार मानतो.

समीरसूर's picture

25 Jul 2014 - 10:15 am | समीरसूर

अतिशय सुंदर लिखाण!

खूप सुंदर लिहिलंय… व्वा… खूप नोस्टेल्जिक आणि इमोशनल व्हायला झालं… खूप खूप धन्यवाद… खूप सुंदर…. जियो….!!!