ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जनातलं, मनातलं
14 Feb 2013 - 12:34 am

ट्रोजन युद्ध पहिला भाग.

ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :)

इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका:

अखेरीस ८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रीक आरमारी ताफा ट्रॉयला जाण्यासाठी सज्ज झाला. ट्रॉयला येऊन ९ वर्षेही उलटून गेली. मागील भागात सांगितल्याप्रमाणे तोपर्यंत हट्टी अ‍ॅगॅमेम्नॉनला शिव्या घालत आणि अकीलिस-ओडीसियस आदि वीरांच्या पराक्रमाने थक्क होत ग्रीक योद्धे निवांत मजा करत होते. कुठे एखादे बेट लुटावे, कधी बाया पळवून आणाव्या, रात्री बैल-मेंढे मारून निवांत खावे आणि झ्यूसदेवाला अर्पण करण्याच्या नावाखाली अँफोरेच्या अँफोरे भरून दारू ढोसावी, असा त्यांचा निवांत दिनक्रम चालला होता. तसे म्हटले तर निवांत पण बोअरिंगच होते सगळे जरा. अजून ट्रोजन लोकांबरोबर "फायनल काऊंटडाऊन" झाला नव्हता. नाही म्हटले तरी ट्रॉयच्या भुईकोटाची अन हेक्टर, सार्पेडन आदि योद्ध्यांची थोडी धास्ती होतीच ग्रीकांना. त्यातच परत ग्रीक छावणीत प्लेगची साथ पसरली. साहजिकच आहे म्हणा ते. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र राहिल्यावर ते कधी ना कधी होणे हे ठरलेलेच होते.

[इकडे ट्रोजनांची स्थितीपण काय लै भारी नव्हती. अख्ख्या ग्रीसमधले अतिरथी-महारथी आपापली शस्त्रे परजत गोळा झालेले, त्यात परत ग्रीकांकडून ट्रोजनांच्या सप्लाय लाईन्स कट करायचे प्रयत्न नेहमीच सुरू असत. ११ बेटे अन १२ शहरे ग्रीकांच्या ताब्यात गेल्यामुळे त्यांची पोझिशन तशी नाजूकच होती. त्यांचे सहकारीदेखील कमी होते.एकुणात, उभयपक्षी वातावरण टेन्स होते.]

इलियडचे थोडक्यात बहिरंगपरीक्षणः

Homer

या पार्श्वभूमीवर सुरूवात होते इलियड या अंधकवी यवनव्यास होमरकृत महाकाव्याची. इलियड अन ओडिसी ही ग्रीकांची रामायण-महाभारतेच जणू. फरक इतकाच, की रामायण आणि महाभारतातील वर्ण्य विषय, व्यक्ती, इ. खूप वेगळ्या आहेत तर एकाच ट्रोजन युद्धाशी संबंधित ही दोन काव्ये आहेत- इलियडचा हीरो आहे अकीलिस तर ओडिसीचा हीरो आहे ओडीसियस. काव्याचे नाव इलियड असायचे कारण म्हंजे होमर ट्रॉयला इलिऑस/इलियम म्हणतो, इलियमसंबंधीचे काव्य ते इलियड. [ जसे रोमन कवी व्हर्जिलने रोम शहराच्या एनिअस नामक संस्थापकावर लिहिलेल्या काव्याचे नाव एनिअड आहे.] महाभारतात जसा पर्व-अध्याय-श्लोक असा फॉर्मॅट आहे, तसा इथे "बुक्स" चा फॉर्मॅट आहे. पूर्ण काव्य हे २४ "पुस्तकांत" विभागलेले आहे. आणि टोटल ओळी या १५,६९३ इतक्या आहेत. लै काही मोठे नाही इतके नक्कीच खरे. बाकी इलियड आणि ओडिसी या काव्यांच्या एकत्रित विस्ताराच्या ८ पट आपले महाभारत आहे असेही एके ठिकाणी वाचलेय. साधारणपणे इ.स.पू.८०० च्या सुमारास हे काव्य रचले गेले असे मानले जाते. या प्रश्नाची चर्चा नंतर विस्ताराने करूच.

जुन्या कुठल्याही काव्याप्रमाणे, पूर्ण इलियड हे छंदोबद्ध आहे. वृत्ताचे नाव आहे "डॅक्टिलीक हेक्सामीटर". म्हंजे काय ब्वॉ? आपल्या अक्षरगणवृत्तांत जसे गण असतात, उदा. य, म त, र, ज, न, स, आणि ल, ग(अनुक्रमे र्‍हस्व आणि दीर्घ साऊंड), तसे पाश्चिमात्य छंदःशास्त्रातदेखील गण आहेतच-ती कल्पना सगळीकडे असतेच. एक फरक असा, की आपल्याकडे अक्षरगणांची रचना फारच टाईट असते, जरा जरी क्रम बदलला तरी लग्गेच वृत्त वेगळे म्हटले जाते. तिकडे तसे नाही. एक स्ट्रक्चर दिले तरी विदिन सम लिमिट्स थोडे फेरफार चालतात. असो. हां तर "डॅक्टिलीक हेक्सामीटर" म्हणजे "डॅक्टिल" नामक गण सहा वेळा वापरलेले वृत्त (हेक्सामीटर). तर आता डॅक्टिल म्हणजे कोणता गण? मुळात डॅक्टिल किंवा दाक्तिलॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे "बोट". खाली दिलेल्या चित्रावरून कल्पना स्पष्ट होईल.

हाताच्या बोटांत एक मोठे पेर आणि दोन लहान पेरे जशी असतात, तद्वतच या डॅक्टिल गणात सुरुवातीला एक गुरु अक्षर आणि नंतर दोन लघु अक्षरे येतात. म्हणजे हा तर झाला आपला भ गण!! -UU अशी त्याची रचना आहे. होमरच्या काव्याची साधारण रचना इलियडच्या पहिल्या ओळीचा वापर करून अशी दाखवता येईलः

μῆνιν ἄειδε, θεά, Πηληϊάδεω Ἀχιλῆος

या ओळीचे वृत्ताच्या सोयीसाठी भाग केले.

μῆνιν ἄ | ειδε, θε | ά, Πη | ληϊά | δεω Ἀχι | λῆος
मेऽनिन् आ | इऽदे थे | आ,ऽ पे | लेइआ | दे आखि | लीऽऑस्.
| -UU | -UU | -U | -UU | -UU | -U |
| भ | भ | लग | भ | भ | ल ग |

इथे लघुगुरू म्हंजे र्‍हस्वदीर्घाच्या आधारे नसून बोलताना कसे आघात होतात त्यावर आहे. पहिला, दुसरा, चौथा, अन पाचवा हेच गण डॅक्टिल ऊर्फ भगण आहेत. पण डॅक्टिलिक हेक्सामीटरची रचना ही साधारण अशीच असते खरी. प्रत्येक गण हाही ३ अक्षरांचाच असतो असे नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. हे वृत्त पाश्चिमात्य कवितेत लैच प्रतिष्ठेचे वगैरे मानले जाते. या वृत्ताला एक छान लय आहे, त्यामुळे मोठमोठी काव्ये, वर्णने वगैरे या वृत्तात झोकात करायला अन वाचायला मजा येते.

इलियडच्या बहिरंगपरीक्षणानंतर आता त्याच्या कथाभागाकडे वळू. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे २४ भाग आहेत. त्याच्या सुरुवातीच्या ओळी खूप बोलक्या आहेत.

संदर्भः पर्स्यूस प्रोजेक्ट.

μῆνιν ἄειδε θεὰ Πηληϊάδεω Ἀχιλῆος, मेऽनिन् आइदे थेआ पेलेइआदेऑ आखिलीऑस,
οὐλομένην, ἣ μυρί᾽ Ἀχαιοῖς ἄλγε᾽ ἔθηκε, ऊलॉमेनिन, ई मिरिऽ आखेईस आल्गे एऽथिके,
πολλὰς δ᾽ ἰφθίμους ψυχὰς Ἄϊδι προΐαψεν, पॉल्लास द इफ्थिमूस प्सिखास आइदि प्रिआफेन,
ἡρώων, αὐτοὺς δὲ ἑλώρια τεῦχε κύνεσσιν, ईरॉऑन, आव्तूस दे एलेऑरिआ तेव्खे कीनेस्सिन,
οἰωνοῖσί τε πᾶσι, Διὸς δ᾽ ἐτελείετο βουλή, ईऑनीसी ते पाऽसि, दिऑस द एऽतेलिएतॉ वुली.
ἐξ οὗ δὴ τὰ πρῶτα διαστήτην ἐρίσαντε, एक्स ऊ दी ता प्रॉऽता दिआस्तीतिन एऽरिसान्दे,
Ἀτρεΐδης τε ἄναξ ἀνδρῶν καὶ δῖος Ἀχιλλεύς. आत्रिदीस ते आनास आन्द्रॉन के दिऽऑस आखिलेउस,
τίς τ᾽ ἄρ σφωε θεῶν ἔριδι ξυνέηκε μάχεσθαι; तिस त आऽर स्फॉए थेऑन एऽरिदि क्सिनेऽइके माहेस्थे,
Λητοῦς καὶ Διὸς υἱός: ὃ γὰρ βασιλῆϊ χολωθεὶς लितूस के दिऑस निऑस, ऑ गार वासिऽलि हॉलॉथीस,
νοῦσον ἀνὰ στρατὸν ὄρσε κακήν, ὀλέκοντο δὲ λαοί, नूसॉन आना स्त्रातॉन ऑर्से काकीन, ऑलेकॉन्दॉ दे लाइ,

याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन रफलि असे: (संदर्भः क्लासिक्स आर्काईव्ह)

"Sing, O goddess, the anger of Achilles son of Peleus, that brought countless ills upon the Achaeans. Many a brave soul did it send hurrying down to Hades, and many a hero did it yield a prey to dogs and vultures, for so were the counsels of Jove fulfilled from the day on which the son of Atreus, king of men, and great Achilles, first fell out with one another."

होमर हा देवीला आवाहन करतोय अकीलिसच्या रागाची कवने गाण्याचे. अ‍ॅगॅमेम्नॉनवर रागावून बसल्यामुळे अकीलिसने युद्धात भाग घेतला नाही. आणि अकीलिस नाही म्हणजे त्याची ती मुंग्यांसारखी खूंखार मॉर्मिदॉन सेनादेखील नाही. त्यामुळे हेक्टरादि ट्रोजन योद्ध्यांनी ग्रीक सेनेची चटणी-सांबार उडवणे यथास्थित सुरू केले. त्यातच कर्मधर्मसंयोगाने अकीलिसचा प्रिय मित्र पॅट्रोक्लीस हा हेक्टरकडून मेला. त्यामुळे चिडून अकीलिसने महायुद्ध सुरू केले आणि शेवटी हेक्टरला मारले. हेक्टर मरतो तिथे इलियडदेखील संपते. एकूणच , इलियड वाचताना जाणवत राहतो तो म्हणजे अकीलिसचा "नखरा". तुलनेने शौर्य इतके कुठे दिसून येत नाही.

ही झाली एकपरिच्छेदी इलियडकथा. आता या कथेतले विस्तृत पदर बघू.

यवनव्यास होमर आपल्या इलियडची सुरुवात करतो ती अकीलिस आणि अ‍ॅगॅमेम्नॉन यांमधील भांडणाने. ग्रीक सैन्यात प्लेग आलेला होता आणि टिपिकल मायसीनियन ग्रीक समजुतीप्रमाणे देवाला बळी अर्पण केल्याशिवाय त्याचे निवारण होणे अशक्य होते, कारण प्लेगचा प्रादुर्भावसुद्धा देवाच्या क्रोधामुळेच झाला होता. इथे देव आहे अपॉलो द फार डार्टर ऊर्फ भटक्या. ९०% ग्रीक देव हे झ्यूसची संततीच असतात तसाच हाही. हा तेव्हाचा धन्वंतरी म्हटला तरी चालेल. पण मग या धन्वंतरीसाहेबांना रागवायला काय झाले होते बरे असे?

तर ग्रीकांच्या लुटीत ट्रॉयजवळचे ईतिऑन नामक एक शहर लुटले गेले, बायाही पळवून आणल्या गेल्या. त्यात अपोलोचा भटजी "क्रिसेस" याची देखणी कन्याही यवनांनी पळवली.क्रिसेसभट्ट मग यवनराज अ‍ॅगॅमेम्नॉनकडे गेले, आपल्या पोरीच्या सुटकेसाठी खूप याचना केली. पण तो कुठला ऐकतोय? दिले हाकलून. मग त्याने अपॉलोची प्रार्थना केली. आपल्या भक्तावरचा हा प्रसंग ऐकून अपॉलो आपले धनुष्यबाण घेऊन ऑलिंपस पर्वत दरदर उतरून आला आणि सपासप ग्रीकांना मारू लागला-म्हणजेच प्लेग आला. दिवसभर लोकांच्या चिता जळत होत्या.

आता ग्रीकांचा धीर खचला. ताबडतोब सभा भरली. ग्रीकांचा मुख्य राजपुरोहित काल्खस याला कारण माहिती होते, पण सत्तेपुढे शहाणपण चालते थोडीच? त्यामुळे त्याने अकीलिसकडून अभय मागून घेतले. अकीलिसने "अगदी अ‍ॅगॅमेम्नॉन जरी तुझ्या जिवावर उठला तरी मी तुझ्या पाठीशी आहे" अशी ग्वाही दिल्यावर मग काल्खस सरळ मुद्द्यावर आला, आणि अ‍ॅगॅमेम्नॉनने क्रिसेसची मुलगी क्रिसीस हिला समारंभपूर्वक सोडून देऊन अपॉलोला बळी म्हणून बैल-बोकड अर्पण करावेत, असे तो बोलता झाला.

यावर सर्व ग्रीकांनी आपली संमती दर्शवली, पण अ‍ॅगॅमेम्नॉन मात्र खवळला. बाकीच्या राजांनी आपले जनानखाने बाळगावेत आणि सर्वांच्या बॉसने मात्र तस्सेच बसून राहावे हे त्याला बिल्कूल पसंत नव्हते. जर अपॉलो देव चिडला असेल तर क्रिसीसला परत देऊ, पण मला रिप्लेसमेंट पाहिजे, असा त्याने धोशा लावला. त्यावर अकीलिसने त्याला लै शिव्या घातल्या. सर्व ग्रीसमध्ये पॉवरफुल असलेल्या अ‍ॅगॅमेम्नॉनला अशा तोंडावर शिव्या घालणे लैच डेअरिंगचे काम. ते ऐकून अ‍ॅगॅमेम्नॉनही चिडला, आणि क्रिसीस नाही तर अकीलिसची "ब्रिसीस" नामक रखेलच सही, असे म्हणून तिला अकीलिसपासून हिरावून घेण्याची धमकी दिली, वर "चड्डीत रहा, तुझी पायरी ओळख," असा दमही दिला.

आता मात्र अकीलिसची सटकली. हावरट, भित्रा, ठरकी, इ. शिव्यांनी अ‍ॅगॅमेम्नॉनला सर्वांसमोर लाखोली वाहून त्याने शेवटी "युद्धातून आम्ही ढिस" ही निर्णायक धमकी दिली."ढीस तर ढीस", असे अ‍ॅगॅमेम्नॉन म्हणाला. यवनभीष्मच जणू असा वयोवृद्ध पायलॉसचा राजा नेस्टॉर शिष्टाई करू लागला होता, पण तीही फुकट गेली. अ‍ॅगॅमेम्नॉनचे दोघे रक्षक येऊन ब्रिसीसला घेऊन गेले आणि अकीलिस आपल्या २,५०० सेनेसह स्वस्थ बसला, पण रणवाद्यांची गर्जना ऐकून स्फुरण चढणे तर सुरूच होते. शेवटी आपली अप्सरा आई थेटिसला त्याने अ‍ॅगॅमेम्नॉनबद्दल सांगितले. आईनेही आपल्या पोरासाठी ऑलिंपसमध्ये झ्यूसकडे वशिला लावेन असे सांगितल्यावर तो जरा स्वस्थ झाला. झ्यूसनेही थेटिसचे ऐकून हेक्टरकडून ग्रीकांना चांगली अद्दल घडेल पण बायको हेरा न रागावेल, अशी तजवीज करायला सुरुवात केली.

अखेरीस ग्रीकांचा बेत ठरला. एक निर्णायक हल्ला होऊनच जाऊदे म्हणून. त्यातच अ‍ॅगॅमेम्नॉनला स्वप्न पडले आणि त्याचा विजय निश्चित होईल अशी आकाशवाणी त्यात झाली. मग त्याने एक मोठी सभा बोलावली, पण वेगळेच कैतरी बोलू लागला, "आपल्याला ट्रॉय घ्यायला जमणार नाही", वगैरे. बहुतेक लोकांचा रिस्पॉन्स पहायचा असावा. मग ग्रीक लोक परतीच्या मार्गावर जाऊ लागले तसे यवनकृष्ण ओडीसिअसने त्यांना गोष्टी युक्तीच्या चार सांगून परत फिरविले. थर्सितेससारखा एक किरकिरा शिपाईही त्याने गप्प बसविला आणि सर्वजण उत्साहाने युद्धावर निघाले. मागे सांगितल्याप्रमाणे कॅटॅलॉग ऑफ शिप्समध्ये कोणत्या योद्ध्याचे किती सैनिक, किती जहाजे ही सर्व आकडेवारी त्यात आलेली आहे. ट्रोजन वीरांमध्ये एनिअस, टेक्टॉन, ग्लॉकस, मेम्नॉन, सार्पेडन आणि हेक्तर हे मुख्य लोक होते. ग्रीकांच्या तयारीचा वास येताच ट्रोजनांनीही तयारी सुरू केली.

दुसर्‍या दिवशी, दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकली. होमरच्या म्हणण्यानुसार, जवळपास सगळे मिळून लाख-दीड लाखाचे तरी ग्रीक सैन्य असेल. ट्रोजन सेनेचा आकार तितका अचूक दिलेला नाही, पण यापेक्षा लै काही लहान असेल असेही वाटत नाही. सगळे एकत्र जमल्यावर हेक्टरने घोषणा केली, की उगा बाकीच्यांनी लढण्याऐवजी हेलेनच्या दोन दादल्यांनी आपसात काय ते भांडून भुस्काट पाडावे, त्यांच्या वैयक्तिक लढाईत जो विजेता होईल, त्यालाच हेलन मिळेल.
हेलेनचा नवरा मेनेलॉसला तेच तर पाहिजे होते. इकडे पॅरिसची मात्र वाईट फाटली होती. मग हेक्टरने त्याला चार शिव्या घातल्या, मर्दानगीची आठवण करून दिली, आणि लढायला पाठवले. पण हा पॅरिस जरा लढाईत कच्चाच असावा, मेनेलॉसच्या तलवार-भाल्याचे वार चुकवता चुकवता त्याच्या नाकी नऊ आले आणि अखेरीस कुठूनतरी खोपचीतून तो सटकला. होमरबाबांनी इथेही मिनर्व्हा देवीला मध्ये आणले आहे. मिनर्व्हाची कृपा असल्यामुळेच पॅरिस सुटला, नैतर त्याचे काही खरे नव्हते.
इकडे हेक्टर-पॅरिसचा बाप, ट्रॉयचा राजा प्रिआम हा ट्रॉयच्या भुईकोटाच्या तटावरून युद्ध बघत होता. हेलेनसाठी चाललेले युद्ध बघण्यासाठी मुद्दाम त्याने तिला पाचारण केले. तिलापण कळूदे काय ते, अशी भावनाही असेल त्यामागे, कुणी सांगावे? इकडे हेलनची मनःस्थिती द्विधा झाली होती. कधी पॅरिस हवाहवासा वाटे, तर कधी मेनेलॉस.पॅरिस तिथून पळून आल्यावर हेलनने त्याला पळपुट्या वगैरे शिव्या घातल्या, पण ती इतकी भारी दिसत होती की पॅरिसला अनंगशराने विद्ध करायचे ते केलेच ;)

हा झाला इलियडमधील सुरुवातीचा काही भाग. पुढील कथाभाग येईल लवकरच :)

(क्रमशः)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

14 Feb 2013 - 1:03 am | अग्निकोल्हा

थोडं अजुन खुलवुन लिहलं तर एक अत्युत्तम लेखमाला म्हणुन प्रसिध्द पावेल असा विश्वास वाटतो. पुढिल भाग लवकर टाका.

त्यातच अ‍ॅगॅमेम्नॉनला स्वप्न पडले आणि त्याचा विजय निश्चित होईल अशी आकाशवाणी त्यात झाली. मग त्याने एक मोठी सभा बोलावली, पण वेगळेच कैतरी बोलू लागला, "आपल्याला ट्रॉय घ्यायला जमणार नाही", वगैरे. बहुतेक लोकांचा रिस्पॉन्स पहायचा असावा. मग ग्रीक लोक परतीच्या मार्गावर जाऊ लागले

समजलं नाही. आता विजय निश्चीत आहे म्हटल्यावर हा भाउ कशाला उलटला ?

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 1:12 am | बॅटमॅन

धन्यवाद :)

हा पार्ट मलाही जरा विचित्र वाटला. अ‍ॅगॅमेम्नॉनला कदाचित रिस्पॉन्स पहायचा असेल लोकांचा. मूळ कथेत म्हटलेय, की आधी त्याने फक्त राजांची एक मीटिंग घेऊन त्यांना स्वप्नात खरे काय घडले ते सांगितले, फक्त सांगताना मी उलटे सांगेन आणि मग तुम्ही लोकांना धीर द्या वगैरे वगैरे सांगितले. यामागचे कारण मलाही कळले नाही. पण कदाचित कोणी गद्दार वगैरे असतील तर पाहणे हा हेतू असावा की काय, अशी शंका येते. थर्सितेस हा एक सोल्जर असाच भडकाऊ भाषणे करत होता, त्याला ओडीसिअसने झापून लोकांना परत न जाण्यासाठी कन्व्हिन्स केले. तशासाठी असेल कदाचित. पण येस, एकूणात हा द्राविडी प्राणायाम कशाला, हे तितकेसे क्लीअर होत नाहीच. असो. बाकी कथा सरळ आहे मात्र. :)

अभ्या..'s picture

14 Feb 2013 - 1:16 am | अभ्या..

मस्त रे आपी. मस्त लिहिला आहेस.

"ढीस तर ढीस", असे अ‍ॅगॅमेम्नॉन म्हणाला.

एकदम जिलबी चौकातल्या कट्ट्यावर बसून नुकताच शिवशंकरला पाहून आलेल्या पिच्चरच्या स्टोरीगत सांगितलास.
छान. येऊ दे पुढील भाग.

सामान्य वाचक's picture

14 Feb 2013 - 3:21 pm | सामान्य वाचक

देवल ला हल्ली नसतात का?

पैसा's picture

14 Feb 2013 - 10:34 am | पैसा

के ज पुरोहितांची चालचलाऊ गीता आठवली! =))

बरेच दिवसांनी लिहिल्यामुळे आधीचा भाग परत एकदा वाचून काढला आणि मग हा. यातील 'वीर' लोकांची आणि गावांची नावे एज ऑफ एम्पायर आणि झ्युस या २ कॉम्प्युटर गेमसमधे तोंडपाठ झालेली असल्याने नवीन वाटली नाहीत. पुढे काय घडले पाहूया!

प्रचेतस's picture

14 Feb 2013 - 11:08 am | प्रचेतस

हेच म्हणतो.
आता पुढचे भाग पटापट येऊ देत रे.

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 11:27 am | बॅटमॅन

चालचलाऊ गीता बाकी जबराट प्रकार आहे एकदम!!!

प्रसाद१९७१'s picture

14 Feb 2013 - 10:55 am | प्रसाद१९७१

हेलेन जर स्पार्टाची होती तर तिला "हेलेन ऑफ ट्रॉय" असे का म्हणले जाते?

हेलेन मूळची स्पार्टाची, पण नंतर ट्रॉयला पळून गेली पॅरिसबरोबर, म्हणून तिला हेलेन ऑफ ट्रॉय म्हटल्या जाते.

हीच नंतर बॉलीवुडात आली काय ? का ती एगळी ?

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 12:31 am | बॅटमॅन

ती येगळी. "पिया तू अब तो आजा" छाप गाणे जुन्या हेलनच्या तोंडी शोभले असते याची शंकाच आहे =))

मृत्युन्जय's picture

14 Feb 2013 - 11:13 am | मृत्युन्जय

बेष्ट. आपल्या आवडीच विषय हाय अगदी. और आन्दो.

लॉरी टांगटूंगकर's picture

14 Feb 2013 - 11:21 am | लॉरी टांगटूंगकर

भांडून भुस्काट पाडावे.., चड्डीत रहा,........
वगैरे वाचताना मेज्जर हसायला आले, :)
भारी चाललय... लिव्हत राहा

चावटमेला's picture

14 Feb 2013 - 12:23 pm | चावटमेला

छान. आवडत्या विषयावरचं लिखाण लिहिण्याच्या ष्टाईल ने अजूनच आवडलं
(लहानपणी चांदोबातली मालिका वाचून ट्रॉयच्या प्रेमात पडलेला) चावटमेला

'चांदोबातली मालिका' म्हणजे 'हिंमती हैबती' का?
फुरसत असल्यास खालील दुव्यावरून ही मालिका हुडकून बघता का?
http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm

चावटमेला's picture

15 Feb 2013 - 12:21 pm | चावटमेला

मी म्हणतोय ती मलिका 'भुवनसुंदरी' ह्या नावाने यायची. दुव्याबद्दल धन्यवाद, तो ही चेक करुन पाहतो.

मालोजीराव's picture

14 Feb 2013 - 1:34 pm | मालोजीराव

आपल्या पण आवडीचा विषय हाय हा

आपल्याला सगळ्यात आवडलेला चित्रपट आणि त्यातल्या अकिलिस ची भूमिका जबराच

.

अग्निकोल्हा's picture

15 Feb 2013 - 1:06 am | अग्निकोल्हा

पण चित्रपटातिल व्यक्तिरेखा या सदरिल पात्रे ऐतिहासीक व्यक्तिरेखा म्हणुन घटना कशा घडल्या असतिल त्या पध्दतिने मांडल्या आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हाणजे पौराणीक व्यक्तिचीत्र न्हवे, जसं कि युगंधर, मृत्युंजय कादंबर्‍या या कर्ण व श्री़कृष्णाला माणुस कल्पुन (ऐतिहासिक व्यक्तिरेखा समजुन) लिहल्या आहेत.

त्यामुळे चित्रपट व महाकाव्यात पराकोटिचा फरक आहे, पुर्ण महाकाव्य ठिकसं आठवत नाही व आत्ता विकि उचकायचीही इच्छा नाही. पण अकिलीसला म्हणे कर्णाप्रमाणे कवच कुंडले होती त्याला मारणे शक्य न्हवते, कारण तो देवमानव होता (म्हणजे आइ अथवा वडील या पैकी एक व्यक्ति देव व एक व्यक्ति माणुस असणे, जसं की महाभारतातले पांडव) पण त्याच्या पायांवर मात्र शस्त्र जखम करु शकत असे म्हणून महाकाव्यात त्याचा म्रुत्यु पायाला लागलेल्या विषारी बाणाने दाखवला आहे (जे चित्रपटात अर्थातच मुख्य कारण म्हटलेलं नाही) तसच युध्दा नंतर आग्यामेमन हॅलनवर जबरदस्तिही करतो वगैरे वगैरे चित्रपटात नसलेले इतर अनेक संदर्भ महाकाव्यात आहेत... असो. लेखमाला वाचनिय ठरणार यात शंका नाही.

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 1:10 am | बॅटमॅन

+१.

चित्रपट आणि इलियड व इतर काव्यांतील काही मुख्य फरक खालीलप्रमाणे:

१. "स्वोर्ड ऑफ ट्रॉय" अशी कुठलीही तलवार अस्तित्वात नव्हती.

२. अकीलिस स्वतः ट्रॉयच्या लाकडी घोड्यात नव्हता, कारण तो मेल्यावरच ओडीसिअसला ती कल्पना सुचली.

३. पॅरिस आणि मेनेलॉसच्या द्वंद्वात मेनेलॉस मेला नव्हता.

४. अ‍ॅगॅमेम्नॉनसुद्धा ट्रॉयमध्ये मेला नाही, तर मायसीनीला परत ल्यावर त्याचा खून झाला.

५. प्रिआमला मारले ते अ‍ॅगॅमेम्नॉनने नाही, तर अकीलिसचा मुलगा निओटॉलेमस याने.

६. हेक्टर-अकीलिसचे युद्ध जसे दाखवले तसे झालेले नाही. इतर सर्वजण स्वस्थ बसून हेच दोघे लढताहेत असे जे दाखवलेय ते सर्व चूक आहे. ऐन हाणामारीत, हेक्टर हा अकीलिसपासून पळू पाहत होता- ३ वेळा हुकवले, नंतर मात्र सापडला.

७. अकीलिसकडे एकच शिप नसून ५० शिप्स होती आणि टोटल २५०० सैनिक होते.

८. हेक्टर-अजॅक्स(तो एक ग्रीक सांड दाखवलाय तो) लढाईत अजॅक्स मेला नाही. ती लढाई ड्रॉ झाली होती. नंतर दोघांनी एकमेकांना गिफ्ट वगैरे देऊन निरोप घेतला एकमेकांचा.

९. डायोमीड नामक तरुण पराक्रमी वीराचा उल्लेखच नाही पिच्चरमध्ये.

१०. ट्रोजन हॉर्समधील वीरांना हेलनने स्वतः गाईड केले होते एकदा ट्रॉयमध्ये आल्यावर-ते कुठे दिसत नाही.

असो. किती चुका दाखवायच्या म्हणा. थोडेसे स्वातंत्र्य घेतले तर हरकत नसावी, पण इथे मेजर फारकत घेतल्याने लिहावेसे वाटले, इतकेच. याचाही उल्लेख नंतर येईलच.

बाकी हेलनवर अ‍ॅगॅमेम्नॉनने जबरदस्ती केली नव्हती. तो कथाभाग सगळा येईलच पुढे लौकर :)

अग्निकोल्हा's picture

15 Feb 2013 - 1:22 am | अग्निकोल्हा

ट्रोजन हॉर्समधील वीरांना हेलनने स्वतः गाईड केले होते एकदा ट्रॉयमध्ये आल्यावर-ते कुठे दिसत नाही

आत्ताच्या आत्ता हेलनची सगळी गाणी डिलीट मारतो, चायला पिसीत ट्रोजन आल्यावर आपलेच दात अन आपलेच ओठ व्हायच ;)

;)

घोड्याबाहेर तिने ग्रीकांच्या नावे हाका मारल्या. काहीजण याचा अर्थ असा घेतात की तिला ग्रीकांचा प्लॅन निष्फळ करायचा होता, तर काहीजण म्हणतात की सेफ लँडिंग कन्फर्म करण्यासाठी ती तसे म्हणाली. पण तिची पूर्वीची मनःस्थिती पाहता ती ग्रीकांना गाईड करेल याची शक्यता जास्त वाटते.

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 1:41 am | अभ्या..

आपी जर ट्रॉय वर एखादा बॉलीवूड पट निघाला तर हेलेनचे असले कॅरेक्टर पाहता हा रोल कुणाला मिळायला हवा रे? ;)

गरम व्हँपचा रोल केलेली कोणी असेल तिला सूट होईल बघ. प्रियांका वुड बी वन गुड चॉईस-ऐतराज़ पिच्चरमुळे फ्यान हौत आपण तिचे ;)

९. डायोमीड नामक तरुण पराक्रमी वीराचा उल्लेखच नाही पिच्चरमध्ये.

म्हणजे तो इलियडचा शत्रुघ्न होता असं वाटतं.

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 2:15 pm | बॅटमॅन

:D म्हणू शकता काही अंशी.

मृत्युन्जय's picture

20 Feb 2013 - 12:56 pm | मृत्युन्जय

अकिलीस कडे कवच कुंडले नव्हती तर त्याचे शरीर पायाला धरुन त्याच्या आईने पवित्र पाण्यात बुडवुन काढले त्यामुळे त्याच्या शरीराचा तो भाग अभेद्य बनला होता असे वाचल्याचे आठवते. ही गोष्ट थोडीफार कृष्णासारखी वाटते. अकीलीसला पायाला धरलेले असल्याने त्याचा पाय अभेद्य नव्हता आणि तिथेच विषारी बाण मारुन पॅरिसने त्याला संपवला. तर कृष्णाच्या अंगठ्याला लावायला लेप शिल्लक न राहिल्याने तो भाग अभेद्य होउ शकला नाही. त्याचा अंगठा म्हणजे सश्याचे शरीर आहे असे समजुन एका पारध्याने तिथे विषारी बाण मारला.

कर्ण आणि हेक्टरमध्ये एक साम्यस्थळ आहे की दोघेही सुर्याची उपासना करायचे. तसेच दोघांचाही अंत देवांच्या राजाच्या वरदहस्ताने प्रभावित असलेल्या व्यक्तींच्या हातुन झाला. अकीलीस वर झ्युसची कृपा होती त्याने हेक्टरला मारले तर अर्जुन तर इंद्राचा मुलगाच होता.

अकीलीस आणी कर्णामधील एक साम्य असे आहे की दोघेही सेनापतीशी वाद झाल्यामुळे काही काळ युद्धापासुन दूर राहिले.

महाभारत आणि ट्रॉय दोन्ही युद्धे वरकारणी पाहता एका स्त्रीसाठी लढली गेली पण नीट लक्षात घेता ती सत्ता आणि भूमीसाठीच लढली गेली.

बॅटमॅन's picture

20 Feb 2013 - 1:17 pm | बॅटमॅन

अगदी. स्टिक्स नदीमध्ये अकिलीसला बुचकळून काढलं, फक्त पायाचा भाग तेवढा सोडून. त्यामुळे पाय अभेद्य राहिले नाहीत. पण ही कथा कृष्णापेक्षा दुर्योधनाशी साधर्म्य असलेली वाटते. भीमाबरोबरच्या गदायुद्धाची प्रिपरेशन म्हणून गांधारीने दुर्योधनाला सांगितले, की तू माझ्यासमोर नग्न होऊन ये, मी एकदा पट्टी सोडून तुला पाहिले, की माझ्या दिव्य दृष्टीने सगळे शरीर अभेद्य होऊन जाईल. पण दुर्योधन संकोचू लागला, आईसमोर या वयात नग्न कसे जायचे म्हणून. मग कृष्णाने सांगितले, की मांड्यांवर केळीची पाने लपेटून जा म्हणून. तसे त्याने केले आणि गांधारी ओरडली, कृष्णाने डाव साधला म्हणून. त्यामुळे नेमक्या मांड्या तेवढ्या अभेद्य राहिल्या नाहीत.

बाकी कृष्णाची कथा इथे वेगळी वाटते.

अकिलीस आणि कर्णातले युद्धापासून दूर राहण्याचे साम्य आहेच, मात्र इथे त्या दूर राहण्याने ग्रीकांवर खूप लोड पडला, तसा कर्णाच्या अनुपस्थितीमुळे कौरवांवर पडलेला दिसत नाही.

महाभारत आणि ट्रॉय दोन्ही युद्धे वरकारणी पाहता एका स्त्रीसाठी लढली गेली पण नीट लक्षात घेता ती सत्ता आणि भूमीसाठीच लढली गेली.

शेवटी हेच खरं!! स्त्रीचा सन्मान वगैरे गोष्टी लोकांना सांगायला बर्‍या असता म्हणून सांगितल्या जातात, इतकेच.

गणामास्तर's picture

20 Feb 2013 - 1:39 pm | गणामास्तर

मस्तचं रे बॅट्या..

तो कथाभाग सगळा येईलच पुढे लौकर

माझं लक्ष आहे बर्का..

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2013 - 1:13 am | श्रीरंग_जोशी

आग्यामेमन वाचून हसू आले.

मालोजीराव's picture

14 Feb 2013 - 2:13 pm | मालोजीराव

ट्रॉय वरून ओडीसीयसचा घरी परतण्याचा प्रवास पण लिहिणार आहेस का रे?
लिहिणार नसलास तर लिही अशी विनंती करत आहे

खरेतर जरा द्विधा होतो याबद्दल, पण आता लिहीन असे वाटतेय. विशेषतः युद्धोत्तर काळातील घडामोडींचे जनरल प्रतिबिंब म्हणून ओडिसी फार रोचक आहे वाचायला.

उगा बाकीच्यांनी लढण्याऐवजी हेलेनच्या दोन दादल्यांनी आपसात काय ते भांडून भुस्काट पाडावे

लई भारी .... नाद खुळा ....

तेव्हड पुढच्या भागाचे लवकर बागा कि भाऊ............

इष्टुर फाकडा's picture

14 Feb 2013 - 6:01 pm | इष्टुर फाकडा

गडद उमरावा किती ताण दिलास तो...आधीचा भाग पुन्हा वाचावा लागला. असो पुन्हा वाचून मज्जाच आली. लेखमाला लय भारी आहे...पुढचा भाग लवकर येवुदे आता.

मन१'s picture

14 Feb 2013 - 6:30 pm | मन१

भन्नाट सुरुये मालिका...
फक्त पटापट येउ द्यात उर्वरित गोष्टी.
पॅरिस हे भलतच दळभद्री, बावचळेल क्यारेक्टर वाटतं.पोरिला घेउन पळून जायची हिम्मत आहे, पण लढायची नाही. फट्टू तिच्यायला.
त्या अ‍ॅगेमेनॉनवाल्यांच्या आधी ट्रॉयवाल्यांनीच ह्या नेभळट माणसाला हाणला असता तर आख्खी ट्रॉयची शोकांत/ट्रॅजेडी होण्यापासून वाचली असती.महाभारतात विराटपुत्र "उत्तर" सुद्धा (सुरुवातीला)असाच शेपूटघालू. तोही त्याच्या आसपासच्या बायकांत फार प्रसिद्ध.
.
हेलेनसाठी चाललेले युद्ध बघण्यासाठी मुद्दाम त्याने तिला पाचारण केले. तिलापण कळूदे काय ते, अशी भावनाही असेल त्यामागे, कुणी सांगावे? इकडे हेलनची मनःस्थिती द्विधा झाली होती. कधी पॅरिस हवाहवासा वाटे, तर कधी मेनेलॉस.
भेंडी!wtf?
(अ‍ॅटलिस्ट वरकरणीतरी)ह्या बयेमुळे/बयेसाठी आख्खे युद्ध सुरु असताना ही साइड कशी बदलू शकते? साइड बदलावी असं तिला का वाटत असेल? पॅरिसनी तिला टपवकलं की नाही नंतर ह्या ड्याम्बिसपणासाठी? इतकच होतं तर बया पळून गेलीच कशाला मेनेलॉसला सोडून पॅरिससोबत. र्‍हायचं असतं की तिथचं तिच्यायला. खरं प्रेम म्हणतात ते हेच काय?
.
बादवे, ही पर्फेक्ट "मानवी" कथा वाटू लागलिये.
म्हणजे "लार्जर दॅन लाइफ" धैर्य, प्रतिज्ञा, स्वतःच्या शब्दाची किंमत राखण्यासाठी स्वतःचे नुकसान करुन घेणे, प्रतिष्ठेसाठी/कर्तव्य म्हणून प्राण धोक्यात घाल्णे कींवा प्राणाची पर्वा न करणे हा बकवास इथे दिसत नाही. सगळे कसे पट्टीचे स्वार्थी,हिप्पोक्रॅट आणि वेळप्रसंगी भेकड आहेत, पर्फेक्ट नॉर्मल माणसासारखे!

-- (नॉर्मल)मनोबा
.
खरेतर कुणीतरी मोठ्ठा माणूस रामायण हे काव्य आहे, महाभारत हे वास्त्व/इतिहास आहे असे म्हणून गेला म्हणून आपण सारेच तसे म्हणतो. मला महाभारतही काव्यच वाटतं. भेंडी त्यातले क्यारेक्टर मला धेडगुजरी वाटतात. ती "अस्सल" माणसे वाटत नाहित. तसा इतिहास असणे अशक्य आहे.(कै च्या प्रतिज्ञा, कै च्या कै अपेक्षा वगैरे) मग शब्दांचे खेळ करत म्धूनच आदर्शवादी भूमिका घेत तर मधूनच अतिवास्तववादी भूमिका घेत , तार्किक कथ्थक करत पब्लिक त्याला अस्सल मानवी चेहरा देउ पाहते.
.
पण ह्या कथेचे हे कंगोरे पाहून हा मात्र नक्कीच इतिहास असणार(निदान इतिहासाचा अंश असणार) अशी शक्यता वाटते. गुलाबी मनोरे आणी सुखांत हा कादंबर्‍यांत ठीक. काहीसे असंबद्ध, मोठ्या कॅनव्हासवरील धुरकट रेषा हेच खरे वास्तव.
अर्थात, मुळातून काही न वाचता ऐकिव माहितीवर अशा मतांच्य्हा पिंका टाकणे चूकच; हे जाणवते; पण राहवले नाही.
.
इथले योद्धे घाबरतात, कुणी नाही ते शब्द देत बसत नाहीत. फुकाचे नियम बनवत , पाळत नि त्यावर रिक्कामा तात्विक वाद युद्धभूमीत घालित नाहित. जमेल तेव्हा जमेल तसं शत्रूला टपकावणं एवढेच ध्येय; तेवडहच नियम. बाकी सारं धाब्यावर. कशी अस्सल मानवी कथा आहे.

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 6:40 pm | बॅटमॅन

बेष्ट प्रतिसाद मनोबा!!!

ही कथा अस्सल मानवी आहे यात संशयच नाही- अगदी देवादिक अतिशयोक्ति असली तरीही!! एकदम मार्मिक निरीक्षण.

बाकी या घटनेशी संबंधित ऐतिहासिक पुरावे इतके चिकार आहेत की सालं फार कौतुक वाटतं. अर्थात त्यामागे गेल्या १५०-२०० वर्षांपासूनचे अव्याहत कष्ट आहेत म्हणा.

प्रचेतस's picture

14 Feb 2013 - 10:35 pm | प्रचेतस

खरेतर कुणीतरी मोठ्ठा माणूस रामायण हे काव्य आहे, महाभारत हे वास्त्व/इतिहास आहे असे म्हणून गेला म्हणून आपण सारेच तसे म्हणतो. मला महाभारतही काव्यच वाटतं.

हा जय नावाचा इतिहास आहे असे स्वतः व्यासांनीच म्हटलंय, तसेही समजा हा इतिहास नसून हे जर काव्यच असेल तर महाभारताचे श्रेष्ठत्व सहस्त्रपटीने वाढते. कारण इतकी पात्रे, इतक्या जागा, इतके प्रसंग त्याच्या असंख्य गुणवैशिष्ट्यांसह दाखवणे हे आत्यंतिक महान प्रतिभेशिवाय शक्यच नाही.

भेंडी त्यातले क्यारेक्टर मला धेडगुजरी वाटतात. ती "अस्सल" माणसे वाटत नाहित. तसा इतिहास असणे अशक्य आहे.(

धेडगुजरी शब्द वाचून जरा हसूच आले. रामायण तसे आहे आदर्शवत. राम आदर्श, त्यांचे बंधू आदर्श, पत्नी आदर्श, प्रजा आदर्श आणि खलपुरुषही आदर्शच. पण महाभारताचे तसे नाही. दुर्योधन, दु:शासन, कर्णादिकांचे जसे येथे गुण दाखवले आहेत तसेच कृष्ण, भीष्म, धर्मादिकांचे येथे दोषही दाखवलेले आहेत. येथे कुणीही कचकड्याच्या बाहुल्याप्रमाणे नाही.
महाभारतातील पात्रे उलट अगदी अस्सल वाटतात. सामान्य माणसांना जे गुणदोष, रागलोभ आदी असतात ते महाभारतात अगदी यथास्थित दाखवलेले आहेत.
आणि महाभारताचा शेवटही सुखांत नाहीच.

एकदा संपूर्ण महाभारत वाचून बघाच मनोबा.

इष्टुर फाकडा's picture

15 Feb 2013 - 2:24 am | इष्टुर फाकडा

वल्लींशी हजारबार सहमत ! वेल पुट वल्ली :)

खरडवहीत अधिकच्या शंका विचारीन म्हणतो

प्रचेतस's picture

15 Feb 2013 - 9:33 am | प्रचेतस

वोक्के.

चित्रगुप्त's picture

16 Feb 2013 - 9:19 pm | चित्रगुप्त

एकदा संपूर्ण महाभारत वाचणे हा अनेक वर्षांपासूनचा बेत अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही.
ते गोनिदांचे, शिवाय युगांत, ब्यासपर्व, हा जय नावाचा इतिहास व या प्रकारची अन्य पुस्तके वाचली आहेत, पण अगदी इत्थंभूत महाभारत नाही.
आता वाचायचे म्हटले, तर (मराठीतून) कोणते घ्यावे,(इतिहासाचार्य चिंतामणि वैद्य यांचे हल्ली उपलब्ध आहे का ?) तसेच जालावर मराठी महाभारत आहे का वगैरे माहिती दिल्यास उत्तम.

प्रचेतस's picture

16 Feb 2013 - 10:16 pm | प्रचेतस

मराठीतून वाचण्यासाठी सध्या दोन प्रकाशनांचे खंड उपलबध आहेत.
विदर्भ मराठवाडा बुक कंपनीने काढलेले ११ खंड सर्वोत्तम आहेत. उत्तम अनुवाद. चांगला टाईप. याचे संपादन प्र.न. जोशी यांनी केलेले आहे.
वरदा प्रकाशनाचेही बहुधा ११ खंड आहेत. संपादक आहेत भालबा केळकर.
दोन्ही प्रकाशनांमध्ये संपूर्ण महाभारत तसेच हरिवंश पण समाविष्ट आहे.

चिंतामणी वैद्यांचे मला तरी कुठे आढळले नाही.
जालावर इंग्लिश आणि संस्कृतमधले महाभारत उपलब्ध आहे.
http://www.sacred-texts.com/hin/index.htm#maha

चित्रगुप्त's picture

16 Feb 2013 - 10:43 pm | चित्रगुप्त

माहितीबद्दल आभार.
चिंतामणी वैद्यांचे बहुधा अठरा खंड असून त्यातल्या शेवटल्या खंडात महाभारत काळाविषयी खूप चांगले लेख आहेत, असे आठवते. एकाद्या जुन्या लायब्ररीत ते मिळतील. दिल्लीच्या साहित्य अकादमीमधे आहेत, पण घरी आणता येत नाहीत.

श्रीरंग_जोशी's picture

14 Feb 2013 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

त्यावर अकीलिसने त्याला लै शिव्या घातल्या. सर्व ग्रीसमध्ये पॉवरफुल असलेल्या अ‍ॅगॅमेम्नॉनला अशा तोंडावर शिव्या घालणे लैच डेअरिंगचे काम.

क्या बात है, एक नंबरी खुसखुशीत वर्णनशैली.

ट्रॉय (हिंदी डब) चे काही संवाद आठवले.

अकेलिस अ‍ॅगमेन्नॉनला - 'शहेनशाहो के शहेनशहा, पहले जंग तो जित लिजिए...'

द्वंद्वयुद्धात पळून जायचा प्रयत्न करणार्‍या पॅरिसकडे इशारा करून मेनॉलॉस हेलनकडे बघून म्हणतो, 'इसके लिए तुमने हमे छोडा?'

पु.भा. प्र.

५० फक्त's picture

15 Feb 2013 - 12:13 am | ५० फक्त

लई भारी, एकदम हसु आलं, जे सहसा इतिहास वाचताना येत नाही. पुढचा भाग लवकर लिहा.

मालोजीराव's picture

15 Feb 2013 - 12:50 am | मालोजीराव

ट्रॉय (हिंदी डब) चे काही संवाद आठवले.

अ‍ॅगमेन्नॉन मेनॉलॉस ला "हुकुमते बनती हे जंगो से, अमन और चैन औरतो,बुज्दिलो के लिये है"
अकिलिस अ‍ॅगमेन्नॉन ला "कैसा रहेगा अगर राजा अपनी जंग खुद लढे तो"
अकिलिस हेक्टर ला "शेर और इंसानो के बीच समझोता नाही होता"
अकिलिस हेक्टर ला "तुम्हारा भाई इसमे माहीर है ,दुसरो कि औरतो को संभालना उसे अच्छी तरह आता है "

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2013 - 1:02 am | श्रीरंग_जोशी

अकिलिस अ‍ॅगमेन्नॉन ला "कैसा रहेगा अगर राजा अपनी जंग खुद लढे तो"

या वाक्याअगोदर अनुत्साहानेच का होईना पण द्वंद्वयुद्धाला निघालेल्या अकेलिसला अ‍ॅगमेन्नॉन म्हणतो, 'आराम में कोई कसर रह गयीं हो तो ये जंग कल रख ले?' ;-).

अग्निकोल्हा's picture

15 Feb 2013 - 1:15 am | अग्निकोल्हा

अकिलीस हेक्टरला द्वंद्व सुरु करण्यापुर्वी चेहर्‍यावरील शिरस्त्राण(?) बाजुला करत.

गौर से देखो इस चेहरेको. कल तुम्हारि ना आंखे होगी ना कान ना जुबान,
मौत के अंधेरे गलियोमे तुम भटकते फिरोगे पागलोंकी तरहा और मुर्दे जान जायेंगे,
ये हेक्टर है, वोह बेवकुफ, जिसने ये सोचा के उसने अकिलिस को मार डाला....

मालोजीराव's picture

15 Feb 2013 - 1:27 am | मालोजीराव

पण एवढं लिहाचा कंटाला अला हुता :P

अस्वस्थामा's picture

15 Feb 2013 - 7:00 am | अस्वस्थामा

भले भले.. :)

चित्रगुप्त's picture

15 Feb 2013 - 5:12 am | चित्रगुप्त

वाहवा. अगदी आवडत्या विषयावर झकास लेख वाचायला मिळणार. पुढले भाग लवकर येऊ द्यात.
सोबत चित्रेपण द्यावीत. उत्तमोत्तम पाश्चात्य चित्रकारांनी यावर खूप चित्रे बनवलेली आहेत.
१९५० च्या दशकात 'चांदोबा'त बहुधा 'हिमती हैबती' नावाची दीर्घ मालिका येत असे, ती याच विषयावर होती. त्यातील चित्रे मिळाली तर बघतो.

(१९५२ पासूनचे चांदोबाचे अंक इथे बघा):
http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm

अवांतरः प्लेग उंदरांमुळे पसरतो, हे होमरच्या काळी ठाऊक होते का? तसा काही उल्लेख?

चांदोबाच्या लिंकबद्दल धन्यवाद. बाकी प्लेग हा उंदरांमुळे झाला वगैरे अर्थाचे विधान इलियडमध्ये दिसले नाही. अपोलो देव आपल्या बाणांनी लोकांना मारत होता म्हणून लोक प्लेगने मरत होते इतकाच त्रोटक उल्लेख आहे.

पिशी अबोली's picture

20 Feb 2013 - 3:33 pm | पिशी अबोली

चांदोबाची लिंक हा एक मोठाच फायदा झाला.. धन्यवाद..

किलमाऊस्की's picture

15 Feb 2013 - 5:14 am | किलमाऊस्की

पु.भा. प्र.

अस्वस्थामा's picture

15 Feb 2013 - 7:12 am | अस्वस्थामा

वाल्गुदेया,
उत्तम उपक्रम सुरु आहे. आणि तुझी लिखाणाची शैलीपण मस्तच..
लहानपणी 'चांदोबा' मध्ये 'भुवन सुंदरी' या नावाने यायची ही 'इलियड' ची कथा आणि 'युगंधर' या नावाने 'ओडिसी' ची कथा यायची.. 'ट्रॉय’ पाहिल्यावर कुठे आम्हाला या ग्रीक महाकाव्यांबद्दल कळालं.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!!! लौकरच पुढचा भाग टाकेन. त्यात चित्रे, हायपरलिंक्स, इ. असतील हे नक्की.

पुन्हा एकदा बहुत धन्यवाद :)

मन१'s picture

15 Feb 2013 - 12:14 pm | मन१

बिलकुल बिलकुल. लवक्र येउ देत पुढला किस्सा.
हापरलिंक्स वगैरे वाचण्यासाठी आम्ही हायपरौत्सुक झालोत.

पिशी अबोली's picture

15 Feb 2013 - 7:41 pm | पिशी अबोली

मस्त..पुढच्या भागांची वाट बघणे सुरु आहे..होमर एकदम बंबय्या वाटायला लागलाय या भाषेत वाचून..

जयनीत's picture

16 Feb 2013 - 7:33 pm | जयनीत

एकदम मस्त धागा सुरु केलाय. असेच अजुन येउ द्यात.

सस्नेह's picture

16 Feb 2013 - 8:13 pm | सस्नेह

हे तर ग्रीसचं 'महाभारत' दिसतंय !
अन ती हेलेन दुर्पदी..

महाभारता पेक्षा रामयणा जवळचं आहे.
अर्थात वैयक्तिक मत.

चित्रगुप्त's picture

16 Feb 2013 - 11:12 pm | चित्रगुप्त

हेलन आणि पॅरिसः चित्र (१७८८)
चित्रकारः Jacques-Louis David (1748-1825)
f

h

बॅटमॅन's picture

16 Feb 2013 - 11:27 pm | बॅटमॅन

वाह! अपेक्षेप्रमाणे आपला चित्रमय प्रतिसाद आलाच :) धन्यवाद चित्रगुप्तजी. एक धागा तर निव्वळ चित्रमय
ट्रोजनयुद्धावरही काढता येईल इतके मटीरिअल आहे यात :)

इशा१२३'s picture

18 Feb 2013 - 5:59 pm | इशा१२३

सुंदर लेख्ननशैली...पु.भा.प्र.