तिच्या मनातून.....................

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
6 Apr 2011 - 2:37 pm

आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय...
त्याचे अस्तित्व अगदी एखाद्या गंभीर पण आश्वासक मुनींसारखे भासतंय ...
असे वाटतंय की कितीतरी काळापासून प्रवास करतेय, करतेय ....... ते शेवटी या इथे पोचण्यासाठीच.
आत्तापर्यंत सोबत असलेले सगळेच निघून गेलेत पुढे, कधीचेच.
पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची!
पण मला आता अजून पुढे मात्र जाता येत नाहीये.... खरें तर माझी तशी इच्छाही नाही.
मला खरोखरच कधी कसली इच्छा होती का?
मला तरी आता आठवत नाही.
होती ती फक्त आग, प्रचंड आग!
माझ्यासकट सगळे काही जाळणारी आग. जन्मापासून माझ्या सोबत असलेली सूडाची आग.
खरें तर मला कधी कळले नाही, त्या जगद्म्बेनी कशासाठी मला जन्माला घातले.
माझ्या भावाच्या जन्माला तरी काहीतरी निमित्त होते. त्याला एक काम करायचंच होते. माझ्या वडलांच्या मनातला धगधगता सूड पूर्ण करायचा होता.
पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले?
या शेवटच्या क्षणांमध्ये मी या मूळ कारणांचा विचार करतेय, हे किती विचित्र आहे.
किती अलगद रहात होते मी लहानपणी..... पुढच्या सगळ्याच गोष्टी कल्पनातीत घडल्या...
इतकी वर्षे झाली, अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो, भीतीनी, आश्चर्यानी....
असा अपमान होऊ शकतो, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते मला.
ज्याबद्दल कृतज्ञता वाटावी, अशी प्रत्येक गोष्ट अचानक भोगवस्तू कधी ठरली, कळलेच नाही.
राज्यसत्ता ही उत्तरदायित्व ना ठरता उपभोग्य ठरली,
भूमाता आणी स्त्री आदरणीय ना ठरता उपभोग्य ठरल्या!
तो फक्त माझाच नाही, माझ्याच कुळातल्या अनेक मातांचा देखील अपमान होता.
सृजनशक्तीचा असा अपमान होऊ शकतो, असे खरेच कधी वाटले नव्हते....
'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले.
लहानपणापासून ऐकत आले होते, की आता कलियुग सुरु होणार आहे, घोर कली पसरणार आहे, अंध:कार येणार आहे,... हेच का ते कलीयुग?
खरोखरच तेंव्हा असे भासत होते, माझ्या सभोवताली काळाकभिन्न धुरासारखा कली मला कोंडून टाकत होता, आणि मी एकटीच धगधगत त्याला जाळू पहात होते.
त्या क्षणी मला स्वत:लादेखील माहित नव्हते, की या आगीत पुढे काय काय होरपळून निघणार आहे!
......................................................
पुढचे संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ त्या एका करुणेच्या आधारावर.
माझ्याकडे पाहताना त्याच्या नजरेतून उतरलेले ते कारुण्य आणी त्यानंतर माझ्या जीवनातली सगळीच आसक्ती जाळून टाकणारे ते त्याच्या डोळ्यातले वैराग्य.
त्याच्या नजरेतूनच मला जाणावले, हे सगळे मला भोगावच लागणार होते,... दुसरा इलाजच नव्हता!
जणू काही तो सांगत होता, कणखर हो, अलिप्त हो!
बास्स.......इतकीच एक मौल्यवान गोष्ट आहे माझ्या उभ्या आयुष्यात.....

आज इथे हे शेवटचे श्वास मोजत शांतपणे मृत्यूची वाट बघतेय........ खरें तर हे विचारही नको वाटतायत...
खरें तर जगणे कधीच संपले होते, माझी मुले, माझा भाऊ काळानी ओढून नेले, त्याच क्षणी मीदेखील संपले.
ज्याच्या करुणेवर पुढची ओझी ढकलली, तो तर असा अचानक, ना सांगताच निघून गेला.
माझ्या संपूर्ण जगातलाच प्राणच संपला. आम्ही सगळेच हतबल झालो.
केवळ त्याचे एक हसू, एक नजर, एक शब्द, आम्हाला जगण्याची ताकद देत होते.
एरवी माझ्यावर सतत कसल्या ना कसल्या नात्यांचे ओझे होते, कन्या, बहीण , पत्नी,सून, आई, सम्राज्ञी,....संपतच नाहीत अपेक्षा कुठल्या नात्यांच्या.
फक्त त्याच्यासमोर असल्यावरच जाणवायचे, की मी मी आहे, एक अस्तित्व.
या अथांग विश्वासमोर जरी क्षूद्र भासले, तरीही, एक एकमेवाद्वितीय सुंदर अस्तित्व. जगदंबेची निर्मिती!
आता तो नाहीसा होणे ही कल्पना देखील इतकी सैरभैर करते मनाला.

त्याच्या आठवणीन्वरच आतापर्यंत तग धरला जीवानी.
त्यानंतर फक्त सावली वावरत होती माझी.... आता काही वेळात ती सावली देखील संपेल.
बास्स.. याचीच वाट पहात होते मी कितीतरी वर्षे.
आपलेच आयुष्य असे ओझे होऊ शकते हे मला कधी माहीतच नव्हते.
आज या इथे अचानक पायातले त्राण संपले, आणि मनानी सुटकेचा श्वास सोडला.
...आता मात्र नक्की संपतोय हा प्रवास.
आता फक्त आठवणीत तडफडणे संपेल....
हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे.
मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

टारझन's picture

6 Apr 2011 - 2:51 pm | टारझन

बापरे .. घामाघुम करणारे मुक्तक आहे हे ! "त्याच्या मनातुन .... " पण इमॅजिन होतंय .. :(

- टार्‍यातुटेक

>>'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले. >> जबरी.
आवडलं. सुरेख.

असुर's picture

6 Apr 2011 - 3:25 pm | असुर

मस्तच लिहीलंय, पण खरंतर लै डेंजर है!
द्रौपदीच्या मनातून लिहायचं म्हणजे किती अवघड काम...

--असुर

पैसा's picture

6 Apr 2011 - 3:30 pm | पैसा

याज्ञसेनीच्या मनात शिरायचं म्हणजे महाकठीण! मुक्तक मस्तच झालंय.

स्पा's picture

6 Apr 2011 - 3:53 pm | स्पा

लीमाऊ, मस्त ग

अ- प्र- ती- म

मी आहे, एक अस्तित्व- सुंदर शब्दशिल्प..
विमानप्रवासात येणारे-जाणवणारे विचार आपण हिमालयाच्या गिरिकुहरात उपभोगून विमुक्तावस्थेला नेणारे कथन सृजन केलेत.

अन्या दातार's picture

6 Apr 2011 - 11:07 pm | अन्या दातार

>>विमानप्रवासात येणारे-जाणवणारे विचार आपण हिमालयाच्या गिरिकुहरात उपभोगून विमुक्तावस्थेला नेणारे कथन सृजन केलेत.

तुम्ही कोर्टनी वॉल्शचे चाहते आहात काय? लई म्हणजे लईच बौन्सर गेलं राव!!!!

पर्नल नेने मराठे's picture

6 Apr 2011 - 3:51 pm | पर्नल नेने मराठे

भिती वाटली :(
आधिच घरात बसुन ४ दिवस नाहि झालेत तोच फ्र्स्त्ट्रेशन आलेय .

परिकथेतील राजकुमार's picture

6 Apr 2011 - 3:52 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या !

माझ्या भावाच्या जन्माला तरी काहीतरी निमित्त होते. त्याला एक काम करायचंच होते. माझ्या वडलांच्या मनातला धगधगता सूड पूर्ण करायचा होता. पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले?

हे काय पटले नाही फक्त.

शंकराच्या आशिर्वादाने गतजन्मी पाच पती मिळण्याचा वर प्राप्त झाला असल्याने द्रौपदीचा जन्म झाला असल्याचे व्यासांनी महाभारतात स्पष्ट लिहिले आहे. आणि द्रौपदी यज्ञातुन प्रकट झाल्याक्षणी 'हि कन्या कौरव वंशाच्या नाशाचे कारण बनेल' अशी आकाशवाणी देखील झाली होती.

कवितानागेश's picture

7 Apr 2011 - 12:38 pm | कवितानागेश

आपण जो काही वाचतो, तो व्यासांनी नंतर लिहिलेला इतिहास आहे.
ही सगळी आधीच्या जन्मांमधली गुंतागुंत व्यासमहर्षींना ठाउक असणे शक्य आहे, पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीना या गोष्टी स्पष्ट्पणे माहित असतीलच असे नाही.

पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले? हा एका आईला जाणवणारा फोलपणा आहे.
प्रचण्ड संहार झाल्यानंतर, शिवाय पोटची मुले गेल्यानांतर, कुठल्याही आईला ही पोकळी जाणवु शकते.
जीव गुंतवायलाच आता मागे कुणी उरले नाही, अशा परिस्थितीत स्वतःचा जन्म व संपूर्ण आयुष्यच निरर्थक वाटू शकते....

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Apr 2011 - 3:53 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदरच!

अवांतर: मिपावर दिवाळी करावी का? अचानक सगळेच चांगले लिहायला लागले आहेत? ;)

गणपा's picture

6 Apr 2011 - 8:15 pm | गणपा

आणि आवांतराशी सहमत.

प्राजु's picture

6 Apr 2011 - 8:39 pm | प्राजु

एक्झॅक्टली!! बिपिनदा.. हेच आलं डॉक्यात!
लिखाळ, चतुरंग, पिडा काका.... ही माउ... सगळेच लिहायला लागलेत.

@ माउ .. सुरेख लिहिले आहेस.

@ बिपिनदा.. आपण कधी उपास सोडताय?? :)

टारझन's picture

7 Apr 2011 - 1:08 pm | टारझन

@ बिपिनदा.. आपण कधी उपास सोडताय??

शी बै ... काहीतरीच :)

असो .. ह्या मंगलप्रसंगी कोदांसारखे कोहिणुरही आपली लेखणीवरची जळमटे झटकुन लिहीती झाली पाहिजेत :) मजा येइल :)

- मुळाकारताळी

धमाल मुलगा's picture

6 Apr 2011 - 4:13 pm | धमाल मुलगा

_/\_

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Apr 2011 - 4:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरेखच आहे हे मुक्तक,
कधी कधी असा विचार मनात येतो की पांडवांपेक्षा दुर्योधन जास्त पुण्यवान होता. कारण त्याच्या नशिबात हाल अपेष्टा दु:ख काहीही आले नाही. पांडवांचे संपुर्ण आयुष्य खडतर होते. सुख म्हणावे असे काहीही त्यांच्या नशिबातच नव्हते.
द्रौपदीही त्यांच्या नशिबाला बांधली गेली होती.
श्रीकृष्णाचाही अंतही अपघाती झाला,
असे का होते ? त्याचे उत्तर नाही,
पैजारबुवा,

थोडेशे अवांतर :

उत्तर असे असु शकते का ?

पांडव सुखी नव्हते पण समाधानी होते ..
कौरव सुखी होते पण समाधानी नव्हते ..

सुखा पेक्षा ही ह्या जगात समाधानाचे महत्व जास्त आहे ..
म्हणुनच अनेक गरीब - कष्टाळु लोक समाधानाने - आनंदाने जगतात ..
संत महात्मे हे समाधानाने गाठलेले उत्तुंग शिखर वाटतात मला

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Apr 2011 - 2:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

पांडव समाधानी होते हे काही पटत नाही,

असे असते तर महायुध्द झालेच नसते. पांडवांची सत्ता लालसा सुध्दा युध्दाला कारणीभुत आहे.

दुर्योधनाने पांडव सोडुन ईतर कोणावर अन्याय केला असे ऐकीवात नाही. तो पण चांगला प्रशासक होता म्हणुन तर महा युध्दात पांडवांपे़क्षा जास्त सैन्य कौरवांचे होते. तो युध्दात हरला म्हणुन नाहीतर कदाचीत आपण वेगळे महाभारत वाचले असते.

धर्मराज शेवटी जुगार खेळायला बसलाच ना? स्वतःच्या बायकोला त्याने पणाला लावले ना? यात पांडव कसले समाधान शोधत होते बरे?

स्वतःच्याच अजोबा पणजोबांना, जवळच्या नातेवाईकांना युध्दात मारुन मिळवलेले राज्य पांडवांनी किती बर काळ भोगले?

नरो वा कुंजरोवा असे म्हणत आपल्या गुरुंची हत्या करण्या मागे कोणते आले आहे समाधान?

बर ईतके सगळे करुन फक्त धर्मराज आणि एक कुत्रा सदेह स्वर्गात गेले. बाकीचे वाटेतच खपले ना?

पांडव समाधानी होते असे मुळीच नाही. ते जेते होते इतकेच.

पैजारबुवा,

प्यारे१'s picture

30 Apr 2011 - 10:06 am | प्यारे१

पैजार बुवांचा जास्तच गोंधळ झालेला दिसतोय.

सविस्तर ल्ह्यावे लागणार आहे.

कोणी बूच मारणार नसेल तर रुमाल टाकावा म्हणतोय.

अभ्य's picture

6 Feb 2013 - 5:49 pm | अभ्य

अवांतर .

कृष्णाचा मृत्यू हि काही अपघाती नव्हता त्याने रीतसर सर्वांचा निरोप घेऊन केलेलं आत्मसमर्पण होत ते .. यासाठी गो नि दांडेकरांचे श्रीकृष्ण हे पुस्तक वाचलेत तरी कळेल..

"पण मुक्तक आवडले ..

गणेशा's picture

6 Apr 2011 - 4:58 pm | गणेशा

मसत आवडले एकदम ..
पण हे द्रोपदी बद्दल होते हे मला रिप्लाय वरुनच कळाले..
शब्द -त्यांची खोली जबरदस्त ..

हरिप्रिया_'s picture

6 Apr 2011 - 5:09 pm | हरिप्रिया_

खुप छान लिहिल आहे...
आवडल...
...
तुम्ही 'कृष्णा' कादंबरी वाचली आहे का?
त्याचीच आठवण झाली... त्यात द्रौपदीच आत्मकथन आहे.

नन्दादीप's picture

6 Apr 2011 - 5:23 pm | नन्दादीप

सुंदर... अप्रतिम...!!!!

सूड's picture

6 Apr 2011 - 5:24 pm | सूड

छान !!

रेवती's picture

6 Apr 2011 - 6:06 pm | रेवती

छानच लिहिलय.

सुहास..'s picture

6 Apr 2011 - 6:32 pm | सुहास..

" पॅलेस ऑफ इलुजन ' वाचुन लिहीला की काय लेख ;)

५० फक्त's picture

6 Apr 2011 - 7:37 pm | ५० फक्त

लिमाउ, फार छान लिहिलंय, परकायाप्रवेश अतिशय मस्त जमलाय. वर बिकांनी म्हणल्याप्रमाणे खरंच मिपावर दिवाळी सुरु झाली आहे असं वाटतंय.

नगरीनिरंजन's picture

6 Apr 2011 - 8:47 pm | नगरीनिरंजन

वा! मस्त लिहीलंय!

प्रीत-मोहर's picture

6 Apr 2011 - 8:55 pm | प्रीत-मोहर

__/\__

काय लिहु कळत नाही..
अ प्र ति म!!!!!

प्रास's picture

6 Apr 2011 - 9:33 pm | प्रास

लीमाउजेट,

खूप छान लिहिलंयत हे मुक्तक-चिंतन!

>>>हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे.
मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....<<<

हे बाकी भन्नाट आहे. या दो-लायनाला "सलाम".

मेघवेडा's picture

6 Apr 2011 - 11:28 pm | मेघवेडा

वा माऊ! छान लिहिलंय! :)

पुष्करिणी's picture

6 Apr 2011 - 11:56 pm | पुष्करिणी

सह्हीच लिहिलयस माउ,
>>>हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे.
मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....<<<

एकदम 'सोलमेट' वगैरे डोक्यात आलं

विलासराव's picture

7 Apr 2011 - 12:29 am | विलासराव

छान लिहिता तुम्ही.
लिहीत रहा.

स्पंदना's picture

7 Apr 2011 - 4:34 am | स्पंदना

'कृष्णा' वाचलीय मी.

खुप आवडल लिखाण. पण शेवटी भिम मागे वळुन तीच्या कडे आला अस काहिस आहे.

तो रांगडाच शेवटी खरा प्रेमी निघाला.

सविता००१'s picture

7 Apr 2011 - 2:25 pm | सविता००१

अप्रतिम लिहिले आहे

sneharani's picture

7 Apr 2011 - 2:44 pm | sneharani

छान लिहलय!

मनीषा's picture

7 Apr 2011 - 3:07 pm | मनीषा

मुक्तक आवडले .
.
.
.
पण
पुढचे संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ त्या एका करुणेच्या आधारावर.
हे वाक्य याज्ञसेनीच्या संदर्भात आलेले पटले नाही.
जिचा जन्मच यज्ञातील अग्नीतून झाला ती अशी दीन होणार नाही असे वाटते.

सूर्यपुत्र's picture

7 Apr 2011 - 4:09 pm | सूर्यपुत्र

अतिशय सुंदर. नक्की काय म्हणू? योग्य शब्दांची उणीव भासतेय....

-सूर्यपुत्र.

स्वानन्द's picture

8 Apr 2011 - 2:27 pm | स्वानन्द

करुण आणि भव्य....

आत्मकथानाची खुमारीच काही निराळी. जीवनाचा पट वेगात उलगडवते... त्या त्या प्रसंगीचे मनोव्यापार कथन करते.. कधी त्यावर त्रयस्थ पणे भाष्य करते.

मस्तच माउ... अगदी 'तिच्या' मनातून च आलं असावं अशी खात्री वाटावी, असं झालंय हे मुक्तक.

प्राजक्ता पवार's picture

8 Apr 2011 - 10:49 pm | प्राजक्ता पवार

मुक्तक आवडले.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Apr 2011 - 5:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भन्नाट.. तुफान...नि:शब्द!!
तुला __/\__

राजेश घासकडवी's picture

28 Apr 2011 - 7:40 pm | राजेश घासकडवी

काहीशा प्रासादिक, पण तरीही वैयक्तिक अशा भाषेत चित्र छान रंगवलं आहे. द्रौपदीचं नाव शेवटपर्यंत उघड न करण्याचं तंत्र छान हाताळलं आहे. आणि ही तांत्रिक बाब साधण्यासाठी तिच्या आयुष्यातले प्रसंग, लढे व दुःख अधिक सार्वत्रिक झाली आहेत.

लिमे कठीण आहे ग तुझं.. काय लिहीले आहे.. विचार जरी केला.. तरी डोक्यात झिणझिण्या उठतात.

- पिंगू

नरेशकुमार's picture

29 Apr 2011 - 11:35 am | नरेशकुमार

खुप भनायक लिहिले आहे.
पन राग नका मानू
मला जास्त काही कळाले नाही.

कवितानागेश's picture

29 Apr 2011 - 12:01 pm | कवितानागेश

भनायक म्हणजे काय हे मलादेखिल जास्त काही कळाले नाही!
;)

नरेशकुमार's picture

29 Apr 2011 - 12:11 pm | नरेशकुमार

ohh sorry, मला भयानक असे बोलायचे होते. माफ करा.
पन मला कविता वाचुन जास्त समजले नव्हते, पन प्रतिसाद वाचुनच समजले कि हि द्रोपदिचि कविता आहे.
धन्यवाद.

किसन शिंदे's picture

29 Apr 2011 - 12:33 pm | किसन शिंदे

अगदी मलाही...शेवटच्या दोन ओळीत याज्ञसेनी हा शब्द आला तेव्हा कळलं.

कवितानागेश's picture

29 Apr 2011 - 12:26 pm | कवितानागेश

ही कविता आहे हे मला देखिल अत्ताच आपला प्रतिसाद वाचून समजले!
मला इतके दिवस वाटत होते, की मी मुक्तक लिहिलंय. :)
असो.
धण्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Apr 2011 - 1:09 pm | बिपिन कार्यकर्ते

म्हणून सांगत होतो नेहमी की लिही लिही... बघ किती ज्ञान वाढलं तुझं एकाच लेखनात!

शिल्पा ब's picture

30 Apr 2011 - 10:44 am | शिल्पा ब

जडबुदुक लिहिलंय...झेपलं नाही त्यामुळे नुसतीच नजर फिरवली...लोकं म्हणताहेत म्हणजे काहीतरी चांगलं चुंगलं असणार. सिरीयस वाचायचा मुड आला की व्यवस्थित वाचेन म्हणते.

अप्पा जोगळेकर's picture

30 Apr 2011 - 4:46 pm | अप्पा जोगळेकर

काहीच न कळल्यामुळे प्रतिसाद देता येत नाही.

जयंत कुलकर्णी's picture

1 May 2011 - 11:06 am | जयंत कुलकर्णी

स्वर्गद्वार !

या दरवाजातून सगळे त्यागून बाहेर पडायचे.
अर्थात मनातून काही सगळे जातच नसते. या पुढे रस्त्यावर नाही पाणी प्यायचे आणि नाही अन्न. सगळीकडे बर्फ आणि डोळ्यात घुसणारे सुर्याचे किरण. रस्त्याच्या बाजूला हाडाचे सापळे, कदाचित नुकतेच या रस्त्यावर आलेल्या पांथस्तांचे देह. अशावेळी मनातले विचारच साथ देतात, पण काहीच काळ. नंतर त्याचाही फोलपणा कदाचित कळत असावा. हे आठवणींचे मुडदे बाजूला सारून आपण पुढे जायचे असते.

असे हे स्वर्गदार. प्रत्येकाच्या नशिबात ते असतेच. त्यासाठी हिमालयात जावे लागतेच असे नाही.

खरे तर स्वर्गद्वार ही एक मला वाटते मनाची अवस्था असावी.

हे लिहीतांना डॉ. झिवॅगोच्या हॅम्लेट या कवितेतील पहिले कडवे आठवले.

त्या दुरच्या डोंगरातून,
शांतता पसरत खाली येते आणि मी
माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे,
वेध घेत कशाचा ?
त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे
माझे विचार भविष्यात ( ?) तर
परावर्तित होत नसतील ना ?

ही चौकट बहुदा स्वर्गद्वाराचीच असावी ....असे मला क्षणभर वाटून गेले.

स्वर्गद्वारात शिरल्यापासूनचा प्रवास हा खास स्वतःचा असा असतो.
तो संपतो तेव्हा ना तो रस्ता उरत, ना ते द्वार उरत.

माऊ, हे कसं कोण जाणे वाचायचं राहून गेलं होतं!

सुरेख लिहिलंयस. ही आणि हिचा तो सखा सुहृद.. दोघंही विलक्षणच!

कवितानागेश's picture

8 Jan 2013 - 12:36 am | कवितानागेश

मीपण फार दिवसांनी वाचतेय हे. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Feb 2013 - 6:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आपलच जुन लेखन नुसतचं वाचा.
नविन काही लिहू नका. :-|

कवितानागेश's picture

6 Feb 2013 - 8:44 pm | कवितानागेश

ब्वॉर्र. :(

अरे! मी तर प्रतिसादपण दिलाय?

असो पुन्हा एकदा..

काय लिहिलय माऊ?

बॅटमॅन's picture

6 Feb 2013 - 5:33 pm | बॅटमॅन

माऊ लयच भारी!!! नमस्कारिले तुवां _/\_

प्रसाद गोडबोले's picture

6 Feb 2013 - 6:07 pm | प्रसाद गोडबोले

अहाहा !

मस्तच लिहिले आहे ...

हे काय सुरेख लिहिले होतेस तू :)
आत्ता पुन्हा हे वाचताना मला सरस्वती उगमाच्या इथल्या भीमपुलाची, सरस्वतीच्या अथक, अफाट नादाची, स्वर्गारोहिणी शिखराची आणि तिथल्या पायवाटेची आठवण आली बघ खूप :)

दीपा माने's picture

7 Feb 2013 - 12:10 am | दीपा माने

मुक्त्तक छान लिहीले आहे.
मला वाटतं, परिस्थितीजन्य वास्तव्यातुन झालेली मनोरचना आणि व्यवहार धारण केलेला मानवीदेह सर्व युगांत सारखाच असतो.
ह्याला अपवाद फक्त ब्रम्हांडाचे दर्शन घडविणारा महायोगी श्रीकृष्णच.

मृत्युन्जय's picture

7 Feb 2013 - 10:59 am | मृत्युन्जय

आव्डले. पटलेच असे नाही. पण आवडले.

सस्नेह's picture

7 Feb 2013 - 9:05 pm | सस्नेह

असेच असेल असे नाही पण एक वास्तवाला स्पर्श करणारी शक्यता...

अग्निकोल्हा's picture

7 Feb 2013 - 7:27 pm | अग्निकोल्हा

त्याच्या अंताबद्दल वाटलेली खंत खरोखर अंतर्मुख व्हायला लावणारी आहे...

अद्द्या's picture

24 Feb 2016 - 12:38 pm | अद्द्या

लिमाउलि
_/\_

सविता००१'s picture

24 Feb 2016 - 1:03 pm | सविता००१

परत कित्ती दिवसांनी वाचलं. मस्तच

नूतन सावंत's picture

24 Feb 2016 - 9:04 pm | नूतन सावंत

वामा असताना वाचले होते,प्रतिसाद आता टंकायला मिळतोय.
सुरेख मुक्तक.द्रौपदीच्या मनातली तळमळ अशी असेल.