श्री. तुकोबारायांचे हस्ताक्षर

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
14 Dec 2011 - 12:08 pm

श्री.तुकोबारायांचे हस्ताक्षर

साठेक वर्षांपूर्वी श्री. परांजपे यांनी देहूच्या श्री. तुकारामांच्या वंशजांकडून " भिजलेल्या वहीचे अभंग " नावाचे सातएकशे अभंग मिळवून ते प्रसिद्ध केले होते. आज ते दुर्मीळ असल्याने " वरदा प्रकाशन " पुनर्मुद्रित करत आहे. त्यांत श्री तुकोबारायांचे हस्ताक्षर असलेले एक पान येथे देत आहे.

Tukaramace akshar

यातील काही अक्षरे आज आपण लिहतो त्यापेक्षा निराळी असल्याने खाली देत आहे. याचा उपयोग करून आपण हे अभंग वाचू शकता.

img077

(१) ब्राह्मी ही भारतातील सर्वप्राचीन लिपी होय. इजपासून गुप्त-सिद्धमातृका-कुटिल-देवनागरी अशा निरनिराळ्या लिप्या कालोघात प्रचारात आल्या. देवनागरी लिपीतही काही बदल झाले असे दिसते. सोळाव्या शतकातील मराठी ग्रंथांच्या लिपीत असेच बदल दिसतात कां ? यावर तज्ञांनी प्रकाश पाडावा.

(२) या पाच अभंगातील पहिले दोन माझ्याकडे असलेल्या साखरे महाराज प्रकाशित सकलसंतगाथा भाग-२ यातील श्री. तुकाराम महाराजांच्या गाथेत आढळत नाहीत. जोग महाराजांनी संपादित केलेया गाथेत ते आहेत असे कळते.

(३) आज प्रकाशित असलेल्या गाथांमधील अभंग व वरील अभंग यात बरेच पाठभेद आहेत. दुसर्‍या अभंगात
तुका म्हणे आले घरा ! तोची दिवाळी दसरा !! असे लिहले आहे. पण आपण लहानपणापासून " साधुसंत येती घरा ! तोची दिवाळी दसरा !! " असे वाचत-म्हणत आलो आहोत. याचे कारण कळू शकते. सुरवातीचा संतांचा संदर्भ सोडला तर " तुका म्हणे " ला अर्थ लागत नाही. केवळ दोन ओळींचा अर्थ पूरा लागावा म्हणून " तुका म्हणे " जाऊन "साघुसंत " आले असावे.

शरद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

शरद's picture

14 Dec 2011 - 12:21 pm | शरद

तुकोबारायांचे ऐवजी त्कोबारायांचे असे चुकुन टंकले गेले आहे. कृपया दुरुस्त करून वाचावे.
शरद

प्रास's picture

14 Dec 2011 - 1:05 pm | प्रास

चांगली माहिती दिलीत.

एकूण हे हस्ताक्षराचं पान बघता आणि प्रकाशित पुस्तकातील पाठभेद पहाता, ज्याला 'क्रिटिकल एडिशन' म्हणतात ती विविध पोथ्यांचा अभ्यास करून तुकोबांच्या मूळ लेखनाच्या जवळची प्रत तयार करण्याची कृति व्यवस्थित झाली असल्याचं वाटत नाही. तुम्ही दिलेल्या पानाच्या मूळ पोथीमध्ये तुकारामांनीच स्वतः स्वहस्ताक्षरात हे लिखाण केल्याचा स्पष्ट उल्लेख असल्यासच हे तुकारामांचे हस्ताक्षर असा निर्वाळा देता येईल.

लिपीचा विचार केल्यास ही नागरी - देवनागरी लिपीचीच एक अवस्था असल्याचं लक्षात येत आहे. 'य' वगैरे काही अक्षरं बाळबोध अर्थात मोडीसारखी आहेतंच.

ब्राह्मी ही भारतातील सर्वप्राचीन लिपी होय.

याबद्दल असहमती आहे. शक्य झाल्यास लिपींच्या उत्क्रांतीवर लिखाण करण्याचा मानस आहे. कधी जमतंय, ते बघू.

गाथेचं 'क्रिटिकल एडिशन' झालंय का ते देखिल निश्चित करावं लागेल, बहुतेक.

माहितीबद्दल आभारी आहे.

:-)

प्यारे१'s picture

14 Dec 2011 - 2:48 pm | प्यारे१

>>>शक्य झाल्यास लिपींच्या उत्क्रांतीवर लिखाण करण्याचा मानस आहे. कधी जमतंय, ते बघू.

लवकर करावे ही णम्र विणंती.
सगळ्या सौदिंडियन लिप्या कशा आल्या नी कशा वाचाव्या ते ही जरा सांगा.
कन्नड, तेलुगु तमिळ नी केरळी असं सगळं आम्हाला जिलब्या घातल्यासारखं वाटतं.
आता त्यात आणखी जिलब्या घालणारा असला म्हणजे मिळवलीच. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Dec 2011 - 2:55 pm | llपुण्याचे पेशवेll

बाळबोध अर्थात मोडीसारखी आहेतंच.
बाळबोध म्हणजेच मोडी का?
कारण समर्थांच्या "बाळबोध अक्षर | घडसून करावे सुंदर | जे देखताचि चतुस| समाधान पावती||" या उक्तीवरून बाळबोध म्हणजे देवनागरी असे वाटते. कारण समर्थांचे बहुतेक वाङ्मय देवनागरी (अर्थात तेव्हाची) मधे आहे.

प्रास's picture

14 Dec 2011 - 3:09 pm | प्रास

बाळबोध लिपी म्हणजे मोडी लिपीच.

जुन्या काळात शाळेत बाळबोध म्हणजे मोडी लिपीच शिकवायचे. अगदी परीक्षांमध्ये उत्तरं लिहिण्यासाठी मोडीही चालायची. नंतर सरकारने अभ्यासक्रमात मोडी लिपी वापरावर बंदी घातली, अशी माहिती जुन्यांकडून मिळाली आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Dec 2011 - 4:19 pm | llपुण्याचे पेशवेll

जुन्या काळात शाळेत बाळबोध म्हणजे मोडी लिपीच शिकवायचे.
जुन्याकाळात शाळांमधे बाळबोध आणि मोडी दोन्ही शिकवायचे असे आमच्या जेष्ठांकडून आम्हाला कळले. मोडी लिपी ही क्लिष्ट असते वगैरे मान्य पण लिहायला सोपी आणि वेगवान म्हणून प्रचलित होती. उलट बाळबोध कळायला सोपी म्हणून जनसामान्यांना अवगत असे. म्हणून लेखन बाळबोधात असावे असे समर्थांचे मत होते.

बॅटमॅन's picture

19 Jun 2012 - 6:51 pm | बॅटमॅन

नै हो नै. बाळबोध म्हंजे देवनागरी अन् मोडी म्हंजे ही आपली बेशिस्तवाली, जिच्यात "तें समयीं बाजीरावसाहेबांजवळीं २०० लोक होते" हे वाक्य "तें समयीं बाजीरावसाहेबांजवळीं २०० केक होते" असे वाचता येऊ शकत असे, ल आणि क यांच्यातील साधर्म्यामुळे. शिवाजीमहाराज व पेशवे तसेच आदिल-निजाम वगैरेंचीदेखील बरीच पत्रे या लिपीत असत.

सुनील's picture

19 Jun 2012 - 8:24 pm | सुनील

शिवाजीमहाराज व पेशवे तसेच आदिल-निजाम वगैरेंचीदेखील बरीच पत्रे या लिपीत असत.

शिवाजी महाराज आणि पेशवे यांची पत्रे मोडीत असत हे समजण्यासारखे आहे पण आदिल्-निजाम यांची पत्रे बहुधा फारसीत असावीत, असे वाटते.

ल आणि क यांच्यातील साधर्म्यामुळे

ध आणि म यांच्यातही साधर्म्य होते काय? ;)

मुघलांची सर्व पत्रे फारसीत असत. पण दक्षिणेकडील आदिल-निजाम वगैरेंची पत्रे बर्‍याचदा द्वैभाषिक असत. फारसी-मराठी, फारसी-कन्नड वगैरे. अशी द्वैभाषिक निजामशाही व आदिलशाही पत्रे मी स्वतः पाहिली आहेत.

जाता जाता:

एकदा मुघलांचा प्रतिनिधी आदिलशाही दरबारात आला आणि शुद्ध फारसी झाडू लागला. लगेच दरबार्‍यांनी खोपच्यात घेऊन समज दिली, की बाबारे, फारसी फारशी झाडू नकोस, कारण बादशहाला फक्त मराठीच समजते ;)

हा आदिलशहा कोणता ते आत्ता लक्षात नाही. सर्वच राजे असे असतील असेही नाही. पण मेहेंदळ्यांच्या इंग्रजी "शिवाजी: हिज लाईफ अँड टाईम्स" या ग्रंथात हा किस्सा दिलेला आहे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2013 - 3:59 pm | प्रसाद गोडबोले

ध आणि मा मधे बरेच साम्य आहे मोडीत !!

सुनील's picture

31 Jan 2013 - 10:25 pm | सुनील

ध आणि मा मधे बरेच साम्य आहे मोडीत !!

तरीच ... ;)

राही's picture

29 Jan 2013 - 4:31 pm | राही

ताजा प्रतिसादही दिसत नाही. असो. येनकेणप्रकारेण धागा वर आलेलाच आहे तर बाळबोध लिपी म्हणजे मोडी लिपी नव्हे हे पुन्हा एकदा सांगून टाकावे झाले. बाळबोध म्हणजे देवनागरी लिपी. वडिलांच्या काळातले शालेय अभ्यासक्रमातले एक मोडीतले पुस्तक सापडले होते त्यात मोडी आणि बाळबोध असे दोन्ही तक्ते दिलेले होते.

मन१'s picture

14 Dec 2011 - 3:19 pm | मन१

बाळबोध म्हणजे सध्याची मराठीसाठी वापरली जाणारी प्रचलित देवनागरी.
मोडी ही बाळबोध नाही हेच आमच्याही वाचण्यात आले आहे.
प्रास रावाला ह्या मुद्द्यावर -१

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Dec 2011 - 4:20 pm | llपुण्याचे पेशवेll

>> " साधुसंत येती घरा ! तोची दिवाळी दसरा !! " असे वाचत-म्हणत आलो आहोत. याचे कारण कळू शकते. सुरवातीचा संतांचा संदर्भ सोडला तर " तुका म्हणे " ला अर्थ लागत नाही. केवळ दोन ओळींचा अर्थ पूरा लागावा म्हणून " तुका म्हणे " जाऊन "साघुसंत " आले असावे. <<
अशाच आशयाचा सेना महाराजांचा एक अभंग ऐकला आहे.
आजि दिवाळी दसरा| सेना म्हणे आले घरा || असे त्याचे शेवटचे चरण आहे.

श्री. तुकोबारायांच्या हस्ताक्षरास.

---^---

धन्यवाद शरदराव, एका चान्गल्या धाग्याबद्दल.

विनोद१८

अविनाशकुलकर्णी's picture

31 Jan 2013 - 4:11 pm | अविनाशकुलकर्णी

बहुजनाना शिक्षणास वंचित केले हा आरोप खोटा ठरतो यामुळे

असा अमूल्य ठेवा आमच्यासोबत शेयर केला मनून धन्यवाद.

II श्रीमंत पेशवे II's picture

1 Feb 2013 - 3:41 pm | II श्रीमंत पेशवे II

खूप खूप अभिनन्दन.....