अजिंठा: भाग १
अजिंठा: भाग २
अजिंठा: भाग ३
खरेतर अजिंठ्याचा प्रत्येक विहार, प्रत्येक चैत्य बारकाईने पाहायला एकेक दिवसपण कमीच आहे पण कसेतरी घाईगर्दीतच पण तरीही निवांतपणेच हे बघत आम्ही पुढे सरकत आम्ही बाहेर आलो व पुढ्च्या विहारांकडे आणि चैत्यांकडे वळलो. आता यापुढील विहारात चित्रे कमी पण शिल्पे जास्त आहेत त्याविषयी पाहू आता अजिंठा लेखमालिकेच्या पुढच्या व अंतिम भागात. त्याच भागात अजिंठ्यांच्या चित्रांचे रहस्य उलगडण्याचा मी थोडाफार प्रयत्न करेन.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१६ व १७ क्रमांकाचे देखणे विहार पाहून आम्ही पुढे निघालो. १८ क्रमांकाचा विहार अतिशय साधा आहे तर पुढचे १९ व्या क्रमांकाचे लेणे हे चैत्यगृह आहे.
वाकाटक नृपती हरिषेण याचा मांडलिक ज्याने क्र. १७ चे लेणे खोदवले त्यानेच हा चैत्यही खोदवला व यास गंधकुटी असे नाव दिले.
या चैत्यगृहाचा दर्शनी भाग अतिशय सालंकृत आहे. दर्शनी भागावर पिंपळपानाकृती कमान, आजूबाजूला महायानकालीन शैलीत कोरलेल्या पद्मपाणी, अवलोकितेश्वर अशा विविध प्रकारच्या बुद्धमूर्ती, त्यासभोवती असलेले आकाशगामी गंधर्व, कमानींखालचे कोरीव स्तंभ, अतिशय नजाकतीने केलेले नक्षीकाम यामुळे ह्या चैत्याचा दर्शनी भाग अतिशय देखणा झाला आहे.
चैत्यगृहाच्या अंतर्भागातील गजपृष्ठाकार छत १७ सालंकृत स्तंभांनी तोलून धरलेले आहे व मधोमध महायानकालीन शैलीतला हर्मिकेवर तिहेरी छत्र असलेला स्तूप आहे. या स्तूपावर अवलोकितेश्वर बोधिसत्व कोरला गेला आहे. तर स्तूपांतर्गतच स्तंभ कोरलेले आहेत जणू स्तूपरूपी मंदिरात हा बोधिसत्व अभयमुद्रेत उभा आहे झाला आहे. हा स्तूप त्यावरच्या अलंकरणामुळे, बुद्धमूर्तीमूळे कमालीचा देखणा दिसतोय तरीही ह्याच अलंकरणामुळे स्तूपाचा मूळ उद्देश बिघडला जाऊन त्याचा तोल ढासळलाय. मलातरी हा स्तूप एकाचवेळी अतिशय सुंदर व त्याचवेळी अतिशय बैडोल असा दिसतोय. हिनयान शैलीतल्या स्तूपाचे साधेपणातील सौंदर्य ह्या स्तूपातील अलंकरणाने आलेल्या सौंदर्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे वाटते.
चैत्यगृहातील भिंतींवर बोधिसत्वाची विविध मुद्रांतील चित्रे येथे कोरली गेली आहेत तर छतावर पानाफुलांचे नक्षीकाम केले दिसते. स्तूप हे फक्त प्रार्थनेसाठीच असल्याने येथे जातक कथांतील चित्रांचा अभाव दिसतो.
१. चैत्याची पिंपळापानाकृती कमान
२. कमानीशेजारील सुंदर बोधिसत्व मूर्ती
३. दर्शनी भागावरील देखणे अलंकरण
४. दर्शनी भागावरील देखणे अलंकरण
५. चैत्याच्या अंतर्भागातील सालंकृत स्तंभ
६. चैत्याच्या अंतर्भागातील सालंकृत स्तंभ
७. स्तंभावरील बोधिसत्व आणि आकाशगामी गंधर्व
८. सालंकृत महायानशैलीतील स्तूप
९. प्रत्येक छत्र एकेका भारवाहक यक्षाने तोलून धरलंय
१०. चैत्यामधील ध्यानस्थ बुद्धचित्रे
११. बोधिसत्वाची रंगवलेली चित्रे
नागपूजा करणारे जे इथले आदिवासी लोक ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बुद्ध धर्मात नागपूजासुद्धा आणली. बोधिसत्वाला नागराजाचे रूप देऊन त्यांनी आपली प्रार्थना सुरु केली. नागरूपातील बोधिसत्व अनेक ठिकाणी दिसतो. त्यातलेच हे एक शिल्प येथील चैत्यगृहाबागेरील डावीकडच्या भिंतीवर कोरलेले आहे. येथे मानव मुखधारी नागराज सात फड्यांचा नागमुकूट परिधान करून आपल्या राणीसह बसला आहे. बाजूला एक सेविका चवरी ढाळत उभी आहे.
१२.
ह्या चैत्यगृहानंतरचे काही विहार पूर्ण तर काही अपूर्णावस्थेत आहेत. ओसरीतले स्तंभ, सभामंडप, आतील स्तंभ, विश्रांतीकक्ष आणि गर्भगृहात बुद्धमूर्ती अशी आधीच्या विहारांसारखीच त्यांची रचना.
विहार क्र. २० मधल्या ओसरीतील सालंकृत स्तंभांवर अप्सरा विहार करताना दाखवलेल्या आहेत. त्यांच्या मस्तकांवर वृक्ष दाखवले आहेत. बहुधा हा स्वर्गातील कल्पवृक्ष असावा.
१३. स्तंभांवरील अप्सरा
१४. स्तंभांवरील अप्सरा
लेणी क्र. २१ चा विहार महायानकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना असून याच्या ओसरीतील भिंतींवर बुद्धाच्या सुंदर प्रतिमा कोरलेल्या आहेत. तर विहाराचा अंतर्भाग बारा सालंकृत स्तंभांनी तोललेला असून त्यावर बोधिसत्वाच्या विविध प्रतिमा कोरलेल्या आहेत. इथल्या चौकटींमधील शिल्पकाम कमालीचे देखणे आहे. तर भिंतीवर एका ठिकाणी भगवान बुद्धाचे प्रवचन देतानाचे चित्र काढलेले आहे. छतावरही रंगकाम केले आहे. त्यातला फुलाफुलांचा निळा रंग अजूनही चांगलाच तकतकीत आहे. हा निळा रंग पर्शिया आणि उत्तर भारतातून आयात केला जात असे.
तर गर्भगृहात बुद्धाची ध्यानमग्न अवस्थेतील भलीमोठी मूर्ती असून बाजूला चामरधारी सेवक चवर्या ढाळत उभे आहेत.
१५. ओसरीतील स्तंभ
१६. ओसरीतील देखणे नक्षीकाम
१७. सभामंडप आणि विश्रांतीकक्ष
१८. चौकटींमधील सुरेख शिल्पकाम
१९. भिंतीवरील बुद्ध प्रवचन देत असलेल्या घटनेचे चित्रीकरण
२०. छतावरील निळ्या रंगात रंगवलेली फुले
२१. गर्भगृहातील ध्यानस्थ बुद्धमूर्ती
यानंतरचे विहार क्र. २२ ते २५ विहार काही साधे तर काही अलंकृत आहेत. पण बहुतेकांच्या ओसरीतील स्तंभांवर नाजूक शिल्पकाम केलेले आहे.
२२. भारवाहक यक्ष
२३. द्वारचौकटीवरील कोरीव काम
२४. द्वारचौकटीवरील शिल्पपट
इथला एक अपूर्ण राहिलेला भव्य विहार (बहुधा क्र. २४) हा कदाचित पूर्ण झाला असता तर अजिंठ्यातील सर्वात मोठा विहार ठरला असता. पण एकंदरीत याच्या अपूर्णावस्थेवरून विहार कसे बांधले जात याची थोडीशी कल्पना येते.
२५.
हे सर्व विहार संपवून आम्ही आता निघालो ते इथल्या शेवटच्या चैत्यगृहाकडे, लेणी क्र. २६ कडे.
लेणी क्र. २६ हे महायानकालीन चैत्यगृह असून त्याच्या निर्मितीचा शिलालेख उजव्या बाजूच्या दरवाजावर कोरलेला आहे.
लिपी ब्राह्मी, भाषा संकृत, इ.स. ५ वे शतक
१) जयति लोकहितावहितोद्यतो....हिसुखान्तकरः परमार्थवि(त्) (|)
त्रिविधनिर्म्मलसर्वगुणोदयो मु(षितभी) करूणामलच्न्दिकः (||)
२) पुनरपुमरणादि येन सम्यक्षिवमजरामरधर्म्मता च लब्धा शिवमभयनालयं
गतोपि प्रशमपुरं जगतां करोति चार्त्थं (||)
.
.
.
.
१६) जगताम् ....बलभिर्न्नानण्डजव्याहृते गोलान्गूलोननादपूरितदरे प्राग्भावि....
१७) योगीश्वराध्यासिते वेश्मेदं ज.....जनकभूत्यें प्रतिष्ठापितं पूर्व्वापि चेयं तेनैव
द्रिब्धा चार्येण सौगतिम् लोकचिन्तामुपादाय.......
इथेही संपूर्ण शिलालेख न लिहिता मी फक्त त्यातील सुरुवातीच्या आणि शेवटच्या दोन दोन ओळी उद्धृत केल्या आहेत जेणेकरून तत्कालिन संस्कृत भाषेची अल्पशी कल्पना यावी.
शिलालेखाचा सारांश असा-
या लेखाचा उद्देश या शैलगृह खोदवण्यासाठी ज्याने दान दिले त्याचा उल्लेख करण्याचा आहे. ज्या व्यक्तीने ह शैलगृह खोदवण्याचा हुकूम दिला व या कामासाठी पैसा पुरवला त्या व्यक्तीचे नाव बुद्धभद्र असे होते. या लेखात अश्मक प्रदेशावर राज्य करणार्या राजाचा उल्लेख आहे. व त्याच्या दोन मंत्र्यांची भविराज व त्याचा पुत्र देवराज ही नावे दिली आहेत. तसेच या लेखात स्थविराचल मुनींनी लेणे खोदल्याचा उल्लेख आहे.
हा अश्मक प्रदेशातील राजा नेमका कोणता हे कळत नाही. अश्मक म्हणजेच आजचा पैठणचा प्रदेश. हा राजा वाकाटकांचा तेथील मांडलिक असावा.
हे चैत्यगृह अतिशय भव्य असून अतिशय सालंकृत आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे बुद्ध मूर्ती कोरलेल्या आहेत. या चैत्यगृहात एकही चित्र नाही, मात्र शिल्पे अगणित आहेत. दर्शनी भागातील अश्वनालाकृती वातायन, त्याच्या डावी-उजवीकडील भाग तसेच दोन्ही बाजूच्या भिंती आदी सर्वच भाग शिल्पांकित झालेला आहे.
चैत्याचा अंतर्भाग गजपृष्ठाकार छताने तोलून धरलेला असून लाकडी फासळ्यांच्या जागी दगडी फासळ्या आहेत. छताला आधार देणार्या स्तंभांवर भरजरी नक्षीकाम, स्तंभशीर्षाखालच्या घंटाकार आमलकावर स्तंभशीर्ष तोलून धरणार्या अप्सरा व त्याहीवर अप्सरा व त्याच्याहीवर छताची भरजरी चौकट तोलून धरणारे भारवाहक यक्ष आहेत. इथले कोरीव काम अतिशय सुंदर आहे. स्तंभचौकटींवरही बुद्धमूर्ती प्रचंड प्रमाणात कोरल्या गेल्या आहेत.
इथला स्तूप गोलाकार असून त्याच्या समोरील बाजूस कमळावर पाय ठेऊन बसलेल्या सिंहासनस्थ बुद्धाची मूर्ती आहे. तर मूर्तीच्या वरील बाजूस गंधर्व कोरलेले आहेत. स्तूपाच्या उर्वरीत गोलाकार भागावर बोधिसत्वांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत तर घुमटाकार अण्डावर गंधर्व कोरलेले आहेत. हर्मिकेवरचे दगडी छत्र भग्न झालेले असल्याने नेमकी किती छत्रे असावीत याची नीटशी कल्पना येत नाही परंतु क्र. १९ च्या चैत्यगृहाप्रमाणेच इथेही तीन छत्रे असावीत असे मानण्यास पुरेसा वाव आहे.
इथेही ह्या अलंकरणामुळे स्तूप अतिशय देखणा दिसत असूनही त्याचा तोल कुठेतरी ढासळलेला दिसतोय.
२६. चैत्याचा दर्शनी भाग पिंपळपानाकृती कमान व त्याशेजारील अलंकरणासह
२७. बाजूच्या भिंतींवरील कोरीव मूर्ती
२८. चैत्यगृहातील स्तंभ
२९. चैत्यगृहातील स्तंभ
३०. स्तूप
३१. स्तूपनगार्यावरील बोधिसत्व मूर्ती
या लेण्यांतील भिंतींवरही बुद्धाच्या जीवनातले प्रमुख शिल्पपट कोरलेले आहेत. त्यापैकी दोन सर्वात महत्वाचे आणि जगप्रसिद्ध शिल्पपट म्हणजे बुद्ध महानिर्वाण आणि मारविजय.
बुद्ध महानिर्वाण
या शिल्पपटात बुद्धाचे महानिर्वाण दाखवले आहे. बुद्धाची सव्वातेवीस फूट लांबीची मूर्ती लोडावर हाताचा आधार घेऊन त्यावर डोके ठेऊन कुशीवर झोपलेल्या अवस्थेत दाखवली आहे. बुद्धाचा मृत्यु झालेला असूनही मूर्तीच्या चेहर्यावरचे भाव अतिशय प्रसन्न आणि समाधानाने ओतप्रोत भरलेले दिसत आहेत. मूर्तीच्या खालच्या बाजूला बुद्धाचे अनुयायी शोक करत बसलेले आहेत. त्यांच्या चेहर्यावरचे भाव्ही विलक्षण बोलके आहेत. कुणी भजन म्हणत आहे तर कुणी टाळ्या वाजवून त्याला साथ देत आहे तर कुणी धाय मोकलून रडत आहेत तर काही अगदी शोकाकुल होऊन डोळे पुसत बसले आहेत. तर कुणी एक विमनस्क अवस्थेत हनुवटीवर हात टेकवून बसलेली आहे. तर कुणी एक गालावर हात टेकवून हे दु:ख कसे सहन करावे या विचारात आहे. दगडी शिल्पेसुद्धा किती बोलकी असू शकतात हे येथे दिसते.
तर बुद्धमूर्तीच्या वरच्या भागात आकाशात बुद्धाच्या शरीरावर पुष्पवृष्टी करताना देवता आणि गंधर्व दाखवलेले आहेत. जणू ते स्वर्गात येणार्या बुद्धाचे स्वागत मोठ्या हर्षाने करत आहेत.
३२. बुद्धमहानिर्वाण
३३. बुद्धाचे मुखदर्शन
३४. शोकाकुल अनुयायी
३५. शोकाकुल अनुयायी
३६. गालावर हात टेकवून मूकपणे अश्रू ढाळणारी स्त्री
३७. पुष्पवृष्टी करणार्या देवता आणि गंधर्व
याच शिल्पपटाच्या शेजारील बाजूस असेच एक जगप्रसिद्ध शिल्प आहे ते म्हणजे मारविजय
मारविजय
विश्वातील दु:ख बघून आल्यावर गोतमाने घोर तपश्चर्या केली व बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसला. गोतमाला ज्ञानप्राप्ती होण्याचा म्हणजेच बुद्धपद प्राप्त होण्याचा समय होताच गोतमाचा शत्रू मार याने त्याच्या ध्यानात विघ्न आणायचे ठरवले. माराने नगारा वाजवून आपले सैन्य जमवले. त्याच्या सैनिकांनी हत्ती, वाघ, सिंह तसेच भयानक चेहर्यांची मुखे धारण केली व सर्व बाजूंनी ते बुद्धावर चालून आले. ह्या भयंकर हल्ल्यातूनही बुद्धाची जराही चलबिचल होत नाही हे पाहून त्याने बुद्धाला मोहित करण्यासाठी शृंगाराची शिकस्त केली. आता बुद्धाचे ध्यान मोडण्यासाठी अप्सरांना बोलावण्यात आले. कुणी नृत्य करत आहे तर कुणी गायन करत आहे. तर कुणी पुष्पमाला तर कुणी चवर्या हाती घेऊन उभ्या आहेत तर कुणी वाद्ये वाजवीत आहेत. त्यात एक स्त्री तबलातरंगासारखे वाद्य वाजवत आहे हे विशेष प्रेक्षणीय आहे.
अप्सरांनी घेरूनही गोतमाचे ध्यान जराही विचलीत झाले नाही हे बघून बुद्धशत्रू मार शेवटी लज्जित होऊन पळून जातो व गोतमाला बुद्धप्राप्ती होते.
हा मार प्रत्यक्षात अस्तित्वात नसून हे स्वतःच्याच अंगी असलेया षड्रिपूंविरुद्ध झगडणे आहे हे आपण मागे पाहिलेच आहे.
३८. मारविजय
३९. माराचे सैनिक हल्ला करताना
४०. माराचे सैनिक हल्ला करताना
४१. तपोभंगाच्या प्रयत्नातील अप्सरा
४२. एका नर्तिकेची नृत्यमुद्रा
यानंतरच्या भिंतीवर बुद्धाच्या जीवनातले इतरही प्रसंग दाखवले आहेत. श्रावस्तीचा चमत्कार, बुद्धाचे अनुयायी नंद आणि अनुपनंद हे दोन नाग बुद्ध बसलेल्या कमळाचे देठ तोलून धरताना, बुद्धाच्या विविध मुद्रा-ध्यानस्थ, प्रवचनपर, अवलोकितेश्वर इत्यादी. अनुयायी बुद्धाची सेवा करत आहेत तर कधी त्याच्या पायांशी बसून शांतपणे त्याचे प्रवचन ऐकत आहेत.
४३. बुद्धाच्या विविध भावमुद्रा व जीवनातील प्रसंग
४४. बुद्धाच्या विविध भावमुद्रा
४५. बुद्धाच्या विविध भावमुद्रा
असे हे अत्यंत सुंदर चैत्यगृह बघून आम्ही बाहेर आलो. चैत्यगृहाबाहेरील डावीकडच्या भिंतीवर अगदी विष्णूसारखीच दिसणारी एक आगळीच बुद्धमूर्ती दृष्टीस पडली तर पुढच्या २७ व्या क्रमांकाच्या विहारात प्रवेश बंद असल्याने त्यात नेमके काय आहे हे पाहता आले नाही तरी त्याच्या प्रवेशद्वारावर दोन द्वारपाल कोरलेले मात्र दिसले.
४६. विष्णूसारखी दिसणारी बुद्धमूर्ती.
आता अजिंठा लेणी जवळपास संपूर्ण पाहून झाल्या होत्या. जवळपास ६ तास आम्ही हे सर्व दगडातील सौंदर्य बघत भटकत होतो, घाईगर्दीत तरिही निवांतपणे. वास्तविक अजिंठा हे एका दिवसात पाहण्याचे ठिकाण नाहीच. इथली चित्रे, इथली शिल्पे, त्यामागच्या कथा नीट समजूत घेत पाहावयाचे म्हटल्यास हा सर्व समूह बघण्यास १५ दिवस तरी सहज लागावेत.
४७. अजिंठा लेणी समूहाची लांबून घेतलेली प्रकाशचित्रे
४८. अजिंठा लेणी समूहाची लांबून घेतलेली प्रकाशचित्रे
४९. अजिंठा लेणी समूहाची लांबून घेतलेली प्रकाशचित्रे
५०. अजिंठा लेणी समूहाची लांबून घेतलेली प्रकाशचित्रे
५१. कड्याच्या वरच्या भागात अपूर्णावस्थेतील चैत्यगृहाची कमान
जाता जाता मागच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे अजिंठ्याच्या चित्रांमागचे रहस्य थोडे उलगडू म्हणतो.
अजिंठ्याच्या चित्रांचे रहस्य.
इथल्या कातळी भिंती आधी छिन्नीने तासून तासून गुळगुळीत केल्या जात व त्यावर माती शेण, ताग, तूस यांछ्या वस्त्रगाळ मिश्रणाच्या पातळ गुळगुळीत गिलावा इथल्या ताशीव भिंतीवर चढवला जाई. व त्या गिलाव्यावर शिंपले तसेच चुनखडीपासून तयार केलेया चुन्याचा अंड्याच्या टरफलाइतक्या जाडीचा चकचकीत थर चढवला जाई. आणि तो थर ओलसर असेतोच त्यावर रसचित्रे काढली जात. सूक्ष्म टोकाच्या दाभणासारख्या साधनाने गेरूच्या रंगात चित्राची बारीक बाह्यरेषा प्रथम काढावयाची आणि नंतर त्यांत रंग भरावयाचे अशी येथील चित्रकारांची पद्धत होती.
ही चित्रे रंगवण्यासाथी चित्रकारांनी फक्त सहा रंगांचा वापर केला आहे. पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा व निळा. यापैकी काळा रंग काजळीपासून तयार करण्यात असे तर इतर रंग तीळ, जवस, आदी वनस्पतींपासून आणि विविध रंगांतील दगडांपासून बनवण्यात येत असत. या सर्व रंगांपैकी निळ्या रंगाचा वापर येथे अगदी कमी प्रमाणात आढळतो याचे कारण हा रंग येथे बनत नसे. हा रंग पर्शिया अथवा उत्तर भारतातून आयात करावा लागे.
या सर्व लेण्यांत इतका अंधार आहे की साध्या डोळ्यांना ही चित्रे नीट दिसतही नाहीत. चित्रकारांनी ही चित्रे कशी रंगवली असतील याची आज नीटशी कल्पनाही करता येणार नाही. पण दिवसाच्या ठराविक वेळात येणारा सूर्यप्रकाश तर काही वेळा मशाल आदी साधनांचा वापर करून त्यांनी ही सौष्ठवपूर्ण चित्रे रंगवली असतील असे वाटते.
५२.
वाकाटकांच्या अस्ताबरोबर आणि वैदिक धर्माभिमानी राष्ट्रकूटांच्या आगमनानंतर बौद्ध धर्माचा हळूहळू र्हास व्हायला सुरुवात गेली. वेरूळच्या भव्य दिव्य अशा एकाश्म कैलास मंदिराच्या निर्माणानंतर अजिंठ्याच्या बौद्ध मठातील रीघ थांबून ती हळूहळू वैदिक धर्माकडे आकर्षित होऊ लागली व अजिंठ्याचा हा वैभवाशाली वारसा हळूहळू विस्मृतीत जाऊ लागला. त्या वेरूळ लेण्यांची सफर आपण करू ती यापुढच्या लेखमालिकेत.
समाप्त
प्रतिक्रिया
28 Jan 2013 - 10:47 pm | पैसा
यातली काही चित्रे/शिल्पे यांचे फोटो चित्रकलेच्या पुस्तकांतून पाहिले आहेत. पण तेव्हा तो अभ्यासाचा विषय असल्यामुळे त्यांचा असा आनंद घेता आला नव्हता. वल्ल्या, धन्यवाद!
28 Jan 2013 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजिठ्याची शिल्पे आणि चित्रे म्हणजे दगडावरचे काव्य आहे. इतक्या प्राचीन काळी इतक्या उच्च दर्जाचे कोरीवकाम व त्रिमीतीपूर्ण चित्रकला साकारली गेली हे किती आश्चर्यकारक आहे !
उत्तम चित्रे. आणि इतक्या सखोल माहितीने तर या लेखावर कळसच चढवला आहे ! तुमच्या संशोधक वृत्तीला सॅल्यूट !!
वेरूळ संबद्धीच्या भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे.
28 Jan 2013 - 11:34 pm | बाबा पाटील
अप्रतिम,५ वर्षापुर्वी येथे जाउन आलो होतो, पन तुमच्या नजरेने नव्याने ही लेणी पाहिली.....
28 Jan 2013 - 11:41 pm | अग्निकोल्हा
लेखमाला बघुन आता स्वतःच एखाद्या लेण्याचे खोदकाम हाति घ्यावेसे वाटत आहे.
28 Jan 2013 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
हा भाग पण हायक्लास :-)
29 Jan 2013 - 10:09 am | मूकवाचक
+१
29 Jan 2013 - 12:09 am | मोदक
व्वा..
भारी लिहिले आहेस रे.
29 Jan 2013 - 12:11 am | बॅटमॅन
टिपिकल वल्ली टच. जिव्हाळ्याचा विषय असल्याने काय अन किती लिहू असे लेखकाला वाटल्याचे दिसतच आहे. :)
29 Jan 2013 - 8:30 am | किसन शिंदे
नेमकं बोललास रे निख्या. :)
29 Jan 2013 - 11:00 am | इनिगोय
अगदी खरं :)
हे वल्लीबुवा एकेका शिल्पावर तावच्या ताव लिहू शकतील!
29 Jan 2013 - 8:34 am | किसन शिंदे
लेखणी मुद्दाम आवरती घेतलीय असं वाटतं. एवढ्या मोठ्या अंजिठ्यावर तुझ्यासारख्या अभ्यासू माणसाकडून फक्त चारच भाग? हे काही पटत नाही. :p
आळशी कुठचा*
29 Jan 2013 - 8:39 am | दीपा माने
ह्या सुंदर फोटोग्राफी आणि लिखाणामुळे एका सुंदर कालखंडात काही काळ घालवल्याचा मनोमन अनुभव घेतला. धन्यवाद.
29 Jan 2013 - 9:28 am | लीलाधर
हे समीकरण चांगलेच अंगवळणी पडले असल्याने काय बोलु ? मस्त मस्त आणि फक्त मस्तच !
29 Jan 2013 - 9:38 am | यशोधरा
छान लिहिले आहे. शिल्पे अत्यंत देखणी आहेत.
भुलेश्वरबद्दल लिहिले आहे का?
29 Jan 2013 - 9:43 am | यशोधरा
छान लिहिले आहे. शिल्पे अत्यंत देखणी आहेत.
भुलेश्वरबद्दल लिहिले आहे का?
29 Jan 2013 - 9:43 am | स्पा
अ प्र ती म
मस्तच झाली लेखमाला ,
वेरूळ सिरीज च्या प्रतीक्षेत ...
29 Jan 2013 - 10:25 am | ज्ञानोबाचे पैजार
आळशी कुठचा*
या साठी किसन देवाला +१
अजिंठा या आधी दोन वेळा पाहीले होते. पण या माणसाच्या नजरेने पहाण्याची मजा काही वेगळीच आहे.
पैजारबुवा,
29 Jan 2013 - 10:48 am | मन१
ह्या भागाप्रमाणेच सर्वच भाग उत्तम असणार ह्यात शंका नाही.
नेमकं हापिसातून मिपा उघडात नाही, उघडलेच तर दहा-बारा मिनिटात साइट ब्लॉक होते. त्यामुळं फुरसतीत वाचन्यासारखे कैक चांगले लेख राहून गेलेत वाचायचे.
पण एवढं तरी वाचता आल्यानं बरं वाटतय.
29 Jan 2013 - 12:23 pm | जयंत कुलकर्णी
मस्त !
29 Jan 2013 - 1:44 pm | ५० फक्त
लई भारी लिहिलंय, नक्की काय करावं इथं जावं का नुसतं लेख वाचुनच समाधान मानावं या विवंचनेत आहे.
29 Jan 2013 - 2:53 pm | पियुशा
केवळ अप्रतिम !
29 Jan 2013 - 2:56 pm | सौरभ उप्स
जाम भारी रे वल्ली शेठ ..... मस्त सफर घडवलीस .......
वर्णन आणि फोटू एकदम जबरदस्त.....
29 Jan 2013 - 2:57 pm | सौरभ उप्स
"लई भारी लिहिलंय, नक्की काय करावं इथं जावं का नुसतं लेख वाचुनच समाधान मानावं या विवंचनेत आहे." अगदी सहमत......
29 Jan 2013 - 2:58 pm | स्पा
म्या तर जाऊन आलोय
आता परत जाऊ , तुझा क्यामेरा आल्यावर
29 Jan 2013 - 3:00 pm | सौरभ उप्स
नक्कीच, लवकरात लवकर येवो कॅमेरा......
29 Jan 2013 - 3:14 pm | नि३सोलपुरकर
___/\___ उत्तम चित्रे. आणि इतक्या सखोल माहितीने तर या लेखावर कळसच चढवला आहे ..हॅटस आफ वल्ली.ग्रेट
२० व्या चित्रात छतावरील निळ्या रंगात रंगवलेली फुले पाहुन जो प्रश्न पडला होता त्याचे निराकरण तर +१०००
29 Jan 2013 - 3:16 pm | स्मिता.
अजिंठ्याचे अनेक आधी न पाहिलेले फोटो आणि त्यासोबत सुरस वर्णन... खूपच छान!
या लेण्यांचा एवढा आस्वाद तर मी स्वतः तिथे जाऊनही (काही न कळल्यामुळे) घेतला असता की नाही, कल्पना नाही.
29 Jan 2013 - 6:35 pm | चित्रगुप्त
अप्रतिम फोटो आणि माहिती. पुन्हा सावकाशीने वाचण्या-बघण्याचा लेख.
29 Jan 2013 - 8:00 pm | नासिकचे महाराज
"या सर्व लेण्यांत इतका अंधार आहे की साध्या डोळ्यांना ही चित्रे नीट दिसतही नाहीत. चित्रकारांनी ही चित्रे कशी रंगवली असतील याची आज नीटशी कल्पनाही करता येणार नाही. पण दिवसाच्या ठराविक वेळात येणारा सूर्यप्रकाश तर काही वेळा मशाल आदी साधनांचा वापर करून त्यांनी ही सौष्ठवपूर्ण चित्रे रंगवली असतील असे वाटते."
चकाकणार्या धातूच्या पत्र्यावरुन सुर्यकिरण परावर्तित करुन हे काम केले आहे.मशालीचा वापर केला तर धुरामुळे /उष्णतेमुळे रंगावर परिणाम आणि कलाकारांना धुराचा त्रास झाला असता .
29 Jan 2013 - 8:04 pm | सागर
वल्ली मित्रा, नेत्रसुखद छायाचित्रांना तुझ्या ओघवत्या शैलीतल्या वर्णनाने एक सुंदर झळाळी आलेली आहे.
खूप छान वाटले ही चार भागांची मालिका वाचून (आणि पाहूनही) :)
एका सुंदर ऐतिहासिक ठिकाणाची एक सुरेख सफर झाली. आता जेव्हा कधी अजिंठ्याला जाईन त्यावेळी ते मला अनोळखी अजिबातच वाटणार नाहिये आणि याचे श्रेय सर्वस्वी तुला आहे.
29 Jan 2013 - 8:58 pm | धन्या
वल्ली और फोटो दोनोंको !!!
30 Jan 2013 - 12:58 pm | सुहास..
व्वा !! क्या बात है !!
चार ही भाग आवडेशच आवडेश
1 Feb 2013 - 9:12 am | कंजूस
अजिँठा वेरूळ सहल . अजिंठा सोमवारी आणि वेरूळ मंगळवारी बंद असते . मुंबईहून रात्रीची २३.४५दादर(आता कुर्ला)अमृतसर ११०५७ ने सकाळी सवा सहाला जळगावला उतरा . सामान घेउनच रिक्षाने एसटि डेपोला जा . नाशता करून औरंगाबाद बसने 'अजिंठा टि जंक्शन'ला उतरा ,६०किमी आहे एक दीड तास लागतो. पर्यटनच्या बसने लेण्यांच्या पायथ्याशी(४किमी) सोडतात . येथे पर्यटन मंडळाच्या क्लोकरूम आहेत तिथे बैगा ठेवा . चांगली टॉयलेटही आहे . आता ९ वाजले असतील आणि लेणी उघडतात . दुपारी एकपर्यँत लेणी पाहून ,टि जंक्शनला या जेवण घ्या .पुन:हा औरंगाबाद बसने/शेअर टेक्सीने औरंगाबाद डेपोला या .१०० किमी आहे २ तास लागतात . जवळच हॉटेल आहेत २४तासाचा चेक ऑउट मिळतो . दुसरे दिवशी सकाळी सहालाच तयार होऊन धुळे बसने वेरूळ गेटला उतरा ,३०किमी आहे एक तास लागतो ,वाटेतच दोलताबाद आहे . वेरूळ सातला उघडते ११ पर्यँत लेणी पाहून धुळेच्या दिशेने १५ मिनीटे चालल्यावर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे . दर्शन करून बस/शेअर टेक्सीने औरंगाबादला एक वाजता पोहोचाल . हॉटेल सोडून औरंगाबाद रे स्टेशनला या २किमी आहे . दुपारी २.३५ ला तपोवन गाडी १७६१८ ने रात्री दहाला मुंबई .
1 Feb 2013 - 9:23 am | कंजूस
धन्यवाद वल्ली . फारच छान !! कर्नाटकातील बदामि - पट्टडकळ -ऐहोळे तसेच हम्पि येथील लेणी आणि मंदिरांची सहल करून असेच उत्तम वर्णन लिहा .
15 Jan 2015 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल अजिंठ्याला महाविद्यालयाची सहल घेऊन गेलो होतो अजिंठा म्हटलं की दोन गोष्टी मला वेड लावतात एक माझा मुकुटावर विराजमान असलेली अजिंठा लेणीतील सर्वात लहान आकाराची बुद्ध मुर्ती ज्यांच्या प्रेमकथेवर जीव आहे ती रॉबर्ट गिल आणि पारोची या जोडीची चित्तर कथा आणि दुसरं म्हणजे अजिंठ्याच्या चित्रांमधे असलेल्या यशोधरेचं चित्र ज्यात नवरा साक्षात समोर भिक्षापात्र घेऊन उभा आहे आणि ती स्वत:च्या बाळाला सावरते ते चित्र मला खुप आवडते अर्थात आता ते चित्र खुप दुरुन पाहावे लागते त्यामुळे यशोधराच्या चेहर्यावरचे भाव वाचता येत नाही. बाकीच्या जातकथा असलेली चित्र आणि शिल्प हेही आवडतातच.
अजिंठ्याला आपण कधी गेलात तर वल्लीने लेखन केलेल्या मिपावरच्या अजिंठ्याची चारही भागांची मालिकांची प्रिंट काढून घेऊन गेलं पाहिजे. अतिशोयक्ती वाटेल पण अजिंठ्यामधे आपल्याला कितीही टॉर्चच्या उजेडात तेथील कितीही चित्र कोणी कितीही स्पष्ट दाखविण्याचा प्रयत्न करीत असेल पण वल्लीच्या लेखांमधे जितकी ठळक,स्पष्ट चित्र आली आहेत ती आणखी कोणी दाखवू शकत नाही, असे माझं मत आहे. आणि मार्गदर्शकही वल्लीच्या लेखांपेक्षा अधिक असं मार्गदर्शन करु शकत नाही.
वल्ली, अजिंठा लेणीतील जातककथा तपशीलवार तुम्ही टाकाव्यात अस मला वाटतं. जातककथा या बुद्धविचाराची, जीवनमार्गाची शिकवण देणा-या कथा आहेत तेव्हा त्याबद्दल तपशीलवार तुम्हीच लिहु शकाल असे मला वाटते.
आता वल्लीच्या कौतुकानंतर चुक काढण्याचा एक प्रयत्न. गौतमबुद्धाच्या महानिर्वाणाच्या शिल्पात शोकाकुल अनुयायात आपण ३६ व्या प्रकाशचित्रात शोकाकुल स्त्रीचा उल्लेख केला आहे तो मुळात गौतमबुद्धाचा पट्टशिष्य आनंद असावा असे मला वाटते. :)
-दिलीप बिरुटे
16 Jan 2015 - 8:50 am | प्रचेतस
धन्यवाद सर.
तुम्ही वर उल्लेखलेले बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र माझ्याही अतंय आवडीचे. चित्रकाराने जीव ओतल्याशिवाय असली चित्रे तयारच होऊ शकत नाहीत.
जातककथांचे म्हणाल तर फार पूर्वी जातककथा वाचल्या होत्या. चिं. वि. जोशींनी त्यांचा उत्तम अनुवाद केला होता. आता परत लिहायचे म्हणजे त्याची परत उजळणी करणे आले. जयंत कुलकर्णी काकांनी काही जातक कथांवर त्यांच्या अजिंठा लेखमालेत सविस्तरपणे लिहिलेले आहेच.
मी ही सवडीनुसार लिहिण्याचा प्रयत्न करतो.
बाकी अश्रू ढाळणारी स्त्री नसून पुरुषच आहे. चूक नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मात्र तो आनंद आहे की नाही हे मात्र सांगता येत नाही.
आता परत अजिंठ्याला जाणे आले. :)