अजिंठा लेणीतले १ व २ क्रमांकाचे भव्य विहार पाहून आम्ही पुढच्या लेणी पाहण्यास निघालो निघालो. पद्मपाणी आणि वज्रपाणी प्रतिमांनी मनावर अक्षरशः गारूड केले होतं आता आमच्यापुढे अजिंठ्याने काय काय आश्चर्ये वाढून ठेवली आहेत याची जाम उत्सुकता होती
पुढील ३ ते ८ क्रमांकाच्या लेण्या या ह्यासुद्धा विहार असून आत सुरुवातीच्या विहारांसारखीच त्यांची रचना आहे. ओसरी, सभामंडप, आणि गर्भगृह. ह्या विहारांमधेसुद्धा काही चित्रे आहेत पण ती बरीचशी नष्ट झालीत. या विहारांमध्ये शिल्पे कोरण्याचे प्रमाण जास्त आहे.
लेणी क्र. ४ च्या प्रवेशद्वारांवर अतिशय सुंदर मूर्तीकाम केले आहे तर आतील स्तंभांवर नक्षीदार कलाकुसर केली आहे. हा विहार बुद्धाच्या विविध स्वरूपातील - आशीर्वादपर, प्रवचनपर, अर्धोन्मिलित, ध्यानस्थ अशा प्रतिमांनी सुशोभित झाला आहे. येथील सभामंडपाच्या छतावर लाव्हारस वाहिल्याच्या खुणा स्पष्टपणे आढळून येतात.
लेणी क्र. ४ मधील प्रकाशचित्रे
१. प्रवेशद्वारातील बोधिसत्व प्रतिमा
२. दरवाजांवरील अशाच काही प्रतिमा
३. ओसरीतले कोरीव काम
४. प्रवेशद्वारानजीकचे काम
५. स्तंभांवरील नकसकाम
लेणी क्र. ६
लेणी क्र. ६ हा अजिंठा समूहातील एकमात्र दुमजली विहार. दोन्ही मजल्यांवर स्तंभयुक्त सभामंडप, निवासकक्ष आणि अंतराळयुक्त गर्भगृहे आहेत. सभामंडपात बुद्धमूर्ती कोरलेल्या असून गर्भगृहामध्ये बुद्धाची सिंहासनारूढ भव्य प्रतिमा व त्यावर आकाशगामी गंधर्वमूर्ती कोरलेल्या आहेत.
तळमजल्यावरील भिंतीवर बोधिसत्व प्रवचन देतानांची चित्रे, जातक कथांमधील काही दृश्ये चित्रित केली आहेत तर वरच्या मजल्यावर बुद्ध, बोधिसत्व, नागराजा नंदाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
लेणी क्र. ६ मधील प्रकाशचित्रे
६. बोधिसत्व प्रवचन देत असताना
७. भिंतींवरील कोरीव बुद्धप्रतिमा
८. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारानजीकच्या भव्य प्रतिमा
९. गर्भगृहातील सिंहासनारूढ भगवान बुद्ध
लेणी क्र. ७ मधील प्रकाशचित्रे
लेणी क्र. ७ हा सुद्धा एक विहार असून इथे मात्र गौतम बुद्धाचा श्रावस्तीतला चमत्कार जिथे त्याने स्वतःला एक हजार बुद्धांमध्ये अवतरीत केले होते तोच इथे मूर्तस्वरूपात कोरलेला आहे. जातककथांमधली ही कथा लेणी क्र. २ मध्ये चित्ररूपात रंगवलेली आहे हे आपण मागे पाहिलेच आहे.
१०. श्रावस्तीचा चमत्कार
११. श्रावस्तीचा चमत्कार
१२. गर्भगृहातील आशिर्वादपर मुद्रेतील प्रसन्न पद्मासनस्थ बुद्धमूर्ती
१३. सभामंडपातील रंगवलेले छत
चैत्यगृहे (क्र. ९ व १०)
पुढचे काही विहार साधे आहेत तर ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृहे आहेत. अजिंठ्यातील सर्वात प्राचीन चैत्यगृहे ती हीच.
सर्वसाधारणपणे एका लेणी समूहात एकच चैत्य खोदला जातो. अजिंठा लेणीसमूहात मात्र तब्बल चार चैत्यगृहे आहेत आणि ही ९ आणि १० क्रमांकाची तर एकमेकांना अगदी लागून. फार पूर्वीपासून अजिंठा लेणीमध्ये मोठ्या प्रमाणावर येणार्या बौद्द भिख्खूंच्या प्रार्थनेच्या सोयीसाठी इथे चैत्यगृहे जास्त प्रमाणात कोरली गेली असावीत.
दोन्ही चैत्यगृहांचा दर्शनी भाग नेहमीच्या शैलीतच आहे. प्रवेशद्वारावरचे स्तंभ, पिंपळपानाकृती वातायन. तर अंतर्भागात दोन्ही बाजूंना एका ओळीत कोरलेले स्तंभ, छताची गजपृष्ठाकार रचना, आणि जोते, वेदिकापट्टी, अण्ड, हर्मिका अशा रचनेचा स्तूप.
हिनयानकाळातले हे चैत्य. महायानकाळात यांच्या बाहेरील भिंतींवर बोधिसत्वाच्या मूर्ती कोरल्या गेल्या तर चैत्याच्या आतील बाजूस स्तंभांवर आणि भिंतींवर चित्रे रंगवली गेली. चैत्यगृहे त्यांच्या वातायनामुळे नेहमीच जास्त प्रकाशमान असतात त्यामुळे इथली चित्रे बरीचशी सुस्पष्ट आहेत. या चैत्यांमध्ये जातककथांतील दृश्यांबरोबरच बुद्धप्रतिमाही मोठ्या प्रमाणावर रंगवलेल्या आहेत.
१० व्या क्रमांकाच्या चैत्यगृहात चैत्यकमानीच्या उजव्या बाजूला एक शिलालेख आहे.
वासिठिपुतस कट
हादिनो घरमुख
दानं
वासिष्ठिपुत्र कटहादी दिलेले कठ आणि चैत्यमुखाचे दान
म्हणजेच हा चैत्यमुखाचा दर्शनी भाग हा वाशिष्ठिपुत्र कटहादी याने दिलेल्या दानातून निर्माण केले आहे. हा कुणीतरी श्रेष्ठी असावा.
तर चैत्यगृहाच्या आतील बाजूस डाव्या भिंतीवर अजून एक शिलालेख कोरलेला आहे.
कणहस बाहडस
दानं भिति
बाहडचा रहिवासी कण्हक याने दान दिलेली भिंत
हे बाहड गाव कुठले याचा उलगडा होत नाही.
हे दोन्ही शिलालेख ब्राह्मी पाकृतात असून इ.स.पू २ ते इस. पू. १ यादरम्यान कोरलेले आहेत.
लेणी क्र. ९ मधील काही प्रकाशचित्रे
१४. चैत्यगृहाचा दर्शनी भाग
१५. प्रवेशद्वाराजवळील तिहेरी छत्र असलेल्या स्तूपाचे शिल्प
१६. स्तूप आणि चित्रांकित स्तंभ
१७. जातककथांमधील काही प्रसंग
१८. जातककथांमधील काही प्रसंग
१९. बोधिसत्व
२०.जातककथांमधील काही प्रसंग
२१. जातककथांमधील काही प्रसंग
२२. स्तंभावरील बुद्धचित्र
लेणी क्र. १० मधील काही प्रकाशचित्रे
२३. चैत्यगृहाच्या शेजारील भिंतीवरील कोरीव शिल्पे
२४. अजिंठा लेणीतील सर्वात भव्य स्तूप
२५. स्तंभांवरील बोधिसत्व आणि इतर भिख्खूंची चित्रे
२६. स्तंभांवरील चित्रे
२७. चैत्याच्या आतील भित्तीचित्रे
२८. एका स्तंभावर असलेले हे सुरेख चित्र
२९. स्तंभावरील एका बौद्ध भिख्खूचे चित्र
३०. हा बहुधा चिनी/ मंगोलीयन भिख्खू असावा
३१. बोधिसत्व
३२. भिख्खू, बोधिसत्व व छत्रधारी सेवक
३३. हे अजून काही परदेशी भिख्खू
चैत्यगृहातून बाहेर आलो. येथून पुढचे काही विहार साधे असून काही ठिकाणी शिल्पांसकट चित्रेही रंगवली आहेत. आता पुढचे लक्ष्य होते ते क्र. १६ व १७ चे भव्य विहार. या विहारांमध्ये सिंहल जातक, शददंत जातक आणि विश्वंतर जातक ह्या कथांमधील दृश्ये असणारी काही अप्रतिम, सुस्पष्ट आणि जगप्रसिद्ध अशी भित्तीचित्रे आहेत. त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Jan 2013 - 6:17 pm | ह भ प
काय प्रतिक्रिया देऊ या संभ्रमात.. चांगलं चांगलं म्हणायचा पण कंटाळा आलाय.. त्यामुळं 'खूप चांगलं.. खूपच चांगलं..' असं म्हणतो.. :)
8 Jan 2013 - 6:41 pm | इनिगोय
_/\_ तुझ्या उत्कृष्ट छायाचित्रणाला दाद द्यावी की या अजरामर कलाकृती निर्माण करणार्या त्या कलाकारांना!
केवळ अप्रतिम..
8 Jan 2013 - 6:50 pm | सागर
मस्त छायाचित्रे आहेत वल्ली मित्रा.
एकदम रच्च्याक ...
बोधिसत्त्वाने मनाला भुरळ घातली.
हाही भाग क्रमशः आहे हे छायाचित्रे पाहूनच लक्षात आले. ;) पुढील भाग लवकर टाक हा आग्रह :)
8 Jan 2013 - 7:01 pm | पैसा
चित्रे सुंदर आणि त्यांची छायाचित्रे सुंदर! या विहारांमधे राहणारे लोक बहुधा संन्यासी असणार. मग एवढ्या प्रमाणात स्त्रियांच्या आकर्षक प्रतिमा का कोरत असावेत? अशी भित्तीचित्रे आणखी कोणत्या मंदिरात्/लेण्यांमधे असल्याचे ऐकले नाही. की अशी चित्रे होती आणि ती काळाच्या ओघात नामशेष झाली? कारण अशा कला सहसा मौखिक ज्ञानाने वंशपरंपरागत रीत्या पिढ्यानपिढ्या चालत येत असत.
9 Jan 2013 - 9:33 am | प्रचेतस
रूढार्थाने हे संन्यासी नव्हेत. हे तर बौद्ध धर्माचा प्रचार करत हिंडणारे धर्मप्रचारक अथवा श्रमण.
स्त्रियांच्या प्रतिमा कोरण्यामागचे कारण म्हणजे जातक कथांमधले संदर्भ किंवा तत्कालिन जीवनातली रूपके दाखवणे. हे चित्रे काढण्याचे काम करणारे अथवा मूर्ती कोरण्याचे काम करणारे कलाकार बौद्धच असावेत हा नियम नव्हता. पैशाच्या अथवा वस्तूंच्या मोबदल्यात ही कामे कसबी कारागीरांकडून करवून घेतली जात असे.
बाकी अशी भित्तीचित्रे बर्याच ठिकाणी आहेत. कान्हेरीच्या लेण्यात छतावर बोधिसत्वाचे अपूर्णावस्थेतील चित्र आहे तर जुन्नरच्या लेण्यांमध्ये छतांवर कोरलेली नक्षीदार डिझाईन्स आजही दिसतात. बेडसे लेण्यांमध्ये पूर्वीच्या रंगांचे अवशेष आहेत.
हीच रंगांची कला नंतर हिंदू/जैन लेण्यांमध्येही आली. वेरूळच्या जैन, हिंदू लेण्यांत छतांवर आणि भिंतींवर रंगवलेली चित्रे आहेत. खुद्द कैलास लेण्याच्या मुख्य सभामंडपातही छतांवर चित्रे रंगवलेली आहेत.
@मराठे: सहसा मूर्ती रंगवल्या जात नसत. रंगवल्यासारखा वाटतोय तो भाग बहुधा झिरपण्यार्या पाण्यामुळे पांढरट पडला असावा.
8 Jan 2013 - 9:42 pm | सस्नेह
ही चित्रे अन लेणी प्रत्यक्ष पाहताना जितकी रोचक वाटली नव्हती तितकी हे फोटो पाहताना अन वर्णन वाचताना वाटत आहेत.
8 Jan 2013 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
जबर्या..........! :-)
धनाजींच्या लेण्या पहातानांच्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत.....! ;-)
9 Jan 2013 - 9:00 am | ५० फक्त
होय होय, लेणी पाहताना धनाजी असा एखादा फोटो आहे का ?
10 Jan 2013 - 10:04 pm | धन्या
तसं झालं मात्र खरं. "गाढवाला गुळाची चव काय" असाच काहीसा प्रकार तेव्हा माझ्या बाबतीत झाला.
वेरुळ आणि अजिंठा या दोन्ही ठीकाणी लेण्यांमध्ये थोडयाफार फरकाने तशाच बुद्धाच्या मूर्ती, हिंदू लेण्यांमध्ये तोच तोच शिव पार्वतीचा सारीपाटाचा खेळ कोरलेला पाहून लय बोअर झालो राव. ईतका की वेरुळला तर चक्क वल्ली, किसन आणि माझा भाऊ लेणी पाहत असताना मी मात्र बिरुटे सरांसोबत शांतपणे एका ठीकाणी बसून स्वाध्याय परीवार आणि "विठठल एक महासमन्वय" हे पुस्तक अशा विषयांवर चर्चा केली.
असो. ज्याची त्याची आवड असते. या ट्रीपच्या निमित्ताने माझी बर्याच दिवसांची लाँग ड्राईव्हची ईच्छा मात्र पुर्ण झाली.
11 Jan 2013 - 9:40 am | स्पा
वेरुळ आणि अजिंठा या दोन्ही ठीकाणी लेण्यांमध्ये थोडयाफार फरकाने तशाच बुद्धाच्या मूर्ती, हिंदू लेण्यांमध्ये तोच तोच शिव पार्वतीचा सारीपाटाचा खेळ कोरलेला पाहून लय बोअर झालो राव. ईतका की वेरुळला तर चक्क वल्ली, किसन आणि माझा भाऊ लेणी पाहत असताना मी मात्र बिरुटे सरांसोबत शांतपणे एका ठीकाणी बसून स्वाध्याय परीवार आणि "विठठल एक महासमन्वय" हे पुस्तक अशा विषयांवर चर्चा केली.
चला म्हणजे आमच्यासारखी अजूनही लोक आहेत तर ..
आम्हाला वाटलं आम्ही एकुलते एक निर्बुद्ध दगड कि काय =))
9 Jan 2013 - 2:10 am | दीपा माने
फोटोग्राफर आणि लेण्यांचे कलाकार यांचे आभार.
9 Jan 2013 - 2:50 am | मराठे
चैत्यगृहातल्या काही मूर्तीही (कधीकाळी) रंगवलेल्या असाव्यात का?
चित्र.क्र. १२ बघून असं वाटले.
9 Jan 2013 - 8:24 am | स्पा
ेेएक लंबर फटु आलेत.
डीट्टेलवार माहीतीने म जा आली.
पु.भा.प्र
9 Jan 2013 - 8:58 am | चौकटराजा
तेथील चित्रांचे रंग केमिकल्स पासून बनविलेले नाहीत असे सांगतात. आजही इतक्या दीर्घ कालानंतर ते नवेच्या नवे वाटतात. त्यातील रसरशीतपणा फोटोतही आला आहे . वल्ली यानी एसेलार कॅमेरा घेतल्याने नक्की असा फरक दर्जात दिसतो आहे. आता वल्ली पांड्या चोला पल्लवा यांचा वेध कधी घेतात हे पहायचे !
11 Jan 2013 - 8:46 am | पाषाणभेद
हजारो वर्षांपुर्वीचे हे अजिंठ्याचे रंग अजूनही रसरशीत आहेत.
नैसर्गीक रंग आताच्या जमान्यात तयार करणे आताच्या संशोधकांना / रंगशास्त्रज्ञांना जमले आहे का? की आधीच कोणीतरी ते करण्याचा प्रयत्न केला आहे?
तेथील रंगाचे मिश्रण कशाचे आहे? त्यावर काही संशोधन किंवा त्या रंगांची उकल कुणी केली आहे काय?
9 Jan 2013 - 9:46 am | मूकवाचक
_/\_
9 Jan 2013 - 10:17 am | स्पंदना
वल्ली जातककथा, तुम्ही गडबडीत जातकथा लिहिलयं.
बाकि काय बोलाव. दुसर काय सुचल नाही म्हणुन कुसळ दाखवल समजा हवं तर.
तुमचा कॅमेराही तुम्हाला हवा तसा फोटो काढतो वल्ली.
9 Jan 2013 - 10:23 am | प्रचेतस
गडबड झालीच शेवटी.
असो. योग्य ते बदल केले आहेत.
निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)
9 Jan 2013 - 10:40 am | स्पंदना
:-)
9 Jan 2013 - 2:26 pm | पाषाणभेद
फारच जबरदस्त.
आपल्या लेखामुळे चित्र जरा जास्तच कळत आहेत.
9 Jan 2013 - 2:51 pm | पियुशा
इथे भींतीना लस्टर मारा नाही तर प्लास्टिक़कोटेड पेंट २-४ वर्षात रया जाते, या लेण्यामधील रंगीत चित्रे इतक्या वर्षांनीदेखील सुस्थितीत आहे काय म्हणावे त्या कलाकारांना :) वल्ली फोटु बेश्ट्म बेश्ट :)
9 Jan 2013 - 2:55 pm | त्रिवेणी
मस्त फोटो.
9 नंबरच्या फोटोत मूर्तीवर प्रकाश पडला आहे की आरिजिनल रंग आहे तो.
9 Jan 2013 - 3:03 pm | स्पा
माझ्यामते प्रकाश पडलेला असावा
10 Jan 2013 - 9:51 pm | लीलाधर
निव्वळ अप्रतिम वल्लीटच नेहमीप्रमाणेच
11 Jan 2013 - 11:29 am | सौरभ उप्स
भाग १ मध्ये खूप छान माहिती आणि दोन्ही भागातील फोटोस पण... इतिहासच सुधारित पुस्तक वाचल्यासारख वाटल.....
11 Jan 2013 - 11:32 am | सौरभ उप्स
प्रकाशाच असणार तो ९ नं च्या फोटोत, कारण सावली पडली आहे ना,.....
16 Jan 2013 - 9:07 am | किसन शिंदे
लेणी अथवा गड-किल्ले पाहायला गेल्यानंतर नेमके तेच फोटो काढणं फक्त या वल्ल्याकडूनच शिकावं.उगाच भारंभार कॅमेर्याची बटणं दाबत बसायचा नाही तो. :)
ह्या भागातली माहिती आवडलीय. आता पुढची जिलबी कधी?? ;)