चैत्यगृहातून बाहेर आलो. येथून पुढचे काही विहार साधे असून काही ठिकाणी शिल्पांसकट चित्रेही रंगवली आहेत. आता पुढचे लक्ष्य होते ते क्र. १६ व १७ चे भव्य विहार. या विहारांमध्ये सिंहल जातक, छदन्त जातक आणि विश्वंतर जातक ह्या कथांमधील दृश्ये असणारी काही अप्रतिम, सुस्पष्ट आणि जगप्रसिद्ध अशी भित्तीचित्रे आहेत. त्याविषयी पुढच्या भागात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यानंतरचे पुढचे विहार साधे आहेत. विहार क्र. ११ मध्ये बोधिसत्वाची सिंहासनावर पद्मासन घातलेल्या अवस्थेत बसलेली मूर्ती आहे. सिंहासनाच्या पायथ्याला दोन्ही कोपर्यात सिंह तर मध्यभागी हरीणांची शिल्पे कोरलेली आहेत तर त्याशेजारीच एक हात जोडून प्रार्थना करताना दाखवला आहे. तर बुद्धाच्या मस्तकी आकाशगामी गंधर्व पुष्पवृष्टी करताना दाखवले आहेत.
१. लेणी क्र. ११ मधील बोधिसत्व
लेणी क्र. १२ हा अतिशय जुना विहार असून याचे भाजे लेणीतल्या विहारांशी बरेचसे साम्य आहे. साहजिकच हा विहार इ.स.पू. २०० ते इ.स.पू. १०० च्या आसपास खोदलेला असावा. साधे विश्रांतीकक्ष आणि त्यांच्या दरवाजांवर पिंपळपानाकृती कमानीची नक्षी अशी याची रचना.
इथे भिंतीच्या उजव्या कोपर्यातील खोलीच्या दरवाजाच्या शेजारी एक ब्राह्मी लिपीत कोरलेला प्राकृत भाषेतील एक शिलालेख आहे.
ठाणको देयधमं घनामदडस वनिजस
सौवरको स उपा[सथो]
अर्थात
घनामदड या व्यापार्याने मध्यवर्ती दालन असलेले व सर्व बाजूंनी खोल्या असलेले हे लेणे दान दिले.
२. लेणी क्र. १२
लेणी क्र. १३, १४ मध्ये काहीही बघण्यासारखे नाही. अत्यंत साधे कक्ष आहेत. तर लेणी क्र. १५ मध्ये अजिंठ्यातील एका भित्तीचित्राची अलीकडेच काढलेली प्रतिकृती आणि अजिंठा लेणीसमूहाचे प्रारूप एका काचपेटीत ठेवलेले आहे. तर दोन काचपेट्यांमध्ये ज्यापांसून हे रंगकाम केले जाई त्या हिरडा, जवस, काथ्या अशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत. विहारातील गर्भगृहात बुद्धाची ध्यानमग्न अवस्थेतील प्रसन्न मूर्ती आहे.
३. लेणी क्र. १५
ह्यानंतरचे १६ व १७ क्रमांकाचे विहार हे अजिंठ्यातील सर्वात महत्वाचे. किंबहुना लेणी क्र. १ नंतर ह्या विहारांमधलीच चित्रकला आकर्षक आहे. जातक कथांचे सर्वाधिक चित्रांकन याच दोन विहारांत झाले आहे. अर्थात १६ क्रमांकाच्या विहाराचे विहारांचे काम वाकाटक राजा हरिषेण याचा अमात्य वराहदेव याच्याकडून झाले आहे तर विहार क्र. १७ हा हरिषेणाच्याच एका मांडलिक राजाने खोदवून घेतलेला आहे.
लेणी क्र. १६.
इथे व्हरांड्याच्या अगदी टोकाला डाव्या बाजूच्या भिंतीवर वराहदेवाचा शिलालेख कोरला आहे.
ब्राह्मी लिपी, संस्कृत भाषा, इ.स. ५ वे शतक.
१) दीर्ण्णलोकत्रयदोष्वन्हिनिर्व्वापनो..............
......................प्रणम्यं पूर्व्वा प्रवक्ष्ये क्षितिपानुपूर्व्वी (म्) (||)
२) महाविमद्देष्वभिवृद्ध्शक्ति: क्रुद्धस्सुरैरप्यनिवार्य्य (वीर्यः) (|)...
............रणदानशक्ति: द्विज प्रकाशो भुवि विन्ध्यशक्ति: (||)
३)
.
४)
.
.
.
.
२३) ....यस्य जनेन नाम प्रीतिप्रसादविकचप्रयणेन चक्रे (||) चेतः
२४)....लयनं सुरेन्द्र मौलिप्रभोपचित.....हायं (|) निवेवेद्य
संघाय.....थ्यं सबन्धुवर्ग्गस्स वराहदेवः (||) नृदेवसौख्यान्यनुभूय
२५)...शास्ता सुगतप्रशस्तः (||) सान्द्राम्भोदभुजन्ग्भोग...
२६).....सेव्यतामन्तर्म्म्णुपर्त्नमेतदमलं रत्नयोद्भावित(म्)
....तमाराम...भमनश्शिलालक्पिलैर्य्यावत्करैर्भास्करः (|)
तावच्छि-
(||) विविधलयनसानुस्सेव्यमानो महद्भिर्ग्गिरिरय-
२७)....भ्यः (|) जगदपि च समस्तं व्यस्तदोषप्रहाण
म्विशतु पद्मशोकं निर्ज्वरं शान्तमार्य्यं (||)
हा शिलालेख मोठा असल्याने मी तो येथे संपूर्ण न लिहिता सुरुवातीच्या आणि शेवटच्या काही ओळी लिहिल्या आहेत जेणेकरून तत्कालिन संस्कृत भाषेची थोडक्यात कल्पना यावी.
शिलालेखाचा थोडक्यात सारांश असा-
हा लेख वाकाटक नृपती हरिषेण याचा अमात्य वराहदेव याचा आहे. याचा उद्देश वराहदेवाने स्तंभ, चित्रावली व शिल्पाकृती इत्यादीनी विभूषित केलेले विहार बौद्ध संघाला दान दिले हे नमूद करण्याचा होता. या लेखाचे दोन भाग पडतात.
पहिल्या भागात पहिले वीस श्लोक येतात. त्यात तत्कालिन नृपती हरिषेण याची विंध्यशक्तीपासून वंशावळ दिलेली असून अनुषंगिक रीतीने देवसेन व हरिषेण या नृपतींचे अमात्य हस्तिभोज व त्याचा पुत्र वराहदेव यांचेही वर्णन आहे.
दुसर्या भागात वराहदेवाने ज्यात चैत्य मंदिर व विहार आहेत असे लेणे कोरवून ते मात्या-पित्यांना पुण्यलाभ व्हावा म्हणून बौद्ध संघाला अर्पण केले त्याचे वर्णन आहे.
विशेष म्हणजे हे वाकाटक राजे व त्याचे मंत्री हे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते तरीही त्यांनी बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला होता.
४. वराहदेवाचा शिलालेख
हा विहार महायानकालीन कलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना असून हा विहार स्तंभयुक्त सभामंडप, विश्रांतीकक्ष आणि गर्भगृहातील चवर्या ढाळणारे सेवक आणि आकाशगामी गंधर्वांनी घेरलेल्या बुद्धमूर्तीमुळे कमालीचा देखणा झाला आहे. इथल्या स्तंभावरचे भारवाहक यक्ष हे अगदी वेगवेगळ्या भावमुद्रांमध्ये कोरलेले आहेत. तर याच्या भिंतींवर जातक कथांमधील विविध दृष्ये कोरलेली आहेत.
यक्षांच्या विविध भावमुद्रा
५. हा नेहमीच्या पठडीतील भारवाहक यक्ष. हाता पायांनी छत तोलून धरताना
६. तर इथे मात्र एक जोडगोळी एकमेकांना आधार देत बसलेली आहे
७. तर इथे एक यक्षांच्या ऐवजी चक्क गंधर्वच छताला आधार द्यायचा सोडून उगा विहरत आहेत.
८. हे शिल्प मला खूप वेगळेच वाटले. इथे एक यक्षावर एक पशू हल्ला करतोय आणि यक्ष एका बाजूने पायाने छताला आधार देतोय तर एका हातातील ढालीने पशूला थोपवून दुसर्या हातात खंजीर पकडून त्याचा प्रतिकार करतोय.
९. इथे बघा एक भारवाहक यक्ष कसा यक्षिणीला गिटारसदृश वाद्य वाजवत तिचे मन रिझवण्याचा प्रयत्न करतोय
१०. तर दुसर्या एका स्तंभावर एक यक्ष चक्क दुसर्या एका यक्षाच्या छातीत खंजीर खुपसताना दाखवलाय.
सभामंडपातल्या भिंतींवर बुद्धाचा भाउ नंद याच्या धम्मदीक्षेचा प्रसंग कोरलेला आहे. त्यातले एक प्रसिद्ध शिल्प म्हणजे मरणासन्न राजकुमारी.
बुद्धाचा चुलतभाउ नंद याची ही पत्नी. बुद्धाने घेतलेल्या दिक्षेबरोबरच त्याचा पहिला अनुयायी नंद हा होतो व सर्वसंगपरित्याग करून राज्याबाहेर जायला निघतो. हे जेव्हा त्याच्या पत्नीला कळते तेव्हाची तिची विदिर्ण मनोवस्था टिपणारे हे चित्र आहे.
आपला पती आपल्याला सोडून चाललेला आहे हे कळताच ती बेशुद्ध झालेली आहे. त्या अवस्थेतच तिच्या दासींनी तिला तोलून धरले आहे. काही दासी भांबावलेल्या नजरेने मदतीसाठी इकडेतिकडे पाहात आहेत. खुद्द राणीच्या चेहर्यावर कसलेच भाव नाहीत. असणारच कसे? ती आता मरणासन्न अवस्थेत पोचली आहे.
११. मरणासन्न राणी
१२. भांबावलेल्या दासी
१३. याच प्रसंगाची काही दृश्ये
१४. एका दासाचे चित्र (त्याने घातलेला चौकड्यांचा पोषाख लक्षवेधी आहे)
या विहारात इतरही जातक कथांमधले प्रसंग रंगवलेले आहेत पण दुर्दैवाने प्रकाश कमी असल्याने त्यांची चित्रे पुरेशी स्पष्ट घेता आली नाहीत.
लेणी क्र. १७
या विहाराची रचना सुद्धा क्र. १६ सारखीच आहे.
इथेही व्हरांड्याच्या बाजूच्या भिंतीवर एक मोठा शिलालेख कोरलेला आहे.
ब्राह्मी लिपी, संस्कृत भाषा, इ. स. ५ वे शतक
१).....मावनिं, प्रणम्य विद्यात्रयपारगं मुनीम् (|)
विहारदातुर्व्यवदातकर्म्मणो गुणाभिदानोपनय..करिष्यते (||)
२)...नेश, लब्धात्मभावस्य नराधिपस्य (|)
धृतातपत्रस्य बभूव पुत्रस्सितातपत्रो धृतराष्ट्रसंज्ञः (|)
३)
.
.
.
२८) ...... द्भितायोद्यतसर्वकर्मणः (|)
मुनीन्द्रनाथप्रणिधानसिद्भये भवन्त्वभीष्टा भुवि सर्व्वसम्पदः (||)
२९) ..........सप्रणयेन मण्डपः (|)
करोतु तावतुशलोदयं सतां निहन्ति यावद्रविरंशुभिस्तमः
हाही शिलालेख बराच मोठा असल्याने याचे पूर्ण वाचन व भाषांतर इथे देता येणार नाही तरी याचा थोडक्यात सारांश असा-
हा लेख ज्या राजाने कोरविला त्याचे नाव नष्ट झाले आहे. पण तो वाकाटक नृपती हरिषेण याचा मांडलिक असून खानदेशावर राज्य करत असावा. या लेखाचा उद्देश या राजाने विहार क्र. १७ व क्र. १९ चे 'गंधकुटी' नामक शैलगृह खोदविले हे सांगण्याचा होता. या लेखात मांडलिक राजाची वंशावळ दिलेली आहे.
१५. विहार क्र. १७ तील शिलालेख
या विहारातल्या आतील भिंतीवर षडदंत अथवा छदन्त जातक कथांमधील प्रसंग चित्रांकित केले आहेत.
छदन्त जातक-
हिमालयातील आठहजार हत्तींच्या कळपाचा गजराजा (पूर्वजन्मीचा बोधिसत्व) हा राजा. त्याच्या दोन राण्या. त्याने एका झाडाला टक्कर दिली. एकीच्या अंगावर फुले तर दुसरीच्या अंगावर मुंग्या पडल्या. अपमानित झालेल्या राणीने पुढच्या जन्मात याचा बदला घ्यावयाचे ठरवले व देह ठेवला. पुढल्या जन्मात ती ब्रह्मदत्त राजाची राणी झाली. शिकारी पाठवून तिने त्यांना या गजराजाला मारून त्याचे सहा दात आणायला सांगितले. शिकार्यांनी सात वर्षे खटपट करून या गजाला विद्ध केले पण त्याचे सुळे निघेनात. तेव्हा पुण्यवान असलेल्या त्या पूर्वजन्मीच्या बोधिसत्वाने स्वतःच आपले सुळे उपटून त्यांच्या हवाली केले. ते पाहून राणीला आपल्या पापांची जाणीव झाली व तिने देहत्याग केला.
हत्ती हत्तिणी यांच्या लीला, अपमानप्रसंग, शिकार, दन्तप्राप्ती, शिकार्याचे गजराजासमोर लोटांगण हे सर्व प्रसंग येथे उत्तमरित्या चित्रित केले आहेत.
१६. छदन्त जातक
१७. राणीसमोर एका ताटातून एक हस्तीदंत नजर केला जातोय
१८. शिकारी गजराजासमोर लोटांगण घालतांना
१९. छदन्त जातकातलेच काही प्रसंग
याच विहारात सिंहल जातकामधले पण काही प्रसंग कोरलेले आहेत. ही जातक कथा मला पुरती माहित नसल्याने त्यातली काही चित्रे फक्त येथे देतो.
२०. सिंहला जातक
२१. सिंहला जातक
२२. अजून काही प्रसंग
२३. इथल्याच एका स्तंभावर दोन सिंहांचे एक सुंदर चित्र आहे.
आतमधीलच भिंतीवर असलेली अजून काही चित्रे ( ही बहुधा विश्वंतर जातक कथांमधली असावीत)
२४. राजा व राणी हत्तींवर बसून नगर सोडून निघालेत. ह्या चित्रांतील छत्र्या लक्षवेधी आहेत. त्यांच्याबरोबर खूप मोठा लवाजमा आहे.
२५. राजा व राणी
गर्भगृहातील बुद्धमूर्तीशेजारी भगवान बुद्धाचे एक चित्र आहे.
बुद्ध भिक्षाटण करत परत कपिलावास्तूत (त्याची राजधानी) येतो. समोर त्याची पत्नी यशोधरा उभी आहे व पुत्र राहुल त्याला भिक्षापात्रातून भिक्षा वाढत आहे. बुद्धाचा चेहरा अतिशय निर्विकार दाखवलेला आहे, यशोधरा दु:खात पूर्णपणे बुडून गेली आहे तर पुत्र राहुल भांबावलेल्या चेहर्याने वडिलांकडे पाहात आहे.
दुर्दैवाने या चित्राजवळ अतिशय अंधार असल्याने फोटोमध्ये भाव टिपले गेले नाहीत.
२६. बुद्ध भिक्षा मागतांना
या विहाराच्या बाहेरच्या (व्हारांड्यातल्या) भिंतीवर विश्वंतर जातक व नलगिरीचे दमन या कथांमधील दृश्ये चित्रांकित केली गेली आहेत.
वेस्सेंतर जातक (विश्वंतर जातक)
पूर्वजन्मीचा बोधिसत्व आता विश्वंतर राजाच्या रूपात आहे. जवळच्याच लोकांनी केलेल्या कारस्थांनांमुळे त्याला स्वत:च्याच राज्यातून हद्द्पार व्हावे लागत आहे व ही बातमी तो त्याच्या प्रिय पत्नीला -राणी मद्दी (माद्री) हिला जवळ बसवून सांगत आहे.
हा राजा राणीला मद्य देत आहे किंबहुना मद्याचा अधिक आग्रह करत आहे. जणू राणीने नशेत चूर होऊन ही दु:खद घटना विसरावी. काळसर रंगाचा विश्वंतर आणि गौरवर्णीय मद्दी अतिशय सुंदर रेखाटले आहेत. राणीचे डोळे नशेने अगदी भरून गेल्याचे दिसत आहे. सेवक आणि दासी हाती मद्याचे पेले आणि सुरया भरून तयार आहेत.
२७. वेस्सेतर आणि मद्दी, इथे एक चिनी वंशीय सेवक पण दिसत आहे.
२८. विश्वंतराने सावरलेली राणी व तिचे मद्यधुंद डोळे
२९. राज्यातील नागरीक, वृक्ष व छत्र्या
स्वर्गातून पृथ्वीवरील या मानवी भावभावनांचे इंद्र व अप्सरा कुतूहलाने निरीक्षण करत आहेत. इंद्राचा मुकूट, अप्सरा, चेहर्यावरील हावभाव, आकाशातील ढग चित्रकाराने अतिशय सुरेखरित्या चितारले आहेत.
३०.
३१. वेस्संतर राज्य सोडून निघाला आहे. त्याचे प्रजानन त्याच्यासोबत जात आहेत.
३२. या कथेतीलच अजून काही चित्रे
३३. छतांवर कोरलेली विविध नक्षी
नलगिरी हत्तीचे दमन
तर याच भिंतीच्या दुसर्या बाजूला नलगिरी हत्तीच्या दमनाचे चित्र काढलेले आहे.
गौतमावर चिडून असलेला त्याचा भाऊ देवदत्त नलगिरी नावाचा पिसाळलेला हत्ती नगरात सोडून देतो. हत्तीपासून वाचण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटतात. घरांच्या गवाक्षांतून काही नागरिक भेदरलेल्या चेहर्याने त्या हत्तीकडे पाहात आहेत. एकीच्या हातून तीचे लहान मूल निसटते आहे. अशातच गौतम त्या पिसाळलेल्या हत्तीपुढे उभा राहतो व त्या हत्तीचा राग शांत होतो.
३४. पिसाळलेला नलगिरी (वरच्या खिडक्यांत भेदरलेले नागरीक व एका स्त्रीच्या हातातून खाली पडत असलेले मूल)
३५. गवाक्षांतून बघत असलेले नागरीक
३६. याच कथेतील ही काही रंग उडालेली चित्रे
३७. छतावरील देखणे नक्षीकाम
खरेतर अजिंठ्याचा प्रत्येक विहार, प्रत्येक चैत्य बारकाईने पाहायला एकेक दिवसपण कमीच आहे पण कसेतरी घाईगर्दीतच पण तरीही निवांतपणेच हे बघत आम्ही पुढे सरकत आम्ही बाहेर आलो व पुढ्च्या विहारांकडे आणि चैत्यांकडे वळलो. आता यापुढील विहारात चित्रे कमी पण शिल्पे जास्त आहेत त्याविषयी पाहू आता अजिंठा लेखमालिकेच्या पुढच्या व अंतिम भागात. त्याच भागात अजिंठ्यांच्या चित्रांचे रहस्य उलगडण्याचा मी थोडाफार प्रयत्न करेन.
क्रमश:
प्रतिक्रिया
16 Jan 2013 - 11:18 pm | पैसा
अमेरिकन टुरिस्टसारखी घाईघाईने चित्रे पाहिली. वेळ मिळताच सावकाशीने पाहीन!
16 Jan 2013 - 11:23 pm | किसन शिंदे
जबराट!!
जरा बारकाईने पाहिल्यानंतर वेस्सेतर आणि मद्दी या राजा राणीच्या पहिल्या चित्रात त्रिमितीय साक्षात्कार होतोय.
16 Jan 2013 - 11:40 pm | गणामास्तर
फटू आणि माहिती नेहमीप्रमाणेचं भारी..
जाताना कळवलं असतं तर आम्ही पण आलो असतो.
17 Jan 2013 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
फोटू क्र-६ ते १० >>> लक्षवेधक अर्थनिष्पत्ती
बाकि धागा नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणी छान :-)
17 Jan 2013 - 12:57 am | बॅटमॅन
हा धागा कळस आहे!!!!!!!! जियो वल्ली. काञ लिहू शब्दच नाहीत _/\_
17 Jan 2013 - 9:07 am | मूकवाचक
+१
17 Jan 2013 - 1:03 am | अभ्या..
चित्रे तर अप्रतिम आहेतच पण अप्रतिम वर्णन वल्ली.
आता रहस्याच्या प्रतिक्षेत.
17 Jan 2013 - 8:21 am | स्पंदना
किती माहिती आहे तुम्हाला वल्ली? अगदी बुडुन जायला होतय या कथा वाचताना.
धन्यवाद.
17 Jan 2013 - 5:31 pm | स्मिता.
लेख वाचतांना हाच विचार मनात येत होता की किती माहिती आहे वल्लींना! अनेक ऐतिहासिक कथा माहिती असतात, चित्र-शिल्पांची बारीकसारीक वैशिष्ट्ये त्यांना 'दिसतात', अर्थ कळतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व ते खुलवून सांगतात.
फोटो आणि माहिती वाचून स्वतः अजिंठ्याला भेट दिल्यासारखेच समाधान मिळते. पुभाप्र.
20 Jan 2013 - 2:14 pm | धमाल मुलगा
ह्या भल्या मनुक्षाला मिपावरचा 'इंडि जोन्स' का म्हणतात ते.
@वल्ली: तू ऐक रे बाबा, खरंच ऐक! एक जरा ते रिसर्चचं मनावर घेच. खूप मोठं काम घडेल तुझ्या हातून. :)
17 Jan 2013 - 8:45 am | ५० फक्त
लई भारी चित्रं, जाताना मा.श्री.मिस्पाजी यांना घेउन गेला असता तर त्यांनी एक गुढकथा लिहिली असती या चित्रांवर, आता सुद्धा त्यांना तशी विनंती करतो.
17 Jan 2013 - 10:16 am | स्पा
जाताना मा.श्री.मिस्पाजी यांना घेउन गेला असता तर त्यांनी एक गुढकथा लिहिली असती या चित्रांवर
लोल्स =))
वेल .. वर वाघुळबुवा ने म्हटल्या प्रमाणे , अशक्य कहर आहे आजचा भाग .. भयानक डीटेलिंग.. मी स्वत: अजिंठ्याला जाऊन आलोय , पण प्रत्येक गुहेत बसलेले ध्यानस्त बुद्ध , यावर आपल्या नजरेला काही पडलं नाही , आणि बुद्धीला काही झेपलं नाही, वल्ली काकांनी मध्ये मध्ये धन्या काकांना दिली असती ,तर तेही आनंदाने तुमच्या सोबर फिरले असते , असो ( फेसबुक प्रमाणे इथे मेम्ब्रांना टॅग करता यायला हवं होतं , असो )
शिलालेखाच भाषांतर दिल्यामुळे बरेच उपकार झाले .. फोटू तर नेहमीप्रमाणेच अप्रतिम , शेवटच्या गुहेत बुद्धाचे महानिर्वाण आणि इतर महत्वाचे प्रसंग रेखाटले आहेत शिवाय प्रथमच बुद्ध निद्रावस्तेत कोरलेला आहे .. त्याबद्दलची माहिती वाचायला उत्सुक आहे
17 Jan 2013 - 10:42 pm | धन्या
कुणीतरी समविचारी मिळाल्यामुळे ड्वाले पानावले.
17 Jan 2013 - 9:54 am | पियुशा
इथे बघा एक भारवाहक यक्ष कसा यक्षिणीला गिटारसदृश वाद्य वाजवत तिचे मन रिझवण्याचा प्रयत्न करतोय
तुस्सी ग्रे८ हो वल्ली महाराज !!
17 Jan 2013 - 10:04 am | पिंगू
अप्रतिम.. शब्दच खुंटले.. :)
- पिंगू
17 Jan 2013 - 5:03 pm | इनिगोय
ही सगळी चित्रं आणि शिल्पं बोलतात काय रे तुझ्याशी?
किती आणि कायकाय उलगडून दाखवलं आहेस.. खरंच ग्रेट आहेस!
अवांतर - मिपावर पूर्वी कुठेतरी जातककथांचा एक दुवा दिला होता कोणीतरी, असेल तर इथे द्यावा पुन्हा एकदा..
17 Jan 2013 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाही भाग सुंदर. लेणी क्र.१५ मधे काढलेला फोटो एकदम सुंदर.
गिटारसदृश वाद्य वाजविणारा यक्ष लैच भारी.
-दिलीप बिरुटे
17 Jan 2013 - 11:58 pm | शिल्पा ब
भारी. मी १२-१३ वर्षांची असताना एकदाच अजिंठ्याला गेले होते. अप्रतिम अनुभव. पण या खजिन्याची देखभाल केली जात नव्हती..तेव्हातरी.
एका गुहेत मानवी विष्ठा होत्या. :( सुदैवाने आता आपल्या लोकांना या ठेव्याचं थोडंतरी महत्व कळायला लागलंय.
18 Jan 2013 - 3:12 pm | अनिरुद्धशेटे
खुपच मस्त अणी उपयुक्त माहिति आहे
20 Jan 2013 - 2:06 pm | चित्रगुप्त
अतिशय माहितीपूर्ण, सुंदर. उत्तम फोटोग्राफी. एकादी जागा बघावी, तर ती वल्लीच्या नजरेने.
..... "त्याच भागात अजिंठ्यांच्या चित्रांचे रहस्य उलगडण्याचा मी थोडाफार प्रयत्न करेन"..... या भागाची उत्सुकतेने वाट बघत आहे.