फोड रे मटका...

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
23 Aug 2008 - 8:44 pm

धुंद हे काश्मिर सगळे, एकमेकां मारिती
प्रश्न विसरूनी जनांचा, फोड रे मटका

धुंद त्या पदकांत सगळे, सुवर्ण कवटाळती
प्रश्न हरलेल्या क्षणांचा, फोड रे मटका

धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती
प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका

धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती
प्रश्न विकलेल्या मतांचा, फोड रे मटका

धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती
प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका

धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती
प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका

धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती
प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका

धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती
प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड रे मटका

धुंद हे गोपाळ सगळे, गोपिका न्याहाळती
प्रश्न कसला रे थरांचा, फोड रे मटका

सर्व वाचकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
-ऋषिकेश

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Aug 2008 - 12:09 am | विसोबा खेचर

आयला! लै भारी काव्य रे ऋषिकेशा!

जियो...!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2008 - 8:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी, तुझी दहीहंडी आवडली रे !!!
'फोड रे मटका' हे पालुपद तर लै भारी.

अवांतर : अगोदर वाटले ते कल्याण मटक्याच्या आकड्यावर काही लिहिले की काय ?

देवदत्त's picture

24 Aug 2008 - 12:03 pm | देवदत्त

मस्त एकदम :)

वैद्य's picture

24 Aug 2008 - 12:07 pm | वैद्य (not verified)

कविता सुंदर आहे, प्रासंगिक असूनही !

पण आणखी छान होऊ शकली असती.

"राज-का-रण" हे सर्वात बेश्ट.

-- वैद्य

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2008 - 12:08 pm | स्वाती दिनेश

ऋषिकेश,
प्रासंगिक कविता आवडली.
स्वाती

II राजे II's picture

24 Aug 2008 - 2:08 pm | II राजे II (not verified)

धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती
प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका

वा वा !
मस्त जमली आहे ही ओळ !
कविता आवडली.

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सचिन's picture

24 Aug 2008 - 4:00 pm | सचिन

ऋषिकेशा!
जिंकलस रे !!!

सुनील's picture

24 Aug 2008 - 4:24 pm | सुनील

मीटर काही ठिकाणी गडबडतोय पण अशा प्रासंगिक काव्यात ते चालून जाते.

छान...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण's picture

24 Aug 2008 - 5:42 pm | मदनबाण

कविता फारच सुंदर आहे !!

धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती
प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका
व्वा...

धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती
प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड रे मटका

क्या बात है..व्वा..

(देवकीनंदन भक्त)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

शितल's picture

24 Aug 2008 - 5:50 pm | शितल

कविता आवडली. :)

कुंदन's picture

24 Aug 2008 - 6:19 pm | कुंदन

धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती
प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका

धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती
प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका

हे आवडले...

प्रकाश घाटपांडे's picture

24 Aug 2008 - 9:15 pm | प्रकाश घाटपांडे

त्येन्लाच मटका बराब्बर लागतुय.
प्रकाश घाटपांडे

संदीप चित्रे's picture

25 Aug 2008 - 6:59 pm | संदीप चित्रे

कविता मस्तच आहे आणि वेगळी आहे.
--------
एक आगाऊ सूचना --
>> धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती
ह्या पेक्षा
'धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-राणे आहुती' असं वापर्‍यालाने जास्त इफेक्टिव होईल का? :)

प्राजु's picture

25 Aug 2008 - 7:50 pm | प्राजु

ऋषिकेश,
सुंदर कविता. प्रत्येक शेर सुंदर आहे.. अतिशय अर्थपूर्ण.
अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

25 Aug 2008 - 8:03 pm | लिखाळ

छान कवीता ! आवडली.
--लिखाळ.

ऋषिकेश's picture

26 Aug 2008 - 12:14 pm | ऋषिकेश

सर्व रसिक प्रतिसादकर्त्यांचे अनेक आभार :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुमीत भातखंडे's picture

26 Aug 2008 - 12:33 pm | सुमीत भातखंडे

खूप आवडली

राघव१'s picture

26 Aug 2008 - 12:39 pm | राघव१

काय मारलंय राव... पार जोड्यानं हाणलंय म्हणा की :)
झक्कास... जियो...

राघव

एक आमचाही -

धुंद, पैशाच्या मिषाने, देह विकणारी दलाली...
प्रश्न सुकल्या आसवांचा, फोड रे मटका!!

मृगनयनी's picture

28 Aug 2008 - 9:50 am | मृगनयनी

धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती
प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका

यांचा नुसता मटका नाय फोडायचा...... त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या करून माती करायची... आणि या मातीत या 'धुंदा'वलेल्यांना पुरुन टाकायचं........

धुंद हे गोपाळ सगळे, गोपिका न्याहाळती
प्रश्न कसला रे थरांचा, फोड रे मटका

हा मटका गोपिकाच आपापल्या रवी-लाटण्यांनी फोडतील.....

बाकी मस्त!!!!!

राघवजी...... आपल्या कवितेतून सामजिक सत्यतेचं भान परिवर्तित होते....
:) येऊ देत.....

मृगनयनी's picture

28 Aug 2008 - 9:55 am | मृगनयनी

राघवजी...... आपल्या कवितेतून सामजिक सत्यतेचं भान परिवर्तित होते....
येऊ देत.....

माफ करा... ऋषीकेशजी.......... नावात थोडा गोंधळ झाला.......
(पण त्यामुळे...आपल्या काव्य-प्रतिभेची उंची, खोली तसूभर ही कमी होत नाही...)

:)

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 9:39 pm | प्रियाली

;) कवितांवरील माझे अगाध प्रेम ठाऊक असल्याने ऋषीकेशा तुला प्रत्यवाय नसावा. ;)

मस्त कविता आहे! आवडली.

प्रत्यवाय!!!!! वाण नाही पण गुण लागलेला दिसतोय.