देव आहे अथवा नाही? सनातन प्रश्न. चावून चोथा झालेला विषय. त्यात ही आणखी एक भर. असो.
प्रत्येकाची धारणा वेगळी. प्रत्येकाचे मत वेगळे. कोणाची बरोबर अन् कोणाची चूक हे आपण कोण ठरवणार? हा अधिकार कोणाचा? त्यातही मी कोणावर विश्वास ठेवायचा?
देवाचं अस्तित्व नाकारयचं म्हटलं तर मला आपसुक एक प्रश्न पडतो- संतांचं म्हणणं, वागणं, त्यांचे अनुभव, त्यांनी सांगीतलेलं मर्म; हे सर्व थोतांड होतं असं मी मान्य करू शकतो का? माझ्या ते पचनी पडतं का? कारण तसं नाही झालं तर आपल्याच मताशी अप्रामाणिक असल्यासारखं होईल. मी स्वत: तरी ते करू शकत नाही. कारण संतांवर मी अविश्वास दाखवायचं एकही संयुक्तिक कारण मला सापडत नाही.
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मला संतांनी सांगीतलेला मार्ग पुरतो. त्या मार्गावर मी विश्वास ठेवतो. ही श्रद्धा आहे. मला आंतरिक प्रश्न पडतात. म्हणजे संतांनी सांगीतलेला मार्ग आक्रमितांना माझं कुठं चुकतंय, माझ्यात काय कमतरता आहे, मी स्वत:मधे सुधारणा करण्यासाठी आणिक काय करू शकतो असे व अशा पद्धतीचे प्रश्न पडतात. यात नकारात्मकता वरवर वाटली तरी ती नसते. कारण श्रेयसाची तळमळ लागली की आपल्यातली कमतरता जाणण्यात, ती मान्य करण्यात व ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीही कमीपणा वाटत नाही. वृत्ती अंतर्मुख होऊ लागतात. बाहेर कुणी काय म्हटलं यामुळे आपल्या वृत्तीत फरक पडत नाही. अर्थात् हा आत्मकेंद्रीतपणा नाही. सतत स्वत: मधे काही चांगले बदल होण्यासाठी प्रयत्नरत असल्यानं त्यात अभिमानाचा प्रश्न येत नाही. यापलिकडे मला अद्याप अनुभव आलेला नाही.
हे साधन होत असतांना मी व्यवहारात कसा वागतो? सर्वसामान्य माणसासारखाच. अजूनही राग, लोभादी त्रास मला होतातच. गप्पा मारतांना, सिनेमे बघतांना, चित्र रेखाटतांना, फोटो काढतांना, कविता लिहितांना, वाचन करतांना, काम करतांना; सर्व वेळेस आनंद घेण्याची वृत्तीही कमी होत नाही. तो नाही मिळाला तर त्रागा अजूनही होतो. प्रमाण थोडं कमी झालेलं असेलही. पण अजूनही काही संपूर्ण अलिप्त झालेलो नाही!
मी मंदीरात जातो. मशीदीतही गेलोय. चर्च मधेही चांगले वाटले आहे. जैन मंदीरही सुंदर असतात. बौद्धधामातही छानच वाटलंय. गुरुद्वारांत अजून जाण्याचा योग आलेला नाही.
मग मी नक्की कोण? मूर्तीपूजक आहे की नाही? मूर्ती म्हणजेच देव की इतरत्रही त्याचं अस्तित्व आहे? इतके देव सांगीतलेत तेवढेच नक्की असतील की अजूनही काही उरलेत?
घरी मी श्रद्धेनं, शक्यतो विधीवत पूजा करतो. अजूनतरी स्वत:साठी काही मागायची गरज पडलेली नाही. मला ठाकूर-विवेकानंदही आवडतात, कृष्णमूर्तीही पटतात, ओशोही काही वेगळं सांगतोय असं भासत नाही, ज्ञानेश्वरीवरील प्रवचनं ऐकून आनंदच होतो, गजानन महाराजांबद्दल लहानपणापासून आकर्षण आहे, समर्थांचा दासबोध ऐकतच मोठा झालोय, गोंदवलेकर महाराजांचे तर मला अतीव प्रेम आहे, श्रीअरविंदही आवडतात, रमणमहर्षींबद्दल नुकतंच वाचायला घेतलंय.. यादीच करायची म्हटली तर अंत राहणार नाही की काय-काय आवडतं.
तसे यात अनेक वेगवेगळे मार्ग आलेत. त्यातला माझा मार्ग भक्तीचा. तरीही इतर मार्ग अस्तित्वात आहेतच. तेही श्रेयसाच्या प्राप्तीचाच मार्ग सांगतात. साधना वेगवेगळ्या असल्या तरी साध्य एकच. एका बिंदूपर्यंत अगणीत रेषा जाऊ शकतील. मी प्रत्येक मार्ग एकाचवेळी चोखाळून उपयोग नाही. एका गावी जाण्यासाठी सर्व मार्ग थोडे-थोडे जाऊन उपयोग नाही. कोणतातरी एक मार्ग एकावेळी धरणं अन् गावी पोहोचणं हेच योग्य. वर उल्लेखलेले सर्व जण थोर सत्पुरुष होतेत. संत होतेत. यांपैकी कुणावरही विश्वास ठेवून आपण साधना करण्यात काय गैर? हां, कुणाला श्रेयसाच्या प्राप्तीची इच्छाच नसेल तर साधनेचा प्रश्न त्या व्यक्तीपुरता मिटला, पण इतर कुणी बरोबर का चूक हे ठरविण्याचा आपल्याला काय अधिकार? त्यासाठी कोणत्याही अट्टहासाची गरजच काय? आपण आपली साधना बघावी व त्यावर पुढे जायचा मनापासून प्रयत्न करावा.
भोंदू लोक मला वाटतं सर्वत्रच असतील. ते त्यांचं काम करतात. आपण आपलं करावं. पण त्यांच्यावर टिका करतांना साधनमार्गच चुकीचे असं ठरवू नये. विवेकविचार हा प्रत्येकाकडे असतो. त्याचा सुयोग्य वापर व्हायला हवा. असल्या भोंदूंकडे जाण्यापेक्षा वर उल्लेखलेल्या कुणावरही श्रद्धा ठेवली तर कमीतकमी कुणी फसणार तरी नाही.
राहिला या सर्व साधनेचा परिणाम.. तर तो आपल्या हाती कधीच नाही. भक्तीमधे वृत्ती लीन होत जाते. श्रेयसाचं प्रेम लाभणं यात ओरबाडण्याची वृत्ती नसते. त्यात केवळ आनंदच असतो. भगवंत केवळ प्रेमानंच बांधल्या जातो, दुसर्या कशानंही नाही असं संत सांगतात, ते ह्यासाठीच. ज्या मार्गात आपल्याला हे प्रेम लाभेल तो मार्ग आपल्यासाठी श्रेयस्कर.
शुभम्
प्रतिक्रिया
19 Jan 2013 - 9:13 pm | प्रसाद प्रसाद
एकीकडे पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ... आणि त्याच वेळी तुमचा लेख देव - सनातन प्रश्न!
अंमळ मजा वाटली.........
लेखांची नाही...... दोन्ही लेख एकाच वेळी आले ह्याची.......
19 Jan 2013 - 10:13 pm | अग्निकोल्हा
त्यामुळे मुख्य काय सांगायचे आहे ते समजुनही घ्याव वाटत नाहीये.
19 Jan 2013 - 10:21 pm | शैलेन्द्र
पण "मी" काय म्हणतो..
बर जावुद्या च्यायला, अंडा करी मारतो मस्त.. साधनेच नंतर बघु..
19 Jan 2013 - 11:08 pm | पैसा
सगळ्यांनीच असा समन्वयाचा मार्ग घेतला तर किती चांगलं होईल!
19 Jan 2013 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा
20 Jan 2013 - 12:17 am | कवितानागेश
मला ठाकूर-विवेकानंदही आवडतात, कृष्णमूर्तीही पटतात, ओशोही काही वेगळं सांगतोय असं भासत नाही, ज्ञानेश्वरीवरील प्रवचनं ऐकून आनंदच होतो, गजानन महाराजांबद्दल लहानपणापासून आकर्षण आहे, समर्थांचा दासबोध ऐकतच मोठा झालोय, गोंदवलेकर महाराजांचे तर मला अतीव प्रेम आहे, श्रीअरविंदही आवडतात, रमणमहर्षींबद्दल नुकतंच वाचायला घेतलंय.. यादीच करायची म्हटली तर अंत राहणार नाही की काय-काय आवडतं. >>
तुम्ही नशीबवान आहात! :)
फक्त एकच टिप्पणी: मूर्ती म्हणजेच देव की इतरत्रही त्याचं अस्तित्व आहे?>>
मूर्तीतही जे चैतन्य आहे, असे आपण मानतोय, तेच इतरही ठिकाणी असू शकतं हे समजून घेण्यासाठी दगडाची मूर्तीपूजा! मूर्तीपुजा वास्तविक आपल्या नकलत आपल्याला निर्गुणाकडे घेउन जाते, असे मला वाटते.
20 Jan 2013 - 6:41 am | राघव
अर्थात् जर त्या भावनेनं आपण साधन केलं तर. नुसतंच कर्मकांडं करत जन्म गेले तरी काही फारसा फरक पडणार नाही. त्या साधनेनं आपल्यात बदल घडायला हवा.
20 Jan 2013 - 7:16 am | चौकटराजा
संत मंडळी श्रेष्ठच आहेत पण त्यानाही देव सापडला आहे असे मानण्याचा भावुक व भाविक पणा करण्याचे कारण नाही. शंभर संतांपेक्षाही श्रेष्ठ व श्रेयस्कर आहे आपला अंतरात्मा ! त्याला जिथे दिसेल तिथे देव आहे व जिथे दिसणार नाही तिथे देव नाही. आपला आतला आवाज हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे. सबब मी तरी साठ वर्षाच्या जिंदगीत कोणत्याही संताच्या निरिक्षणा पेक्षा त्या आत्मारामाचा डोळा महत्वाचा मानला आहे . तोच माझा सर्वात जवळचा गुरू , सखा, पिता, माता ! एरवी बालदपि सुभाषितम ग्राहयम हे आहेच !
20 Jan 2013 - 8:45 am | राघव
मी कुठं नाही म्हणतो? तुम्ही म्हणता तोही एक मार्ग आहेच की. प्रत्येकानं आपल्याला जो मार्ग पटतो भावतो तो चालावा. माझं म्हणणं इतकंच की दुसर्यांचं चूक का बरोबर हे बघण्याची आपल्याला गरज नाही. कारण असं केल्यानं त्या व्यक्तीसाठी खूप मोठ्या बदलांची नांदी होऊ शकते. आणि त्या गुरुत्वाची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही.