भारतीय शिल्पकलेतले अत्त्युच्च वैभव पाहायला वेरूळ, अजिंठा इकडे जायची कितीतरी वर्षापासूनची इच्छा होती. शेवटी मिपाकरांबरोबर ऑक्टोबरमध्ये जायचा बेत नक्की झाला. पण ऐनवेळी टपकलेल्या हापिसच्या कामांमुळे शेवटी एकदाचे डिसेंबरमध्ये निघालो.
१५ तारखेला शनिवारी पहाटे लवकर धन्याच्या कारने मी, किसनदेव आणि दिनेश निघालो ते १०.३०/११ च्या सुमारास औरंगाबादेस पोचलो. बिरुटे सर नगर फाट्यावर आले होतेच. मग त्यांच्यासवे खुल्दाबाद इथली औरंगजेबाची कबर, भद्रा मारूती आदी पाहून वेरूळ लेण्यांची मनसोक्त भटकंती झाली (त्यावर नंतर लिहिनच). त्या रात्री वेरूळ येथेच मुक्काम करून दुसर्या दिवशी सकाळी सकाळी वेरूळ - फुलंब्री -सिल्लोड मार्गे अजिंठ्याला जाण्यास निघालो. वेरूळ ते अजिंठा साधारण १०० किमी आहे. रस्ता चांगलाच आहे. साधारण १.५ तासात अजिंठा व्ह्यू पॉइंट फाट्यापाशी आलो. इथून अजिंठा व्ह्यू पॉइंट ८ किमीवर आहे. या पॉईंटवरून एका इंग्रज अधिकार्याला दगडधोंडाच्या ढिगार्यात लपलेल्या अजिंठा लेणीचे दर्शन झाले आणि हा अमूल्य ठेवा जगासमोर आला. तर सरळ रस्त्याने फर्दापूरमार्गे अजिंठा १६ किमी पडते. फर्दापूरला गाडी पार्क करून पुढे अजिंठा लेणीपर्यंत सरकारी सीएनजी वाहनाने पोहोचावे लागते. आम्ही अजिंठा ह्यू पॉइंटला जायचे ठरवले. आणि थोड्याच वेळात तिथे पोहोचलो. पॉइंटवरून संपूर्ण अजिंठा लेणीचा समूह एकाव वेळी नजरेच्या टप्प्यात येतो. घोड्याच्या नालासारखा डोंगराचा आकार, वाघूर नदीच्या प्रवाहाने केलेले डोंगराचे दोन भाग व पलीकडच्या भागात खोदलेला अजिंठा लेणीचा समूह त्यातील विहारांचे स्तंभ व चैत्यगृहांच्या कमानीमुळे अतिशय प्रे़क्षणीय दिसतो.
पॉइंटवरूनच अजिंठालेणीकडे जाता येते. इथून उतरले तर फर्दापूरचा मार्ग व सीएनजी वाहनप्रवास टाळता येतो. दरीत उतरायला उत्तम पायर्या बांधल्या आहेत. गाडी पॉइंटच्या पार्किंगमध्ये लावून आम्ही पायरीमार्गाने उतरायला सुरुवात केली. १० मिनिटातच एक टप्पा उतरून एका पठारावर आलो. इथून अजिंठ्याच्या तुटलेल्या कड्यांचे भेदक दर्शन होते. इथून परत पायर्या उतरून त्यापुढील लोखंडीपुलावरून वाघूर नदी पार करून आम्ही थेट अजिंठा लेणीच्या पुढ्यात पोचलो. प्रत्येकी १० रूपयांचे प्रवेश शुल्क भरून आम्ही ९ व्या क्रमांकाच्या चैत्यगृहापाशी आलो.
अजिंठा व्ह्यू पॉइंटवरून दिसणारे अजिंठा लेणीसमूहाचे मनोरम दृश्य
१.
२.
अजिंठा लेणी ही विविध कालखंडात खोदली आहे. इथले सगळ्यात जुने लेणे इस.पू. २०० वर्षापूर्वी खोदले गेले तर सर्वात अलीकडचे साधारण ५ व्या ते ६ व्या शतकात. सातवाहन, गुप्त आणि वाकाटकांच्या कारकिर्दीत येथली लेणी खोदली गेली. सुरुवातीच्या काळात खोदलेली लेणी ही हीनयानकाळातली असून त्यात साधे चैत्यगृह आणि विहार आहेत तर नंतरच्या काळात खोदलेली महायानपंथीय लेणी सालंकृत स्तूप आणि भव्य विहारांनी सजलेली आहेत. अजिंठ्याची जगप्रसिद्द चित्रे असलेले विहार महायानकाळात खोदले गेले, साहजिकच ती लेणी ह्या समूहाच्या दोन्ही टोकांना आहेत तर मधली लेणी ही सर्वात प्राचीन आहेत. म्हणजेच ९,१० क्रमांकाची लेणी ही अतीप्राचीन तर १,२ आणि २५, २६ हे सर्वात अलीकडील. यातले १ व २ क्रमांकाची लेणी हे विहार असून यात पद्मपाणी, वज्रपाणी, मैत्रेय आदी बोधिसत्वांची अतिशय देखणी चित्रे तसेच जातक कथांतील दृश्ये रंगवलेली आहेत तर २५, २६ क्रमांकाच्या लेण्यांमध्ये बुद्धाच्या जीवनातील प्रसंग मूर्तीरूपात कोरलेले आहेत.
अजिंठा लेणीसमूहात एकूण ४ चैत्यगृह तर उरलेले सर्व विहार आहेत. कड्याच्या वरच्या भागात अजून एक चैत्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो पण फक्त अश्वनालाकृती वातायन तयार करून इतर काम अर्धवट सोडलेले दिसते.
अजिंठ्यातील बहुतेक विहार हे महायानकाळातील असल्याने त्यांमध्ये बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. ओसरी, स्तंभयुक्त सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृहात सिंहासनारूढ अथवा कमळपुष्पावर विराजमान झालेली बुद्धमूर्ती अशी यांची सर्वसाधारण रचना. एका परीने मंदिरनिर्माणाची ही पहिली पायरीच. इथल्या पहिल्या व दुसर्या क्रमांच्या विहारात अजिंठ्यातली जगप्रसिद्ध चित्रे रंगवलेली आहेत तिथेच आता आपण जाउ.
लेणी क्र. १:
हा विहार वाकाटक राजा हरिषेण याने खोदविला. लेणी क्र. १६ व १७ याच राजाचा अमात्य वराहगुप्त याने स्वतःच्या खर्चाने खोदविली असा शिलालेख त्या लेण्यांमध्ये आहे. साहजिकच आपले अमात्य लेणी खोदवून घेत असता राजा कसा मागे राहील. खुद्द हरिषेणच हा विहार खोदवून घेत असल्याने यातील काम राजाच्या दर्जाला साजेसे असे नेत्रदीपक झाले आहे.
ह्या प्रशस्त विहाराच्या ओसरीत सालंकृत स्तंभ असून स्तंभांवर तसेच ओसरीच्या भिंतीवर बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग, हत्ती, घोडे इ. पशू कोरलेले आहेत तसेच नक्षीदार कलाकुसर केली आहे. ओसरीतले छत आणि भिंती पूर्वी रंगवलेल्या होत्या पण आजमितीस मात्र त्यांचे लहानसे अवशेष दिसतात. रविवार असल्याने गर्दी होती. एकावेळी ठरावीक लोकआंनाच आत सोडत असल्याने १० मिनिटे रांगेत उभे राहिल्यावरच आतमध्ये प्रवेश झाला.
प्रशस्त सभामंडप, स्तंभावरचे अतिशय देखणे कोरीवकाम, समोरील गर्भगृहातील बुद्धाची प्रसन्न मूर्ती आणि सभामंडपातील सर्वच बाजूंना रंगवलेली चित्रे अशी याची रचना.
भिंतीवरच्या चित्रांमध्ये जातक कथांमधल्या घटना रंगवलेल्या आहेत.
शिबी राजाची कथा, महाजनक जातक कथा, बुद्धशत्रू मार याचा बुद्धाला मारायला येणारा प्रसंग आणि पद्मपाणी, वज्रपाणी बोधीसत्वाच्या प्रतिमा आदी चित्रे या विहारांत रंगवलेली आहेत.
३. लेणी क्र. १ बाहेरून
४. ओसरीतील स्तंभांवरील कोरीव काम
५.
६.
महाजनकाच्या कथेत महाजनकाच्या राज्यारोहणाचा प्रसंग चित्रित केला आहे. राजक्न्या शिवालीच्या विविध कूटप्रश्नांना उत्तरे देऊन महाजनक तिचे मन जिंकतो आणि मिथिलेचा राजा बनतो.
७.
८. वास्तविक इथे राणी शिवाली अर्धावस्त्रांकिता दिसत असली तरी तिने अतिशय तलम असे उत्तरीय परिधान केले आहे.
इथे महाजनकाच्या राज्यारोहणप्रसंगी चाललेल्या नृत्याचे चित्रण केले आहे. दोघी जणी बासरी वाजवीत असून एक जण ढोलावर ताल देत आहे तर वाद्यांच्या तालावर चाललेल्या नर्तिकेचे नृत्य इतरेजणी कुतूहलाने आणि आनंदाने बघत आहेत. सर्वांनीच सुंदर अलंकार परिधान केले आहेत.
९.
तर एका चित्रामध्ये बुद्धशत्रू माराचा प्रसंग चित्रित केला आहे.
गौतम बुद्ध ध्यान करत बसला आहे तर त्याचा शत्रू मार एका हातात तलवार घेऊन त्याला मारण्यासाठी येत आहे. मनुष्याच्या अंगातले षडरीपू, त्याच्यातले विकार म्हणजेच हा मार. गौतम जणू त्या अंतस्थ विकारांशी लढून बुद्धपदाला पोहोचलेला आहे.
१०.
दुसर्या बाजूच्या भिंतींवर राजाच्या दरबारातले काही प्रसंग चित्रीत केले आहेत.
११.
१२.
इथली सर्वात लक्षवेधी चित्रे आहेत ती पद्मपाणी आणि वज्रपाणी बोधीसत्वांची. ती आहेत गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना.
ही दोन्ही बुद्धाचीच रूपे.
पद्मपाणी बोधीसत्व अतिशय शांत मुद्रेचा, गोर्या रंगाचा दाखवलाय. डावा हात कमरेवर तर उजव्या हातात कमळ, मस्तकी मुकूट, गळ्यांत मोत्यांचा हार व त्यात मधोमध ओवलेला निळ्या रंगाचा तेजस्वी खडा. त्याची देहबोली अतिशय संयमित आहे. जणू शांतीचे प्रतिक असलेले कमळ हातात धरून तो सर्व जनांना अभय देतोय. त्याचे अनुयायी त्याच्यासमोर उभे आहेत.
तर दरवाजाच्या दुसर्या बाजूला वज्रपाणी बोधीसत्वाचे चित्र कोरलेले आहे.
हा काळसर वर्णाचा असून याचा डावा हात कमरेपाशी तर उजव्या हातात याने वज्र धरलेले आहे. ह्याच्याही मस्तकी मुकूट असून ह्याची मुद्रा कठोर दाखविली आहे. याच्या देहबोलीतून याची ताकद प्रतीत होते.
पद्मपाणी आणि वज्रपाणी अशा खुबीने रंगवलेले आहेत जणू ते एकाच व्यक्तीचे दोन चेहरे आहेत. एकाचे शांत रूप तर दुसर्याचे कठोर. जणू एक संयमित स्वभावाची व्यक्ती आरशासमोर उभे राहून आपलेच उग्र रूप आरशात पाहात आहे असाच भास इथे होतो.
१३. पद्मपाणी
१४.
१५. वज्रपाणी
१६.
तर छतावरसुद्धा देखणे रंगकाम केले आहे.
१७.
विहारातल्या स्तंभांवर काही लक्षवेधी शिल्पे कोरलेली आहेत. बुद्धजीवनांतील काही प्रसंग, भारवाहक यक्ष यांच्या जोडीलाच इथल्या एका स्तंभावर एक अनोखे शिल्प कोरलेले दिसले. चार हरीण परंतु चौघांचे शिर एकच अशी अनोखी रचना इथे केलेली दिसली. अतिशय प्रमाणबद्ध असे हे शिल्प.
१८.
हा विहार बघून आम्ही बाहेर आलो व लेणी क्र. २ मध्ये शिरलो.
लेणी क्र. २
या विहाराची रचनापण पहिल्या विहारासारखीच.
ओसरीतील भिंतींवर इथेही देखणे कोरीवकाम केले आहे.
१९.
२०.
ह्या विहारातील छताची रंगसंगती तर लाजवाब आहे.
२१.
२२.
२३.
छतावरच रंगवलेली एक जोडी
२४.
इथल्या भिंतीवर जातक कथांमधील काही दृश्यांचे चित्रांकन केले आहे.
त्यातले एक म्हणजे बुद्धाचा श्रावस्तीमधला चमत्कार ज्यात बुद्धाने स्वतःला १००० बुद्धांमध्ये रूपांतरीत केले.
२५.
इथल्या काही पॅनेल्सवर नागराजा नंदाच्या राज्यारोहणाचे प्रसंग रंगवले आहेत.
२६.
२७.
उजवीकडच्या भिंतींवर रंगवलेली चित्रे तर त्रिमितीय दृश्यांचा आभास करून देतात. इथे गौतमाचा जन्मप्रसंग चित्रीत केला आहे.
२८.
२९.
३०.
३१.
३२. माता मायादेवी नवजात गौतमाला हातात घेऊन उभी आहे.
३३. विहारातील स्तंभावरचे नाजूक नक्षीकाम आणि ते छत तोलून धरणारे भारवाहक यक्षिणी
३४.
गर्भगृहातील पद्मासनावस्थेत बसलेली बुद्धाची प्रसन्न मूर्ती
क्रमशः
अजिंठा गुहेत कॅमेरा फ्लॅशचा वापर करण्यास मनाई असल्याने वरील सर्व फोटो अतिशय मंद प्रकाशात फ्लॅशचा वापर न करता काढलेले आहेत त्यामुळे काही फोटो हलल्यासारखे आले आहेत. प्रत्यक्षात यातली चित्रे जास्त तेजस्वी आहेत.
प्रतिक्रिया
31 Dec 2012 - 10:03 am | धन्या
वाह... प्रत्यक्ष सहलीमध्ये आम्हाला माहिती न सांगता क्यामेर्याच्या लेन्समधून डोळा मारण्याच्या गुन्ह्यासाठी माफ केले आहे. :)
1 Jan 2013 - 11:58 pm | मोदक
प्रत्यक्ष सहलीमध्ये आम्हाला माहिती न सांगता
वेल्कम टू द क्लब. ;-)
3 Jan 2013 - 9:21 am | स्पा
=))
असेच म्हणतो
3 Jan 2013 - 11:34 pm | ५० फक्त
सवा कोइका हो
अशा अर्थाचं आणि उच्चाराचं काहीतरी सोलापुरच्या भुईकोट किल्यावर लिहिलेलं आहे.
हे सातवाहन कालीन भाषेत लिहिलेलं आहे, ज्याला अर्थ लागेल त्यानं मला कळवावा ही विनंती.
31 Dec 2012 - 10:35 am | रुमानी
खरंच अप्रतिम ......!
आपल्या सोबत न येता आल्यचे अतिशय दुखः वाटते आहे.
31 Dec 2012 - 10:59 am | सोत्रि
वल्ली छान!
पण आता ह्या अमूल्य अशा ऐतिहासिक ठेव्याची झालेली वाताहत बघवत नाही :(
- (भटक्या) सोकाजी
31 Dec 2012 - 11:15 am | किसन शिंदे
चला..पहिली 'जिलबी' पडली म्हणायची. ;)
31 Dec 2012 - 11:54 am | बॅटमॅन
भारी रे वल्ली. चित्रे तर लै म्हंजे लैच खास!!!!!!!!
31 Dec 2012 - 12:12 pm | मालोजीराव
मस्त मस्त मस्तच !!!
31 Dec 2012 - 12:56 pm | अत्रुप्त आत्मा
वल्लीज ग्रेट भेट+वल्लीज ग्रेट फोटूज= मिपाज ग्रेट धागा :-)
31 Dec 2012 - 1:07 pm | शैलेन्द्र
:) मस्त रे.. चुकवलच म्हणायच आम्ही हे..
31 Dec 2012 - 3:04 pm | त्रिवेणी
मस्त
31 Dec 2012 - 3:33 pm | इनिगोय
"चार हरीण परंतु चौघांचे शिर एकच" वाल्या शिल्पाला १०० लाइक्स :)
हे सगळं आजही इतकं सुंदर दिसत आहे.. तर ही लेणी घडताना, घडल्यावर पाहताना केवढा विलक्षण आनंद मिळाला असेल!
31 Dec 2012 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास.
-दिलीप बिरुटे
31 Dec 2012 - 4:23 pm | स्पा
ए १
31 Dec 2012 - 4:33 pm | स्मिता.
या लेखमालेतून अजिंठ्याची तीच ती चित्र वगळता आणखीही अनेक चित्र आणि माहिती मिळेल अशी खात्री आहे. सुरुवात छान झालीच आहे. आता पुभाप्र.
31 Dec 2012 - 4:38 pm | गणपा
अफाट !
वाट पहातोय पुढल्या भागाची.
2 Jan 2013 - 2:54 pm | मूकवाचक
+१
31 Dec 2012 - 4:39 pm | सूड
मस्त !! पुभाप्र !
31 Dec 2012 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
एकमेवाद्वितिय अजिंठा ! उत्तम प्रवासवर्णन आणि सुंदर चित्रे !! धन्यवाद !!! फार पूर्वी अजिंठा-वेरूळचे दर्शन केले होते. तुम्ही ती आठवण उजळ केलीत !
चार धडे व एक डोके असलेले हरीण तर शिल्पकलेचा "मास्टरपीस" आहे. अजून काही खास लक्षात राहीलेले म्हणजे छतावर असलेले रागाने चिडून अंगावर धावून येणार्या बैलाचे कोरीवकाम. त्याच्या चारीबाजूनी फिरून कोठूनही पाहिले तरी तोआपल्याकडेच धावत येतो असे दिसते.
31 Dec 2012 - 5:33 pm | लीलाधर
ईसको बोलते है वल्लीटच लेख बोले तो आम्ही उगाच नै उपाधी दीलीय वल्लीबुवा गडकरी फारच छान ब्वॉ :)
31 Dec 2012 - 6:03 pm | स्पंदना
इतिहास बघावा तर तो जाणकाराच्या नजरेतून. अन वल्ली आमच्यासाठी तुम्हीच जाणकार.
नेहमी प्रमाणे फोटो अतिशय आवडले. निवेदन सुद्धा झकास. खरच इतकी प्रमाणबद्ध, अन इतकी चेहर्यावरच्याभावमुद्रा टिपणारी आपली कला. अन हरिणाच शिल्प, सारच खास.
31 Dec 2012 - 6:08 pm | गवि
फार लहानपणी पाहिली आहेत ही लेणी. त्यावेळी काही समजण्याची शक्यताच नव्हती.
वल्ली द ग्रेट... झकास सुरुवात आहे.. एका भागात संपणारा प्रकारच नव्हे हा...
31 Dec 2012 - 6:12 pm | चित्रगुप्त
वा वा वा
एकदम झकास फोटो आणि लेख.
त्याकाळी अंधारात चित्रे कशी रंगवली/खोदली, आणि बघणारे कसे बघत याविषयी खात्रीशीर माहिती काय मिळते?
असे ऐकले आहे की आत गेल्यावर जरा वेळाने सर्व स्पष्ट दिसू लागते, त्यामुळे कृत्रिम प्रकाशाची गरज नसते वगैरे.
तरी यावर तुमचा अनुभव काय आहे?
हल्ली तिथे कायमचे दिवे लावलेले आहेत का?
31 Dec 2012 - 8:08 pm | प्रचेतस
अजिंठा लेणीत दिवसाचा काही काळ सूर्यप्रकाश पोहोचतो. विशेषतः ९ आणि १० क्रमांकाची लेणी बरीच प्रकाशमान आहेत पण हे जे १ व २ क्रमांकाचे विहार आहेत तिथे आतमध्ये दिवसाही सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. अपवाद फक्त ओसरीवर काही काळ येत असलेल्या सूर्यप्रकाशाचा. काही जण म्हणतात की ओसरीवर पाण्याने भरलेली मोठी परात ठेऊन सूर्यप्रकाश आतल्या भिंतीवर परावर्तीत करून त्या प्रकाशातच चित्रे रंगवली जात. हे काम दिवसातल्या थोड्याश्याच काळात करता येत असे. मशालींचा वापर होत असेल का याविषयी शंकाच आहे. कारण छतावर काजळी धरली जाण्याची भीती.
प्राचीन काळी ही चित्रे बघणारे कसे बघत असावेत कल्पना नाही. अर्थात आतमध्ये गेल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोडेफार तरी दिसू लागते. हल्ली तिथे अतिशय कमी क्षमतेचे दिवे लावलेत. चित्रे नीट बघण्यासाठी त्यांच्या फारसा वापर तसा होतच नाही. बॅटरीच्या उजेडातच बर्यापैकी दिसू शकते. तरीही त्या अंधारातही चित्रांमधल्या व्यक्तींचे दागिने अगदी झळकत असलेले दिसून येतात.
1 Jan 2013 - 4:13 am | चित्रगुप्त
आणखी एक शक्यता अशी वाटते, की हल्ली आपली जी डोळ्यांची क्षमता असते, तेवढीच पूर्वीच्या लोकांची असेल, असे आपण गृहित धरून चालतो, परंतु त्याकाळी मानवी डोळ्यांची क्षमता जास्त असल्यास अगदी कमी प्रकाशातही चित्रे स्पष्ट दिसत असतील.
चित्रे काढताना समजा परावर्तित प्रकाश वापरला, तरी नंतर बघणार्यांचे काय? इजिप्तच्या पिरॅमिड मधील चित्रकला ही कुणाही मानवाने बघू नये, तिथे कुणी पोहोचूही नये, म्हणून सीलबंद केली जात असे, तसे काही या गुफांविषयी असावे का?
2 Jan 2013 - 9:19 am | प्रचेतस
>>>परंतु त्याकाळी मानवी डोळ्यांची क्षमता जास्त असल्यास अगदी कमी प्रकाशातही चित्रे स्पष्ट दिसत असतील.
असे वाटत नाही. डोळ्यांच्या क्षमतेत बदल व्हायला १७०० वर्ष काळ हा पुष्कळच कमी आहे.
>>>चित्रे काढताना समजा परावर्तित प्रकाश वापरला, तरी नंतर बघणार्यांचे काय?
आज १७०० वर्षांनंतरसुद्धा ही चित्रे इतकी तेजस्वी दिसतात की पूर्वी रंग ताजे असताना ती नक्कीच जास्त चमकदार असावीत. विशेषतः पहिल्या २०० वर्षांत तर खूपच.
>>>इजिप्तच्या पिरॅमिड मधील चित्रकला ही कुणाही मानवाने बघू नये, तिथे कुणी पोहोचूही नये, म्हणून सीलबंद केली जात असे, तसे काही या गुफांविषयी असावे का?
नाही. लेणी बनवायचा उद्देश म्हणजे धर्मप्रसार करता करता वर्षावासात भिख्खूंना ध्यानधारणा करता यावी हाच होता. महायानकाळात वर्षानिवास हा उद्देश मागे पडून धर्मप्रसारासाठी लोकांना आकर्षित करून भव्य दिव्य निर्मिती करूणे सुरु झाले. त्यामुळे तिथे कुणी पोहोचूही नये गुहा म्हणून सीलबंद केली जाई असे होणे शक्य नाही.
राष्ट्रकूट राजवटीत वेरूळच्या एकाश्म कैलास मंदिराच्या अतिशय भव्य निर्मितीनंतर अजिंठ्याचा हा ठेवा विस्मृतीत गेला.
31 Dec 2012 - 6:20 pm | केदार-मिसळपाव
मला आवडला लेख. विशेषतः चित्रांबद्दल माहिती छानच..
31 Dec 2012 - 6:49 pm | पैसा
कोणत्या शब्दात कौतुक करू समजत नाहीये. अमूल्य चित्र शिल्पे यांची तेवढीच सुरेख ओळख. अजिंठ्याला जाईन तेव्हा काय बघायचे हे आधी माहित असेल आता. पुढचा लेख लवकर लिही!
31 Dec 2012 - 9:03 pm | अशोक पतिल
छान वर्णन ! मी खुप वेळा अजिंढ्याला गेलो आहे. मी नेहमी बघतोकी विदेशी पर्यटक फार बारकायीने निरीक्षण करतात परंतू आपले भारतीय फक्त मोजम्ज्जा करण्यासाठी बहूतेक येत असतात .अजुन एक लेण्या मधील फोटो काढ्न्यासाठी फ्लॅश वापरू देत नाहीत . तुम्ही काय फ्लॅश वापरून फोटो काढलेत ?
1 Jan 2013 - 10:00 pm | मदनबाण
सुंदर फोटो. :)
अजंठा लेण्याचे अगदी नयनरम्य दर्शन झाले. :)
2 Jan 2013 - 2:51 am | दीपा माने
अप्रतिम सुंदर फोटोग्राफी आहे. सर्वच फोटो जुना इतिहास सांगत आहेत. धन्यवाद.
2 Jan 2013 - 9:33 am | नंदन
निवांतपणे वाचायचा म्हणून हा लेख बाजूला ठेवला होता, त्याचं चीज झालं.
तंतोतंत सहमत. पुढील भागांची आणि वेरुळ लेण्यांवरील लेखाची वाट पाहतो आहे.
अवांतर - आझमचाचा आठवले.
2 Jan 2013 - 3:40 pm | अनिल तापकीर
सर्वच- अप्रतिम
3 Jan 2013 - 11:39 pm | ५० फक्त
फोटो भारी आलेत रे, फक्त ते फ्लॅश मॅनेज कसा केलास ते समजलं नाही ? बाकी माहिती थोडी नविन थोडी वेगळी.
4 Jan 2013 - 1:34 pm | पियुशा
आवडेश रे वल्लीदा :)
पु.भा.प्र.
5 Jan 2013 - 12:48 pm | सुहास झेले
मस्त रे.....नुकताच जाऊन आलोय इथे. दोन दिवससुद्धा पुरणार नाहीत ह्या लेणी बघायला :) :)
5 Jan 2013 - 2:26 pm | सस्नेह
काळाच्या पोटातला हा अमुल्य ठेवा माहितीची जोड देऊन सादर केल्याबद्दल धन्यवाद.
ही चित्रे सुस्थितीत असताना कशी दिसत असतील या कल्पनेनेच धन्य वाटत आहे.
5 Jan 2013 - 4:56 pm | नि३सोलपुरकर
सुंदर फोटो ,छान वर्णन आणी अमुल्य माहितीची जोड असलेला उत्तम लेख.
वल्ली खुप खुप धन्यवाद.. २००५ साली एकट्यानेच केलेली वेरुळ आणी अजंठा लेण्याची वारी आठवली.
5 Jan 2013 - 5:58 pm | सागर
नेत्रसुखद व स्पष्ट छायाचित्रांबरोबरच तुझ्या खास शैलीत केलेल्या वर्णनांमुळे प्रत्यक्ष अजंठा लेण्यांचे दर्शन करत असल्याचा आभास निर्माण झाला.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे हे वेगळे सांगायला नकोच :)
5 Jan 2013 - 10:10 pm | मुक्त विहारि
झक्कास..
5 Jan 2013 - 10:10 pm | मुक्त विहारि
झक्कास..