केमिकल कॅस्ट्रेशन..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
31 Dec 2012 - 1:02 pm

दिल्लीमधे झालेला धावत्या बसमधला बलात्कार आणि त्यामधे त्या निरपराध मुलीच्या शरीराशी केल्या गेलेल्या विकृत मारहाणीने घेतलेला तिचा बळी हे सर्व अगदी ताजं आहे आणि त्याविषयी आधीच खूप चर्चा आणि आंदोलनं झाली आहेत, चालूही आहेत.

या प्रसंगाची धग, बोच , अपराधीपणा कुठेतरी सर्वांनाच जाणवतो आहे. प्रत्येक व्यक्तीने, जास्त करुन पुरुषाने स्वतःलाच यासाठी अंशतः जबाबदार धरावं की नाही हा मुद्दा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. सध्या कोणीही त्या दिशेने विचार करण्याच्या मनःस्थितीत नाही. आय अ‍ॅम सॉरी टू बी अ मॅन अशा आशयाची भावनापूर्ण निवेदनं दिली जात आहेत.

सध्या बलात्कारविरोधी शिक्षा (न्याय) आणखी आणखी तीव्र करावी अशा विचारातून जो मसुदा बनवला जातोय त्यामधे तीस वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच केमिकल कॅस्ट्रेशन हा एक पर्याय विचारासाठी घेतला गेलेला आहे. पोलंड, अमेरिकेत काही राज्यं आणि इतर काही देशांमधे शिक्षेचा हा प्रकार आधीच वापरला जातो आहे.

खच्चीकरण असा एक प्रतिशब्द यासाठी आजच्या लोकसत्तेत वापरला गेला आहे. हा शब्द कितपत चपखल आहे ते मला माहीत नाही. त्यामधे "रसायने टोचून खच्चीकरण हा प्रकार नसबंदीसारखा (पर्मनंट) नसतो, औषधे म्हणजे रसायने बंद केल्यानंतर त्या व्यक्तीची लैंगिक क्षमता पूर्ववत होते", अशा आशयाचा मजकूर आहे.

नसबंदी या प्रकाराशी केलेली अशी तुलना चुकीची वाटते आहे. केमिकल खच्चीकरण म्हणजे नसबंदीपेक्षा बरे असा काहीतरी रोख त्यात उगीच दिसतो. नसबंदीने पुरुषाची लैंगिक भावना, क्षमता वगैरेवर काही परिणाम होत नाही अशी माझीतरी समजूत आहे. हीच समजूत कुटुंबनियोजनाच्या अनेक जाहिरातींमधेही अधोरेखित होते.

बातम्या ऐकता-वाचताना आलेले असे विचार थोडे बाजूला सोडतो आणि केमिकल कॅस्ट्रेशनविषयी आलेला विचार पुढे मांडतो.

मिळालेल्या माहितीवरुन असं दिसतंय की हा पर्याय "रेअरेस्ट ऑफ रेअर" केसेसमधे वापरला जावा अशी शिफारस आहे. ("दुर्मिळ घटनांत":लोकसत्ता)

सर्जिकल कॅस्ट्रेशन अर्थात शल्यक्रियेद्वारे नपुंसकत्व / वंध्यत्व आणण्याच्या शस्त्रक्रियेपेक्षा हा प्रकार वेगळा आहे. यात शस्त्रक्रियेने लैंगिक अवयव कायमचे काढून टाकण्याऐवजी केवळ इंजेक्शनद्वारे डेपो प्रोवेरा किंवा सायप्रोटेरॉन अ‍ॅसिटेट किंवा तत्सम औषधं दर तीन महिन्यांनी (किंवा ठराविक काळाने) टोचत राहून त्याचं शरीरातलं प्रमाण मेंटेन केलं जातं. या द्रव्यांमुळे लैंगिक इच्छा आणि शरीरसंबंध करण्याची क्षमता दोन्ही कमी होतात.

आता प्रश्न असा आहे की यामधे गुन्हेगाराला दर ठराविक दिवसांनी ते द्रव्य टोचण्याचा उपद्व्याप कोण करणार? त्याची अंमलबजावणी दर अमुक महिन्यांनी होतेय का ते कोण पाहणार? जर तुरुंगवास अधिक वरुन हा उपाय करायचा असेल तर त्याचा उपयोग काय? तुरुंगवासाऐवजी पर्याय म्हणून हा उपाय इतर देशांत केला जातो. या उपायाने दीर्घ काळानंतर स्त्रीप्रधान हार्मोन्सची पुरुष शरीरात वाढ होऊन पुरुषात काही स्त्रैण लक्षणे येतात. या प्रक्रियेत वापरलेल्या द्रव्यांमुळे हृदयविकार आणि इतर काही आजारात वाढ होऊ शकते. अर्थातच मूळ गुन्ह्याला शिक्षा देताना इतर डॅमेजेसही होतात, याचा विचार एका गुन्हेगाराच्या बाबतीत करायचा किंवा नाही याविषयी देशाची काय विचारसरणी आहे त्यावर देशाविषयी एक जागतिक प्रतिमाही तयार होत असते.

यामधे कशाला विरोध किंवा पाठिंबा देण्याचा उद्देश नाही, पण असे ठराविक काळाने औषध देऊन "खच्चीकरण" मेंटेन करणं हे कोणत्याही दृष्टीने योग्य किंवा किमान प्रत्यक्षात शक्य कोटीतलं वाटतं का?

कायद्याच्या मूलभूत विचारांमधे एक विचार आहे. समाजातला एक घटक (व्यक्ती) हा सार्वजनिक हिताचे नियम (कायदे) पाळत नाहीये, अर्थात ती व्यक्ती हा या सिस्टीम मधला उत्पन्न झालेला एक "दोष" आहे. अशा वेळी या "दोषा"ला समाजाच्या रचनेतून दूर करणं हे कायद्याचं काम आहे. या "दूर" करण्याने बाकीचा समाज पुन्हा एकसंधपणे कायद्याने राहील.

या "दूर" करण्याचे मार्ग गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार "नोकरीतून सस्पेंड" ते "तडीपारी" ते "तुरुंगात टाकणे" ते "फाशी (जगातून टर्मिनेट)" असे असतात.

खच्चीकरणामागे हे सूत्र लावलं तर लैंगिक व्यवहाराच्या सिस्टीममधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा (दूर करण्याचा) हा प्रकार आहे.

आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत हा विचार उपयोगी आहे का? मर्दानगी ही अस्तित्वापेक्षाही महत्वाची मानणार्‍या सर्वसाधारण मानसिकतेत हजेरी लावून कोणी खच्चीकरणाला सहकार्य करेल का? अशी व्यक्ती लैंगिकदृष्ट्या खच्ची झाली तरी हिंसात्मकदृष्ट्या खच्ची होईल का? आपली तथाकथित मर्दानगी जाहीर शिक्षेने "खच्ची" केली गेली हा त्या व्यक्तीच्या स्वतःच्या(अर्थातच तथाकथित) मानसिक प्रतिमेला इतका काळिमा असेल की त्या अर्थाने शिक्षेचा उद्देश पूर्ण झाला तरी त्यानंतर ती व्यक्ती फक्त आणि फक्त सूड हे एकच ध्येय समोर ठेवून जगेल असं वाटत नाही का? अशी व्यक्ती तुरुंगात ठेवून समाजापासून दूर राहणं आणि खच्ची होऊन समाजातच राहणं यापैकी दुसर्‍या पर्यायात त्या बलात्कारित स्त्रीचं जिणं ती व्यक्ती नकोसं करणार नाही का? किती पीडित महिलांना नंतर आयुष्यभर पोलीस प्रोटेक्शन देणार?

अगदी "ह्युमॅनिटी गेली तेल लावत" असं म्हटलं तरी असं म्हणता येईल की हे गुन्हेगार म्हणजे जणू उंदीर, डास असे निर्मूलनाचे विषय आहेत. अशा दृष्टीने सुद्धा.. उंदीर किंवा डास निर्मूलनासाठी त्यांना दर तीन आठवड्यांनी पकडून "चावण्याची इच्छा कमी करणार्‍या" द्रव्याचा ठराविक डोस त्यांच्या तोंडी घालत राहणं हे किती फिजीबल आहे याविषयी शंकाच आहे.

केमिकल कॅस्ट्रेशनविषयी सध्यापर्यंत तरी हे प्रश्न मनात आले आहेत. प्रत्यक्ष कायदा काय आणि कसा होतो त्यावर कल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात..

समाजविचार

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

31 Dec 2012 - 1:19 pm | मृत्युन्जय

फीजिबिलिटी या एकमेव मुद्द्यावर मी गविंशी सहमत आहे. दर ३ महिन्यांनी हे उपद्व्याप कोण करणार? त्या मा*रचो*ला शोधायचे त्याला इंजेक्शन द्यायचे. मओर ती पीडा. त्यापेक्षा एकदाच सर्जिकल कॅस्ट्रेशन करुन टाका. प्रश्न मिटवा.

बाकी त्या हरामखोरावर कसली दया आणी माणुसकी दाखवायची? बलात्काराला सर्जिकल कॅस्टृएशन हा एकमेव पर्याय बलात्कारित मुलीला मानसिक दिलासा देइल. वाटल्यास त्याब सर्जिकल कॅस्ट्रेशनची जी काही औपचारिकता असेल तीदेखील करण्याची संधी त्या बलात्कारित मुलीला द्यावी आणि त्यावेळेस तो गुन्हेगार भुलीच्या प्रभावाखाली पण शुद्धीत असावा.

सर्जिकल केले तरी त्याला बाहेर मोकळा सोडायचा का?? तो पीडीत स्त्रीच्या जिवाला धोका नाही का?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2012 - 1:39 pm | अत्रुप्त आत्मा

@तो पीडीत स्त्रीच्या जिवाला धोका नाही का?>>> हो धोका असेलच,पण ही असली शिक्षा होते,ही गोष्ट जरब बसवणारी ठरेल... आणी जो बलात्कारी अश्या पद्धतीने बलात्कारितेला त्रास देइल,त्याला त्याहूनंही भीषण शिक्षेला सामोरं जाण्याची तरतूद अधीच करता येणं शक्य आहेच की...!

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 2:03 pm | टवाळ कार्टा

"असली शिक्षा होते,ही गोष्ट जरब बसवणारी ठरेल"...अगदी खरे
अशा पुरुषाना "जाहीरपणे" नपुसंकतेचा शिक्का बसणे जास्त त्रासाचे असेल ... तुरुंगात ठेवल्याने कदाचीत कोडगेपणा वाढेल

सर्जिकल केले आणी नंतर तो निर्दोष सिध्द झाला तर त्याला परत पुर्ववर करता येते काय?

आणी तसे करता येत असेल तर सर्जिकल केलेला गुन्हेगारही परत पुर्ववत होऊ शकेल.

मृत्युन्जय's picture

1 Jan 2013 - 11:24 am | मृत्युन्जय

दोषी सिद्ध झाल्यावरच सर्जिकल करावे. तोपर्यंत कायद्याची योग्य ती कारवाई करावी.

मृत्युन्जय's picture

1 Jan 2013 - 11:23 am | मृत्युन्जय

बाहेर मोकळा सोडायला हरकत नसावी. १०-१५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगुन झाल्यावर. सोडताना फक्त त्याच्या कपाळावर " बलात्कारी - १० वर्षे तुरुंगवास" असे लिहुन सोडावे. म्हणजे बाकीचे लोक स्वतःची काळजी घेतील.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2012 - 1:34 pm | अत्रुप्त आत्मा

@उंदीर किंवा डास निर्मूलनासाठी त्यांना दर तीन आठवड्यांनी पकडून "चावण्याची इच्छा कमी करणार्‍या" द्रव्याचा ठराविक डोस त्यांच्या तोंडी घालत राहणं हे किती फिजीबल आहे याविषयी शंकाच आहे.>>> अनेक दृष्टीने अशी शिक्षा अमलात आणणे अडचणीचे आहे./सोईचेही नाही... त्यापेक्षा अश्या गुन्हेगारांना,खायला आहे पण तोंड नाही अशी शारिर अवस्था(ऑपरेशनद्वारे काढून टाकणे) करून सोडणं हीच योग्य शिक्षा होइल. ज्या एका विकृत मानसिकतेनी हे बलात्कारी एका व्यक्तिचं आयुष्य संपवतात,त्याच विकृत आनंदाला त्यांना आयुष्यभरासाठी पारखं करणं/मोहोताज करणं...हीच योग्य शिक्षा आहे.

रुस्तम's picture

1 Jan 2013 - 1:15 pm | रुस्तम

ज्या एका विकृत मानसिकतेनी हे बलात्कारी एका व्यक्तिचं आयुष्य संपवतात,त्याच विकृत आनंदाला त्यांना आयुष्यभरासाठी पारखं करणं/मोहोताज करणं...हीच योग्य शिक्षा आहे.

बाळ सप्रे's picture

31 Dec 2012 - 1:50 pm | बाळ सप्रे

"रेअरेस्ट ऑफ रेअर" गुन्ह्याला फाशी हा देखिल एक अगम्य विचार वाटतो.. शिक्षेची तीव्रता ही गुन्ह्याच्या गंभीरपणावर ठरली पाहि़जे.. गुन्हा घडण्याच्या शक्यतेवर (प्रोबॅबिलिटी) अवलंबून का असावी??

सस्नेह's picture

31 Dec 2012 - 1:55 pm | सस्नेह

अगदी "ह्युमॅनिटी गेली तेल लावत" असं म्हटलं तरी असं म्हणता येईल की हे गुन्हेगार म्हणजे जणू उंदीर, डास असे निर्मूलनाचे विषय आहेत. अशा दृष्टीने सुद्धा.. उंदीर किंवा डास निर्मूलनासाठी त्यांना दर तीन आठवड्यांनी पकडून "चावण्याची इच्छा कमी करणार्‍या" द्रव्याचा ठराविक डोस त्यांच्या तोंडी घालत राहणं हे किती फिजीबल आहे याविषयी शंकाच आहे.
.्ए तर फक्त बलात्कारलाच नाही, सर्वच गुन्हे अन गुन्हेगारांना लागू होते.
मग इतर गुन्ह्यांमधे जर गुन्हेगार पीडिताचा सूड घेण्याची शक्यता असेल तर यातही आहे.

मला ही शिक्षा अव्यवहार्यही वाटते आणि अप्रस्तुतही. अश्या व्यक्तिंना काही काळ समाजापासून दूर ठेवणे (अर्थात तुरूंगवास) ही सध्याच्या कायद्यात असलेली तरतुद मला योग्य आणि पुरेशी वाटते.

मात्र अश्या केसेसची शक्य तितक्या त्वरीत आणि कोणाचीही हयगय न करता केलेली अंमलबजावणी, विशेष न्यायालये, पिडीत स्त्रीला सगळ्यांसमोर उत्तरे द्यायला लावण्याऐवजी थेट न्यायाधिशाकडे लेखी उत्तरे द्यायची सुट, शक्यतो स्त्री न्यायाधीशांकडे अशी केस सुपूर्त करणे असे उपाय अधिक प्राधान्याने करण्याची गरज वाटते.

अर्थात हे सारे 'रिस्पॉन्सिव्ह' कायदे झाले, घटना घडून गेल्या नंतरचे. ती घडू नये यासाठी अत्यावश्यक लोकशिक्षण, स्त्रियांना मानाचे स्थान समाजात मिळेल यासाठी हरेक प्रयत्न (जसे महिला आरक्षण बिल, खाजगी व्यवसायांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये ५०% महिलांना आरक्षण, महिला सैनिकांना केवळ संचलनाला आणि दंगलींच्यावेळी महिला दंगलकर्त्यांना अटकाव करण्यापुरते न वापरता पुरूषांशी लढायला ट्रेन करणे आणि तसे करण्याची संधी देणे वगैरे वगैरे ) असे उपाय अधिक परिणामकारक ठरावेत.

प्रचेतस's picture

31 Dec 2012 - 4:19 pm | प्रचेतस

पूर्णपणे अनुमोदन.
बाकी काही प्रतिसाद वाचून भारताचे तालिबानीकरण व्हायला सुरुवात तर झाली नाही ना असे क्षणभर वाटून गेले.

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 4:22 pm | बॅटमॅन

माझेही अनुमोदन.

बैदवे भारताचे तालिबानीकरण होणे शक्य नै. तसे करायलासुद्धा एक एफिशियन्सी लागते, ती आपल्या आळशीपणामुळे आपल्यात कधीच येणे शक्य नै ;)

ऋषिकेश's picture

1 Jan 2013 - 9:21 am | ऋषिकेश

:) खरे आहे.

बाकी जो काही कायदा बनेल तो 'सूड घेण्याच्या' मानसिकतेतून बनवला जाऊ नये असे वाटते.

पुन्हा एकदा तेच हिंसक विचार मांडतो क्षमस्व.
तुम्ही म्हणता तसा फास्ट ट्रॅक खटला भरावा.
गुन्हेगार दोषी आढळल्यास हात पाय कलम करुन, तसाच मरे पर्यंत तडफडत ठेवावा.

रीमा लागु यांचं "पुरुष" नाटक आठवल.

Dhananjay Borgaonkar's picture

31 Dec 2012 - 3:35 pm | Dhananjay Borgaonkar

आरोप सिद्ध झाल्यास ७ वर्ष सक्त्मजुरी आणि त्या नंतर दोन्ही हात तोडा.
म्हणजे परत कुठल्याही स्त्रीवर हात टाकु शकणार नाही कितीही इच्छा झाली तरीही...

अभिजित - १'s picture

31 Dec 2012 - 4:09 pm | अभिजित - १

अशा १० / १५ केस मधील सगळ्या आरोपींना एकदम रस्त्यावर फटके हाणून ठार करावे . एकदाच असे २५ / ५० लोक तडफडत मेले कि परत कोणी असला गुन्हा करायला पुढे येणार नाही. आणि हो मोठ्या धेन्डा न पण . ( जसा गोपाल kanDa ) . संस्कार वगैरे झुठ आहे . जे चांगले आहेत ते कायमच चांगले असतात. आणि जी जनावर असतात ती कायमच जनावरे. संस्काराची बाळगुटी पाजून काही त्यांची माणसे होणार नाहीत . संधी मिळाली कि ते शिकार करणारच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Dec 2012 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रासायनिक प्रक्रिया करुन कायमचा नपुंसक करण्याचा मार्ग असेल तर काही हरकत नाही. किमान आयुष्यभर आठवणीत राहील अशी शिक्षा मला वाटते, योग्यच आहे. वयोमानाने अशा अवस्थेला पोहचत असलेल्या लोकांना अशी शिक्षा देऊन उपयोग काय ? अशा विकृत लोकांवर एक वचक बसेल फक्त अशा शिक्षा देतांना कायद्याचा दुरुपयोग होऊ नये.

-दिलीप बिरुटे

ब़जरबट्टू's picture

31 Dec 2012 - 4:41 pm | ब़जरबट्टू

कुठे त्यांना दर तीन आठवड्यांनी पकडून डोज देता ? आमच्या गावाकडे डायरेक्ट गोट्या ठेचतात सान्डाच्या, बैल बनवायला, तोच इलाज वापरावा..

स्पंदना's picture

31 Dec 2012 - 4:59 pm | स्पंदना

त्याच काय आहे गवी, अगदी लहाणपणापासुन एका आळशी माणसाची मजेशीर गोष्ट ऐकत मोठे झालो आपण. पण तो बिनकामाचा,आळशी, गुड फॉर नथिंग माणुसही स्वप्नात सुद्धा बायकोला लाथ मारतो अन त्याची जी काय दुधाची हंडी, काचेची भांडी वा अंडी असतील ती फुटतात अन तो हळहळ्तो. त्याच्या त्या हळहळण्यावर हसताना आपल्याला त्याला बाय्कोला लाथ मारायचा काय अधिकार हा प्रश्न कधी पडलाच नाही. त्याचेच परिणाम. दुसर काय. ज्या बाईवर ही आपत्ती ओढवते तिची या दु:खातुन जन्मभरासाठी सुटका नाही याचा कोण विचार करणार हो? पण एका पुरुषप्रधान समाजात एका पुरुषाच खच्चीकरण ही फार वाईट गोष्ट बघा.

भावनेच्या भरात काय म्हटलंय तेच मुळातून न वाचण्याचं प्रातिनिधिक उदाहरण..

"बाईचं काही का होईना, तिच्याशी काहीही करण्याचा पुरुषाला अधिकार आहेच, पण पुरुषाचं खच्चीकरण ही फार वाईट गोष्ट ..." असा आशय दिसला तुम्हाला या लिखाणात?

सध्याच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक उपलब्ध सामाजिक / वैयक्तिक अपमान (जो योग्यच असू शकेल, असं स्पष्ट म्हटलं आहे) तो अपराधी पुरुषाचा केला आणि मग त्याला समाजात मोकळाच सोडला तर त्या स्त्रीला काय सुरक्षितता राहणार? तो सुडाने पेटून तिला त्रास देईलच का? असा प्रश्न उपस्थित करण्यामागे, त्या व्यक्तीला समाजापासून फिजिकली दूर करणं हेच योग्य आहे (तुरुंगवास, मृत्युदंड इ इ मार्गांनी) हे मी ध्वनित करत असताना तुम्हाला मात्र "पुरुषाचं खच्चीकरण वाईट हो, बाकी बाईच्या यातनांचा विचार कोण करणार", असे अर्थ दिसावेत हे अत्यंत दुर्दैवी आहे इतकंच म्हणू शकतो..

स्पंदना's picture

31 Dec 2012 - 5:41 pm | स्पंदना

नाही भावनेच्या भरातला नाही आहे प्रतिसाद.
मी कॉलेजमध्ये असताना एक मैत्रीण होती बरोबर. तिच्या वडिलांनी खून केला होता. त्या वेळच्या कायद्याप्रमाणे त्यांना दहा वर्षे सक्तमजुरी झाली होती. आता हे घडुन फार वर्ष लोटली होती. त्यांना आधीची चार मुले होती. अन दहा वर्षे तुरुंगवास भोगुन आल्यावर झालेला आणखी एक मुलगा. मला सांगा काय साधल कायद्याने? काय फरक पडला हो त्या माणसाला? दहा वर्ष हां हां म्हणता गेली. घरी परत आल्यावर बायको उप्लब्ध होती. सगळ पुन्हा जसच्या तसं! काही फरक नाही. मी अमेरिकेत किंबा इतरत्र ७० वर्षे , १३० वर्षे असल्या शिक्षा ऐकते, त्या, त्या त्या गुन्ह्याच्या स्वरुपावर आधारित असतात. या इतक्या वर्षाच्या शिक्षेत तितका लांब कालावधी पॅरोल साठीही लागतो. आहेत आपल्याकडे असे कायदे की जर सापडलो तर आपली खैरे नाही अस आप्ल्या समाजाच्या चौकटीत रहणार्‍या सामान्य माणसाला वाटाव? घरातुन बाहेर पडल की समोर आलेल्या पहिल्या बाईकडे नजर बदलुनच बघितल जात. बायकांना काय अक्कल असते अशी विधान चार्चौघात उभारुन केली जातात. मुलीचा जन्म झाला रे झाला की 'चला आता हुंड्याच्या तयारीला लागा" अस सुचवल जात, या बद्दल बोलतेय मी.
एकुण काय तर वरिल गोष्ट ऐकताना आपल्याला कधीही हे वावग आहे याची फारशी जाणिव नाही होत, पण एका पुरुषाच खच्चीकरण हा मुद्दा खटकुन जातो, एव्हढच म्हणायच आहे मला. तो पुरुष याच्यापुढे सुडबुद्धीने वागेल अस म्हणता तुम्ही, पण बलात्काराच्या नावापुढे असणारी शिक्षा दहा बलात्कार्‍यांना विचार करायला भाग पाडेल हा विचार नाही आला या लेखात. मागच्या वेळीपण माझा नेपाळच्या कायद्याविषयीचा मुद्धा हाच होता. तो कायदा स्त्री सहानुभुतीपुर्वक बनवलेला असल्याने, ज्या व्यक्तीच्या मनात असले विचार येतील त्याला त्याच्या होणार्‍या भयानक परिणामांचा विचार इंट्रुद्युस करते. अन तेंव्हा तो कायदा प्रिव्हेंटीव्ह काम करतो. मग डोंबिवलीतले पितापुत्र असल काही करायला धजावणार नाहीत अशी आशा निर्माण करतो. एव्हढच म्हणायच आहे मला.

आत्तापर्यंत तरी कोणत्याही गुन्ह्याला शिक्षेची भीती रोखू शकल्याचं प्रमाण अगदी तातडीने शिक्षेची अंमलबजावणी करणार्‍या देशातही दिसलेलं नाही. तपशीलवार आकड्यांमधे जाऊन हे पाहता येईल, पण सर्वसाधारण निष्कर्ष हाच आहे की "शिक्षेच्या भीतीने" गुन्ह्याचं प्रमाण कुठेच कमी झालेलं किंवा होत गेलेलं नाही. लैंगिक गुन्ह्यामधे तर "कामातुर = कामांध" हीच गुन्ह्याच्या क्षणाची तात्कालिक परिस्थिती असते हे प्रत्येक गुन्ह्याबाबत सिद्ध झालंय. अन्यथा दिल्ली बस घटनेनंतर शिक्षा सोडा, केवळ उसळलेला जनसागर आणि पेटलेला इश्यू पाहूनसुद्धा पुढच्या दोन आठवड्यात त्याच शहरात किमान चार बलात्काराच्या घटना झाल्याच आहेत.

इथे खच्चीकरण पुरुषाचा अपमान म्हणून कोणालाच खटकलेलं नसून, उलट अशा व्यक्तीला फक्त लैंगिक खच्चीकरणाचा अपमान करुन मोकळा सोडला तर त्या स्त्रीचं काय होईल ही काळजी आहे. ती रास्त नाहीये का?

समजा थेट चोवीस तासाच्या आत ठारच करुन टाकण्याची पॉवर त्या स्त्रीला आणि नातेवाईकांना दिली (नेपाळ फेम) तर आत्ता ज्या मुली बलात्कारातून निदान जिवंत सुटताहेत त्या सुटतील का? जिवंत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि उद्या आपल्याला ठार करणारी अशी ती मुलगी त्या बलात्कारी पुरुषाला जिवंत ठेवावीशी वाटेल का?

की यातही त्या बलात्कार्‍याला काय करावंसं वाटेल असा त्याच्या बाजूने विचार केलेला दिसतोय?

शिक्षेच्या भितीने बलात्काराच नगण्य प्रमाण सिंगापुरात दिसेल. इव्हन मी ऑस्ट्रेलियात मागच्यावर्षी न्युअ इयरला ५० हजारांच्या जमावात सापडले होते. अंगात न्यु इयर म्हणुन चांगले कपडे, बरोबर टिनएजर मुलगी, कुणीही अगदी कुणीही एकही खटकेल असा स्पर्श नाही केला. हे मी भारताच्या बाबतीत नाही म्हणु शकत. मी सिंगापुरच्या अस्तित्वात तिन किंवा चार रेप केसेस ऐकल्या. ऑस्ट्रेलियात आल्यापासुन अरांउड पाच एका वर्षात. कुठे चार बलात्कार एका दिवसात अन कुठे पाच केसेस एका वर्षात. टॅली इट.

तुम्ही दिलेले आकडे विचार करण्यासारखे आहेत. पण आपण इथे कोणत्या देशात जास्त बलात्कार होतात हे पहात नसून शिक्षेचा परिणाम होतो किंवा नाही हे पाहू इच्छितोय. ऑस्ट्रेलिया अन सिंगापुरात कडक शिक्षा नसलेल्या काळात याहून बरेच जास्त बलात्कार होत होते का? ही माहिती आपल्याला आत्ता नसली तरी तिथले लोक आणि इथले लोक, तिथला वार्षिक काउंट आणि इथला दैनिक/वार्षिक काऊंट यांची थेट लिनीअर तुलना कशी करता येईल...??

लोकसंख्या:

ऑस्ट्रेलिया : २,२८,५६,१६३

सिंगापूरः ५३,१२,४००

भारत : १,२१,०१,९३,४२२

थोडाथोडका नाही हो फरक.. अजिबातच थोडाथोडका नाही..

मालोजीराव's picture

31 Dec 2012 - 6:07 pm | मालोजीराव

चौरंग करा !!!

कारण दर ३ महिन्याने गुन्हेगार सापडायचा कुठून? पेरोलवर सुटलेले कितीतरी परत सापडत नाहीत. शिवाय हा अगदीच तात्पुरता उपाय झाला. त्यातूनही ही मंडळी डॉक्टर्सकडे संधान बांधून या शिक्षेची वासलात लावतील ही शक्यताच भारतात जास्त. तुरुंगात ठेवून केमिकल्स देण्यात काय हशील आहे?

प्रत्येक गुन्हा, गुन्हेगार यांची पार्श्वभूमी, गुन्ह्याची तीव्रता, पीडित महिलेवर झालेले शारीरिक/मानसिक/सामाजिक परिणाम हे सगळं विचारात घेऊन शिक्षा दिली पाहिजे. नाहीतर अरुणा शानभाग व्हेजिटेटिव्ह स्टेटमधे आणि तिला असं हतबल करणारा ७ वर्षं काढून मोकळा असले चीड आणणारे प्रकार होतात. घरातल्या माणसाने बाप्/भाऊ जवळचे नातेवाईक यांनी केलेल्या गुन्ह्याना जास्त कडक शिक्षा असली पाहिजे कारण तो विश्वासाघात असतो.

दिल्लीच्या केसमधल्या मुलीने आपल्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असा विचार आईकडे लिहून दिल्याचं वाचलं. निदान मरणार्‍याची शेवटची इच्छा तरी पुरी झालीच पाहिजे. या ६ गुन्हेगारांपैकी एकजण अल्पवयीन आहे आणि जास्त गंभीर गुन्हा त्याच्या माथी मारून बाकीचे कमी प्रमाणातल्या शिक्षेवर सुटून जातील अशीच चिन्हे आहेत. बलात्कार करताना तो अल्पवयीन नव्हता का?

बलात्काराला फक्त ७ वर्षे तुरुंगवास ही शिक्षा फार अपुरी वाटते, तशीच असल्या समाजविघातक प्रवृत्तीना कशाला आमच्या टॅक्सच्या पैशांवर पोसत रहायचं असंही वाटतं. तालिबानी शिक्षा नको खरी पण अशा माणसाला पूर्णपणे समाजातून बहिष्कृत करणे हे समाजाच्या हातात आहे.

गवि's picture

31 Dec 2012 - 6:23 pm | गवि

विचारपद्धतीशी अत्यंत सहमत..

शिवाय त्या बालगुन्हेगार कॅटेगरीचं काहीतरी करायला हवं. "बाल" या शब्दाला रॅशनली जोडता येतील अशा छोट्या गुन्ह्यांबाबतच ही वयोमर्यादा ठेवण्यात यावी. म्हणजे एखाद्या १२ वर्षांच्या पोराने परिस्थितीनुसार भुरटी चोरी केली तर त्याला "बाल" समजून सुधारगृहात पाठवणं ठीक वाटतं, कारण तेवढ्या चुकीने त्याला पूर्ण गुन्हेगार म्हणून शिक्का मारण्यात अर्थ नसतो. पण खून, बलात्कार हे गुन्हे हातून घडणं हे बालपण न राहिल्याचंच लक्षण आहे. तिथे सवलत नसावी.

खर तर बलात्कार करणार्‍याचे लिंग कापणे हिच शिक्षा योग्य आहे.
लिंग कापुन बलात्कार करणार्‍याच्या पुरुष्यत्वाच्या त्याच्या भावनेच खच्चीकरण करुन त्याला जगायला लावायच हीच शिक्षा योग्य आहे त्याला व तसे करु पाहणार्‍या प्रत्येकाला त्यामुळे एक जरब बसेल.

चित्रगुप्त's picture

31 Dec 2012 - 6:29 pm | चित्रगुप्त

कालच बघितलेल्या ( फ्रान्स मधील १७८६ साली घडलेल्या 'नेकलेस अफेयर' या घटनेवरील) सिनेमात असे दाखवले आहे, की शिक्षेखेरीज गुन्हेगाराने जो गुन्हा केला असेल, त्याचे चिन्ह गरम लोखंडाच्या साच्याने त्याच्या शरीरावर कायमचे उमटवले जायचे. कपाळावर वा गालावर "बलात्कारी" असे कायमचे गोंदवले जाणे, ही कल्पना कशी वाटते?

तिमा's picture

31 Dec 2012 - 6:51 pm | तिमा

नुसती शिक्षा वाढवत नेण्यापेक्षा मूळ रोगावर उपचार करा. विकृती निर्माण का होते याचा शोध घ्या. आयटेम साँग्सचा लहान मुलांच्या मनावर (आणि तरुणांच्याही) काय परिणाम होतो त्याचा विचार करा. समाजाचे मनस्वास्थ्य जेंव्हा मोठ्या प्रमाणावर ढळते तेंव्हाच अशा घटना वाढीस लागतात.

नव्वद ट्क्के वेळा पुरूषांची चुक हे मान्य असले तरीही कायद्याचा दुरूपयोग उरलेल्या दहा ट्क्क्यांसाठी होऊ नये हेही तेवढेच महत्त्वाचे.आपण सुचवत असलेले उपाय योग्य असले तरी याद्वारे त्या व्यक्तीची हिंसक व्रुत्ती वाढून एक स्त्री याला कारणीभूत आहे म्हणून समस्त स्त्रीवर्गाला तो त्रास देऊ शकतो. याचा अर्थ या घटनेचा संताप नाही असे नव्हे, पण कायदा संतापाच्या भरात नाही तर पूर्ण विचारांती व्हायला हवा.
शेवटी कायदा गुन्हा घडल्यानंतरच्या शिक्षेसाठी आहे, तो होणारे गुन्हे किती रोखेल हे महत्वाचे आहे. दिल्लीतील त्या घटनेनंतरही रोज पेपरमध्ये त्याच बातम्या दिसतात. ही व्रुत्ती कशी नष्ट करायची हेच कळत नाही.

सध्या होणारी शिक्षा ही कमी कालावधीची आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्यानं २० वर्षाचा असताना बलात्कार केला आणि त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली तर ३०व्या वर्षी तो नालायक तुरुंगातून बाहेर पडणार. ३० हे काही जास्त वय नाही. बचेंगे तो और भी करेंगे प्रकार होईल. एरवी गुन्ह्याची तीव्रता बघून शिक्षा होत असेल पण बलात्कारासाठी सगळ्यांना एकच शिक्षा म्हणजे आयुष्यभर तुरुंगात डांबणे. नाहीतर अगदी तीस वर्षांच्या शिक्षेनंतर ५० वर्षाचा म्हातारा तुरुंगातून बाहेर येऊन पुन्हा असलेच गुन्हे करायला मोकळा. शिवाय इतके वर्षात तुरुंगात कोणाच्या सहवासात राहतो देवजाणे! असलेच लोक आजूबाजूला असले तर करून सवरून मोकळे राहण्याचे कसब शिकायचा.
कॅस्ट्रेशन केल्यावर भावनांचा निचरा झाला नाही म्हणून जर आणखी भयानक पद्धतीने तो राग इतरांवर निघाला तर आणखीच प्रश्न उभे राहतील. एकतर तुरुंगात कायमस्वरूपी डांबून ठेवा किंवा मारून टाका. नाहीतरी लहान मुलींवर अत्याचार करून मारून टाकताना जी विकृती उफाळून येते किंवा स्त्रीचे कधीही भरून न निघणारे शारिरीक, मानसिक नुकसान होते त्यापुढे ही शिक्षा काहीच नाही. उगीच ते दर तीन महिन्यांनी इंजेक्षन वगैरे मुद्दा बाद करावा. आम्ही आमच्या ट्याक्सचे पैसे अश्या कारणासाठी खर्च करणार नाही. त्यापेक्षा जल्लादाला बोलावले की काम तमाम. तसेही त्याला काही काम नसते. सटासट फाशी द्यायला लावायची. पण असे होणार नाही हो. अनेक आमदार, खासदार, उद्योगपती, व्यापारी, नट, दिग्दर्शक, निर्माते यांची पोरे, नातेवाईक, ते स्वत: कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आत गेले की पंचाईत. त्यापेक्षा त्या सामान्य जनतेला, पोरीबाळींना मरू द्या की!

आनन्दा's picture

31 Dec 2012 - 9:13 pm | आनन्दा

जर त्या माणसाच्या शरीरात 'तशी" कोणती क्रियाच झाली नाही तर तो त्याला वंचित कसा होणार?

खरं तर बलात्काराच्या केसेस मधल्या गुन्हेगारांना त्यांच्या वयाच्या ८० वर्षांपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा योग्य वाटते. त्यामुळे त्यातून बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून पुन्हा असा गुन्हा घडण्याची शक्यता नसेल. शिवाय मधून मधून इतर टग्या गुन्हेगारांबरोबर डांबून ठेवावं !

अशोक पतिल's picture

31 Dec 2012 - 9:41 pm | अशोक पतिल

शिक्षेखेरीज गुन्हेगाराने जो गुन्हा केला असेल, त्याचे चिन्ह गरम लोखंडाच्या साच्याने त्याच्या शरीरावर कायमचे उमटवले जायचे. कपाळावर वा गालावर "बलात्कारी" असे कायमचे गोंदवले जाणे, ही कल्पना कशी वाटते?
१०० % सहमत !
बलात्काराचा व अपहरणाचा खटला अतिशय फास्ट ट्रॅकने कमीतकमी ३-४ महिन्यातच संपवावा व त्याचा निकाल अतिशय व्यापक पातळीवर प्रसिद्ध करावा .

अप्पा जोगळेकर's picture

31 Dec 2012 - 10:25 pm | अप्पा जोगळेकर

खच्चीकरण शब्द वाचल्यावर पहिल्याने मला वाटले की तापलेल्या शिगा घेऊन बैलाचे करतात तसं करणार की काय ? असो.
फाशी दिली तरी खूप झालं. सरकारकडून किंवा कायद्याकडून फार्शा अपेक्षा नाहीतच.

काळा पहाड's picture

1 Jan 2013 - 1:48 am | काळा पहाड

अपराधींच्या घरच्यांना अपराधींच्या समोर ठार करता येइल का? कायद्याने.

कौशी's picture

1 Jan 2013 - 4:43 am | कौशी

लिंग कापा xxxx चे

चित्रा's picture

1 Jan 2013 - 7:41 am | चित्रा

सध्याच्या कायद्याने काय साध्य होईल याची अनेकांना कल्पना नाही असे वाटते.

ही केस जमल्यास जरूर वाचावी असे सुचवते.
http://www.rediff.com/news/report/review-of-crucial-rape-murder-verdict-...

त्यातील न्यायाधीश श्री. गांगुली यांचे "The mood and temper of the public with regard to the treatment of crime and criminals is one of the unfailing tests of the civilization of any country. A calm, dispassionate, recognition of the rights of the accused .. mark and measure the stored-up strength of a nation, and are sign and proof of the living virtue in it." हे म्हणणे मला पटते.

अशा निर्घॄण गोष्टी घडून गेल्यानंतर आणि सुरुवातीचा संताप ओसरल्यानंतर नंतर आपण अशा व्यवहारास कायमचा पायबंद बसावा म्हणून काय करतो हे महत्त्वाचे आहे असे वाटते.
गुन्हेगारांना शिक्षा कडक आणि वेळच्यावेळी होणे महत्त्वाचे आहे असे वाटते.
दुसरे एक असे सुचते की भारतात अनेक लहान उद्योग आहेत, तसेच प्रायवेट कंपन्या बर्‍याच आहेत. अशा लहानमोठ्या तसेच सरकारी कंपन्यांमधून काम करणार्‍या स्त्री- आणि पुरुष कर्मचार्‍यांकडून होणारे गैरवर्तनाचे प्रसंग कमी करण्यासाठी कामाच्या निमित्ताने संबंध येणार्‍या इतर व्यक्तींशी सामान्य व्यवहार कसे करावे याचे काही ठराविक संस्थांकडून शिक्षण देणे बंधनकारक करता येईल. यामुळे बलात्कार थांबतील असे नाही, पण निदान त्याबद्दल जाणीव तयार होईल. काहीच नाही तर त्यातील काही लोकांकडून होऊ शकेल असे गैरवर्तन (अंगचटीला जाणे, सहेतुक स्पर्श, चाळे, अश्लील बोलणे) तरी काही प्रमाणात आटोक्यात येईल असे वाटते. बर्‍याचदा अशा प्रकारे लोकांना असे वाटत असते की त्यांना कोणी पाहत नाही.