प्रेमाची मंद मधुर आच

रविंद्र रुपन्'s picture
रविंद्र रुपन् in जनातलं, मनातलं
19 Dec 2012 - 9:43 pm

प्रेमाचा उन्माद नाही, नशा नाही. कसलेही अलंकरण नाही- शब्दात,स्वरात, चित्रीकरणात. कोठेही कसला देखावा नाही. काळजाला डंख करणारे दुःख नाही की तारुण्याची खूण पटविणारा उत्साह व जल्लोषही नाही. नायक, नायिकाही तसे पाहिले तर सिनेमातल्या हिरो-हिरोईन सारखे वाटत नाहीत. आपल्यातलेच एक असावेत, थोडे जास्त लोभस, पण आपल्यासारखेच. चालण्या-बोलण्यात, भावना व्यक्त करण्यात.एवढेच आहे की त्यांना जीवनात प्रेम लाभले आहे, म्हणून ते सुंदर दिसताहेत. ही त्यांच्या प्रेमाची सुरुवात आहे. मंद- मधुर हलकी हलकी आच त्यांच्या शरीर-मनाला उजाळा देते आहे.भडकणारे 'शोले'नाहीत हे.

वसंत ऋतूचे कोणी कितीही गोडवे गावू दे, भारतवर्षात वर्षा ऋतू हाच प्रेमाचा ऋतू आहे यात शंका नाही. ह्या विधानाला पुष्टी देणारे पुरावे ढिगांनी मिळतील. वृत्तपत्रात पुराच्या बातम्यांसोबत नेमाने झळकणारी पावसात भिजणाऱ्या प्रेमी युगुलांची प्रकाशचित्रे, एरवी रुक्ष बातम्या व लेख छापणाऱ्या नियतकालिकात प्रकाशित होणाऱ्या पावसाच्या कविता, गावोगावी कवी लोकांच्या तुडुंब गर्दीत साजरी होणारी कवी संमेलने ( ज्यात प्रामुख्याने प्रेम कविता ऐकविल्या जातात), आणि अर्थातच भारतीय सिनेमात हजारांनी मोजली जातील अशी वर्षा ऋतूतील प्रेमगीते-

पावसाच्या सरींसोबत स्मरणयात्रेला निघायचे म्हटले तर प्रत्येक रसिक अनोख्या वाटांवर विहरत अक्षरशः हरवून जाईल. बॉम्बे सिनेमातला पाऊस पडून गेल्यानंतरचा ओला समुद्रकिनारा आठवतो? गर्जणाऱ्या लाटा, हिरवा-शेवाळी साज ल्यालेल्या बुरुजाच्या काळ्या भिंती, उडू उडू पाहणाऱ्या छत्रीला सावरीत, होडीतून येणारी मनीषा कोईराला व तिचा बुरख्यातून डोकावणारा निरागस चेहरा. तिची वाट पाहणारा अरविंद स्वामी, हरिहरनचा आर्त आवाज.

तू ही रे, तू ही रे, तेरे बिना मै कैसे जियूं,
आ जा रे, आ जा रे, यूंही तडपा ना तू दिल को....
जान रे जान रे, इन सांसो में बस जा तू
चांद रे, चांद रे, आ जा दिल की जमीं पे तू.....

मुंबईचा धसमुसळा पाऊस पाहायचा तर तो मणीरत्नमच्या सिनेमातच पाहायला मिळेल असे कुठे आहे? सत्या व त्यानंतर आलेल्या कितीतरी सिनेमांनी जसे मुंबईचे अधोविश्व समाजापुढे आणले, तसेच हार्बर रेल्वेलगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाऊस कसा कोसळतो हेही प्रत्ययकारी पद्धतीने दाखविले. असा पाऊस कधी अंडरवर्ल्डच्या चकमकींचे नेपथ्य बनतो तर कधी गोविंदांच्या दहिहंड्यांवर कोसळतो. पण बहुतेक वेळी तो प्रेमी युगुलांमध्ये प्रेमाची चिनगारी भडकविण्यासाठी मात्र येतोच येतो.

मुंबईतला पाऊस चक्क गोड असू शकतो हे अनुभवायचे असेल तर मंजिल चित्रपटातील कवी योगेश ह्यांचे हे गीत ऐकायलाच हवे-

रिमझिम गिरे सावन
सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में
लगी कैसी ये अगन...

चक्क सुटाबुटातला लंबूटांग्या अमिताभ व ठेंगणी, साध्या साडीतली पण गोड दिसणारी मौसमी चॅटर्जी. मुंबईतली नेहमीच्या पाहण्यातली पण पावसात एकदम वेगळी भासणारी ठिकाणे. फोर्ट, नरिमन पॉइंट वगैरे. (त्या काळात मुंबईत एवढी गर्दी नव्हती. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर प्रेमी युगुलांची गर्दी होत नसावी.) ह्या गाण्याची लय, अमिताभ- मौसमीचा वावर ह्या सर्वांमध्ये एक साधा-सहज मोकळेपणा आहे.

पाउस पूर्वीही पडत होता, पण ‘असा’ नव्हता हा प्रेमात पडलेल्या साऱ्यांचा अनुभव. हे दोघेजण हे तर जाणतातच, परंतु त्याशिवायही ते इतके भावविभोर झाले आहेत, की जणू काही स्वप्नातच वावरत आहेत.

जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे
अरमाँ हमारे पलके न मूंदे
कैसे देखे सपने नयन, सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौंसम में,
लगे कैसे ये अगन---

पावसाने भडकणारी आग ही प्रतिमा सिनेमावाल्यांच्या चांगल्याच परिचयाची (व सोयीचीही. एरवी सालस दिसणाऱ्या नायिकेचे सेक्सी रूप पेश करायला ह्याहून चांगली संधी कोठून मिळणार?) पावसातले धांगडधिंगा गीत हे बहुदा हिंदी (किंवा भारतीय) चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे.
टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगायी
आग लगी पानी ने, दिल को तेरी याद आई
(आनंद बक्षी, मोहरा, १९९४)
हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी
तेरी दो टकियोंकी नौकरी में, मेरा लाखोंका सावन जाये रे
(वर्मा मलिक, रोटी, कपडा और मकान, १९७४)

ही गाणी सर्वांच्या परिचयाची आहेत. ह्याच भावाचे सर्वात लोकप्रिय गीत म्हणजे अमिताभ- स्मिताचे-

आज रपट जाये तो हमे ना उठयीयो
आज फिसल जाये तो हमे ना उठयीयो
हमे जो उठयीयो तो, हमे जो उठयीयो तो,
खुद भी रपट जईयो , खुद भी फिसल जईयो

(अनजान, नमक हलाल, १९८२)

दुसरा प्रकार आहे तो अधिक सूचक शृंगाराचा. त्यात पावसात भिजण्याची दृश्ये नसतात, पण भिजल्या नंतरच्या शेकोटीची किंवा अनोळखी जागी एकत्र येण्याबद्दलची दृश्ये असतात. बहुतेक वेळी ही गाणी त्या दृश्यांमुळे वा संगीत-स्वरांमुळे लक्षात रहातात; उदा: आराधना मधले 'रूप तेरा मस्ताना ' हे गीत.

खूप जुन्या, नर्म शृंगाराच्या किंवा विरह वेदनेच्या अर्थपूर्ण गाण्यांकडे वळण्या आधी एका आडवाटेवरच्या सिनेमातली जोड गाणी पाहू. ह्या गाण्यातील चमकदार मध्यवर्ती कल्पना तशी जुनी आहे. पण हिंदी सिनेमाच्या मानाने ती खरोखर काव्यमय आहे. चित्रपट आहे ' सबक'. शत्रुघ्न सिन्हा व पूनम यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे आजही अनेकांच्या स्मरणात आहे , ह्याचे कारण मुकेश. त्याच्या सदाबहार गाण्यापैकी हे एक. उषा खन्नाचे संगीत दिग्दर्शन व सावन कुमारची गीते एरवी विस्मरणात गेली असती. पण ह्या जोड गाण्यांनी त्यांची याद जागी ठेवली.

ह्यातला नायक वर्षादेवीला विनवितो आहे- 'वर्षाराणी, तू अगदी जोरात कोसळ. इतक्या जोरात की मला भेटायला आलेली माझी प्रिया बाहेर पडूच शकणार नाही. मग तिला माझ्यासोबत थांबायला काही सबब तरी मिळेल. ती आता आताच तर आली. पण आल्या आल्या लगेच निघण्याच्या गोष्टी ही करू लागली. म्हणून तू अगदी सर्व शक्तीनिशी कोसळ. म्हणजे काय होईल?.....

बरखा रानी, जरा जम के बरसो
मेरा दिलबर जा ना पाये,
झूम कर बरसो...

वो अभी तो आये है
कहते है हम जाये है
तू बरस, बरसो बरस,
वो उमर भर ना जाये रे...

ह्याचे जुळे गीत मात्र फार कमी जणांनी ऐकले असावे. आवाज आहे सुमन कल्याणपूर ह्यांचा. ह्या नायिकेला मात्र वर्षाराणी फारशी भावत नाही. कारण ती जोराने बरसू लागली की तिचा हिरो (आळशी, नाजूक, काय म्हणाल त्याला?) तिला भेटण्यासाठी येण्याचे टाळून सरळ घरीच राहतो. म्हणून तिला बरसात ही त्या दोघांच्या प्रेमात बिब्बा घालणाऱ्या वैरिणीसारखी वाटते. पण तरीही तिच्या विनवण्या करण्यापलीकडे बिचारी नायिका काय करू शकते?

बरखा बैरन जरा थम के बरसो
पी मेरे आ जाये तो
चाहे जम के तुम बरसो ...

पी से है मेरा मिलन
क्यू है रे तुझको जलन?
हाये रे पापन जरा रुक जा
जरा थम जा ना रे ...

गाण्यांची ही यादी कितीही वाढवता येईल. प्रत्येक व्यक्तीने तिच्या तरुणपणी ऐकलेले – पाहिलेले वर्षा गीत तिच्या भावविश्वाचा एक भाग बनून जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनपसंद वर्षागीतांची यादी ही न संपणारी असेल.

एकाहून एक उत्कृष्ट वर्षागीतांतून एकाचीच निवड करणे महाकठीण. पण शब्द,अर्थ,लय,स्वर व चित्रीकरण ह्या राऱ्या गोष्टी ज्यात जमून आल्या आहे,अशा श्रेष्ठ गाण्यांचा विचार आपण आज करणार आहोत.'लताच्या सर्वोत्तम गीतांत ज्याची गणना वारंवार केली जाते,असे हे गीत. चित्रपट आहे १९६० सालचा 'परख'. बिमल रॉयना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळबून देणारा हा चित्रपट त्यांच्या नेहमीच्या धाटणीच्या चित्रपटांपेक्षा काहीसा वेगळा आहे. लोकशाही व्यवस्थेवर व्यंगात्मक भाष्य करणारा, एका बंगाली खेड्याची कहाणी सांगणारा हा चित्रपट आज लाखों रसिकांच्या मनात रुजून आहे ह्याचे कारण ते गाणे.

चित्रपट अर्थातच कृष्ण-धवल आहे. गाणे सुरु होताच आपल्याला दिसते एक चंद्रमौळी घर. वाऱ्याच्या लहारीसोबत पावसाची सर येते व तिच्यावर वाहात येतो लताचा स्वर्गीय स्वर-

'ओ सजना, बरखा बहार आई
रस की फुहार लाई, अँखियों मे प्यार लाई - २
ओ सजना

तुमको पुकारे मेरे मन का पपिहरा - २
मीठी मीठी अगनी में, जले मोरा जियरा
ओ सजना ...

(ऐसी रिमझिम में ओ साजन, प्यासे प्यासे मेरे नयन
तेरे ही, ख्वाब में, खो गए ) - २
सांवली सलोनी घटा, जब जब छाई - २
अँखियों में रैना गई, निन्दिया न आई
ओ सजना ...
वारा आता जोराने वाहतोय. पावसानेही सुरासोबत जोर पकडला आहे. पावसाच्या धारा त्या झोपडीच्या छपरावरून घरंगळत खाली मातीत मिसळत आहेत. झाडाची विस्तीर्ण पाने वाऱ्यासोबत डुलत आहेत, पावसात निथळत आहेत. पावसाचे थेंब त्यांवर काहीसे विसावून मग खाली कोसळत आहेत. मधूनच विजा चमकतात. पण त्या कडाडत नाहीत. त्यांच्या चमकण्यामुळे सारा आसमंत क्षणभर उजळून निघतो. पावसाचे हे रूप रौद्र -भीषण नाही;आवेगी आहे. ती घरी एकटीच आहे. पण ह्या पावसामुळे तिला एकटे राहणे कठीण झाले आहे. ती बाहेर दरवाज्यात येउन उभी राहते. पागोळ्याची संतत धार लागली आहे. ती कोण आहे हे समजायला आपल्याला जरा वेळच लागतो. अरे ही तर साधना. पण ही साधना 'साधना कट'च्या युगा आधीची साधना आहे,तीही बिमल रॉयच्या चित्रपटातली. ती एक साधी साडी नेसली आहे. तिने अंगभर पदर घेतला आहे. माथ्यावरील कुंकवाशिवाय तिने कसलेही प्रसाधन केलेले नाही. तिने केस मोकळे सोडले आहेत. पावसाला पाहून तिच्या चित्तवृत्ती फुलून आल्या आहेत. ना राहवून ती आपल्या प्रियाला साद घालते,आळविते--

'हे सजणा, बघ ना, वर्षा ऋतूची बहार आली आहे. सगळीकडे चैतन्याची पखरण करणारा हा वर्षा ऋतू, डोळ्यात स्वप्ने भरून तो आला आहे आणि मुक्त हस्ताने त्या अमृतरसाची ,स्वप्नांची बरसात तो करतो आहे. माझ्या राजा, बघ ना, ऋतूंचा राजा आपल्या दारात उभा आहे'. (जवळच कुठे तरी तिचा प्रियकर हे दृश्य नजरेत साठवीत आहे.)

पावसाच्या आगमनामुळे माझ्या डोळयातली स्वप्ने फुलली आहेत. पण तुला माहित आहे का,मी कोणत्या पावसाची वाट पाहते आहे ते? माझे मन तर चातकासारखी फक्त तुझीच वाट पाहते आहे. तुलाच आळविते आहे,साद घालते आहे. ह्या पावसाच्या सोबत गार वारा वाहतोय, पण माझ्या शरीर-मनात मात्र कुठली तरी मंद-मधुर आग जळते आहे.

बाहेर अशी रिमझिम जेव्हा सुरु असते तेव्हा माझे डोळे मात्र तृषार्त असतात. त्यांना फक्त तुझी स्वप्ने पडतात. म्हणजे जागेपणी ते स्वप्न बघत असतात. रात्र भरात आहे, ,पाउस अजून जोशात आहे. बाहेरची रात्र शिणून माझ्या डोळ्यात जाउन बसली,पण झोपेला मात्र त्यात थारा मिळाला नाही.

सजना, बघ ना, पाउस कोसळतो आहे. वर्षाऋतू आला आहे. प्रेमाचा ऋतू आला आहे, अन अशात तू आहेस तरी कुठे? प्रेमरसाने ओसंडणारी ,डोळ्यात स्वप्ने घेउन आलेली बरसात आपल्याला साद घालते आहे. तू कुठे आहेस?

किती साधे गाणे! त्यात प्रेमाचा उन्माद नाही, नशा नाही. कसलेही अलंकरण नाही- शब्दात,स्वरात, चित्रीकरणात. कोठेही कसला देखावा नाही. काळजाला डंख करणारे दुःख नाही की तारुण्याची खूण पटविणारा उत्साह व जल्लोषही नाही. नायक, नायिकाही तसे पाहिले तर सिनेमातल्या हिरो-हिरोईन सारखे वाटत नाहीत. आपल्यातलेच एक असावेत, थोडे जास्त लोभस, पण आपल्यासारखेच. चालण्या-बोलण्यात, भावना व्यक्त करण्यात.एवढेच आहे की त्यांना जीवनात प्रेम लाभले आहे, म्हणून ते सुंदर दिसताहेत. ही त्यांच्या प्रेमाची सुरुवात आहे. मंद- मधुर हलकी हलकी आच त्यांच्या शरीर-मनाला उजाळा देते आहे.भडकणारे 'शोले'नाहीत हे.

हे गाणे ऐकले आणि शैलेन्द्रच्या प्रतिभेचे रहस्य कळाले. गीतकार साऱ्यामध्ये मिसळून जाणाऱ्या पाण्यासारखा असयला हवा. त्याने पात्राच्या भाषेत बोलायला हवे. चित्रपटाच्या, प्रसंगाच्या रंगात मिसळून जायला हवे. गंगा- ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन, कन्याकुमारीला जाणवणारे एकाकीपण, गिरसप्पाच्या प्रपाताची मनोहारिता ह्या सर्व सुंदर गोष्टी आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना करू नये. पण ह्या सौंदर्याचा आस्वाद घेतांना आपल्या झोपडीमागून पावसाळ्यात झुळू झुळू वाहणाऱ्या झऱ्याचे सौंदर्य टिपण्याची नजर मात्र आपण हरवून बसू नये.

खूप नाजूक,अलवार असे हे गाणे आहे, त्यातील सुरुवातीच्या सतारीच्या छोट्याशा तुकड्यासारखे. त्यातील पाऊस वाहून आणणारा ढगही अक्राळविक्राळ नाही, ती सावळी,सलोनी घटा आहे- सावळ्या सलोन्या प्रियकरासारखी.

लताचा आवाज निमिषार्धात टिपेला पोहचतो व तसाच खालीही उतरतो. पण तो एरवीच किती सहज सुंदर आहे हे समजण्यासाठी हे गाणे ऐकायला हवे.

खरे तर एवढी कारणे तरी कशाला सांगायला हवीत? प्रेमात पडायला,पावसात भिजायला आपल्याला कारण लागते?

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

एस's picture

19 Dec 2012 - 11:40 pm | एस

प्रेम कशाशी खातात ते माहीत नाही पण पावसात भिजणारी प्रेमीयुगुले पहायला व त्यांच्या प्रेमाला दाद द्यायला मनापासून आवडते. लगे रहो!!

बहुगुणी's picture

20 Dec 2012 - 1:49 am | बहुगुणी

अनेक आवडत्या गाण्यांच्या आठवणी जागवल्यात, धन्यवाद!

काही चटकन आठवलेली अशीच प्रेम-भिजली गाणी:

१९४२ लव्ह स्टोरी मधलं रिम झिम, रुम झुम रुम झुम

प्यार हुआ इकरार हुआ है

लतादीदींचं १९५१ च्या मल्हारमधलं गरजत बरसत भीजत आयो रे:

आणि याच गाण्याचं नंतर १९६० मध्ये रोशन यांच्याच दिग्दर्शनात सुमन कल्याणपुर-कमल बारोट यांनी गायलेलं गरजत बरसत सावन आयो रे हे रुप:
Garjat barsat saawan aayo re(Barsaat ki raat)

पहेली चित्रपटातलं सोना करे झिलमिल झिलमिल:

बाकी जशी आठवतील तशी...

धाग्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

किसन शिंदे's picture

20 Dec 2012 - 5:50 am | किसन शिंदे

पावसावरील गाण्यांचं अगदी नेमक्या शब्दात विश्लेषण केलंय.

लेख मनापासून आवडला.

सुहास..'s picture

20 Dec 2012 - 11:02 am | सुहास..

क्लास लेखन ! आवडले ,

आमच्या देवानंदाच्या गाण्याची ही एक आठवण झाली.

रिमझिम के तराने लेके आई बरसात
याद आयी हमको तुमसे पहली मुलाकात

लेखन आणि विषय दोन्ही छान :)

प्रचेतस's picture

20 Dec 2012 - 11:40 am | प्रचेतस

खूप छान लेखन.

चौकटराजा's picture

21 Dec 2012 - 6:19 am | चौकटराजा

हा धागा मस्त. यावरून एक आठवण आली . एकदा शिवाजीनगर ( पुणे) येथून चिंचवड मुक्कामी टू व्हीलर वऊन जात असताना पावसाने गाठले. रेनकोट नव्हता. त्रासाऐवजी भिजण्याचा मूड जमला. १४ किमी अंतर पार करीत असताना मराठी व हिंदीतील आठवतील तेवढी पावसाची गाणी म्हणत गेलो. अगदी रिमझिम पाउस पडे सारखा सारखे जुनेही त्यात व सोना ...रूपा. टिपर टापूर...ही.

पाउस कसाही असो .ती एक सुखद घटना वाट्ते. मग आठवते
ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी, कडाडे चपला होतसे वृष्टी
घालाया सृष्टीला मंगल स्नान , पूर अमृताचा सांडे वरून
- चित्रपट- प्रभात निर्मित कुंकू

म्हणून ते सुंदर दिसताहेत.

मस्त नजरिया आहे रविंद्रन! बहोत खुब!

'ओ सजना, बरखा बहार आई'

हे गाणे ऐकले आणि शैलेन्द्रच्या प्रतिभेचे रहस्य कळाले. गीतकार साऱ्यामध्ये मिसळून जाणाऱ्या पाण्यासारखा असयला हवा. त्याने पात्राच्या भाषेत बोलायला हवे.

एकदम सही!

गाण्याचं संगीत सलील चौधरींच आहे, तो महत्त्वाचा ऋणनिर्देश करतो.

इतक्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही मनाची जी तरलता शाबूत ठेवलीत त्याचं कौतुक.

रविंद्र रुपन्'s picture

27 Dec 2012 - 8:20 pm | रविंद्र रुपन्

"गाण्याचं संगीत सलील चौधरींच आहे, तो महत्त्वाचा ऋणनिर्देश करतो."
अतिशय महत्वाचा सन्दर्भ आहे. गाण्याच्या सौन्दर्यात त्यान्चा महत्वाचा वाटा आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

नेहमी सारख नाही जमल पण तरीही आवडल. तुम्ही एक एक गाण खुलवा रुपन.

प्रेम>वसंत >पावसावरची गाणे सुरवातीचे थोडेसे जमले नाही, पण आवडले. गाण्यांचे सिलेक्शन क्लास!

पैसा's picture

23 Dec 2012 - 8:44 am | पैसा

या भागात बर्‍याच गाण्यांवर लिहिलंत आणि वाचकांनीही आपापली भर घातली. माझ्याकडून माझ्या आवडत्या मदनमोहन आणि लताचा आणखी एक मास्टरपीस.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Dec 2012 - 1:52 am | निनाद मुक्काम प...

बहुतेक आवडती गाणी येथे नमूद झाली आहेत.
मला महेश भट ह्यांची तीन गाणी पावसावर आधारीत जाम आठवतात.
वेदना विरह ह्या भावना मांडण्यासाठी तसेस प्रेमाच्या भावना भट साहेबांना पावसाचा आधार लागतो त्यात गाण्याचे शब्द व सुमधुर संगीत प्रसंगात जान आणते,