गाणे गात रहा

हारुन शेख's picture
हारुन शेख in जे न देखे रवी...
4 Dec 2012 - 9:05 pm

लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील
हवे एक वचन तरी, गात तू रहाशील

प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण
रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण

भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी
जडावल्या पावलांनी चालत तू राही

अंती येशी किनार्याशी सुखावेल मन
पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण

क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी
साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी

सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर
खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर

पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद
गोंजारेल गाल वारा करुनिया नाद

शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी
सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी

खंत नको परतीच्या वाटेवर वेडी
शेवटचे स्वप्न आता निद्रा उरे थोडी

जागे होण्या नव्या जगी डोळे मिटून पहा
लागेल तेव्हा सूर तुझा गाणे गात रहा

कविता

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

4 Dec 2012 - 9:18 pm | सस्नेह

आर्त आशयघन कविता आवडली.

जाई.'s picture

4 Dec 2012 - 9:28 pm | जाई.

+१

सहमत

पैसा's picture

4 Dec 2012 - 9:53 pm | पैसा

पण वाचत गेले तशी "लागले नेत्र रे पैलतीरी" अशी काहीशी जाणीव होत राहिली.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2012 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा

लागेल तेव्हा सूर तुझा गाणे गात रहा >>> सुंदर........... मस्त एकदम :-)

वेगवेगळे विचार वेगवेगळ्या मीटरमधे फक्त यमक जुळवून लिहिलेत याला कविता म्हणत नाहीत

उत्तम कविता. बाकी प्रतिसाद पाहून वाटलं-

नाही पाडली दररोज
जिलेबी तिले म्हनू नही
नाही लिहिला वाकड्यात
त्याले प्रतिसाद म्हनू नही

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Dec 2012 - 9:56 am | श्री गावसेना प्रमुख

1
रोज नाही कधीतरी

परिकथेतील राजकुमार's picture

5 Dec 2012 - 10:00 am | परिकथेतील राजकुमार

पण हे कुठल्याश्या पद्याचे भाषांतर आहे का ?

वटवाघुळाला फक्त एकच पदार्थ माहितीये त्यामुळे त्याला कविता कळण्याची सुतराम शक्यता नाही.

:(

संजय काका यु आ सो रुड :( :-/

कट्टी :-/

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2012 - 10:38 pm | संजय क्षीरसागर

तुझी कट्टी कशाबदल आहे?

कवितेवरच्या अभिप्रायाबद्दल असेल तर कवितेला लय असणं नितांत आवश्यक आहे. शिवाय शब्दांच नादमाधुर्य बघणं तितकंच महत्त्वाचय. नाही तर गद्य आणि पद्य यात फरक तो काय?

उपप्रतिसादाबद्दल म्हणत असशिल तर मी कधी कुणाच्या वाटे जात नाही. पण कश्यातलं काही कळत नाही, विषय समजत नाही आणि प्रतिसाद देण्याची तर घाई. मी इथे आल्यापासून लेख लिहा की प्रतिसाद द्या यांच आपलं एकच चालूये. तुझी ओळख असेल तर ऐकतात का बघ.

जेनी...'s picture

5 Dec 2012 - 11:01 pm | जेनी...

संजय काका माझा भौराया आहे तो :(
मग तुमी त्याच्याशी प्रेमाने नाय बोललात म्हुण मला राग आला न. :-/
एक डाव माफ कराना काका तेला :(
कवितेत तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे ते सांगाना खानचच्चाना :-/
तुमाला जे पोचलं नसेल ते तेला पोचलं असल त ?? :-/

संजय काका कवितेत काय हवय नक्कि ?? ( वेरी सीरियुस क्वश्च्स्न हं ! )

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2012 - 11:56 pm | संजय क्षीरसागर

पहिली गोष्ट म्हणजे कवितेसाठी सॉलिड मूड यावा लागतो. ती एका उर्मीतनं येते. एका उत्कट अनुभवाची ती एकसंध अभिव्यक्ती असते. बसल्याबसल्या उगीच शब्दाला शब्द जुळवून वेगवेगळे विचार मांडण्याला अर्थ नाही.

दुसरं म्हणजे कवितेला लय आणि शब्दांना नादमाधुर्य हवं. संदीप खरे म्हणतो त्याला कविता चालीतच सुचते! हे चालीत सुचणं कवितेला लय आणि शब्दांना नाद देतं.

तिसरं म्हणजे कवितेला इंपॅक्ट हवा. कविता वाचल्यावर रसिक काय अर्थ असेल या ओळींचा ? असा विचार करत बसला तर उपयोग नाही. त्याच्या तोंडून सहज निघायला हवं `वा, क्या बात है!'

मला वाटतं उत्तम कवितांच मनःपूर्वक वाचन, लयीची समज यायला गाण्याची आवड आणि शब्दांवर प्रभुत्त्व यायला साहित्याचा अभ्यास हवा. हे सगळं झाल्यावर जगण्याचा कैफ आणि स्वतःचा अनुभव असला की कविता जमते.

श्रीरंग_जोशी's picture

6 Dec 2012 - 12:42 am | श्रीरंग_जोशी

हे विचार मांडून आपण माझ्या मनातील काही अव्यक्त प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत.

मला स्वतःबद्दल फार आश्चर्य वाटते की भाषा, संस्कृती, वाडमय यात मनापासून रस असताना मला काव्य या विषयाचे एवढे वावडे का? शालेय अभ्यासक्रमात अगदी पहिल्या वर्गापासून भाषा विषयांत कविता असायच्या. पण मला या प्रकारात अगदीच जुजबी रस वाटायचा अन अजूनही वाटतो.

गेल्या सात-आठ वर्षांत मराठी जाल विश्वात संचार करताना अनेकांना कवितांचा पाऊस पाडताना पाहून स्वतःविषयीची भावना अधिकच त्रासदायक व्हायची. इतरांप्रमाणे देवाने मला का कविहृदय दिले नाही? शाळेत असताना, निबंध लिहिणे, संदर्भासहित स्पष्टीकरण करणे, कल्पनाविस्तार करणे वगैरे शिकवले जायचे व परीक्षेतही त्यासंबंधीचे प्रश्न यायचे. पण कविता लिहिणे हे न अभ्यासक्रमात होते व न ते परीक्षेत यायचे. मग या मंडळींना हे कसे काय जमते बुवा? कवितेचे शिकवणीवर्ग सुद्धा कुठे पाहिले नाही.

हा प्रश्न इतरांसाठी क्षुल्लक असेल पण जसे झोपेचे महत्त्व झोप न येणाऱ्यांना, पैशाचे महत्त्व सदैव कडकी असणाऱ्यांना असते तसे काव्य लिहिता येण्याचे महत्त्व ते न लिहिता येणाऱ्या माझ्यासारख्यांनाच अधिक जाणवते.

संजय सरांशी , मी पूर्णतः सहमत आहे …
कविता म्हणजे पहिली भावना , नंतर शब्द ….नि त्यानंतर येणारा लय …
या सर्वांचे "perfect “ combination पाहिजे .
कवितेला सुद्धा रियाजाची गरज असते .. हे बहुतेक कवी विसरतात .

आपल्या कवितेचे विश्लेषण तटत्थ नि त्रयत्थ होऊन करणे देखील महत्वाचे .
संजय सरांनी शेवटी १ संदीप खरेचे मस्त उदाहरण दिले आहे .

बाकी हारून शेठ कवितेतले भाव १दम मस्त आहे बर का ???

Keep it up ani हो भावनांची कधी स्पर्धा होऊ शकत नाही …

आणि काही " फुटकळ " प्रतिसादाना " My foot : म्हणून उडवण्याची सवय अंगी बाळगणे महत्वाचे …

आभिप्रयात काही वावगे वाटल्यास क्षमस्व …

हारुन शेख's picture

6 Dec 2012 - 1:31 am | हारुन शेख

संजय क्षीरसागर आपल्याशी सहमत. प्रतिसादाच्या शेवटी लाखमोलाचं बोलला आहात. त्यातल्या त्यात जगण्याचा कैफ आणि उत्कट अनुभव यातून येणारी कविता खरी. मला आत्ता तशी लिहिता येत नाहीये. पण कधीतरी लिहिता यावी एकतरी असे फार वाटते.

स्पंदना's picture

6 Dec 2012 - 5:17 am | स्पंदना

हारुन शेख हार नका मानु.
जोक्स अपार्ट. कविता म्हणजे यमक जुळलच पाहिजे असा हट्ट नका धरु/ करु. तुमचे जे विचार आहेत , जे या कवितेत व्यक्त झालेत, ते काव्यात्मकच आहेत. पण एकदा कविता लिहिली की ती आपणच एकदा दोनदा फिरुन फिरुन वाचा. कविता उमटली पाहिजे. शिक्क्या सारखी ठासुन नका मारु तीला. उमटण म्हणजे जस आकाशात इंद्रधनुष्य उमटत तस. म्हणतीय मी. अन ज्या क्षणी अस काही उमटत, त्याला वेसन घालुन यमकात बसवण म्हणजे त्या विचारावरचा, कवीकल्पनेवरचा अत्याचारच. जशी असेल तशी लिहा. राहुद्या. मनात त्या ओळी आपसुक घोळत राहुद्या. अन बघा. आपोआप कविता रिफाईन होत जाइल.

तिमा's picture

6 Dec 2012 - 7:48 pm | तिमा

कवितेचा चांगला प्रयत्न. लिहित रहा. तुमचे मनातले विचार आणि सच्चा दिल, एक दिवस उत्तम कविता जन्माला घालेल.

दुसर्‍याच्या चांगल्याला मनापासनं दाद दिली तर ते गुण आपल्यात उतरतात. विषयातलं गम्य नाही, स्वतःच लेखन शून्य आणि एक ओळीचे भंपक प्रतिसाद देणारे काहीही साधू शकत नाहीत.

अपर्णानं म्हटलय

अन ज्या क्षणी अस काही उमटत, त्याला वेसन घालुन यमकात बसवण म्हणजे त्या विचारावरचा, कवीकल्पनेवरचा अत्याचारच.

तसं नाहीये. कविता नेहमी छंदबद्ध असते. कवितेचा मुखडाच लयीत प्रकट होतो. मग त्या मूडचा परिपोष करणारे अंतरे सुचत जातात आणि शेवटी कविता क्लायमॅक्सला येते. जोपर्यंत विचार लयबद्ध होत नाहीत, शब्दांवर हुकूमत येत नाही तोपर्यंत मनातला भाव उत्कटतेनं कवितेत उतरत नाही.

संदीपच्या या ओळी पाहा :

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो...१

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो....२

येतात उन्हे दाराशी
हिरमुसूनी जाती मागे
खिडकीशी थबकून वारा
तव गंधा वाचून जातो...३

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजूनी झालो
तुज वाचून उमगत जाते
तुज वाचून जन्मच अडतो...४

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघव वेळा
श्वासाविण हृदय जसे की
मी तसाच अगतिक होतो...५

याला म्हणतात लय, अनुभवाची उत्कटता आणि शब्दांवर हुकूमत!

कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे. छंदोबद्ध कविता गेयतेमुळे चट्कन अपील होते आणि मनावर ठसा उमटवते, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण, गेल्या शंभर-दीडशे वर्षांत बरीच मुक्तछंदात्मक कविता तयार झालेली आहे. तिथे यमक-गण-मात्रा इत्यादींची बंधने न पाळतासुद्धा आशयदृष्ट्या तितकीच परिणामकारक कविता झाल्याची कितितरी उदाहरणे देता येतील. विकी लिंक बघा-फ्री व्हर्स.

सर्वांत आधी यमकाबद्दल थोडेसे. इ.स.८००-१००० च्या आधी संस्कृतोद्भव भाषांत-मराठी, बंगाली, इ. साहित्यनिर्मिती नगण्य होती याबद्दल दुमत नसावे. कन्नड आणि तमिऴचा अपवाद वगळल्यास अखंड भारतात संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश या भाषात्रयीचे राज्य होते. आणि यांपैकी कुठल्याही भाषेत यमकाचे प्रमाण नगण्य आहे. संस्कृतपुरते बोलायचे झाले तर शंकराचार्यांची काही स्तोत्रे सयमक आहेत खरी, उदा.

अंगं गलितं पलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुञ्चति आशापिंडं||

पण तो अपवाद आहे. कालिदासाचे मेघदूत, रघुवंश, कुमारसंभव, व्यासांचे महाभारत, वाल्मिकींचे रामायण, आणि इतरही सदाबहार संस्कृत काव्यांत कुठे आहे यमक? तस्मात उत्तम काव्य हे यमकाविनादेखील करता येते.

आता उरला वृत्त-छंदादिकांचा मुद्दा. एकवेळ यमकाला झुगारणे सोपे आहे, परंतु वृत्त-छंदाला झुगारणे तुलनेने कठीण आहे. पण तशीदेखील कैक उदाहरणे देता येतील. जास्त लांब कशाला जा, कुसुमाग्रजांची ती फेमस कविता बघा.

ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.

इथे यमक आहे, पण वृत्त कुठेय? वरती प्रतिसादात एक मुद्दा आलाय, की

कविता नेहमी छंदबद्ध असते. कवितेचा मुखडाच लयीत प्रकट होतो. मग त्या मूडचा परिपोष करणारे अंतरे सुचत जातात आणि शेवटी कविता क्लायमॅक्सला येते. जोपर्यंत विचार लयबद्ध होत नाहीत, शब्दांवर हुकूमत येत नाही तोपर्यंत मनातला भाव उत्कटतेनं कवितेत उतरत नाही.

पहिल्या दोन वाक्यांशी अंशतः सहमत. पण वॉल्ट व्हिट्मनच्या कविता लय वैग्रे काही बंधने न पाळूनसुद्धा तितक्याच गाजलेल्या आहेत. अन्य उदाहरणे देखील देता येतील.

पण काव्य कशास म्हणावे? याबद्दल संस्कृत साहित्यिक-टीकाकार विश्वनाथ याचे एक वाक्य मला फार आवडते-

"वाक्यम् रसात्मकं काव्यम्|"

रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. हीच काव्याची खरी मिनिमॅलिस्टिक डेफिनिशन आहे, नेसेसरी आणि सफिशिअंट कंडिशन आहे. अन्य लयीची बंधने (माझ्या वैयक्तिक मते) तितकीशी अनावश्यक म्हणता येणार नाहीत, पण मूळ डेफिनिशन हीच. काव्य म्हणजे मिनिमम एखादे रसपूर्ण वाक्य असलेच पाहिजे.

प्रस्तुत कविता रसपूर्णतेच्या निकषावर उतरली असल्याने "काव्य" या संज्ञेस नक्कीच पात्र आहे याबद्दल मला तरी आजिबात संदेह नाही.

नावात्_काय्_आहे's picture

6 Dec 2012 - 12:18 pm | नावात्_काय्_आहे

खट्याक नि चपखल ..

मस्तचं.....

नुसतीच टीका करण्यापेक्षा मुद्देसूद विश्लेषण पटले.

प्रचेतस's picture

6 Dec 2012 - 12:21 pm | प्रचेतस

प्रतिसाद अतिशय आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 3:42 pm | अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन दी ग्रेट :-)

दिल की सारी बांतें कागज पर आ गई...
मुझसे बगैर पुछे ही,कविता हो गई...

ब्याटम्याना... उत्कॄष्ट प्रतिसाद रे...

ह भ प's picture

6 Dec 2012 - 4:11 pm | ह भ प

बॅटेश..!!
धुरळा.कॉम रे..

इनिगोय's picture

6 Dec 2012 - 9:39 pm | इनिगोय

उत्तम विवेचन रे बॅटमॅन. तुलनाच नाही!

बाकी विषयातलं "गम्य" दर्शवणारा, नुसतंच अमक्यातमक्याने अमकंतमकं म्हटल्याचे दाखले न देता दिलेला दीर्घ, अभ्यासपूर्ण आणि संतुलित असा हा प्रतिसाद अजूनही 'आपल्याला(च) सग्गळं कळतं' असं समजणार्‍यांच्या आवाक्याबाहेरचा असणार याची खात्री आहे!

ब्यात्म्यानाचा इजय सो

सबी गवाहो को मद्दे नजर रखते व्हुवे ....

हम इस नतिजे पर पौन्चे हय कि ....

भौराया आणि संजय काका दोघानीहि आपली मते परखड पणे मांडलियेत
त्याबद्दल दोघांचहि अभिनंदन .
कविता करताना निदान मी तरी शब्दात , वाक्यात .. त्यांच्या अर्थात कुठेतरि घुसुन
असते ,, यमक जुळवनं मला महत्वाचं वाटत नाहि ... तर माझ्यामते सुंदर शब्दांची सांगड
बसनं महत्वाचं .
मला मुक्तछंदातल्या कविता आवडतात .
थोडं एक्झाम्पल देते ... मार्गदर्शन मिळालं तर उत्तमच.

हळव्या जाईला एकदा विचारलं
तुझ्यात कुठुन गं एवढी अधिरता भरलिय ?
तर म्हणाली ... नाहि गं !
त्याचा स्पर्श होताच पाकळी आपोआप उमलु लागते ! ( फ्रॉम मी )

खालमुंड्या सूर्यफुलाला संध्याराणीनी विचारलं
तुझ्यात कुठुन रे एवढी विरक्ती शिरलिय?
तर म्हणाले ... नाही गं!
काळोखाचा स्पर्श होताच मान नकळत खाली जाते ! ( फ्रॉम मुकवाचक )

ढगा आडुन वारा जेव्हा
अव़खळ लिला करायचा
वेड्यागत चमेलीचा ताटवा
नुसता बघत उभा रहायचा
मग एकदा हटकुन तिला छेडलं
" इतकी कशी गं वेंधळी तु? "
तर म्हणाली ... नाहि गं !
वार्‍याच्या चाहुलिनच तनु मोहोरल्याचा भास होतो ... ( फ्रॉम मी )

सस्नेह's picture

6 Dec 2012 - 8:33 pm | सस्नेह

एक्झॅक्टली...!
काव्य कल्पनेत आहे...यमकात आणि छंदातच फक्त नव्हे...!

असं म्हणणं म्हणजे `गाणं लयीत नसेल तरी चालेल' म्हणण्यासारखं आहे! ते सर्वथा चूक आहे.

लय हाच तर गद्य आणि पद्यातला बेसिक फरक आहे.

आता मुक्तछंदाबद्दल तुम्ही म्हणताय :

पण, गेल्या शंभर-दीडशे वर्षांत बरीच मुक्तछंदात्मक कविता तयार झालेली आहे. तिथे यमक-गण-मात्रा इत्यादींची बंधने न पाळतासुद्धा आशयदृष्ट्या तितकीच परिणामकारक कविता झाल्याची कितितरी उदाहरणे देता येतील. विकी लिंक बघा-फ्री व्हर्स.

लिंक बघण्यापेक्षा इथे तुम्हाला पटलेली उदाहरणं द्या. तुमच्या लिंक्स वाचून त्यांच खंडण करण्याचं काम मी करत नाही.

एनी वे, तुमचं कन्क्लूजन आहे :

तस्मात उत्तम काव्य हे यमकाविनादेखील करता येते.

`यमक' हा गाण्यातल्या समेसारखा आहे. यमकाविना कविता म्हणजे `समेविना गाणं' असा अर्थ आहे त्यामुळे ते निरर्थक आहे.

पुढे तुम्ही अगम्य लिहिलय :

आता उरला वृत्त-छंदादिकांचा मुद्दा. एकवेळ यमकाला झुगारणे सोपे आहे, परंतु वृत्त-छंदाला झुगारणे तुलनेने कठीण आहे. पण तशीदेखील कैक उदाहरणे देता येतील

याचा अर्थ यमक नसले तरी छंद (किंवा लय अथवा वृत्त) नसलेली कविता असू शकते. आणि उदाहरण देऊन विचारलय `इथे यमक आहे, पण वृत्त कुठेय?' :

ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.

तुम्हाला बहुदा लय म्हणजेच वृत्त (अथवा छंद) ही कल्पना नाही.

या ओळी फक्त अश्या लिहिल्या की त्या लयबद्ध दिसतील (म्हणजे लय आहेच, फक्त ती लक्षात येईल)

ओळखलं का सर मला,
पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले
केसांवरती पाणी.

पुढे लिहिलय :

...पण वॉल्ट व्हिट्मनच्या कविता लय वैग्रे काही बंधने न पाळूनसुद्धा तितक्याच गाजलेल्या आहेत. अन्य उदाहरणे देखील देता येतील.

विषय मराठी कवितेचा आहे. तरीही लय आणि यमक अजिबात नसलेल्या कविता इथे द्या.

शेवटी तुम्ही कहर केलाय :

रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य.

रस निर्मितीसाठीच तर नादमय शब्द, लयबद्ध रचना आणि आवर्तनाची सम दर्शवणारं यमक हवं!

प्रस्तुत कविता रसपूर्णतेच्या निकषावर उतरली असल्याने "काव्य" या संज्ञेस नक्कीच पात्र आहे याबद्दल मला तरी आजिबात संदेह नाही.

वॉट अ ज्योक! तुमच्या रस निर्मितीच्या कल्पनेला काही एक आधार नाही. स्वतः कवि म्हणतोय

संजय क्षीरसागर आपल्याशी सहमत

त्यामुळे कवितेतल्या उणीवा दाखवून मी त्यांना पुन्हा नाउमेद करू इच्छित नाही.

तुम्ही स्वतःची किंवा इतर कोणतिही मराठी कविता जी लय आणि यमकविरहित आहे ती इथे द्या आणि त्यातून रसनिर्मिती कशी झाली आहे ते दाखवून द्या.

मराठे's picture

7 Dec 2012 - 12:24 am | मराठे

कविता आणि गाणं (पद) यात तुमच्या दृष्टीने काय फरक आहे?

वॉल्ट व्हिट्मनची ही कविता बघावी. लिंक न पाहता शेरेबाजी करण्याचे कष्ट मी वाचवतो.

A child said, What is the grass? fetching it to me with full
hands;
How could I answer the child?. . . .I do not know what it
is any more than he.

I guess it must be the flag of my disposition, out of hopeful
green stuff woven.

Or I guess it is the handkerchief of the Lord,
A scented gift and remembrancer designedly dropped,
Bearing the owner's name someway in the corners, that we
may see and remark, and say Whose?

Or I guess the grass is itself a child. . . .the produced babe
of the vegetation.

Or I guess it is a uniform hieroglyphic,
And it means, Sprouting alike in broad zones and narrow
zones,
Growing among black folks as among white,
Kanuck, Tuckahoe, Congressman, Cuff, I give them the
same, I receive them the same.

And now it seems to me the beautiful uncut hair of graves.

Tenderly will I use you curling grass,
It may be you transpire from the breasts of young men,
It may be if I had known them I would have loved them;
It may be you are from old people and from women, and
from offspring taken soon out of their mother's laps,
And here you are the mother's laps.

This grass is very dark to be from the white heads of old
mothers,
Darker than the colorless beards of old men,
Dark to come from under the faint red roofs of mouths.

O I perceive after all so many uttering tongues!
And I perceive they do not come from the roofs of mouths
for nothing.

I wish I could translate the hints about the dead young men
and women,
And the hints about old men and mothers, and the offspring
taken soon out of their laps.

What do you think has become of the young and old men?
What do you think has become of the women and
children?

They are alive and well somewhere;
The smallest sprouts show there is really no death,
And if ever there was it led forward life, and does not wait
at the end to arrest it,
And ceased the moment life appeared.

All goes onward and outward. . . .and nothing collapses,
And to die is different from what any one supposed, and
luckier.

इथे यमक नाही, गण-मात्रांचे बंधन नाही. तरी रसनिष्पत्ति होतेच. आता याची चिकित्सा नंतरच्या प्रतिसादात करेन. तूर्त बाकीचे मुद्दे:

यमक' हा गाण्यातल्या समेसारखा आहे. यमकाविना कविता म्हणजे `समेविना गाणं' असा अर्थ आहे त्यामुळे ते निरर्थक आहे.

अधोरेखित वाक्याला आधार काय? की नुसतेच स्वमत? तुमच्या मताप्रमाणे संस्कृत काव्य निरर्थकच ठरेल-निव्वळ निर्यमक असल्यामुळे, नाही का? कालिदासाच्या मेघदूतातील

"तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिंबाधरोष्ठी
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणानिम्ननाभि:
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्याम्
या तत्र स्यात् युवतिविषया सृष्टिराद्येव धातु:"

हे यक्षपत्नीचे अप्रतिम वर्णन, ज्यातून शृंगाररस ओसंडून वाहतोय, ते निरर्थकच आहे नैका? यमक नाही म्हणून?

विषय मराठी कवितेचा आहे. तरीही लय आणि यमक अजिबात नसलेल्या कविता इथे द्या.

का? नाही, म्हणजे मराठी कविताच का? अन्य भाषांतील कविता दिल्याने नेमके काय बिघडते?

रस निर्मितीसाठीच तर नादमय शब्द, लयबद्ध रचना आणि आवर्तनाची सम दर्शवणारं यमक हवं!

का? तुम्ही म्हणता म्हणून? पुन्हा एकदा, संस्कृत काव्याचा ढीगभर पसारा बघा, तुमच्या विधानाचा फोलपणा लगेच लक्षात येईल. भगवद्गीतेसारख्या अप्रतिम काव्यग्रंथात कुठेय यमक???? मेघदूतात कुठेय यमक? त्या यमकाचे विनाकारण स्तोम माजवण्यात काही अर्थ नाही. मराठीतली बहुतांश काव्यनिर्मिती यमकबद्ध आहे याचा अर्थ ते इन्डिस्पेन्सिबल आजिबात नाही. जर मराठीसदृश अन्य भाषांमधील काव्य पाहिले तरच हे लक्षात येते, नाहीतर एकच एक घेऊन बसले की वेगळे यापेक्षा काही असू शकेल या कल्पनेची रिसेप्टिव्हिटी संपते.

वॉट अ ज्योक! तुमच्या रस निर्मितीच्या कल्पनेला काही एक आधार नाही.

मी स्वतः आधार दिलाय संस्कृत ग्रंथ साहित्यदर्पण याचे लेखक कविराज विश्वनाथ याचा आणि तरी तुम्ही म्हणताय आधार नाही!! एकतर तुम्ही प्रतिसाद नीट नाही वाचला किंवा विश्वनाथाचे म्हणणे चूक आहे असे वाटतेय. जर विश्वनाथ चूक आहे तर का आणि कसे ते सांगा- सप्रमाण, निव्वळ स्वमताच्या दृढ रोपणाने काही साध्य होणार नाही.

तुम्ही स्वतःची किंवा इतर कोणतिही मराठी कविता जी लय आणि यमकविरहित आहे ती इथे द्या आणि त्यातून रसनिर्मिती कशी झाली आहे ते दाखवून द्या.

मी सुरुवातीस उद्धृत केलेली कविता रसपूर्ण आहे. हे विधान माझ्यासाठी जवळपास स्वयंसिद्ध आहे, पण तरी सांगतो, त्याचे विवेचन लिहिण्यास मला जरा वेळ लागेल, तोपर्यंत जर इच्छा असेल तर त्या कवितेची लक्तरे काढावीत खुशाल. मी काहीतरी लिहिणार, परत तुमचे रसग्रहण वेगळ्या अँगलने जाणार, एखाद्या शब्दाच्या अर्थासाठी विनामतलब, निव्वळ स्वमते प्रतिष्ठापिणारी वादावादी होणार, त्यापेक्षा तुम्ही उपरोल्लेखित कवितेतून रसनिर्मिती कशी काय होत नाही ते सांगा, त्याच्या आधी रस म्हणजे काय तेही स्पष्ट करा. संज्ञांच्या व्याख्या एकदा स्पष्ट झाल्या की निम्मा वाद तिथेच संपतो- हे वादातील दोन्ही पक्षांच्या फायद्यासाठी सांगतोय.

सरतेशेवटी हे वाक्य

तुम्हाला बहुदा लय म्हणजेच वृत्त (अथवा छंद) ही कल्पना नाही.

तुमच्या प्रतिसादातले कदाचित एकमेव सेन्सिबल वाक्य. एक प्रश्न आहे- ही जी लय आहे ती गेयतेशी संबंधित आहे का? आपल्या गद्य बोलण्यालादेखील एक लय असतेच, पण स्पेसिफिकली गाण्याशी संबंधित लय असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास मी सहमत नाही. इथे साहित्यासारख्या गोष्टींत अटळ असलेल्या सब्जेक्टिव्हिटीमुळे शेवटी तुमचे मत तुम्हाला, माझे मला. हे केवळ मतप्रवाह आहेत, यांपैकी इंट्रिन्सिकलि कोणताही मतप्रवाह अधिक बरोबर वा चूक नाही.

प्रथम `रस' म्हणजे काय ते लक्षात घ्या.

संदीपची मी वर दिलेली कविता पाहा. एका क्षणात ती रसिकाच्या मनाचा ठाव घेते आणि उत्तरोत्तर विरह भावनेचा परिपोष करत जाते. कोणतिही संवेदनाशिल व्यक्ती नुसती कविता वाचून भावविभोर होते. गाण्याचा इंपॅक्ट तर निव्वळ लाजवाब आहे. कुणाच्याही तोंडून नकळत दाद येते, `वा, क्या बात है!' याला रसनिष्पती म्हणतात.

तुम्ही व्हिट्मनची दिलेली कविता म्हणजे मुक्तछंदात मांडलेल्या गद्य कल्पना आहेत.

ज्या कालिदास, भगवद्गीता वगैरेच्या गोष्टी केल्यात ती `महाकाव्य' वगैरे असतील पण त्या `कविता' नक्कीच नाहीत.

टू बी वेरी फ्रँक, मला साध्या सोप्या कवितेशी जी सामान्य माणूस आपल्या उत्कट भावनांची अभिव्यक्ती म्हणून करू शकेल कर्तव्य आहे, महाकाव्याशी नाही.

याचा अर्थ मला भगवद्गीतेची प्रतिभा मान्य नाही असा नाही. माझं इतकंच म्हणणय की त्या श्लोकात लयबद्धता असली तरी ती कविता नाही.

दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट :

...तोपर्यंत जर इच्छा असेल तर त्या कवितेची लक्तरे काढावीत खुशाल.

मला अश्या कामात स्वारस्य नाही.

माझ्या मते जीवनात जे जे सौंदर्यपूर्ण आहे ते सहज आहे आणि ते इतकं चटकन भावतं की विश्लेषणाची गरज उरत नाही.

वॉट अ ज्योक! तुमच्या रस निर्मितीच्या कल्पनेला काही एक आधार नाही

यावर तुम्ही म्हणताय :

मी स्वतः आधार दिलाय संस्कृत ग्रंथ साहित्यदर्पण याचे लेखक कविराज विश्वनाथ याचा

आणि त्याचं विधान आहे `रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य!'

ही व्याख्या मान्य केली तर `शिवाजीराव भोसल्यांची पल्लेदार वाक्य म्हणजे कविता' असं म्हणावं लागेल आणि त्यांचं संपूर्ण भाषण म्हणजे `महाकाव्य' होईल!

तुमची बेसिक चूक बहुदा तुमच्या लक्षात येत नाहीये. ती भाषणं रसनिर्मिती करतात पण ते गद्य आहे पद्य नाही आणि चर्चा कवितेची आहे.

रस म्हणजे काय ते मी संदीपच्या कवितेनं सदोहारण विशद केलय त्यामुळे तो मुद्दा परत घेत नाही. तरीही तुमच्या कवितेसंदर्भात रसनिष्पत्तीच्या काय कल्पना आहेत ते लिहा म्हणजे बघू.

कमींग टू द एंड :

आपल्या गद्य बोलण्यालादेखील एक लय असतेच, पण स्पेसिफिकली गाण्याशी संबंधित लय असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास मी सहमत नाही.

लयीचा अर्थ समान कालावधीमुळे येणारी वारंवारिता. या वारंवारितेत अंतर्भूत असलेला पॅटर्न. आणि त्या बरोबर येणार्‍या नादमय आणि चित्रदर्शी शब्दयोजनेमुळे निर्माण होणारा इंपॅक्ट किंवा रसनिष्पत्ती.

`एकदा लय अंगवळणी पडली आणि शब्दांवर हुकूमत आली की कविता करणं अवघड नाही पण तिची आशयघनता मात्र कविच्या संवेदनाशिलता आणि अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते' असं ग्रेससारखा दिग्गज म्हणतो त्याच्या पुढे आपण काय बोलणार?

बॅटमॅन's picture

7 Dec 2012 - 12:44 pm | बॅटमॅन

ज्या कालिदास, भगवद्गीता वगैरेच्या गोष्टी केल्यात ती `महाकाव्य' वगैरे असतील पण त्या `कविता' नक्कीच नाहीत.

टू बी वेरी फ्रँक, मला साध्या सोप्या कवितेशी जी सामान्य माणूस आपल्या उत्कट भावनांची अभिव्यक्ती म्हणून करू शकेल कर्तव्य आहे, महाकाव्याशी नाही.

याचा अर्थ मला भगवद्गीतेची प्रतिभा मान्य नाही असा नाही. माझं इतकंच म्हणणय की त्या श्लोकात लयबद्धता असली तरी ती कविता नाही.

या तीन वाक्यांचा अर्थ इतकाच की कविता म्हणजे काय, याची तुम्ही तुमच्या मते एक डेफिनिशन केलेली आहे आणि तिला काउंटरएग्झांपल मिळाले तरी तुम्ही लक्ष देत नाही आहात तिकडे. कारण तुमच्या मते कवितेत जी लय, इ.इ. असणे गरजेचे आहे, ते सर्व काही उपरोल्लेखित साहित्यात आहे. त्यामुळे माझ्याच काय, तुमच्या व्याख्येप्रमाणेदेखील ती कविताच आहे. ते सर्व साहित्य श्लोकबद्ध आहे, अनेक वृत्तबद्ध आहे, प्रत्येक वृत्ताला स्वतःची वेगळी चाल आहे. तुमची-माझी प्रथम भाषा मराठी असल्याने त्यातील सौंदर्याचा इंपॅक्ट आपल्यावर कदाचित तितका होणार नाही, पण संस्कृत भाषा जेव्हा भारतात बर्‍यापैकी प्रचलित होती, तेव्हा लोकांना समजायला अवघड गेले असावे असे नाही वाटत. बाकी महाकाव्य विरुद्ध साधी कविता म्हणायचे असेल तर संस्कृत स्तोत्रे पहा- साधी, ठाव घेणारी भाषा, आटोपशीर पसारा यांतच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक दडले आहे. ती उत्तम कविता आहे.

रस म्हणजे काय ते मी संदीपच्या कवितेनं सदोहारण विशद केलय त्यामुळे तो मुद्दा परत घेत नाही. तरीही तुमच्या कवितेसंदर्भात रसनिष्पत्तीच्या काय कल्पना आहेत ते लिहा म्हणजे बघू.

बरं. आता माझ्या मते गद्य आणि पद्य रसनिष्पत्ति यांत फरक लयीचा आहेच, पण ही लय म्हणजे तुम्ही म्हणता तीच आहे असे मला वाटत नाही. एखादी कविता (तुमच्या अर्थाने नव्हे) गाता आली नाही, तरी तिच्यापासून रसनिर्मिती होते, मग गद्यापासून फार उल्लेखनीय फरक पडतो का? जपानी हायकू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. फक्त तीन ओळी, त्यादेखील गेयता वगैरेंचा घंटा विचार न करता फक्त आशयावर लक्ष केंद्रित करून लिहिलेल्या. मग त्यातील रसनिर्मिती आणि गद्य रसनिर्मिती यांत फरक नाही असं म्हणायचं आहे का?

`एकदा लय अंगवळणी पडली आणि शब्दांवर हुकूमत आली की कविता करणं अवघड नाही पण तिची आशयघनता मात्र कविच्या संवेदनाशिलता आणि अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते' असं ग्रेससारखा दिग्गज म्हणतो त्याच्या पुढे आपण काय बोलणार?

पण इथे कविता अशीच असावी, तशीच नसावी, असे कुठे म्हणतोय ग्रेस? लय ही गेयतेशी निगडित असावी असा सूर कुठे ध्वनित होतोय? त्याने जनरल पॉईंटर्स मांडलेत, त्यांच्याशी असहमत होण्याचे काही कारण दिसत नाही. आणि कवितेच्या एकूण रूपाबद्दल स्वतः केशवसुतच म्हणतात-

अशी असावी कविता फिरून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहात मोठे, पुसतो तुम्हाला?

आता ही कविता वृत्त-यमक-बद्ध असल्याने काही सिद्ध होत नाही. मी फक्त केशवसुतांचा पॉईंट मांडला इतकेच.

आबा's picture

7 Dec 2012 - 7:23 pm | आबा

मराठी मधल्या मुक्तछंदामधल्या आणि वृत्तबद्ध नसलेल्या कवितांची चटकन आठवणारी एक-दोन उदाहरणे (त्या कविता नाहित असं म्हणण्याची माझी हिम्मत नाही)...
नामदेव ढसाळांची "आमच्या आळीतून जाताना" ही कविता

हे महाग्यानी लोक,
हिंडताहेत मशाली घेऊन
गल्लीबोळातून-आळीआळीतून
जिथे उंदीर उपाशी मरतो,
त्या आमच्या खोपटांतील काळोख म्हणे यांना कळतो;
पाणचट गवशी सारखे हेही एक थेर...
ज्यांना आपल्या गांडीखालचा अंधार कळत नाही,
त्यांनी पेटलेल्या माणसांना छप्पन्न टिकली बहुचकपणा;
अजूनही दाखवावा!
अरे धूर्तांनो,
ज्यांना तुमची नसननस कळलिये,
त्यांच्याशी तरी इमान राखा...
आणि ज्यांना उजेड दिसत नसेल,
त्यांना मशाली खुशाल दाखवा;
आमची ना नाही!
मात्र एक,
आमच्या आळीतून जाताना,
त्या विझवूनच पुढे जा
आज आम्हाला या खोपटा-खोपटा मधून,
पूर्ण सूर्य दिसतोय!

ढसाळांच्या बर्‍याच कविता मुक्तछंदामध्येच आहेत, तसेच नारायण सुर्व्यांच्या सुद्धा
आणखी एक उदाहरण म्हणजे बाबा आमटेंच्या "ज्वाला आणी फुले" कवितासंग्रह त्यातल्या १-२ सोडता बाकिच्या सगळ्या कविता मुक्तछंदातच आहेत...

मस्त हो आबा, ढसाळ आणि तत्सम कवींचे उदाहरण मी विसरलोच होतो. धन्यवाद :)

आता तू विचारलयस म्हणून योर पॉइंट.. (तू लाईटली घेशिल या अपेक्षनं)

मला मुक्तछंदातल्या कविता आवडतात .

मेव्यानं `मी ही कवि होणार' ` मधे म्हटलय

छंद नको मज, नकोत वृत्ते
अलंकारही नकोत भलते
गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि
मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार!

त्याला नक्की काय म्हणायचय ते, तू लिहिलेलं असं वाचलं की लक्षात येईल :

हळव्या जाईला एकदा विचारलं तुझ्यात कुठुन गं एवढी अधिरता भरलिय ? तर म्हणाली ... नाहि गं! त्याचा स्पर्श होताच पाकळी आपोआप उमलु लागते.

तुला तुझं लेखन (किंवा कल्पना) कविता वाटते कारण पुढे `लागते' ला `जाते' ! असा यमक जुळवलाय.
ऑन इटस ओन ती गद्यात लिहिलेली कल्पना आहे.

पुढे जे काय लिहिलयस ती पण गद्य कल्पना एंटर मारून पद्य केली आहे आणि तिथे तर यमकपण जुळत नाही त्यामुळे ते `एक वेगळं वाक्य' झालंय.

ढगा आडुन वारा जेव्हा अव़खळ लिला करायचा
वेड्यागत चमेलीचा ताटवा नुसता बघत उभा रहायचा

(इथे यमकामुळे कवितेचा भास होतो पण पुढे सरळ वाक्य आहे)

मग एकदा हटकुन तिला छेडलं " इतकी कशी गं वेंधळी तु? "तर म्हणाली ... नाहि गं !वार्‍याच्या चाहुलिनच तनु मोहोरल्याचा भास होतो

जेनी...'s picture

7 Dec 2012 - 12:46 am | जेनी...

:( :-/

मस्त प्रश्न आहे.

कविता म्हणजे माझ्या दृष्टीनं चाल न लावलेलं गाणं आहे!

( माझं सर्व म्हणणं मला खरं तर या एका वाक्यात मांडायच होतं, तुमच्या प्रतिसादामुळे संधी मिळाली, धन्यवाद!)

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2012 - 8:30 am | नगरीनिरंजन

कविता आवडली.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2012 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

ओ संजयशेठ तुमचे प्रतिसाद वाचण्याच्या नादात आमच्या माऊसचा स्क्रोल मोडला बघा. ;) आणि डोक्यात उजेड पडला नाही तो नाहीच.

बाकी वाचता वाचताच जी गुणगुणली जाते आणि कवितेतले शून्य कळत असताना देखील खाडकन कीबोर्ड पुढे ओढून दाद दिली जाते ती आमच्या दृष्टीने कविता.

बाकी वाचता वाचताच जी गुणगुणली जाते आणि कवितेतले शून्य कळत असताना देखील खाडकन कीबोर्ड पुढे ओढून दाद दिली जाते ती आमच्या दृष्टीने कविता.
>>>> +१११११ सहमत.....

संक्षीजी आणि बॅटमॅन दोघांना धन्यवाद, खुप छान चर्चा पार अगदी त्या रविकिरण मंडळ वगैरे होतं ना तसलं काहीतरी वाटलं, त्यातल्या त्यात बॅटमॅनचे मुद्धे जास्त पटत गेले कवितेबद्दल.

पण शेवटी परांना +१००, एकुण या सगळ्याचं सार काय, हे कुणी साध्या मराठीत सांगेल काय ?

आणि हो, काही ठिकाणी चर्चा थोडीशी वैयक्तिक झाल्याचं जाणवलं, ते नको होतं व्हायला, असो.

ज्ञानराम's picture

7 Dec 2012 - 2:45 pm | ज्ञानराम

५० जी - ते गुण नाहीत काय , मी त्यांच्या वाक्याशी +१११११ % सहमत आहे अस लिहीलय , कारण त्यांनी एका शब्दात काय ते योग्य उत्तर दिलंय.
बाकी वरती झालेल्या चर्चे बाबत आपल्याला काहीच म्हणायचे नाही बुवा..!!!:;)

कारण आहेत.

बाकी वाचता वाचताच जी गुणगुणली जाते आणि कवितेतले शून्य कळत असताना देखील खाडकन कीबोर्ड पुढे ओढून दाद दिली जाते ती आमच्या दृष्टीने कविता.

हे गुणगुणलं जाणं म्हणजे लय आणि दाद देणं म्हणजे रसनिष्पत्ती.

हेच मी एका वाक्यात लिहिलं होतं `कविता म्हणजे चाल न लावलेलं गाणं'

आता इथे चर्चा क्लिष्ट कुणी केलीये ते पाहा म्हणजे झालं.

गवि's picture

11 Dec 2012 - 5:52 pm | गवि

अहो संक्षी.. मीही इथे:

http://www.misalpav.com/node/15308

एक कविता लिहिली होती फार पूर्वी. लयीतही आहे हो. पण तरीही लोकांनी प्रतिसाद न देऊन ती अशी काय पाडली म्हणता की तेव्हापासून प्यारेच लिहीतो.. (प्यारे१ नव्हे, मीच, परिच्छेदरुपात लिहीतो अशा अर्थाने) ... ;)

लिहिता येतं पाहा.

बालकविंची औदुंबर!

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दि पुढे

पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळया डोहाकडे

झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

याला म्हणतात लय, नादमय शब्द रचना आणि इंपॅक्ट!

राही's picture

7 Dec 2012 - 8:42 pm | राही

कवि अनिलांनी मराठीत मुक्तछंद आणला त्याला आज साठ सत्तर वर्षे होऊन गेली.तेव्हापासून आजपर्यंत मराठीतल्या बहुसंख्य कविता या मुक्तछंदातल्याच आहेत.अगदी मर्ढेकर,विंदा,पाडगावकर(नंतरचे)पासून काळसेकर,रजनी परुळेकर,ढसाळ,सुर्वे,जोगळेकर,दिवटे,तिळवे,नीरजा,प्रज्ञा,उषा मेहतांपर्यंत. यातल्या कित्येकांच्या पुस्तकांना काव्य या साहित्यप्रकारामध्ये अनेक सरकारी आणि गैरसरकारी बक्षिसे,पुरस्कार मिळालेले आहेत. ही निवड करताना कोणीच या साहित्याचे काव्यपण नाकारलेले नाही.

५० फक्त's picture

7 Dec 2012 - 9:36 pm | ५० फक्त

हिम्मत असेल तर करा रसग्रहण अन लावा वृत्तं..

जळतोय
पळतोय
गिळतोय
मळतोय
जुळतोय
ढळतोय
कळतोय
छळतोय
फ़ळतोय
बरळतोय
हळहळतोय
वळवळतोय
जळफ़ळतोय
कळवळतोय
सळसळतोय
मळ्मळतोय
हुश्श; झाली कविता
सगळ्या ग्रुप्स वर टाकायला आता
तळमळतोय!

--
कवि - श्री. उमेश कोठिकर.

बॅटमॅन's picture

7 Dec 2012 - 9:56 pm | बॅटमॅन

कथिन आहे.

अखंड बद्धकोष्ठीकर.

प्रचेतस's picture

7 Dec 2012 - 9:59 pm | प्रचेतस

कथिन आहे का कुथून आहे?

- कवी कुंथलगिरीकर

बॅटमॅन's picture

8 Dec 2012 - 1:38 am | बॅटमॅन

कथिन अहे अस मल वातत.

-कवी बॅटेश्चंद्रा दोशी ( कविता: कोकलाया ऊर्ध्व दिश्या)

वाचण्यासारखी आहे मुक्तछंद म्हणजे नक्की काय?

विषेशत: मिकाचा हा प्रतिसाद आणि हे कन्क्लूजन :

...पण तरीही त्या कवितेच्या अर्थाच्या दृष्टीने ते तिथे तसेच हवे आहे. तर हि फारकत त्या कवितेला अर्थाची जोड देऊनही त्या रचनेची गेयता आणि लय कायम ठेवते आहे.

आणि माझा इथे दिलेला पहिला प्रतिसाद :

...कवितेवरच्या अभिप्रायाबद्दल असेल तर कवितेला लय असणं नितांत आवश्यक आहे. शिवाय शब्दांच नादमाधुर्य बघणं तितकंच महत्त्वाचय. नाही तर गद्य आणि पद्य यात फरक तो काय?

आता मजा म्हणजे बॅटमॅन स्वतःचा स्टँड बदलायला लागलेत :

पहिला प्रतिसाद :

कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे

आताचे प्रतिसाद :

बरं. आता माझ्या मते गद्य आणि पद्य रसनिष्पत्ति यांत फरक लयीचा आहेच..

मग त्यातील रसनिर्मिती आणि गद्य रसनिर्मिती यांत फरक नाही असं म्हणायचं आहे का?

लय ही गेयतेशी निगडित असावी असा सूर कुठे ध्वनित होतोय?

तुम्हाला गद्य आणि पद्य यातला फरकच कळत नसेल किंवा लयबद्धता म्हणजे काय ते समजत नसेल तर चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाही.

हारुन शेख's picture

7 Dec 2012 - 11:35 pm | हारुन शेख

संजयजी आता बास करा राव. उत्तम चर्चा करून झाली आहे आणि प्रकार खाजवून खरुज काढण्याकडे वळतोय आता. उगाच धाग्याची गाझापट्टी करू नका. प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.

मोदक's picture

8 Dec 2012 - 1:19 am | मोदक

खल्लास...! :-)

उगाच धाग्याची गाझापट्टी करू नका.

भिडलं!!!!

बॅटमॅन's picture

8 Dec 2012 - 12:54 am | बॅटमॅन

ती चर्चा मी वाचलीये, लय म्हणजे गेयतेशी निगडितच असावी असे नाही हेही सांगून झालंय, पण तुमचं आपलं एकच. शिवाय हायकू हा काव्यप्रकार तुमच्या समीकरणांत बसत नाही, त्याला डावललेत बरे?

असो. तुमच्या व्याख्या मी सरसकट स्वीकाराव्यात हा तुमचा आग्रह मला मान्य नाही, सबब या चर्चेत आता अर्थ उरलेला नाही.

दादा कोंडके's picture

8 Dec 2012 - 1:33 am | दादा कोंडके

वास्तविक तुमच्यात मतभेद असले तरी तुमची चर्चा आमच्या सारख्यांना वाचनिय झालिय. आणि तुमचे मुद्दे लॉगिकली बरोबर असले आणी पटलेदेखिल असले तरीही, मला स्वतःला संजय यांच्यासारखंच कवितेची डेफिनिशन संकुचित असलेलीच आवडेल (पण तशी नाही हे मान्य). आणि कवितेला सिरीयस घेणार्‍या कवींनी/कवयत्रींनी सध्या एका क्लिकने जरी ती प्रकाशित करता येत असली तरीही आधी पण्णास कविता जमल्या नाहीत म्हणून फाडून टाकायला हव्यात. आणि अरूण म्हात्रेंच्या कवितेसारखं,

जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे
ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची

गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे
सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची

फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची

काही लिहिलं की पुढे जन्मभर काही लिहिण्याची गरज नाही! :)

बॅटमॅन's picture

8 Dec 2012 - 1:42 am | बॅटमॅन

रैट्ट यू आर :) विशेषतः

फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची

काही लिहिलं की पुढे जन्मभर काही लिहिण्याची गरज नाही!

याच्याशी दिलोजानसे तुंबा सहमत :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2012 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे

असे प्रतिसाद वाचले की मिपाकर झाल्याचं चीज झालं असच वाटतं... इतकी करमणूक करणारा दुसरा गद्य अथवा पद्य कलाविष्कार पहाण्यात नाही !

ज्ञानाच्या अभिषेकांने चिंब आणि वर हहपुवा झालेला...

धनंजय's picture

8 Dec 2012 - 1:24 am | धनंजय

छान.

मी कविता वाचली, तर मला आघातांच्या ठेक्याची लय जाणवली. अधूनमधून चरणांत ओढाताण होत असली, तरी बहुतेक ठिकाणी माझ्याकरिता लय स्पष्ट होती.

(अतिशय स्पष्ट लय :

हवे एक वचन तरी, गात तू रहाशील
...
भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी
जडावल्या पावलांनी चालत तू राही
...

माझ्याकरिता लय अगदीच हरवलेली ओळ :

पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद

काही यमके आवडली (समुद्रावर/प्रवासावर हे यमक अनपेक्षित, आधी चुकचुकणारे, पण लयीमुळे चपखल होणारे यमक!), तर काही बेडौल वाटली (मन/अंगण? त्यावेळी/कोवळी? यमक साधायचे ठरवले, तर आघातांच्या लयीचा विचका होतो).

आता कवी हारून शेख यांनीच म्हटले आहे, "आपल्याशी सहमत." ही सहमती म्हणजे काय? हारून शेखना रचण्याच्या वेळीसुद्धा कुठलीही लय जाणवली नाही अशी सहमती आहे काय? खुद्द कवीला लय जाणवत नसेल, तर मला लय जाणवते, असा आग्रह मी करणार नाही. ("मला लय जाणवली नाही" असा शब्दही फिरवणार नाही. आग्रह करणार नाही, इतकेच.)

लयीत आणि यमकांत सफाई नाही, इतपत कवीची सहमती असेल, तर चांगले. मलाही तसेच जाणवते. पण सरावाने सफाई येईल. हा प्रयत्न छान झाला आहे.

हारुन शेख's picture

8 Dec 2012 - 2:54 am | हारुन शेख

अजून कवितेत सफाईदारपणा नाही याचीच सहमती. कविता अगदी फसली नाहीय तरी एकदम जमलीपण नाहीय. मनातले एक चित्र आणि कल्पना मांडतांना यमकांची ओढाताण झालीय हे प्रामाणिकपणे कबूल करतो. कवितेचे पहिले कडवे सुचले तीच लय उचलून ती उलगडायचा प्रयत्न केला. लय आहेच त्यामुळे ती जवळ जवळ सगळ्यांना जाणवली आहे. एक आर्त भाव मनात होता तोपण पोचता होतोय. टाकतांना घाई केली हेही मान्य. पण नवे काही केले कि ते share करण्याच्या अनावर वृत्तीवर संयम आता शिकून घ्यावा लागेल. खूप जोरात पळता आले कि हवेतही उडता येते असे वाटणार्यांना मिपाकर बरोब्बर आंटीधप्पा देऊन पाडतात. मायबाप मिपाकरांचे आभार.

इष्टुर फाकडा's picture

8 Dec 2012 - 3:45 am | इष्टुर फाकडा

कविता भिडली ! पराशी सहमत, प्रतिसाद वाचून चिकित्सेत दु:ख असते असे का म्हणतात याचा पुनह्प्रत्यय आला :)

शेख च्चच्चा कविता आवडली . पूढिल लेखनास शुभेच्छा !
आणि जे जे वाटेल ते लिहा आणि शेअर करा . तरच त्यातल्या चांगल्या
वाईट गोष्टीन्चा प्रत्यय येईल .

( डरो मत .. मय हु ना ! :) )

हारुन शेख's picture

8 Dec 2012 - 8:14 am | हारुन शेख

शेख च्चच्चा, दुसरं संबोधन नाही काय हो सुचलं. चचा हे वयाने अंमळ वडिल माणसाला वापरायचं संबोधन आहे. निदान मला तरी तसे वाटते. आत्ता कुठे २९ सुरु आहे. तेवढ्यात चचा. एक तुम्हाला म्हणून सांगतो ज्याचं 'चचण्याचं' वय जवळ आले आहे ते 'चचा' अशी एक व्याख्या आहे ब्वा आपली. :) आणि हो आपका सल्ला सरआंखो पर. उसको लक्षात रक्खेंगे. ThanQ.

:-/
काय म्ह्नायचं मग तुमाला ??
शी बै .. आजकाल प्रेमाने कुणाला कायपण म्हणायची सोयच राहिलि नै .. :-/

ज्ञानराम's picture

8 Dec 2012 - 10:42 am | ज्ञानराम

तीला थोडीच माहीत होतं तुमचं वय २९ आहे ते....!!! ;)

पूजामुळे चर्चा झाली तीचे आभार. या चर्चेतून संकेतस्थळावरच्या कवितांचा दर्जा सुधारेल अशी आशा व्यक्त करून चर्चा संपन्न करतो.

मोदक's picture

8 Dec 2012 - 5:45 pm | मोदक

चर्चा संपन्न करतो.

मनापासून आभार.

या निमित्ताने तुमची काव्यक्षेत्रातली जाणकारी पाहून एक नम्र सुचवणूक. तुम्ही "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक लिखाण केले तर माझ्यासारख्या सदस्यांना काव्य विभागात सक्रिय सहभागी होता येईल.

आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2012 - 5:47 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.

आता काय पाळणाघर काढणार का काय संजय काका? ;)

अखिल सिंव्हगड रोद अधिक धायरी प्रभाग साहित्य संघाच्या सदस्यांना ' "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक ' याची गरज काय, एखादा /दी नवकवी व त्यांच्या जिलेब्या एवढ्या भांडवलावर तुम्ही प्रतिसादांची साम्राज्यं उभारु शकता,

संजय काका आभार कसले मानताय ?? लहानाना आशिर्वाद द्यावेत , आभार नसतात मानायचे :-/
आगेसे याद रखो हं :-/

सस्नेह's picture

8 Dec 2012 - 11:28 am | सस्नेह

आता 'समीक्षा करत रहा' असे एक विडंबनही यायला हरकत नाही.

सुधीर's picture

8 Dec 2012 - 3:01 pm | सुधीर

चर्चा आवडली. एका मुलाखतीत (बोरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या कार्यक्रमात) असं ऐकलं होतं की, बोरकरांसारख्या प्रतिभावान माणसाला कविता चालितच सुचायच्या. आता सगळेच कवी त्या प्रतिभेचे नसतील कदाचित. पण बर्‍याचवेळा छंद, मात्रा, यमक नसलेली भावस्पर्शी कविता (कुणी गद्य म्हणेल) खूप आवडून जाते आणि "दाद द्याविशी वाटते".

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Dec 2012 - 3:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

इतकी साल काढू नका हो कवितेची...
संदिप दा मला एकदा म्हणाला होता...

जे सुचतय तसचं उतरवायचं राव, ते मीटर, वृत्त, यमक गेलं चुलीत..
आधी खुप वाच, सगळं वाच, बहीणाबाई पासून ते अगदी चेपूवरच्या नवकवींपर्यंत सगळ वाचत जा...
पण तेच लिही जे तुझ्या आतून येतं.
तुझ्यात प्रतिभा असेल तर ती दिसेलचं, नसली तरी काही बिघडत नाही, तुझा तुला आनंद नक्की मिळेल.

आता असे काही ऐकल्यानंतर कोणाला हात आवरता येणार आहे सांगा? म्हणून मी लिहीतो ;)

जयंत कुलकर्णी's picture

8 Dec 2012 - 4:25 pm | जयंत कुलकर्णी

मला वाटते कवितेचे दोनच प्रकार असतात. एक तुम्हाला भावते ती आणि दुसरी जी भावत नाही. बाकी सगळे झूट ! कवितांच्या टिकाकारांचे अनेक ग्रंथ वाचून मी हे मत बनविलेले आहे. "उदा. "मोकालाया दाही दिशा" ही सर्वोकृष्ट विनोदी कविता आहे तर "मोकळ्या दाही दिशा" हीही एक चांगली कविता आहे. संदीपच्या बायकी कविता काही जणांना भावतात तर काहींना सावरकरांच्या दाहक.........तर हे असे आहे..........
मग चांगली कविता व वाईट कविता हा वाद का होतो ? कारण स्पष्ट आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या विचारसरणीत आहे.
असो.
मला स्वतःला श्री. खान यांची पहिली गज़ल आवडली होती त्या तुलनेत ही एवढी नाही आवडली.......पण मी फक्त एवढेच म्हणेन......कारण वर दिलेलीच आहेत.

जेनी...'s picture

8 Dec 2012 - 8:28 pm | जेनी...

काहि म्हणा ...
आत्तापर्यंत साध्या कवितेवर इतकि चर्चा कुठेहि वाचायला मिळाली नव्हती .
मागे एकदा सांजसंध्याच्या कवितेवर चौराकाक्सनी पण अशीच चर्चा केली होती .
पण हारुन्याला कविता मिपावर टाकल्याचं सार्थक झालं असं वाटायला हरकत नाहि ;)
( आता च्चच्चा नाहि म्हटलं हं .... दोस्तीमे ' हारुन्या ' बोलाय देखो :-/ )

चिगो's picture

9 Dec 2012 - 11:37 pm | चिगो

मग आता संदीपची "नास्तिक” ही कविता हाय का नाय? नाही म्हणजे यमकाबिमकात फारशी अडकत नाही म्हणून म्हटलं..